सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ आक्रमण – श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
बावीसावं शतक. एक दिवस देशात अघटित घडलं. मोठं संकट सर्वांवर आलं. सकाळी लोक उठले आणि बघितलं, तर काय? सगळीकडे फुलपाखरंच फुलपाखरं. खेडी, लहान-मोठी गावं, शहरं, महानगरं कुठेही बघा. फुलपाखरंच फुलपाखरं. शेतात फुलपाखरं, अंगणात फुलपाखरं, घरात फुलपाखरं, गल्ली-बोळात फुलपाखरं, बाजारात फुलपाखरं, रस्त्यात-चौकात फुलपाखरं. करोडो-अब्जांच्या संख्यने फुलपाखरंच फुलपाखरं. ऑफीसमध्ये फुलपाखरं होती. मंत्रालयात फुलपाखरं होती. न्यायालयात फुलपाखरं होती. इस्पितळात फुलपाखरं होती. फुलपाखरं इतक्या मोठ्या संख्येने होती, की माणसं कमी आणि फुलपाखरंच जास्त झाली.
सामान्य जन-जीवन पूर्णपणे अस्ताव्यस्त झालं. असं वाटत होतं की जसं काही फुलपाखरांनी देशावर आक्रमण केलय. दिल्लीत संसदेचं सत्र चालू होतं. फुलपाखरं मोठ्या संख्येने लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये घुसली. प्रेक्षकांच्या गॅलरीत फुलपाखरंच फुलपाखरं भिरभिरू लागली. अध्यक्ष आणि सभापतींच्या आसनांच्या चारी बाजूंनी फुलपाखरंच फुलपाखरं फडफडू लागली. अखेर दोन्ही सदनांची कारवाई दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. राज्यातही विधानसभा आणि विधान-परिषदेची कारवाई दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. सुरक्षा यंत्रणा सावध झाली. फुलपाखरांच्या देशावरील आक्रमणात शेजारी देशाचा तर हात नसेल. हे त्यांचच षडयंत्र तर नसेल? विचार सुरू झाला.
सगळ्या देशात आरडा-ओरडा, रडणं-भेकणं सुरू झालं. रस्त्यातील वाहतूक बंद झाली. न्यायालयातील कारवाई दिवसभरासाठी स्थगित केली गेली. शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आली. मंत्रालयात, ऑफिसात काही काम होत नव्हतं. इस्पितळात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला कारण आपत्कालीन सेवा कक्षात मोठ्या संख्येने फुलपाखरं घुसल्याने नर्सेस आणि डॉक्टर रुग्णांकडे नीट लक्ष देऊ शकत नव्हते. ऑपरेशन-थिएटरमध्ये फुलपाखरं भिरभिरत असल्याने ऑपरेशन्स स्थगित करावी लागली. फुलपाखरं इतक्या मोठ्या संख्येने भिरभिरत होती की त्यांनी सूर्याला झाकून टाकलं होतं. भर दुपारी अंधार पडला. रेडिओ आणि टी. व्ही. यांचं प्रसारण बाधित झालं. टेलीफोन सेवा ठप्प झाली.
सगळे आवाक झाले. कुणालाच समाजत नव्हतं की हे अचानक काय झालं? सरकारवर आपत्ती कोसळली होती. प्रशासन लाचार दिसत होतं.
सुरुवातीला लहान मुलांना मजा वाटली. ती फुलपाखरांशी खेळू लागली, पण जेव्हा परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव लोकांना झाली, तेव्हा त्यांची शुद्ध – बुद्ध हरपली. असं नाही, की त्यांनी या समस्येवर काहीच इलाज केला नाही. बेगॉन स्प्रेपासून ते सगळ्या प्रकाराची कीटक नाशके फुलपाखरांच्या फौजेवर फवारली गेली. पण त्यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. पोलिसांनीही आपल्या परीने स्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. देशात अनेक ठिकाणी फुलपाखरांवर अश्रू धुराचे गोळे फोडले. त्यांच्यावर लाठीमार केला. काही ठिकाणी त्यांच्यावर फायरिंगसुद्धा केलं. पण काही उपयोग झाला नाही. फुलपाखरांची संख्या इतकी अतोनात होती, की गोळ्या कमी पडल्या. विमान आणि रस्त्यावरील वाहतुकीवर फुलपाखरांच्या अस्तित्वाचा खूप वाईट परिणाम झाला. जागोजागी दुर्घटना झाल्या. त्यात अनेक लोक मेले. शेवटी वैज्ञानिकांनी काही फुलपाखरे पकडली आणि ‘ एलेक्ट्रोन माइक्रोस्कोप ‘खाली त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या हैराणीला सीमाच उरली नाही. त्यांना दिसलं की फुलपाखरांच्या पंखांवर बारीक अक्षरात कुठलं ना कुठलं आश्वासन लिहिलय. मग हे कोडं उलगडलं. ही फुलपाखरे म्हणजे करोडो, अब्जावधी आश्वासने आहेत. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यानंतर पुढार्यांनी, अधिकार्यांनी गेल्या अनेक वर्षात जी आश्वासने दिली होती, पण पूर्ण मात्र केली नव्हती, ती सगळी खोटी आश्वासने, फुलपाखरे बनली होती.
ही बातमी सगळ्या देशात वणव्यासारखी पसरली. लोक चर्चा करू लागले, एक ना एक दिवस हे होणारच होतं. खोटी वचने, पोकळ आश्वासने किती काळ देणार? एक ना एक दिवस पापाचा घडा भरणारच की!
इतिहासकारांनी ताबडतोब एक आपत्कालीन बैठक बोलावली. सरकारला आठवण करून देण्यात आली, की शेकडो वर्षांपूर्वी विश्वातील पहिले गणतंत्र राज्य वैशाली होते. याच प्रकारच्या प्रकोपामुळे ते नष्ट झाले होते. ज्या लोकशाहीत नेते, पुढारी, अधिकारी खोटी वचने आणि पोकळ आश्वासने देतात, त्या लोकशाहीची परिस्थिती वैशाली गणतंत्रासारखीच होते. भविष्यवेत्त्यांनीही इतिहासकारांच्या या बोलण्याचं समर्थन केलं.
हे सगळं ऐकून सरकार सक्रीय झाले. एक सर्व पक्षीय बैठक बोलावली गेली. बैठकीत वैज्ञानिक, इतिहासएचे अभ्यासक आणि भविष्यवेत्ते यांच्या बोलण्यावर चर्चा झाली. पण एक तर चारी बाजूंनी फुलपाखरेच फुलपाखरे भिरभिरत होती. दुसरं म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपच्या अशा फैरी झडत होत्या, की त्यातून कोणताच निर्णय होऊ शकला नाही. या अशांत काळातही हे शाबीत करण्याची दोन्ही पक्षात चढाओढ लागली होती, की खोटे वायदे कुणी जास्त केले होते आणि कुणी कमी.
घरा-घरातदेखील असाच परिणाम दिसत होता. पती-पत्नीने एकमेकांना, आई-वडलांनी मुलांना खोटे वायदे केले होते, आश्वासने दिली होती. ते सगळे खोटे वायदे आणि आश्वासने असंख्य फुलपाखरे बनून घरात चारी बाजूंनी भिरभिरत होती आणि घरवाल्यांना सतावत होती.
जे वायदे १९६०च्या दशकाच्या आधी केलेले होते, ते ‘ ब्लैक-अॅंड-व्हाइट ‘ फुलपाखरांच्या रूपात चारी बाजूंनी फडफडत होते. सिनेमात रंगीत युग आलं, त्यानंतर केलेले वायदे रंगीत फुलपाखरांच्या रूपात चारी बाजूंनी फडफडत होते.
अशा तर्हेने पूर्ण दिवस सरला. या समस्येवर कुठलाच उपाय सापडला नाही. रात्रीचे बारा वाजून गेले आणि सगळ्या फुलपाखरांचं रूपांतरण झालं आणि ते टोळ बनून लोकांवर हल्ला करू लागले. त्यांच्या निशाण्यावर विशेष करून मंत्री, राजनेते, आणि अधिकारी होते. ते घरात घुसून झोपलेल्या लोकांवर हल्ले करू लागले. सगळीकडे हाहाकार मजला. स्थिती वाईटापेक्षा वाईट होऊ लागली.
अखेर सकाळी चार वाजता कॅबिनेटची एक आपत्कालीन बैठक झाली. सरकारने निर्णय घेतला, की सगळे अपूरे वायदे आणि आश्वासने एका निश्चित कलावधीत पूर्ण केली जातील. दुसरा कुठला उपायच नव्हता. टोळधाडीचे हल्ले चालूच होते. हे मोठं कठीण काम होतं. अपूरे वायदे आणि आश्वासने यांची संख्या कोटी, अब्जावधी होती. तेवढ्याच संख्येने टोळ होते. जेव्हा एखादा अपुरा वायदा किवा आश्वासन पूर्ण व्हायचं, तेव्हा एक टोळ गायब व्हायचा. पण कोटी – अब्जावधी वायदे आणि आश्वासने पूर्ण व्हायला वर्षे लागली. तेव्हा कुठे देशातील टोळधाडीचा कहर समाप्त झाला आणि देशाची स्थिती सामान्य झाली.
या बातमीचा परिणाम सगळ्या दुंनियेत झाला. बाबीसाव्या शतकाचा इतिहास याला साक्षी आहे, की दुसर्या देशातील राजनेते आणि अधिकारी यांनी टोळ्धाडीच्या भयाने आपल्या देशात केलेले सगळे अपुरे वायदे आणि आश्वासने पूर्ण केली.
मूळ हिन्दी कथा – “हमला“
मूळ लेखक : श्री सुशांत सुप्रिय
मो: 8512070086
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




