श्री मंगेश मधुकर
☆ अंधार… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
उन्हाळ्यातली संध्याकाळ फारच आल्हाददायक असते. दिवसभर आग ओकणारा सूर्य अस्ताला गेल्यावर वाहणारा वारा जीवाला फार सुखावतो. अशाच एका संध्याकाळी, सात-साडे सातच्या सुमारास लाइट गेले. काही क्षणांपूरता गडद अंधार. ताबडतोब मोबाइल टॉर्च सुरू झाल्या. अंधार एकदम फिका पडला.
लाइट जाणं ही काही विशेष बाब नाही. उन्हाळा–पावसाळ्यात ये-जा सुरू असते पण अर्धा तास झाला तरी लाईटचा पत्ता नव्हता. असह्य उकडत होतं. मोबाइलमध्ये तोंड खुपसलेल्या लेकीकड पाहत बायको कडाडली
“जरा ठेव की बाजूला तो डबा. ”
“एक मिनिट, काहीतरी महत्वाचं चाललंय” मोबाइलवरची नजर न हटवता लेकीचं उत्तर. बायकोच्या ओरडण्याचा शून्य परिणाम.
“निदान अंधारात तरी फोन बाजूला ठेव. आत्ता रील्स पाहिल्या नाहीत तर काही बिघडणार नाही. जरा डोळ्यांचा विचार कर” बायकोच्या बोलण्याकडं लेकीनं दुर्लक्ष केलं तेव्हा मला मधे पडावं लागलं. मोबाइल टीपॉयवर ठेवत जाहीर केलं “लाइट येईपर्यंत कोणीही मोबाईलला हात लावायचा नाही सगळ्यांनी फोन इथं ठेवा”
“बाबा, काहीही काय”लेक वैतागली.
“मोबाइल नाही मग करायचं काय”चिरंजीव
“शांत बसायचं”बायको.
“म्हणजे” लेक आणि चिरंजीवांनी एकदमच विचारलं.
“निवांत बसा. आधी तो टॉर्च बंद करा. जरा अंधारच असू द्या. रोजच्यापेक्षा वेगळा अनुभव. ”
“आता आपण इनव्हरटर घेऊ. ”लेक
“काही गरज नाही. लाइट नेहमी जात नाहीत आणि गेलीच तर मोबाइल, मेणबत्ती आहेत. उगीच फालतूचा खर्च नको. ” माय-लेकीत वादावादी सुरू झाली.
“एक मिनिट. दोघी गप्प बसा. मस्त अंधार आहे. खूप दिवसांनी सगळे निवांत आहोत. गप्पा मारू. ”
“कोणाशी? ”चिरंजीव
“एकमेकांशी”मी
“कसं शक्यय. नॉट पॉसिबल”लेक
“इट्स हॉरीबल”चिरंजीव.
“त्यात हॉरीबल काय?? आम्ही इतकेही आऊटडेटेड नाही की तुमच्याशी गप्पा मारू शकणार नाही. ”बायको.
“बघितलत. मातोश्री लगेच सेल्फ पिटी मोडवर गेल्या. ”
“बरोबरयं. तुम्ही ओव्हर रिएक्ट करताय. ”
“ओके, सॉरी!! सांगा कोणत्या विषयावर गप्पा मारायच्या. ” चिरंजीव.
“ अंधार ”
“त्यावर काय बोलणार”
“खूप काही आहे. अंधार म्हटलं की काय वाटतं”
“त्यात काय वाटायचं. लाइट गेले की टॉर्च सुरू करायचा. अंधार गायब. एवढंच आहे. ”
“म्हणजे अंधार माहितीच नाहीये. ”
“तुमची चूक नाहीये. दिवस-रात्र असलेल्या उजेडामुळं अंधार त्यातही गडद अंधार तुम्ही अनुभवलाच नाही. ”बायको.
“गडद अंधार, व्हॉट इज दॅट” इंग्लिश मिडियमचे चिरंजीव वदले.
“टोटल डार्क, काहीच दिसत नाही. ब्लॅक आउट”लेकीचा खुलासा.
“आमच्या लहानपणी असा अंधार झाला की आकाशतलं चांदणं दिसायचं आणि आता फक्त एक चंद्र अन थोड्याफार चांदण्या दिसतात. “बायको.
“पूर्वी लाइट गेले की बराच वेळ येत नसतं. दिवसा काही वाटायचं नाही पण संध्याकाळी लाइट गेले की रॉकेलचा दिवा लावला जायचा नंतर त्याची जागा मेणबत्तीनं घेतली आणि मग एकेक नवीन प्रकार येत गेले. मोबाइल नसल्यामुळे मोठी माणसं गप्पांमध्ये हरवायची आणि मुलं!!! . ”बायको.
“आणि अंधार म्हणजे मुलांसाठी लॉटरी. स्पेशल खेळ सुरू व्हायचे. ”बोलताना माझं मन जुन्या काळात गेलं.
“स्पेशल खेळ???? ”लेक
“हो, अंधार स्पेशल”
“ लपाछपी तेही अंधारात खेळताना जी मजा येते ती इतर कशात नाही. ज्याच्यावर राज्य आजच्या भाषेत ‘डेन’ त्याचे सगळयात जास्त हाल. अंधारात चेहरा ओळखणं अवघड त्यात आम्ही मुलं शर्टची अदलाबदल करायचो त्यामुळे फार धमाल यायची. अजून एक खेळ म्हणजे डब्बा ऐसपैस. ”
“अशा नावाचा खेळ असतो”चिरंजीव.
“हो, रिकामा डब्बा लांब फेकायचा. ज्याच्यावर राज्य तो डब्बा आणून एका जागेवर ठेवतो आणि लपलेल्यांना शोधतो. त्याच्या नजरेस न पडता डब्बा लाथेनं उडवला मग पुन्हा राज्य. खेळताना आरडाओरडा, मस्ती, भांडणं सगळा गोंधळ. ज्याच्यावर राज्य तो पार रडकुंडीला यायचा. ”
“बाबा, हे इंटरेस्टिंग आहे”
“अजून एका गंमत म्हणजे अंधारात हमखास भुतांच्या गोष्टी सुरू व्हायच्या. हडळ, वेताळ, खवीस मंडळीबद्दल भीती वाटायची पण खूप उत्सुकता असायची. भान हरपून ऐकलं जायचं. जास्त घाबरलेले काही ना काही कारणं सांगून घरी पळायचे. आजूबाजूला किवा झाडावर कोणीतरी आहे असले भास व्हायचे त्यावरून एकमेकांना घाबरवणं सुरू व्हायचं. भूत आणि कंपनी यांचा अंधाराशी जवळचा संबंध असल्यानं गप्पांमध्ये भारी एक्साईटमेंट असायची. ”बोलताना मला लहानपणीचे दिवस आठवले.
“आता असं काहीच नाही. यू आर सो लकी. ”लेक.
“काळाबरोबर सगळं पार बदललं. आता अंधारच नाही आणि मुलं मोबाइलवर बिझी असतात. ”
“किर्रsssर्र काळाकुट्ट अंधार आता फक्त स्क्रीनवर पहायला मिळतो. अनुभवता येत नाही. गावाकडं थोड्याफार प्रमाणात शिल्लकयं पण शहरात तर अजिबात नाही. ”बायको.
“आणि आजकाल अंधाराची सवयच नाही. लाइट गेले की लगेच टॉर्च लाइट ऑन. नेहमी कामापुरतं बोलणारे आपण आज गप्पा मारतोय. इतक्या वेळेत मोबाइलची आठवण सुद्धा झाली नाही. ”
“थॅंक्स आई-बाबा आणि नवीन माहितीय मिळाली. आता एक भुताची स्टोरी सांगा. ” चिरंजीव उत्साहानं म्हणाले.
“नक्की सांगतो. ऐक, मी नववीत असतानाची गोष्ट… होळीसाठी मित्राच्या गावी गेलेलो. एकदम खेडेगाव. अशा ठिकाणी राहण्याचा पहिलाच प्रसंग, दिवस मावळला. लाइट नाही. संध्याकाळी जोरात पाऊस सुरू झाला. अनोळखी गांव, गडद अंधार, विजांचा कडकडाट, कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज, मिणमिणता दिवा, ओसरीवर कोपऱ्यात गोधडी लपेटलेली मित्राची जख्ख म्हातारी आजी, तिचे भीतीदायक मोठाले डोळे पाहून नेमकं भुतांचे सिनेमे आठवले. जाम घाबरलो आणि….. ” इतक्यात घरातले लाइट आले पण चिरंजीवांनी धावत जाऊन पटापट सगळी बटनं बंद केली. पुन्हा अंधार. मी गोष्ट पुढे सुरू केली.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






