सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ पाऊस आणि आठवणी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“सावन आया बादल आए, मोहे पिया नही आए… “1975 साली रिलीज झालेल्या “जान हाजिर है” या सिनेमातील हे गाणं! खरंतर मला हे गाणं माहिती नव्हतं, कारण आम्ही त्यावेळी राजेश खन्ना, अमिताभ बच्चनच्या प्रेमात होतो! त्यामुळे अर्थातच राजेश खन्ना, अमिताभचे पिक्चर आणि त्यातील गाणी पाठ होती. पण हे गाणं ह्यांच्या आवडीचं होतं आणि आज बाहेर पाऊस पाहताना मला हे गाणं आठवतंय! हे तर आता परतून येणार नाहीत, पण ते गाणं मनात आहे! ह्यांनी ऐकवलेले ते गाणे आता माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थानं मी अनुभवते आहे.

तेव्हा आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही पाटणला मे महिन्याच्या अखेरीस बिऱ्हाड केलं त्यामुळे लगेचच पावसाळा सुरू झाला! कोकण आणि देश यांच्या बॉर्डर वरचं पाटण हे गाव! तिथे पाऊस ही भरपूर असे. आमचा क्वार्टर गावाबाहेर एका डोंगरावर असल्यासारखाच होता. आणि घराच्या दारात बसलं की समोरही डोंगरदऱ्याच दिसत असत! पाटणला पाऊस भरपूर पडत असे. इतका की घराबाहेर पडताच येत नसे. त्यावेळी घरात टीव्ही ची करमणूक नव्हती. ट्रांजिस्टर, टेप रेकॉर्डर सुद्धा नव्हता आमच्याकडे! त्यामुळे फक्त गाणी आठवणं आणि गुणगुणणे! …. डोळ्यातला पाऊस आणि बाहेरचा पाऊस…. कधी रिमझिम येतोय, कधी कोसळतोय तर कधी बरसतोय एका लयीत! “सावन आया, बादल आए, मोहे पिया नही आए’ ह्या गाण्याप्रमाणे हे पण आता परतून येणार नाहीत, हे सत्य मला मान्य करावं लागतं आहे!

पावसाची गाणी हा तर लेखनाचा आवडता विषय! “रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,.. ” हे एक गाणं अमिताभ आणि मौसमी वर चित्रित झालेलं, दरवर्षी पाऊस आला की या गाण्याची आठवण येतेच येते!

” सावन का महीना पवन करे शोर…. ” हे ही असं च चिरतरूण

गाणं सुनील दत्त आणि नूतन च्या

“मीलन” मधील!

अशी कित्येक हिंदी गाणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात जपलेली असतात आणि आपल्या ला भावुक करत असतात..

” घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा.. “मराठीतील सुप्रसिद्ध पावसाळी गीत!

अशी कित्येक गाणी आपला पावसाचा आनंद द्विगुणीत करत असतात!

पावसाळा ऋतूच मोठा मजेदार! मजेदार अशासाठी की पाऊस नसला तरी प्रॉब्लेम, जास्त झाला तरी प्रॉब्लेम! कामावर जाणाऱ्यांची तर पावसाळ्यात फार चिडचिड होत असते! रोज ट्रॅफिक जॅमला तोंड देणे, कधी पावसामुळे रस्ता बंद होणे तर कधी एखादा पूल धोकादायक तर कधी एखादं धरण! पावसाचा फटका कसा बसेल सांगता येत नाही!

पण पाऊस आठवावा लागत नाही! पाऊस आला की आपोआपच पावसाच्या आठवणी मनामध्ये रुंजी घालू लागतात. असं वाटतं की इतके पावसाळे आपण पाहिले पण पावसाचं प्रेम काही कमी होत नाही! कदाचित बालपण कोकणात गेल्यामुळे मला पावसाची आपुलकी अधिक वाटत असेल! बाहेर बरसणाऱ्या

पावसाच्या सरी, कौलावरून येणारे त्याचे ओघळ, घरामध्ये असणारा बऱ्यापैकी अंधार, – कारण पावसाळ्यात लाईट जाणे कायमच असायचे, मग आम्ही कंदीलाच्या प्रकाशात संध्याकाळी आईच्या भोवती भोवती करत असू. वडील बरेच वेळा फिरतीवर असायचे. त्यामुळे माझे दोन भाऊ आणि मी आई भोवतीच असायचो..

त्या अंधाऱ्या रात्री आई मऊ भात, कधी खिचडी तर कधी

कुळीथाचे पिठलं आणि भात, पापड असे मेनू करीत असे.

हे पदार्थ गरम गरम खाताना खूप आनंद मिळत असे. आधुनिक काळात आपण काही काही गोष्टी विसरून गेलो किंवा त्या मिळेनाशा झाल्या हे मात्र मनाला जाणवत असते.

वयाने सत्तरीचा टप्पा ओलांडला आणि नकळत मन सातव्या वर्षाकडे जात राहिले! बरेचदा आत्ता घडलेल्या गोष्टी आठवत नाहीत पण जुन्या गोष्टी मात्र मनाच्या कोपऱ्यात घट्ट धरून राहिलेल्या असतात आणि पुनरावलोकन करताना पहिल्यांदा आठवतं ते आपलं बालपण!

काळ बदलला, पावसाचं रूप ही बदललं! कधी तो वेळेत येतो, कधी नाही! बाहेरच वातावरण बदललं, रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले, लाईट जाणं कमी झालं, घर स्लॅबची झाली, त्यामुळे घरात

पाणी गळणे, ओल येणे कमी झाले! या ओली बरोबरच या सगळ्या गोष्टी प्रेमाची ओढ घेऊन गेल्या! प्रत्येक गोष्टीत आधुनिकता आली पण नकळत प्रेम, मायेची ओल ही कमी झाली. पावसात भिजून आल्यावर गरम गरम चहा आणि भजी किंवा तत्सम पदार्थ खाण्याची लज्जत मात्र कमी झालेली नाही. अजूनही पावसाचं नातं कांदा भज्याशीच जोडले जाते… आणि मग कॅलेंडर कडे लक्ष जातं, अरेच्चा, आषाढी एकादशी जवळ आली, तेव्हा कांदेनवमी चा कांदा भज्याचा बेत व्हायलाच पाहिजे! पूर्वीच्या काळी पुढे चार महिने कांदा खायचा नाही म्हणून कांदे नवमीचे महत्त्व असे, पण आपण आता बारा महिने कांदा खातो, तरीही कांदे नवमी ते कांदे नवमीच! तिचा आनंद तर घेतलाच पाहिजे आणि त्याचबरोबर जुन्या प्रत्येक आठवणी बरोबर एक एक भजं तोंडात टाकताना घेत असलेला आनंद एकमेकांबरोबर शेअर केला पाहिजे!

अशा या पावसानं नेहमीप्रमाणेच मला आठवणींच्या पावसात भिजवून टाकले! दरवेळी पाऊस सुरू झाला की मनामध्येही आठवणींच्या पावसाची बरसात चालू होते आणि ती व्यक्त करायला लिखाण हे होत राहिलंच पाहिजे, खरं ना!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted