सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ दीपपूजनाच्या निमित्ताने… दिव्यांची आवस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
दीपपूजनाच्या निमित्ताने…
दिव्यांची आवस.
आषाढी अमावास्या, म्हणजेच दीप पूजनाची अमावास्या.
आपल्याकडे वंशाला दिवा हवा असे म्हणतात.
थोडक्यात वंशवृद्धी किंवा असलेल्या वंशावळीचे रक्षण व्हावे यासाठी हे दीपपूजन. घरात दीप पाहून लक्ष्मी देखील आत येते असे म्हणतात आणि म्हणूनच त्या लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घरातील दिवे लख्ख उजळून लावणे म्हणजेच समृध्दी व ऐश्वर्य यांचे प्रतिक आहे.
इतर अमावस्या आपल्याकडे अशुभ मानल्या जातात, परंतु ही दीपअमावास्या किंवा लेकुरवाळी अमावास्या ही शुभ मानली जाते. तसेच दिवाळीतील लक्ष्मी पूजनाची अमावस्या देखील शुभ मानली जाते. इतर अमावस्या अशुभ समजल्या जातात.
घराघरातून मातीची ठाणाई ( मांडीवर लेकरासहित) तयार करतात, तिच्या हातात दीप दिला जातो व दोऱ्यानी सुतवले जाते. आणि मग तिची यथासांग पूजा करून तिला पुरणाचा नैवेद्य दाखवून तिची आरती केली जाते व आमच्या वंशाचे रक्षण व वंशवृद्धी साठी प्रार्थना केली जाते.
आपल्याकडे दिव्यांचे विविध प्रकार आहेत. विविध प्रसंगी विविध ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतात. या दिवसात पावसाळी हवा असते. बरेचदा अंधारून येते. त्या साठी घरातील दिवे हाताशी असतील तर शोधाशोध करावी लागत नाही. म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्ताने सगळे दिवे साफ करून ठेवले जातात.
या सणाचे वैज्ञानिक महत्व म्हणजे, आत्तापर्यंत आपण जो आहार केला होता तो आता करायचा नाही तो गतहार झाला. आता चार महिने पचनास हलके अन्न घ्यायचे. या दिवसात पचनशक्ती कमी झालेली असते. म्हणून हलके व सात्विक अन्न घ्यावे.
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे.
◆ आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया:
१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.
२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथींना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.
अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
◆ या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच.
१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.
२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात. त्यात बऱ्याच औषधी वनस्पती असतात. त्याचा फायदा वर्षभर होतो.
३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.
४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात.
५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.
चातुर्मासात वेगवेगळी व्रते केली जातात. काही मंडळी नक्तव्रत करतात. ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले असते. ही व्रते करण्यामागे सात्विक भाव वाढावेत हा उद्देश असतो. आपले सगळेच सण त्यातील पूजा, आहार, कपडे, व्रते हे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असतात.
दिव्यांच्या आमावस्येची पूर्वी सांगितलेली कहाणी सर्वांना माहिती असेलच. त्यातून खूप बोध मिळतो. या कहाण्या पूर्वीच्या असल्याने त्या काळाला अनुसरून लिहिलेल्या होत्या. पण त्यातील बोध मात्र त्रिकाल आबाधित आहे. याच कहाणीत किती महत्वाच्या बाबी समजतात.
१) घरातील व्यक्तींची काळजी घ्यावी.
२) माणसात देव बघावा.
३) हलक्या कानाच्या किंवा ज्यांना कमी समज आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.
४) प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळून बघावी.
ही तत्वे नुसती सांगून आचरणात येतीलच असे नसते. म्हणून त्याला काही उदाहरणे/अनुभव/गोष्टी जोडाव्या लागतात. म्हणून आपल्याकडे कहाण्या आवडीने वाचल्या जातात. आज आमच्या प्रत्येक शाळेत दिव्यांचे विविध प्रकार, त्यांचे उपयोग, महत्व तसेच आजच्या दिवसाचे महत्त्व सांगून दीपपूजन केले जाते.
असे आपले सगळेच सण सर्व दृष्टीने परिपूर्ण असतात.
शुभंरोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिनिशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।
दीप ज्योती: परब्रम्हा दीपज्योतीजनार्दन:।
दीपो हस्तुं पापं दीपज्योतीर्नमोऽस्तुते ।
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





