श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या… – भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे 

विचारशक्ती, बुद्धीप्रामाण्य, विवेकबुद्धी आणि संशोधन यातून प्रतीत होणारं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान असे मी मानतो. म्हणजे तेच ब्रह्म आणि तेच सत्य.

ब्रह्म म्हणजे अंतिम सत्य.

ब्रह्मा / ब्रह्मदेव म्हणजे विश्वाचा उद्गाता.

म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांडाचा निर्माता. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असे. म्हणजेच अंतिम सत्य. म्हणजे कधीही न गवसणारे सत्य. कारण त्याला अंत नाही. याचाच सरळ शब्दात अर्थ म्हणजे सत्य हे सतत उलगडत जाणारी गोष्ट आहे. जितका शोध घेऊ तितकं ते अधिक उलगडत जातं आणि तेवढं अधिक ज्ञान प्राप्त होत राहतं. म्हणूनच विज्ञान व संशोधन या सर्व गोष्टी या अनंत आहेत. याला शेवट नाही. म्हणूनच जगामध्ये अंतिम सत्य नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. आपण सतत तर्कशक्ती, विचारशक्ती आणि संशोधन यामध्ये कार्यरत राहिलं पाहिजे. म्हणजे सत्याच्या मार्गावर, म्हणजेच ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर आपण सतत पुढे पुढे जात राहू. विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन याचा अर्थ हाच आहे. अज्ञात गोष्टी अनंत आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे कधीच कुणाला होऊ शकणार नाही. कितीही ज्ञान प्राप्त झालं तरी त्यापुढे काहीतरी आहेच. म्हणूनच विज्ञान मार्गाने सतत संशोधन करत राहणे आणि प्रगतीच्या मार्गावर जायचे असेल तर मिळालेले ज्ञान विवेक बुद्धीने वापरणे हाच खरा ज्ञानमार्ग आणि हीच खरी ब्रम्होपासना.

दृश्यज्ञानातून पुढे प्रगती करत अनुभव सिद्ध ज्ञान, त्यातून पुढे प्रगती करत संशोधन सिद्ध ज्ञान, त्यातून पुढे प्रगती करत विचार आणि तर्क शक्तीतून ज्ञानाचा विकास आणि विवेकशक्ती मधून ज्ञानाचा उपयोग या क्रमाने हा ज्ञानमार्ग असावा असे मला वाटते.

सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे दृश्य ज्ञान म्हणजेच जगामध्ये दिसणारं दृश्य ज्ञान. परंतु ते मिथ्या आहे, खरं नाही.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वरील चार निकषांवर सिद्ध झालेलं ज्ञान म्हणून ते सत्य आहे. पण मग ते अंतिम सत्य आहे का? असेलच असे नाही. सत्य मार्गा वरून जाताना ते सापडलेले सर्वात अलीकडचं ज्ञात सत्य आहे. सत्याच्या मार्गावरून जाताना एखाद्या गोष्टीचा शोध घेत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या पुढेच अंतिम सत्य असू शकते. म्हणजेच जसे जसे आपण या चार निकषांवर सत्याच्या मार्गावर पुढे पुढे जात असतो,

तसतसे आणखी नवनवे प्रश्न निर्माण होत जातात. त्या प्रश्नांच्या उत्तरा कडे जात असताना पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. अंतिम सत्य हे या सर्व प्रश्नांच्या उत्तरांच्या ही पुढे असले पाहिजे. त्यामुळे ज्ञात सत्य आणि अंतिम सत्य यात फरक केला पाहिजे. विज्ञान हा फरक जाणीवपूर्वक करत असते. कोणत्याही विज्ञानाने अथवा संशोधकाने असा कधीही दावा केलेला नाही की मी तर्काने गणिताने किंवा प्रयोगांनी सिद्ध केलेले सत्य हे अंतिम सत्य आहे. विज्ञानाचा कायम असाच दावा असतो की हे सत्य या चार मार्गांच्या चिकित्सांवरून जे ज्ञात झाले आहे ते ज्ञात सत्य आहे. विज्ञानाच्या दृष्टीने अंतिम सत्य ही कल्पना आहे. अनंत म्हणजेच इन्फिनिटी ही जशी कोणती एक संख्या नाही सर्व संख्यांच्या पलीकडची ही संकल्पना आहे. त्याच पद्धतीने अंतिम सत्याची कल्पना म्हणता येईल. म्हणजेच ब्रह्मज्ञान हे जर अंतिम सत्य म्हणून कल्पिले तर ब्रह्मज्ञान हे ज्ञानाच्या मार्गावरील अनंतत्व आहे.

‘ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या’

या वाक्याचा विचार करताना ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे असा करण्यापेक्षा अंतिम सत्यालाच ब्रह्म कल्पूया. अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म असे म्हणूया. या दृष्टीने या मंत्राचा विचार करणे आवश्यक आहे असे वाटते. या परिप्रेक्षातून जर विचार करावयाचा म्हटला तर जगामध्ये अंतिम सत्य असूच शकत नाही, हेच खरे अंतिम सत्य आहे. कुणाला जर अंतिम सत्य सापडले असे म्हणत असेल तर ते असेच असले पाहिजे.

मग उरते ते काय? फक्त प्रश्न प्रश्न आणि प्रश्न.

प्रश्न म्हणजे मनुष्याच्या बुद्धीला, संशोधन शक्तीला, आणि विचारशक्तीला सतत पुढे नेण्यासाठी निर्माण झालेले आव्हान. या आव्हानांचा पाठपुरावा करणे हे सगळ्यात महत्त्वाचे सगळ्यात मोठे सगळ्यात आवश्यक आणि प्रगतीसाठी उपकारक आहे. परंतु या सर्व शक्तींबरोबर विवेकशक्ती ही सुद्धा पुढे गेली पाहिजे त्याचाही विकास झाला पाहिजे. विवेकशक्तीचा विकास झाला नाही तर बाकी सर्व शक्ती गोठून जातील, अस्थिर होतील किंवा चुकीच्या दिशा पकडतील अथवा नष्ट होतील.

क्रमशः...

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted