श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “They never met.. but…..” – इंग्लिश लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
डॉ. शंभुनाथ डे … डॉ. महालानाबिस
They never met … But ….
… त्या दोघांनी कधीही एकमेकांना पाहिले नव्हते. तरीही दोघांनी मिळून जवळजवळ सत्तर लाख प्राण वाचविले आणि तरीपण आपण भारतीय ह्या दोघांनाही विसरलो आहोत.
कलकत्ता : १९५९ …
एका छोट्याशा प्रयोगशाळेत, डॉ. शंभुनाथ डे नावाच्या एका धीरोदात्त शास्त्रज्ञाने असा काही शोध लावला की त्याने संपूर्ण जगच हादरून गेले. त्याने कॉलरा-पटकी या रोगातील रोगजंतूंचा नुसता शोधच लावला नाही तर त्या जंतूंचे शस्त्रसुद्धा शोधून काढले.
त्याने सिध्द करून दाखविले की कॉलरा एक विष पसरवितो आणि ते विष शरीरातील आतडी फाडून शरीरातील सर्व पाणी नष्ट करून टाकते आणि मनुष्याचे जीवनही संपवून टाकते. यावर कोणाचाच विश्वास बसला नाही म्हणून त्याने ‘नेचर’ या नियतकालिकात त्याचा हा शोध छापला आणि मग… आपल्याला माहित आहेच…
या त्याच्या शोधाबद्दल त्याला ‘नोबेल’ तर राहू दे पण वर्तमानपत्रातून साधी प्रसिध्दी पण नाही. एवढेच काय पण वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातसुध्दा त्याचा साधा उल्लेखही नाही!
बऱ्याच लोकांना असे वाटत होते की त्यांच्या या शोधाबद्दल शंभुनाथ डे हे नक्कीच नोबेल पुरस्कारासाठी पात्र होते. परंतु जगाला त्यांचा विसर पडला. मात्र तरीही जगाने त्यांच्या शोधाचा वापर केलाय.
१९८५ साली कलकत्ता येथे शंभुनाथ डे यांनी आपली जीवनयात्रा संपविली. कोणताही पुरस्कार नाही आणि मृत्यूचाही गाजावाजा नाही. वर्तमानपत्रात वार्ताही नाही. निसर्ग नियमाप्रमाणे अनंतात विरून गेले.
सन : १९७२ …
१२ वर्षांनंतर, १९७२ मध्ये अजून एक भारतीय असाच शोध लावूनही त्यांना प्रसिध्दीपासून दूर ठेवले गेले, ते म्हणजे डॉ. दिलीप महालानाबिस हे होय!
डॉ. महालानाबिस बांगला देश युध्दावेळी अगदी सरहद्दीजवळच होते. बोंगाव येथे – निर्वासितांच्या छावण्या-कॉलऱ्याचे थैमान-तासांगणिक माणसे-मुले दगावत होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी एक मिश्रण तयार केले. मीठ-साखर आणि पाणी… कोणाचाच विश्वास बसेना… ते मिश्रण एका मोठ्या ड्रममधून ढवळले आणि नारळाच्या करवंट्यांमधून स्वत:च्या हाताने रोग्यांना दिले. काही आठवड्यातच मृत्यूचे प्रमाण घटले… अगदी ३०% वरून ४% वर खाली आहे. कोणतीही मशिनरी नाही. प्रयोगशाळा नाही. फक्त चमचे आणि शास्त्र!
त्यांनी ORS चा शोध लावला नाही पण जगाला दाखवून दिले की ते मिश्रण कोणत्याही तत्सम रोगावर उपयोगी पडू शकते आणि अशाच प्रकारचा शोध डे यांनी १९५९ साली लावला होता.
१९७८ मध्ये W. H. O. आणि UNICEF यांनी जाहीर केले की २० व्या शतकाचा वैद्यकीय शास्त्राचा नवीन शोध म्हणजे ‘‘ORS’’ चा होय. अशा रीतीने ORS ने प्रत्येक ऍम्ब्युलन्स, हॉस्पिटल आणि खेड्यातही प्रवेश केला. जवळजवळ ७० लाख जणांचे प्राण आत्तापर्यंत वाचले आहेत आणि तरीही…
या दोघांचाही कोठेही पुतळा नाही किंवा साधा फोटोसुध्दा ORS च्या पाकिटावर नाही.
एकाचा कोणत्याही प्रसिध्दीविना मृत्यू झाला आणि दुसऱ्याला त्याच्या मृत्युनंतर २०२३ मध्ये ‘‘पद्मविभूषण” पुरस्कार मिळाला.
त्यामुळेच कोणीतरी म्हंटले आहे…
‘‘भारतीय माणसे शास्त्राच्या मुळाशी जाऊन काम करत नाहीत”
‘‘भारतीय जगाला बदलू शकत नाहीत”
वरील टीकेला असे प्रत्युत्तर देता येईल..
‘‘आम्ही कॉलऱ्याला दोनदा हरविलेच… एकदा प्रयोगशाळेत आणि एकदा निर्वासितांच्या तंबूत. ”
… दोन आख्यायिका – एकाने शरीरात आढळणाऱ्या विषाच्या प्रकाराचा शोध लावला तर दुसऱ्याने त्यावरील उपाय सांगितला… आणि तरीही अजूनही जग त्यांच्याबद्दल अनभिज्ञच आहे.
मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






