सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ!” – इंग्रजी लेखक : रिचर्ड डॉकिन्स – अनुवादक : अज्ञात ☆ सुश्री शोभा जोशी ☆

— निकोला टेस्ला –

‘टेस्ला’चं नाव पहिल्यांदा ऐकताय का…? चूक तुमची नाही… अभियांत्रिकी संबंधित व्यक्ती सोडून कुणाला टेस्ला माहीत असेलच असे नाही… कारण आपल्या शालेय जीवनात आपल्याला एडिसन सापडतो, मात्र टेस्ला नाही!

ज्याच्यामुळे आपल्या घरातली सर्व विद्युत उपकरणं सुरू आहेत, त्या ‘टेस्ला’चं नाव उपेक्षित आहे!

१० जुलै १८५६ रोजी क्रोएशियात (तेव्हाचं ऑस्ट्रिया) मुसळधार पाऊस पडत होता. मध्यरात्री विजांचा कडकडाट होत असताना एक बालक जन्माला आलं; ज्यानं आयुष्यभर आपल्या मर्जीप्रमाणे विजेला शब्दशः खेळवलं. पाद्री वडील आणि निरक्षर गृहिणी आईच्या पोटी जन्माला आला– निकोला टेस्ला.

टेस्ला त्याच्या आईचं खूप कौतुक करतो. घरात काही बिघडलं, की त्याची ही निरक्षर आई ते दुरुस्त करायची. टेस्ला म्हणतो की शोधक आणि कल्पक वृत्ती ही खात्रीनं त्याला केवळ आईकडून मिळालीय, वडिलांकडून नाही.

वडिलांशी त्याचं जास्त पटायचं नाही. पाद्र्याची पोरं पाद्री व्हावीत, असं त्याच्या बापाला वाटायचं. त्यात ह्याचा एकमेव भाऊ अपघातात गेला… मग जी काही आशा ती ह्याच्यावर! पण हा लहानपनापासूनच अवलिया. तो कसला बापाच्या हाती लागतो!

पोरगं एवढं अफाट होतं की बाईंनी अवघड मोठी मोठी गणितं फळ्यावर द्यावीत आणि ह्यानं काही सेकंदात तोंडीच उत्तर द्यावं. बाईंना वाटायचं हा चीटिंग करत असणार… मार खायचा पण शहाणपणा करायचं सोडायचा नाही.

त्या काळात शाळा पूर्ण झाली की नियम होता– एक वर्ष सक्तीची सैन्यात नोकरी करायची. ह्यानं तिथंही हुलकावणी दिली. एक वर्ष जंगल दऱ्यापर्वतात शिकार करत फिरला. आणि मग घरी आला. बाप म्हणाला, ‘हो पाद्री…’ हा म्हणाला, “नाही, मला अजून शिकायचंय! ”

त्यात त्याला पटकीची बाधा झाली. जगण्याची फारशी आशा नव्हती. नऊ महिने अंथरूणावर पडून काढल्यावर जेव्हा एके दिवशी बाप म्हणाला, “तुला सगळ्यात भारी इंजिनिअरिंग कॉलेजला टाकतो…” तेव्हा कुठं पोरानं उभारी धरली आणि सर्व नीट झालं.

पण तिथं तरी यानं नीट शिकावं की नाही… पण छे, एका वर्षात चार विषय पूर्ण करायचे, तर यानं नऊ केले! पहाटे तीन ते रात्री अकरा रोज अभ्यासात गर्क… कॉलेजनं ह्याच्या वडिलांना पत्र पाठवलं की ‘असंच जर सुरू राहिलं तर मुलाच्या प्रकृतीची बरंवाईट होऊन बसेल! ’

एवढी मेहनत केल्यावर गुरूच्या पुढं जाणारच ना! मास्तरांना कौतुकानं नवीन आयडिया सांगायला गेला आणि ते मास्तरांच्या डोक्यावरून गेलं, म्हणून त्यांनी ह्याला वेड्यात काढलं.

निराश होऊन हा जुगाराकडे वळला… त्यात पार डुबला… (दोन्ही अर्थानं). स्कॉलरशिपचे, फी चे सगळे पैसे त्यात घालवले (नंतर वसूल पण केले म्हणा! ) तर अशी अवदसा आठवली त्याला आणि पदवी न घेताच घरी यावं लागलं.

बापाचं टुमणं सुरूच… ‘पाद्री बन! ’ पण ह्याच्या डोक्यात ‘वीज’ घुसलेली. पाच सहा वर्ष मिळेल ती काम करत असंच पॅरिसला कामाला गेला. तिथं चार्ल्स बॅचलर यानं ह्याची गुणवत्ता ओळखली आणि त्याला इथं आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा अमेरिकेला एडिसन यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.

चार्ल्स एडिसन यांचा चांगला मित्र होता. त्यानं टेस्लाकडे एडिसन साठी एक शिफारस पत्र दिलं; ज्यात लिहिलं होतं–

‘आयुष्यात मी दोन जीनियस पाहिले… एक तू आणि एक हा पत्र घेऊन आलेला टेस्ला! ’

थॉमस अल्वा एडिसन… विजेवर बल्ब पेटवणारा शास्त्रज्ञ आणि अमेरिकेत वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीचा संचालक! एडिसननं थोड्या अवधीत ओळखलं की ‘ये लंबी रेस का घोडा है…! ’ त्यानं त्याला अवघड अवघड कामं दिली. ती टेस्लानं सहज पार पाडली. दोघांनी मिळून एक वर्षभर खूप छान काम केलं.

एडिसन वीज पोहोचवण्यासाठी ‘डीसी’ करंट वापरायचा. ज्याला मर्यादा होत्या. पॉवर स्टेशन पासून केवळ एक किमी अंतरावर वीज या पद्धतीनं पोहोचायची. खर्चही खूप यायचा. आणि या विजेवर मोठमोठी मशीन्स चालवणं शक्य नव्हतं.

टेस्लानं कॉलेजमध्ये असतानाच त्यावर पर्याय म्हणून ‘एसी’ करंटनं (जी पद्धत आपण आज वापरतो) वीज वितरित करणं शोधून काढलं होतं. (मास्तरांशी वाद यावरूनच झाला होता! )

टेस्लानं हे एडिसनला दाखवलं आणि एडिसन हादरला! हा तर आपल्या सवाई निघाला…! ! ! ह्याचं म्हणणं मान्य करावं, तर आजवर एडिसननं केलेले सगळे शोध मोडीत निघणार होते…! एडिसननं मुद्दामच, ‘तुझं म्हणणं मूर्खपणाचं आहे’, असं सांगून विषय संपवला.

एक दिवस एडिसननं टेस्लाला आव्हान दिलं, “हा बिघडलेला जनरेटर दुरूस्त केलास, तर तुला ५०००० डॉलर देईन. ”

टेस्लाने चिक्कार मेहनत करून तो दुरुस्त केला आणि हक्कानं पैसे मागायला गेला. मात्र, एडिसननं त्याला उडवाउडवीची उत्तरं देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

इथं टेस्लाचा एडिसनशी खटका उडाला… एडिसनच्या तोंडावर राजीनामा फेकून, “आता माझीच कंपनी टाकतो तुला टक्कर द्यायला…” म्हणत तो बाहेर पडला.

मात्र त्याला कोणी फायनान्सर मिळेना! शेवटी एडिसनच्याच ठेकेदाराकडे त्यानं दोन वर्ष खड्डे खणायचं काम केलं. त्या काळात त्यानं आपल्या शोधाचं पेटंट नोंदवलं.

दोन वर्षांनंतर टेस्लाला फायनान्सर मिळाला आणि त्याचीही कंपनी सुरू झाली. एडिसन जाणून होता, टेस्ला शर्यतीत उतरला आणि जर याची पद्धत मार्केटमध्ये आली तर आपली पद्धती कालबाह्य होईल, म्हणून त्यानं स्वतःचं ‘वजन’ वापरत टेस्लाला त्रास देणं सुरू केलं. या दोघात झालेले वादविवाद ‘करंट वॉर’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

टेस्लानं एडिसनचे स्पॉन्सरर्स फोडायला आणि एडिसननं ह्याचे पंख छाटायला सुरुवात केली.

‘एसी करंट’ किती धोकादायक आहे हे दाखवण्यासाठी एडिसन रस्त्यावर मुक्या प्राण्यांना करंट देऊन मारण्याचं जाहीर प्रात्यक्षिक दाखवू लागला. लोकांत दहशत पसरू लागली.

नीचपणाचा कळस म्हणजे मृत्यूची शिक्षा झालेल्या कैद्याला एसी करंट देऊन मारण्याची शिफारस केली. २००० वॉल्टचा एसी करंट देऊन शिक्षा अमलात सुद्धा आणली गेली… ‘पाहा किती धोकादायक आहे एसी करंट…! ’ अशी एडिसन पुरस्कृत भरपूर प्रसिद्धीही केली गेली.

हे कमी म्हणून की काय, कायदेशीर वजन वापरून टेस्लाची कंपनी गाळात घालण्याचा देखील प्रयत्न झाला… पण, कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहतं का…?

सत्याचा विजय इथंही झाला… टेस्लाच्या पद्धतीला मान्यता मिळाली. इतकंच नव्हे, तर जगप्रसिद्ध नायगारा धबधब्यावर जनित्र बसवून वीज निर्मिती करण्याचं काम टेस्लाच्या कंपनीला मिळालं!

खूप मोठा प्रोजेक्ट एडिसनच्या कंपनीच्या हातून गेला… परिणामी एडिसनची संचालक पदावरून गच्छंती झाली. नायगाराचे काम मिळणं हा टेस्लाच्या आयुष्यातला परमोच्च बिंदू… त्याचं बालपणापासून उराशी बाळगलेलं स्वप्न साकार करणारा!

१८९५ मध्ये टेस्लाच्या ऑफिसला आग लागली आणि तिथून पुढं सगळं उलट होत गेलं… त्यानं बनवलेल्या डिझाईनवर मार्कोनी यानं रेडिओ बनवला. ही बाब त्याला खूप निराशा देणारी होती.

(रेडिओचं पेटंट आधी मार्कोनीकडे होतं, मात्र नंतर ते टेस्लाकडे देण्यात आलंय.)

वायरलेस वीज पुरवठा करण्याचा त्याचा अतिमहत्त्वाकांक्षी आणि खर्चिक प्रकल्प सुरू होता. स्पॉन्सररला वाटलं की ह्याला वीज फुकट वाटायचीय… त्यानं अंग काढून घेतलं आणि टेस्ला अक्षरशः रस्त्यावर आला.

तिथून पुढं त्याचं आयुष्य अतिशय हलाखीचे गेलं. नंतर त्याचे अनेक प्रयोग अपूर्ण राहिले. मेंदू मधल्या भावनांचे फोटो त्याला काढायचे होते, ते काम अपूर्ण राहिलं. तो अश्या एका अस्त्रावर काम करत होता की आपल्या देशाच्या सीमेवर प्रवेश करणाऱ्या शेकडो विमानांना केवळ विद्युत स्तंभ वापरून नष्ट करायचं… पण तेही पूर्ण झालं नाही.

१९४३ साली टेस्ला कालविवश झाल्याचं समजलं तेव्हा त्याची सारी कागदपत्रं, हिटलरच्या हाती पडू नयेत म्हणून अमेरिकन सरकार ने ताब्यात घेतली.

टेस्ला कधी स्त्रियांच्या आहारी गेला नाही. तसा तो जरा तिरसट होताच. कुणाचे कान टोचलेले पाहिले की ह्याच्या पोटात ढवळायचं. दागिने पाहिले की मळमळ व्हायची. कापराचा वास आला तरी जाम आजारी पडायचा. महिलांपासून तर दोन हात दूरच राहायचा… त्यामुळं त्यानं लग्न केलं नाही. म्हणायचा, “मी आयुष्य विज्ञानाला वाहिलंय. ” (आधी लग्न करून मग ध्येयप्राप्ती साठी बायकोला सोडून देण्यापेक्षा हे नक्कीच योग्य होतं.)

शांततेचं नोबेल जगभरातल्या अनेक गांधीवाद्यांना मिळाले आहे मात्र स्वतः गांधीना नाही. त्याचप्रमाणं टेस्लाचं डिझाईन वापरून रेडिओ बनवणाऱ्या मार्कोनीला नोबेल मिळालं मात्र टेस्लाला नाही…

जगाच्या कानाकोपऱ्यात प्रकाश पोहोचवणारा हा जिनीयस प्रसिध्दीच्या झोतात मात्र कधी आलाच नाही. त्याला योग्य प्रसिद्धी द्यायचे काम आपलं!

इंग्रजी लेखक : रिचर्ड डावकिन्स

अनुवादक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

खूप छान वेचलेला हिरा कळला संशोधन क्षेत्रात असं खूप घडतं