श्री सुनील देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातील यावली हे तुकडोजींचे जन्मगाव. त्यांचे आजोबा गणेशपंत हे विठ्ठलाचे निस्सीम उपासक होते. आषाढी एकादशीची पंढरीची वारी त्यांनी कधीही चुकविली नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्गत होती. त्यांना सात मुली आणि एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव होते, बंडोपंत. हेच तुकडोजींचे पिता होत. त्यांच्या वागण्यातील बंडखोरीमुळे त्यांना बंडोपंत हे नाव मिळाले होते. त्यांचा पंढरीच्या वारीवर मुळीच विश्वास नव्हता. कारण की, ही वारी करणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीत कोणतीही प्रगती झाली नव्हती. त्यांची पत्नी म्हणजे अमरावती जिल्ह्यातील वरखेड येथील तुकारामबुवा वानखेडे यांची मुलगी मंजुळा. तिच्या पोटी ३० एप्रिल १९०९ रोजी तुकडोजीचा जन्म झाला. वरखेड येथील संत आडकोजी महाराज यांनी बाळाला भाकरीचा तुकडा भरविला व त्याचे नाव ठेवले तुकड्या. बंडोजींचा स्वभाव धरसोडपणाचा होता. त्यामुळे माता मंजुळा आणि तुकड्या यांची नेहमीच फरफट होत असे. अशा ताण-तणावात तुकड्याचे बालपण गेले. वडिलांच्या व्यसनी वृत्तीमुळे तुकड्या संसारापासून विरक्त झाला.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रामदिघी तसेच चिमूर येथील अरण्यात त्याने साधना केली. या दरम्यान अनेक साधू-संतांचा सहवास त्याला लाभला. त्यातून तुकड्याचे व्यक्तिमत्त्व आकाराला आले व तुकडोजी महाराज या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. आदिवासींच्या व्यथा-वेदना जाणून त्यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. समाजातील कुरीतीविरुद्ध जन-जागरण करण्याकरिता त्यांनी कवने रचलीत. खंजिरी वाजवून ते भजने करीत असत. त्यांच्या भजनांची पुस्तकेही प्रकाशित झालीत. त्यांच्या समाजहितकारक कार्यामुळे त्यांचा महात्मा गांधीजींशी परिचय झाला व ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामील झालेत. भारत छोडो आंदोलनात त्यांना अटक झाली आणि तुरुंगवासही भोगावा लागला होता. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी दहा दिवसात ११४१० एकर जमीन मिळवून देवून अतिशय मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी देशाच्या उभारणीत सहभाग घेतला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने संबोधले. त्यामुळे सारेच त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधू लागले.
पंढरीची वारी आणि अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेश आंदोलन
आपल्या आजोबा आणि आजीप्रमाणेच तुकडोजी महाराजही नियमितपणे आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला न चुकता जात असत. २१ जुलै १९४५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला तुकडोजी गेले असता त्यांनी अस्पृश्यांना मंदिराबाहेर दर्शनासाठी ताटकळत असताना पाहिले. आपल्या दुःखाला वाट करून देण्याकरिता ते विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या संत चोखामेळा यांच्या पायरीवर बसले. नेहमी मंदिरात सहज प्रवेश करणारे महाराज असे बाहेर का बसले आहेत असा प्रश्न बडव्यांना पडला. तेथे उपस्थित वारकऱ्यांमध्येही पंढरपूरला येऊनही विठ्ठलाचे दर्शन न करणाऱ्या महाराजांबद्दल प्रश्न पडला. खरे कारण कळल्यावर त्यांच्यामध्येही गोंधळ उडाला. त्यामुळे धर्ममार्तंड अस्वस्थ झाले. त्यांच्यापैकी काहींनी त्याविषयी विचारल्यावर महाराज म्हणाले:
“समाजात काही विशिष्ट जातीत जन्मास आलेल्या लोकांना इतर अनेक बाबतीत मागे पडावे लागते, अनेक न्याय्य लाभांपासून दूर राहावे लागते, ही वस्तुस्थिती अत्यंत खेदजनक आहे, यात शंका नाही. परंतु या सर्वांवर कळस चढविणारी गोष्ट म्हणजे कित्येकांना ‘ पतितपावन’ भगवंताच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेण्यासही बंदी केली जाते. देवाच्या दर्शनाने ते पावन होण्याऐवजी त्यांच्या सावलीने देवच बाटतो, असे अत्यंत विसंगत व विकृत विचार मांडून लोक त्यांना कुत्र्या-मांजरापेक्षाही नीच लेखतात. मानवतेला व भक्तिभावाला कलंक लावणारी गोष्ट याहून दुसरी कोणती? ”
महाराजांनी आपले याविषयीचे मत काही कार्यकर्त्यांकडे लेखी स्वरुपात दिले. ते कळताच काही सनातन्यांनी महाराजांना शास्त्रार्थ करण्याचे आव्हान दिले. त्याला योग्य शब्दात महाराजांनी पत्र दिले. परंतु त्या पत्राचे उत्तर मात्र मिळाले नाही. एका कीर्तनकाराने मिश्किलपणे प्रश्न केला की, वरखेडच्या आपल्या गुरुमहाराजांच्या समाधी मंदिराचं काय? ” त्यावर महाराज म्हणाले की, ” याच कारणाने मी स्वतः उभारलेल्या समाधी मंदिरात जाण्याचे सोडले आहे. पंढरपूरहून महाराज वरखेडला आल्यावर तेथील लोकांनी आपण पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश का केला नाही, हा प्रश्न केला. त्यावर महाराजांनी तेथील वृत्तांत त्यांना सागितला आणि जोपर्यंत याही ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश नसेल तर मीही या मंदिरात जाणार नाही असे ठामपणे सांगितले. महाराजांचा हा दृढ निश्चय पाहून गावकरी मंडळींनी ७ ऑगष्ट १९४६ रोजी सर्वांसाठी आडकोजी महाराजांचे समाधी मंदिर खुले केले. तेथील कार्यकर्त्यांनी महाराजांच्या विनंतीनुसार गावातील अस्पृश्यांना आपल्या हातात हात धरून मंदिरात नेले. सार्वजनिक विहिरी आणि मंदिरे सर्वांसाठी खुल्या कराव्यात असे मत आपल्या भजनामध्ये महाराजांनी मांडले होते, त्यानुसार ते आग्रही होते. त्यानुसार गावोगावच्या गुरुदेव सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील मंदिरे आणि विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्यात. त्यामुळेच अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले व्हावे यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणाऱ्या पू. साने गुरुजी यांच्यासोबत तुकडोजी होते. साने गुरुजींनी ४ नोव्हेंबर १९४६ रोजी आमरण उपोषण सुरू केले, तेव्हा तुकडोजींनी त्यांना पाठिंबा दिला. १० मे १९४७ रोजी साने गुरुजींचे उपोषण संपले, तेव्हाही तुकडोजी त्यांच्यासोबत होते. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.
ग्रामगीतेची प्रेरणा पंढरपुरात
२३ जुलै १९५३ या दिवशी आषाढी एकादशी होती. या दिवशी पंढरपूरला महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून आलेले पांडुरंगाचे भक्त पाहून त्यांच्याकरिता आपण काय करू शकतो हा विचार त्यांच्या मनात आला. त्यांच्या संवेदना तीव्र झाल्यात आणि त्यांनी सर्व सामान्य माणसाकरिता ‘ ग्रामगीता ‘ हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्याची संकल्पना या ग्रंथामधून त्यांनी विस्ताराने सांगितली आणि आपल्या चिंतनाचे सारही त्याद्वारे व्यक्त केले. आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून राष्ट्रसंतांनी चार-पाच महिन्यांमध्ये ग्रामगीतेची रचना केली. त्यांनी ४१ अध्यायांमधून ४६७५ ओव्या रचल्यात. प्रवासातही ते ग्रामगीतेचे लेखन करीत असत. गावाचा पोशिंदा शेतकरी हा या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. त्यालाच ग्रामनाथ असे संबोधून त्याला त्यांनी हा ग्रंथ अर्पण केला आहे. १९५४ मध्ये ग्रामगीतेचे हस्तलिखित प्रवासात चोरी गेले होते. परंतु काही दिवसांनी ते परत मिळाल्यामुळे तिचे प्रकाशन करण्यात आले.
एक हजार ठिकाणी ग्रामगीतेचे प्रकाशन
विदर्भ साहित्य संघाचे १८ वे अधिवेशन भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे भरले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रसंतांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात २५ डिसेंबर १९५५ रोजी ग्रामगीतेच्या रचनेबद्दल राष्ट्रसंतांचे अभिनंदन करण्याचा ठराव सर्वानुमते संमत झाला. यावेळी राष्ट्रसंतांचा सत्कारही केला गेला. याच अधिवेशनात ग्रामगीतेचे प्रकाशन करण्यात आले.
२५ डिसेंबर रोजी गीता जयंती होती. त्यानिमित्त राष्ट्रसंतांच्या आदेशावरून एक हजार गावांमध्ये थोरा-मोठ्यांच्या हस्ते ग्रामगीतेचे प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त अनेक विधायक कार्यक्रम त्या त्या गावांमध्ये झाल्यामुळे सारी गावे चैतन्याने भारून गेली होती. नागपूरच्या टाऊन हॉलमध्ये झालेल्या ग्रामगीता प्रकाशन समारंभात समाज कल्याण विभागाच्या अध्यक्ष सौ. रमाबाई तांबे, डॉ. वि. भि. कोलते, माजी न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी इत्यादींनी भाषणे दिलीत. अशारितीने इतर गावांमध्येही मान्यवरांनी ग्रामगीतेचे प्रकाशन केले.
धर्मकार्य व राष्ट्रकार्य
राष्ट्राच्या उभारणीकरिता धर्माचा वापर करणारे तुकडोजी महाराज हे एकमेव संत होत. त्यांनी जपानमध्ये २३ जुलै १९५५ रोजी भरलेल्या विश्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. बुद्धाच्या पंचशील तत्वाच्या आधारे विश्वधर्माची संकल्पना त्यांनी तेथे मांडली. या परिषदेचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते झाले. त्यांच्या खंजिरीवादनाने विदेशातील प्रतिनिधींना मंत्रमुग्ध केले होते. जगाला शांततेच्या मार्गाकडे वळविण्याकरिता धर्मसुधार, धर्मसंघटन आणि धर्मप्रसार कसा उपकारक आहे, हे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. या दृष्टीने त्यांनी उचललेले पहिले पाऊल म्हणजे ९ एप्रिल १९५६ रोजी हृषीकेश येथे भरविलेला संत-महात्म्यांचा मेळावा होय. या ठिकाणी त्यांनी भारत साधू समाजाची स्थापना केली. संत गाडगेबाबा, सितारामदासबाबा, लहानुजी महाराज, सत्यदेवबाबा, दामोदर महाराज इ. संत त्यांच्या सोबत असत.
भारतावर १९६२ मध्ये चीनच्या आणि १९६५मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी त्यांनी सैनिकांचे मनोबळ वाढविण्याकरिता जन-प्रबोधन करून आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे स्वतः सीमेवर जावून सैन्याला दिलासा दिला.
पंढरपूरला शेवटले भाषण व भजन
देश-विदेशात समाजप्रबोधनासाठी प्रवास करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शेवटले भाषण व भजन आषाढी एकादशीच्या दिवशी १९६७मध्ये पंढरपूर येथे झाले. १९६५च्या डिसेंबर रोजी त्यांना कर्करोगाची बाधा झाल्याचे निदान झाले होते. तरीही त्यांनी आपल्या दैनंदिन कार्यात खंड पडू दिला नाही. त्यांनी स्थापन केलेले गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी संचालक मंडळाच्या स्वाधीन केले. पंढरपुरात विशाल जनसमुदायासमोर त्यांनी दिलेले भाषण व भजन अखेरचे ठरले. यावेळी ते म्हणाले की विठ्ठलाच्या दरबारची माझी ही अखेरची भेट आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे शेवटचे कीर्तनही पंढरपुरातच झाले होते. या दोन्ही संतांची पंढरपुराविषयीची ओढ अनन्यसाधारण होती. ११ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची खंजिरी कायमची मूक झाली. परंतु त्यांची भजने आणि ग्रामगीता त्यांच्या विचाराचे आणि गुरुदेव सेवा मंडळ हे कार्याचे स्मारक म्हणून आपणाला सतत प्रेरणा देत राहील.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुनील देशपांडे
ईमेल : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






