सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ “नाव नसलेले भांडे…” – लेखिका : सुश्री आसावरी इंगळे ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆
काही वर्षांपूर्वी घराघरात एक पद्धत अस्तित्वात होती. ती म्हणजे दुकानातुन वापरायची कोणतीही भांडी विकत आणली. की ती आणतांनाच त्यावर नांव टाकून आणायची. भांडे लहान वा मोठे प्रश्नच नसे, त्यावर नांव हे असलेच पाहिजे.
समजा बायको सोबत नसतांना जर नवरा एकटाच दुकानात गेला. व गरजेचे भांडे घेऊन घरी आला की गृहिणी आधी त्यावर नांव काय घातले आहे ते पहात असे. त्या भांड्यावर तीला तिचे नाव दिसले की देव भेटल्याचा आनंद मिळत असे… आणि समजा नाव जर दिसले नाहीच तर मात्र काही खरे नसे, ती आल्यापावली नवऱ्याला परत दुकानात पाठवुन त्यावर नांव घालुन आणा असे सांगत असे. किंवा स्वत: जावुन नांव घालुन आणुन मगच ते वापरायला सुरुवात करीत असे.
काय हो बरोबर आहे ना? आजही तुमच्या घरात नांव घातलेली खुप भांडी असतील.
पण आता दिवस बदलले आहेत आता विचार हा असतो की सगळे करायचे पण कुठे नामोनिशाण ठेवायचे नाही.
लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे. नाव घातलेली व नाव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नाव असलेली भांडी वापरात घेतली जायची. व नाव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देवाण, घेवाणीसाठी वापरली जात असत.
– – तर अशी ही नांव नसलेली भांडी बेवारस असल्यासारखी या हातातुन त्या हातात, या घरातुन त्या घरात नुसती फ़िरत रहायची, उपयोग काहीच नाही.
असो. हे सारे आले कशावरुन.. तर नावावरुन. आता ती भांडी जरा घडीभर आपण बाजुला ठेवा व विचार करा.
– – आपला देह हे सुद्धा एक पंचभुतांनी बनलेले भांडेच आहे. हे भांडे जन्माला येते तेव्हा त्यावर काही नांव नसतेच. ते असेच फ़िरत फ़िरत आपल्या घरात आलेले असते. मग त्या देहाला आपल्याकडून नांव दिले जाते. आणि ते मरे पर्यंत रहाते. पण देह संपला की नांव संपते व बिना नांवाचा देह या योनीतुन त्या योनीत असा बिन नावाच्या भांड्यासारखा फिरायला लागतो.
आता ही पळापळ थांबायला उपाय काय?
– – – उपाय आहे नां सांगितला आहे आपल्या संत, सत़्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थांनी जमेल तेव्हा जमेल तसे जमेल तितके देवाचे नामस्मरण करा. म्हणजे काय होईल? देह जरी पडला तरी देवाचे केलेले नामस्मरण हे सोबत येईल.
…. आणि ते नांव एकदा देवाने पाहिले की देव म्हणेल याच्यावर माझे नांव आहे. याला माझ्या घरात पाठवा.
…. आणि ज्या भांड्यांवर माझे नांव नसेल त्यांना द्या पाठवून या योनीतुन त्या योनीत फ़िरायला.
आपले काय होते माहिती आहे का? आपण म्हणतो जमेल तसे, जमेल तेव्हा, जमेल तिथे नामस्मरण करा नाम घ्या असे सांगितले आहे.
पण आपण त्यात पळवाट शोधण्यात पटाईत.
आपण म्हणतो जमेल तसे ना! अहो नाही जमले त्याला आम्ही काय करणार?
मग परमपिता म्हणतो. नाही जमले नांव? हरकत नाही. मग रहा फ़िरत निवांत या योनीतुन त्या योनीत.
…… माझे नामस्मरण कर असे देव कधीच सांगत नाही, तो म्हणतो हे सांगायचे काम मी माझ्या प्रतिनिधींवर म्हणजे संत, सत्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थ यांचेवर सोपवले आहे. ते काम ही मंडळी चोख बजावतात. माझे काम फ़क्त भांडे माझ्याकडे आले की त्यावर नांव आहे का ते पहायचे. नाव असेल तर माझ्यापाशी ठेवायचे. व नाव नसेल तर पुढील प्रवासाला द्यायचे पाठवुन.
हे एवढ्यासाठीच की वाचा आणि विचार करा. नुसता विचार करु नका. तर अंमलात देखील आणा….
धन कमविले कोट्यानकोटी…
संगे येईना साधी लंगोटी…
– – – बरोबर फक्त नामस्मरणच येईल……..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







