सौ. स्मिता पंडित

??

☆ “श्रावण.. ओ नो!! ” ते “श्रावण.. ओ येस!…” – लेखक : वैद्य सौ सुमेधा रानडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

परवा माझी मुलं शाळेतून आल्या आल्या सांगू लागली, “आई, श्रावण महिना सुरु होतोय ना? “

मला ऐकून समाधान वाटलं, मी म्हणाले, “हो हो पुढील आठवड्यात सुरु होईल श्रावण महिना, पण तुम्हाला बरं लक्षात आलं! “

ताबडतोब मुलांची प्रतिक्रिया, “अगं स्कूल मध्ये फ्रेंड्स बोलत होते, आता काय हा श्रावण महिना ओह नो, हे नाही खायचं, ते नाही खायचं, सो रूड ना! , हाउ कॅन वी?? “

हे सांगताना दोन्ही मुलांची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव वेगळेच होते. त्यातून असं जाणवत होतं की यांना या श्रावण महिन्याबद्दल भीती निर्माण झालीय की काय? म्हणजे किती आणि कसं याबद्दल मुलं बोलत असतील या विचाराने मन उद्विग्न झालं.

चूक खरंतर या छोट्या मुलांची नाही, चूक आपली आहे, पालकांची.. मुलं जे ऐकतात, बघतात, अनुभवतात तेच कृतीत, भाषेत आणि वर्तनात उतरवतात. म्हणून हा लेखप्रपंच खास आमच्या सारख्या पालकांसाठी.

बघा ना, आपल्यावेळी श्रावण महिना येणार म्हटले की आपल्यात एक वेगळाच उत्साह यायचा. ‘सणांचा राजा – श्रावण महिना’ यावर तर अनेकदा निबंध लिहिले आहेत. ऊन-पावसाचा खेळ खेळणारा निसर्ग, हिरवागार शालू परिधान केलेली वसुंधरा, विविध रंगाची सुवासाची फुले कायमच मनाला प्रफुल्लित करायची. घराघरात होणाऱ्या व्रतवैकल्यांचा पूर्वी वेगळाच थाट असायचा. कांदा-लसूण न वापरता सुद्धा उत्तम चवीचे पदार्थ घरोघरी बनायचे.

काळ बदलला, आपण मॉडर्न होऊ लागलो आणि आपली संस्कृती-परंपरा जुनी, टाकाऊ, बिनडोक समजायला लागलो. “आम्ही नाही पाळत श्रावण -बिवण. भाजके उपास? आम्हाला ना पोटभर खावंच लागतं. थालीपीठ कसलं खायचं? दिलं सोडून! काय ते मातीचे नाग आणून पूजा करायची? आम्ही निसर्ग संवर्धन करतो, बास! नागपंचमी अँड ऑल इज आउटडेटेड.. ” असे अनेक संवाद आपली पिढी बोलू लागली आहे. खरंच वाईट वाटतं असे विचार ऐकून.. हे ऐकून आपल्या सण परंपराबद्दल नको ते वाईट असेच विचार आपण मुलांच्या मनावर नकळत बिंबवत आहोत. सुंदर अश्या या श्रावण महिन्याचा आणि त्यापुढील येणाऱ्या सर्व सणांचा योग्य दृष्टिकोन आपण मुलांना द्यायला हवा. तो कसा, ते बघूया. (अर्थात नास्तिक लोकांना हे नाही पटणार, त्यांचं त्यांच्याकडे).

१. श्रावण – संयम

सर्वात मोठं दुःख मुलांमध्ये जाणवलं ते म्हणजे आता नॉनव्हेज खाता नाही येणार याचं. ठीक आहे ना, नाही खाल्लं वर्षातले २८ दिवस (मराठी महिने २८ दिवसांचेच असतात हेही आजच्या पालकांना माहीत नाही) तर काही बिघडत नाही. मुलांना स्पष्ट सांगा, “आता १ महिना नाही खायचं नॉनव्हेज. ” आणि तुम्ही ते पाळा आधी. श्रावण महिन्यात होणाऱ्या सणावारी नैवेद्य बनतो, नैवेद्य झाल्याशिवाय काही खाता येणार नाही, हेही मुलांना सांगा. त्यांच्यात संयम आपोआप निर्माण होतो. आयुष्यात याचा पुढे त्यांनाच खूप उपयोग होणार आहे. भाजका सोमवार करू द्या त्यांना, एखादा दिवस नाही अगदी काही हेल्दी खाल्लं तरी काही मोठा फरक नाही पडत. (भाजणी थालीपीठ, खिचडी-कढी ही कैकपटीने पौष्टिक आहेतच, हे या मॉडर्न मातांनी समजून घ्यायला हवं).

२. श्रावण – ऍक्टिव्हिटी

भरगच्च सणांचा हा महिना.. खरंच किती सुंदर रचना या महिन्याची केली आहे ना? दिव्याची अमावस्या, श्रावण सोमवार, नागपंचमी, स्वातंत्र्यदिन, राखी, नारळीपौर्णिमा, जिवती, दहीहंडी, गोपाळकाला, इत्यादी.

या प्रत्येक सणाचा आपण ऍक्टिव्हिटी म्हणून मुलांबरोबर छान उपयोग करू शकतो. असेही ऍक्टिव्हिटी-बेस्ड लर्निंग साठी हजारो रुपये भरून आपण शाळेत घालतो, पण आपल्या संस्कृतीत सणांमुळे आलेल्या या सुंदर ऍक्टिव्हिटीजना मात्र नावं ठेवतो.

३. श्रावण – आरोग्य

अत्यंत महत्वाचा मुद्दा, आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणामागे आरोग्याचा विचार करुन त्याप्रमाणे त्याची रचना केली आहे. हा इतका मुद्दा जरी आस्तिक-नास्तिक पालकांनी लक्षात ठेवला तरी त्यांच्या मुलांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्याची मदत होईल.

अतिपावसाने शरीरातील पाचक अग्नी हा कमी झालेला असतो, त्यावर नॉनव्हेज सारखे जड पदार्थ अन्न म्हणून घेतले तर पचनक्रियेवर ताण येऊन पुढे पचनविकार होतात, त्यामुळे ते नको असं धर्माचा आधार घेऊन सांगितलेलं आहे.

वर्षा ऋतू (पावसाळा) यामध्ये निसर्गत: पित्ताचा संचय शरीरात होऊ लागतो, त्यामुळे अति प्रमाणात कांदा, लसूण, मसालेदार अन्न जर खाल्लं तर पुढे येणाऱ्या शरद ऋतूत पित्ताचा प्रकोप हा जास्त प्रमाणात होईल आणि त्यातून जास्त पित्ताचे विकार होतील. म्हणून कांदा, लसूण कमी करून भाजकं अन्न खाणं या महिन्यात श्रेयस्कर!

सणाच्या दिवशी होणारे वेगळॆ पदार्थ मुलांना थोडे का होईना मुद्दाम खायला द्या. त्यांनाही कळू दे आपल्या पारंपारिक पदार्थांची चव आणि त्यामागचं कारण. आपल्या पिढीला हे पदार्थ कां आवडतात? कारण आपल्या आई-आजीने ते त्या त्या सणाला करुन आपल्यात त्याची टेस्ट डेव्हलप केली. आपल्या दैनंदिन आहारात नावीन्य आणायला हे सण, पदार्थ नक्कीच मदत करतात. भले विकत आणा पण त्या सणाला ते विशिष्ट पदार्थ मुलांना खाऊ द्या. उदा. नारळी पौर्णिमेला नारळी भात, नागपंचमीला तंबीट लाडू, वगैरे.

येणारा प्रत्येक सण मुलांना भरभरून अनुभवू द्यायला हवा. मुली असतील त्यांनी छान नटलं पाहिजे. कां त्यांना मुलांचे कपडे घालून पुरुषी करायचा अट्टाहास आहे देव जाणे! आणि त्याचं त्या पालकांना भारी कौतुक वाटतं. ते म्हणतात बघा आमची मुलगी कशी टॉमबॉय आहे. ती टॉमबॉय नसते, तिला तुम्ही बनवता. अरे नशिबाने स्त्री म्हणून जन्म मिळाला आहे तर घालू दे ना बांगड्या, माळू दे गजरा, लावू दे कुंकू, खेळू दे ना झिम्मा. यातून तिचा सामाजिक, बौद्धिक, शारीरिक, आणि मनासिक विकास होणार आहे. अर्थात या सगळया गोष्टी अती करणं पण योग्य नाही. कर्मकांड, अती सोवळं ओवळं पाळलं तरी मुलांना त्या सणाची घृणा निर्माण होईल असं अजिबात करू नये.

लक्षात असू द्या, आपली परंपरा, सण यांचा मान पालक म्हणून आपण आधी जपायला हवा. त्या महिन्याचं धार्मिक, सामाजिक, आणि आरोग्याच्या दृष्टीने मुलांना महत्व सांगून आनंदाने, ताण विरहित हे सण साजरे केले जावेत, म्हणजे ही पिढी ते टिकवेल आणि पुढे सुरू ठेवेल. नक्कीच याबद्दल विचार करा, श्रावण काय पण कोणत्याच हिंदू महिन्यांची आणि सणांची मुलांमधे भीती निर्माण होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घ्या.

चला, मी तरी माझ्या मुलांना ‘श्रावण फेस्टिव्ह व्हाइब्स’ कशा एन्जॉय करायच्या हे सांगणार!

“श्रावण, ओ येस! ” असं म्हणायला तुम्ही पण सांगणार ना?

(वरील लेखातील मतं ही माझी वैयक्तिक मतं आहेत, प्रत्येकाला असंच वाटलं पाहिजे हा अट्टाहास नाही! )

लेखिका : वैद्य सौ सुमेधा रानडे

आयुर्वेदाचार्य, बालसमुपदेशक.

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted