सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वर्णमयी – लेख क्र. ९ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

लहान वयात ओंजळीत मावणार नाही एवढं ऐश्वर्य मिळालं की हातात व्यसनांचा चषक देऊन ओंजळ रिकामी करणारे खूप भेटतात. चांगल्या वाईटाची समज नसते. आपला मित्र कोण आणि शत्रू कोण ओळखायला डोळ्यावर धुंदीचा पडदा असतो. कधीतरी या गोष्टीचा पश्चाताप झाला, तरी आपण या चक्रातून कधीच सुटू शकणार नाही ही जाणीव बोचत राहते व माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो. असंच काहीसं माझे पती, कासीमबाजारचे‌ महाराजा, कृष्णनाथ यांचं झालं.

माझं नाव वडिलांनी शारदा सुंदरी ठेवलं होतं. कां, ते मात्र कळलं नाही कारण सुंदर मी पाळण्यातही दिसली असेन पण शाळा, शिक्षण यांचा वाराही जिथून वाहत नाही तिथे शारदा कुठून जन्माला येणार होती? पण नाही, परिस्थितीनं नावातील शारदा हा शब्दही खरा करून दाखवला. लग्नानंतर मात्र माझ्या तेजस्वी कांतीला पाहून स्वर्णमयी हे नाव ठेवलं असावं. ते कसं ठेवलं, कां ठेवलं हे विचारण्याइतका पतीचा सहवास व प्रेम मिळालंच नाही.

लग्नाच्या वेळी मी अवघी नऊ दहा वर्षाची होते. गरीब घरातून आलेली. इथली पडदा पद्धत, राजघराण्याच्या रूढींची ओळख अंगवळणी पडण्यापूर्वीच मातृत्वाची जबाबदारी आली. पती घराबाहेर काय करतात हे समजणे शक्य नव्हतं आणि ते समजून घ्यायला हवं ही जाणीवही नव्हती. माझ्या अंगावर दोन मुलींची जबाबदारी टाकून त्यांनी माझा हात सोडून दिला. आणि त्या क्षणी मी प्रौढ झाले. अवघ्या १६_१७ वयाची विधवा!

घराण्याला वारस नव्हता. त्यामुळे राज्याला राजाच नाही, म्हणून सगळी जहागिरी सरकार जमा करण्यास व राज्य ताब्यात घेण्यास ब्रिटिश सरकार तयारच होते. त्यात आत्महत्या करणे हा गुन्हा होता त्याची शिक्षा म्हणूनही जहागिरी सरकार जमा होणार होती. त्यातच महाराजांनी आधीच मृत्युपत्र तयार केले होते आणि आपली सगळी संपत्ती नोकर म्हणून असणारा केशव सरकार याच्या नावे केली होती. त्याशिवाय इतर काही मित्रांनी अशी कागदपत्रं दाखवली की त्यात त्यांच्या नावे जहागिरीचा काही भाग केला होता. माझ्यासाठी हे सगळे एकावर एक धक्के होते. सोसाट्याचा वारा सुटला की वाळलेली पाने गळून पडतात, मला देवानं असे एक एक धक्के दिले की माझी सारी कोवळी स्वप्ने गळून पडली.

एकच गोष्ट लक्षात आली ती म्हणजे दोन्ही मुलींना घेऊन राजवाडा सोडून रस्त्यावर भीक मागावी लागणार आहे त्या क्षणी खडबडून जागी झाले. आणि ठरवलं, आता धैर्य आणि मुत्सद्देगिरी हेच गुण आपल्याला तारणार आहेत. पहिली गोष्ट करावी लागली ती म्हणजे साक्षर होणं! नाही म्हणायला एक सुखाचा धागा होता तो म्हणजे आमचे वयोवृद्ध दिवाणजी मथुरानाथ बॅनर्जी. त्यांनी मला साक्षर केलं. बांगला, संस्कृत, फारसी, इंग्रजी चार भाषा शिकायला मदत केली. ते म्हणाले, मी तुला बापासारखा आहे. काळजी करू नकोस. आपण दोघे झटून हे राज्य टिकवूया, अबाधित ठेवूया. आणि माझा कायद्याचा अभ्यास सुरू झाला. एका मागोमाग एक खटलेही सुरू झाले. पतीच्या निधनानंतर वारस नसेल तर अधिकार पत्नीला मिळायला हवेत यासाठी मी राणी व्हिक्टोरिया यांना पत्र लिहीलं. त्यांनीही माझ्या मताला दुजोरा दिला आणि मला या सगळ्या खटल्यातून सही सलामत सुटता आलं. मृत्युपत्रे अनेक मिळाल्यामुळे त्यावेळी महाराजांची मानसिक स्थिती ठीक नव्हती हे सिद्ध करून सर्व मृत्युपत्रे बेकायदेशीर ठरवली. आणि मी बंगालची बेताज, अनभिषिक्त राणी झाले.

थोडी सावरायला सुरुवात होत होती, पण धक्क्यांची मालिका सुरूच होती. लहान मुलीचा थोड्याशा आजाराने मृत्यू झाला. मोठ्या मुलीचे लग्न झाले तिला एक मुलगी ही झाली. आणि तिच्या अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले. एक बाकी नियतीनं ठरवलं होतं की दुःखं कोसळायला लागली की त्यांना कुरवाळत बसायला मला वेळच द्यायचा नाही. उलट खडबडून जागं करायचं. आमच्या जावयांनी, आपल्याला पत्नीचा म्हणजे माझ्या मुलीचा व त्यांच्या मुलीचा जहागिरीतील वाटा मिळावा म्हणून खटला दाखल केला. हाही खटला मी जिंकला पण आता मी जास्तच एकटी पडले.

दरम्यानच्या काळात मी सगळ्या जहागिरीची माहिती करून घेतली. भाडेकरू, शेतात राबणारे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना वेळोवेळी मदत केली. या लोकांना मानाने वागवले पाहिजे, अमानुषपणा त्यांच्या बाबतीत होता कामा नये, अशी सक्त ताकीद तिथल्या अधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे एक दयाळू राणी अशी समाज मनात प्रतिमा निर्माण झाली. जहागिरीत फिरताना हत्ती, तलवारबाज‌ सैनिक, रसद भरलेल्या गाड्या घेऊन पालखीत बसून मी जात होते. लोकांना माझ्या येण्याची खबर मिळावी म्हणून ढोल वाजवून सूचना दिली जाई. मग मी त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या सोडवत असे. माझं आरस्पानी सौंदर्य माझा शत्रू होऊ नये म्हणून मरेपर्यंत मी पडदा बाजूला केला नाही.

माझी ईश्वरचंद्र विद्यासागर या प्रसिद्ध समाज सुधारकाशी ओळख झाली आणि माझे आयुष्यच बदलले. एकाही जहागिरीचा लिलाव होण्याची वेळ तर येऊ दिली नाहीच पण दूर दूर पर्यंत जाहगिरीचा विस्तार केला आणि मिळणाऱ्या सगळ्या पैशाचा चांगल्या कामासाठी विनीयोग व्हावा यासाठी राजीवलोचन यांच्यासारखे दिवाण मदतीला घेतले. विधवा, निराश्रित, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासाठी वसतीगृहे बांधली. विद्वानांना त्यांच्या कामासाठी आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणावर भर दिला. शिक्षण विनाशुल्क केले. मेडिकल कॉलेज ची सोय केली. फक्त बंगालच नाही तर बाहेरच्या शिक्षण संस्थांनाही मदत केली. स्त्रियांना शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यावर माझा भर होता. परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण आर्थिक मदत देत होते. त्याशिवाय तलाव खोदून पाण्याची सोय करणे, नद्यांची सफाई करणे, झाडे लावणे ही कामे केली. महिला व लहान मुलांसाठी दवाखाने, औषधाची दुकाने काढणे, कुष्ठरोग्यांसाठी आश्रम बांधणे, छापखाने काढणे या गोष्टी केल्या. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आली तर बाधितांना अन्न, पाणी, कपडा, अंथरूण पांघरूण सगळी सोय करत होते. बंगालमध्ये माझ्या कारकिर्दीत बऱ्याच वेळा दुष्काळ पडला पण मदत देण्यात कधी हयगय केली नाही. फक्त बंगालच नाही तर आयर्लंड ला मोठा दुष्काळ पडला तेव्हाही आमच्याकडून मदतीचा हात दिला गेला होता. या सर्व सामाजिक कार्यांची नोंद घेऊन १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारकडून महाराणी ही उपाधी मिळाली. तसेच १८७८ ला ‘ऑर्डर ऑफ द ग्राउंड ऑफ इंडिया’ ची सदस्यता मिळाली.

आधुनिकतेचे मला वावडे नव्हतेच. सामाजिक बदल स्वीकारायला हवेत हीच माझी धारणा होती. पण पडदा प्रथा मात्र मी सोडायला तयार नव्हते. त्यासाठी ईस्ट इंडिया विरुद्ध कायदेशीर लढा करावा लागला. बंगालमधील प्रतिष्ठेची दुर्गा पुजा बंद करण्याचा फतवा काढला होता. त्यासाठीही मी ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढले व पुन्हा मानाने दुर्गापूजा सुरू केली. शिक्षणामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. इतिहास, भूगोल, विज्ञान, धर्म या विषयावरील पुस्तकांचा खजिनाच माझ्याजवळ होता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रे, कोर्टाच्या निर्णयावरील सरकारी प्रकाशने यांचे आवर्जून वाचन करीत होते व महत्त्वाच्या गोष्टींची कात्रणे काढून त्यांची चिकटवही बनवीत होते.

शेवटपर्यंत मी कोणालाही माझे चित्र किंवा फोटो काढण्याची परवानगी दिली नाही. इतिहास माझ्या चेहऱ्यावरून नाही तर माझ्या कार्यावरून मला ओळखेल ही खात्री आहे. जनता माझ्यासाठी नारायण होती तर तिचं कल्याण ही माझी देवपूजा होती.

निरक्षर म्हणून दुर्लक्षित, विधवा म्हणून उपेक्षित, अपमानित या सगळ्या मधून बाहेर पडून भाडेकरू, कष्टकरी कुळं, कासीमबाजारची जनता व ब्रिटिश सरकार यांच्याकडून एक कल्याणकारी महाराणी म्हणून माझा स्वीकार झाला आणि मी धन्य झाले!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted