सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ पुन्हा दुबई… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
कोरोनाच्या सुरुवातीला 2020 साली 12 मार्चला दुबई- पुणे प्रवास करून पुण्यात आलो आणि त्यानंतर पुन्हा दुबईला येणे झाले नाही! घरातील काही दुःखद प्रसंगांमुळे मुलीचेच पुण्याला वरचेवर येणे झाले. दुबईला ह्यांच्याशिवाय येण्याची ही पहिलीच वेळ होती. दुधावरच्या साईसारखी माझी नात – अनुश्री यावेळी आजीला दुबईला घेऊन यायचंच असं ठरवून आईबरोबर – प्राची बरोबर आली होती! आधी मनाची तयारी करणे आणि मग स्वतःची, यामध्ये माझे ८/ १५ दिवस गेले. एकदाची निघायची तयारी झाली आणि 21 जुलैला पुण्याहून मुंबईला येण्यासाठी गाडी ठरवली. बॅग भरणे तसे सोपेच होते – कपडे आणि औषधे इतकेच! मोठ्ठी यादी करून औषधे आणून घेतली – लागणारी आणि न लागणारी सुद्धा! आता ‘बाबा’ बरोबर नाहीत, तेव्हा सर्व औषधे व्यवस्थित आपणच घ्यायला हवी, असे मनाला बजावत होते. ब्लड शुगर टेस्ट, कोलेस्ट्रॉल टेस्ट वगैरे सर्व करून घेतल्या. त्यात काही नाहीये, कळल्यावर मनाला उभारी आली! पाऊस सोबत घेऊनच पुण्यातून सकाळी नऊ वाजता मुंबईला जाण्यास निघालो. फ्लाईट ३-४५ ची होती. पण पुणे- मुंबई प्रवास ट्रॅफिक आणि पाऊस यामुळे किती तास होईल सांगता येत नाही.. पावसामुळे बाहेरचे वातावरण अगदी ओलं ओलं होतं! पुण्यातून निघताना माझंही मन असंच ओलावलं होतं! नाही म्हटलं तरी तिथे कायम राहत असल्याने त्या घराचा लळा जास्तच! त्यातून मुलगा, सून, नातवंडे सगळी सवयीची झालेली! त्यांच्या वेळा बघणे, वाट पाहणे हे सगळं रोजचंच.. तेजस सोबत जेवणे, त्याला खाऊ घालणे हे माझेच विरंगुळ्याचे विषय! मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांना आपली फार गरज नसते हे बुद्धीला पटलं असलं तरी मनाला नाही ना… रोज ‘आजी किती खाऊ घालतेस!’ असा तेजस चा अभिप्राय ऐकला की माझंच पोट भरतं आणि तनु शाळा, क्लास करून दमून येते, तिने व्यवस्थित खाल्लं की मलाच बरं वाटतं! असो, तर असा हा लळा!
पण तिथून इथे येताना अनुश्री माझी अशी काळजी घेत होती की बस्स! विमानात बसेपर्यंत ‘आज्जू, आज्जू’ करून सतत आजीच्या दिमतीला होती. प्राची मोठेपणाने आम्हा दोघींना सांभाळत, पासपोर्ट, तिकिटे, लगेज याची व्यवस्था बघत होती. आतापर्यंत दुबईला माझ्या खूप फेऱ्या झाल्या, पण ही ट्रीप थोडी वेगळी होती. दरवेळी आम्ही दोघे बरोबर जात असू. आम्हाला बाबांची उणीव अर्थातच जाणवत होती. ह्यांना दुबईला खूप आवडत असे. दुबईचे घर, तेथील नवीन स्थळं पहाणे हे सगळं त्यांना आवडे. मनापासून खुश असायचे. लेक, जावई त्यांना साथ देत असत. नातवंडे लहान होती तेव्हा तर त्यांचा उत्साह खूपच असे, कारण लहान मुलांची त्यांना फार आवड होती.
एमिराएट्स ची फ्लाईट असल्याने आम्हाला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेच! फ्लाईट मध्ये मसाला काजू खात आणि इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत “फुलवंती” सिनेमा पाहता पाहता दुबई कधी आली कळलंच नाही! ढगांच्या गालीच्या वरून विमान हळूहळू खाली उतरू लागलं आणि सर्वांची लगबग सुरू झाली. विमानातून उतरून बेल्ट वरून सामान ताब्यात घेतानाही अनुश्रीची आईला मदत आणि ‘आज्जू, तू इथे स्वस्थ बसून रहा, आम्ही काय ते करतो.. ‘ ही आजीला ताकीद! बाहेर आल्यावर मंदार गाडी घेऊन आलेले होतेच. आपल्याकडे पाऊस असला तरी इकडे उन्हाळा चालू आहे आणि तो हवेचा फरक विमानतळातून बाहेर पडतानाच लक्षात येतो. यावेळी मी ज्या घरात आले आहे ते प्राचीचे नवीन घर आहे, त्यामुळे मी ते प्रथमच पाहत होते. फ्लॅट खूपच मोठा आहे. हॉल, चार बेडरूम, किचन, मेड रूम असे सर्व आहे. अनुश्रीने प्रथम मला सर्व घर फिरवले.. मला तर भुलभुलय्या च होता हा!
अवनीश ने आल्या आल्या मला सामान लावायला मदत केली. मुलांनी अक्षरश: आजीची सरबराई केली. प्राची कडच्या मावशी खरोखर ‘अन्नपूर्णा’ आहेत. येथे आले की माझा ‘किचन कट्टा’ बंदच मग “लेखन- वाचन कट्टा” चालू राहतो.
दुबईतील बरीचशी प्रेक्षणीय ठिकाणे पूर्वीच पाहून झालेली आहेत. अबुधाबी रोडवरील नवीन राम मंदिराचे स्थान पहावयाचे आहे. सध्या उन्हाळा खूप आहे. घरात ए सी त बसून बाहेरचे तापमान कळत नाही, पण प्रत्यक्षात हवा खूप गरम आहे. स्वतःचे वाढते वय आणि वजन पाहता, आता भरभर चालणे जमत नाही, पण तरीही जमेल तेवढे फिरायचे, स्वतःला आणि आपल्यामुळे येथील सर्वांना त्रास न होऊ देण्याची काळजी घ्यायची एवढेच!
दुबई चा पहिला दिवस तर साजरा झाला! हळूहळू येथील वातावरणाची सवय होते आणि ती सवय होईपर्यंत जायचे दिवस जवळ येतात… आत्तापर्यंत पुण्यात लेकीचे माहेरपण चालू होते. आता लेकीच्या घरी आईचे माहेर पण चालू आहे! हे केवढे भाग्य आहे माझे!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






