श्री संदीप काळे
☆ “तीन तिघाडा…!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆
रायगडमधली सगळी कामं आटवून मी सिद्धार्थ जाधव नावाच्या माझ्या कॉलेज मित्राच्या घरी जेवण केलं. मुंबईमधल्या माणसाला कोणाच्या घरी जाऊन जेवायचं म्हटलं की जरा अडखळल्यासारखं वाटतंच. आणि ते जेवण जर एखाद्या गावच्या ठेवणीत आईच्या स्पर्शाने बनवलं असेल, तर त्याची मजा काही औरच. सिद्धार्थ आणि मी तसे नांदेड जिल्ह्यातले. त्याच्या आईची जुनी ओळख, मग काय — आईने पक्का मराठवाडी जेवणाचा बेत आखला आणि जोरदार जेवण झाले.
जेवण झाल्यावर मी पुढच्या रस्त्याला निघालो. गाडी सुरू होती. मी माझ्या लॅपटॉपवर माझीच प्रेमसेतू नावाची कादंबरी वाचत होतो. बराच वेळ प्रवास झाल्यावर “फणसाड अभयारण्य” असा बोर्ड वाचायला मिळाला. पुढे मुरुड-जंजिरा आणि रोहे अशी शहरे आसपास असल्याचं फलकावरून जाणवलं. त्या रस्त्यावर मध्ये येणारी माणसं — जंगलातून रस्त्यावर प्रवास करणारी माणसं; कोणी फळं विकत होतं, कोणी लाकडं वाहत होतं, कुणी गुरेढोरे चारण्यासाठी जंगलामध्ये ये-जा करत होतं.
जंगलाच्या आतमध्ये थोडं पुढे गेल्यावर माणसांची वर्दळ जरा कमी झाली. एका वाहणाऱ्या शांत आणि निरागस झऱ्यावर माझी नजर गेली. तिथे प्रचंड शांतता होती. आसपास असणारं वातावरण मनाला मोहिनी घालत होतं. मी सगळीकडे पाहिलं — आसपास कोणीही नव्हतं. कदाचित म्हणूनच इथल्या वातावरणामध्ये एक वेगळी शांतता होती.
माझ्यासोबत असलेला शंकर नावाचा माझा चालक मला म्हणाला, “साहेब, तुम्ही त्या झऱ्याकडे पाहत आहात; पण त्याच्या थोडं पलीकडे पहा. ” मी पाहिलं तर एका बाजूला दोन-चार मोर एका झाडाखाली बागडत होते. त्या मोरांच्या पलीकडे, दोन छोटे-छोटे हरणाची पिल्लं पाणी पिण्यासाठी पाऊलवाटेने पाण्याच्या दिशेने जात होती. आम्ही गाडीचा आवाज न करता शांतपणे तिथेच थांबलो होतो.
असं वाटत होतं की माणसाने त्या सगळ्या प्राण्यांच्या विश्वावर प्रचंड अतिक्रमण केलं आहे. बिचाऱ्या प्राण्यांना माणसाने कुठेच सोडलेलं नाही.
माझ्या चालकाने मानेखालची शीट लांब केली आणि त्या लिंबाच्या झाडाखाली रस्त्यावर शांतपणे त्या शीटवर पडला. सिद्धार्थच्या आईचं जेवण त्याच्या अंगाला लागलं होतं, हे माझ्या लक्षात आलं. मी लॅपटॉप आवरला आणि चालकाला आवाज देत म्हणालो, “अरे, मी जरा आलोच. ” ड्रायव्हरने लावलेले डोळे थोडेसे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. मी गेल्याची खात्री करून तो अजून शांततेत पडून राहिला.
मला दुरून दिसणाऱ्या त्या झऱ्यापर्यंत मी चालत गेलो. मी जाईपर्यंत त्या हरणांचं पाणी पिणं झालं होतं. माझ्या पावलांच्या चाहुलीने ते मोर केव्हाच पळाले होते. आता मी तिथली शांतता आणि ते पाण्याचे वाहणारे झरे — अशा आमच्यातच न बोलताही गप्पा सुरू होत्या. मी बूट काढले आणि शांतपणे त्या पाण्यात पाय सोडून बसलो.
त्या जागेवर खऱ्या अर्थाने सांगायचं तर शांत जगाची चाहूल लागली होती — म्हणजे माणसं नाहीत, वाहनांची जवळजवळ ये-जा नाही, मोबाईलला रेंज नाही, कोणाचं बंधन नाही, कुठल्या फॅक्टरीचा किंवा विमानाचा आवाज नाही.
मला असं वाटलं होतं की थोडा वेळ झाल्यावर माझा चालक मला शोधत-शोधत तिकडे येईल आणि म्हणेल, “चला, उशीर झाला”; पण तो कशाचा येतोय! शांत ठिकाणी आणि लिंबाच्या झाडाखाली त्याला लागलेली झोप अधिकच गाढ स्वरूपाची होती, हे त्याच्या न येण्यामुळे मी समजून गेलो.
पुढच्या प्रवासाला लागावं, या हेतूने मी उठणार तितक्यात दोन महिला आणि एक मुलगी डोक्यावर लाकडांच्या मोठ्या मुळ्या घेऊन येताना मी पाहिल्या. त्या तिन्ही माझ्या अगदी जवळ आल्या. त्यांनी अलगदपणे त्या लाकडाच्या मुळ्या खाली ठेवल्या आणि मी ज्या ठिकाणी पाय सोडून बसलो होतो त्या झऱ्याचं पाणी गटागट पिऊ लागल्या. पाणी प्यायल्यावर त्यांचा थकलेला चेहरा एकदम प्रसन्न झाला.
त्या सुनसान जागी, जिथे सगळीकडे “सावधान” असे बोर्ड लावलेले होते, जिथे माणसांचा-पक्ष्यांचा फारसा थारा नव्हता, तिथे या दोन महिला आणि एक मुलगी एवढ्या जड लाकडं घेऊन कुठे जात असतील? हे रोजचं त्यांचं काम असेल का? यांना इथल्या हिंस्र प्राण्यांची भीती वाटत नसेल का? असे प्रश्न माझ्या मनात आले.
मी त्यांना बोलावं का, आणि बोलल्यावर त्यांना आवडेल का, हा प्रश्नही मनात आला. पण मी संकोच न ठेवता मोठ्याने आवाज दिला —
“ताई, हे पाणी काय पाईपलाईनचं आहे का?”
मी ज्यांना प्रश्न विचारला, त्या बाईने दुसऱ्या बाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पदरानं चेहरा पुसला आणि हसत म्हणाली,
“दादा, हे जंगलातून येणारं पाणी आहे. इथे कुठली पाईपलाईन आली आहे?”
मी विचारलं, “बारा महिने पाणी असतं का?”
ती म्हणाली, “हो, इथे नेहमी पाणी असतं. ”
मी विचारलं, “तुम्ही कुठे राहता?”
हे ऐकल्यावर तिचा सूर थोडा आवरलेला झाला, “बाजूलाच राहतो, ” एवढंच उत्तर दिलं.
मी म्हणालो, “बरं ताई, ठीक आहे, मी निघतो. ”
त्यावर ती म्हणाली, “दादा, जरासा हात लावाल का, ही लाकडं उचलायला?”
मी हसलो, “हो का नाही, नक्की. ”
पण तिनं लगेच म्हटलं, “असू द्या, दादा. आम्ही थोडं खातो, थोडा वेळ बसतो, मग निघतो. ”
मी हो म्हणून मान हलवली.
तिने पिशवीतून भाकरी काढली. त्या खात होत्या. त्या दोन मोठ्या महिलांना मला बोलायला संकोच वाटत होता, पण धाकटी मुलगी मोकळेपणाने बोलत होती.
ती म्हणाली, “दादा, तुम्ही आमच्या सरांसारखे दिसता. तुम्ही पण शिक्षक आहात का?”
मी हसत उत्तर दिलं, “नाही, मी पुस्तकं लिहितो, लेखक आहे. ”
ती म्हणाली, “थोडं खाल का भाकरी?”
मी म्हणालो, “नको, मी आत्ताच जेवलो. ”
ते ऐकून दुसरी महिला म्हणाली, “अगं, एवढे मोठे माणसं आहेत, तुझा चटणी-भाकरीचा तुकडा खातील का?”
हे ऐकून मुलीचा चेहरा पडला.
मी म्हणालो, “अहो, अन्नापुढे लहान-मोठं असतं का? दे, अर्धी भाकरी मलाही द्या, मी खातो. ”
माझं ऐकताच ती मुलगी पटकन उठली. तिनं भाकरीचा एक तुकडा मोडला, त्यावर चटणी लावली, एक मिरची ठेवली आणि मला दिली.
तो घास तोंडात जाताच माझ्या मनानं सिग्नल दिला — हा मेनू झकास आहे! हॉटेलमधून सोन्याचा चमचा घेऊन खाण्यापेक्षा हा मानपानानं दिलेला घास कितीतरी मौल्यवान होता.
जेवताना गप्पा सुरू झाल्या. त्यातून त्यांच्या जगण्याच्या गोष्टी उलगडल्या.
सर्वसामान्य माणसाला रोज पोटाची आग भागवण्यासाठी काय काय उपाय करावे लागतात, हे लाल दिव्याच्या गाडीत बसून योजना करणाऱ्यांना कळणारच नाही.
ती एक मुलगी आणि त्या दोन महिला माझ्यासाठी जिवंत केस स्टडी होत्या — गरिबी आणि लाचारीत जगणारा महाराष्ट्र माझ्यासमोर उभा राहिला. पण या गरिबीतही त्यांनी आपला स्वाभिमान कधीच विकला नव्हता — हाच महाराष्ट्राचा चेहरा आहे.
– क्रमशः भाग पहिला
© श्री संदीप काळे
चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.
व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई
मो. 9890098868
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈







छान लेख सर