श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘महर्षि व्यास, वाल्मिकींचे गुरु.. ‘गुरुंचेही गुरु’ – देवर्षी नारद – भाग – १ ☆ श्री दिवाकर बुरसे

जगातील एकमेव नारद मंदिर पुण्यात आहे. त्या मंदिरातील महर्षी नारदांची प्रसन्न मूर्ती!

नारद म्हटले की प्रत्येकाच्या मुद्रेवर स्मितरेषा उमटते. जनमानसात नारदांचे एक वेगळेच चित्र रंगवले गेले आहे. सर्वत्र संचार करणारे, चतुर बोलणारे, लावालाव्या करणारे, उपद्व्यापी, सतत काही तरी उचापती करणारे, कळलावे, कलागत्ये, बोलघेवडे, कुणा दोघात भांडणे लाऊन स्वतः नामानिराळे होऊन दुरून गंमत बघणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे, असे एक ‘गमत्या’ व्यक्तिमत्व म्हणून नारदांचा परिचय आहे. त्यांना सहसा कोणी गांभिर्याने घेत नाही.

हरदासांच्या कथेत, कीर्तनकारांच्या अख्यानात, लावणीतल्या वगनाट्यात, लोककलांत, संगीत नाटकात, अगदी हिंदी वा प्रादेशिक भाषांमधील चित्रपटात सुद्धा, कुठेही नारद हे पात्र अवतरले की प्रेक्षक, श्रोते प्रमुदित होऊन टाळ्या वाजवणारच.

असे हे सर्वांचे लाडके नारद खरेच विनोदी, गमत्या, उपद्व्यापी आहेत की त्यांना आम्ही नीट ओळखले नाही? देवर्षी नारद नक्की कोण आहेत? कसे आहेत? गावभर भटकणे आणि लावालाव्या करणे येवढेच काम त्यांनी केले आहे की त्यांचे काही अन्य कर्तृत्वही आहे? नारद विदूषक आहेत की विद्वान? या लेखात आपण नारदांना जरा तरी नीट समजून घेऊया.

देवर्षि नारद यांचा वंश/ गोत्र

पुराणात ब्रह्मदेवाच्या तीन पत्नींची नावे आढळतात

१ सावित्री, २ गायत्री, ३ सरस्वती

ब्रह्मदेवांचे पुत्रः 

१. मारिचि, २. अत्रि, ३. अंगिरस, ४. पुलस्त्य, ५. पुलह, ६. कृतु, ७. भृगु, ८. वशिष्ठ, ९. दक्ष, १०. कंदर्भ, ११. नारद

ब्रह्मदेवाचे मानसपुत्रः- 

१ सनक २. सनंदन ३. सनातन ४. सनत्कुमार.

– – – पुराणात या मुलांच्या संख्येत व नावात एकवाक्यता आढळत नसली तरी हे स्पष्ट आहे की नारद हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत व त्यांची माता सरस्वती आहे.

नारदांचा जन्म ज्येष्ठ कृष्णपक्षातील द्वितीयेला झाला आहे. नारदांचा धर्म हिंदु. पंथ वैष्णव. वैष्णव संप्रदायाचे ते परमाचार्य व मार्गदर्शक आहेत याविषयी पुढे कळेलच.

जन्मकथा

आधीच्या कल्पात नारद ‘उपबर्हण’ नावाचे गंधर्व होते. त्यांना आपल्या रूपाचा फार गर्व होता. एकदा ब्रह्मदेवाच्या मनोविनोदासाठी अप्सरा आणि गंधर्वगण नृत्यगायनाने त्यांची आराधना करीत होते. उपबर्हण हे स्त्रियांसह श्रृंगारिक हावभाव करीत जरा विलंबानेच तेथे उपस्थित झाले. त्याचे असे अशिष्ट आचरण बघून ब्रह्मदेव रागावले आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू पुढील जन्मी ‘शूद्र योनी’त जन्म घेशील. शापाचा परिणाम म्हणून पुढील जन्मी ते ‘शूद्रा दासी’चे पुत्र झाले.

हे माता व पुत्र साधुसंतांची निष्ठेने सेवा करीत. हा पाच वर्षचा बालक संतांच्या ताटात उरलेले अन्न प्रसाद म्हणून भक्तिभावाने ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याची पूर्वजन्माची सारी पापे धुतली गेली. बालकाच्या सेवेवर प्रसन्न होऊन साधुंनी त्याला नामसाधना, जप व ध्यानधारणा करण्याचा उपदेश दिला.

लौकरच शूद्रा दासीचा सर्पदंशाने मृत्यु झाला. आता केवळ पाच वर्षाचा नारद जगात एकटा उरला. ‘मातावियोग हा भगवंताचा अनुग्रहच होय’ असे समजून तो बालक अनाथांचा नाथ दीनानाथ अशा भगवंताचे भजन करत घराबाहेर पडला.

– – एक दिवस हा बालक एका पिंपळाखाली ध्यान लाऊन बसला असता त्याच्या हृदयात भगवंताच्या आस्तित्वाची एक लहर विजेसारखी चमकून गेली. त्यामुळे त्याच्या चित्तात भगवंताच्या दर्शनाची व्याकुळता अधिकच वाढली. तेवढ्यात आकाशवाणी झाली, ‘हे दासीपुत्रा! आता या जन्मात तुला माझे दर्शन होणे असंभव आहे. पण पुढच्या जन्मी तू माझा पार्षद होऊन मला प्राप्त करशील ‘.

– – यथावकाश बालकाचा मृत्यु झाला आणि कल्पांती त्याचा आत्मा ब्रह्मातत्वात विलिन झाला. योग्य समयी नारदजी ब्रह्माचे मानस पुत्र म्हणून अवतीर्ण झाले.

पौराणिक उल्लेख

उभी ताठ शिखा, त्यावर मोग-याचे शुभ्र, सुगंधी पुष्प खोचलेले, भाळावर उभे गंध, भाळाच्या दोन्ही अंगाला गोपिचंदनाच्या नाममुद्रा उमटवलेल्या, खांद्यावर ‘महती’ नावाची वीणा, एका हातात चिपळ्या, मुखी ‘नारायण’ शब्दाचा जप, कटिभोवती नेसलेले शुभ्र वा पीत वस्त्र, गळ्यात सुगंधी धवलपुष्पमाला किंवा तुलसीदलमाला, पवन पादुकांवर आरुढ होऊन स्वच्छंदपणे त्रिखंडात विचरण करणारे नारद सर्वपरिचित आहेत. ते भक्ति व नामसंकीर्तन याचे आद्याचार्य आहेत. ते अजर-अमर आहेत. स्वतः भगवान श्रीकृष्ण देवर्षिंगणांमधे नारदांना आपली विभूति मानतात. भगवद्भक्तीची स्थापना, प्रसार व प्रचार करण्यासाठीच त्यांचा अवतार झाला आहे. कठीण तपस्या करून त्यांनी ‘ देवर्षि, ब्रह्मर्षि’ हे पद प्राप्त केले आहे. त्यांना ब्रह्मदंदन असेही म्हणतात. ब्रह्मलोक हे नारदांचे निवासस्थान आहे.

पुराणकथेप्रमाणे राजा प्रजापति दक्षाने नारदांना शाप दिला होता की ते दोन पळांपेक्षा अधिक काळ एकास्थानी थांबू शकणार नाहीत. त्यांच्या सततच्या भ्रमंतीमागचे हेच कारण आहे.

नारदांचे व्यक्तिमत्व

नारद आत्मज्ञानी, नैष्ठिक ब्रह्मचारी, त्रिकाल ज्ञानी, वीणा द्वारा निरंतर मधुर गायन करणारे प्रभु भक्तिचे प्रचारक, श्रेष्ठ वैष्णव, दक्ष, मेधावी, निर्भय, विनयशील, जितेन्द्रिय, सत्यवादी, स्थितप्रज्ञ, तपस्वी, चारी पुरुषार्थाचे ज्ञाता, परमयोगी, सूर्यासमान तेजस्वी, त्रिलोकाचे पर्यटक, वायुसमान गतिमान, सर्व युगात, सर्व समाजात व लोकात विचरण करणारे, मनोविजयी, नीतिज्ञ, अप्रमादी, आनंदरत, कवि, उत्तम गायक, निष्णात ज्योतिषि, प्राणिमात्रांवर नि:स्वार्थ प्रीति करणारे, देव, दानव, मानव अशा सर्व लोकात सदैव सम्मानित होणारे देवता पण तरीही ऋषित्व प्राप्त झाल्याने देवर्षि आहेत.

देवर्षि नारद धर्मप्रचार आणि लोककल्याणासाठी सतत प्रयत्नशील असतात. म्हणूनच सर्व युगांत, सर्व लोकात, समाजातील सर्व वर्गांमधे नारदजी सहज प्रवेश करू शकतात. सर्वत्र त्यांचे नेहमीच स्वागत केले जाते. वेळोवेळी केवळ देवतांनीच नाही तर दानवांनी सुद्धा त्यांचा सदैव आदर केला आहे, त्यांचे समादेश व मार्गदर्शन घेतले आहे.

नारदांच्या रचना/ग्रथसंपदा

नारद पंचरात्र, नारद भक्तिसूत्र, नारद पुराण, नारद स्मृतिवाद्यवीणासंदर्भ ग्रंथ, वैदिक साहित्य, रामायण, महाभारत, पुराण, स्मृति, अथर्ववेद, ऐतरेय ब्राह्मण इ. शास्त्रात कुठे ना कुठे नारदांचा उल्लेख आहेच आहे. ऋग्वेदातील मंडल ८-९ मधील काही सूक्तांचे द्रष्टा नारद आहेत. अथर्ववेद, ऐतरेय ब्राह्मण, मैत्रायणी संहिता यातही नारदांचा उल्लेख आहे. बृहन्नारदीय उपपुराणसंहिता (स्मृतिग्रंथ), नारदपरिव्राजकोपनिषद, नारदीयशिक्षा या सवे त्यांनी रचलेली अनेक स्तोत्रे पण उपलब्ध आहेत.

नारदांचे कार्य

नारदांची अगणित अलौकिक कार्ये केली आहेत. पुढील सूची पहा..

१. भृगुकन्या लक्ष्मीचा विवाह विष्णूंच्या बरोबर करवला.

२. इंद्राची समजूत घालून उर्वशी व पुरुरवा यांचे मीलन घडविले.

३. महादेवांकडून जलंधरचा नाश करवला.

४. कंसाला आकाशवाणीचा अर्थ समजून सांगितला.

५. वाल्मीकींना रामायणाची रचना करण्यास प्रवृत्त केले.

६. वेदव्यासांकडून भागवत पुराणाची रचना करून घेतली.

७. प्रह्लाद आणि ध्रुव यांना उपदेश करुन महान भक्त केले.

८. बृहस्पति आणि शुकदेवांसारख्यांना उपदेश करुन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले.

९. इन्द्र, चन्द्र, विष्णु, शंकर, युधिष्ठिर, राम, कृष्ण इ. ना कर्तव्याभिमुख केले.

१०. नारदजी भक्तिचा प्रसार करताना अप्रत्यक्षपणे भक्तांना सर्व प्रकारचे सहकार्य करतात.

११. नारद भगवंतांची विशेष कृपा लाभलेले त्यांचे विशेष लाडके भक्त आहेत. भगवंतांच्या लीलेत नारदांचा विशेष सहभाग असतो. जेव्हा जेव्हा भागवंत अवतीर्ण होणार असतात तेव्हा तेव्हा नारद भागवंतांच्या अवताराआधीच पुरेशी पृष्ठभूमी तयार करतात. त्यांच्या लीलानाट्यात महत्वाची भूमिका निभावत असतात.

१२. देवर्षि नारद हे व्यास, वाल्मीकि आणि महाज्ञानी शुकदेव इत्यादिंचे गुरु आहेत.

श्रीमद्भागवत हा भक्ति, ज्ञान व वैराग्य याचा परमोपदेशक ग्रंथरत्न आहे. नारदांच्या मार्गदर्शनाखाली व्यासांनी तो लिहिला व आम्हा मानवांना उपलब्ध करून दिला. तसेच रामायण, जे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरांचे पावन, आदर्श चरित्र वर्णन करते, तेही देवर्षि नारदजींच्या कृपेने आम्हाला प्राप्त होऊ शकले. नारदांनीच प्रह्लाद, ध्रुव, राजा अम्बरीष आदि महान् भक्तांना भक्ति मार्ग दाखवला. ते भागवत धर्माचे परमगूढ़ रहस्य जाणणारे, ब्रह्मा, शंकर, सनत् कुमार, महर्षि कपिल, स्वयंभुव मनु आदि बारा आचार्यांतील एक आहेत.

१३. देवर्षि नारदरचित भक्तिसूत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नारदजींना आपली विभूति म्हणताना योगेश्वर श्रीकृष्ण श्रीमद् भगवद्गीतेच्या दशम अध्यायात म्हणतात ‘अश्वत्थ: सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारद’.

– क्रमशः भाग पहिला

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted