डॉ. ज्योती गोडबोले
इंद्रधनुष्य
☆ ‘कथा एका रंगमंदिराच्या निर्मितीची...’ – लेखक: ॲडव्होकेट बाबूराव कानडे ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆
बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेवर अगोदर “आशानगर” नावाची झोपडपट्टी होती. ‘हा जिमखान्याला कुरूपतेचा डाग होय’, अशी पुणेकरांची भावना होती.
साक्षात बालगंधर्वांच्या हस्ते कुदळ मारली जात असतांना डॉ.बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा आला होता…..
.. ” शनिवार, नारायण, सदाशिव पेठांमधील नागरिकांसाठी बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती आरंभली आहे. नदीच्या पलीकडे कोण जाणार? अगोदर रिक्षाभाडे, नंतर नाटकाचा तिकीट दर, शिवाय रात्री बे रात्री कोण नाट्यरसिक जाणार लांबच्या बालगंधर्व रंगमंदिराला? “
बालगंधर्व रंगमंदिराची योजना पुणे महानगरपालिकेची. त्या अगोदर आचार्य अत्रे यांनी स्वत: वीस लाख रूपये खर्च करून रंगमंदिर उभारण्याची योजना असलेले पत्र पूर्वीच दिले होते. ते पत्र आजही नगरपालिका दप्तरांत जमा आहे. नंतर भुजंगराव कुलकर्णी, आयुक्त यांनी – “आचार्य अत्रे यांचेऐवजी नगरपालिकेने का बांधू नये?नगरपालिकेनेच रंगमंदिर बांधावे.”, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला.
पुणे शहरात एकच गदारोळ उठला. नाट्य थिएटर उभारणे नगरपालिकेचे काम नाही, असा बूट निघाला. त्यावर ” नगरपालिकेने फक्त संडास आणि मुता-याच बांधायच्या का? त्यांनी चांगले काम करायचे नाही का? ” – प्रश्न करण्याची पध्दत बघा. ते फक्त आचार्य अत्रे यांनाच जमले!
बांधकामाचे कंत्राट बी.जे शिर्के या नामांकित कंपनीला देण्यात आले. मुदत घातली. उलटा क्रम लावण्यात आला जसे १८०, १७९, १७८ असा. विद्युतीकरण महाराष्ट्र इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनला देण्यात आले. ते पूर्वी सकाळ परिसरात होते.
रंगमंदिर उद्घाटन सोहळा ठरला. निमंत्रणे सर्वेसर्वा पु.ल. यांच्या स्वाधीन. कार्यक्रम ठरला. अनावरण शुभहस्ते – आचार्य अत्रे, प्रमुख पाहुणे – मा. यशवंतराव चव्हाण, अध्यक्ष – महापौर नारायणराव गोरे.
पु.लं.नी मुंबई साहित्य संघ मंदिराला डावलून पार्ले सेवा संघाला निमंत्रण दिले. झाले मुंबईतील साहित्यिक मंडळी नाराज. साहित्यिकांची आचार्य अत्रेंकडे धांव. आता ‘राजकीय आजार!’ आचार्य अत्रे अनावरणाला आजारपणमुळे अनुपस्थित. तरीही तार पाठवून – रंगभूमी सासर सोडून माहेरी आली., हा अग्रलेख अवश्य वाचून दाखवावा, ही विनंती केली. अनावरण यशवंतरावानी केले. नानासाहेब अळंटळं करू लागले. मी एकदम ओरडलो, “आचार्य अत्रे यांचा अग्रलेख वाचा.” सर्वत्र कल्ला झाला. नानासाहेबांनी अग्रलेख मनापासून वाचला.
नंतर आचार्य अत्रे यांनी बालगंधर्व रंगमंदिर महिनाभर बुक केले. प्रीतिसंगम नाटकाचे प्रयोग महिनाभर केले. पहिल्या दिवशी सहा दिवसांचा प्लॅन आचार्य अत्रे यांनी जाहीर केला. लोक म्हणाले, ‘आचार्य अत्रे यांना वेड लागले आहे.’ आचार्य अत्रे डगमगले नाहीत. पहिल्या तासांत सहा दिवसांचा प्लॅन संपला! आचार्य अत्रे यांनी दाखवून दिलं, बालगंधर्व रंगमंदिरांतही नाटकं हाऊसफुल्ल होतात. विरोधकांना ही जबर चपराक होती. हा अत्रे थिएटरचा विजय होता. आचार्य अत्रे यांची इतर नाटके गाजली. आचार्य अत्रे यांनी पुन्हा एकदा पुणे जिंकले. महिनाभर आचार्य अत्रे यांच्या नावाचा जल्लोष चालू होता.
लेखक: ॲडव्होकेट बाबूराव कानडे
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






छान लेख!