डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ अलीबाबा आणि चाळीस चोर…! ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

– – माझ्यावरील पहिला आणि शेवटचाच खटला

आजवरच्या प्रवासात म्युजिक शो प्रोड्युसर, इव्हेंट मॅनेजर, अँकर, पत्रकारिता अशा विविध टप्प्यावरून आलो. त्यात अनुभवलेल्या पडद्यामागच्या काही अनोख्या किश्यांची ही सिरीज….

सुमारे तीस पस्तीस वर्षांपूर्वीची हि घटना आजही आठवली तर जाम हसू येतं… पण तेव्हा मात्र थोडी टरकली होती आणि त्यातून कसा मी कसा वाचलो त्याचीच हि चित्तरकथा….

त्यावेळी पुण्यातील संध्या दैनिकात प्रमुख वार्ताहर म्हणून काम करत होतो. मालक व माझे पत्रकारितेचे गुरु होते भीष्माचार्य वसंतराव काणे. आज पुण्यातले जे जे मोजके नामवंत पत्रकार आहेत त्यापैकी बहुतेकांना तयार करण्याचे काम वसंतरावांनी केलंय! खाजगीत त्यांना आम्ही तात्या म्हणायचो.

त्यावेळी तरुणाईचं रक्त माझ्या अंगात सळसळत असायचं, त्यामुळे फिल्डवर जाऊन धमाकेदार बातम्या मी आणायचो. रचनात्मक आणि समाजोपयोगी कार्य शोधून काढून लोकांसमोर ठेवायचो. त्याबद्दल त्याकाळात राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारही मिळाले

मात्र त्याचबरोबर खटकणाऱ्या गोष्टी, भ्रष्टाचार यावरही बेधडकपणे (मात्र पुराव्यासह) लिहायचो आणि त्याबद्दल त्या त्या लोकांवर कारवाईपण व्हायची.

त्याचवेळी माझ्या हाती एक टीप लागली की पुण्यातील एका प्रसिद्ध देवस्थानात अभिषेकाच्या नावाखाली गोलमाल सुरु आहे. ते खरेखोटे पाहण्यासाठी मी स्वतः तिथं एक साधा भक्त या नात्याने जाऊन अभिषेकाच्या दोन पावत्या फाडल्या. आणि विचारलं की, माझा हा अभिषेक कधी होईल? कारण वेटिंग आहे. त्यावर तो कर्मचारी म्हणाला, “दहा दिवसांनी होईल आणि तुम्हाला प्रसाद घरपोच येईल.”

*

आणि त्याप्रमाणे पोस्टाद्वारे तो प्रसाद बाराव्या दिवशी मला घरी मिळाला.

मी खुश कारण माझ्या हाती आता पुरावा लागला होता. तो असा की, मधल्या काळात मी तिथल्या इतर कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेत होतो. की इथं एकूण किती पुजारी आहेत? त्यातले अभिषेक कितीजण करतात? रोज सकाळी साधारण किती अभिषेक होतात? इत्यादी इत्यादी!

आणि मग शाळेत शिकवलेलं “काळ – काम – वेग” याच गणित मांडले तर माझा अभिषेक दहाव्या दिवशी होऊच शकत नव्हता तरी बाराव्या दिवशी “तुमच्या नावाने अभिषेक झाला” असं म्हणत प्रसाद घरी आला होता. त्यांच्या वेटिंग लिस्ट आणि रोजचे होणारे अभिषेक याचे गणित मांडले तर माझा नंबर सहा महिन्यांनी लागायला हवा होता जो दहाव्या दिवशी लागला!

याचाच अर्थ कळत नकळत भक्ताची मानसिक फसवणूक होत होती हे उघड आहे. शिवाय मी दोन वेगळ्या रकमेचे अभिषेक मुद्दाम करून पावत्या घेतल्या होत्या. एक पन्नास रुपयांची आणि एक शंभर रुपयांची…. तर पन्नासच्या पाकिटात जे मला आले त्यात फक्त एक वाढीव पेढा शंभरच्या पाकिटात होता म्हणजे वाढीव पन्नास रुपयात वाढीव काय मिळाले तर एक पेढा????

ये बात कुछ हजम नही हुई!

आणि मग मी सरळ त्यावर बातमी लिहिली, तीही फ्रंट पेजवर… ठळक अक्षरात….

“पुण्याच्या xxxx मंदिरातील…. अलिबाबा आणि चाळीस चोर”

*

दुसऱ्या दिवशी पुण्यात सगळीकडे खळबळ….. काही मंदिराचे विश्वस्त माझे मित्र होते त्यांचे धास्तावून मला फोन येणे सुरु झाले की त्या फुल्या फुल्या च्या जागी आमचे तर मंदिर नाही न?”

हसून मी त्यांना नाही सांगायचो. पण ज्या मंदिराबद्दल लिहिले होते त्यांच्याकडून मात्र फोन आला नाही तर थेट चार दिवसांनी वकिलाची नोटीस आली आणि माझ्यावर केस दाखल झाली असून मानहानीचा दहा लाखाचा दावा केला असून त्यासाठी कोर्टात हजर राहा” असं बजावण्यात आलेलं!

खरेतर जे मी छापले ते सत्य होते पण तरी पहिलाच असा नोटीस आणि कोर्टाचा प्रसंग असल्याने थोडासा टरकलो. म्हंटल… आपला पगारच तीन हजार रुपये…. केस हरलो तर दहा लाख देऊ कुठून?

स्वतःला जरी विकलं तरी इतके पैसे कोणी दिले नसते!

*

शेवटी भीत भीत मी तात्यांच्या केबिनमध्ये गेलो. तोवर त्यांच्याही कानावर हे सगळं गेलं होत पण मी आत गेल्यावर पाहतो तर ते शांत होते. मिश्किल हसत म्हणाले, “काय प्रताप करून ठेवला?”

मग मी जे काही घडलं आणि लिहिलं ते सविस्तर सांगितलं. त्यांनीही ते ऐकून घेतलं आणि पाच मिनिटं विचार केल्यावर म्हणाले…..

“कोर्टात जाशील तेव्हा मी सांगतो ते एकच वाक्य म्हण… काम होऊन जाईल अन तू सुटशील”

*

त्यांनी सांगितलेलं वाक्य खरेतर मला खटल्यातून सोडवेल असं वाटत नव्हतं. पण गुरु सांगत आहेत म्हणजे तथ्य असेल असं म्हणत….. कोर्टात हजर झालो.

माझ्या नावाचा पुकारा झाला.

मी उभा राहिलो. समोरच्या विरुद्ध पार्टीचे वकील त्या मंदिराच्या मुख्य अध्यक्षांना घेऊन आलेले. ज्यांनी स्वतः हा खटला भरला होता.

वकिलांनी त्यांची बाजू मांडल्यावर मला कोर्टाने (म्हणजे मा. जज्ज साहेबानी) विचारलं…

“काय हो… हे खरं आहे का? त्यांना तुम्ही चोर म्हटलं आहे “

मी म्हणालो, “हो खरं आहे., पण यात अध्यक्षांची बदनामी कशी काय झाली? मी काय म्हणालो आहे…. अलीबाबा आणि चाळीस चोर…. म्हणजे मी याना अलीबाबा म्हटलं आहे आणि कथेमध्ये तो अलीबाबा तर हुशार असतो. मी याना हुशार म्हणालोय तर बदनामी कशी झाली?

*

कोर्टात एकदम हशा उसळला!

*

यावर समोरचा वकील म्हणाला, “हरकत नाही, पण तुम्ही चाळीस चोर तर म्हणाला न? अन आमच्याकडे चाळीस कर्मचारी आहेत. त्यांना तुम्ही चोर म्हटलं असं गृहीत धरून मग त्यांच्यातर्फे खटला नवा उभा राहू शकतो”

आता माझी झाली पंचाईत… कारण तात्यांनी तर फक्त एकच ते वाक्य दिले होते! ती ढाल वापरून झाली पण आता काय करू? मात्र एकदम मला आठवलं की मधल्या काळात मी तिथं किती लोक काम करतात हे काढलं होत तर कळलं होत की पगारावर (म्हणजे मस्टरवर) पस्तीस असून पाच जण बिगारी (म्हणजे काँट्रॅक्टवर) आहेत.

ते आठवून जज्ज साहेबाना म्हटलं, “साहेब तरीही यांच्याच कर्मचाऱ्यांना मी चाळीस चोर म्हटलं हे लागू होत नाही कारण यांच्याकडे म्हणायला चाळीस जण आहेत पण मस्टरवर पस्तीसच आहेत. बाकी पाच बिगारी आहेत आणि त्यामुळे ते लेबर ऍक्ट नुसार तिथले स्थायी कर्मचारी धरले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तोही मुद्दा लागू होत नाही! (लॉ शिकणारे माझे काही मित्र होते त्यांच्याशी कायम संपर्क असायचा त्यातून मिळालेले हे एक ज्ञान मला त्यावेळी कामाला आले)

*

माझ्या या उत्तरावर  कोर्टातले उपस्थित लोकही हसायला लागले इतकेच नव्हे तर जज्जला पण हसू आवरेना!

आणि त्यांनी एका क्षणात केस डिसमिस केली…. आणि मी निर्दोष सुटलो!

*

दुसऱ्या  दिवशी या खटल्याची आणि माझ्या नावासह “अलीबाबा चाळीस चोरांचा खटला अशा रीतीने निकाली” अशा बातम्या झळकल्या!

*

मी नंतर ऑफिसवर येऊन तात्याच्या चक्क पायावर सपशेल आडवा होत दंडवत घातला तेव्हा त्यांनी जवळ घेत अजून एक मंत्र दिला,

“अरे कुणाबद्दल कितीही पुरावे असले तर त्याच्या नावासकट बातमी देऊ नये. बातमी तर द्यायची पण  नाव न घेताही कुणाबद्दल ती आहे हे लोंकाना कळलं पाहिजे अशी लिहायची… म्हणजे समोरचा माणूस खटला तर भरू शकत नाही आणि आपलं तर लोकांपुढे सत्य आणायचे काम होऊन जाते! कारण आपल्याला बातमीदारी करायची आहे… कोर्टात हेलपाटे घालत बसायला आपल्याला वेळ आहे का?”

*

आणि हा मंत्र लक्षात ठेवून नंतर मी त्या पद्धतीने बातम्या द्यायला सुरु केल्या.

आणि मग कधी खटल्याची पाळी आली नाही!

अशी हि चित्तरकथा!

कशी वाटली…. आवर्जून सांगा!

© डॉ. धनंजय देशपांडे  

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted