सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ काळ आला होता, पण – भाग – २ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – ‘गोळी मार स्साल्याला!’ टकलूने माझ्या कानपटीवर पिस्तुलाची मूठ मारली. डोळ्यात एखाद्या बोगद्यातला अंध:कार भरत चालला. धरणीकंप झाला. जग गोल गोल फिरायला लागलं. अंधारात शेकडो रातकिडे एकदम किरकिरू लागले. वेदनेची एक लहर वीजेसारखी शरिरातून गेली. मग अंधार अधीक गडद झाला. लडबडून मी जमिनीवर बसलो.) — आता इथून पुढे
‘सगळं माहीत आहे याला. माहीत असूनसुद्धा सांगत नाही. गोळी मार याला!’
काळ्या बोगद्यात अशुभ वटवाघळे फडफडत होती. मेंदूत कुणा टाईम बॉम्बची टिक् टिक् ऐकू येत होती.
एक ना एक दिवस प्रत्येकालाच मरायचे आहे. मरणाला काय भ्यायचं? पण थोडा अधीक वेळ जर मिळाला असता तर…. अनेक अर्धवट कामे तशीच पडून रहातील.
टकलूने कॉलर ओढून मला उठवले. सदर्याची वरची बटणे तुटून जमिनीवर पडली.
‘ऊठ, ऊठ भल्या माणसा, तू काय इतक्या लवकर मरू इच्छितोस. आता तरी सांग भल्या माणसा, कुठे आहे के. पी.?’
‘ मी सांगतो ना, ‘गोळी मार स्साल्याला!’
माझी कानपट जळत होती. एक टेंगुळ आलं होतं. ते विलक्षण ठणकत होतं. वाटत होतं, डोकं फुटून त्याचे हजार तुकडे होतील. जेव्हा वेताळ विक्रमाच्या खांद्यावर बसून त्याला कहाणी सांगत असे आणि काठीण प्रश्नाचं उत्तर विचारात असे, तेव्हा विक्रमालाही तसंच वाटत असेल का?
रात्री पार्टीत धीमने म्हटलं होतं, तुझी कुंडली पहिली आहे. शनीची साडे-साती सुरू झालीय. त्रास होईल. ‘हनुमान चालीसा’चा पाठ सुरू कर आणि मीठ कमी खा.’
‘काय रे, सांगतोयस के.पी. चा पत्ता की दाबू ट्रिगर? सरळ वरचं तिकीट कापलं जाईल.’ मृत्यू माझ्या माथ्यावर टक टक करत होती.
‘जर मी कुणा के.पी.ला ओळखतच नाही, तर तुम्हाला त्याचा पत्ता कुठून देणार?’
माझा आवाज विझत आलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीसारखा कापत होता.
‘अच्छा, तू के.पी.ला ओळखत नाहीस?’ दाढीवाला खंबीरपणे चालत माझ्यापाशी आला
‘नाही.’
‘तू शर्मा नाहीस?’ टकलूने विचारले.
‘आहे. ‘
‘विश्वास ठेवा, मी कुणाही के.पी. नावाच्या माणसाला ओळखत नाही.’
‘खोटं बोलतोय हा! गोळी मार याला!’ दाढीधारीने माझा उजवा हात धरून मागे मुरगळला. ‘आई ग!’ वेदनेच्या अजगराने हात आणि खांदे मजबूतपणे जखडले. मी कळवळलो. म्हंटलं, ‘हां हां मारा मला. क्षणोक्षणी मरत रहाण्यापेक्षा यातना लवकर संपून गेल्या, तर बरंच होईल!’
‘खरं खरं सांग, तू रजत शर्मा नाहीस? के.पी.चा पार्टनर?’ टकलूच्या पिस्तुलाची नळी आता माझ्या गळ्याच्या निळ्या नसीला कुरवाळत होती.
म्हणजे हे खुनी मला रजत शर्मा समजत होते तर…..
नाही’ विव्हळत मी म्हंटलं.
रजत शर्माला मी ओळखत होतो. शहरात आलेल्या काश्मिरी विस्थापितांची देख-भाल करणारी एक संस्था होती. त्या संस्थेचा तो सक्रिय सभासद होता. त्याशिवाय त्याचा स्वतःचा काही व्यवसायदेखील होता. जवाहर नगरमधे राहात होता. एक दोन वेळा देणगीच्या संदर्भात मला भेटला होता.
‘खोटं बोलतोय हा! मी म्हणतोय, गोळी मार साल्याला!’
‘तू रजत शर्मा नाहीस, यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा?’ टकलूने माझ्याकडे टवकारून पहात विचारलं, जसं काही तो पोलिसवाला आहे आणि मी गुन्हेगार.
‘कोटाच्या खिशात माझं आधार कार्ड आहे. बघा.’ माझा आवाज प्रकाशाची पायवाट शोधत होता.
टकलूने खुंटीवर टांगलेल्या माझ्या कोटाच्या खिशातून माझे आधार कार्ड काढले आणि काळजीपूर्वक बघू लागला. जसं काही त्याच्या अशा बघण्याने लिहिलेली अक्षरे बदलणार आहेत.
काळ जसा तिथे गोठला होता. मला वाटलं त्याच्या नजरेच्या ऊष्णतेने माझं आधार-कार्ड जळून जाईल. भिंतीवर चिकटवलेलं मधुबालेचं छायाचित्र थरथर कापून उठेल. कॅलेंडरमधून डोकावणारे, सोनल मान सिंहाचे काजळभरले डोळे घामेजल्या सारखे दिसत होते. सिलिंग फॅनच्या आडून एक पाल खाली पाहत होती.
थोड्या वेळाने टकलू म्हणाला, ‘हं… तू रजत शर्मा नाहीस तर…. राकेश शर्मा आहेस. ‘
गोठलेला काळ जसा वितळून वाहू लागला. बाहेर कुठे तरी एक कोकीळ जोराने कुकला. पाल सिलिंग फॅनच्या आडून बाहेर आली.
‘हो.’ मी म्हंटलं.
‘रजत शर्माला ओळखतॊस?’
‘नाही.’
मी या खुन्यांना रजत शर्माचा पत्ता काय म्हणून सांगू?
‘खोटारड्या, गोळी मार साल्याला.’ त्याचा आवाज पुन्हा एकदा तीक्ष्ण चाकूसारखा टोचला.
‘छोट्या, सोडून दे याला. हा तो नाही.
‘पण….. ‘
‘छोट्या आपण चुकीच्या माणसाला पकडलय.’
‘जा. मर साल्या ‘ दाढीवाल्यानं मला जोरात धक्का दिला. मी भिंतीवर जाऊन आदळलो. थोडंसं जुनं प्लॅस्टर खाली पडलं.
‘तू नशीबवान आहेस,की तू रजत शर्मा नाहीस, राकेश शर्मा आहेस.’ टकलू म्हणाला.
‘पण याने सगळं ऐकलय. याला जिवंत सोडून कसं जाता येईल? मी तर म्हणतो, गोळी मार स्साल्याला.’दाढीवाला माझा पूर्वजन्मीचा शत्रू वाटत होता.
‘राहू दे छोट्या! ऐक साध्या माणसा, तुला कळलंच असेल आम्ही किती भयंकर, धोकेबाज माणसे आहोत. आम्ही आज आलो, तर पुन्हा उद्याही येऊ शकतो. कुठेही, कधीही तोंड उघडू नकोस. कळलं! तू काहीच पाहीलं नाहीस. काहीच ऐकलं नाहीस. तू स्वतःवरच उपकार करशील. आपलं तोंड शिवून टाकशील. गांधींची तीन माकडेच आता तुला वाचवू शकतील. ‘
टकलूच्या गळ्यातून एक बिघडलेला पंखा घुर्र घुर्र करत होता.
मी मान हलवली. वा: खुन्यांनो, गांधीजींच्या तत्वज्ञानाचा हा उपयोग!
‘आणि आम्ही गेल्यावर अर्ध्या तासापर्यंत बाहेर पडायचं नाही. टकलूने ताकीद दिली. मी होकार भरला. वेदनेचा अजगर माझं अंग आवळत होता.
टकलूने पिस्तुल पँटच्या खिशात ठेवले आणि दरवाजा उघडला. उन्हाचा एक उत्सुक तुकडा गुप्तहेरासारखा घराचा शोध घेत खोलीत घुसला आणि आत पसरलेल्या तणावाला हुंगू लागला.
‘वाचला स्साला! पण काही गडबड केली, तर तुला गोळी मारायला मी स्वतः येईन. शब्दांच्या सुरीने मला अर्धमेला करत दाढीवालाही टकलूबरोबर बाहेर पडला. मी गुपचूप भिंतीला चिकटून उभा होतो. छाती अजूनही भात्यासारखी चालू होती. बाहेर मोटार सायकल स्टार्ट झाली होती. शेजारच्या मिस सैलीचा अल्सेशियन कुत्रा भुंकू लागला. मग मोटरसायकलच्या इंजिनाचा आवाज दूर होत होत गेला आणि कुत्राही भुंकायचा थांबला.
मला वाटलं, जसं काही कुणी माझ्या गळ्या वर ठेवलेला चाकू हटवलाय. एक दीर्घ श्वास घेऊन मी दरवाजापाशी आलो. ते गेले होते. बाहेर एप्रीलच्या रस्त्यावर एकाकीपण विखरून पडलं होतं. रस्त्याच्या कडेला उगवलेल्या उघड्या झाडा-झुडुपांवर नवी पालवी फुटू लागली होती. हवेत, शेजारच्या मंदिरात होणारा घंटानाद पसरत होता. तेवढ्यात उशिरा उठलेला कोंबडा उतावळ्या स्वरात बांग देत होता. मनगटावरील घड्याळात आठ वाजले होते.
मी कपाळावरचा घाम पुसला. नसांमधून धावणारी वेदना आता काहीशी कमी झाली होती. कानपटीवर उभारलेल्या टेंगुळावर हात फिरवला. रक्त येत नव्हतं. केवळ सूज होती. मृत्यू माझ्याजवळून वास घेऊन निघून गेला होता. आज त्याचा दिवस दुसरीकडे कुठे तरी होता. आज माझी पाळी नव्हती. कुठे तरी, कुणी तरी होतं, ज्याला वाटत होतं, मी अजून जगावं… त्याला मनोमन धन्यवाद दिले. मग खाली पडलेलं वर्तमानपत्र उचललं आणि आत डोकावलो. शेजारच्या कारखान्याचा सायरन पुन्हा वाजू लागला…… मला वाटलं, असा एखादा कारखाना, नाही का निघू शकत, जो केवळ चांगल्या आणि प्रामाणिक माणसांचंच उत्पादन करू शकेल?
– समाप्त –
मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय
मो: 8512070086
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





सुंदर आहे ‘काळ आला होता पण’!