सुश्री शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “शबरी – साक्षात श्रद्धा…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆
शबरी संबंधी,काही माहिती वाचनात आली होती.त्याचा संदर्भ घेऊन लिहिलेला लेख.
(शबरी म्हटलं की आपल्याला आठवतात तिनं रामाला दिलेली उष्टी बोरं. पण त्याही पलिकडे शबरी कोण कुठली ती दंडकारण्यात कशी आली याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती असते.तिच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा लेख.)
शबरी ही भिल्ल जनजातीतील एका राजाची मुलगी.तिचा जन्म कोजागिरी पौर्णिमेला झाला होता.ती राजकन्या होती.तिचं खरं नाव श्रमणा.भिल्ल जनजातीतील शबर जातीशी तिचा संध होता म्हणून कालांतरानं तिचं नाव शबरी पडलं.
शबरी दिसायला खूप सुंदर होती.होनहार होती.खूप दयाळू आणि प्रेमळ होती.श्रीराम जेव्हा वनवासाला गेले तेव्हा या नवासी लोकांशी त्यांचा खूप जवळचा संबंध आला.खरं तर राम – रावण युध्दाच्या वेळी राम आयोध्येतून सैन्याची मदत मागू शकले असते परंतु श्रीरामांनी तसं केलं नाही.त्यांनी तिथल्याच वनवासी बांधवांची मदत घेऊन युध्द जिंकले.( वानर सेना म्हणजे वानरांचे मुखवटे धारण केलेले मानवच होते असं सांगितलं जातं. )त्यामुळे राम हे वनवासींचे दैवत बनले.त्यांच्या नसानसात राम वसलेला आहे.शबरीही त्याला अपवाद नव्हती.सार्या प्रजेची शबरी खूप लाडकी होती.तिला सर्व प्रजा मानत असे.असं असताना,शबरी राजकन्या असताना,आपलं राज्य सोडून ती दंडकारण्यात का आली असा प्रश्र्न पडणं अगदी स्वाभाविक आहे.
शबरी लग्नाच्या वयाची झाल्यावर (त्याकाळी ७/८ वर्षांच्या मुलींचे विवाह करण्याची पध्दत होती.) तिच्या वडीलांनी एका भिल्ल राजकुमाराशी तिचा विवाह ठरविला. राजकुमार सुध्दा खूप सुंदर आणि गुणवान होता.लग्नाच्या आधी दोन दिवस शबरीनं,शेकडो पशू राजवाड्याबाहेर बांधलेले बघितले.तिनं आईला विचारलं, “आई, एवढे पशू इथं कशाला आणलेत? “आई म्हणाली, “अग तुमच्या लग्नात द्यायच्या मेजवानीसाठी आणलेत.ती आपली परंपरा आहे.” हे ऐकून शबरी खूप व्यथित झाली. म्हणजे आपल्या विवाहासाठी एवढ्या पशूंची हत्त्या होणार? छे! तिला हे काही बरोबर वाटले नाही.ही कसली परंपरा? हे काही बरोबर नाही.तिला खूप वाईट वाटलं.
भूतदया ठेवी तया काय उणे। प्रथम साधन हेची असे।
असे जे साधन जया चित्ती वसे। मायाजाल नासे तुका म्हणे॥
संत तुकारामांची ही उक्ती शबरीनं हजारो वर्षांपूर्वीच आमलात आणली होती.ह्या मुक्या प्राण्यांची हत्त्या टाळण्यासाठी,संसाराच्या मायाजालात अडकण्यापूर्वीही राजकन्या लग्नाच्या आधी एक दिवस रात्रीच्या वेळी पळून गेली.
दुसर्या दिवशी,आपण घरात नाही हे पाहून, वडील आपल्याला शोधायला माणसं पाठवणार हे तिला माहित होतं.म्हणून ती दिवसा झाडावर बसून राही.झाडावरची फळं खाऊन उदरनिर्वाह करी आणि रात्र झाली की चालू लागे.असं करता करता एक दिवस ती दंडकारण्यात येऊन पोहोचली.
दंडकारण्यात मातंग ऋषींचा आश्रम होता.तिथे ते तपस्या करीत. शबरीला त्यांची सेवा करण्याची इच्छा होती. पण ती भिल्ल असल्याने मातंग ऋषी तिची सेवा स्वीकारतील की नाही,अशी तिला शंका होती.म्हणून ती काय करायची पहाटे लवकर उठून,ऋषी उठण्याच्या आधी आश्रमाचा परिसर आणि आश्रमापासूनचा नदीपर्यंतचा रस्ता साफ करून ठेवायची.रस्त्यावरील काटे कुटे उचलून टाकायची.कारण ऋषी पहाटे नदीवर स्नानासाठी जातात हे तिनं पाहिलं होतं. त्यांना काटे टोचू नयेत म्हणून ती काळजी घेई. हे सगळं कोण करतं आहे याचा कुणालाच पत्ता नव्हता.
पण एक दिवस मात्र ऋषींनी तिला पाहिलं.तिच्या सेवेमुळे ते संतुष्ट झाले आणि तिला आश्रमात स्थान दिले.आश्रमातील कामं करताना तिच्या तोंडी सतत राम नाम असे.तिची रामावर असलेली श्रध्दा पाहून ऋषी प्रसन्न झाले.आपला शेवट जवळ आल्यावर त्यांनी तिला सांगितले, “मी गेल्यावर सुध्दा आश्रमात राहूनच तू रामाची प्रतिक्षा कर.एक दिवस तुला भेटण्यासाठी ते नक्की येतील.
मातंग ऋषींच्या मृत्यूनंतर शबरीचा वेळ रामभक्तीत आणि त्यांची प्रतिक्षा करण्यात जाऊ लागला.
अणूमाजी राम रेणू माजी राम।तृष्णी काष्ठी राम वर्ततसे।
बाहेरी अंतरी राम चराचरी ।विश्वी विश्र्वकारी व्यापलासे॥
ती राममय झाली होती. श्रीराम केव्हाही येतील म्हणून ती रोज,आश्रम अगदी साफसुफ करून ठेवायची.रामाला देण्यासाठी रोज ताजी फळं तोडून आणायची.त्याला आंबट, किडकी फळं दिली जाऊ नयेत म्हणून प्रत्येक फळ चाखून बघायची.असं करत करत कितीतरी वर्षं निघून गेली. शबरी म्हातारी झाली.पण तिचं रामाची प्रतिक्षा करणं थांबलं नव्हतं.
एक दिवस तिला कळलं की, दोन सुंदर युवक तिला शोधत आहेत.तिला समजलं की प्रभू रामच आले आहेत.आता तिच्या अंगात एक प्रकारचा उत्साह संचारला.ती पळत पळत रामाजवळ पोहोचली.त्यांना आश्रमात घेऊन आली.त्यांचे पाय धुवून पूजा केली आणि ती रामाला म्हणाली, ” रामा जर रावणाचा वध करायचा नसता तर तू इथं कशाला आला असतास? “
त्यावेळी श्रीराम आणि शबरी यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाविषयी एका लेखकानं लिहिलं आहे.आपल्याला माहित आहे की, अनेक लेखकांनी रामायण,महाभारतावर आपल्या कल्पनाशक्तीने अनेक कथा लिहिल्या आहेत त्यामुळे हे काल्पनिकही असेल पण तो जो संवाद आहे तो आत्ताच्या परिस्थिला लागू पडतो.म्हणून मी त्याचा उल्लेख इथं केला आहे.
शबरीचा प्रश्र्न ऐकून राम गंभीर झाले.ते म्हणाले, ” माते तू संभ्रमात पडू नकोस.मी तुलाच भेटायला आलोय.जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लोकांना कळेल की, सत्ता जेव्हा समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचेल तेव्हा रामराज्य येईल.फक्त रावण, खर, दूषण, शुर्पणखा यांच्यासारख्या विघातक शक्तींचा बिमोड करून किंवा फक्त रामाच्या शक्तीनेच नाही तर वनामध्ये असलेल्या शबरी सारख्या मातांच्या आशीर्वादाने सुध्दा युध्दं जिंकली जातात. लोकांना कळावं की श्रध्देने केलेल्या प्रतिक्षेचे फळ निश्र्चित मिळते. “
रामाचे बोलणे ऐकून शबरीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.काही वेळानं शबरीनं रामाला विचारलं ” बोरं खाणार? “राम म्हणाले, ” मी बोरं खाल्याशिवाय जाणारच नाही.” शबरीनं ती चाखलेली बोरं रामाला दिली.रामानं ती आनंदानं खाल्ली.लक्ष्मणानं रामाचं मन राखण्यासाठी बोरं घेतली पण ती उष्टी बोरं तो खाऊ शकला नाही.असं म्हणतात की राम- रावण युध्दात जेव्हा लक्ष्मणाला बाण लागून तो मुर्च्छित झाला तेव्हा या बोरांपासून बनवलेली संजिवनी बुटी दिल्यानं त्याला शुध्द आली.
श्रीरामानं तिला उपदेश केला. त्यानं शबरीला पूर्णावस्था प्राप्त झाली.तिनं रामाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, “श्रीरामा, तुझं दर्शन होताच माझे तप, ध्यान,अनुष्ठान सफल झाले.माझ्या गुरूंचं मी ऐकलं म्हणून मला आज तुझं दर्शन झालं. मी धन्य झाले.आता देहसंगाची निवृत्ती करण्यासाठी कृपा करून मला आज्ञा दे. ” असं म्हणून तिनं रामाच्या पायावर लोटांगण घातले.राम म्हणाले, “माते तू देह सोडून सुखानं परलोकात जा. “रामाची ही आज्ञा ऐकून शबरीनं आसन घातलं आणि आत्मतेज चेतवून देहाचं दहन केलं.आपली आत्मज्योत तिनं श्रीरामांमध्ये विलीन केली आणि ती स्वर्गवासी झाली.
© सुश्री शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




