मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Birthday Gift… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ Birthday Gift… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काल मैत्रिणीकडे आमची भिशी पार्टी होती. कालच तिच्या नातवाचा ११ वा वाढदिवस झाला. त्यामुळे आम्हाला पण केक मिळाला. तशी वाढदिवसाची पिझ्झा पार्टी हॉटेल मध्ये होती.

आमची मैत्रीण रमा देशमुख चे घर म्हणजे मोठ्ठा बंगलाच आहे. पैशाची चमकधमक दिसतेच.

सहजच विचारलं 

अग! मग रेहान ला काय गिफ्ट मिळाल?

रमा म्हणाली, ••• अग! मागच्या महिन्यात रेहानचा फोन हरवला, तेंव्हा पासून सारखा फोन घेऊन द्या म्हणत होता.

काल त्याला तेच गिफ्ट मिळाल. चांगला वीस हजारांचा फोन घेऊन दिलाय. आता किती दिवस टिकतो? माहीत नाही.

फोनची किंमत ऐकून तर माझ्या मनात वेगळाच हिशोब सुरू होता. आमच्या घरात माझा आणि यांचा फोन, मिळून तरी एवढी किंमत असेल का?

श्रीमंत लोकांची गोष्टच वेगळी. आणि आता तर सर्वच बदललंय. आमच्या वेळेस औक्षवाण, जमल्यास एखादा नवीन ड्रेस. म्हणजे दिवाळी किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने मिळत असे. आणि गोड जेवण. एवढं म्हणजे वाढदिवस साजरा झाला. आम्ही पण happy असायचो.

बरं असो,

तेवढ्यात रेहान आला.

स्वाती म्हणाली, •••

अरे व्वा! रेहान Happy Birthday.

तुझे gift दाखव ना.

व्वा! मस्तच आहे रे.

रेहान म्हणाला, •••

आजी! मला I phone हवा होता. आई बाबांजवळ आहे ना म्हणून.

बाबा म्हणाले आत्ता नाही, नंतर घेऊ.

 मी घरी आले, पण माझ्या डोक्यातून फोन ची किंमत काही केल्या जात नव्हती. जणू काही रमाच्या घरचा पैशाचा हिशेब मलाच बघायचा होता.

घरी सर्वांना ही गोष्ट सांगून झाली.

मुख्य म्हणजे पूढच्याच महिन्यात अनय पण १० वर्षांचा होतोय. आता हे महाराज काय म्हणतात? काय मागतात? माहीत नाही.

ही मुलं ऐकमेकांच बघून, ऐकून काय म्हणतील? काय मागतील? काही भरवसाच नाही.

मी अजयला रेहान ची गोष्ट सांगितली.

मी म्हंटल, ••• अरे!! बघ बाबा.

आधीच काही तरी ठरवल तर बरं होईल.

म्हणजे चूकीच्या मार्गाने गाडी जाण्याआधीच काही तरी ठरवूया.

अजय म्हणाला, ••• हो ना. खरच आधीच लक्ष द्यायला पाहिजे.

आज अनय शाळेतून आला आणि म्हणाला.

My dear आजोबा! My best friend!

आज शाळेत किशोरचा वाढदिवस झाला. त्याने सर्वांसाठी कॅडबरी आणली होती.

 आजी आजोबा! What are your plans for my birthday?

Ajoba Said, ••• 

Yes, my dear friend, I have a big plan for you.

तुझा ११ वा वाढदिवस हो ना.

मग मी ११ छान stories तुला सांगणार. एकदम वेगवेगळ्या. रामायण, महाभारत, क्रिकेट, , animal world, and whatever you say.

मी तुला 5 games घेऊन देणार.

 Cricket kit, badminton kit, football 

Chess, carrom board. + 5 books 

Is it ok?

Yes, my dear grand Pa. I love you.

I love you too. आजोबा म्हणाले.

आजोबांनी आजीकडे बघीतले, आता तुझा नंबर, असं इशाऱ्यानेच सांगीतले.

आजी तू काय देणार? सांग ना.

 तुला लाडू आवडतात ना. मी ११ प्रकारचे लाडू करणार, माझ्या लाडू बाळासाठी.

आवडेल का हे gift?

हो आजी.

आता मात्र आजीच्या सुगरणपणाची परीक्षाच होती. इतक्या वर्षांचा अनुभव आता कामी येणार होता.

तसे आजी आजोबांनी सर्व छानच सांभाळलं.

११ प्रकारचे लाडू?? अग! कोणते? आजोबांनी विचारल.

आजी म्हणाली, •••

मला येतात. रव्याचे, बेसनाचे, नारळाचे, मेथी, डिंक, नाचणी, पौष्टिक, कणकीचे, बुंदीचे, वाटल्या डाळीचे, दाण्यांचा, तिळगुळ लाडू आणि पोळीचा लाडू पण करता येईल की. बुंदीचे तेवढे फक्त विकत आणा.

आजी आजोबा तर परीक्षेत पास झाले 

खरी परीक्षा अजय अनिताची आहे.

आज वाढदिवसाचे भूत डोक्यात शिरलेले आहे.

अजय अनिता आॅफिस मधून आल्यावर आजीने सर्व सांगितले.

आजी म्हणाली आता तुम्ही दोघे तयार रहा.

खेळून झाल्यावर पुन्हा बर्थ डे पुराण सुरू झालं.

अजय अनिता म्हणाले, •••

हे बघ, मी आणि आईने ठरवलंय, आम्ही १० दिवस सुट्टी घेणार. आणि मस्त मजा करूया.

आजी आजोबा तू मी आई, बाहेर जाऊया, बिरयाणी खाऊया, कॅरम, क्रिकेट खेळुया, आणि तू म्हणशील ते.

Wow बाबा! You are great.

आजोबा म्हणाले, ••• 

म्हणजे Birthday जोरदारच होणार. गम्मत जम्मतच आहे बाबा एका मुलाची.

एक परिवार म्हणजे एक combined unit आहे. प्रत्येकाची जबाबदारी / निश्चित भूमिका असते. प्रयत्न असतात. फक्त ते वेळेच्या आधी समजून, आपल्याला पाहिजे असलेल्या दिशेने चक्रं फिरविता आले पाहिजे.

त्या साठी समज, असायला हवी आणि वेळही द्यायला हवा.

मुलं ऐकतच नाही, हे कारण सांगून बाजूला होणं बरोबर नाही.

थोडा प्रयत्न करून आपल्या मनाप्रमाणे विचारांना दिशा देता येते.

जग असंच असणार आहे. समाजात अशीच श्रीमंत माणस आपल्या अवतीभवती असणार आहेत, तेंव्हा आपल्याला आपल्या पद्धतीने मुलांना वाढविताना प्रयत्न तर करावेच लागतील.

अजय अनिता ने कामातून ब्रेक घेतला, त्यांना पण ते आवश्यकच होते. अशा प्रकारे आपल्या घरात, आपल्या इच्छेनुसार एक चांगली सिस्टम सेट करता येते.

फॅमिली टाईम, quality time महत्वाचा.

पैसा नक्कीच महत्वाचा, पण योग्य वेळी योग्य जागी विचार करून खर्च करायला शिकावं लागेल. आणि ते शिकवावं लागेल. प्रवाहाच्या दिशेने/ का विरुद्ध वाटचाल विचार पूर्वक करायला हवी.

संगत कोणाचीही असो, घडण बिघडण आपल्या हातात असतं.

म्हणतात ना, •••

 राह तो सीधी होती है मोड तो मन के होते है ।

लोकांच्या प्रेशर खाली येता कामा नये.

 चढाओढ, शर्यत कुठे करायची हे वेळेवर समजायला हवं, आणि मुलांनाही शिकवायला हवं. तेही कुठलाही complex न ठेवता. इर्षा, द्वेष न ठेवता.

आपल्या परिस्थितीनुसार खरं काय ते मुलांना कळलंच पाहिजे. स्पष्ट ‘हो’ किंवा ‘नाही’ मुलांना सांगायलाच पाहिजे.

If you don’t control your mind, someone else will control.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ६२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ६२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आनंदाच्या वाटा….

आम्ही व्यवसायाच्या निमित्ताने जळगावला राहत होतो पण आमच्या संसाराची खरी नाळ ही आमच्या अंमळनेरस्थित संयुक्त कुटुंबाशी कायम जोडलेली राहिली. आम्ही त्याच ‘एकत्र कुटुंबाचा एक भाग” हीच आमची खरी ओळख होती. जवळजवळ दर पंधरा दिवसांनी आम्ही अमळनेरला जायचोच. सगळेजण आमची अगदी आतुरतेने वाट बघत असत. वास्तविक आमच्या या परिवारातले प्रियजन तसे शांत गंभीर प्रवृत्तीचे, अबोल, मितभाषीच होते पण याचा अर्थ ते शिष्ठ, तिरसट, ’ आलात काय गेलात काय’ असे असंवेदनशील मुळीच नव्हते. काही नाती बोलकी असतात. काही अव्यक्त असतात पण अव्यक्त नात्यातले मनातले आदर आणि प्रेमाने गुंफलेले धागे चिवट असतात हे मी आजपर्यंत अनुभवलेलं आहे.

त्यावेळी आम्ही जळगाव- भुसावळ पॅसेंजरने अमळनेरला जायचो. पाळधी, धरणगाव, चावळखेडा, टाकरखेडा अशी गमतीदार नावं असलेली स्थानके ओलांडत आमचा अमळनेरपर्यंतचा जवळजवळ दीड दोन तासाचा अगदी धिम्या गतीचा प्रवास असायचा. या गाडीत प्रामुख्याने नोकरीसाठी अपडाऊन करणारे प्रवासी असायचे. नकळत मला माझ्या ठाणे -व्ही. टी. या मुंबईच्या लोकल गाडीचा प्रवास आठवायचा आणि पुन्हा शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचं वेगळेपण मला या जळगाव- भुसावळ पॅसेंजर मध्ये जाणवायचं. या प्रवासातली आजही मनात राहिलेली गमतीदार आठवण म्हणजे धरणगाव स्टेशनवर गाडीत डोक्यावर वेताचे डालके(टोपली) घेऊन स्वतःला सांभाळत चढणारा भेळवाला. तो कांदा, लिंबू, कोथिंबीर पेरून शेव कुरमुर्‍यांची इतकी काही चविष्ट भेळ बनवायचा की भूक असो नसो ती खाल्ल्याशिवाय आमचा प्रवास पूर्ण व्हायचाच नाही. आजही गाडीतल्या त्या गर्दीत कागदाची ओलसर त्रिकोणी घडीत सांभाळत चवी चवीने खाल्लेली ती धरणगाव ची भेळ जिभेवर त्याच चवीसकट रेंगाळते. आजही मी कधीकधी विलासला म्हणते, “पुन्हा एकदा आपण त्या जळगाव भुसावळ पॅसेंजरने अंमळनेरला जाऊया केवळ धरणगावची भेळ खायला. ”

अर्थात त्या सोबत प्रश्नही येतात. आता असेल का तोच भेळवाला? तोही म्हातारा झाला असेल? आता कशाला या धक्काबुक्कीत तो “पोटापुरता पसा” देणारा धंदा करेल?

या प्रवासातली आणखी एक आठवण म्हणजे “सदररूचा टांगा. ”

ज्या दिवशी आम्ही अंमळनेरला जाणार असू त्या दिवशी सकाळपासूनच आबा(माझे सासरे) मुलांच्या (माझे दीर सुहास, विवेक, श्री च्या) पाठी लागलेले असत. “अरे! आज दादा येणार आहे ना? सदरूला सांगून ठेव स्टेशनवर टांगा न्यायला. ”

आम्ही अमळनेर स्टेशनातून बाहेर पडताच ‘सदरू’ आमच्या स्वागताला उभाच असायचा. पटकन आमच्या हातातलं सामान घ्यायचा आणि “चला दादा! ” म्हणायचा. आम्ही त्याच्यापाठोपाठ त्याच्या टांग्यात जाऊन बसायचो. त्यादिवशी “सदरू” कोणाचेच भाडं घ्यायचा नाही. त्यावेळीही मला सुट्टीत आईबरोबर आजोबांकडे जातानाची आठवण यायची. व्ही. टी. समोर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या इमारती जवळ आजोबांनी आईसाठी पाठवलेली त्यांची तपकिरी रंगाची चकचकीत रोव्हर गाडी उभी असायची. रामजी नावाचा ड्रायव्हर आम्हाला घ्यायला यायचा. ‘रामजीची रोव्हर’ आणि ‘सदरूचा टांगा’ या दोन्हीमागची अव्यक्त भूमिका मला एकाच भावनेची असल्याचे जाणवायचे. आयुष्यातल्या या गोष्टी मुळीच छोट्या नसतात. नकळत त्या तुम्हाला घडवत असतात. आयुष्यातली कधीही न सुकणारी अशी ती हिरवळच असते.

नंतरच्या काळात आम्ही स्वतःच्या गाडीतून जळगाव- अमळनेर बाय रोड जायला लागलो. त्या प्रवासात कधी असायची रणरणत्या उन्हानं पार भेगाळलेली खानदेशची काळी धरती आणि कुंपणावरची बाभळी, काटे सावरीची हिरवी झाडं. मधूनच दोन्ही बाजूला डेरेदार हिरवेगार निंबाचे वृक्षही असायचे. त्याच्या सावलीखाली बसलेली गुरं ढोरं आणि इतर पांथस्थही दिसत. त्यावेळी आता पाऊस पडलाच पाहिजे ही सृष्टीची व्याकुळता जाणवायची. पावसाळ्यात मात्र सारं चित्र पालटलेलं असायचं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्वारी, बाजरी, कापूस, हरभरा गव्हाची हिरवीगार, लांबलचक पसरलेली शेती नयनरम्य वाटायची. सुजलाम् सुफलाम् देशाचं एक सुंदर हिरवंगार दर्शन मनभावन वाटायचं. गाडी चालवताना विलासची शेतीविषयक कॉमेंट्री मस्त असायची. मी आणि मुली.. आम्ही समरसून जायचो.

या प्रवासात आमचा एक महत्त्वाचा थांबा असायचा तो म्हणजे उजवीकडे वळणाऱ्या अमळनेर रस्त्याच्या आधी लागलेला पारोळ्याचा ढाबा. भल्या मोठ्या कढईत गरमागरम तेलात तळले जाणारे ते फाफडे आणि त्यासोबतच्या तळलेल्या हिरव्यागार लांबट मिरच्या. आहाहा! ते कागदात गुंडाळलेले गरमागरम फापडे खाल्ल्याशिवाय आमचा पुढचा प्रवास व्हायचाच नाही. लाकडाच्या मोठ्या पाटावर मळलेले डाळीचे पीठ हातानेच घासून सफाईदारपणे केलेल्या त्या पट्ट्या गरम तेलात बुडबुडत सोडणाऱ्या त्या आचार्‍याचे पाककौशल्यही वाखण्यासारखे असायचे. आजही मुली जेव्हा अमेरिकेहून भारतात येतात तेव्हा इथलं पाणी, धूळ, रस्त्यावरचा गलिच्छपणा, गर्दी याविषयी काटेकोरपणे स्वतःला आणि नातींना (त्यांच्या लेकींना) सांभाळत असतानाही “बाबा! पारोळ्याचे फाफडे खाऊया हंआपण! ” असं जेव्हा म्हणतात ना तेव्हा खूपच मजा वाटते.

वर्षभरात येणारा कुठलाही सण असो आम्ही नेहमीच सारे सण अमळनेरलाच साजरे करायचचो. एक तर संयुक्तपणे सण साजरे करण्याची मजाच निराळी असते शिवाय लहानपणापासून मुलींना भारतीय संस्कृती, परंपरा, सण आणि संस्कार यांची ओळख व्हावी, त्यातले महत्त्व त्यांना कळावे हे मनापासून वाटायचे. शिवाय खानदेशात साजरे होणारे कृषी संस्कृतीशी निगडित असणाऱ्या सणांविषयी मला स्वतःलाही फार आकर्षण वाटायचे. गौरी गणपती, राखी बंधन, दसरा, दिवाळी, होळी, संक्रांत हे सण सर्वत्र साजरे होतात पण काही प्रांता प्रांतातले ग्रामीण संस्कृतीशी जुळलेले जे सण असतात त्या पाठीमागच्या कथा, भूमिका, श्रद्धा, भावना सगळं आगळं वेगळं असतं. त्यापैकी श्रावणात येणारी कानबाई आणि बैलपोळा हे सण मला नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. चैत्रातला आखाजीचा घागर भरण्याचा सण सुद्धा(अक्षय तृतिया) मी याच मातीत अनुभवला.

कानबाई रानबाई या ग्रामदेवतांचं पूजन खानदेशात घरोघरी मोठ्या भक्ती भावाने केलं जातं. कानबाई म्हणजे राधा आणि रानबाई म्हणजे रुक्मिणी. या दोन्ही देवता म्हणजे कृष्ण स्वरूपच. शेतकऱ्यांसाठी या देवता शेतात मोती उगवतात अशी भोळी भाबडी कल्पना म्हणून त्यांच्या प्रती असलेला हा भक्ती भाव. शिवाय त्या अहिराणी कुळातल्या असाही एक समज येथे आहे. कधी या कानबाईला शंकराची पार्वतीही मानतात.

श्रावणातल्या नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी या कानबाई चे पूजन होते. त्यानिमित्ताने जणू काही तिच्या स्वागतासाठी घराची साफसफाई, रंगरंगोटी होते. या सगळ्या कामात कुटुंबातल्या सगळ्यांचा सहभाग आणि उत्साह असायचा.

चौरंगावर नवे जरतारी वस्त्र, त्यावर स्वच्छ तांब्या, त्यात विड्याची पानं, त्यामध्ये नारळ आणि नारळालाच वज्रटीक, चपलाहार, मोहनमाळ, नथनी मुकुट घालून प्रतिकात्मक कानबाईची अशी सौंदर्यपूर्ण प्रतिष्ठापना होते. केळीच्या खांबांनी सजलेला तो चौरंग अतिशय देखणा भासतो. नैवेद्यात पुरणपोळी, खीर, कटाची आमटी(खानदेशी रश्शी), वगैरे कांदा लसूण वर्ज्य पदार्थही असतात, हे सगळं असंच याच पद्धतीने अमळनेरला आमच्या कुटुंबातही ही साजरं व्हायचं. घरातल्या पुरुषांच्या नावाने सव्वा मूठ धान्य त्यात गहू आणि हरभऱ्याची डाळ घेतली जाते आणि जाडसर दळलेल्या त्या पिठाचे रोट (रोडगे) बनवले जातात. लोखंडाच्या तगारीत गोवऱ्या, काड्यांचा हार(निखारे) पेटवला जातो आणि त्यात हे रोट भाजले जातात. (जगड्यावरचे रोट). हे रोट कुटुंबातल्या व्यक्तीच खातात. कानबाईचा खरा प्रसाद हे रोट असतात. आतापर्यंत मी फक्त गाण्यात ऐकलं होतं. “रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला” पण प्रत्यक्ष कानबाईचे रोट करण्याचा अनुभव आणि त्याचं सेवन हे फारच मजेचं आणि चवीच असायचं.

या दरम्यान गणगोतातील बाया मस्त कानबाईची आहिराणी भाषेतली गाणी गायच्या.

।। अवती भवती फुलझाडी

तठे मन्ही मालन तोडी

खुयखुय नदीनं झुयझुय पानी

तठीनं घागर भरीन आनी

मन्ही मालन बोले अमृतवानी

सुखी राहो तुन्हा घरधनी

आदीशक्ती की आदीमाया

खानदेशमा घरोघर बठन्या कानबाया ।।

दुसऱ्या दिवशी या कानबाईचे नदीत साग्रसंगीत विसर्जन केलं जातं. शेतात जी बाई बियाणं पेरते तिलाही कानबाईच्या रुपात पूजले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये नारी पूजन, नारी शक्ती वंदन याचं किती महत्त्व आहे ना?

कानबाई म्हणजे सूर्यशक्ती, आदिशक्ती. मुलींना तिच्या भोवती गुंफलेल्या विविध मनोरंजक कथा सांगताना माझ्या मनात नेहमी एक विचार असायचा, ” या माझ्या लेकी उद्याच्या सक्षम नाऱ्या होणार आहेत. जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्यांना सामोरं जाण्याचं बळ या आपल्या संस्कृतीतून त्यांच्यात रुजवण्याचा माझा एक प्रयत्न असायचा. प्रतीकात्मकतेत श्रद्धा, भोळेभाबडेपणा असला तरी त्या आनंदाच्या वाटा असतात. त्यातून एक समृद्ध संस्कृती झिरपत असते आणि नकळतच सुसंस्काराचं एक भक्कम कवच जगताना प्राप्त होत असते.

सहज गंमत म्हणून इथे सांगावसं वाटतं, ज्या ज्या वेळी ज्योतिका मयुरा मला भेटायला ऑफिसात येत त्यावेळी माझे सहकर्मचारी माननीय वासुदेव भुरे मला म्हणत, ” मॅडम आल्या तुमच्या कानबाई रानबाई. ”

खरंच आज अनेक विविध विचाराने, आठवणींने माझे मन भरून येते. आनंदाच्या या वाटांवर पुन्हा झुलू लागते.

– क्रमशः भाग ६२.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘अजि म्या ब्रह्म पाहिले…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘अजि म्या ब्रह्म पाहिले…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

गुलबर्गा येथे रहाणाऱ्या श्रीनाथ डॉक्टरांशी अधून मधून होणाऱ्या गप्पांमधून ते म्हणाले, “आजकाल भिकारी सुद्धा आपण दिलेल्या खाद्यपदार्थावर टीका करतात. माझ्या आजारपणात भेटीला येणाऱ्या हितचिंतकांनी दिलेली फळे, एकट्याला एवढी लागणार नाहीत म्हणून सद् भावनेने वाटून टाकली. काहींनी ती कृतज्ञ भावनेने खाल्ली तर काही महाभागानी खुसपट् काढली. “

त्यांच्या म्हणण्यावर माझं मत मी मांडलं, ” एक तर, ही भिक्षेकरी मंडळी संकुचित वृत्तीची असतील किंवा त्यांना गरजच नसेल. भिकाऱ्याला ओकाऱ्या असंही म्हणता येणार नाही कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे, काहीजण खरंच भुकेले आणि गरजवंत असतात. त्यांची गरज, भूक ओळखण्याचं कसब आपल्यात हवं, पण तेवढा वेळ आपल्या जवळ नसतो. चांगल्या भावनेने चांगलं देणं देऊन आपण मोकळं होतो आणि आपल्या रूटीनकडे वळतो – – डॉक्टर! ह्यावरून आठवलं, तुम्हांला मी तो किस्साच सांगते.गरिबांचे डॉक्टर आणि देव असलेले डॉ.अभिजीत सोनवणे, ह्या सद्गृहस्थांशी माझी ओळख झाली. समाजाच्या तळागाळात पोहोचून, गरीबांच्या मनात शिरून, त्यांची गरज ओळखून, देशसेवा, मानवसेवा करणाऱ्या ह्या निस्वार्थी महान समाजसेवकाशी ओळख झाल्याचा मला खूप आनंद झाला.”.

“होहो! हे नाव मी ऐकलय खरं” 

श्रीनाथ डॉक्टरांनी उत्सुकता दाखवल्यावर, मीही सरसावून म्हणाले, ” त्याचं असं झालं.. पितृपंधरवडा आला. काहीतरी संकल्प करण्याची उर्मी मनात होती. अन्नदान तर करायचं होतच. मंदिरे वृद्धाश्रम शोधली तिथे देवाणघेवाणाचा कारभार चांगला असणारच. तिथला भरभरून वहाणारा अन्नकोटही बघितला. आणि आधीच तृप्त असलेले, अन्नावर भरपेट अन्न जेवून बाहेर पडणारे सधनही बघितले. “

त्यावर डॉ.श्रीनाथ म्हणाले, “खरं म्हणजे ह्या सुखवस्तुंना अन्नाची गरजच नसते. घरी खाऊन पिऊन ते सुखी असतात. अन्नावर अन्न आणि वस्रावर वस्र असाच हा प्रकार होतो “……. त्यांच्या म्हणण्याला पुस्ती जोडून मी पण म्हणाले, “अगदी बरोब्बर! हे! हेच म्हणायचय मला. खरी गरज भुकेलेल्यांनाच असते. आणि म्हणूनच ह्या दृष्टिकोनातूनच डॉ. अभिजीत सोनवणे यांच्याशी मी संपर्क साधला होता.. सौ मनीषाताई, अभिजीत अत्यंत प्रगल्भ बुद्धीचे उत्तम लेखक, अत्यंत कष्टाळू असे समाज सेवक आहेत. गरजवंतांची गरज ओळखण्याची आणि त्यांच्या मनांत, पोटात शिरून त्यांची मन:शांती आणि भूकशांत करण्याची कला, कसब त्यांच्यात नक्कीच आहे.तुम्हाला सांगते गरिबांचा हा देव आहे निराधार भगिनींचा हा पाठीराखा आहे. बालकांचा हे सद्गृहस्थ आणि सौ मनीषा ताई आईवडील आहेत तर निराधार वृद्धांसाठी ते पुत्र आणि कन्येची भूमिका मनापासून सेवा करून वठवतात.”.

श्रीनाथ डॉक्टरांची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती., “अरे वा! फारच छान आहे हा किस्सा आणि तुमचा अनुभव. बरं पंडित मॅडम मला असं सांगा. त्यांचा हा उपक्रम नक्की आहे तरी काय आणि कसा? “

 उत्तरा दाखल मी डॉक्टर अभिजीत यांची अतिशय सुंदर भावपूर्ण, विनम्र अशी मला भावलेली कविताच वाचली… हा गरिबांचा परमभक्त नम्रपणे, कनवाळूपणे श्रीगणेशाला आळवतो – – 

“ गणेशा माफ कर मला. तुझ्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर उसळला होता. 

पण मी अभिषेक नाही करू शकलो, कारण त्यावेळी फुटपाथवर अस्ताव्यस्त पडलेल्या आई-वडिलांना अंघोळ घालण्यात मी व्यस्त होतो. 

त्या आई-वडिलांची पूजा करताना तुझा क्षणभर मला विसर पडला होता. त्यांना रस्त्यावरून उचलून स्वच्छ करून एका स्वच्छ आश्रमात ठेवण्याच्या धावपळीत मी त्यावेळी होतो ”

– – डॉ.अभिजीत सेवाभावी सेवक, गणेशाची माफी मागून आशीर्वाद मागतात,

” तुझी कृपा आणि दानशूरांच्या दानधर्माच्या मदतीने या गरिबांची सेवा मला करायची आहे. ‘

हा किस्सा ऐकताना डॉ.श्रीनाथ म्हणाले, “कमाल आहे, किती कौतुकाची, महानतेची गोष्ट आहे ही. या गृहस्थांना जरासुद्धा गर्व नाहीय्ये.”.

त्यांच्या म्हणण्याला अनुमोदन देताना मी पुढे सांगु लागले, “”अहो हो ना! समाजातल्या गरजवंतांचे आशीर्वाद घेऊन, त्यांच्या मनात आदराचं, मानाचं स्थान पटकावणाऱ्या या गृहस्थांचे पाय जमिनीवरच आहेत. “.

डॉ.अभिजीतांच्या कवितेचे रसग्रहण करण्याचं भाग्य मला लाभलं होतं.

मी पुढे म्हणाले, ” त्यांची गणेशापुढे क्षमायाचना होती – – “गणेशा तुझ्यासाठी मी मखर नाही करू शकलो कारण त्यावेळी भर पावसात थंडीने कापणाऱ्या तान्ह्या लेकरांसाठी, सेकंड हॅन्ड ताडपत्री घेऊन सुतळीने छप्पर बांधण्यात मी गर्क होतो. तुझे पैसे मी तुझ्या लेकरांसाठीच वापरले आणि तुझ्या नैवेद्यासाठीचा मोदक मी भुकेलेल्यांच्या मुखात भरविला… तर तूच सांग देवा चुकलं कां रे काही माझं? “ ही आळवणी, ही शब्दरचना, अभिजीत स्वतः देवापुढे मांडून माफी मागत आहेत. ते म्हणतात, ‘तुझी आरती नाही मी केली कारण त्यावेळी पॅरॅलिसिस झालेले, स्पष्ट शब्दात आपल्या भावना मांडू न शकणारे माझ्या कानात काहीतरी सांगत होते. तुझ्या मंदिरातली नाही तर जनमानसातली ती आरती मी ऐकत होतो – –.

एका आजीचं साधं मागणं होतं, ” डाकतरा अंगाला झोंबणारा वारा कानात शिरला की थंडीनी कुडकुडायला होतं रे! एखादी कानटोपी तरी आणून देनां रे मला! “ तिची मागणी ऐकून अभिजीतांनी काय करावं! .. एक टोपी आणून आजींच्या डोक्यावर चढवून ते म्हणाले, “आजे अगं गणेशानी तुझं मागणं ऐकलं, आणि ही कानटोपी त्यांनी तुझ्यासाठी पाठवलीय “ 

आजीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर पसरलेलं, समाधानी हसू बघून ते गणेशाकडे वळले आणि म्हणाले,

” का गणेशा आजी भेटली तर तिला काही बोलू नकोस आणि पुन्हा हा विषय वाढवू नकोस “..

– – त्यांच्या प्रत्येक वाक्यावाक्यातून निःस्वार्थीपणा निथळत होता. कार्याचा बोलबाला नाही की प्रसिद्धीची हाव नाही. गायत्री मंत्र त्यांनी नुसता अनुभवला नाही तर जगवलाय.. जागवला आहे.

…. पाय नसलेल्या माऊलीला त्यांनी कृत्रिम पाय देऊन चालवलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद श्री व सौ सोनवणे यांनी मनसोक्त वाचला. दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद शोधणारी ही जोडगोळी धन्य धन्य आहे असं मला वाटतं..

देवाच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या निराधार जिवांना अग्नी देऊन ते मृत्तात्म्यांसाठी प्रार्थना करतात,

“देवा आता तरी त्यांना सुख मिळू दे रे बाबा! “

आणि विशेष म्हणजे त्यांच्या सुख शांतीसाठी स्मशानात त्यांनी दोघांनी सुखकर्ता दुखहर्ता आरतीसुद्धा गायली.

नवरात्रात फाटक्या वस्त्रातील मंदिराबाहेरच्या देवींच्या अंगावर त्यांनी नव्या साड्यांचे पांघरूण घातले. पुरात निर्वासित झालेल्यांना त्यांनी भाड्याच्या घरात छपराखाली आणले. तिथेच कलशपूजन करून त्यांचा संसार ह्या पुण्यकर्मी नवरा बायकोनी मांडून दिला. 

डॉ अभिजीत उत्तम लेखकही आहेत. स्वतः लिहिलेली ही त्यांची गणेशाची आळवणी वाचून मी अवाक् झाले. ह्या आधुनिक तपस्वींना माझा सलाम.

पितृ पंधरवड्यात त्यांनी तर सेवेचा उच्चांक गाठला. शेकडो आई वडिलांना त्यांनी भोजनाने तृप्त केले. त्यांच्या शब्दात ते अन्नदान नसून तृषा शांती होती….. ह्या उपक्रमाशी मी थबकले. हजारो सधनांना जेवू घालण्यापेक्षा शंभर निर्धनांना भोजन देण्याचा हा उपक्रम मला मनापासून भावला. पितृपंधरवड्यात अन्नदानाचा हा नवा मार्ग मला गवसला. आणि सगळ्यांच्या संमतीने देणगी देण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टरांना फोन लावला. त्यांनी सगळा उपक्रम व कार्यभागाच्या आराखडा आमच्यापुढे मांडला. आम्ही भारावलो. माझ्या चिरंजीवांनी चेक पाठवला, ताबडतोब पोच पावती तर आलीच, पण दुसऱ्या दिवशी सकाळीच तृप्त मनाने भोजनास्वाद घेणाऱ्या अतिथींचे फोटोही डॉक्टरांनी पाठवले.ते बघून मी धन्य झाले. त्या अतिथींमध्ये मला माझे आईवडिल, पूर्वज दिसले. डॉक्टरांच्या माध्यमातून मला ब्रह्मदर्शन झाले होते.”

हे सगळं ऐकून गुलबर्गा येथून डॉ.श्रीनाथ उत्स्फूर्तपणे म्हणाले, “अत्यूत्तम आहे हा उपक्रम. माझ्या 200 लोकांच्या मंडळात मी हा उपक्रम मांडीन. सगळ्यांना तो आवडेल आणि खारीचा वाटा उचलण्यासाठी ते नक्कीच पुढे येतील.”.

आनंदाचा समाधानाचा सांठा मनात साठवून. डॉ.अभिजीत व सौ मनीषा ताईंचे पुन्हा पुन्हा आभार मानून मी संवाद आटोपता घेतला….. 

आनंद, समाधानाचा हा सेतू डॉक्टर अभिजीत सोनवणे आणि सौ मनीषाताईमुळे मला सांधता आला.

त्या दोघांना माझे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद! ! .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ त्या – –!! ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ त्या – –!! डॉ. माधुरी जोशी 

“त्या”… त्यांनी कधी नोकरी केली नाही. “त्या “रोज कामाला बाहेर गेल्या नाहीत. “त्यांनी” पैसे मिळवले नाहीत. पण “त्या” गृहीत होत्या. जरा काही कमी पडलं, चुकलं तर आरोपीच्या पिंजऱ्यात होत्या. जे जे हवंय ते ते व्हायलाच पाहिजे असा त्यांच्यासाठी कडक नियम होता. जणू कायदे होते घराचे… काही चुकलं तर टोमणे, कुजके बोल होते. “त्यांच्या” कामांना “सीमा” नव्हती पण खर्चाला “बंधनं” होती. पैसे कशाला? किती?कधी?अशा अनेक प्रश्नांना ” हिशेबाचं” उत्तर हवं होतं. सणवार, रितीभाती, देवकार्य, स्वच्छ नेटकं घर, येणाऱ्यांचं आगत स्वागत, नवे मेन्यू सगळं “हासतमुखानीच” व्हायची अट होती. नो नाराजी… नो तक्रार…

भूतकाळ एवढ्याचसाठी म्हणते..

कारण आता थोडं दृश्य बदललंय… बऱ्यापैकी “त्या” बाहेर पडतात… घरून काम करतात.. पण अजूनही बऱ्याच त्याच, तशाच जगण्यात रमल्या आहेत. अडकल्या आहेत.

अगदी रोज… रोज तेच तेच…

दाराशी तुंबलेले बूट मोजे चपला जागेवर ठेवणं, सोफा खुर्चीवरचे कपडे, त्यातली बिलं, पावत्या, पैसे पाहून मग धुवायला घेणं, ऑफिसबॅग्ज, ऑफिसमधून आलेले खरकटे डबे, पाण्याच्या बाटल्या हे सगळं जागेवर जाणं यांनी पहायचंच असतं आणि मग ऑफिस शाळेतल्या तक्रारी, दमणूक, त्रास, अडचणी ऐकून घ्यायच्या.. ‌कंपलसरी… कारण “ती “बाहेर जात नाही… घरात तर असते…

किती काळ असंच चालू असतं… आता हे प्रमाण सगळ्या घरात, सगळ्या बायकांच्या वाट्याला नसेलही… पण बऱ्याच अंशी असंच आहे…

काही दिवसांपासून सतत घरात, घरांसाठी, घरातल्यांसाठी तरूण वयापासून साठी सत्तरी पर्यंत गुंतलेल्या अशा”त्या”मनात डोकावत होत्या. कुणी नात्यांच्या, कुणी ओळखीच्या, कुणी मैत्रीच्या, कुणी शेजारच्या… त्या अशिक्षित होत्या का?फारसं शिकल्या नव्हत्या का?… छे छे… अजिबात नाही असं… अनेक जणी ऊत्तम शिकलेल्या, नोकरीची संधी येऊनही सोडायला लागलेल्या, क्वचित काहींमध्ये आत्मविश्वास नसलेल्या, तर काहींना घरातूनच कमी लेखून घरानंच घरगुती शिक्का ठाम केलेल्या… घरकामातंच गृहीत धरलेल्या… त्या तशाच कायम राहिल्या, खपल्या, जगल्या.. ‌‌आजही अशा भेटतातंच…

अशा गृहिणींनो, घर सांभाळणं किती तारेवरची कसरत आहे हे मी तुमच्या इतकंच जाणते. खरंतर मी ३१वर्ष नोकरी केली पण कुठलंही कर्तव्य जबाबदारी टाळली नाही. घर छान ठेवणं, चहापाणी, खाणीपिणी, डबेडुबे, येणार जाणार, धुणीभांडी, दुखणीबाणी,

सगळं सगळं… वाण्याच्या याद्या, सामान भरणं, उरलंसुरलं, मुलांचे अभ्यास, सोडणं आणणं, बिलं भरायला रांगेत उभं राहणं… अगदी घरातल्या तुमच्यासारखीच स ग ळी धावपळ… आणि रोज घड्याळाला बांधलेलं वेळाचं गणित… त्यातूनच सणवार, सवाष्णी, सत्यनारायण, गणपती दिवाळी सगळं पार पाडलंही… हे काही कौतुक म्हणून नाही सांगत. नोकरी हा माझा जगण्याचा भाग होता. मग निभावणं आलंच… पण नोकरी करणारी म्हणून कशातून सुटका नसते हे ही खरं… हो!!एक मात्र खरं नोकरीवालीचं कुठे काही कमी पडलं तर “नोकरीच्या”पांघरूणात ते क्षम्य होतं. खूप excuses असतात… पण जी घरात असते तिला हे माफ नाही.. ‌ती 24×7 सतत available असते हेच गृहीत आहे. ती पण खूप धावंत असते. कष्टंत असते. ऊत्तम करते सगळं… पण हे गृहीतंच असतं कारण ती काम करत नाही ना बाहेर… खरंतर तिचा गौरव वाटायला हवा… तिला शाब्बासकी हवी.. ‌दोन गोड शब्द हवे… या बाईमुळे घरात सगळं सुरळीत चालू आहे याची जाण, जाणीव हवी.. ‌सगळ्यात महत्वाचं ती भावना व्यक्त व्हायला हवी… न कमावताही घरात आर्थिक घडीतला तिचा वाटा ती काटकसरीनं, पैसे न उधळता सार्थ करते. सुंदर साजरे होणारे सणवार, कार्यक्रम ती कसे मॅनेज करते यांचं कुणी कौतुक करतं?याही पलिकडे जाऊन तिची विश्रांती, तिचा क्वचित कंटाळा, तिनं वेळोवेळी मारलेलं मन, तिच्या आवडीनिवडी, तिला हवा असा तिचा स्वतःचा वेळ याही बाबतीत फारशी आस्था दिसतं नाही. आपलं नीट होतंय यातंच रमलेले सगळे.. सगळी घरं अशी नसतात. पण बरेचदा तिला वेगळं “मानायला” हवं याची फारशी गरजंच वाटंत नाही कुणाला‌… असंही खूप घरात असंच दृश्य…

ती करते.. करतंच राहते जीवापाड… खपून… पण ती पण दमते… थकते… कंटाळते… क्वचित कणकण असली तरी आधी काम करते मग आडवी होते… ते पण पुढच्या कामाचा गजर लावून… एखादे दिवशी ती खरंच काही न करण्यासारखी होते. सारं घर खडबडून जागं होतं. बापरे!!म्हणजे आता डबे, कपडे, इस्त्र्या, केरवारे, बाजार,

हांथरूणं पांघरुणं, रद्दी, उरलंसुरलं सगळं ठप्पंच की… काही घरं खरंच तिचं मोल जाणतात… सोयीनं वेळा जुळवतात, सांभाळतात… बूज राखतात. पण काही घरात तिनं आजारी पडणं हे संकट होतं.. त्रागा सुरू होतो… ती आजारी आणिकंच दबते, संकोच ते.. त्याही स्थितीत कुकर लावते, चहा करते, डबे भरते… कण्हत कुथंत… पण आत मनात खूप खोलवर दुखावते… आजवर जे करत राहिलो त्याची किंमत नाही याची भयाण जाणीव होते तिला. खंतावते ती… मन अशांत… अस्वस्थ.. ती व्याकूळ मायेच्या दोन शब्दांसाठी, डोक्यावरून पाठीवरून फिरणाऱ्या हातासाठी… तिला वस्तू नकोत, साडी दागिना नको.. तिला मायेचा काळजीचा शब्द हवाय फक्त… सारे श्रम विसरायला लावणारा प्रेमळ शब्द… तिचा गौरव!!

काय झालं… कालंच एक मैत्रीण गेली… अगदी दोन दिवस साधा ताप आला अन् गेलीच… आठवड्यापूर्वी भेटली तेव्हा म्हणाली होती, ” मी खूप करते सगळ्यांचं.. पण घरात कधी कौतुकाचा शब्द नाही… नवरा, मुलं कधीच.. कुणीच काही म्हणत नाही गं… कान आसुसतात गं, “घर छान ठेवतेस किती, आमच्या वस्तू तुझ्यामुळे जागेवर मिळतात, पदार्थ मस्त झालाय… असलं काही तरी ऐकायला “पण बिचारीला नाहीच मिळालं कधी असं काही… गेलीच जग सोडून… ती जेव्हा भेटे तेव्हा ही खंत येईच बाहेर… किती खरी, किती माफक, किती साधीशी अपेक्षा… पण ती तशीच गेली व्याकूळ, आसुसलेली… सगळी कर्तव्य पूर्ण करूनही यश अपूर्ण!!!मन ढवळून निघालं माझं… तिच्यासाठी, तिच्यासारख्या अनेकजणींसाठी… अशी खूप घरं आहेत… कुणाला काही वाटंत नाही असं नाहिये… पण वाटतं आणि व्यक्त होणं यात फार फरक आहे.. घर सुशिक्षित असो नाहीतर अशिक्षित… घरातली बाई तशीच झटते. आवाहनं लहान मोठी असली तरी मनाला ओढ त्याच शाब्बासकीची, कौतुकाची, गौरवाची… काळानुरूप हे घरात राहणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं असेलही… पण ज्या आजही याच चक्रात आहेत त्यांचा गौरव व्हायला हवा नाही का?

व्हाल ना व्यक्त? तिच्यासाठी?

आणि पहाच त्या चार दोन शब्दांची जादू… तिला गौरव मिळायलाच हवा!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “रस्ता क्रॉस करण्याची अशी पण एक मज्जा…” ☆ श्री सुधीर करंदीकर

उत्तम तब्येतीकरता भरपूर फिरा असे सगळेच तज्ञ सांगतात, आता घराच्या बाहेर पडलो, की छोटे – मोठे रस्ते क्रॉस करणे हे ओघाने आलेच. आपल्याकडे कुठलाही मोठा आणि खूप रहदारीचा रस्ता क्रॉस करायचा म्हणजे सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा रहातो. आणि याला कारण म्हणजे आपल्या इथली बेशिस्तितीत वावरणारी, आपणच तयार केलेली, आपलीच रहदारी.

रस्ता क्रॉस करतांना पण काही मज्जा येऊ शकते, यावर खरंतर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण शक्य होऊ शकतात, हे सांगणारा माझा अनुभव आता सांगणार आहे. तो ऐकून आपल्याला पण असा अनुभव एकदातरी यावाच, असे सगळ्यांना नक्कीच वाटेल…..

—–

नेहमीप्रमाणे आज सकाळी मुलीकडे बावधनला गेलो होतो. दुपारी ऋता (बायको) स्कूटर घेऊन तिच्या क्लासला गेल्यामुळे संध्याकाळी मला बसने कर्वेनगरला घरी जायचे होते. म्हणजे घरापासून चालत मेनरोडपर्यंत जायचं, आणि तिथून बसनी गुजराथ कॉलनी पर्यंत जायचं, तिथून चालत मार्केट क्रॉस करायचं, ऑटो पकडायची आणि घरी पोहोचायचं. संध्याकाळी पाच वाजताच इथून निघालो. आज बर्‍याच दिवसांनी म्हशी बरोबर बावधनचा रस्ता क्रॉस करायला मिळणार, म्हणून मनातून खुश होतो. चालत चालत मेन रोड पर्यंत पोहोचलो. आणि नेमकी आज म्हशीनी सुट्टी घेतलेली दिसत होती. म्हणजे आज जीव मुठीत धरूनच रस्ता क्रॉस करावा लागणार होता. तेवढ्यात मला, गेल्या भेटीत गणेशने (म्हशीबरोबरच्या मुलानी) दिलेला सल्ला आठवला. आणि मी भूतकाळात गेलो….

गणेश : काका, कधी मी नसलो तर रस्ता एकट्याने क्रॉस करू नका. रस्ता क्रॉस करणारे बरेच जण असतात. जेव्हा कुणी क्रॉस करत असेल, तेव्हा त्याच्या बाजूनी चालत रस्ता क्रॉस करायचा. आणि बाजूनी चालणारी व्यक्ती ही तरुणीचं पाहिजे, हे लक्षात ठेवायचे.

मी : तरुणीच कां ?

गणेश : काका, इथला ट्रॅफिक किती बेशिस्त आहे / जीवघेणा आहे, हे तुम्हाला सांगायला नकोच. माझा इथला रोजचा अनुभव सांगतो – आपल्या इथले गाड्या चालवणारे, अजूनतरी, समोर तरुणी दिसली तर गाडी थोडी स्लो करतात. आणि आपण त्याचाच फायदा घ्यायचा आहे.

मला गणेशचे हे म्हणणे पटले.

मी वर्तमानकाळात आलो.

झेब्रा क्रॉसिंग जवळ जाऊन उभा राहिलो. ट्रॅफिक नेहेमीप्रमाणेच सुसाट होता. कुणी तरुणी रास्ता क्रॉस करायला आली, की तिच्याबरोबर रस्ता क्रॉस करायचे असे मनात ठरवले. तेवढ्यात डावीकडून घाईघाईत येणारी एक तरुणी दिसली. माझ्या बाजूला येऊन ती थांबली. यालाच मी रस्ता क्रॉस करण्याचा ग्रीन सिग्नल समजलो. रहदारीत थोडी गॅप दिसली आणि आम्ही रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली, ती माझ्या बाजूबाजूनी रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करत होती आणि माझ्या स्पीड प्रमाणे पावले टाकत होती आणि मी तिच्या आडोशाने राहण्याचा प्रयत्न करत होतो. “मेड फॉर इच आदर” प्रमाणे एकमेकांकडे बघत बघत आम्ही व्यवस्थित पलीकडे पोहोचलो. मी मनात गणेशला आणि तरुणीला धन्यवाद दिले.

मी जाऊन बस स्टॉप च्या बाकावर बसची वाट बघत बसलो आणि थोड्याच वेळात माझी बस आली. माझ्याबरोबरची तरुणी पण याच बसमध्ये पुढच्या दारातून चढली असे मला वाटले. बसमधे बरीच गर्दी होती. माझा पौड रोडकडे जाण्याचा बसचा प्रवास सुरु झाला. आता किनारा हॉटेलला उतरायचे आणि रस्ता क्रॉस करून गुजराथ कॉलनीतून पुढे जायचे, असा माझा पुढचा प्रवास होता. 

स्टॉप ला उतरलो. चालत थोडा मागे रस्ता क्रॉस करण्याच्या स्पॉट ला आलो. इथे मेट्रोचे काम सुरु होते, त्यामुळे ट्रॅफिक विस्कळीत होता आणि गाड्या पण स्पीडनी जात – येत होत्या. इथे रस्ता क्रॉस करायला म्हैस कधीच नसते. म्हणजे आता जीव मुठीत धरणे आणि रस्ता क्रॉस करणे, हे ओघाने आलेच. आणि एकदम लक्षात आले, अरे, गणेशचा सल्ला इथे पण अमलात आणायलाच पाहिजे. सुरक्षिततेला पर्याय नसतो. मनाला एकदम पटले. 

आता इथे रस्ता क्रॉस करायला कोण तरुणी भेटतेय याची वाट बघत, आजूबाजूला बघत उभा होतो. इथे पण पब्लिक आपापल्या सवयीप्रमाणे धावत – पळत रस्ता क्रॉस करत होती. मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होतो, आणि तरुणीची वाट बघत होतो. काही वेळा आपल्याला आश्चर्याचा धक्का कसा बसतो, तो असा – बावधनला जी तरुणी माझ्याबरोबर रस्ता क्रॉस करायला होती, तीच घाईघाईने आली आणि माझ्या बाजूला उभी राहिली. रस्ता क्रॉस करायला ग्रीन सिग्नल मिळाला असे समजून, रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. मी त्या तरुणीला गाईड समजत होतो, आणि ती बहुदा मला गाईड समजत होती. कारण आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो आणि चालण्याचा स्पीड ऍडजेस्ट करत होतो. पलीकडे आरामात पोहोचलो

पलीकडे पोहोचलो आणि —

बरोबरची तरुणी : काका, थँक्स

मी : कशाबद्दल ?

तरुणी : दोन्ही ठिकाणी रस्ता क्रॉस करायला मदत केल्याबद्दल.

मी (मनात): खरंतर हे वाक्य मी तिला म्हणायला पाहिजे.

 मी तिला थँक्स म्हणणार एवढ्यात —

तरुणी : काका, गावात बसनी येण्याची आणि रस्ता क्रॉस करण्याची पाळी फारच कमी वेळा येते. मी राहते बावधनला. तिथे मात्र बऱ्याच वेळा रस्ता क्रॉस करावा लागतो. पण तिथे म्हैस घेऊन एक मुलगा उभा असतो. म्हशीच्या आडोशानी रस्ता क्रॉस करण्याचे टेन्शन नसते. आधी तिथे म्हैस नसायची, तेव्हा मात्र रस्ता क्रॉस करतांना भितीच वाटायची.

काका, इथल्या ट्रॅफिक मधे म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणं, यासारखं सुख नाही. तुम्ही एकदा हा अनुभव घेऊन बघा. मला ही कल्पनाच भन्नाट वाटते.

आज निघतांना आईनी बजावलं होतं, तुला पौडरोडला रस्ता क्रॉस करावा लागेल. तिथे म्हैस नसणार आहे. एकटीनी रस्ता क्रॉस करायचा नाही. एखादा तरुण दिसणारा सिनियर सिटीझन बघून त्याच्या बाजूबाजूने रस्ता क्रॉस करायचा. आपल्या इथले गाड्या चालवणारे, अजूनतरी, समोर तरुण सिनियर सिटीझन असेल, तर गाडी थोडी स्लो करतात. आणि आपण त्याचाच फायदा घ्यायचा आहे. थोडा वेळ वाट बघावी लागली, तरी हरकत नाही.

बावधनला आज नेमकी म्हैस नव्हती. म्हणजे इथे पण आईची सूचना पाळायलाच पाहिजे. रस्ता क्रॉस करणारे तिथे दिसत होते, क्रॉस करणारे सिनियर सिटीझन पण दिसत होते, पण आईनी दिलेल्या स्पेसिफिकेशन मधे बसेल असे कुणीच रस्ता क्रॉस करायला येत नव्हते. म्हणून मी बाजूच्या झाडाखाली वाट बघत उभी होते. तुम्हाला येतांना बघितलं आणि क्लिक झालं, “यस, धिस इज ‘द’ पर्सन”. आणि मी लगेच पुढे आले.

आणि माझं लक असं, की इथे पौड रोडला पण मला तुमची साथ मिळाली. म्हणून डबल थँक्स.

मी : माय प्लेझर, तुम्हाला पण थँक्स

एकमेकांना बाय बाय झाले, पुन्हा भेटू झाले आणि आम्ही आपापल्या मार्गाला लागलो.

छान आणि जरा रोमँटिक सल्ला दिल्याबद्दल मी मनातून गणेशचे आभार मानले. तरुणीच्या आईचे पण मी मनातून आभार मानले, कारण मी ज्या स्पेसिफिकेशन्स मधे बसतो, अशी क्रॉस करणाऱ्या माणसाची स्पेसिफिकेशन्स, त्यांनी मुलीला दिल्याबद्दल.

दुसऱ्याचे ऐकल्यामुळे ‘रस्ता क्रॉस करणे’ अशा रुक्ष वाटणाऱ्या बाबतीत पण अशी मज्जा येऊ शकते, हा आजचा नवीन अनुभव.

आणि या अनुभवामुळे माझ्या ज्ञानात पडलेली महत्वाची भर म्हणजे, आपल्या हितचिंतकांचे नेहेमी ऐकावे, आपण स्वतःला कितीही हुशार समजत असलो तरीही.

हितचिंतक आपला नवरा असू शकतो, बायको असू शकते, नातेवाईक असू शकतात, ओळखीचे असू शकतात, अनोळखी पण असू शकतात. 

आता म्हैस नसतांना बावधनचा रस्ता क्रॉस करण्याची संधि पुन्हा कधी मिळते, आणि ती पण ह्याच बावधानच्या तरुणी बरोबर, याच्या प्रतीक्षेत मी आहे ….

तुम्ही पण एकदा बावधन ला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याचा सुखद अनुभव जरूर घ्या. आणि इतर ठिकाणी रस्ता क्रॉस करताना मात्र गणेशने सांगितलेल्या सूचना, आणि नवीन झालेल्या मैत्रिणीच्या आईने सांगितलेल्या सूचना, जरूर जरूर लक्षात ठेवा आणि फिरणे मस्त एन्जॉय करा….

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या सासूबाई…… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ माझ्या सासूबाई… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सासुबाई म्हटलं की नकळतच मनावर दडपण येतं. लग्नाच्या वेळी वाटतच आपली सासरची माणसं कशी असतील. त्यातल्या त्यात सासुबाई कशा असतील. मला वाटतं प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो. सासरी जाण्याआधी मी साखरपुड्याच्या वेळी सासूबाईंना पाहिलं होतं. आमच्या सासूबाई दिसायला सुंदर, गोऱ्यापान, सरळ नाक, नाजूक ओठ, गोल सुबक अंगकाठी, काठापदराची सूती साडी. आधी पूर्वी नऊवारी नेसायच्या पण नंतर नंतर सहावारी नेसायला लागल्या. मी पाहिलं तेव्हा सहावारीतच होत्या. मोजकेच पण ठसठशीत दागिने. कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील करजगी सीमा भागातील माझं सासर. गाव खूप लहान पण आमचं खूप मोठे दुमजली घर. बऱ्याचशा खोल्या भाताच्या मोठमोठ्या कनग्यांनी भरून गेलेल्या असायच्या. मोठं न्हानीघर. मोठा पाणी तापवायचा गोल हंडा. त्यासाठी मोठीच्या मोठी सिमेंटमध्ये बांधलेली चूल. पाणी साठवण्यासाठी बांधलेला मोठा हौद. घराच्या मागे विहीर. विहिरी मधून सतत कोणी ना कोणी पाणी आणायचे आणि तो हौद कायम काठोकाठ भरलेला ठेवायचे. एकत्र कुटुंब चार भाऊ दोन बहिणी आणि त्यांची मुलं. घर भरलेलं वाटायचं. मी लग्न होऊन आले तेव्हा फक्त धाकट्या दिरांचा लग्न व्हायचं होतं. मी महाराष्ट्रातली. माझा कधी खेड्याशी फारसा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे खेडवळ बोली मी फारशी ऐकली नव्हती. आता तर कर्नाटकातली सीमा भागातली भाषा. भाषा मराठी असली तरी थोडी वेगळी होती. मला ती फारशी समजायची नाही. सासरचे लोक एकमेकांशी बोलताना भरभर बोलायचे. मला एखाद्या वाक्यातील एखाद्या शब्द अडला की माझा विचार करण्यात वेळ जायचा. वाक्याचा अर्थ लावे पर्यंत त्यांचं संभाषण पुढे गेलेलं असायचं. त्यामुळे माझा खूप गोंधळ उडायचा. तिथे सगळा स्वयंपाक चुलीवर केला जायचा. फक्त चहा कॉफीसाठी गॅस तोही गोबर गॅस वापरला जायचा. मला चूल पेटवायला अजिबात जमत नव्हते. लाकडांची रचना करता यायची नाही. फुंकणीने फुंकायला यायचं नाही. तिथल्या तांदळाच्या भाकरी मला तिथे असेपर्यंत कधीच थापायला आल्या नाहीत. मोठे कुटुंब असल्याने मोठ्या पातेल्यांमध्ये स्वयंपाक केला जायचा. तिथे सांडशी वापरत नसत कपड्याने भांडी उतरवणे ठेवणे मला जमायचे नाही. तिथे काही चिरायचं असेल तरी विळा वापरला जायचा. मला आपल्या इकडल्या विळीची सवय. तो विळा मला पायात धरून काही चिरायला यायचे नाही. कपडे धुण्यासाठी पाणी काढणं मला त्रासदायक व्हायचं. अशाप्रकारे मी तिथे किंवा त्यांच्यासाठी कोणत्याही कामाची किंवा उपयोगाची नव्हते. मला सगळं येतं हा गर्व तिथे गेल्यावर गळून पडला. त्यामुळे मी झाडलोट करणे, तांदूळ निवडणे, कपडे सुकत घालणे, कपड्यांच्या घड्या घलणे भाज्या लसूण निवडणे, अशा प्रकारची वरवरचीच कामे करत होते. माझ्या सासूबाई इतर सूनांच्या बाबतीत थोड्याशा कडक होत्या. गावातही त्यांचा दरारा आमच्या गावातील शेजारच्या स्त्रिया सुद्धा त्यांना दचकून असायच्या. पण मला त्या त्यांच्याबरोबर जेवायला घेऊन बसायच्या. त्या माझ्याशी फारशा कडकपणे वागत नाहीत हे माझ्या जावांना दिसत होतं. न राहून एकदा जावेने मला म्हटले, आम्हाला कधी त्यांनी त्यांच्याबरोबर जेवायला घेतलं नाही, तुला मात्र पहिल्या दिवसापासून स्वतःबरोबर जेवायला घेतात. माझ्या सासुबाई कमी बोलणाऱ्या परंतु अतिशय विचारपूर्वक आणि मार्मिक बोलायच्या. नवीन असताना एक खूप मजेशीर प्रसंग घडला. मी धुतलेली भांडी लावायला लागले होते. मी भांडी घेऊन उठणार एवढ्यात सासूबाईंनी वरच्या जाळीतून ताट काढले आणि ते ताट माझ्या डोक्याला जोरात लागले मी जोरात ओरडले माझा जीव कळवळला आणि त्यांना खूप वाईट वाटले त्यांनी माझं डोकं धरलं व चोळायला लागल्या. मी ओरडल्यामुळे सगळे धावत आत आले. काय झाले काय झाले विचारू लागले. माझ्या सासूबाई त्यांना त्यांच्या भाषेत पटपट घडलेलं सांगत होत्या. त्या बोलता बोलता म्हणाल्या ती उठली मी जाळीतून ताट काढत होते आणि तिच्या टकल्याला लागलं. टकल्याला हा शब्द ऐकल्यानंतर त्या अवस्थेतही मला खूप हसायला आलं. कारण आपल्याकडे टकला म्हणजे केस नसलेला माणूस ही संकल्पना होती. तिकडे मात्र डोक्याला टाकलं म्हणायचे. हसल्यामुळे माझ्या वेदना तात्पुरत्या कमी झाल्या. आणि सगळे जणच मग रिलॅक्स झाले. सासूबाईंना खूप वर्षापासून शुगर होती. त्यामुळे त्यांना खूप सांभाळून राहायला लागायचे. माझ्या जाऊ बाईंनी सांगितलं मी घरात आल्याबरोबर त्यांनी घरातलं काम करायचं सोडून दिला आणि त्यामुळे त्यांना शुगर झाली. यांच्या नोकरीमुळे मला सासरी फारसं राहावं लागलं नाही. परंतु आमचे सासू-सासरे वरचेवर दवाखान्यासाठी आमच्याकडे यायचे. ते जरी आमच्याकडे राहायला आले तरी इथलं शहरी वातावरण असल्यामुळे त्यांना इथे करमायचे नाही. मी काही वर्षानंतर सर्विस करायला लागले. आमच्या सासरी माहेरी दोन्हीकडे सुनांनी नोकरी करावी अशी बिलकुल अपेक्षा नव्हती. परंतु मी हट्टाने सर्विसला लागले होते. एकदा माझ्या वडिलांनी सासूबाईंना विचारलं. “सुनबाई नोकरी करते तुम्हाला चालतय का. ” त्यावर त्यांनी एक क्षणभर विचार करून वडिलांना सांगितलं. “इथे तर सगळेच नोकरी करत आहेत. ” कारण आमच्या साहेबांना कामानिमित्त भेटायला येणाऱ्या काही स्त्रिया व त्यांचे संभाषण तसेच प्रत्येक शाळेतील शिक्षकांविषयीची चर्चा त्या नेहमीच ऐकायच्या. त्यामुळेच त्यांना माझ्या नोकरीबद्दल आता काही विशेष किंवा वेगळं वाटत नव्हते. माझ्या सासरी बरेचसे पदार्थ तांदळापासून बनवलेले असायचे. भाकरी केली तरी तांदळाची. भात आमटी तर असायचीच. ओल्या खोबऱ्याचा खूप वापर असायचा. त्या सर्वांना मासे खायची खूप आवड. एक दिवसांआड ते मासे खायचे. मला माशाचं वावडे. मला तिथल्या विहिरीच्या पाण्याचा सुद्धा वशाळ वशाळ वास यायचा. त्यामुळे मला तिकडचे जेवण आवडायचे नाही. तिकडे उपवासाला साबुदाणा बिलकुल वापरत नव्हते त्यामुळे माझा खरोखर उपवास घडायचा. परंतु आमच्या घरातील सर्वांनाच सगळीकडे ऍडजेस्ट व्हायची खूप सवय आहे. जेवणाच्या बाबतीत मी सोडून कोणी फारशी तक्रार करत नाही. परंतु हळूहळू सवय झाल्यानंतर मला तिथले जेवण खूप आवडू लागले. आता तंदुरी रोटी आपण मुद्दाम विकत घेऊन खातो. परंतु गावाकडली पाणी लावून हातावर थापलेली आणि चुलीवर भाजलेली तंदुरी रोटीची चव अप्रतिम लागते. मी जेव्हा सर्विसला लागले तेव्हा माझ्या पहिल्या पगारातील काही रक्कम मी सासरी मनी ऑर्डर केली होती. त्यावेळी फोन नव्हते. पत्रानेच कळवले जायचे. त्यानंतर मे महिन्यात सासरी गेल्यानंतर अंगणामध्ये खूप सुंदर तुळशी वृंदावन बनवून घेतलेले दिसले. त्याला मोठा चौकोनी पारही केला होता. घरात गेल्यानंतर जाऊ बाईंनी सांगितले तू दिलेल्या पगाराच्या पैशांमधून सासूबाईंनी हे सुंदर वृंदावन बांधून घेतले आहे. त्यांची खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली होती. माझ्या पैशाचा उपयोग त्यांनी इतका छान केला आहे हे बघून मला खूप आनंद झाला. अजूनही मला वृंदावन बघितली की त्यांची आठवण होते. माझ्या लग्नापूर्वी सासू सासरे आमच्या यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी हौसेने या दोघांना चारधाम यात्रेला पाठवले होते. काशीला जाऊन आल्याचे समाधान त्यांना मिळाले होते. माझे लग्न झाल्यानंतर त्या दोघांचेही दात बसवायचे होते. त्यानंतर दोघांचेही डोळ्यांचे ऑपरेशन करायचे होते. एकदा मात्र खूप परीक्षा पाहणारा प्रसंग घडला. सासुबाईंचे डोळ्याचे ऑपरेशन करताना त्यांना येऊन तीन चार महिने झाले तरीपण त्यांची शुगर नॉर्मल येत नव्हती. शुगर नॉर्मल येण्यासाठी पुन्हा तीन महिन्यांसाठी औषध दिले होते. मी त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन रोज द्यायचे. आम्ही फ्लॅटमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होतो. त्यामुळे रोज नर्सला एवढ्या वरती येणे शक्य नव्हते. त्यामुळे मी त्यांच्यासाठी ते शिकून घेतले. त्यांना चहा नाश्ता जेवण वेळेवर देणे आणि गोळ्या देणे हे काम मी जबाबदारीने करत होते. त्यावेळी माझा मुलगा दोन वर्षाचा होता. साहेबांची बदली दुसऱ्या गावाला होती. त्यामुळे ते जाऊन येऊन करायचे. सकाळी जाऊन संध्याकाळी यायचे. सासूबाईंच्या डोळ्याच्या ऑपरेशनची तारीख जवळ आली म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना ऍडमिट करायचे होते. म्हणून मी त्यादिवशी दुपारी त्यांना जेवणाचे ताट ठेवले पाण्याचा तांब्या व फुलपात्र ठेवले आणि आई तुम्ही जेवून घ्या असे सांगितले. तसेच नातवाकडे म्हणजे माझ्या मुलाकडे लक्ष द्या मी बाजारात जाऊन येते असे सांगितले. बरेचसे सामान व भाजी आणायची असल्यामुळे मला यायला जवळ जवळ दीड दोन तास लागले. मी जेव्हा घरी आले तेव्हा गेट उघड होतं आणि मुलगा तिथं खेळत होता. माझ्या हृदयात धस्सं झालं. एवढ्या उंचावरून तो गेटवरती चढून पडला बिडला असता तर अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली. आईचं कसं काय लक्ष नाही. असं क्षणभर वाटलं आणि आत जाऊन बघते तर काय आई तशाच झोपलेल्या होत्या. टीव्ही तसाच चालू होता. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. जेवणाचे ताट तसेच उघडे होते. पाण्याचा तांब्या तसाच होता. हे भीतीदायक भयानक दृश्य बघून मला काहीच सुचेना. मी हाका मारायला सुरुवात केली. त्यांचा काहीच रिस्पॉन्स येईना. मी खूप घाबरले पिशव्या तिथल्या तिथे टाकून शेजारी गेले. भाभींना सांगितलं दुलेश कडे लक्ष द्या. मी दवाखान्यात जातेय. मी तसच चप्पल न घालता चौथ्या मजल्यावरून पळत आमच्या थोड्याशा जवळ असलेल्या पाठक हॉस्पिटल मध्ये गेले आणि सरळ डॉक्टरांच्या समोर जाऊन उभी राहिले त्यांना सगळी परिस्थिती भडाभडा सांगितली. त्यांनी लगेच स्ट्रेचर आणि दोन माणसं दिली. ते माझ्या आधी आमच्या अपार्टमेंट वरच्या चौथ्या मजल्यावर पोहोचले. मी पाठीमागून आले त्यांना स्ट्रेचर वर पाठवून मी घराला कुलूप लावले. मुलाला शेजारी भाभींना बघायला सांगितले. काय माहित त्यावेळी माझ्या मनात आले आणि मी रुमाला मध्ये थोडीशी साखर घेतली. मी हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळी त्यांना बाहेर झोपवले होते. मी त्यांच्या तोंडात सहजच साखर टाकली आणि काय आश्चर्य त्यांचा फेस कुठल्या कुठे गायब झाला आणि त्या एकदम जाग्या झाल्या “काय झालं ग जया मला ” म्हणून माझ्या गळ्यात पडल्या. मी त्यांची समजूत घातली. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले. संध्याकाळपर्यंत तीन सलाईन झाले होते. डॉक्टरांना पुन्हा एकदा मी सगळी कल्पना दिली. जास्ती सलाईनमुळे शुगर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे का हे विचारले. त्यांनी रात्रीचे सलाईन थांबवले. तेव्हा आमच्या साहेबांना यायला रात्रीचे नऊ वाजले होते. परंतु तोपर्यंत त्यावेळी डॉक्टरांनी, शेजाऱ्यांनी आणि तिथल्या नगरसेवकांनी खूप धीर दिला. रोज इन्शुलिन आणि गोळ्यांमुळे त्यांची शुगर कमी झाली होती. तसेच दुसऱ्या दिवशी ऑपरेशन म्हणूनही त्यांनी थोडं टेन्शनही घेतलं असावं. परंतु मी खूप घाबरले होते एवढं सगळं करून काही झालं असतं तर माझ्यावर आलं असतं असं वाटलं. शुगर पेशंट जवळून हाताळण्याची माझी पहिलीच वेळ होती. तरी परमेश्वर कृपेने त्यांचे ऑपरेशन वेळेवर पार पडले. त्यानंतर अनेक वर्ष त्या व्यवस्थित राहिल्या. अधून मधून सासू-सासरे यायचे. काही वर्षानंतर सासरे गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या तब्येतीकडे फारसे लक्ष दिले नाही. शुगर खूप झाली आणि पायाला जखम झाली. हे त्यांच्यावर खूप रागावले. काही दिवसानंतर त्या इकडे आल्या. दवाखान्यात ऍडमिट केले. बरेच दिवस उपचार चालू होते. परंतु शुगर जास्त झाल्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. याचे त्यांना अतोनात दुःख झाले. त्यांनी जरी बोलून दाखवले नाही तरी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचे त्यांना कदाचित मान्य नव्हते. कदाचित आता त्यांना जगणे नकोसे वाटत होते त्या अवस्थेतच दवाखान्यामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. मी आणि ह्यांनी नोकरी सांभाळून त्यांची सर्व सेवा केली. मी घरातून नाश्ता व दोन वेळचा स्वयंपाक करून देत होते. त्यांच्याजवळ दवाखान्यात माझ्या मोठ्या जाऊ बाई राहिल्या होत्या. सासुबाई आता खूप शांत आणि समाधानी होत्या. त्यांचे सर्व कुटुंब सुखा समाधानात होते. त्यामुळे त्या समाधानाने गेल्या. त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत हे जाणवते. त्यांची नेहमीच आठवण येते आणि त्या आठवणींमध्ये त्यांच्याविषयीचा आदर नेहमीच वाढत राहतो.

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कबाड से जुगाड… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ कबाड से जुगाड… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काल हे वाक्य ऐकलं. ••••

माझी मैत्रीण, मंजू खूप हुशार, स्मार्ट आणि खूप creative. •••• काल तिने आपल्या बगीच्याचे फोटो पाठविले. तिचे छोटेसे Terrace garden. •••पण खूप सुंदर. •••कलात्मकतेने सजविलेले•••. एकदम colourful, vibrant •••. तिचे प्रत्त्येक काम जरा ‘ हटके’ असत. मस्तच असत. ••••

त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे तिने लिहिलेलं एक वाक्य •••

This is all from, ••• “कबाड से जुगाड” 

कबाड म्हणजे तुटक्या-फुटक्या •••, खराब झालेल्या, •••वापरायला उपयोगी नसलेल्या, ••• फेकायच्या •••, किंवा काही कामाच्या नसलेल्या वस्तू ••• आणि त्यापासून एवढं सुंदर काम. व्वा खूप कौतुक वाटलं मला मंजूचे. ••••••

मला ‘कबाडचा’ अर्थ छान माहिती आहे. कारण माझ्या घरात भरपूर आहे. मी जपून ठेवला आहे ना. ••••कधी तरी कामी येईल. म्हणून•••• हा मनात येणारा पहिला विचार. •••• म्हणून ठेवायचे. •••पण वर्षानुवर्षे निघून जातात, •••पण ती वस्तु काही कामी तर येत नाहीच. •••आपल्या जवळ अशी काही वस्तू आहे, हे पण लक्षात रहात नाही. •••कुठे ठेवली आहे??? हे तर‌ प्रयत्न करुनही आठवत नाही. ••• खुप सांभाळुन ठेवलेली असते ना. •••हे सर्व माहिती असतं, तरी ठेवायचे •••. मुलं, नवरा म्हणतातही. •••• अग! फेक ना‌. हो, हो फेकते. फक्त म्हणायचे. •••••

मी रोड झाले की हा ड्रेस मला होईल. •••रोड होणे जमतं नाही. •••तो ड्रेस काही कामी येत नाही. •••कान नसलेला कप। म्हणे पेन stand म्हणून वापरता येईल. •••, झाकण नसलेली बरणी, कदाचित मनी प्लांट लावायच्या कामी येईल •••••. हॅंडल नसलेला तवा, फोडणीचे भांडे. cracked steel चे डबे प्लास्टिक चे डबे. या तरी मोठया वस्तु झाल्या. अहो, ना•••डा पूर्ण दोन मीटरचा नाही बरं, फक्त एक नाड्याचा छोटासा तुकडा. •••• कधी तरी कामी येतो म्हणे ••••, काही बांधायला श्रीखंडाचा चक्का वगैरे. •••, कानातला एकच(साधाच) टॉप. कारण दुसरा हारवून गेलेला आहे. पुन्हा मिळेल या आशेने सांभाळुन ठेवायचा. ••••

या वस्तू मी का ठेवल्या??? तर कधी कामी येतील म्हणून. ••• यातील एकही वस्तू माझ्या करिता कामाची नाही •••. हे मला माहीत आहे. ••• आणि प्रामाणिकपणे सांगते, ••त्यातील एकही वस्तू पुन्हा वापरली जात नाही. एक तर ती वापरण्यासाठी नसते. ••• दुसरं म्हणजे माझ्यात तेवढी कलात्मकता नाही •••अशी, creativity माझ्यात नाही. की त्या गोष्टींचा वापर/जुगाड करून काही तरी नवीन करेन‌••••

मग मी का फेकत नाही??? फक्त ‘लोभ ‘ व ‘मोह ‘ बाकी काही नाही. •••नंतर फेकते असं म्हणत ••• नंतर नंतर ••••करत या वस्तुंनी घरातली खूप जागा अडवून ठेवली आहे •••.

घर स्वच्छ करणे म्हणजे ही अडगळ पण बाहेर टाकणे होय. ••••घरात असंख्य वस्तू अशा असतील ज्या वेळेवर दिल्या, काही वस्तू, कपडे वगैरे तर दुसऱ्यांच्या कामी नक्की येऊ शकतात. ••• अडगळ काढली तर घरातील negativity जाते म्हणे. ••••.

त्यामुळे मला ‘कबाड’ शब्दाचा अर्थ चांगला माहीत आहे ••••आणि ” कबाड से जुगाड “करून तयार केलेले जग प्रसिद्ध चंडीगढ चे ” रॉक गार्डन” मी बघीतले आहे. या गार्डन चे शिल्पकार श्री नेमीचंद यांच्या ‘कबाड हे जुगाड ‘कलाकुसरीचे खरच खूप कौतुक आहे. •••••

पण असे किती जण असतात???? शंभर पाचशे मधे एखादी स्त्री किंवा पुरुष असेल •••. जी खरच अशा वस्तुंचा वापर करून काही तरी सुबक वस्तू तयार करत असेल •••”. Best from waste “म्हणतात ना ते. ••••

पण नव्याण्णव % बायका फक्त वस्तू जमवून ठेवतात. कधी तरी कामी येईल म्हणून. •••••

बरेचदा बाजारात नवीन प्रकारच्या वस्तू आपण घेतो •••. पण जून्या वस्तू तशाच ठेवतो. •• घरात किती तरी चांगल्या, पण वापरात नसलेल्या वस्तू, उगीच पडून असतात••• कोणाच्या तरी नक्की उपयोगी पडू शकतील. •••••

ते कबाड नाही. •••कोणाच्या तरी कामी येऊ शकणाऱ्या वस्तू आहेत त्या. ••. मग लगेचच द्यावे ना ••••.

द्यायलाही शिकले पाहिजे ••••

माणूस म्हणजे कधी ही न समजणारा प्राणी. •••आणि त्यात स्त्री म्हणजे‌ विचारायलाच नको. स्त्री ला समजणे तर अशक्यच •••कशात जीव गुंतलेला असेल सांगता येत नाही. ••••••

आणि वस्तू “फेकणे “किंवा कोणाला “देणे” तेवढे सोप्पं नाही. त्याकरिता मोठ्ठं मन असावं लागतं•••••

आज तर ” USE. And THROW ” चा ज़माना आहे. ••••

चला, तर मग कबाड साफ करूया, घरातील आणि मनातील सुध्दा. •••

कोरोनाने हात धुवायची, स्वच्छतेची सवय लावलेली आहेच. •••आता घर‌ व मन पण स्वच्छ करूया. •• मनातील अडगळ •••• हेवेदावे, मत्सर, अहंकार, दुःखदायक आठवणी बाहेर काढून टाकुया. ••••

ही दिवाळी वेगळी साजरी करू या. ••••

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शिंपलेलं चांदणं…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘शिंपलेलं चांदणं…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बागेतल्या बाकावर उदास मनाने बसलेल्या त्या बाबांना मी रोज बघते. कुणाशी बोलणं नाही, हंसणं नाही की, घरी लवकर जाणं नाही. खिन्न मनाने, उदास चेहऱ्याने त्या ठराविक, ठरलेल्या जागेवर बसणाऱ्या त्या गृहस्थांजवळ मी एक दिवस जाऊनच बसले.

“एक विचारू का बाबा? एकटं बसायचा कंटाळा नाही कां हो येतं तुम्हाला? “

“काय करणार पोरी घरीदारी या दुनियेत मी एकटाच आहे. अर्धांगिनी अर्ध्या वाटेवरून सोडून गेली. ती होती तेव्हा तिची किंमत कळली नाही, तिच्याअसण्याचं महत्त्व मला जाणवलचं नाही आणि तिच्या उशिरा उमजलेल्या किमतीचं मोजमाप ऐकायला ती आता या जगातच नाही. कुणाची बोलू मी? काय करू? कसा वेळ घालउ? कळेनास झालंय मला”.

त्या दिवसापासून आमच्यात संवाद सुरू झाले, ओळख वाढली आणि बाबा भरभरून माझ्याशी बोलू लागले. एकत्र बसून डबा पार्टीपर्यंत आमची मैत्री वाढली…

आणि एक दिवस मी त्यांना खुलवण्यासाठी प्रश्न विचारला, ” काय हो बाबा गायला आवडतं का तुम्हाला? माझ्या प्रश्नावर ते गडगडाटी हसत उत्तरले, “मी? आणि गाणं? अगं हा तानसेन गायला लागला ना तर प्रेक्षक सैरावैरा धावत सुटतील. ” बाबांची विनोद बुद्धी हळूहळू जागृत होत होती. माझंच घोडं मी पुढे दामटतच राह्यले. ” बरं राह्यलं! पण बाबा गाणं ऐकायला तर आवडेल ना तुम्हाला? एकटेपणावर मात करण्यासाठी कुठलातरी छंद हा हवाच. छंद माणसाच्या भरकटलेल्या मनाला एके ठिकाणी बांधून ठेवतो. गोंधळलेलं अंतर्मुख झालेलं मन छंदात गुंतवलं ना की सैरभैर होत नाही. असं मला तरी वाटतं हं बाबा “

“ते सगळं ठीक आहे गं, पण माझ्या आयुष्यातले रंगच उडालेत. “

“बाबा दिवाळीत रांगोळीत आम्ही बायका रंग भरतोचं ना! अगदी रांगोळी पुसली जाणार आहे हे माहित असून सुद्धा रांगोळी रंगवतो. प्रसन्न वातावरणात जाऊन, मन आनंदी ठेवून, शुद्ध वातावरणात वावरून, तुमच्याही आयुष्यात तुम्हाला पुन्हा रंग भरता येतील. “

म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असतं नाही का! बाबांच्या निरागस चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. कालचा ताजा अनुभव होताच माझ्याजवळ. तो धागा पकडून मी म्हणाले, ” बाबा नका म्हणू गाणं! पण सुरेल, सुंदर गाणं ऐकायला तर आवडेल नां तुम्हाला? ”.

“हो तर! तान नाही पण मान डोलवायला नक्कीच जमेल मला. अग पण हल्ली धांगडधिंग्या शिवाय कार्यक्रम होतातच कुठे? आम्ही जुन्या काळातले, जुन्या गाण्यात रमणारी माणसं, आर्केस्ट्राच्या कानठळ्या कोण ऐकेल? “.

“नाही बरं का बाबा! काल मी ऐकलेला कार्यक्रम साधा, सुंदर मनाला भुरळ घालणारा असाच होता. थांबा, ऐका ना! , सविस्तरच सांगते तुम्हाला.. श्रीकांत साने-मृणालिनीताई साने या जोडगोळीने, गायक श्री प्रभाकर कुलकर्णी, वृषाली क्षीरसागर, सौ. साने, हार्मोनियम साथ श्रीकांत साने, व्हायोलियन साथ विवेक बनगे आणि तबला संगत प्रकाश पंडित ह्या समस्त कलाकार मंडळींच्या साथीने एक उत्तम टीम तयार झाली आहे. कोजागिरीचं औचित्य साधून हा बहारदार कार्यक्रम माणिकबाग ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सुंदर गार्डन गणेश मंडपात खूपच रंगला. सूर्यास्त होऊन चंद्रोदय होण्याच्या मार्गावर चंद्राची गाणी या मंडळींनी सादर केली. जय शारदे प्रार्थनेपासून सुरू झालेला हा सगळ्याच कलाकारांनी सादर केलेला, अतिशय सुंदर, आखीव कार्यक्रम कैवल्याच्या भैरवीपर्यंत येऊन अगदी वेळेत साजरा झाला. आणि तो कधी संपला कळलच नाही. त्यात ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, चंद्र आहे साक्षीला इत्यादी शांत, प्रसन्न गाण्यांचा समावेश होता. तर ‘कशी झोकात चालली’, अरे जा रे नटखट इत्यादी ठेक्यातल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध होऊन प्रेक्षकांनीही ठेका धरला होता. श्री साने हयांचं हार्मोनियम आणि खुसखुशीत निवेदन, सौ मृणालिनीताईंची माणिक वर्माची सुंदर गाणी, वृषालीताईंची गवळण, श्री प्रभाकर कुलकर्णी ह्यांची सुरेल गाणी, जोडीला श्री. विवेक वनगे ह्यांची व्हायोलिन संगत, श्री प्रकाश पंडितांचा तबल्याचा ठेका, सगळ्यांच्याच साथीमुळे कार्यक्रम बहारदार झाला. प्रत्येकाच्या बोलण्यात विनम्रता होती बालगंधर्वांच्या काळातही हे हौशी कलाकार आम्हाला घेऊन गेले. ‘प्रेक्षक आमचे मायबाप’.. ह्या वाक्याला स्मरून त्यांनी लांबून आल्याबद्दल आमचे आभार मानले तेव्हां त्यांना, धन्यवाद देऊन मी म्हणाले, ” तुमच्या सगळ्यांच्या आवाजातचं इतकी जादू आहे की तो आवाजच आम्हाला इथपर्यंत घेऊन आला आहे”

 – माणिकबाग ज्येष्ठ मंडळींनी अगत्याने दिलेलं दुग्धपान करून पुढच्या कार्यक्रमाचं आमंत्रण घेऊनच, मी त्या श्रीगणेश मंडपातून बाहेर पडले..

बाबांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर दुःखाच्या काळोखाआडून त्यांच्या चेहऱ्यावर चांदणं पसरल्याचा मला भास झाला. उस्फूर्तपणे ते म्हणाले, “अगं मग मला का नाही नेलंस त्या कार्यक्रमाला? मी पण आलो असतो की, “

“अगं बाई खरंच लक्षातच आलं नाही हो माझ्या. चुकलंच माझं ” ही खंत माझ्या चेहऱ्यावर उमटली.

तेव्हा ते दुःखाच्या पडद्याआडून बाहेर आलेले सद्गृहस्थ म्हणाले, “असू दे! असू दे! पुढच्या वेळेला मला नक्की घेऊन जायचं. तुझ्या रसभरीत वर्णनाने हा रंगभरीत कार्यक्रम ऐकायला मी अगदी उतावळा झालोय बघ. “

“ हो बाबा अगदी नक्की जाऊ आपण” आश्वासन देता देता थर्मासमधलं आटीव केशरी दूध मी पेल्यात भरून बाबांच्या पुढे केलं.

… दुधात चंद्राचं चांदणं मिसळलं होतं तर नवीन छंद गवसलेल्या बाबांच्या चेहऱ्यावरही चंद्र प्रकाश पसरला होता. बाबा निराशेतून बरेचसे बाहेर आले होते, त्या गायक वादक छंद जोपासलेल्या कलाकारांना माझा मनःपूर्वक सलाम..

ह्या मंडळींचा हा, उत्साही वयातला मनाला आल्हाद देणारा पंचाहत्तरीकडे वाटचाल करणारा छंद तुमच्यापुढे यावा म्हणून हा मनापासूनचा लेखन प्रपंच..

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माऊली… लेख क्र. १८ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ माऊली… लेख क्र. १८ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

खादी शिक्षिका गैरहजर असेल, तर तात्पुरता वर्ग सांभाळण्यासाठी पालक-प्रतिनिधी बोलावले जातात. यावर्षी पहिलीच्या नवीन पालक प्रतिनिधी वर्गावर आल्या. त्यांची ओळख करून घेतली. वर्ग छान सांभाळल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले, त्यांचे अभिनंदन केलं. पहिलीत असलेल्या त्यांच्या मुलाबद्दल चौकशी केली.

त्यांनी सांगितलेली माहिती ऐकून आश्चर्यचकित झाले, अवाक झाले. त्यांना चक्क नमस्कार केला.

वयाची नुकतीच पंचविशी ओलांडली असेल तिने. परंतु तिचे विचार आणि आचरण दोन्ही अतिशय वंदनीय होते.

मुळात पहिलीत असलेला मुलगा हा तिचा मुलगा नव्हताच मुळी.

तिच्या यजमानांचे पहिले लग्न त्यांच्या मामाच्या मुलीबरोबर झालेलं. तिचं आधीपासून कोणा दुसऱ्यावर प्रेम होतं. या मुलाच्या जन्मानंतर, त्या बाळाला सोडून ती चक्क तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली.

या बाळाला आई हवी, म्हणून तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. आणि या माऊलीनं पोटच्या गोळ्यापेक्षा जास्त प्रेम केलं आणि त्याला वाढवलं. दिराचा मुलगा लहान असतानाच, त्याचे आईवडील – हिचे दीर आणि जाऊ – अचानक वारले. हिनेच त्याचंही पालन पोषण केलं, तो आता आठवी इयत्तेत आहे.

खूप कौतुक वाटलं मला तिचं… 

स्वतःच्या मुलाचं सर्वच प्रेमाने करतात. परंतु, एक सवतीचं आणि एक दिराचं, अशा दोन मुलांचे, आपलेपणाने, हसतमुखाने करणे वाटतं तितकं सोप्पं नाही. पण या छोट्या वयात ही माऊली प्रौढपणे ही जबाबदारी पार पाडत होती.

खरोखरच नमस्कार करण्यासारखी ही गोष्ट नाही का?

– लेख क्र. १८.  

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात नेहमी असावी… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्यात नेहमी असावी… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आज ‘ morning walk ‘ला देशपांडे काका, जोशी काका, कुलकर्णी काका, भेटले. ••• तिघे बर्याच दिवसांनी भेटले, म्हणून बगीच्यात बसून गप्पा मारत बसले. ••••

देशपांडे काकांनी विचारले कशी चाललीय मग दिवाळी ची तयारी??? गम्मत म्हणजे तिघांची मुल परदेशी आहेत. ••• कोणाची अमेरिकेत, तर कोणाची जर्मनी ला. ••• त्यामुळे प्रत्त्येक घरी आजी आजोबाच आहेत. •••

कुलकर्णी आजोबा म्हणाले, •••

अहो कसली आलीय दिवाळी अन् दसरा??? मुलं येथे नाही, म्हणून उत्साहच वाटत नाही बघा•••. दोघेच दोघे घरात काय करणार??? अन् काय खाणार??? जोशी आजोबा थोडे अबोलच आहेत, म्हणून फक्त हसले. ••••

देशपांडे आजोबा म्हणजे. ••• full of life, एक आनंदी व्यक्तिमत्त्व, एकदम मस्त, हौशी, सर्वांशी दोस्ती त्यांची. अगदी लहान मुलांपासून ते त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असणारे सर्व त्यांचे मित्र. ••••

ते म्हणाले, •••• अहो!! असा काय विचार करताय??? आपली मुलं खूप शिकावी. •• पूढे शिक्षणासाठी अमेरिकेत जावी •••. त्यांची खूप प्रगती व्हावी •••. अशी आपलीच स्वप्ने होती ना. ••आयुष्यभर त्याच एका उद्देशाने आपण काम करत होतो ना•••. मग आता आपली स्वप्नं पूर्ण झाली आहेत. ••• मुलं आपापल्या मार्गाला लागली आहेत ••. आता ती आपल्यावर अवलंबून नाही. ••• ही किती आनंदाची गोष्ट आहे ••. अहो!! जेंव्हा मुलं शिक्षणात छान करत होती, ‘scholarship’ वर अमेरिकेत गेली तो आनंद आपणच enjoy केलाय ना.. ••••आपल्या नातलगांमधे त्यामुळे आपल्याला विशेष दर्जाही मिळाला •••. मुलांच्या या सर्व गोष्टींमुळे आपण आनंदाने फुगत होतो त्यावेळी. •••. स्वतः ला नशीबवान समजत होतो. •• कधी कधी ‘ग ‘ ची बाधा पण होत होतीच. •••

अगदी ताठ मानेने, कॉलर वर करून अभिमानाने रहात होतो ना. ••• आकाश ठेंगणे झाले होते त्यावेळेस. •••मग अजून काय पाहिजे??? किती दिवस मुल आपल्या जवळ राहणार?? कधी तरी दूर जाणारच ते. •••. घेऊ दे त्यांना उंच भरारी. आपल्याला त्यात आनंदच आहे •••. शेवटी प्रत्त्येक आई वडीलांची हीच इच्छा असते. ••••

आता आपण येथे, आणि मुलं तिथे. हे त्याच स्वप्नांचे/ आनंदाचे ‘side effects’ आहेत. तेव्हा हे पण त्याच spirit ने घ्यायला पाहिजेत. ••••

मग आता तक्रार नसावी ••. मुलं येथे सणावारी, आपल्या छोट्या मोठ्या अडचणी च्या वेळेस येथे नसतात तर नाराजगी नसावी••••. चेहऱ्यावर वर बिचारेपणाचा भाव नसावा. ••• आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सौ. ना अजिबात रडू द्यायचे नाही आपण. ••••

अहो!! मुलांचा तेथून फोन आला की त्यांचा प्रश्न काहीही असो •••••आमचे उत्तर ठरलेल‌ असत. “आम्ही अगदी उत्तम आहोत. मजेत आहोत. आनंदात आहोत. We are perfectly fine. and enjoying life. ” आम्ही त्यांना आमच्या जबाबदारीतुन मुक्त केलंय. त्यांना काय कमी काम असतात?? lawn maintenance ते laundry. सर्व कामे नोकरी बरोबर करावी लागतात. •••• अजूनही ते आपली जबाबदारी आहेतच. ते तिथे आनंदी रहायला आपण येथे मजेत राहणे आवश्यक आहे. ••••

आता आम्ही त्यांना सल्ले देणे बंद केले••. आपले problem पण सांगतच नाही. ••• “let them live their life. let them enjoy. “

मी खरं सांगू का ••• जोशी साहेब अहो!!

मी तर भारतातच राहुन नोकरी केली. •••पण माझ्या आई वडिलांच्या गरजेच्या प्रत्त्येक वेळेस मी त्यांच्या जवळ होतोच असं नाही झालं ••••. हे चक्र असंच चालू राहणार ••••. परिस्थिती आनंदाने accept करावी. •••

अहो!! आता माझे दुसरे बरेच नवीन नातेवाईक आहेत. ••आम्ही त्यांना आमचे. Indian नातेवाईक म्हणतो. ••आमच्या शेजारचे मुलं, मुली हे सर्व आमचे नातेवाईकच आहेत. ••त्यांच्यात आम्ही आमच्या मुलांना, नातवंडांना बघतो ••. खूप मजेत आहोत आम्ही या मंडळी बरोबर. ••अजिबात एकटेपणा जाणवत नाही. •• देशपांडे आजोबा पूढे मिश्किलपणे म्हणाले••• अहो!! त्या अमेरिकेन नातेवाईकांपेक्षा हे Indian नातेवाईक रोज दिसतात. आधार आहेत आमचे. ही सर्व मंडळी माझ्या करिता खूप खास आहेत. ••••

कूलकर्णी साहेब, आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर काही न काही नवीन होणारच. म्हणून आनंदी रहाणं सोडायचं का?? दिवाळी साजरी का करायची नाही??? सांगा बरं. ••••

अहो!! फराळ अमेरिकेत पोहचला ना, मग झालं. मुलांचे फोन येतात ना. मग अजून काय पाहिजे? आणि समजा नाही आला फोन म्हणजे असं समजायचं 

” No news means good news “

They are fine. ते रमले आहेत आपल्या संसारात, मुलाबाळांमधे. All is well अस समजायचे. ••••

तिथे पण आणि येथे पण. ••• 

आपण स्वस्थ व मस्त रहायचे •••

कुलकर्णी व जोशी आजोबा एकदम charged झाले. •••• पटल त्यांना. •••

घरी आले ते उत्साहातच. काल पर्यंत सर्व गोष्टींना नाही नाही म्हणणारे •••. कशाला??? राहु दे ना. म्हणणारे, आजोबा आजींना म्हणाले, •• “चला लागू या दिवाळी च्या तयारीला “. लगेच शेजारच्या गायत्री ला फराळाचा अॉर्डर दिला. अग!! on line दिवाळी पहाट केंव्हा आहे?? •••आजोबांनी विचारले??? •••

आजी आश्चर्य चकित तर झाल्याचं. पण कुठेतरी आजोबांमधे झालेला बदल बघून‌ त्यांना आनंदही झाला 

म्हणतात ना •••••

“कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तिंपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. “••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares