मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आम्रफूल पत राखत ! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ आम्रफूल पत राखत ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

मंडळी, सध्या बाजारात आम्रफल म्हणजेच आंबा आलेला आहे. अजून कुठे कुठे कच्च्या कैऱ्या आहेत, तर कुठे कुठे नव्हे सर्वत्र पिकलेले आंबे सुद्धा आपल्याला दिसू लागले आहेत. हा फळांचाच राजा. आंबा केवळ फळांचाच राजा नाही, तर तो सर्व तऱ्हेने राजा आहे असं मी म्हणेन.

आंबा आपण घराच्या अगदी जवळ लावू शकतो. कारण आंब्याचं मूळ हे दंडाकार असतं. म्हणजे ते जमिनीत खोलवर जातं. त्याचा घराला घराच्या पायव्याला त्रास होत नाही. धोका होत नाही. याउलट वड – पिंपळ – चिंच हे महावृक्ष ! यांची मुळे ही शाखाकार असल्यामुळे ती घराच्या पायव्याच्या खाली ही जाऊ शकतात. म्हणूनच कदाचित हे सर्व महावृक्ष आपल्याला गावाबाहेर / नदीकाठी / तळ्याकाठी किंवा जंगलात आढळतात. अर्थात यासाठी वेगवेगळी कारणे सांगतात. कारण चिंचेवर – पिंपळावर भूत असतं म्हणून घाबरवलं जातं. ही भूते अर्थातच आपल्या घराशी संबंधित आहेत / सुरक्षेसाठी आहेत. हे खरं कारण आहे. जेव्हा शास्त्रीय कारण लोकांना पटत नाही, तेव्हा त्यांच्या मनाशी खेळ करून ही कारणं त्यांच्या गळी उतरवली जातात, हे आपल्याला ठाऊक आहे.

हे झालं मुळांबद्दल ! यापुढे जाऊन आंबा हा बारा महिने हिरवागार असतो. खरं तर आपला भारत देश हा मोसमी हवामानाचा प्रदेश आहे. म्हणजेच शिशिर ऋतू लागला की, पानझड सुरू होते. अगदी सागवानाची जंगलं बघितली तरी या ऋतूत पानांवर जाळी पडलेली आणि पुढे जाऊन ती सगळी पानं गळून पडलेली आपण बघतो. अर्थात पुढे वसंत ऋतू लागला की खरी पालवी येते हे खरे आहे. मात्र आंबा – आम्रवृक्ष आपल्या भरगच्च पानांनी बाराही महिने हिरवागार असतो.

सर्वांनाच ठाऊक आहे की आंब्याची पाने ही शुभ मानली आहेत. आंब्याचं खोड हे घरासाठी अवजारांसाठी असं वापरलं जातं. पण याही पुढे जाऊन आंब्याच्या संबंधात एक गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे.

आम्रफूल पत राखत / मोह फूल पत खोय 

नापत का रस चाखत जो उसकी क्या पत होय

वरील चरण मी लहान असताना एका कीर्तनात, कीर्तनकार बुवांच्याकडून ऐकलं होतं. अर्थात त्यावेळी जी समज होती त्याप्रमाणे मला त्याचा अर्थ लागला. पण आज त्याचा खरा खरा अर्थ कळतोय.

आपण प्रथम चरण बघूया ! “आम्रफूल पत राखत ” – म्हणजे ज्यावेळी आंब्याला फुले येतात म्हणजे मोहर येतो, त्यावेळी सुद्धा आंबा हा आपल्या हिरव्या गार पानांनी नटलेला असतो म्हणजे आंब्याची फुलं ही आंब्याची पानं यांचं रक्षण करत असतात. अर्थात पत या शब्दावर श्लेष अलंकार आहे. पत म्हणजे तुमची प्रतिष्ठा ! म्हणजे आंब्याची फुले तुमची – त्या झाडाची प्रतिष्ठा राखतात. आता दुसरं चरण बघूया !

मोह फूल पत खोय “ म्हणजेच मी आधी सांगितल्याप्रमाणे मोसमी हवामानाच्या प्रदेशामुळे आपल्याकडे मोह या वृक्षाला जेव्हा फुले येतात, त्यावेळेस मोहाची पाने झडतात पानगळीमुळे. म्हणजेच मोहाची पाने ज्यावेळेला झडू लागतात त्यावेळेसच मोहाची फुले येतात. याचा अर्थ असा की मोहाची फुले आपल्या वृक्षाची पाने घालवतात. म्हणजेच पत / प्रतिष्ठा घालवतात. आता पुढे बघा

नापत का रस चाखत जो उसकी क्या पत होय ?

ना पत का रस चाखत “ हे चरण घेऊ या ! म्हणजेच मोहापासून / मोहाच्या फुलांपासून दारू बनवली जाते हे सर्वांना ठावूक आहे.. जी फुले आपल्या झाडांची पत – प्रतिष्ठा राखत नाहीत, अशा फुलांचा रस – म्हणजे दारू प्राशन केल्यानंतर त्या माणसाची पत कोणीही राखू शकत नाही.

सरळ भाषेत सांगायचं तर, दारू पिणाऱ्या माणसाची पत अजिबात राहत नाही. पण हे सांगण्यासाठी कवीने हे अतिशय सुंदर चरण सांगितलेले आहे.

या दृष्टीने आंब्याची पत राखणारा मोहर पुढे येणाऱ्या आंबा याची /आपल्या वृक्षाची / आपल्या घराची पत राखतात. प्रतिष्ठा जाणतात. लोकांना सावली देतात. आंब्याला नवीन पालवी फुटायला अगदी वसंत ऋतूची वाट बघावी लागत नाही. कालमानाप्रमाणे आंब्याची पाने सुद्धा जुनी झाली की ती गळतात आणि नवी पालवी उगवत असते. त्यासाठी कुठल्याही ऋतूची हवामानाची आंब्याला वाट बघावी लागत नाही. मात्र मोह वृक्षाचं नेमकं उलट आहे. त्याला फुलं येतात तेव्हा मोहाची सर्व पाने गळून गेलेली असतात.

त्यामुळे आपण स्वतः लक्षात ठेवायचे आहे की, जतन कोणाचं करायचं ? आपल्या घराचं की, आपल्या घराचं वाटोळं करणाऱ्या लोकांचं ? स्वतःच जगून पहा ! जगून घेताना एवढं मात्र लक्षात ठेवा की, तुम्ही कुठेही, कितीही दूर गेलात तरी मोहांच्या फुलांसारखे होऊ नका /तर आंब्याच्या फुलासारखं वागत चला. घराची प्रतिष्ठा वाढेल असंच वागत चला ! म्हणजेच जगणं सोपं होईल.

© प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा)

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “असं काही पाहिलं की छान वाटतं !!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “असं काही पाहिलं की छान वाटतं !!…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

आमची सोसायटी मुख्य रस्त्याला पासून थोडी आतल्या बाजूला असल्यानं गाड्यांचा आणि इतर आवाजांचा बिलकुल त्रास नाही. बऱ्यापैकी शांतता असते. त्यामुळेच थोडासा आवाज, गोंगाट सुद्धा सहन होत नाही. दुपारच्या वेळेला तर नाहीच नाही.

 दुपारी जेवण उरकून वामकुक्षीच्या अगोदर पुस्तक वाचत बसलेलो तेव्हाच मुलांचा गलका ऐकायला आला. खिडकीतून पाहिलं तर सोसायटीतल्या शेडमध्ये मुलं खेळत होती. जाम वैतागलो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे डोक्याला ताप. त्यात शेड आमच्या खिडकीच्या जवळ असल्यानं सगळा गोंगाट थेट कानावर आदळत होता. शांततेची इतकी सवय झालीये की थोडासा आवाज सहन होतं नव्हता. चिडचीड आणि बेचैनी वाढली. दोनतीन वेळा खिडकीतून पाहत ओरडलो पण मुलांवर काहीही परिणाम झाला नाही. राग अनावर होऊन बडबडायला लागलो. ते ऐकून बायको म्हणाली.

“अति करताय” 

“त्रास होतोय म्हणून बोलतोय. उगाच नाही. ”

“मुलं खेळताना गोंगाट करणारच आणि आता तर सुट्ट्या आहेत. ”

“त्यांचे आईबाप निवांत आणि आपल्या डोक्याला ताप” 

“वयानं नाही पण विचारांनी पक्के म्हातारे झालात. पन्नाशीतच ही अवस्था. पुढं अवघडयं”

“काहीही काय बोलतेस. ”

“जरा स्वतःचे बालपण आठवा. तेव्हासुद्धा कुणाला त्रास होत असणारच की… ”बायकोच्या बिनतोड मुद्द्यावर मी निरुत्तर.

“मुलांचा गोंगाट यात नवीन काही नाही पण सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं. ”

“कशाबद्दल?”खिडकीतून पाहत मी विचारलं.

शेडमध्ये दहा-बारा वर्षांची मुलं-मुली ग्रुप करून खेळत होते. त्यांचे खेळ पाहून आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. जे दिसलं ते फारच अविश्वसनीय होतं. एक ग्रुप पत्ते खेळत होता, दुसरा नवा व्यापार आणि तिसरा ग्रुप चक्क ‘काचा-कवड्या’ खेळत होता. महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच्याही हातातच नाही तर जवळपास सुद्धा “मोबाइल” नव्हता आणि सगळेजण भान हरपून खेळण्यात तल्लीन झालेले. मोबाईल वेडाच्या काळात असं काही ‘हटके’ पहायला मिळणं हे खरोखर सुखद होतं. खूप कौतुक वाटलं. माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. खिडकीतून पाहत मुलांच्या खेळात मीसुद्धा कधी गुंग झालो कळलंच नाही.

असं काही पाहिलं की छान वाटतं 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाम आणि शब्द… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ नाम आणि शब्द… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

 नाम आणि शब्द – – 

दोन्हीमध्ये फरक काय ?

शब्द…

शब्द बोचतात…

शब्द टोचतात…

शब्द लागतात…

शब्द गोड वाटतात…

शब्द बोलतात

शब्द आधार देतात

शब्द सांत्वन करतात

शब्द…

शब्द…

शब्द…


नाम…

नाम.. नाम घेणाऱ्याला या सर्व शब्दांच्या मायेतून अलगद बाहेर काढते…

नाम सर्व शब्दांचे सर्व अर्थ शोषून घेते आणि नाम घेणाऱ्याला सर्वांपासून अलिप्त करते…

श्रीराम

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आता फार काही अपेक्षाच नाही… ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ आता फार काही अपेक्षाच नाही☆ तृप्ती कुलकर्णी

फार काही नाही, फार काही नाही 

फक्त रोज एक छोटासा डोस घेत जाऊ 

एक छोटी टॅबलेट हिंसेनी भरलेली

खून, हाणामाऱ्या, अत्याचार यांची

मेजवानी पचवायला शिकवणारी

त्याशिवाय कसं आपण काही मनोरंजन करणार

 

फार काही नाही फार काही नाही 

एक चमचा सिरप रोज आधी घ्यायचं 

शिवराळ भाषेला त्याने पचवायचं 

त्याशिवाय कसं आपण काही ऐकणार, बोलणार 

संवादाची परिपूर्णता त्याशिवाय कशी होणार?

 

फार काही नाही फार काही नाही 

अहो जग मॉडर्न होतंय आता कुठे तुम्ही आहात

कसले संस्कार, सात्विकता का शोधत आहात?

खरंच गरज आहे का या जगाला तुमची,

तुमच्या विचारांची

नाही ना कळलं ????

बघताय का नुसते मग, एक पटकन सुई टोचून घ्या,

मन आणि मेंदू बधीर करण्याची! 

त्याशिवाय कसे तुम्ही इथे जगू शकणार

 

सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र

न चुकता बस इतकं रोज करत जा 

बाकी काही केलं नाही तरी,

हे करणं म्हणजे आत्ताच्या काळात योग्यच की

फार काही नाही फार काही नाही… ‌

 

© तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”चौकटीबाहेरचा विचार..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चौकटीबाहेरचा विचार.. ☆ संध्या बेडेकर ☆

काही लोक ‘out of the box’ विचार करतात.

आज खूप दिवसांनी देशपांडे आजी आजोबा भेटले. माझे आवडते आजी आजोबा आहेत ते. नेहमी उत्साहात असतात. अगदी ‘full of energy’. मागच्या वर्षीच पंचाहत्तरी झाली त्यांची. त्यांचे घर म्हणजे, आजी आजोबा, अजय, अनिता म्हणजे त्यांचा मुलगा सून व नातु अनय.

अजय अनिता दोघे ही नोकरी करणारे व अनय दुसरीत आहे. शाळेनंतर तो ‘डे केअर’ ला जातो. येताना अनिता त्याला बरोबर घेऊन येते. आजी आजोबांना दिवस भर बिझी ठेवायचा, अजिबात शांत बसत नाही अनय. म्हणूनच अजय अनिता ने त्याला ‘डे केअर’ मधे ठेवायला सुरुवात केली.

या घरची संध्याकाळ म्हणजे, अनिता ची धावपळ असते. स्वयंपाक, अनय चा अभ्यास, आजी आजोबांना वेळेवर जेवण देणे, त्यांचे औषधपाणी, अनयची दुसऱ्या दिवशीची तयारी, सकाळच्या डब्याची तयारी, त्यात येणारे जाणारे असतातच. आजी जेवढं जमेल त्यापेक्षा जास्त मदत करतातच. मुख्य म्हणजे दोघे ही जेष्ठ अजिबात घाई गडबड करत नाही. पण अनिता ची ओढताण बघून त्यांना वाईट वाटत. बायकांची नोकरी म्हणजे ‘double front’ वर काम करावे लागते. घर आणि ऑफिस. दोन्ही कामं सोप्पी नाहीत. अजय ही मदत करतो तिला. सकाळी मावशी येतातच. पण घरच्या बाईला लक्ष द्यावेच लागते.

आज शनिवार, अजय अनिता घरीच आहेत. आज आजी आजोबा कोणत्यातरी वेगळ्याच विचारात आहेत. आजोबा म्हणाले, “अजय !! आज तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तुम्हाला वेळ मिळाला की बोलू आपण. “

अजय अनिता आपापली कामे पूर्ण करून येऊन बसले. आजोबा म्हणाले, “मी काय म्हणतो, ते शांतपणे ऐका. अरे!! आम्ही दोघे वृध्दाश्रमात रहायला जायचा विचार करत आहोत. ” आजोबा थेट विषयावरच आले.

एवढं ऐकलं, आणि अजय तर उठून चाललाच गेला. अनिता ढसाढसा रडू लागली. “आई!! माझी काही चूक झाली का ? मला माफ करा”. तिने आपल्या सासूबाईंचा हात हातात घेतला. तिला रडू आवरत नव्हते.

अजय पुन्हा आला. “काय झालं बाबा ? असं का म्हणाला तुम्ही ? काय चाललंय तुमच्या मनात ? हे असे विचार कसे आले तुमच्या मनात ? कोणी कान भरले का तुमचे ? एका नंतर एक प्रश्नांची झडीच लावली त्याने. त्याच्या डोळ्यात पण पाणी आले होते. आजी पण रडत होत्याच.

आजोबा मात्र शांत होते. अजयच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, “अरे बाबा!! असं काही नाही. आम्ही दोघे खूप मजेत आहोत. खूप आनंदात व आरामात आहो. तुमचे रोजचे काम बघुन आम्हीच थकतो. सध्या तू आणि अनिता वेगळ्याच फेज मधुन जात आहात. करीयर पण बघायचं आहे. अनयकडे पण लक्ष द्यायचे आहे. आमची पण खूप कामं असतात. आम्हाला दिसतंय तुम्हा दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. आणि आम्हाला आमचा वेळ कसा काढायचा??? हे कळत नाही. “

आजोबा पूढे म्हणाले, “अरे !! एखादे छानसे वृध्दाश्रम बघ. अगदी छान सोई असलेले. आम्ही तेथे राहू. आम्हाला पण मित्र मैत्रिणी भेटतील. अरे !! आजही तुमची जबाबदारी आहे आमच्यावर. तुमचा आनंद, तुमची तब्येतही महत्वाची आहे. आणि नवीन पिढी ला पण घडवायचे आहे ना. तेव्हा मी काय म्हणतो, ते लक्षात घे व विचार कर. आणि हो, लोक काय म्हणतील ? याचा विचार करायचा नाही. ते येतात का अनिता ला मदत करायला ? अनयला शिकवायला ?”

“बघू”, म्हणून‌अजय ऊठुन गेला. आज जेवताना डायनिंग टेबलावर सर्व शांत होते.

रविवारी सकाळी आजोबांनी अजयला चौकशी करायला सांगितले व स्वतः येऊन बसले. अजय ने नेटवर चेक करायला सुरुवात केली. ‘अजूनही विचार करा’ असं सारखं म्हणत होताच तो.

शेवटी एक वृद्धाश्रम मनाजोगे वाटले. तेथे जाऊन बघीतले. अजयने खूप चौकशी केली. नियम वाचले. खोली बघीतली. सोई बघीतल्या. डॉक्टर ची सोय आहे. मनोरंजन, जेवण हे सर्व बघून खात्री झाल्यावरच आजी आजोबा तेथे रहायला गेले. हे सर्व प्रत्येकासाठी खूप कठीण होते. पण आजोबांनी निर्णय घेतलाच होता.

आता प्रत्येक ‘weekend’ ला अजय अनिता अनयला घेऊन आजी आजोबांना भेटायला जातात. बरोबर दोघांची औषधं, फळं व इतर त्यांच्या आवडत्या वस्तू नेतात. चांगले दोन तास तेथे बसतात. चौघे बगिच्यात बसून खूप गप्पा मारतात. आता अनय ला एक नाही अनेक आजी – आजोबा मिळाले आहेत. आता सर्वांनाच अनयची सवय झाली आहे. अजय अनिता ही सर्वांना प्रेमाने भेटतात. विचारपूस करतात. आता सर्व weekend ची वाट बघतात. वृध्दाश्रमातील उत्साह वाढला आहे.

आज आजोबा गमतीत अजयला म्हणाले, “अरे !! एवढा वेळ तर आमच्याशी बोलायला, तुम्हाला घरी पण मिळायचा नाही. अरे !! आता वृध्दाश्रमात रहायला जाणे म्हणजे मुलं याना सांभाळत नाही असे राहिले नाही, असा अर्थ निघत नाही. नवीन पिढी, घरातले जेष्ठ, सर्वच महत्वाचे आहेत. काही निर्णय घेताना त्रास होतो. पण ते योग्य असतात. कधी कधी ‘out of box’ विचार करून बघावे. जमलं तर ठीक, नाहीतर आपलं घर आहेच ना. अजय रोज सकाळ संध्याकाळ फोन करतोच. “

आज अनयचा वाढदिवस सकाळी सर्व आजी आजोबांबरोबर झाला. आता संध्याकाळी मित्र मैत्रिणींबरोबर, म्हणुन आजी आजोबा परमीशन घेऊन घरी आले आहेत.

आजोबांचे हे bold decision ऐकुन त्यांच्या बद्दल माझा आदर वाढला आहे.

कधी कधी. “out of the box” विचार करून बघावा. त्याकरिता धाडस लागतं…

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आयडियाची कल्पना…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयडियाची कल्पना…” ☆ श्री सुधीर करंदीकर

ऊन ‘मी’ म्हणतयं, अशा वेळेस आपण पण “मी” म्हणायचं 

ऊन मी म्हणतयं म्हणजे ऊन कमी व्हायला तयार नाही. अशा वेळेस आपण पण मी म्हणायचं, म्हणजे मी पण उन्हापासून बचावाकरता काहीतरी मार्ग काढीनच्..

यावर्षी उन्हाळा खूपच म्हणजे खूपच जास्त जाणवतो आहे. उन्हात फिरल्यामुळे बऱ्याच जणांना छोटे मोठे आजार होत आहेत, त्रास होत आहेत. ऑटो करून बाहेर पडलो तरी उन्हाच्या झळा लागतात आणि उन्हाचा त्रास हा होतोच होतो.

सर्व जाणकार आणि तज्ञ मंडळी सांगत आहेत की सध्या तरी 25 मे पर्यंत दुपारी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत घराबाहेर पडूच नका.

ज्यांचा व्यवसायच बाहेर फिरून काम करणे आहे त्यांना तर पर्यायच नाही, पण इतर मंडळी मात्र दुपारी बाहेर जाणे नक्कीच

टाळू शकते. ऑफिसच्या कामाकरता / क्लासेस करता ऑनलाइन पद्धत पण उपलब्ध आहे.

पुणे तिथे काय उणे या म्हणी प्रमाणे पुणेकरांना दुपारी बाहेर न पडणे वगैरे मान्य नसते.

कुणाचे लग्नाचे वाढदिवस, कुणाची ७५ री, कुणी परदेशातून आले म्हणून त्यांच्या स्वागताकरता पार्टी, रिडेव्हलपमेंट नंतर नवीन घर मिळाले त्याबद्दल वास्तुशांती कार्यक्रम, वगैरे वगैरे, असे कार्यक्रम अजूनही पुण्यामध्ये भरदुपारी हॉटेलमध्ये होत असतात.

कार्यक्रम आणि जेवणाची वेळ दुपारी एक वाजता असते. आणि बोलावलेली सगळीच मंडळी असे कार्यक्रम अटेंड करत असतात, कारण ऊन आहे या कारणाकरता नाही कसं म्हणणार, अशी सगळ्यांना अडचण असते.

आज सकाळीच एका मित्राला सहज गप्पा मारायला फोन केला होता.

मी : नमस्कार, काय चाललंय ? उन्हापासून काळजी घे. दुपारी बाहेर पडू नकोस.

मित्र : अरे मी कालपासून श्रेयस हॉटेलमध्ये काल आणि आज असे दोन दिवस राहायला आलोय

मी : अरे पुण्यात तुझं घर असून हॉटेलमध्ये, हा काय नवीन मूव्ह आहे

मित्र : अरे बायकोच्या मैत्रिणीच्या जावयाला मोठ्या पोस्ट वर प्रमोशन मिळालं आहे, त्यानिमित्त ओळखीचे आणि नातेवाईक यांना आज पार्टी आहे. डेक्कन वर याच श्रेयस हॉटेलमध्ये. दुपारी 12 ते 3 वेळ आहे.

मी : पण तू दोन दिवस हॉटेलमध्ये का आहेस 

मित्र : सगळीच तज्ञ मंडळी सांगत आहेत की मे महिन्याच्या 25 तारखेपर्यंत दुपारी घराबाहेर पडू नका. मी बायकोला सुचवले की मैत्रिणीला कार्यक्रम थोडा पुढे ढकलायला सांग, म्हणजे उन्हाचा कोणाला त्रास होणार नाही. कारण अशा कार्यक्रमाकरता मुहूर्त बघणे वगैरे असा प्रकार नसणार.

बायको म्हणाली, तुम्ही म्हणताय ते कारण कोणालाही पटणार नाही. अशा विचारांना पुण्यामध्ये निगेटिव्ह अटीट्युड असे म्हणतात.

तुम्हाला ते समजणार नाही, तुम्ही येणार नसाल तर तसं सांगा, मी एकटी जाईन.

आपण बायकोला काही सुचवणं आणि ते लॉजिकल असलं तरी बायकोला ते पटणं, असं कधीच होत नसतं. (बहुतेकांचा असाच अनुभव असणार).

त्यामुळे मीच विचार केला की आपणच काहीतरी सोपा पर्याय काढावा.

मी : तुझं म्हणणं आणि तुझा अनुभव अगदी बरोबर आहे, कार्यक्रमाचं काय ठरवलं शेवटी

मित्र : आमच्या घरापासून दुपारी साडेअकरा वाजता रिक्षेने डेक्कन ला जायचं, आणि कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी कडक उन्हात अडीच वाजता पुन्हा रिक्षाने घरी यायचं, म्हणजे ऊन्हाला – ‘आ बैल मुझे मार’ असे सांगण्यासारखेच आहे.

रिक्षेमध्ये प्रवास करताना उन्हाच्या झळा लागतात, आणि कार्यक्रम हॉटेलमध्ये म्हणजे तिथे एसी असतो. म्हणजे आधी झळा आणि नंतर लगेच गारवा, म्हणजे तब्येतीचे आणखीन बारा.

काय मार्ग काढावा !, काय मार्ग काढावा!, असा विचार करत मी खिडकीतून बाहेर ऊन्हाकडे बघितलं आणि मला मार्ग सापडला.

हॉटेल श्रेयस मध्ये मी दोन दिवसां करता खोली बुक केली. काल संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर आम्ही दोघेजण श्रेयस मधे आलो.

काल रात्रीचं जेवण इथेच घेतलं, आज सकाळचा नाश्ता पण इथे झाला. त्यामुळे रोजच्या खाण्यात आणि चवीमध्ये पण अनायसेच छान बदल मिळाला.

आजचा कार्यक्रम याच हॉटेलमधल्या हॉलमधे आहे. आमची खोली दुसऱ्या मजल्यावर आहे. दुपारी रूम मधून खाली हॉलमध्ये कार्यक्रमाला जाऊ, जेवण आणि गप्पा टप्पा आटोपल्या, की वरती पुन्हा खोलीमध्ये येऊन आराम करू. अजूनही कोणी ओळखीच्यांना उन्हात घरी जायचं नसेल, तर त्यांना पण खोलीवर घेऊन येऊ.

संध्याकाळी हॉटेल मधून चेक आउट करू आणि रिक्षा करून घरी जाऊ.

माझ्या या प्लॅनिंगमुळे उन्हालाही बरं वाटेल, की आपल्यामुळे यांना त्रास झाला नाही. आणि आपल्याला पण उन्हाचा त्रास नाही, ज्यांच्याकडे कार्यक्रम ते पण खुश, आणि बायको पण खुश

मी : तुझी आयडिया एकदमच जबरदस्त आहे. इथूनच तुला सलाम करतो.

ऊन कमी झालं की जून महिन्यात ठरवून एकदा भेटीचा कार्यक्रम करू, मित्रांना पण बोलवू, भरपूर गप्पा टप्पा करू, मस्त मजा येईल.

बाय-बाय झाले आणि फोन संपला.

(आपल्या मित्रमंडळींना लेख फॉरवर्ड केला तरी छानच. म्हणजे सगळेच उन्हापासून काळजी घेतील आणि इतरांची काळजी करतील.)

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एक अवलिया अस्सल कलावंत !” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “एक अवलिया अस्सल कलावंत !” ☆ डॉ. धनंजय देशपांडे

जगदीश खेबुडकर

जगदीश खेबुडकर यांच्याशी माझी चांगली मैत्री होती मी कलाकार डिरेक्टरी सन २००० मध्ये सुरु केली ज्यात सर्व कलाकाराचे नाव पत्ते असायचे… त्यात पहिली प्रस्तावना त्यांनी लिहून पाठवली होती.

तर पत्रकारिता करत होतो तेव्हा एका मुलाखतीत मला त्यांनी एक गुपित सांगितलं आणि मी ते छापलं 

ज्यावर नंतर त्यांच्यावर कौतुकाची जणू सुनामी आली 

झालं असं की.. ‘अष्टविनायक’ नावाचा मराठी सिनेमा येत होता. त्यात सर्व आठ गणपतीच्या गावाचे आणि त्यांचे वैशिष्ट्य वर्णन करणारे गाणे लिहून हवे होते जे खेबूडकरांनी लिहून दिले 

“अष्टविनायका तुझा महिमा कसा”.. हे ते गाणे 

आणि कहर म्हणजे तुम्ही आता पुन्हा ते गाणे नीट ऐका ज्यात आठही गणेश मंदिराचे व परिसराचे यथार्थ वर्णन केले आहे 

मात्र खेबुडकर म्हणाले,

“ अहो पत्रकार महाशय… मी यापैकी एकही देवळाला भेट दिलेली नाही !”

यावर मी उडालो होतो. विचारलं की “ मग कस काय परफेक्ट वर्णन ? “

तर मिश्किल हसत म्हणाले “ मी प्राचीन ग्रंथ पण वाचत असतो “

खरा किस्सा त्यानंतरचा आहे. हे गाणं एका रात्रीत तयार झालं आहे.

त्याचं झालं असं खेबुडकर जेव्हा मुंबईत यायचे तेव्हा एका ठराविक बिल्डिंग मध्ये उतरायचे.

खेबुडकर मुंबईत आलेत हे कळल्यावर निर्माते शरद पिळगावकर यांनी ताबडतोब खेबुडकर यांना गाठलं आणि गाडीत घालून घरी आणलं आणि म्हणाले की “ अष्टविनायकावर तुम्हाला गाणं लिहायचं आहे. ” 

खेबुडकर म्हणाले की “ऑलरेडी याच्या आधी शांताराम नांदगावकर आणि शांताबाई शेळके यांनी लिहिलेली आहेत गाणी अष्टविनायकावर… ”

तर पिळगावकर म्हणाले “ते बाजूला ठेवा. मला तुमच्याकडून हवं आहे. ” 

– – आणि विशेष म्हणजे तोपर्यंत खेबुडकर हे लावणी लिहिण्यासाठी फेमस झाले होते तरी पण पिळगावकरांनी त्यांच्याकडून लिहून घेण्याचा हट्ट धरला आणि त्यांना घरातल्या रूममध्ये बंद केलं.. गाणं पूर्ण केल्याशिवाय उठायचं नाही असं सांगून!

खेबुडकर यांनी चंग बांधला आणि सलग एकटाकी असं म्हणतात तसं गाणं लिहून काढलं.

– – – आठ कडव्याचं गाणं. रेकॉर्डिंग सुमारे 13 मिनिटाचं… एवढं मोठं गाणं तोपर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभादेवी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालं त्यावेळेला अचानक पिळगावकर म्हणाले खेबुडकर यांना की “गाणं पण तुम्हीच गायचं आहे. “

(खेबूडकर यांचा खडा आवाज सर्वांना माहीत होता.) मात्र तोपर्यंत बाकी दोन गायक आलेले होते.. अनुराधा पौडवाल वगैरे. म्हणून खेबुडकर म्हणाले “ त्यांना गाऊ द्या. शेवटचं एक कडवं फारतर मी गाईन”

.. आणि सातव कडवं खेबुडकर यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं आणि त्या गाण्याने नंतर रेकॉर्ड ब्रेक केलं. आजही ते गाणं गणेशोत्सवाच्या काळात वाजत असतं.

असा हा सगळा महिमा अष्टविनायकाचा … खेबुडकरांचा … आणि त्यांच्या कौशल्याचा !!

असे होते कविराज ते..

साक्षात दंडवत त्यांना !

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी मुक्तेश्वरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? मनमंजुषेतून ?

माझी मुक्तेश्वरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

वैशाख वद्य दशमी, शके १९४८..

 संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी.. त्यानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण… !

 

मुक्ताई,

अनेक आशिर्वाद.

खरंतर माझी स्थिती त्या चांगदेवांसारखीच झाली आहे… ! मायना काय लिहावा, याबद्दल मी थोडा गोंधळलो आहे… ! कारण, तू फक्त वयाने लहान, आणि ज्ञानाने मात्र मोठी… आणि मी फक्त वयाने मोठा… !

तू म्हणशील लोकं तुला ‘माऊली’ म्हणतात… !

पण खरं सांगू यात माझे असे काय आहे… ?

गीता भगवंताने सांगितली म्हणजे यात माझे काही नाही… !

माझ्या सद्गुरूंनी, आपल्या निवृत्तीदादांनी माझ्याकडून ती लिहून घेतली… !

दादाचे आपण आजपर्यंत ऐकतोच, मग यात माझे ‘कर्तृत्व’ ते काय.. ?

आईबाबा गेल्यावर लहान असूनही तूच आम्हाला आधार दिलास… !

‘… …… …… ‘

हा असे का बोलत आहे ? असा तुला प्रश्न पडला असेल ना ? अग आज तुझी पुण्यतिथी!! म्हणून तुझ्याबद्दल चार शब्द सांगावे, असे निवृत्तीदादाने मला सांगितले… !.

अग, मला मांडे भाजून दिलेस ना ?

… तेव्हा तू माझी ‘आई’ झालीस… !

मला ‘ताटी ‘उघडायला लावलीस..

तेव्हा तू माझी समजूत काढणारी ‘ताई’ झालीस… !

हे दोन प्रसंग सर्वांना माहीत आहेतच… !

पण असे अनेक प्रसंग… !

मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही मुली, प्रसंग आला की लगेच मोठ्या कशा होता… ?

मला तुझा खूप आदर वाटतो, मोठा आधार वाटतो आणि कौतुकही वाटतं… !

आपण चार भावंड! सर्वात शेवटी तुझं नाव घेतलं जातं… पण तूच सर्वश्रेष्ठ आहेस असे मला नेहमी वाटतं आले आहे… !

… कारण आजही या जगात ‘मातृत्व’भावच सर्वश्रेष्ठ आहे..

सदगुरुकृपेने लोकं मला ‘माऊली’ म्हणतात. पण आईनंतर तूच माझी ‘माऊली’ झालेली आहेस, त्यामुळे तूच सर्वश्रेष्ठ आहेस… !

मला तुझा अभिमान वाटतो… !

.. माझी मुक्तेश्वरी!!

तुझं कौतुक कदाचित केलंल तुला आवडणार नाही, पण आज तरी मला माझ्या लाडक्या मुक्तेचं मन भरेस्तोवर कौतुक करू दे… !

– – मुक्ते!! आज सामान्य जनांना नुसतं ‘मुक्त’ करून चालणार नाही तर आपला ‘नरेंद्र’ (स्वामी विवेकानंद) म्हणतो तसे लोकांनी गोरगरिबांची सेवा करायला हवी… !

आपल्या ‘भारतमाते’ला आज त्याचीच गरज आहे असे मला वाटते.

तू आदिशक्तीचा अवतार आहेस, मुक्त होण्यासाठी सर्वजण तुझ्याच चरणी येतील, तेव्हा तू हे सर्वांना सांग, सांगशील न… ?

चल मुक्ते, थांबतो… !

तुझ्याशी बोलून आज मला खूप आनंद झाला… !

तुझा,

ज्ञानादादा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आयुष्याची extra किल्ली नकोच..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आयुष्याची extra किल्ली नकोच.. ☆ संध्या बेडेकर ☆

“आपल्या घराची एक ‘ extra’ किल्ली नेहमी शेजारी असावी. हे नक्की. पण आपल्या आयुष्याची किल्ली मात्र स्वतः कडेच ठेवावी. ”

आज मी खूप उत्साहात आहे. काय कारण असावं माहीत नाही. पण आज भरपूर ऊर्जा आहे. मला छान वाटतय. खूप काम करावसं वाटतंय. मन गुणगुणतय. आजच्या या उत्साहपूर्ण दिवसांचा चांगला उपयोग करून घ्यायचा हे मी लगेच ठरवलं. आजकाल असे दिवस दररोज उगवत नाहीत. म्हणून मी सगळ्यात आधी मस्त चमचमीत जेवणाचा बेत ठरविला. घर अगदी चकाचक करायचे ठरविले. एकानंतर एकेक काम आठवतं गेली व आज जास्तीत जास्त काम करायची हे लगेच ठरविले. कामे केंव्हा, कशी करायची याची रूपरेषा मनात ठरवून टाकली. आता एवढ्या कामांची लिस्ट समोर म्हंटल्यावर कामाची स्पीड वाढवायलाच हवी. हे सर्व ठरवत असताना च मधे दोन मिनिटे काढून वॉशिंग मशीन लावली. म्हणजे आजची सकाळ वेगळीच उगवली.

बहुतेक माझी झोप चांगली झाली होती. स्वप्न पण छान पडलं होतं. पावसाळी मन प्रसन्न करणारी हवा होती. त्यातच रेडिओ वर पहिलंच मस्त आवडीचे गाण ऐकलं.

” मस्ती भरा है समा,

 हम तुम हैं दोनो यहां.

 आंखो में आ जा, दिल में समा जा,

 झूमें ज़मीं आसमां । “

वाढत्या उत्साहात भर पडली. तसे मागच्या पंधरा वर्षांपासून आम्ही दोघेच असतो पण “Today it’s different. ”

कारण काहीही असू दे. लगेच हा दिवस cash करायचाच. असं मी ठरवलं.

सर्व अगदी मजेत सुरू होत. हळदीचे डाग पडतात व कपडे खराब होतात, असा रोजचा विचार आज बाजूला सारून, रोजपेक्षा वेगळा ड्रेस घातला. मनात म्हंटल पडले डाग तर पडू देत.

” बहुत कपड़े हैं अपने पास । ”

मन लावून एकेक पदार्थ लक्ष देऊन केला. पाहुण्यांसाठी जपून ठेवलेली क्रोकरी उत्साहाने काढणार, तेवढ्यात फोन वाजला, लगेचच घेतला. एका मैत्रिणीचा होता.

वेळ आहे का ग.???

असं म्हणून आमच्या गप्पा नेहमी प्रमाणेच सुरू झाल्या. मी उत्साहात होतेच. लगेच आजचा माझा बेत मी तिला सांगितला.

खीर, पूरी, बटाटा भाजी, चटनी, कोशिंबीर भजी, मसालेभात, मसाला ताक (मठठा) वगैरे वगैरे.

बाप रे!! आज काय विशेष ग?? तिने विचारले.

कोणाचा वाढदिवस की काय??

काही नाही ग सहजच.. सणवार, वाढदिवस वगैरे काहीच नाही. मी म्हंटल. असच काहीतरी वेगळं करावं म्हणून करतेय. सर्व झालंय, फक्त मसालेभात तेवढा राहिलाय. येतेस का जेवायला?? मी सहज विचारलं.

लगेच ती म्हणाली, अग! तुला कंटाळा नाही येत का?? मला तर आता एवढा कंटाळा आला आहे. रोज रोज, तेच ते, तोच तोच, आपल्या हातच जेवून स्वयंपाक करून करून मी थकलेय.. मी तर आता जेमतेम जेवढी गरज असेल तेवढंच काम करते व बाकी जास्तीची कामे तर अजिबात करतच नाही. कोणी येत जात नाही. त्यामुळे तर अजून काही करत नाही. कंटाळा तर रोजच येतो.

अग! तू आणि मी एकाच वयाच्या ना, मग तुलाही आता कामाचा कंटाळा येतच असणार नाही का?? बघ बाई, खूप करायला जाऊ नको, नाही तर उद्या कंबर दुखायची.

झालं, एवढं पूरे होत. मलाही ते पटले. मनाने सहजच पलटी मारली. उत्साही मनाने कुलांटी मारली. अचानक घड्याळ उलटे सुरू झाले. आता विचारांची दिशाच बदलली. म्हणजे. ‘ Follow Me ‘ सारख तिच्या मागे माझे मन चालू लागले.

मलाही थकल्या सारखे वाटू लागले. कुठे तरी ‘कंटाळा ‘ शब्द डोक्यात छान बसला. व आपला असरही दाखवू लागला.

आता मनात नवीन विचार येऊ लागले. मसालेभात राहू दे का?? बाकी एवढं सर्व आहेच ना. म्हणजे नाही केलं तरी चालेल. एवढं पचलही पाहिजे ना. आजकाल जास्त जेवले की त्रासही होतो. ‘कंटाळा’ शब्दाला साजेसे व स्वतःला सोईस्करपणे पटणारे विचार मनात येऊ लागले. स्वतः शी च बोलणे होत होते.

गॅस बंद करून थोड्या वेळ शांत बसले.

एकदम विचारात बदल कसा काय झाला?? संगतीचा असर का? तरी संगत दुरुनच होती. फक्त फोनवर. तरी एवढा प्रभाव कोणाच्या तरी बोलण्याचा होऊ शकतो का?? मग माझ्या उत्साहपूर्ण दिवसाचे काय?? सर्व मुसळ केरात??

एकदम दिवस कंटाळवाणा वाटू लागला. थकल्या सारखे वाटू लागले. क्रोकरी वगैरे नकोच, राहू दे. उगीच फूटली तर सेट खराब व्हायचा.

म्हणजे तिच्या म्हणण्याने माझी नकारघंटा सुरू झाली. एकदम विचारांची दिशाच बदलली.

माझी अवस्था मलाच कळत नव्हती. मनात कुठेतरी तरी अस्वस्थता जाणवू लागली. मी हा असा विचार करणे योग्य आहे का??

म्हणतात ना,  “संगतीचा असर पडतो. ”

हो बरोबर आहे. ती पण तर माझ्या संगतीत तेवढ्याच वेळ होती ना, मग तिला मी प्रभावित का करू शकले नाही.????

तिचा कंटाळवाणा दिवस उत्साहात मी का बदलू शकले नाही.???? मी पण सांगू शकले असते ना,

अग! नाही, असं अजिबात नाही. वयाप्रमाणे थकवा येतो कधी कधी. नाही असं नाही. पण आजचा दिवस खुप छान उगवला आहे. म्हंटल आनंद घेऊया आज. कधी कधी काही तरी वेगळं असावं ना. आपल्यालाही छान वाटत असे प्रसंग स्वतः च निर्माण करायचे असतात. कशाला वाट बघायची वाढदिवसाची किंवा सणाची. आणि जेवढं पचेल तेवढच खायचं. अग! छान वाटत. स्वतः चीच पाठ थोपटावीशी वाटते. आनंदी दिवसाची वाट बघण्यापेक्षा हातात असलेला क्षण/ दिवस आनंदात कसा घालवता येईल यांचा विचार करावा.

माझ्या अशा बोलण्याने तिच्यात कदाचित बदल झाला असता. बरे असो,

माझ्या आनंदाची किल्ली मी तिला दिली आहे का?? घराची एक extra किल्ली शेजारी नेहमी द्यावी. हे बरोबर आहे पण आपल्या आयुष्याची किल्ली जर दुसऱ्या च्या हातात दिली तर बंदर च्या खेळाप्रमाणे तो डंबरू वाजवणार आणि आपण नाचायचं का?? आपले निर्णय ते घेणार का?

लगेच सर्व मरगळ झटकली. सर्व कंटाळा डिलीट केला. व पुर्वीच्या उत्साह मोड मधे आले. आरशात बघीतल. स्वतः चेच कौतुक केले मनात म्हंटल,

” अभी तो मैं जवान हूं ” ।

व लगेच उत्साहाने कामाला लागले. क्रोकरी काढली. टेबल सजवले. बगीच्यातून गुलाबाची फूल फ्लॉवर पॉट मधे सजवली. प्लेट मधे सर्व वाढले. छान गाणी लावली. फोटो काढला. काही लोकांचा कंटाळा जाऊन उत्साह यावा या उद्देशाने फेस बुक वर फोटो पोस्ट केला.

रोज पेक्षा दोन घास जास्त खाल्ले.

थोड्याच वेळात उत्साही फेस बुक प्रेमी active लोकांचे comments ही आलेच.

  •  व्वा काकू मस्तच
  • Wow!! so tempting
  • Great, , Kaku You Rock
  • मी पण उद्या नक्की करते
  • Enjoy Kaku n Kaka

वाचून छान वाटल. मेहनतीचे चीज झाले, अस वाटल.

मी स्वतः लाच धन्यवाद दिला. छान स्वयंपाक केला, हे कारण तर होतच. पण दुसरं म्हणजे नवीन सूत्र ” Follow yourself ” हे पाळल्या बद्दल.

कोणी काय बोलावे?? काय सांगावे?? यावर आपलं नियंत्रण नसते. पण त्यांचे किती ऐकायचे?? किती नाही?? यावर आपल्याला नियंत्रण नक्की ठेवता येते.

तरीही संगत महत्वाचीच. माझी आई नेहमी म्हणत असे, तुम्ही ज्या प्रकारच्या व्यक्तिंच्या सहवासात राहाता, त्या सर्वांचे एव्हरेज व्यक्तिमत्त्व तुमच घडत जातं. नकळत त्यांचे विचार तुम्हाला पटत जातात.

लोक निंदा करतात तर मी दुःखी होते.  लोक स्तुती करतात तर आनंद होतो.  म्हणजे माझ्या सुख दुःखाचे बटन दुसऱ्यांच्या हातात आहे का?? बटन आपल्या हातात असावे. स्वतःला जे पटेल तेच करावे.

आत्मविश्वास.. हीच आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे

“Say Or Do what you feel. It is not being rude. It is called being real. ”

आयुष्य माझ आहे ते मी माझ्या मनाप्रमाणे जगणार.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मूड! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ मूड! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आता माझा मूड नाही! “

हे वाक्य अखिल मानवजात आपापल्या मातृभाषेत किमान दिवसातून एकदा किंवा सकाळी उठल्यापासून काहीच मनासारखं होतं नसेल तर अनेकदा वदत असावी!

एवढंच कशाला, ज्या लहानग्यांना या शब्दाचा अर्थ तर सोडाच, स्पेलिंग पण येत नसेल अशी चिमुरडी मुलंसुद्धा हा शब्द, अर्थात आपल्या पप्पा, मम्मीचे ऐकून आजकाल उच्चारत असतात, आता बोला!

प्रत्येक शब्दाचे एक उगम स्थान असते, तसे या मूड शब्दाचे पण असावे, पण ते सांगण्याच्या मूड मधे मी नाही, असं मी म्हणणार नाही, कारण ते मला खरंच ठाऊक नाही! आणि यात कमीपणा असण्याचे सुद्धा काही कारण नाही, असं आपलं मला माझा मूड चांगला असला तरी वाटतय! या माझ्या अशा वाटण्याला वाचकांचा मूड चांगला नसेल तर बाधा येण्याचा संभव नाकारता येत नाही बरं का मंडळी! तर अशा या मूड शब्दाच्या उत्पत्तीवर भाषा शास्त्रातले जाणकारच त्यांचा मूड असेल तर, अधिक प्रकाश टाकतील या बद्दल मला शंका नाही!

माझ्या मनांत कायम एक प्रश्न माझा मूड चांगला असला की या संदर्भात उभा राहतो. तो असा, की हा मूड शब्द प्रचारात येण्याआधी आपण सगळेच त्यासाठी कोणता पर्यायी शब्द आपापल्या मातृभाषेत वापरत होतो? या माझ्या प्रश्नावर सुद्धा वर म्हटल्या प्रमाणे पुन्हा भाषाशास्त्रातले जाणकारच एकदा त्यांचा मूड नसला तरी प्रकाश टाकू शकतील याची बालंबाल खात्री मला आहे! आता तुम्ही म्हणाल प्रथम मी शंका नाही असं म्हटलं आणि आता बालंबाल खात्री आहे असं कोणत्या मूड मध्ये म्हणतो आहे? तर तुमच्या या मनांत उभ्या राहीलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला कुठल्याही मूडची आवश्यकता नाही बरं का मंडळी! तुमच्या मनांत असा प्रश्न तुमचा मूड चांगला नसल्याने जर का उभा राहिला असेल तर त्याचे उत्तर असं, की पहिल्या प्रश्नाचे उत्तर भाषातज्ञाना देता आल्यावर माझा हा दुसरा प्रश्न त्यांच्यासाठी, त्यांचा मूड कसाही असला तरी, किस झाडकी पत्तीच वाटणार! म्हणूनच मी खात्रीपूर्वक असा शब्द माझा मूड चांगला लागल्याने वापरला. असो!

ह्या मूड शब्दाला निदान आपल्या मराठी भाषेत तरी कोणता पर्यायी शब्द आहे, हे जर मला लवकरात लवकर कळले (हे परत भाषातज्ञाच्या मूडवर अवलंबून बरं का) तर मी त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि माझ्या कोणत्याही मूड मधे हे असिधाराव्रत पूर्ण करण्याचे मी ठरवले आहे. मग ते करत असतांना समोरच्या माणसाचा मूड काय आहे हे मी कधीच ध्यानात घेणार नाही, याची माझी मलाच खात्री आहे! कारण कितीही झालं तरी मूड हा शब्द आपल्या मातृभाषेतला नाही, हे आपण आपला मूड कसाही असला तरी मान्य करालच कराल! तो आपण सर्वांनीच कुठून आणि कसा उचलला, आपल्या समृद्ध अभिजात मराठी भाषेत आणला आणि आपल्या कुठल्याही मूड मध्ये तो वापरण्या इतका, आपण आपल्या नकळत कसा प्रचलित केला, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरू शकेल! किंवा या मूड शब्दाचा आपल्या साहित्यात कुठल्या लेखक महाशयांनी, त्यांच्या कुठल्या मूड मध्ये प्रथम वापर केला, हा सुद्धा तुमच्या मूडला साजेसा नसला तरी, वरील संशोधनाचा उपप्रश्न ठरू शकतो यात दुमत असण्याचे कारण नाही आणि या अशा उपप्रश्नामुळे कुणाचा मूड बिघडेल असं मला अजिबात वाटत नाही.

माझ्या लिहिण्याच्या मूडमधे मी लिहीत गेलो आणि आपला मूड हे वाचत असतांना कसा होता आणि आता हे सगळे वाचून झाल्यावर कसा आहे, हे आपण मला, आपला मूड लागेल तेव्हा नक्कीच कळवाल, या आशादायक मूड मध्ये मी सध्या आहे, याची खात्री बाळगा!

आपल्या सर्वांचाच मूड (दुसरा पर्यायी शब्द कोणीतरी सांगे पर्यंत) काही ना काही कारणांनी कायमच चांगला राहो, हीच त्या विधात्याच्या चरणी (ज्याचा मूड कधीही बिघडत नाही असं काही भाविक म्हणतात) माझी मूडभरी प्रार्थना!

 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares