पण, कोलाहलातूनही कार्यसिद्धीची किमया करणारा हा देश आहे, हे त्यांच्या पचनीच पडत नाही.
आणि कार्यसिद्धीसाठी या १४० कोटी लोकांना, कुठल्यातरी एकाच, नेमून दिलेल्या संहितेप्रमाणे बोलावं-वागावं लागत नाही, ते कसं काय? .. हेच त्यांना जाम कळत नाही!
आपल्या यशामुळे ते धास्तावतात. कारण ते यश त्यांच्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे न वागता, त्यांच्या अनुमतीविना, आणि मदतीशिवाय आपण मिळवलेलं असतं!
आजवर अनेकांनी आपल्यावर राज्य केलं, पण आपल्याला कुणीच जिंकून घेऊ शकलं नाही.
आपण त्यांच्याशी जुळवून घेतलं, त्यांच्याकडून घेण्यासारखं सगळं आत्मसातही केलं.
आपण त्यापैकी कुणाचंही अनुकरण केलं नाही, आणि जुनं सगळं विसरलोही नाही.
आपण बदललो, पण आपलं अस्तित्व अबाधित ठेवलं.
आपल्यातल्या सर्व विरोधाभासांना झुगारून नव्हे, तर योग्यप्रकारे वापरून, आपण आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर, संकटांना टक्कर देत उभे राहिलो.
– – आणि नेमकं तेच त्यांना अस्वस्थ करतं!
आपलं यश साजरं करणं त्यांना जमत नाही, जमणारही नाही. कारण त्यांच्या दृष्टीने ते अघटित आहे!
असो.
मूळ इंग्रजी लेखिका : सौ. प्रियांका जोशी
स्वैर मराठी अनुवाद – कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
मो 9422870294
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
श्रीजोगेश्वरी ते मुलींचे भावेस्कूल प्रवास..
1ते 4 थी नूतन मराठी शाळेतलं बालपण संपलं खरं, पण आता पुढचा प्रवास म्हणजे वनवास वाटायला लागला. कारण हायस्कूलची पदवी घेण्याकरिता नव्या मोठ्या हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. प्रायमरीचा विरह जाणवायला लागला आणि हायस्कूलचा दाह वाटायला लागला. पण निर्णय शेवटी आईनानांच्याचं हातात होता. काही मैत्रिणी अहिल्यादेवीत पळाल्या तर कुणी हुजूरपागा गांठली. मला मात्र ति. नानांचा हात धरून मुलींचं भावेस्कूल अगदी रडत खडत पकडावं लागलं. रडकुंडीला येऊन शाळेचा रस्ता ओलांडताना मी वडिलांना म्हणाले, “नाना माझ्या मैत्रिणीच्या शाळेत जाऊ द्या ना मला! बुधवार पेठ कुठे, आणि ही सदाशिव पेठ कुठे चालत जायचा कंटाळा येतोय हो मला,! कां घातलतं तुम्हीं मला या शाळेतं? सांगा ना! कां नेताय तुम्ही मला या लांबच्या हायस्कूलला? ” माझं दप्तर सांवरत माझे डोळे पुसतं भावेस्कुलला शिक्षक असलेले माझे वडील, मला परिस्थितीची चालता चालता जाणीव करून देत होते, आहे ती परिस्थिती स्विकारून इतरांशी तुलना न करता परिस्थितीशी हात मिळवणी करण्याचा पहिला धडा लहान वयातच नानांनी मला दिला. घरी वडील आणि शाळेत गुरु झालेल्या माझ्या वडिलांनी शिक्षणाची दिक्षा मला दिली, आणि मी, पाचवीच्या वर्गाची पायरी चढले नाना म्हणाले होते, “अगं इतर शाळांची फी खूप आहे, ही शाळा मी येथे शिक्षक असल्याने खूप लांब असली तरी तुला फ्रीशिप मध्ये आहे. मलाही तुला कॅम्प मधल्या मोठ्या शाळेत घालावसं वाटतय पण –परिस्थिती! माझ्या तुटपुंज्या पगारात, दहा तोंड खाणाऱ्या संसारात माझी मजबुरी आहे ग बाळा! वडिलांचे हे बोलणं ऐकून माझे डोळे भरून आले. नानांना इतकं अगतिक झालेलं मी कधीच पाह्यलं नव्हतं आणि मग माझ्या लक्षात आलं, नाना शाळेत रोज पायी चालत जायचे ह्याच कारण, बसला पुरेसे पैसेच नसायचे. आणि मग त्यानंतर मात्र आमचा दिनक्रम ठरला. लांबलेला रस्ता जवळचा वाटावा म्हणून माझे वडील मला पुण्याच्या परिसरांतील माहिती सांगायचे. शाळेत पुस्तकातलेज्ञानाचे धडे आणि चालतांना चालण्याच्या व्यायामाचे संस्कार नानांनी माझ्यावर वयाच्या 10 व्या वर्षीच बिंबवले. बुधवारातून सदाशिव पेठेपर्यंतची आमची पदयात्रा, जुन्या नव्या पुण्याचा इतिहास ऐकण्यात केव्हां संपायची ते मला कळायचंच नाही. नानांनी सुरुवात केली ती सदाशिव पेठेपासून. ते म्हणाले, “आपण पर्वतीला जातांना भिकार दास मारुतीला गेलो होतो ना, आठवतय कां तुला? ” अय्या! खरंच कीहो नाना, किती छान मंदिर आहे ते! तिथे गणपती आहे मारुती आहे आणि नाना ती साधू बुवांची मूर्ती कसली आहे हो? आणि नाना, एक सांगा ना मला, असं काय नांव आहे हो त्या देवळाचं? काय तर म्हणे भिकारदास मारुती” माझा धबधबा थांबवत नाना म्हणाले, “सांगतो सांगतो! सगळं काही सांगतो पण आधी तू रस्त्याच्या कडे कडेनी चाल बरं! कान माझ्याकडे आणि डोळे रस्त्याकडे ठेव. ती बघ समोरून गाडी येतीय. रहदारी वाढलीय. अगं! पूर्वी हा रस्ता इतका वाहता नव्हता ईथे बाग होती. ” “अय्या ईथे बाग? नाना सांगा ना मग ती बागेची गोष्ट” नानांची आणि माझी पावलं शाळेच्या वाटेवरून भराभर पळत होती वडिलांच्या रसाळ वाणीने सांगितलेल्या आठवणी मी कान देऊन ऐकतं होते. भिकारदास मारुतीचा इतिहास नानांनी पुढे चालू ठेवला, ” प्रथम तुला पडलेलं नावाचं कोडं आपण आधी सोडवूया भिकारदास सावकाराने ह्या मारुतीची स्थापना केली म्हणून, त्यांचं नांव या मंदिराला दिले गेले. पुण्यात खूप बागा बखळी आणि ‘आळ्या’ होत्या, तांबट आळी, बोहरी आळी अशी नांवे असलेल्या गल्ल्या होत्या. बागांची रेलचेल असलेलं पुणे हिरवाईने नटलेलं होतं. आणि हो! याचं श्रेय नानासाहेब पेशवे व नाना फडणीसांना आहे बरंका बाळा! प्रदूषण मुक्त, स्वच्छ मोकळी हवा, वाहनांचा तेव्हा इतका सुळसुळाट नव्हता. पक्षांच्या मंजूळ आवाजानी, भूपाळीने, काकड आरतीने, वासुदेवाच्या आगमनानी पुणं जागं व्हायचं. पुणेकरांची मंगल प्रभात शुभ प्रभात व्हायची. त्यांचा सकाळचा प्रत्येक क्षण मांगल्यानी उत्साहाने भारलेला असायचा. भरपूर फळा फुलांनी लगडलेल्या भागांमुळे त्यांचा उपास पौष्टिक, सात्विक, मधुर फळांनी सुटायचा. जोडीला दुधातूपाची रेलचेल होतीच. त्यामुळे तालमीत, लाल मातीत, तरुणाई मदमस्तीत कुस्त्यांचा सराव करायची. मध्येच माझी शंका डोकावली, ” नाना म्हणजे! तालीम म्हणजे गुरुजी तालीमच काहो? मानाच्या तिसऱ्या गणपतीत मान पटकावणारी गुरुजी तालीम म्हणजे हीच होती ना? “हो गं बाळे तीच ती गुरुजी तालीम. त्यावेळी जिम हा प्रकारच नव्हता. तेव्हां आरोग्याचं वरदान मिळून, कामचुकार तरुण रांगडे पैलवान गडी झाले होते. आरोग्याचा मंत्र साध्य केल्यामुळे त्यांना आयुष्याचा प्रत्येक क्षण, कुठलंही आव्हान न घेता आनंदाने जगता आलं” “पण नाना अहो तो भिकारदास नावाचा मारुती मागे पडला की हो! ” शाळा जवळ आली होती म्हणून मी गाडी रुळावर आणली. हो! नाहीतर कथा अर्धवटच राह्यली असती. ” नाना खळखळून हंसले, “अरेच्चा खरंच की! मध्येच आपण तालमीकडे वळलो नाही का? नाना सांगायला लागले, “तेव्हां भिकारदास बाग होती. सिंहगड रोडला तर बाग बंगलाच होता, तर नारायण पेठेत गोड खोबऱ्यासारख्या भरपूर गराच्या पेरूंनी बाग डंवरली होती. सदाशिवपेठेचं पहिलं खरं नांव होतं, नृसिंह बाग, तिथून शुक्रवारपेठेला सांधणारी नातू बाग होती. आणि कमळांचं मोठ्ठ तळ असलेली सारस बाग, आणि ती तर तू पाह्यली आहेसच ना? या दोन्ही बागांच्या मधोमध फळांनी लगडलेली छोटीशी बाग होती, तिचं नाव होतं भिकारदास बाग गप्पांचाओघआंवरता घ्यावालागला. कारण आम्ही भावेस्कूलच्या पटांगणात आलो होतो. बापरे! गणू शिंदे घंटे कडे चाललाय तो घंटा बडवायच्या आंत 5 वी तुकडी अ च्या वर्गात मला पळायला हवं. कारण नाना वेळेचे, शिस्तीचे भोक्ते होते दप्तर, डबा, शाळेची बाटली सांवरत मी धूम ठोकली. आणि माझे शिक्षक पडील टीचर्स रूम कडे वळले. आता मी नानांची लेक नव्हते तर शिस्तप्रिय शिक्षक वडिलांची विद्यार्थिनी होते. मंडळी असं होतं माझं ते बालपणातलं शालेय जीवन, आणि असं होतं, त्यावेळेचं हिरवाईने नटलेलं, फळा फुलांनी डंवरलेलं, सुंदर पुणं. पुण्याला प्रदूषण मुक्त करणाऱ्या त्या कर्तुत्ववान पेशवाईला माझा मानाचा मुजरा.
☆ सर्वशक्तिमान ? – अर्थात व्हाट्स अप – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
बळवंतराव दवाखान्यात आले तेच मुळी कण्हत, कुंथत, कमरेत वाकून आणि मान वाकडी करून.
कालपर्यंत एकदम ताठ कण्याने वावरणारे हे सत्तरीचे गृहस्थ, आज काय झालं ? कुठे धडपडले ?
मोठ्या कष्टाने, पाय ओढत, आत येऊन, बळवंतराव अलगदपणे खुर्चीवर बसले.
“काय झालं काका ?”
“Whats app झालं”
“म्हणजे ?”
“अहो, त्या व्हाट्स अपवर एक पोस्ट आली होती, ‘सर्वांगविमुक्तासनाची’… ते रोज दहा मिनिटे केले की पोट साफ राहते, कंबर, पोटदुखी थांबते म्हणे. वाचलं आणि आमच्या हिने काल सकाळी जबरदस्तीने मला करायला लावले. कसंबसं पद्मासन घातलं पण ते सोडवताच येईना. शेजारच्या मधूने आणि आमच्या चिरंजीवाने अर्धा तास खेचाखेची करून कशीबशी सुटका केली. पण आता कंबर, मान, गुडघे मांड्या भयंकर दुखतायत. एक पाऊल ही टाकणे अवघड झालय हो.”
– – काका अगदीच दीनवाणे झाले होते…
“सर्वांगविमुक्तासन म्हणे !सर्वांगाचा एक एक पार्ट विमुक्त झाल्यासारखे वाटतंय. “
.. मी सहानुभूतीने मान डोलावली.
*
“या व्हाट्सअपने उच्छाद मांडलाय नुसता. आजकाल कुणीही काहीही पोस्ट फॉरवर्ड करतो आणि आम्हीही विचार न करता एकमेकांवर त्याचे प्रयोग करीत बसतो. “
.+. पुन्हा दीर्घ निःश्वास !
मागे एक पोस्ट आली होती, “तीन पिंपळाची पाने आणि सहा कडूलिंबाची पाने यांचा एकत्र रस काढून रोज सकाळ संध्याकाळ घ्या. एक महिन्यात तुमचा मधुमेह पूर्ण बरा होईल…. “
.. सुनबाईने चिरंजीवांच्या डायबेटीसच्या सगळ्या गोळ्या बंद केल्या आणि महिनाभर तो रस त्याला पाजला. महिनाभर रोज बिचारा ओका-या काढत फिरत होता. महिन्यानंतर त्याची फास्टिंग शुगर आली पाचशे !!!!”
“अहो पण असलं काही करण्याआधी मला विचारायचं तरी…. “
“छे हो…. या व्हाट्स अप डॉक्टरपुढे सारे तुच्छ ! त्यात पुन्हा तिथे आयुर्वेदाचा दाखला असतो. “
*
“परवा आमच्या नातवाने पोस्ट वाचली.. कोकाकोला वापरून बाथरूम संडास स्वच्छ होतात.
फ्रीजमधून दोन लिटरची कोकची बाटली काढून लगेच प्रयोग करून हा मोकळा. “
.. यावर मी काय बोलणार ?
*
“साहेब हे तर काहीच नाही, सौ. ला कुणीतरी व्हाट्स अप केले. गुलाबजामसाठी मैदा आणि खवा मळताना त्यात पन्नास ग्रँम कोलगेट पेस्ट मिसळावी, जामुन खुमासदार होतात…. !
“आम्ही गुलाबजाम तोंडात घातला की ब्रश करीत असल्यासारखा तोंडाला फेस यायचा…. !”
“त्या गोडबोल्यांनी त्यांचा मोबाईल फेकून दिला म्हणे. ”
.. विषय बदलावा म्हणून मी म्हणालो.
“फेकून देतील नाहीतर काय करतील ?”
“म्हणजे ?
“गेल्या महिन्यात त्यांचा वाढदिवस होता. दुर्दैवाने त्याच पहाटे त्यांच्या पत्नीचं निधन झालं, वयही झालं होतं म्हणा…!”
“मग ?”
“त्यांना एका ग्रुप वरून मेसेज आला…
RIP and Happy birthday …!” – – कळपातील एका मेंढराने खड्ड्यात उडी मारली. बाकीच्यांनी काही विचार न करता पाठोपाठ उड्या मारल्या. RIP and HBD चा चाळीसाव्वा मेसेज आला तेव्हा वैतागून गोडबोल्यांनी फोनच फेकून दिला. “
* बळवंतरावांनी परत एक दीर्घ निःश्वास सोडला.
“गेल्या आठवड्यात मीही एक मेसेज आमच्या ग्रुपवर पाठवला, अगदी sarcastically! तोंडाचा चंबू करून ओssss असा दीर्घ आवाज काढा आणि डाव्या हातची पालथी मूठ दहा वेळा ओठांवर आपटा. मग दहावेळा उजव्या हाताची पालथी मूठ वापरा. डाव्या हाताचा उपयोग केल्यास सर्व शारीरिक व्याधींपासून एक महिन्यात सुटका होते आणि उजव्या हाताचा उपयोग केला तर घरात सुख समृद्धी येते.”
“वा, मस्त! छान टर उडवलीत…!”
“टर ????? अहो हा मेसेज व्हायरल झालाय. एका आठवड्यात दहा वेगवेगळ्या ग्रुप वरून मलाच परत आलाय. “
= सर्वशक्तिमान व्हाट्स अप की जय हो…. !!!! =
वरील संभाषण करमणूक करणारे वाटतं असले तरी सध्या घरोघरी हीच व्यथा आहे…!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
असह्य प्रसववेदनातून बाहेर पडल्यानंतर पहिला टाहो जेव्हा आईच्या कानावर पडतो ते त्रिभुवनाचे सौख्य जेव्हा आईच्या चेहऱ्यावर पसरते व ती त्या बाळाला पोटाशी धरते हे जगातील सर्वात सुंदर व प्रथम प्रेम आहे. मुळात प्रेमाची सुरुवातच इथून होते. ते बाळ म्हणजे तिचे सर्वस्व! त्याच्या बदल्यात त्याक्षणी तिला कोणी सप्तस्वर्ग जरी बहाल केले तरी ती ते लाथाडेल इतके दिव्य व जगातील सुंदर प्रेम हे आहे.
या प्रेम भावनेला आम्ही फार संकुचित करून टाकले आहे. प्रेम हे जमिनीत उगवून आकाशात पोहोचतं हे कुसुमाग्रजांनी आम्हाला सांगितलं म्हणजेच ते विश्वव्यापी आहे हे समजावलं. आणि ते व्यक्त करतांना कुणाचीही भीती बाळगायचं कारण नाही हे ही ठणकावून सांगितलं.
प्रेम हा शब्दच मुळी जगाचा व जगण्याचा पाया आहे. जीवनातून प्रेम हा शब्द वजा करताच खाली काहीच शिल्लक रहात नाही. सारेच निष्प्रभ होऊन जाते. केवळ एका या प्रेमभावनेवरच विश्व तरले आहे. जन्मत:च आई, वडील, भाऊ, बहिण, काका, काकू, मामा, मामी, आजी, आजोबा, शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी व या साऱ्यांनी मिळून बनलेला समाज व नंतर राष्ट्र इतक्या नात्यांशी आपण जोडले जातो व ही सारी नाती पायाभूत बनून त्या अनुषंगानेच आपण जगतो. यातील जी जी नाती दगा देतात तेव्हा तेव्हा आपण नाराज व प्रसंगी निराश होऊन त्याचा आपल्या जीवनावर प्रचंड परिणाम होतो.
एरव्ही तुम्ही देशावर किती प्रेम करता हा प्रश्न कुणी विचारला तर…पण, आता न बोलता साऱ्या भारतीयांनी एकमुखाने या पाच दिवसात त्याचे उत्तर दिले आहे की, आम्ही सारे एक आहोत व आम्ही आमच्या देशावर प्रचंड प्रेम करतो. या वेळी, एरव्ही कशा कशावरून भांडणाऱ्या आम्हाला देशापुढे कशाचीही आठवण येत नाही इतके आम्ही देशप्रेमाने भारावलेले असतो. ही प्रेमाची एक वेगळीच जातकुळी असते. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. समाजाशिवाय त्याला अस्तित्वच नसते.
या दोन उदात्त व महान प्रेमानंतर येते ते, शृंगारातील प्रेम. ती भावनाच मुळी इतकी लाजवाब इतकी सुंदर आहे की त्याला तोड नाही. प्रियकर प्रेयसी व पती पत्नी यांच्यात शृंगारच निर्माण झाला नाही, आकर्षणच निर्माण झाले नाही तर… ? अहो हा शृंगारच तर( परस्परांविषयी आकर्षण) नवनिर्माण, सृजन, माणसाची माणसापासून निर्माण होणारी साखळी निर्माण होण्याचे कारण आहे. या आकर्षणातून म्हणजेच बघा, प्रेमातूनच माणसाची निर्मिती, जन्म होतो. म्हणून मी म्हटले की ही प्रेमभावना हाच जगाचा पाया आहे.
पण, जन्माला घातलं नि प्रेम संपलं असं होत नाही. हे एकच प्रेम एवढे मजबूत असते की, त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व नात्यांना ते घट्ट बांधून ठेवते त्यानेच नाती बनतात, टिकतात व समाज निर्माण होऊन पर्यायाने राष्ट्र निर्माण होते. आणि अशा नात्यांबरोबरच दररोज आपल्या मनात राष्ट्रप्रेमही नकळत वाढीस लागते व वेळ येताच ते प्रकट होते.
प्रेम ही चघळण्याची थिल्लर भावना नाही तर ते फार सुंदर व पवित्र असे बंधन आहे न दिसणारे पण मनात कायम वास्तव्यात असणाऱ्या मायलेकरांच्या, पतीपत्नीच्या मनात वसणारे, ज्याला कुठल्याही पुराव्यांची गरज नाही व ते पुरावे दाखवताही येत नाहीत कारण ते मनाच्या खोल तळाशी सुप्त असतात. म्हणून रोज कुणीही म्हणत नाही माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण ते वाणीतून, कृतीतून, नजरेतून, देहबोलीतून सतत पाझरत असते व पाहणाऱ्याला ते न सांगता कळते.
प्रेम म्हणजे आकर्षणाबरोबर आत्म्याचे मिलन असते म्हणून त्यातून माणसासारखी अजोड कलाकृती निर्माण होते. प्रेम ही एक अद्वितीय भावना आहे जिचा आपण सर्व प्रकारच्या नात्यात फक्त आदर आणि आदरच केला पाहिजे कारण प्रेमाशिवाय जीवनच व्यर्थ आहे. म्हणून जिथे जिथे जीवन संपवण्याच्या घटना घडतात त्याच्या कारणांच्या मुळाशी तुम्ही गेलात तर माणसाच्या दु:ख्खाचे एकमेव कारण असते ते म्हणजे…. “ प्रेमाचा अभाव” बस्स…
☆ “माणुसकीचा खळाळता झरा…डॉ. जयंत नारळीकर” – लेखक : श्री भगवान दातार ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆
जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखदायक आहे. या थोर शास्त्रज्ञाला शतशः प्रणाम.
या महान शास्त्रज्ञाच्या मनातली माणुसकी दाखवून देणारी एक आठवण आज मनात पुन्हा प्रज्वलीत झाली.
(छायाचित्रे – डॉ. नारळीकर, मंगलाताई नारळीकर आणि संगीता खंडागळे)
६ मे २०१३ च्या साप्ताहिक सकाळमध्ये मी एक लेख लिहिला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या एका कामगाराच्या पत्नीने आपल्या हिंमतीवर धावपटू म्हणून कसं नाव कमावलं याची ती यशोगाथा होती. जिचं सगळं लहानपण आईच्यामागे खुरपणी करत धावण्यात गेलं अशा संगीता खंडागळे हिची ही कर्तृत्व गाथा होती.
– – शाळेचं तोंडहि न पाहिलेली व दिवसाला २ रुपये मजुरी मिळवणारी ही मुलगी लग्नानंतर पुण्यात आली. बोपोडीतल्या एका झोपडपट्टीसदृश वस्तीत तिचा संसार सुरु झाला. तिनेच सांगितलेल्या तिच्या कहाणीत नारळीकर दांपत्याच्या मनातला माणुसकीचा झरा मला ऐकायला मिळाला.
आपल्या जिद्दीवर तिनं अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धातली सुवर्णपदकं पटकावली होती.
पुण्यात एकदा तिनं मॅरेथॉन स्पर्धा पाहिली. मला असं पळता येईल का असा भाबडा प्रश्न तिनं तिच्या नव-याला विचारला. तेथून ती पळण्याच्या इर्ष्येने झपाटली गेली. त्यानंतर सुरु झाली तिची अखंड मेहनत.
साडी नेसणा-या व पायात स्लिपर घालणा-या संगीताताईंनी विद्यापीठाच्या ग्राऊंडवर पळण्याचा सराव सुरु केला. भल्या पहाटे ती पळायला जात असे. घरी लवकर परतण्याची घाई होती, कारण दोन छोट्या मुलांना घरी झोपवून ती पळायला यायची. दोन चार दिवस गेले. मुलं घरी उठून रडायला लागली. शेवटी मुलांना बरोबर घेऊन ती जायला लागली. एका झाडाखाली मुलांना बसवून ती त्यांच्या अवती भवती, तिथल्या तिथं धावायची. मुलं घाबरतील या भीतीनं तिला दूरवर जाता येत नव्हतं.
योगायोगाने एक दांपत्य तिथं रोज फिरायला येत असे. साडी वर खोचलेली ही बाई अनवाणी पायांनी तिथल्यातिथं धावत असल्याचं पाहून त्यांचं कुतुहल चाळवलं गेलं. त्यांनी तिची चौकशी केली. आम्ही तुझ्या मुलांकडे पाहतो, तू पाहिजे तेवढं लांब जात जा असं त्यांनी तिला सांगितलं आणि मग तो रोजचाच परिपाठ सुरु झाला. ते दांपत्य म्हणजे डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगलाताई.
थंडी वाढायला लागली. मुलांना इथं त्रास होईल. तेंव्हा तू त्यांना आमच्या घरीच सोडत जा असं त्या मॅडम संगीताला म्हणाल्या. संगीतालाही ते पटलं. मुलांना त्यांच्या घरी सोडून ती पळण्याचा सराव करायला लागली. त्या काळात दोघेहीजण त्या मुलांची काळजी घेत, त्यांचं खाणं पिणं बघत. मॅडमनी त्यातल्या थोरल्याला थोडं शिकवायलाही सुरुवात केली.
काही दिवस गेले. घरी टी. व्ही. वरच्या एका कार्यक्रमात संगीताने नारळीकरांना पाहिलं आणि ती चमकलीच. दुस-या दिवशी, तुम्ही डॉ. नारळीकर का?, असं तिने थेट डॉक्टरांनाच विचारलं. तेंव्हापासून या परिवाराशी तिचा स्नेह जडला. तिच्या मुलींच्या लग्नाला हे दांपत्य आवर्जून उपस्थित होतं.
मोठं मन म्हणजे आणखी वेगळं काय असतं ?
शाळा न शिकलेल्या, पहिली स्पर्धा बूट न घालता पळणा-या संगीताने पुढे देशोदेशीच्या स्पर्धेत भाग घेतला. अनेक पदकं पटकावली. ही सगळी कथा त्या लेखात मी लिहिली होती.
डॉ. नारळीकरांचे निधन झाल्याची बातमी ऐकून मला ती कहाणी आठवली.
माणुसकीचा एवढा खळाळता झरा ज्याच्या मनात वाहतो त्याला देव माणूसच म्हटलं पाहिजे!
1975 पूर्वी ज्यांनी एसएससी परीक्षा दिली ते अकरावीत होते त्याला मॅट्रिक ची परीक्षा असं म्हणत. ती परीक्षा अवघड पहिला तो एक टप्पा पार करणार विद्यार्थी त्यामुळे एसएससी परीक्षेला क्लास कुठला मिळाला? मार्क किती पडले? असले प्रश्न कोणीही विचारत नव्हते मॅट्रिक पास झालास, वा! वा! अभिनंदन!!! … कारण खरोखरच ते तितके अवघड होते. कॉपी प्रकरण अजिबातच नव्हते. शाळेचे मार्क हा विषयाच नव्हता, म्हणजे एकूण बाह्य परिस्थितीवर पास होण्यावर अजिबात अवलंबून नव्हते त्या विद्यार्थ्यांची स्वतःची गुणवत्ता असेल तरच विद्यार्थी पास होत असे. त्यामुळे मॅट्रिक पास झाला म्हणजे त्यांनी खूप काही मिळवले असे समजले जाई. लोक अभिनंदन करत… आई-वडील आनंदाने पेढे वाटत.. आईला तर अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटे, “झाला बाई पोरगा एकदाची मॅट्रिक”ही भावना. त्यानंतर कुठेतरी नोकरीही लागत असे. अगदी सरकारी सुद्धा. एसएससी म्हणजे अकरावीच्या वर्गात येईपर्यंत फारशा शिड्या त्या विद्यार्थ्याला लागत नव्हत्या स्वगुणावर पास होऊन त्याला पहिली ते अकरावी पर्यंतचा प्रवास करावा लागे. अगदी एखाद दुसऱ्या मार्काने कुठेतरी तो वर ढकलला जाई अन्यथा एक मार्काने सहावी सातवीत नापास झालेले विद्यार्थी मी पाहिले आहेत. मग एसएससी ला आल्यानंतर अभ्यासाची फार गंभीरता नव्हती पण एकदा घरातून सांगितले जाई यंदा मॅट्रिकला आहेस तू जबाबदारीने अभ्यास कर वेळ घालवू नकोस. उन्हाळ्यात कोणतेही वर्ग नव्हते. शाळा कोणताही जादा तास घेत नव्हत्या. शिकवण्या लावल्या जात नव्हत्या. मुलाने स्वतःच्या स्वतः अभ्यास करायचा. गाईड वगैरे फारसा प्रचार नव्हता पाठ्यपुस्तका शिवाय कुठला आधार नव्हता आणि शिक्षकांशिवाय दुसरे मार्गदर्शन नव्हते. एखाद्या घरातून यापूर्वी शिकलेली जर पिढी असेल तर कुणीतरी अडल्या नडल्या वेळी मार्गदर्शन करीत असे इतकेच. काही घरातून तर शिकणारी ती पहिलीच पिढी होती एसएससी ला आहे म्हणून आया काही वेगळं करत नसत घरात पाहुणेरावळ्यांचा सुकाळ असायचा मुलगा अकरावीचा आहे हो म्हणून कोणी येऊ नका असे कोणालाही सांगितले जात नव्हते. आया फरशा काम करत नसल्यामुळे(बाहेर जाऊन)रजा वगैरेचा प्रश्न नव्हता नाहीतर आजकाल मुलगा मुलगी दहावीला म्हणलं की आईची एक महिना रजा ठरलेली जणू काही बाईच अभ्यास करणार आहे असो आईचं काम एवढेच वेळेवरती जेवायला खायला. घरातला जो कोणी मोठा करता माणूस असे तो फक्त अभ्यासाला बसा किंवा काही कमतरता आहे का एवढे बघत असे. यापेक्षा पालक सभा वृत्तपत्रातून मार्गदर्शन ऑनलाईनच नव्हते त्यामुळे तो भागच नव्हता, बरे होते ते. त्यामुळे विद्यार्थ्याला येणारे अतिरिक्त टेन्शन अजिबात नव्हते मुळात घरातून कोणाच्याही अपेक्षा नव्हत्या आपलं दुकान चालवावं म्हणून त्याने तेच काहीतरी केले पाहिजे असंही काही नव्हतं त्यामुळे त्या वेळचे विद्यार्थी भयमुक्त आणि तणावमुक्त शिक्षण घेऊ शकले त्यामुळे ते सखोल असावेत. वर्षभर अशाप्रकारे विद्यार्थी नियमित अभ्यास करत असे एखादा विद्यार्थी हुशार असेल विशेषतः संस्कृत मध्ये तर शंकर शेठ शिष्यवृत्तीचे आकर्षण असायचे त्या विद्यार्थ्यावर शाळेत थोडे अधिक खटपट करीत असत 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला शंकर शेठ स्कॉलरशिप मिळत असे आणि आयुष्यभर तो विद्यार्थी हा शंकरशेठ मिळवणारा बर का… म्हणून मिरवत असे आता संस्कृत आज शंभर पैकी 100 मार्क मिळवणारे अनेक विद्यार्थी मी पाहिले आणि मला शंका निर्माण झाली की शिक्षकांनाच काही संस्कृत येते की नाही. या सगळ्या मध्ये आपल्या एका पिढीच्या रिझल्टच्या आठवणी फार रम्य आहेत
मॅट्रिक चा निकाल साधारण जूनच्या तोंडावरती लागत असे वर्तमानपत्राच्या प्रेस मध्ये हा निकाल आदल्या दिवशी छपाईसाठी येत होता पूर्वी पूर्ण नावाची छपाई होत होती अगदी सुरुवातीच्या काळाला पण त्यानंतर नंबर यायला लागले मग ज्यांची ओळख प्रेस मध्ये असेल ती मंडळी प्रेस च्या आजूबाजूच्या खिडक्यातून चिठ्ठ्या पाठवून पाठवून संध्याकाळपर्यंत रिझल्ट मिळ वित असत मग भल्या पहाटे वर्तमानपत्राला सायकलवरून एसएससी परीक्षेचा निकाल असे ओरडत जायचा वाड्यात घरात एसएससी ची मुलं असतील तर बरीच मंडळी जागी असायची मग तो पेपर विकत घ्यायचा आणि त्यामध्ये नंबर पाहणे सुरू… झालास का पास वगैरे एका मिनिटात 100 जण चौकशी करायची आणि एकदाचे नंबर समोर यायचा.. झालो पास म्हणून तो मुलगा ओरडायचा.. सगळ्या वाड्याला आनंद.. आई म्हणायची देवापुढे साखर ठेव बरं देवाजवळ दिवा लावून साखर ठेवली जायची पोरग पटापटा सगळ्या वाड्यातल्यांच्या पाया पडायचे दुसऱ्या दिवशी स्नान संध्या वगैरे सगळं आटोपून वडील आणि मुलगा पेढे आणायला पेढ्याच्या दुकानावर मग पेढे वाला विचारायचं का झाला वाटतं मुलगा मॅट्रिक? वडील अभिमानाने सांगायचे हो ना 50 टक्के मार्क पडले… अरे वा! छान!! असे म्हणत दुकानदार एखादा पेढा जास्त टाकायचा मग घरोघरी पेढे देण्याचा कार्यक्रम घरामध्ये त्या दिवशी काहीतरी गोड धोड केले जायचे मग दुसऱ्या दिवशी पासून मुलाच्या नोकरीचा किंवा कॉलेजचा शोध सुरू व्हायचा
मॅट्रिक परीक्षेच्या निकालात बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला एक किस्सा मला अजून आठवतो ते माझ्या नापासांच्या शाळेत मुलांशी गप्पा मारायला आले होते. त्यानी सांगितलेली हकीगत फारच रंजक आहे. ते म्हणाले, ” एसएससी चा निकाल लागणार ते आदल्या दिवशी पासून अंतःकरणात धडधडत होती कारण गणित विषय मला नेहमीच अवघड जात होता त्यामुळे मी नापास होतो की काय अशी मला भीती वाटत होती पहाटे आईने मला दोन आणे देऊन पेपर आणायला पिटाळले पेपर विकत घेताना मला धडधडत होते पेपर उघडला त्यावर बलवंत मोरेश्वर पुरंदरे हे नाव वाचले आणि मला प्रचंड आनंद झाला छापून आलेले हे पहिले माझे नाव मी तडक घर गाठले घरातील सर्वांना पास झाल्याचे सांगितले आईला नमस्कार केला तिने एक रुपया ठेवला आणि सांगितले पेढे घेऊन ये मी पेढे घ्यायला जाताना गणिताचे पुस्तक एका पिशवीत गुंडाळून घेतले त्याला घट्ट दोरी बांधली आणि सायकलवर बसून खडकवासला गाठले तिथे जाऊन त्या बंडलला दोन-तीन दगड मांडले आणि ते पुस्तक पाण्यात फेकून टाकले पुन्हा याच्या वाटेला जाणार नाही. आणि मग तडक पेढे घेऊन घरी. गणिताचे सर्वात मोठे ओझे होते माझ्या डोक्यावरून उतरले होते बरे मुलांनो पुढे जरी गणित लागलं नाही तरी दहावी तो अभ्यास करावाच लागतो तेव्हा तुम्ही तो छान करा आणि उत्तम गुणांनी पास व्हा असा आशीर्वाद देतो “असे म्हणून त्यांनी भाषण संपले जेव्हा जेव्हा एसएससी परीक्षेचा निकाल असतो त्या त्यावेळी मला बाबासाहेबांच्या या गोष्टीची आठवण येते.
काल परवा दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला बोर्डाचे पर्सेंटेज 92 टक्के च्या पुढे अनेक शाळांचे निकाल शंभर टक्के.. शंभर टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी.. सगळेच आकडे अचंबित करणारे होते त्या काळात 40-45% निकाल लागत असे 70 72% चा विद्यार्थी बोर्डात यायचा आता शंभर टक्केच अनेक विद्यार्थी.. हुशारी वाढली गुणवत्ता वाढले का परीक्षा सोपी झाली काहीच कळत नाही. 100 ही मार्काची मर्यादा आहे म्हणून नाहीतर किती मार्क विद्यार्थ्यांनी घेतले असते कोण जाणे एसएससी निकालानंतर शंभर टक्केवाल्या मुलांचे काय होते याचे आम्ही कधी मूल्यांकन केले नाही विद्यार्थी पुढे काही घडतात काय हे पाहिले नाही जे चाललंय ते चालू दे असं म्हणण्याची आपली पद्धत झाली आहे. परवा निकाल लागल्यानंतर माझ्याकडे शिकवणीला येणाऱ्या एका विद्यार्थिनीची तयारी मी अ ब क ड पासून करून घेत होते तिला एसएससीची काहीच पात्रता नव्हती हे मला ठाऊक त्यांच्या शाळेने तिचा फॉर्म भरला होत.. चार वर्षे शिक्षणाचा गॅप होता तिला काना मात्राचे एकही शब्द आजही लिहिता येत नाहीत. इंग्रजी गणित विज्ञान हे विषयआकलनाच्यापलीकडे… मराठी वाचता येत नाही अशी विद्यार्थिनी 42% गुणांनी पास झाली आहे आणि मी गेले चार वर्षे जिच्यावर खूप मेहनत घेऊन शिकवले प्रत्येक विषयाचे पाच पाच पेपर बसून सोडवून घेतले त्या मुलीला 58% मार्क पडले त्याचे मला खूप समाधान वाटले पण या 42% च्या मार्काने मात्र मी अजून शुद्धीवर नाही असे मला वाटते एसएससी बोर्ड कुणाला फसवत आहे यात आपण फसतो आहे हे जाणून सुद्धा गप्प असणारा कोणता वर्ग आहे पालक शिक्षक शाळा शिक्षण विभाग एसएससी बोर्ड यावरच खरे एक मोठा लेख तयार होईल आणि मी तो लिहिणार आहे असो.
पण आमच्या वेळच्या मॅट्रिकच्या आठवणी अर्थात 75 च्या आधी असणाऱ्या पिढीच्याआठवणी अत्यंत रम्य आहेत सुंदर आहेत एवढे मात्र खरे… आणि प्रत्येक एस एस सी परीक्षेच्या निकाला दिवशी ती रात्रीची जागरण ए मॅट्रिक परीक्षेचा निssकाल असे ओरडणारा वर्तमानपत्र वाला… कौतुकाने एक पेढा जास्त टाकणार स्वस्तिक पेढेवाला ही सगळी मंडळी डोळ्यासमोर येतात गुणवत्तेचा फक्त गुणवत्तेशी संबंध होता परिस्थितीशी नव्हता त्यामुळे कौतुकाच्या बातम्या फारशा येत नसत वाड्यातला पोरगा मॅट्रिक झाला तर सगळ्या वाड्याला आनंद त्या दिवशी तो हिरो असायचा निकालाची ती मजा आता नाही एवढे मात्र खरे काही वेळेला एखादा रिझल्ट चुकलेला असायचा.. मला आठवते तशी तार सुद्धा बोर्डाकडून येत असे आणि ती दुरुस्ती व्हायची एसएससी बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांनाही आदल्या दिवशी तार येत असे वृत्तपत्र वाले त्यांच्या मुलाखती घेत दुसऱ्या दिवशी फोटोसह पेपर मध्ये मुलाखत येत असे नापास झालेल्या मुलांना आई-वडील दिलासा द्यायचे अरे चुकलं असेल येईल कळेल दोन दिवसात.. पण हे फारदा घडत नव्हतं क्वचित असे होत असे त्यामुळे रडणाऱ्या पोरांना पोरींना आई-वडील समजूत घालत ‘अरे चुकीच्या दुरुस्तीमध्ये उद्या बघू आपण ‘. ती सुद्धा एक मजाच होती.
मॅट्रिकच्या परीक्षेच्या अनेक आठवणीत या लेखाच्या निमित्ताने 75 पूर्वी मॅट्रिक झालेल्या सगळ्यांना या आठवणीत पुन्हा एकदा रमता येईल आणि मग घरामध्ये आपल्याला ते सांगतील अरे आमच्या वेळच्या मॅट्रिक परीक्षेचा निकाल म्हणजे काय…. वगैरे वगैरे सांगा आणि जरा कंपल्सरी बसून ऐकायला पण लावा आनंद घ्या…!!
☆ माझी जडणघडण… आत्या – भाग – ४२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
आत्या
“नाना चौक, ग्रँड रोड, मुंबई. ” येथील ईश्वरदास मॅन्शन या सुखवस्तू लोकांच्या इमारतीत माझे आजोबा (आईचे वडील) राहत. मम्मी (आजी) संध्या, (मावस बहीण) आणि भाईंची बहीण असे चौघेजण त्या इमारतीतल्या ब्लॉक मध्ये पहिल्या मजल्यावर राहत. अतिशय शिस्तबद्ध, नीटनेटकं, आखीव चौकटीतलं त्यांचं आयुष्य होतं. या चौघांपैकी भाईंची बहीण म्हणजे आईची आत्या आणि सवयीने आम्ही सगळेच तिला आत्या म्हणत असू.. तिचं एक वेगळं व्यक्तिमत्व लहानपणापासून नकळत माझ्या मनावर ठसलेलं आहे. वास्तविक तिच्या आयुष्याचा पूर्वेतिहास मी कधी जाणून घेतलेला नाही. माझ्यापुरतं आणि खरं म्हणजे आम्हा सर्वच कुटुंबीयांपुरतं आत्याबद्दल जे माहीत होतं ते हेच की तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर भाईंनी तिचा भावाच्या मायेने आणि कर्तव्य बुद्धीने सांभाळ केला. तिला ते त्यांच्या घरी घेऊन आले. तेव्हापासून ती भाईंबरोबरच राहत होती.
आत्याला “वसंतप्रभा” नावाची एकुलती एक मुलगी होती. ती मात्र भाईंच्या घरी आत्याबरोबर कधी राहत असल्याचं स्मरत नाही शिवाय जेव्हापासून आत्याबद्दल माझ्या आठवणी आहेत त्यावेळी वसंतप्रभाचे लग्न झालेले होते आणि ती तिच्या पतीबरोबर सुखाने डोंबिवलीत संसार करत होती. मधून मधून ती तिच्या कमलिनी नावाच्या मुली बरोबर आत्याला भेटायला भाईंकडे येत असे. त्यावेळी आत्याच्या चेहऱ्यावरचा ओसंडून जाणारा आनंद मात्र मला आठवतो. नात आणि मुलगी भेटल्याचे समाधान तिच्या चर्येवर दिसायचं शिवाय माझी आई, मावशी आणि वसंतप्रभा यांच्यातलं बहिणी बहिणींचं नातंही तसं उल्लेखनीय होतं.
मी सात-आठ वर्षाची असताना मम्मी गेली. आजोबांचं आणि आजीचं विलक्षण प्रेमाचं नातं होतं. आजी गेल्यानंतर आजोबा खूपच एकाकी झाले. प्रचंड मानसिक पोकळीत ते जगत होते त्या वयात मला एवढी जाण नव्हती पण मम्मीचं आणि आत्याचं जे नणंद भावजयीचं नातं होतं ते काहीसं घर्षणयुक्तच होतं. आत्या असहाय्य, निराधार म्हणूनच भाईंनी तिच्या बाबतीतलं भावाचं नैतिक कर्तव्य सांभाळलं होतं आणि मम्मीनेही त्यांच्या या भावनेला दुःख पोहोचेल असं वर्तन कधीही केलं नाही पण कुठेतरी अंतस्थ तिची घुसमट होत असावी. त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर व्हायचा. खरं म्हणजे या मानसिक कोंडीचा ताप माझे आजोबाही सोसत असावेत पण भेगाळलेलं नातं कधी तुटलं नाही हे महत्त्वाचं. शिवाय चार भिंतींच्या पलीकडे हे पडसाद कधी गेले नाहीत. आजी-आजोबांचे घट्ट प्रेमळ नातं आणि भावाच्या संसारातलं आत्याचं समंजस! गृहीत धरलेल्या नात्याचं अस्तित्व याला मात्र कधी तडा गेला नाही. आजी असतानाही आणि ती गेल्यानंतरही.
आजी गेल्यानंतरची आत्या मला अधिक आठवते. एकट्या पडलेल्या भावाचा आधार म्हणून बहिणीच्या मायेने आजोबांची मनापासून काळजी घेणारी आत्या माझ्या मनात राहिलेली आहे. माझ्या मनातली आत्या वृद्धत्वाकडे झुकणारी होती. तिची राहणी अतिशय टापटीपीची होती. ती नेहमीच पांढरी फुलाफुलांचे प्रिंट असलेली, स्वच्छ नऊवारी लुगडी नेसायची. तिने तिच्या लुगड्यांना कधी इस्त्री केलेली मी पाहिली नाही तरीपण तिच्या साड्या अगदी व्यवस्थित घडी असलेल्या इस्त्री केल्यासारख्याच वाटायच्या. तिचा रंग गोरा, चमकदार होता. डोक्यावरचे केसही ती आवरून सावरून त्याचा घट्ट बुचडा बांधायची. मध्यम बांधायची आणि मध्यम उंचीची आत्या दिवसभर घरातली काम करूनही मला कधी विस्कटलेली, थकलेली वाटलीच नाही. जसे माझे आजोबा शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोक्ते होते तशीच आत्याही होती. ओंगळपणा, रेंगाळणं, कसंतरी उरकणं हे तिच्या स्वभावातच नव्हतं. आजोबा, संध्या आणि नंतरच्या काळात आणखी एका सदस्याची वाढ झाली होती आणि ती म्हणजे माझी मोठी बहीण ताई हिची. दर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आणि मावशीचा परिवार भाईंकडे राहायला जायचो. स्वयंपाकाचा सर्व भार आत्याच पेलायची. आम्ही मुलं मात्र खेळातच रमलेले असायचे. आई, मावशी तिच्या कामात हातभार लावायच्या पण मुख्य सूत्रधार आत्याच. विलक्षण चव होती तिच्या हाताला! तिच्या हातच्या एकेका पदार्थाची चव जिभेवर आजही रेंगाळते. इतकंच नव्हे तर, ” आजची तुझी शेंगांची आमटी अगदी आत्यासारखीच जमलीय” असं कोणी म्हटलं की १०० पैकी १०० मार्क मिळवल्याचा आनंद होतो. पदार्थ नुसता चविष्टच नाही तर त्याचे रंग, रूप, नेटकेपणा, आकर्षक मांडणी याबाबतीत आत्याचा हात कोणीच धरू शकणार नाही. इतके सारे पदार्थ ती एकाच वेळी बनवायची पण कधीही ओट्यावर पसारा नाही, वेडावाकडा भाज्या कापल्यानंतरचा कचरा नाही. मसाल्याच्या डब्यातले पदार्थही कधी एकमेकात मिसळले नाहीत. ज्यात शिजवले जायचं ते भांडंही कधी लडबडलेलं नसायचं. सगळं अगदी नीटनेटकं, स्वच्छ, चकचकीत. त्यावेळी आत्याच्या या सवयीचा धाकच वाटायचा. तिला मदत करावी की न करावी असाच प्रश्न पडायचा मला. कारण “राम! राम! राम! काय बाजार मांडून ठेवला आहे. ” असं म्हणून ती उगीच फटकारेल याचंच भय वाटायचं.
मे महिन्याच्या सुट्टीतला पापड लाटण्याचा एक मोठा कार्यक्रम आत्याबरोबरचा असायचा. अदल्या दिवशीच आत्या वर्षभर कपाटात सांभाळून ठेवलेली पोळपाट- लाटणी धुवून पुसून ठेवायची. आजोबांच्या घरातल्या, दिवाणखान्याला लागून असलेल्या ऐसपैस गॅलरीत जुन्या स्वच्छ साड्या अंथरायच्या, , चारी टोकांवर वजनं ठेवून द्यायची, पापडाचे पीठ बांधून कुटणं ओढणं आणि लाट्यांना तेलात घोळवून ठेवणं ही सगळी कामं आत्याच्या देखरेखी खालीच व्हायची. जराही इकडचे तिकडे झालेलं मला आठवतच नाही. लाटलेले पापड एखादी रांगोळी काढावी तशी ती एकसारखी रांगेत वाळत घालायची. हा पापडांचा कार्यक्रम तसा दोन-तीन दिवस चालायचा. रात्रीच्या जेवणात खिचडी बरोबर तो ताजा ओलसर तळलेला बुडबुडे आलेला कुरकुरीत पापड खायला काय मजा यायची! एकदा का उंच पत्र्याच्या कोठीत हे वाळलेले पापड व्यवस्थित भरले गेले की पापड मिशन संपायचं.
आज सगळं आठवून लिहितानाही मला खूप काही हरवून गेल्याची भावना सतावते. लहानपणी या घरातल्याच उपक्रमांनी आम्हाला खूप शिकवलं. एकत्र सामुदायिकपणे काम करण्याचा आनंद, मेहनत, चिकाटी आणि एक प्रकारचे स्वनिर्मितीचे समाधान काय असते हे अनुभवायला मिळाले. त्याचे महत्त्व त्यावेळी नसेल जाणवलं पण आज बाजारातून सारं काही रेडिमेड आणून रेखीव वेष्टनातून सोडवून, दिसण्यास आकर्षक असणाऱ्या पदार्थांना स्वाहा करताना त्यात हरवलेलं, कधीही न सापडणारं, ज्याला नावही देता येणार नाही असे काहीतरी मी शोधत राहते. त्यावेळी घरोघरी अशा रांधणाऱ्या, राबणाऱ्या गृहिणींमधली स्त्री आणि माझ्यात वास करणारी आजच्या आणि उद्याच्या मधली स्त्री यांना तुलनात्मक रीतीने जेव्हा मी पाहते ना तेव्हा आत्याचं कुठल्याही कामात मनापासून झोकून देणारं, शिस्तप्रिय आणि हसतमुख व्यक्तिमत्व मी विसरू शकत नाही. शिवाय याही पार्श्वभूमीवर आत्याचं एक वेगळं अस्तित्व होतं. भावाच्या संसारात राहूनही तिनं तिचं एक विश्व निर्माण केलं होतं. ती रसिक होती कलाकार होती. झाडं, पाना -फुलांची तिला मनस्वी आवड होती. गच्चीच्या एका कोपऱ्यात कुंड्यांमधून तिने अनेक झाडं लावली होती. जास्वंदी, गुलाब, मोगरा, तुळस झिपरी टेबल पामसारखी बरीच झाडं तिने लावली होती आणि त्या झाडांची निगा ती स्वतः राखत असे. त्यांना पाणी घालणं, माती कोरणं, आकार देणं सारं काही इतकं कलात्मकतेने ती करायची! कुठेही पाण्याचे, मातीचे वेडेवाकडे सांडलेले ओघळही दिसायचे नाहीत. रोज सकाळी अगदी अलगद गुलबक्षी, सदाफुली, तगरीची फुले तोडून देव्हार्यात पूजेसाठी ठेवायची. पूजा बहुतेक आजोबाच करायचे. कधी कधीच आत्या करायची. देवांना धुवून पुसून चंदन, गंध फुलं वाहून, उदबत्तीच्या वासात निरांजनाच्या मंद प्रकाशात देव्हारा कसा छान उजळायचा! आत्याची पूजाही कशी देखणी असायची, सुंदर असायची. सजलेल्या त्या देवांकडे पहातच रहावसं वाटायचं. कदाचित त्यावेळी पूजाअर्चा म्हणजे रिकामे उद्योग, एक काम असंच वाटायचं का? आज मात्र याही रिकाम्या उद्योगाचे अर्थ निराळे जाणवतात. चित्त एकाग्र करण्याचा तोच एक संस्कार नव्हता का? आणि कुठल्याही कामात सौंदर्याची जपणूक कशी करायची आणि का करायची याचाही एक वस्तूपाठ मनावर नकळतपणे बिंबवला गेला होता.
आमच्याशिवाय आत्याने स्वतःचा असा परिवार जमवला होता. खरं म्हणजे ईश्वरदास मॅन्शन मध्ये राहणारी सगळीच कुटुंबं आर्थिकदृष्ट्या भक्कम होती. अनेकजण उद्योग, व्यवसाय, सरकारी कामकाजात उच्च हुद्द्यावर होते. सर्वांचीच राहणी, उच्च, उंच आणि वेगळ्या दर्जाची होती पण अशाही माणसांच्या समूहात आत्याला रमाबेन, शहाबेन, लाठीबेनसारख्या जिवलग मैत्रिणी लाभल्या होत्या. त्या आत्याच्या चाहत्या आणि प्रशंसक होत्या. त्या अगदी प्रेमाने, आपुलकीने आत्याला भेटायला येत, गप्पा मारत. आत्या म्हणजे “विमलबाई पंढरीनाथ दिघे” अस्सल मराठी पण या गुजराती बायकांशी तिचे चांगलेच जमायचे. आत्या त्यांच्याशी फक्कड गुजराती भाषेत बोलायची तेव्हा खूपच मजा वाटायची. आत्याचे बेसन लाडू आणि रमाबेनचे ढोकळे एकमेकांच्या घरात आवडीने खाल्ले जायचे. शिवाय या मैत्रीतला एक महत्त्वाचा धागा म्हणजे आत्याची कलाकारी. आत्या अतिशय सुरेख बारीक धाग्यांचे, मणी लावलेले क्रोशाकाम केलेले बटवे सफाईदारपणे विणायची. आत्याचे बटवे साऱ्या बिल्डिंगमध्ये प्रसिद्ध होते. आत्याच्या या बटव्यांना मोठमोठी गिऱ्हाईकं रमाबेन, लाठीबेन आणून द्यायच्या. बटवे विकून आलेल्या पैशात ती तिचे वैयक्तिक खर्चही भागवू शकायची. त्याच पैशातून ती तिच्या मुलीसाठी नातीसाठी भेटी आणायची.
दुपारी आवर सावर झाली की ती मधल्या खोलीतल्या मोठ्या खिडकीजवळ कॉटवर बसून तिचं विणकाम उघडायची. मग्न होऊन एकचिताने विणकाम करणारी आत्या आजही माझ्या नजरेसमोर आहे. ती क्रोशाची सुई, त्यावर घातलेले टाके आणि त्यातून धाग्यांची वीण उलगडवत जाणारी तिची गोरीपान काहीशी वक्र झालेली बोटं मला आजही दिसतात. विणकाम संपलं की ती स्वतःच्याच हाताने तिची मनगटं दाबायची. त्यावेळी नकळतपणे मी एका सक्षम, स्वावलंबी, सहनशील स्त्रीच्याच रूपात तिला पहायचे.
पाणी आणि प्रतिबिंब ही दोन्हीही नजरेला त्यांच्या अस्तित्वाप्रमाणे वेगवेगळी दिसतातच. भावाच्या आधाराने जीवनाचा डोंगर चढणाऱ्या आत्यालाही तिचं अस्तित्व होतं. स्वावलंबनाची सक्षम धार तिथे होती. आत्या निराधार असेल कदाचित पण ती लाचार कधीच नव्हती. तिच्या अंगच्या गुणांना तिने कधी पेटीत बंद करून ठेवले नाही. तिच्या कलाकारीला तिने छंद आणि व्यवसायाचे रूप दिले. तिने धाग्यांच्या, शिंपल्यांच्या, कवड्यांच्या अनेक बाहुल्या बनवल्या, कपडे शिवून कापूस भरून पक्षी, प्राणी, जलचर बनवले, झबली, स्वेटर, टोपरी, मोजे विणले, साड्यांना लावण्यासाठी सुंदर किनारी, सुती फुलं केली, नाना प्रकारची तोरणे ही बनवली. फॅशन शोसाठी उपयोगी पडणारी वस्त्रे तिने कुणाकुणासाठी शिवली या साऱ्यांची गणतीच नाही. आमच्या ज्ञाती वर्धापन दिनानिमित्त भरणाऱ्या कला प्रदर्शनात आत्याने अनेक बक्षीसंही मिळवली. व्यक्ती स्वातंत्र्य जपणार्या त्याकाळच्या स्त्रियांमध्ये मी आत्याला प्रातिनिधिक स्वरूपात पाहते. आज वाटतं आत्या नावाचा एक मूर्तीमंत कुटीरोद्योगच आमच्या आयुष्यात होता. खूप शिकलं, खूप पदव्या घेतल्या, खूप कीर्ती मिळवली, खूप माया जमवली, वर्तमानपत्रातून, स्क्रीनवर चमकलात म्हणजेच तुम्ही तारे झालात का? पण आमच्या आत्या सारखे फारसे न चमकलेले तारे कधी कधी आपल्या घरातच असतात. त्यासाठी वैज्ञानिक दुर्बिणीची गरज नसते. असे तारे पाहण्यासाठी मनाचीच दुर्बीण करावी लागते….
वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी सेवासदन शाळेमध्ये कार्यरत होते. साधारण जून महिन्याच्या आसपास एक मध्यमवयीन महिला माझ्याकडे आली आणि म्हणाल्या, ‘‘बाई, माझा मुलगा आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो दोन महिन्यांपूर्वी वारला. ” मला जरा धक्काच बसला. कारण मुलगा अगदी तरुण होता… २३-२४ वर्षांचा. त्या बाई पुढे म्हणाल्या, ‘‘त्याची बायको वीस वर्षाची आहे. तिचे काय करावे मला समजत नाही. ”
मी म्हटलं, ‘‘किती शिकली आहे? ”…
त्या म्हणाल्या, ‘‘आठवी नापास झालीय. कारण घरामध्ये सावत्र आईचा त्रास असल्यामुळे शाळेत जाऊ शकत नव्हती. मग भावाची मुलगी म्हणून मी माझ्या मुलाला करून घेतली. पण दुर्दैवाने एका वर्षातच हे असे घडले. पोरगी देखणी आहे. वयाने लहान आहे. मी कामाला जाते. घरात माझा दुसरा तरूण मुलगा आहे. म्हणजे तिचा दीर आहे. मला काही सुचत नाही. मी काय करू? ”… मी म्हणाले, ‘‘बाई, शिकवा मुलीला. शिक्षण द्या. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. धुणेभांडे करण्यासाठी ही मुलगी गेली तर तिच्यावर अनेक आपत्ती येऊ शकतात”…
मुलगी खरोखरच दिसायला खूप सुंदर होती. गोरा पान रंग. बोलके डोळे… लांब केस… छान उंची, बांधा. हे सगळं सौंदर्य आता बाधक ठरणार होते. मी म्हणाले, ‘‘हिला शिकवा. ” त्या म्हणाल्या, ‘‘आता कुठे शाळेत पाठवणार? ”… मी म्हणाले, ‘‘माझ्या शाळेत पाठवा. नापास मुलांच्या… तिथे तिला आपण दहावी करून घेऊ आणि मग पुढचा मार्ग हुडकूया”… त्यावेळेला आठ हजार रुपये फी होती. मी त्यांना सांगितले की ८,०००/- रुपये फी भरावी लागेल. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. ”
मी म्हणाले, ‘‘फुकट शिक्षणाची किंमत नसते. मी तुम्हाला एक मार्ग सुचवते”… त्यावेळेला माझ्याकडे बालवाडीला सेविका हवीच होती. मी त्यांना एक मार्ग सांगितला की, ‘‘सकाळी ८ ते ११ पर्यंत बालवाडीला सेविका म्हणून तिने काम करावे. साडेअकराला शाळेत बसावे. साडेपाचला शाळा सुटते. जाताना परत साफसफाई करून तिने घरी जावे. मी तिला महिना पाचशे रुपये देईन आणि हे पाचशे रुपये फी म्हणून कट केले जातील. याप्रमाणे तिची जी काही रक्कम होईल त्यामध्ये मी थोडीशी भर घालून तिची शाळेची फी भरेन. फॉर्म फी मात्र तुम्हाला भरावीच लागेल. ”
त्यांना ते पटलं. पण आठवी नापास झालेली मुलगी चार वर्षानंतर दहावी पास होईल याबद्दल मात्र त्या साशंक होत्या. मी त्यांना दिलासा दिला, ‘‘ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही काळजी करू नका. ” त्या म्हणाल्या, ‘‘तुमच्या पदरात लेक म्हणून टाकते आहे. तुम्ही सांभाळा. ” मी म्हणाले, ‘‘हरकत नाही. आता ती माझी जबाबदारी आहे. ” याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली.
मुलगी हुशार होती. कामाला चपळ होती. एकही दिवस शाळा बुडवायची नाही ठरलेलं होतं. त्यामुळे शाळेला सुट्टी नाही. काम उत्तम व नेटके करत होती. अभ्यासाची गोडी वाढली. आमच्या अनेक शिक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मुळात ती संस्थेत रमली. थोडा वेळ मिळाला तरी अभ्यास करत बसायची. परिस्थितीची जाणीव तिला उत्तम झाली होती. या पद्धतीने तिचा अभ्यास सुरू झाला. पहिल्या चाचणीत तिला उत्तम गुण पडले. तिचा उत्साह वाढला. मुलगी खरंच हुशार होती, पण खेडेगावात संधी मिळाली नव्हती.
हे सगळं ठरत असताना त्या बाईंनी मला सांगितले होते की हिच्या नवऱ्याचे दरमहा मासिक घातलं जाते. त्या दिवशी मात्र तिला दुपारच्या शाळेसाठी दोन तासाची सुट्टी द्यावी. आणि ते कार्य दुपारी बाराला असते. याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या मासिक घालण्याच्या दिवशी ती फक्त दोन तास उशिरा येत असे. तिला पाहिल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळहळ असायची… तिला काहीच कळत नव्हते. संसार म्हणजे काय हे कळण्यापूर्वीच तिच्यावर हा घाला झाला होता. त्यामुळे सगळेजण तिच्याशी प्रेमाने वागत होते आणि त्या प्रेमाच्या ताकतीनेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
साधारण डिसेंबर महिन्यात तिची सासू माझ्याकडे आली जी तिची आत्या होती. ती म्हणाली, ‘‘बाई एक विचार तुमच्याशी बोलायचाय”… मी म्हणाले, ‘‘बोला. ” त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलाची एक लाखाची पॉलिसी होती. ती हिच्या नावावर केलेली आहे. पण एवढ्याने तिचे आयुष्य संपणार नाही. तेंव्हा तिचे दुसरे लग्न करण्याचा आम्ही विचार केला. पण अन्य कुठला मुलगा बघून द्यावा तर पुन्हा त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर पोरगी घरी येईल. काही झालं तरी भावाची मुलगी आहे हो, म्हणून”… ‘‘अगदी खरे आहे. ” मी म्हणाले, ‘‘मग काय विचार केलात? ”
त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या धाकट्या मुलाला तिला करून घ्यावी म्हणते”… खरंतर मला तिच्या या विचाराचे कौतुकच वाटले होते. पण तरीही आईच्या सावधपणाने मी त्यांना म्हंटलं, ‘‘का एक लाख रुपये आपल्या घरात राहावेत आणि तुमच्या थोड्याशा अपंग असलेल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी हा हेतू ठेवून हे लग्न करताय का? ” त्या म्हणाल्या, ‘‘नाही हो बाई. पोरीला सावत्र आई आहे. बाप कुठवर बघणार. माझ्या घरात तरी काय वेगळं आहे. माझा नवरा आजारी. पोरगा अपंग. ”
लहानपणी झाडावरून पडून एक हात आणि एक पाय याच्यामध्ये थोडंसं अपंगत्व आलं होतं त्या मुलाला. बाकी मुलगा चांगला होता. निर्व्यसनी होता. एका दुकानात काम करत होता. बाईचं स्वतःचं घर अगदी भर पेठेत होतं. जुन्या चाळीत रहात असलेल्या घरालाच मालकाने त्यांना मालकी हक्क दिले होते. त्यामुळे दोन खोल्यांचं छप्पर डोक्यावर होतं. बहिणीचा शेतीतला वाटा म्हणून भाऊ शेताचा माल आणून टाकत होता. आता मुलीचा वाटा म्हणूनही थोडे अधिक देऊ शकला असता. या सर्व दृष्टीने विचार करता ‘अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता’ या सगळ्याच बाबतीत स्थळ वरचढ होतेच. मी म्हंटलं, ‘‘मुलीच्या वडिलांना बोलावून घ्या. ”
आमच्या संस्थेत ते मला भेटायला आले. बरोबर त्यांच्या नात्यातली चार माणसंही आली. बोला-चाली झाल्या. लग्न ठरले. पण मी त्यांना एकच अट घातली की, ‘लग्न रविवारी करायचं. मुलगी शाळा बुडवणार नाही. ’ एका दिवसात फार खर्च न करता देवळात लग्न करायचे ठरले. त्यांच्या गावाकच्या त्यांच्या देवाच्या दारात जाऊन लग्न करायचे ठरले. मग मुलीलाही चार गोष्टी समजून सांगितल्या. अर्थात् हे सगळं तिला एकटीला बाजूला घेऊन समजून सांगितले. तिला विचारले, ‘‘हे तुला चालणार आहे का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्याच घरात राहणार आहेस. तुझी आणि तुझ्या नवऱ्याची बेडरूम जी होती, तीच तुझी आणि तुझ्या दिराची बेडरूम असणार आहे. त्याच घरात तुला वावरावयाचे आहे. हे सर्व तुला नव्याने जमवता येईल का? ”
तिची मानसिक तयारी चांगली झाली होती. ती म्हणाली, ‘‘हो. मी हे करेन. तो दिर सुद्धा चांगला आहे आणि सासू तर माझी आत्याच आहे आणि ती माझी आई पण आहे. ” तरीही ‘आई आणि बाई’ या नात्याने मी तिला दोन सूचना दिल्याच. मी तिला सांगितले, ‘‘तुझा पहिला नवरा हा तुझ्या या नवऱ्याचा भाऊ असला तरी, त्याच्याबद्दल कुठलीही गोष्ट त्याच्याशी बोलू नकोस. पुरुषांना हे आवडत नसते. त्याची थोडी पडती बाजू आहे म्हणून त्याने तुला स्वीकारले आहे. पण त्याचा अहंभाव दुखावेल असे, पहिल्या नवऱ्याबद्दलचे काहीही शब्द तू त्याच्याकडे बोलू नकोस. आठवणी सांगू नकोस. हे पथ्यं पाळ. म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल. ”
हे खरंतर खूप अवघड होते. पण तिला निभावणे भाग होते… झाले… मग काय? लग्न झाले… सोमवारी नवी नवरी आणि जावई पाया पडायला आले. शाळा सुरू झाली. जेमतेम दोन महिने राहिले होते परीक्षेला… त्यानंतर आमची अभ्यासिका, परीक्षा, सराव परीक्षा… हे सगळं पार पडलं. आणि मुलगी ७५% गुणांनी पास झाली…
मग पुढचा विचार सुरू झाला. तिच्या नवऱ्याला आणि सासूला मी बोलावून घेतले. आणि सांगितलं की, आता स्वत:च्या पायावर उभे राहील असेच काही शिक्षण तिला दिले पाहिजे. ते दोघेही माझ्या शब्द बाहेर नव्हते. लगेचच मी आमच्या इथे असलेल्या ‘मुळे हॉस्पिटल’ मधील नर्सिंग कोर्सला तिला प्रवेश घ्यायला सांगितला. गुण उत्तम असल्यामुळे तिला तीन वर्षांच्या नर्सिंग कोर्सला प्रवेश मिळाला.
‘आता या तीन वर्षाच्या कोर्समध्ये मूल होण्याचा अडथळा येता कामा नये याची दक्षता घ्या’… इतके मी त्यांना सांगितले. खरं तर इतक्या बारीक गोष्टी होत्या, पण काय करणार… इलाज नव्हता. त्यांनीही हे सगळं वेळोवेळी ऐकलं… अतिशय सद्भावनेने! त्यानंतर ती त्याही परीक्षेमध्ये अव्वल गुणाने पास झाली. लगेचच तिला तिची सासू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती, त्याच महिला डॉक्टरने तिला आपल्याकडे जॉईन करून घेतले. नोकरीतल्या सुरक्षिततेचा प्रश्न संपला.
नोकरी घराजवळच होती आणि मंडळी अत्यंत विश्वासू आणि खूप चांगली होती. आज ती तिथे उत्तम काम करीत आहे. दहा हजारहून चांगली प्राप्ती आहे. दोन गोंडस मुले झाली आहेत. संसार सुखाचा चालला आहे. स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण यापेक्षा काय वेगळे असेल…!
मी असा हात अनेकांना देण्याचे ठरवले, तरी श्रद्धा ठेवून यांच्याकडून आपले काही भले होईल अशा विश्वासाने काही चार गोष्टी ऐकल्या तर खूप चांगले घडू शकते याचे हे उदाहरण आहे. आज कधीतरी ती आपल्या मुलांना घेऊन माझ्या भेटीला येते. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि संसारामध्ये असलेले सुख-समाधान हे मला तिच्या चेहऱ्यावर वाचता येते व लक्षात येतं की, हे केवळ शिक्षणाने घडले आहे.
दहावी परीक्षा पास होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यानंतर तुम्हाला अनेक वाटा मिळू शकतात. ज्या वाटांवर तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल, अशा गोष्टी तुम्हाला सापडतात. लक्षात ठेवा शिक्षणाला पर्याय नसतो… न शिकता मोठी झालेली माणसंही आहेतच… पण ते वेगळे. शिक्षणाने येणारे सामंजस्य आणि विचार यांनी माणूस नुसता मोठा होत नाही, तर सुखी होतो. म्हणून माझे सगळ्यांना सांगणे आहे की शिका. आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना शिकायला प्रोत्साहन द्या. जमलं तर एखाद्याला लिहायला, वाचायला शिकवा आणि त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करा. शिक्षणाने माणूस स्वतःच्या आयुष्याचा काही वेगळा विचार करू शकतो आणि सक्षम होऊ शकतो याचे हे सुंदर उदाहरण आहे…!
मग काय? … करा सुरुवात… ‘जून’मध्ये एखाद्या मुलीला शाळेत घालण्यासाठी मदत करा. शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना शिक्षणाची गोडी लावा. त्याला प्रवाहात आणा. खरंच, इतके तरी आपण करू शकतो ना…!
जन्माला आलो तेव्हा पहिली पाच मिनिटे मी नागडा होतो, मला कुठले नावही नव्हते, जात आणि धर्मही नव्हता, मी कुठल्याही प्रकारचे पाप आणि पुण्यही केलेले नव्हते की कोणत्याही निष्ठुर कळपात नव्हतो. पण हे स्वातंत्र्य फक्त पहिले पाच मिनिटेच टिकले.
या पहिल्या पाच मिनिटांनंतर त्यांनी माझे नाव, राष्ट्रीयत्व, धर्म आणि जात ठरवले आणि माझ्या कपाळावर ठसठशीतपणे त्याचा शिक्का मारला. मग मी माझे आयुष्य अशा गोष्टींसाठी लढत आणि बचाव करत घालवालं ज्या मी कधी निवडल्या नव्हत्याच. पण नंतर नंतर मला त्यांची नशा चढली.
म्हणजे पाच मिनिटानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य गुलामीत आणि पारतंत्र्यात घालवलं. कारण देव, देश आणि धर्माच्या सळ्यांनी तयार केलेल्या सोन्याच्या पिंजऱ्यात त्यांनी मला कैद केले होते.
पण एका क्षणी मेंदू विचार करायला लागला आणि या कैदखान्याची जाणीव झाली. मग मी देव, देश आणि धर्मापेक्षा माणूस, माणुसकी आणि मानवतेला प्राधान्य देऊ लागलो. त्याबरोबर या सोन्याच्या पिंजऱ्याच्या सळया तटातट तुटू लागल्या आणि मी मुक्त झालो… खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो. सगळ्या मानव जातीकडे मी प्रेममय नजरेने पाहू लागलो. प्राणी, वनस्पती आणि आकाश माझे सगेसोयरे झाले. माझे मन आभाळमायेने दुथडी भरून वाहू लागले.
☆ प्रिय माउली☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
प्रिय माउली,
बा विठ्ठला,
देवा, तू असा आहेस ना? मनाने तू माउली आहेस आणि दिसतोस मात्र लेकरासाठी, कुटुंबासाठी उन्हांत राबलेल्या, उन्हानं रापलेल्या बापासारखा…
आमच्या सारख्या सामान्य जीवांना तुला नक्की कोणत्या नावाने हाक मारावी असा संभ्रम पडतो…
मी तुला माउलीच म्हणेन इथून पुढे…
खरं सांगू का?
प्रपंचातील कटकटींनी आम्ही पार वैतागून जातो, आम्हाला माहीत असते या सर्वांस आम्हीच किमान ५०% तरी जबाबदार आहोत. (खरेतर आम्ही १००% जबाबदार असतो, पण ती जबाबदारी घेण्या इतपत शहाणपण आणि सामर्थ्य आमच्या अंगी नाही रे…) पण सर्व दोष आम्ही तुला देतो, तुला माहित असते की लेकरू कावले आहे…, राग व्यक्त करायला त्याला माझ्या शिवाय कोणी नाही, म्हणून तू सर्व शांतपणे ऐकून घेतोस…, देवा, अगदी मनातलं सांगतो, तुझ्यासारखे शांतपणे, एकाग्र चित्ताने ऐकून घेणारे कोणीही नाही रे या जगात…, तू आमचे गाऱ्हाणे ऐकून घेतोस ना, तिथेच आमचे ५०% दुःख निवळते… आणि बाकी राहिलेले दुःख वागविण्याची ताकद तुझ्या दर्शनाने मिळते…
तुला वाटेल, आज एकादशी आहे म्हणून हा बोलत असेल…
तसे नाही देवा, वरील विचार कायम आमच्या मनात असतो, पण आज तुझ्या घरी तुझे लाडके भक्त आले आहेत, साक्षात ज्ञानेश्वर माउली, तुकोबा, जनी, चोखोबा, नामदेव,… कित्ती जणांची नावे घेऊ…? खरी माहेर वाशीण घरी आली की घराच्या गड्याला ही गोडधोड खायला मिळते, एखादं वस्त्र मिळत, अगदीच काही मिळालं नाही तर मालकाचे चार प्रेमाचे शब्द मिळतात, आमच्या सारख्या सामान्य भक्ताला ते अमृता सारखे नाहीत काय?
देवा तुझ्या डोळ्यांत पाणी आले न? अरे या दोन गोड अमृत असलेल्या शब्दांसाठीच आम्ही वर्षभर आसुसलेले असतो…
देवा, अपार काळजी मागे सोडून तुझ्या दर्शनासाठी येतो, जे पायाने वारी करू शकत नाहीत, ते मनाने वारी करतात…
विठू माउली,
तुला सगळंच ठावे…, तरीपण तुझे कौतुक तुला आपल्या लेकरांकडून ऐकायचे असते, म्हणून माझ्या लेखणीतून तू ते लिहून घेतलेस ना…
तूच खरा खेळिया, आणि आम्ही तुझ्या हातातले खेळणे…
अरे हो, हिने तुझ्याकडे मागण्यासाठी मोठी यादी दिली होती… पण तू चंद्रभागेत स्नान करताना वाहून गेली… आता, घरी गेल्यावर मी तिला काय सांगू…?
अरे मी काही सुदामा नाही की तू मला सोन्याची नगरी भेट द्यावी…
एकच कर, माझी आणि माझ्या पत्नीची मागण्याची इच्छाच नष्ट कर…
हे तुला करायला आवडेल…
तुझ्या मनातलं बोललो ना…?
मी तुझेच लेकरू आहे, तुझ्या मनातलं थोडेसे मला कळणारच…