मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाहुणा ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पाहुणा ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

कुणी ना देखिला जगी,

श्वास कसा दिसतो |

चेतना असते जोवरी,

देहात तो वसतो |

*

शरीर एक नश्वर झोपडी,

श्वास राही त्यात पाहुणा |

पाहुणा जाता सोडून,

झोपडी निरर्थक म्हणा |

*

चोचले देहाचे चाले,

जोवर चालतो श्वास |

कोंडाता श्वास मात्र,

काळ घेतो त्याचा घास |

*

संसार सुखाचा थाटता,

येते प्रापंचिक जबाबदारी |

अखेरच्या श्वासापर्यंत,

सुटत नाही दुनियादारी |

*

कोणी रंक असो वा की राव,

विकत मिळेना त्यास श्वास |

जितकी आयुष्याची दोरी,

तितकाच इहलोकीचा प्रवास |

*

किती वर्ष जगला यापेक्षा,

कसा जगला यास अर्थ |

चौऱ्याऐंशी लक्ष योनी,

अन्यथा भ्रमण ते व्यर्थ |

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मूठ आणि माफी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मूठ आणि माफी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

राग येता पराभवाचा 

मूठ आपटे दाणकन

राजा चौसष्ट घरांचा 

बसे हरवून मग भान

*

भाव दिसती आश्चर्याचे 

गुकेशच्या चेहऱ्यावरती 

शांत संयमी “राजाची”

केली त्यानेच फजिती

*

सावध होऊन कार्लसन

माफी मागे गुकेशची 

करून हसत अभिनंदन 

पाठ थोपटे मग त्याची

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आताही जोडीने करू वारी… – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशीष ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आताही जोडीने करू वारी… – चित्र एक काव्ये दोन ? सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆

☆

सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

आयुष्यभर जोडीने केली

पंढरीची प्रत्येक वारी

अचानक मागे सोडून गेला

आभाळातील देवाघरी

*

 तुमच्या विना वारीला येणं 

 नकोनकोसं वाटत गेलं

 परंपरा माऊलीची ओढ

 म्हणून यायचंच ठरलं

*

 तुमच्याविना पाय निघेना

 तुळस वृंदावन घेतले डोई

 माऊली दर्शन घडवायला

 तुमचा फोटोच घेतला बाई

*

 चंद्रभागेत अंघोळ उरकली

 तुम्हाला अंघोळ घालते

 छातीशी घट्ट फोटो धरून

 जोडीने विठू दर्शन घेते…..

☆

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

☆☆☆☆

( २ )

श्री आशिष बिवलकर

☆

धन्य झाली चंद्रभागा,

घालून ऐसे पवित्र स्नान |

पुसल्या कुंकूवाचा,

माऊलीने राखला मान |

*

वैष्णवांचा सोहळा रंगला,

चंद्रभागेच्या वाळवंटी |

मन तृप्त होते,

सख्या पांडुरंगाच्या भेटी |

*

कारभाऱ्यासंगे करू लागली

कारभारीण पंढरीची वारी |

साथ जरी सुटली या जन्माची,

स्मृतींना घेऊन विठ्ठलाच्या दारी |

*

यापुढे तो जरी नाही संगतीला

शेवटपर्यंत वारी नाही चुकणार |

विठूराया तूझ्या दर्शनाला,

सोबत त्याला ती असाच आणणार |

*

कोणी म्हणा साधीभोळी,

कोणी म्हणा तिला आडाणी |

वेड्या मायेच्या स्नानाने,

पवित्र झाले चंद्रभागेचे पाणी |

*

सुखाचा संसार करतांना,

जीवापाड लावली तिने माया |

सांग रे पंढरीच्या नाथा,

असं पुण्य जाते का जन्मी वाया |

☆

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वैशाखात बहावा तू… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वैशाखात बहावा तू … ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

☆

चैत्र घेऊन रे आला तुझ्या सुवर्ण रुपाला 

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला 

*

पोपटल्या पानामध्ये किरमीजी रे फुलोरा

नववधू भासतो रे हळदुला तुझा तोरा

राजवृक्ष म्हणती रे सोनवर्खिल्या तनाला 

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला 

*

कधी किरीट सोनेरी कधी वाटे कानडुला

तुझ्या संगती सजला चैत्रगौरीचा रे झुला 

पखरण झाडाखाली वसंत वैभव ल्याला

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला

*

किरणात कोवळ्याश्या तव् रुपाचा बहर 

सोन पिवळे झुंबर किती देखणे सुंदर

टपटप फुलवंती माझ्या खुलवते गाला

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला 

*

कर्णिकार झाला तू रे राम सीतेचा सांगाती 

आरग्वध, आरेवत, व्याधीवत तुझी ख्याती

सुवर्णक नी स्वर्णांग म्हणती तुझ्या वृक्षाला 

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला 

*

तुझ्या फुलमाळा मला शब्द सुर साथ देती

मंद सुगंधी झुळूक फुले कवेत रे घेती

गीत ओठावर येते संगीताचा नाद त्याला 

वैशाखात बहावा तू तेजपुंज किती झाला

☆

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दार… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दार… ?  सुश्री वर्षा बालगोपाल ☆

☆

दाराची व्याख्या कोणी केली आहे का

उघडे चांगले की बंद माहित कोणाला आहे का?

*

दार खिडकीचे बाहेरच्या जगाकडे पहायचे

दार घराचे संस्कृती रीती सांभाळण्याचे

दार पुस्तकाचे, ज्ञान भांडार जपण्याचे

दार तिजोरीचे धन संपत्ती साठवण्याचे||

*

दार गडाचे इतिहास शौर्य सांभाळण्याचे

दार गावाचे गाव सीमा दर्शवण्याचे

दार आभाळाचे अष्टॊप्रहर विविधतेचे

दार कर्तृत्वाचे योग्य दिशा, मार्ग गवसण्याचे||

*

दार जीवनाचे जन्म-मृत्यू नोंदवण्याचे

दार मंदिराचे अनादी अनंत देवास समीप पहाण्याचे

दार स्वर्ग-नरकाचे पाप – पुण्य हिशेबाचे

दार आपल्या नेत्राचे अंतरात्म्यास जागवून चांगले वाईट ठरवण्याचे||

*

कोणतेही असले दार तरी उघड्या दारात पारदर्शकता असते

बंद दार म्हणजे कुतूहल रहस्य औत्सुक्य त्यात वसते

म्हणूनच कोणतेही असू दे दार त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू

त्या दरवाजाचा असणारा प्रवास जाणून घेऊ||

☆

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कृपेचे आभाळ ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कृपेचे आभाळ ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

सुंदर लोभस | सखा पांडुरंग |

जीवनात संग | श्वासापरी ||१||

*

ललाटी शीतल | चंदनाचा टिळा |

शोभे हार गळा | तुळशीचा ||२||

*

सावळा विठ्ठल | कटेवरी कर | 

उभा वीटेवर | युगे युगे ||३||

*

मकर कुंडल | कर्ण झळकती |

तेज उधळती | दिव्यत्वाचे ||४||

*

सुवर्ण मुकुट | भव्य शिरावरी |

पंढरीत हरी | वैष्णवांचा ||५||

*

कुंतल कुरळे | सावळी ही काया |

हृदयात माया | माऊलीच्या ||६||

*

लेकरांचा करे | माऊली सांभाळ |

कृपेचे आभाळ | धरोनिया ||७||

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अंतर्मनीची प्रेरणा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “अंतर्मनीची प्रेरणा…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 ☆

पाषाण भेदूनी उगवता

आनंद गगनी न मावले

अंतर्मनीची नित्य प्रेरणा

जगण्याचे फूल झाले..!

*

वेदनेचे अनेक स्तर 

सुखाने झेलत जाता

किरणाने सोबत केली

आभाळाचे गाणे गाता 

*

निळ्याशार उंच गगनी

हिरवी सुंदरता झेपावी

पाहुनी कर्तुत्व भरारी 

धवल मेघही कौतुकी 

*

विनयतेने झुकते खाली 

फळ लगडता अंगोअंगी

निसर्गाची किमया न्यारी 

मित्रत्वाची अद्भुत कहाणी

*

असंख्य संकटे भोवती

हिरवे कोंब जपूनि मनी

स्वप्नं साकारु जीवनाचे

अंकुरा ध्येयाचे पाणी..!

☆

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ असाही रिंगण सोहळा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? असाही ‘रिंगण सोहळा’ ?  सुश्री नीलांबरी शिर्के ☆

☆

वारकऱ्यांच्या मार्गावरती

भक्तिमय रिंगण सोहळा

 गरीब श्रीमंत लहान मोठे

 रिंगणास या होती गोळा

*

गाड्यांचे चौकातील रिंगण

 पोटोबाचा असे सोहळा

प्रत्येकाची मंदिरे वेगळी

 प्रत्येकाचा रथ आगळा

*

ध्येय मंदिर गाठायाची

सगळ्यांना असते घाई

टाळ मृदुंगासम  रिंगणी

पें पें पों पों हाॅर्न गजर होई

*

विठ्ठल विठ्ठल ओठ बोलती

पोटोबांची  मस्तकी गणती

पोटोबासह विठू बोलतो

तालावरती भक्त नाचती

☆

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – हेच सगळ्यात मोठं अंतर  – AK ( काव्यानंद ) मराठे ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – हेच सगळ्यात मोठं अंतर  – AK ( काव्यानंद ) मराठे ? ☆ श्री सुहास सोहोनी ☆

☆

गरजच नाही सांगायची 

आत कोण बसले असतील 

शिस्तीत चपला काढणारे 

तत्वनिष्ठच फक्त दिसतील ll

*

बैठक असो,पंगत असो 

शिस्त त्यांची सुटत नाही 

भोंगळपणा,वेंधळेपणा 

मुळीच त्यांना पटत नाही ll

*

नियोजनाशिवाय काम 

कधीच ते करत नाहीत

किती लालूच दाखवा तरी

वाकडी वाट धरत नाहीत ll

*

दुष्काळ असो,पूर असो

सर्वात पुढे तेच असतात

ऊन,पाऊस,चिखल,वारा

त्यांना कुठे जाच वाटतात ?

*

कितीही संकटं आली तरी

नीतीधैर्य खचत नाही

देशद्रोह वा अपप्रचार

त्यांना मुळीच रुचत नाही ll

*

राष्ट्र सर्वतोपरी जयांना

कुटुंब,नाती सगळं नंतर

त्यांच्यात आणि इतरांच्यात

हेच सगळ्यात मोठं अंतर ll

*

नसानसात राष्ट्रभक्ती

घडतात मुशीत वेगळ्याच 

स्वयंसेवक वेगळेच असतात

सामान्यांहून सगळ्याच ll

☆

कवी : AK ( काव्यानंद ) मराठे

कुर्धे,पावस,रत्नागिरी

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ खुणावतो मज हळूच चाफा… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खुणावतो मज हळूच चाफा… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

☆

खुणावतो मज हळूच चाफा

अन् गुपित सांगतो काही 

माझ्यासम तू फुलत रहा ग

फुलत रहा लवलाही

*
फुलपाखरू जणू मजला वाटे 

भुईचंपक हा गोड 

धरणीवरती फुले उमलती 

गंधाची मजला ओढ 

*
देवासम हा श्वेतरंगी पण

वाटे मजला योगी 

देवचाफा कधी समाधीस्थ 

कधी वाटे रमता जोगी 

*

सोनवर्खिल्या रंगामधला

धुंद सुगंधी काया

मला भेटतो पानांमधूनी

अत्तर फाया द्याया

*
कवठी चाफा सुगंध देण्या 

ओंजळ भरुनी उमले 

संगतीत मी त्याच्या अविरत 

कवनांमध्ये रमले 

*
पानांमध्ये लपून बसतो 

हिरवा गंधित चाफा 

जरा शोधता किती फुले ती

दिसतो नुसता ताफा 

*

नागचाफा पिवळा चाफा 

तांबडा ही तो असतो

मनात माझ्या मोहिनी घाली

जिकडे तिकडे दिसतो

☆

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares