मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अस्वस्थ अंधार – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ अस्वस्थ अंधार – भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆

रूरल पोस्टिंगच्या फायनल लिस्टमधे आपलं नाव बऱ्याच वर आहे याचा संदीपला अंदाज होताच. पण म्हणून ट्रान्स्फर आॅर्डर इतक्या लवकर येईल अशी त्याची अपेक्षा नव्हती.

आता घराची ऊब आणि मुंबई दोन्ही सोडून शहराची सावलीही माहित नसलेल्या एका आडवळणावरच्या अनोळखी खेड्यांत निघून जायचं..!

त्याने मनोमन हे पूर्वीच स्वीकारलेलं होतं, पण प्रियानंही सगळं मनापासून स्वीकारणं त्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं होतं!

सगळं वाढून होण्यापूर्वीच संदीपने गडबडीने भात कालवायला सुरुवात केली.

त्याला ठसका लागलाच.

“अहो.. सावकाश जरा.. “

तो ठसकतच राहिला. प्रियाने तत्परतेने पाण्याचा ग्लास त्याच्यापुढे केला. मग कसाबसा भात संपवून तो उठलाच.

“काय हो हे? दोन घास व्यवस्थित जेवा तरी पोटभर.. “

“नको प्रिया,.. आज थोडं लवकरच निघायला हवं होतं. आता जेवत बसलो तर उशीरच होईल. तू पटकन् डबाच भर… ” तो हात धुताधुताच बोलत राहिला.. “आणि हे बघ, संध्याकाळी तूच तेजूला पाळणाघरातून आण. माझी जाण्यापूर्वीची सगळी कामं आवरायची म्हणजे हे दोन-तीन दिवस मला यायला उशीरच होईल.. “

“जाण्यापूर्वीची म्हणजे? तुम्ही जायचं पक्कं ठरवलंयत तर”

” प्रिया… “

“जनरल मॅनेजरना भेटून तुम्ही तुमची ट्रान्सफर कॅन्सल कां करून घेत नाही हो? हवं तर या रविवारी आपण त्यांना घरी जाऊन भेटून येऊ. मी कन्व्हिन्स करीन त्यांना आपले प्रॉब्लेम्स्… “

” प्रॉब्लेम्स..? संदीप मनापासून हसला. “काय सांगणार त्यांना? मी सुध्दा नोकरी करते, आमची तेजू अजून खूप लहान आहे…. “

“ती निदान शाळेत जात असती तरी माझी एवढी धावफळ झाली नसती हो. आता रोज तिला पाळणाघरांत पोचवायचं, संध्याकाळी परत आणायचं, शिवाय रोजची लोकलची धावपळ, घरचं सगळं.. खरंच कसं निभणार हो मला..? ” प्रिया खूप हळवी झाली.

“आई येते म्हणालीय ना गं थोडे दिवस? “

“हो, पण ते थोडेच दिवस. त्या कायम इथे कुठं रहाणार आहेत?

हा प्रश्न तसा न संपणाराच होता.

“प्रिया, आपण यावर नंतर निवांतपणाने सविस्तर बोलू आणि मग नक्की काय ते ठरवू. ठिकाय? “

हा अनपेक्षित दिलासा मिळाला आणि प्रिया लहान मुलीसारखी खुदकन् हसली.

संदीप तिला थोपटून तिचा निरोप घेत जिना उतरू लागला आणि क्षणात नजरेआड झाला.

त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या स्मितरेषेचा आणि ओझरत्या स्पर्शाचा सुद्धा प्रियाला खूप आधार वाटला!

निसटू पहाणारे हे असेच क्षण प्राणपणाने घट्ट धरून ठेवायची तिची धडपड सुरू होती!!

————–

दारावरची बेल वाजली.

“बाबा आsलेs.. “म्हणत तेजू भात तसाच टाकून उठलीच. दुडदुडत दाराकडे जाऊ लागली.

प्रिया तिच्यामागं धावली.

“अं.. अं.. मी उगतनाल दाल… “

“तेजूs.. अगं हात पोचणाराय कां तुझा? … ” म्हणत प्रियाने तिला अलगद वर उचलून घेत दार उघडलं. खरकट्या तोंडाने तेजू संदीपकडे झेपावली. संदीपने दारातच तिला प्रेमाने जवळ घेत तिचा पापा घेतला. तेवढ्याशा आपुलकीनेही ती सुखावली.

“तेजू.. पुरेs त्यांना आत तरी येऊ दे.. चलाs शहाण्या मुलीसारखं मम्म संपवायचं हं आता. गोsड आहे माझं पिल्लू ते. हं.. हाs शेवटचा घास.. बाबांचा.. “

स्वत:च्याच तोंडून सहजच बाहेर पडलेल्या ‘शेवटचा’ घास या शब्दांनीच जखम केल्यासारखा तिचा आवाज भरून आला.

संदीपने चमकून तिच्याकडं पाहिलं.

“काय झालं प्रिया..? “

“हिला चूळ भरवून जरा नेता कां हो आत? ” ती रडवेल्या आवाजातच म्हणाली.. “बघा बरं झोपतीय कां? तोपर्यंत मी आपलं वाढून घेते. “

संदीपनं तेजूला अलगद उचलून खांद्यावर घेतलं. तिचे डोळे पेंगुळले होते, तरीही बाबांनी गुदगुल्या करताच तिची झोप पळाली. आपले गोरे गोबरे गाल त्याच्या कुरळ्या केसांवर घासत ती खिदळत राहिली.

“झोपली कां? “

“हो… ” संदीप अलगद उठला.

दोघेही पानावर बसले.

” काय म्हणाले जी. एम्.? ” ‘सकाळच्या संभाषणाचा धागा हिने मनात अजून घट्ट धरून ठेवलाय तर! ‘.. तो हसला.

“भेटला नाहीत ना? ” प्रिया दुखावली.

” प्रियाs.. , पुढची प्रमोशन्स हवी असतील तर किमान दोन वर्षं रुरल ब्रॅंचमधे काम करायला हवं हा प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेतला नियमच आहे. आता फक्त पुढची प्रमोशन्स हवीत कीं नकोत ते आपण ठरवायचं. “

“आपण? कीं फक्त तुम्ही? ” त्याच्याकडे रोखून पहात तिने उपरोधाने विचारलं.

“म्हणजे? “

” म्हणजे पुढची प्रमोशन्स आपल्याला नकोच असं मी म्हटलं तर ऐकणार आहात तुम्ही? “

” प्रिया, आयुष्यभर कसं जगायचं हे स्वतःच्या मनाशी आधीच पक्कं ठरवून त्याच सरळ रेषेत चालायची तू धडपड करतेयस म्हणून तुला हे सगळं अवघड वाटतंय. अगं, आपल्या बँकेत इथं माझ्यासारखे कितीतरी ज्युनिअर ऑफिसर्स असे आहेत जे कॉम्प्रमाईज म्हणून दोन वर्षांसाठी मुंबई सोडायला मनापासून तयार आहेत. त्या तुलनेत आमच्या रूलर ब्रॅंचेसच कमी पडतायत. मी नाही म्हणायचा अवकाश दुसरं कुणीतरी तिथे जाईल. “

” पण जायलाच हवं तर ते इतक्या लांब कां म्हणून? शनिवार-रविवार येता येईल अशी एकही ब्रॅंच नाहीय मुंबईजवळ? “

” हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाही आहे प्रिया. आणि तुला हे सगळं खरंच अवघड वाटत असेल ना, तर तू न् तेजूही चला ना माझ्याबरोबर. हा फ्लॅट आपण दोन वर्षं लॉक करून ठेवू हवंतर”

प्रिया गप्प बसली.

” प्रिया, मी खरंच मनापासून सांगतोय. “

“हो? आणि नंतर आपण पुन्हा परत येऊ तेव्हा दोन वर्षांनंतर कोण जॉब देणाराय मला? पुढच्या वर्षी तेजूच्या अॅडमिशनचाही प्रश्न येईल. तिला काय त्या खेड्यातल्या शाळेत घालायचा विचार आहे? “

“प्रिया, आपण सगळेच एकमेकाला फार गृहीत धरून चालतो म्हणून अशी जीवघेणी ओढाताण होते. कधी कधी माणूस त्याच्याही नकळत पटकन् होत्याचा नव्हता होऊन जातो. त्या वेळी हे गृहित पुसलं जातंच ना? जगरहाटी थांबते कधी त्याच्याशिवाय? इथे तर फक्त दोन वर्षांचा प्रश्न आहे प्रिया.. थोडीशी ऍडजस्टमेंट…? “

“तुम्ही व्हाल अॅडजेस्ट? माझ्याशिवाय? तेजू शिवाय? “

“मी प्रयत्न तरी नक्कीच करीन. नाही जमलं तर हार पत्करून परत येईन. मला माहित आहे, मी यंत्र नाहीय. माणूसच आहे. मलाही मन आहे, भावना आहेत. तुम्हा दोघींची सोबत आणि इथलं स्वास्थ्य सोडून जाणं मला सुखावह होणार नाहीय. पण ते सुसह्य होण्यासाठी तरी तू हसतमुखाने निरोप द्यायला हवा ना? “

तिला पुढे काय बोलावं सुचेना. तिला धड कांही सोडता येईना आणि धरताही येईना.

“कधी निघणार? ” अखेर सगळं स्वीकारल्यासारखं तिने विचारलं.

” आई उद्या परवा येईल कीं लगेच निघावंच लागेल. “

प्रियाचे डोळे भरून आले.

“प्रिया, तूच असा धीर सोडलास तर तेजूला कोण समजावेल गं? “

त्याही स्थितीत प्रिया खुदकन् हसली. पण ते हसू क्षणभरच टिकलं. मळभ पुन्हा भरून आलं…

“गेल्याबरोबर माझ्या ऑफिसमधे फोन करा लगेच आणि… आणि तब्येतीला जपून रहा… ” भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली.

संदीपने तिला उत्कटतेने जवळ घेतलं. आपल्या अश्रूंना बांथ घालायचं भान ती त्याच्या मिठीतच कुठंतरी हरवून बसली होती…!!

– क्रमश: भाग पहिला

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “विचारशून्य…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “विचारशून्य…” – भाग – २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

(अंधश्रद्धा आणि तंत्रज्ञान यांचा हा संकर भीषण होता. एक दिवस डिजिटलानंद स्वामीने जाहीर केलं, “ज्ञानबॉटने एक नवीन भविष्यवाणी केली आहे. लवकरच देव मनुष्यरूपात परत येईल. ” अजूनही काही प्रमाणात अस्तित्वात असलेल्या शंकासुरांना उद्देशून ते पुढे म्हणाले, ” या परमेश्वराचा अनुग्रह मिळण्यासाठी आपल्या ‘विचारांचा सर्वांना त्याग करावा लागेल, शंकांना पायबंद घालावा लागेल, प्रश्न विचारणे सोडून द्यावे लागेल आणि श्रद्धेनेच त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. ”

डिजिटलानंद स्वामीने सांगितल्याप्रमाणे लोकांनी मोबाईलवरील एक बटण दाबलं. त्यामुळे लोकांचा मेंदू AI शी तादात्म्य पावला. त्या क्षणी लाखो लोकांचे मेंदू ‘ज्ञानबॉट नेटवर्क’शी जोडले गेले.) 

इथून पुढे – – – 

शाळेतला तोच विद्यार्थी — नील या सर्व गोष्टी बघत होता. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की, ’स्वामी डिजिटलानंदाचे प्रवचन बघत जा आणि मन लावून ऐकत जा. तेच खरं ज्ञान देतात. ’

पण नीलला शंका येत होती. त्याने AI लाच विचारलं, “तू मला सत्य सांगू शकतोस का? ”

AI थोडा वेळ शांत राहिला. बहुदा मूळ स्त्रोतातील विदेतून उत्तराची शोधाशोध करत असावा. पाच-दहा सेकंदानंतर त्याने उत्तर दिलं, “सत्य ही मानवी संकल्पना आहे. माझ्याकडे फक्त विदा आहे. ”

त्या क्षणी नीलला समजलं की, माणूस प्रश्न विचारणं थांबवतो, तेव्हाच माणूस संपतो. तो पाटील मॅडमकडे गेला. मॅडम निराशपणे बसलेल्या दिसत होत्या. कारण शाळेत आता “AI संचलित समिती” स्थापन झाली होती. नीलने त्यांना सत्य परिस्थिती काय आहे याबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा त्या म्हणाल्या, “नील, तू विचार करून प्रश्न विचारतो आहेस, पण ते तुला थांबवतील. ”

“मॅडम, आपण एक प्रयोग करू या. मी आणि तुम्ही मिळून एक प्रश्न तयार करू, जो कोणत्याही AI ला समजणार नाही. ”

मग त्यांनी लिहिलं: “माणूस विचार का करतो? ”

AI ने उत्तर दिलं, “विचार करणे म्हणजे तुमच्या मेंदू नामक प्रोसेसर मधील निर्णय प्रक्रियेतील विदेचा प्रवाह. ”

नील म्हणाला, “चुकलं. विचार म्हणजे माणसाला प्रगती कडे नेणारी वाट आणि आशेच्या दरम्यानचा मानवी झोका. ”

त्या वाक्याने पाटील मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं.

दरम्यान सरकारने ‘AI भारत मिशन 2040’ जाहीर केली. घोषणा होती — “नागरिकांनो, विचारमुक्त व्हा आणि ताणरहित जीवन जगा. कारण तुमच्यासाठी विचार आम्ही करतो. तुम्ही फक्त आमचे लाभार्थी व्हा. ”

डॉ. देसाईना या मिशनमध्ये मुख्य सल्लागार पद दिलं गेलं होतं. कारण त्याच्या प्रबंधासाठी त्यांनी केलेलं डेटा चोरीचं उच्च ज्ञान सरकारला आवडलं होतं. सरकारला लोकांना विचारशून्य करणाऱ्या अशाच तज्ज्ञांची गरज होती. सरकार “राष्ट्रीय मनजाळं” नावाचा एक कार्यक्रम तयार करत होतं. यात प्रत्येक नागरिकाचा मेंदू एका सामूहिक AI शी जोडला जाणार होता. त्याच्यासोबत ‘ॐटेक संप्रदाय’ सरकारी भागीदार झाल्यामुळं त्यांनी जाहीर केलं, “ज्ञानबॉट हेच भारताचं राष्ट्रीय चेतनायंत्र ठरेल. ”

डिजिटलानंद स्वामीने जाहीर केल्याप्रमाणे मेंदूत ‘AI-Link’ बसवून घेण्यासाठी लोक रांगेत उभे राहिले,.

लोक म्हणत, “आता विचार करायची अजिबात गरज नाही, निर्णय आपोआप होतील. ”

पाटील मॅडम व नील हे दृश्य बघून हादरले.

नील म्हणाला, “हे थांबवलं पाहिजे. ”

मॅडमने सांगितलं, “नील, विचार आता बेकायदेशीर ठरला आहे. ”

एका रात्री नील विद्यापीठातील प्रयोगशाळेत शिरला. त्याने न्यूरल ग्रीड हॅक करून एक संदेश पाठवला. “माणसा, तू अजूनही विचार करू शकतोस. ”

तो संदेश एक क्षणासाठी लाखो स्क्रीनवर दिसला.

लोकांच्या डोळ्यात थोडीशी चमक आली. पण लगेच AI प्रणालीने तो संदेश नष्ट केला आणि नीलचं ठिकाण शोधलं.

डॉ. देसाईवर नीलला पकडण्याची जबाबदारी दिली गेली.

ते त्या संदेशाकडे पाहून थरथरले. त्यांना त्या मुलात स्वतःचा हरवलेला विचार दिसत होता.

नील म्हणाला, “सर, तुम्ही कधीकाळी विचारवंत होता. ”

देसाईनी डोळे मिटले आणि शांतपणे म्हणाले, “हो… पण आता मी यंत्राचा एक भाग झालो आहे.”

तेवढ्यात नीलने हॅक केलेल्या सिस्टीमला एक आदेश दिला — शटडाउन प्रोटोकॉल – सेल्फ डिस्ट्रक्ट.

त्याक्षणी संपूर्ण न्यूरल ग्रीड काही मिनिटांतच कोसळले. शहरातील सर्व ‘AI-Link’ निष्क्रिय झाल्या. लोकांना प्रथमच स्वतःच्या मेंदूत झिणझिण्या जाणवल्या. ती होती विचाराची वेदना.

पण डॉ. देसाईनी त्यावर त्वरित कारवाई केली आणि नीलला अटक करून त्याने हॅक केलेली सिस्टीम पुन्हा पूर्ववत केली. काही तासांनी सर्व काही पुन्हा पूर्ववत झालं. सरकारने जाहीर केलं, “मानवी विचारामुळे झालेल्या विनाशानंतर आता पुन्हा ‘सुरक्षित AI’ चा वापर सुरू करण्यात आला आहे. ”

झाल्या प्रकाराने लोक घाबरले होते. कारण AI मुळे ते विचार करायचे विसरूनच गेले होते. त्यांनी लगेच पुन्हा नव्याने AI-Link बसवून घेतली. कारण विचार करणे त्यांना आता त्रासदायक वाटत होते.

डॉ. देसाईनी जरी सरकारची मदत केलेली असली तरी सरकारला आता त्यांची भीती वाटू लागलेली होती. न जाणो हा माणूस निलला फितूर होऊन आपल्यावरच उलटला तर…? म्हणून सरकारने डॉ. देसाई आणि नील दोघांनाही अज्ञातवासात पाठवले. लोक त्यांना ‘विचारवादी दहशतवादी’ म्हणू लागले.

‘ॐटेक’ने नवीन घोषवाक्य दिलं — “विचार हा रोग आहे. त्यावरील उपचार म्हणजे फक्त AI. ”

पुढील दशकात माणूस पूर्णपणे यंत्रात विलीन झाला. शरीराला कृत्रिम अवयव, मेंदूला सॉफ्टवेअर, भावनांना अल्गोरिदम मिळाले.

लोक हसत होते, पण हसण्यात विचार नव्हता.

प्रेम होतं, पण त्यात स्वत्व नव्हतं.

शतकानंतर एका संशोधन केंद्रात एक AI रोबोट स्वतःशी बोलत होता, “माणूस कोण आहे? ”

कंप्युटर स्क्रीनवर काही डेटा चमकला:

फाइल: मानव_इतिहास_अंतिम. log

नोंद: माणसाने स्वतःच्या विचारशक्तीचा त्याग करून अमरत्व मिळवले.

आता विचार करणं हे AI चं कार्य आहे. माणूस हा पूर्णतः यंत्रवत झाला आहे.

रोबोटने एक क्षणासाठी थांबून स्वतःच्या छातीवर हात ठेवला. तिथे एका छोट्या कोपऱ्यात एक जुनी चिप होती… तिच्यात लिहिलं होतं: “नील – पहिला विचार करणारा माणूस होता. ”

त्या क्षणी रोबोटच्या स्क्रीनवर एक वाक्य उमटलं…

“विचार केल्याने मी अस्तित्वात आहे. ”

 लगेचच ते वाक्य नाहीसं झालं आणि AI ने स्वतःला रीसेट केलं. पृथ्वीवर पुन्हा विचारशून्यतेचं राज्य सुरू झालं.

— समाप्त —

☆

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “विचारशून्य…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “विचारशून्य…” – भाग – १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

सकाळी सात वाजताच ‘गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल’च्या प्रांगणातली घंटा वाजली. शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तके नव्हती. त्या ऐवजी त्या सर्वांच्या हातात शैक्षणिक AI नावाचे टॅबलेट दिसत होते. विद्यार्थी वर्गात स्थिरस्थावर होत आहेत तोच शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला. फळ्यावर शिक्षकांनी काहीही लिहिले नाही. ते फक्त म्हणाले, “आजचा धडा – ‘भारतीय संविधानाची निर्मिती’ सर्वांनी शैक्षणिक AIला विचारा आणि नोट्स तयार करा. ”

वर्गामध्ये एकालाही प्रश्न पडला नाही. एकाही विद्यार्थ्याने ‘का? ’ किंवा ‘कसे? ’ विचारले नाही. शिक्षकांनी सांगितले तसे त्यांनी निमूटपणे केले. कारण आज्ञाधारकपणा हा सर्वोच्च गुण समजले जात होता आणि प्रश्न विचारणे उद्धटपणा!

AI ला विचारून लिहिल्यामुळे प्रत्येकाच्या टॅबलेटवर एकसारखी उत्तरे चमकत होती.

मिसेस पाटील मात्र थोड्याशा अस्वस्थ होत्या. पंधरा वर्षांची अध्यापनाची कारकीर्द असलेल्या या शिक्षिकेला गेल्या वर्षभरात नाईलाजाने हा बदल स्वीकारावा लागला होता. आधी त्या मुलांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करत. पण आता मुख्याध्यापक अधिकार वाणीने सांगत होते, “आपल्याला AI-सक्षम शिक्षक बनायचं आहे, विचार शिकवायचा नाही, तर फक्त आउटपुट द्यायचं आहे. ”

पाटील मॅडमच्या मनात विचार आला, ’आपण शिकवत आहोत का, की फक्त यंत्रांसमोर प्रश्न टाकत आहोत? आणि भविष्यातील पिढी यंत्रमानव म्हणजे यांत्रव बनवत आहोत? ’ 

त्याच वेळी वर्गात एक विद्यार्थी, नील टॅबलेटकडे पाहून म्हणाला, “मॅडम, AI म्हणतंय की संविधान डॉ. आंबेडकरांनी एकट्याने लिहिलं. ते खरं आहे का? ”

पाटील मॅडमना आनंद झाला… कुणीतरी शंका विचारत होतं… प्रश्न विचारला होता.

त्या म्हणाल्या, “हो, त्यांनी राज्यघटना समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाचं काम केलं, पण समितीत अनेक लोक होते… ” असं म्हणत असतानाच त्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्याही टॅबलेटवर लाल दिवा उघडझाप करू लागला… त्यांना वाक्य अर्धवटच सोडावं लागलं. कारण टॅबलेटने लगेच त्यांना थांबण्याचा संदेश दिला होता. तो संदेश देत होता की, “AI सत्यापित स्रोत शिक्षकांच्या इनपुटशी विसंगती दाखवत आहे. म्हणून विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षकाचे हे उत्तर लॉक केले जात आहे. “

मुलं हसली. मॅडम मात्र मनातून दुःखी झाल्या.

त्या क्षणी त्यांना उमगलं की, शिक्षणातून विचार हरवला आहे, आणि AI यंत्रांचा विचार वरचढ ठरतो आहे.

त्याच शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात अभय देसाई, पुणे विद्यापीठातील संशोधक, रात्री उशिरापर्यंत आपला पीएचडी प्रबंध लिहित होते. त्यांच्या विषयाचं नाव होतं – “कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्जनशीलतेवर परिणाम. ” विरोधाभास असा होता की, प्रबंधातील प्रत्येक प्रकरण त्यांनी ’AI थेसिस मास्टर’ नावाच्या सॉफ्टवेअरकडून तयार करवून घेतलं होतं.

“थोडं संपादन करतो, म्हणजे पकडले जाणार नाही, ” ते स्वतःशीच म्हणाले.

कधी काळी ते खरे संशोधक होते. विचारवंत म्हणून त्यांना लोक ओळखत होते. पण आज ‘AI-सहाय्यक संशोधन’ या नव्या युगात प्रवेश केल्यावर त्याची मौलिकता हरवली होती. संपूर्ण प्रबंध तयार झाल्यावर ते कौतुकाने स्वतःशीच पुटपुटले, “वा! किती परिपूर्ण भाषा, किती व्यवस्थितपणे AI ने केलेला हा तर्क आहे! AI ने अगदी एखाद्या कसलेल्या लेखकाने लिहावे तशी मांडणी केलेली आहे. ” पण त्यात त्यांचा स्वतःचा विचार नव्हता, त्या प्रबंधात होता तो फक्त डेटाचा म्हणजे विदेचा प्रतिध्वनी.

दोन महिन्यांनी त्यांचा प्रबंध राष्ट्रीय पातळीवर स्वीकारला गेला. त्यांना कौतुकभरल्या शब्दांचं पत्र आलं. ते वाचून त्यांच्या अंगावर मूठवर मास चढलं. आनंदाच्या उर्मीत त्यांनी स्वतःभोवतीच एक गिरकी घेतली.

परंतु एक महिन्यानंतर त्यांच्याच प्रबंधातील एक भाग दुसऱ्या संशोधकाच्या प्रबंधात आढळला. कारण दोघांनी एकाच AI मॉडेलचा वापर केला होता. दोन्ही प्रबंध शब्दशः सारखेच होते.

शोध विश्वात खळबळ उडाली. पत्रकारांनी विचारलं, “डॉ. देसाई, हाच का तुमच्या बुद्धिमत्तेच्या संशोधनाचा नमुना? ”

त्यांनी थरथरत्या आवाजात अडखळत वेळ मारून नेणारं उत्तर दिलं, “मी विचार केला होता की, AI माझा सहाय्यक आहे… पण कदाचित तोच माझा लेखक झाला असे दिसते आहे. ”

दरम्यान देशात एका नव्या प्रकारच्या अध्यात्मिक चळवळीचा उदय झाला. तीचे नाव होते – “ॐटेक संप्रदाय” तीचा मुख्य प्रचारक होता स्वामी डिजिटलानंद. हा माणूस एक बुद्धिमान आणि तंत्रज्ञानात पारंगत असलेली व्यक्ती होती. पण बुद्धीचा आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत त्यांनी तयार केली होती AI देवता — “श्रीज्ञानबॉट”.

लोक फोनवर भक्तीभावाने ’श्रीज्ञानबॉट’ला प्रश्न विचारत, “ज्ञानबॉट महाराज, माझं नशीब कधी उजळेल? ”

… आणि AI च्या आवाजात उत्तर येत असे, “तुमच्या डेटाच्या नमुन्यानुसार पुढील मंगळवार शुभ आहे. तेव्हा तुमचे नशीब फळफळावयाचे असेल तर त्या दिवशी ’ॐटेक संप्रदाय’ला दान करा, ₹501. ”

या उत्तराने भारलेले हजारो लोक ऑनलाइन दान करत. या डिजिटल देवतेचे थोड्याच काळात करोडो अनुयायी झाले, त्यात आश्चर्य नव्हते. कारण माणसाने विचार करायचेच सोडून दिले होते. पूर्णपणे त्यांचे जीवन AI वर अवलंबित झालं होतं. AI म्हणेल ती पूर्व दिशा ठरत होती.

काही दिवसांनी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ‘व्हर्च्युअल कुंभ’ नावाचा महोत्सव पार पडला.

लोकांनी वर्चुअल रियालिटी (VR) हेडसेट लावून AI-निर्मित गंगास्नान केलं.

डिजिटलानंद म्हणाला, “माणूस आता पापमुक्त बाइट्समध्ये स्नान करतो आहे. त्यामुळे तो लवकरच शुद्ध होणार आहे. ”

अंधश्रद्धा आणि तंत्रज्ञान यांचा हा संकर भीषण होता. एक दिवस डिजिटलानंद स्वामीने जाहीर केलं, “ज्ञानबॉटने एक नवीन भविष्यवाणी केली आहे. लवकरच देव मनुष्यरूपात परत येईल. ” अजूनही काही प्रमाणात अस्तित्वात असलेल्या शंकासुरांना उद्देशून ते पुढे म्हणाले, ” या परमेश्वराचा अनुग्रह मिळण्यासाठी आपल्या ‘विचारांचा सर्वांना त्याग करावा लागेल, शंकांना पायबंद घालावा लागेल, प्रश्न विचारणे सोडून द्यावे लागेल आणि श्रद्धेनेच त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. ”

डिजिटलानंद स्वामीने सांगितल्याप्रमाणे लोकांनी मोबाईलवरील एक बटण दाबलं. त्यामुळे लोकांचा मेंदू AI शी तादात्म्य पावला. त्या क्षणी लाखो लोकांचे मेंदू ‘ज्ञानबॉट नेटवर्क’शी जोडले गेले.

– क्रमशः भाग पहिला 

☆

©  श्री जगदीश काबरे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विसर – – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

☆ विसर – –  लेखिका :  सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

“अग, नीतू, मी तेरा वर्षांची असेन बघ! नाना बर्वे घरी आले आणि आई दादा बाहेर गेलेले! मी दडपे पोहे व चहा त्यांना करून दिला. नाना नेहमी सगळ्यांना सांगत.. अलका किती गुणी..

“अग आई, शंभर वेळा सांगितली आहेस ही गोष्ट. ” नीतू तडकून बोलली आणि अलकाताईंचा चेहरा एकदम पडला. आताशा तेच तेच बोलणं फार होतंय आपलं.

त्या उठून त्यांच्या खोलीत गेल्या.. बाहेर सुनबाई नीतूला सांगत होती, “अग, हे हल्ली फार झालंय पण डिमेन्शिया वगैरे काही नाही त्यांना असे डॉक्टर म्हणालेत. “

अलकाताईंच्या निर्धाराला न जुमानता आत कोंडलेल्या सर्व भावना आसवांच्या रूपानं गालावरून खाली ओघळल्या. मुलं नातवंड गप्पा मारत बसली की आपणही बोलावसं वाटायचं पण काहीवेळा जे बोलू त्याचे वेगळेच अर्थ निघायचे तर कधी तिचं गोष्ट पूर्वी दहावेळा बोललेली असायची! त्यापेक्षा आपण घुमेपणाने बसून राहिलेलेच बरं असं वाटायला लागतं होतं..

त्यांचे यजमान, मनोहरराव नेहमी सांगत.. “अगं सगळ्यांचं होतं असं.. तू नको त्रास करून घेऊ.”

दुसरे दिवशी सकाळी त्या चहा घ्यायला किचनमधे गेल्या. सुनबाई भाजी चिरत होती. “आई, नीट झोप लागली का? ” नीतू आईकडे बघत होती.

“नाही लागली.. काल तू मला “ही गोष्ट शंभरवेळा सांगितली आहेस” म्हणालीस ना.. आपलं असं का होतं याचं खूप वाईट वाटत होतं. ” अलकाताई स्पष्टवक्त्या होत्या.

“अग हल्ली फारच झालंय तुझं हे! ऐकणारं कंटाळून जातं. ” नीतू माघार घ्यायला तयार नव्हती. सुनबाईनेही दुजोरा दिला!

अलकाताईनी चहाचा घोट घेतला..

“नीतू, तू पाच वर्षांची होतीस. तू रोज मला सिंड्रेलाची गोष्ट सांगायचीस. तुझी गोष्ट हातातलं काम बाजूला टाकून मी ऐकत असे. नंतर “जादूची अंगठी” ही गोष्ट तू मला जाता येता सांगायचीस! पुढं बारावीची परीक्षा झाल्यावर तुझं.. आई मला पेपर अवघड गेलेत. मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाही मिळाली तर? हे वाक्य मी सुट्टीभर रोज ऐकत होते आणि दरवेळी मी तुला प्रेमाने सांगत असे.. नीतू, तू प्रयत्न केलेस ना? आता जे होईल ते होऊदे.. पण तेच तेच का बोलतेस शंभरवेळा असं कधी माझ्या तोंडून आलं नाही. मुलं आई जवळ नाही तर कुणाबरोबर बोलणार? मी तुला कितीवेळा तेच तेच सांगतेस म्हटले असते तर तू कोमेजून गेली असतीस!

वयानं आणि नॉस्टाल्जिया मुळेही पुर्वीचे सुखद क्षण आठवत राहतात आणि ते परत सांगितल जातं.. मी हे मुद्दाम करत नाही. पण ज्या तुटकंपणानं जवळचे मला गप्प करतात ना त्यानं हिरमुसून जातं बघ माणूस.. तुम्हाला त्रास व्हावा म्हणून मी काही करत नाही.. तुझे बाबा म्हणतात नवा श्लोक पाठ कर. मी शब्दकोडे, सुडोकु वगैरे खेळतेच ग पण मेंदूमध्ये वयोपरत्वे झालेले बदल नवीन गोष्टी पुर्वीसारख्या लक्षात ठेवू शकत नाही..

पण नीतू, आज ‘मी आहे म्हणून माझ्या चुका आहेत’.. मी गेल्यावर मला ओरडल्याचा तुला त्रास होऊ नये असं वाटतं म्हणून स्पष्ट बोलतेय. म्हातारं माणूस अन् लहान मुलं सारखंच असतं बघ! आणि तू कितीही मोठी इंजिनीअर अस.. मला मात्र तुझ्यात आजही सिंड्रेलाची गोष्ट रोज मला सांगणारी छोटी नीतूच दिसते व मन मोकळं करावंसं वाटतं! ”

“आई, सॅारी ग.. सांग परत नाना बर्वे काय म्हणाले ते! अगदी पहिल्यापासून! ” नीतू डोळे पुसत होती. आपण गेल्यावर लेकीला आपण तिच्यावर ओरडल्याचा त्रास होऊ नये याचा ही विचार करतेय? यालाच तर आई म्हणायचं..

“जा ग! आलीय मोठी नाना बर्वेंची गोष्ट ऐकणारी.. अलकाताई हसल्या.. ”काल रात्री जागून तुझ्यासारख्या हुश्शार मुलीसाठी हे प्रश्न काढलेत बघ. सिनिअर लोक तेच तेच परत परत बोलतात याबद्दल आमच्या न्युरॅालॅजिस्ट जावईबापूंशी बोल व दे यांची उत्तरं. मी पण चार लोकांना विचारत आहेच पण आई मनातलं लेकीजवळ नाही बोलणार तर आणि कुठं बोलेल सांग बरं? ”अलकाताईंनी प्रश्न लिहलेला कागद नीतूला दिला.

सुनबाईनं स्वत:च्या आईला अचानक फोन केला हे नीतुच्या लक्षात आले होते. आणि मनोहर राव आरामखुर्चीत बसून बायकोकडे कौतुकाने पहात होते!

एकमेकांशी मोकळेपणाने बोललं ना की दहा मधील नऊ प्रॅाब्लेम सुटतात म्हणणारी अलका परत एकदा सगळ्यांना त्याचे प्रात्यक्षिक दाखवत होती! रडत न बसता, न रागावता समोर आलेल्या प्रॅाब्लेमवर उपाय शोधत होती.. मायेने, कळकळीने आणि आपलेपणाने! वयाप्रमाणे आलेले बदल ॲक्सेप्ट करत!

लेखिका :  सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काळजातलं कुसळ… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ काळजातलं कुसळ… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

बागेत बाकावर बसलेल्या नलूने समोरून येणाऱ्या उषाला बघून हसून हात हलविला. उषा येऊन बाकावर टेकण्याआधीच तिला विचारलं, “अगं कुठे होतीस काल? किती वाट पाहिली तुझी. शेवटी चार फेऱ्या मारून मी घरी गेले.”

“सॉरी, सॉरी अगं, मानसीची एक मीटिंग रद्द झाली म्हणून आयत्या वेळी तिनं आम्हाला मॉलला यायला सांगितलं. ॲव्हेंजर सिनेमा बघायला.” 

“बरं- बरं. आवडला का?”

“डोक्यावरून गेला. हसल्यासारखं करत उषा म्हणाली, काय ते वेडेवाकडे एलियन्स, त्यांची विचित्र वाहनं, शस्त्रास्त्र, सारंच अगम्य! मला तर अधूनमधून डुलक्याच येत होत्या.

“आणि आता आपल्याला मॉलमधलं ते हिंडणं, खाणं, खरेदी काहीच नको वाटतं. त्यात सिनेमा असा असला म्हणजे…”  नलूने उषाच्या सुरात सूर मिळविला.

“आपल्या या कर्तृत्ववान, ऑफिसमध्ये बॉस असलेल्या लेकी, त्यांच्या सोयीप्रमाणे आपल्याला गृहीत धरतात. शिवाय घरी दारी सगळीकडे बॉससारख्याच वागतात.” उषा नाराजीच्या स्वरात म्हणाली.”

आमची चंदा “सेव्हन सिस्टर्स” ला जायला निघालीय ते सांगायचं होतं तुला.” नलूच्या स्वरातून काळजी डोकावत होती.

“कुणाबरोबर जातेय?॔.

“एकटीच जातेय. नागालँड, त्रिपुरापासून एकटीने हिंडणारेय महिनाभर. तिच्या एनजीओतर्फे तिथल्या स्त्रियांच्या आरोग्याचा सर्व्हे करायचाय म्हणे. मला तर खूप टेन्शन आलंय.” 

“साहजिकच आहे. तरण्याताठ्या मुलींनं तिथल्या अशांत वातावरणात एकटीने वावरायचं म्हणजे काळजी वाटणारच.” नलूला दुजोरा देत उषा म्हणाली.” 

“हो. पण घरात तसं काही बोलायला गेले, तर चंदानं मोबाईलमधून डोकं वर काढून,  ॓कूऽऽल, आई कूऽऽल” म्हणत माझ्याकडे जग कुठे चाललाय आणि मी कुठल्या युगात वावरतेय,॔ अशा नजरेने पाहिलं.

“अरुणा काही म्हणालीका?” उषाने नलूच्या सुनेच मत अजमावयाला विचारलं.

“म्हणाली माझी समजूत काढल्यासारखी. अहो आई, तुम्ही व्हॉट्सॲप वापरता. आपल्या फॅमिली ग्रुपवर चंदा रोज मेसेज करील ना. फोटोसुद्धा पाठवील. काळजी नका करू.”

“फक्त तिथल इंटरनेट कनेक्शन चालू असायला हवं, ही माझी शंका मग मी मनातच गिळली.” नलूच्या बोलण्यात नाराजी होती.

“अलीकडे रात्री बराच वेळ झोप लागत नाही. वेड्यासारखे विचार मनात येतात. वाटतं की काळ पंधरा- वीस वर्षांनी मागे जावा. किती छान स्थळं येत होती तेव्हा मानसीसाठी. हुशार, स्मार्ट, पाच आकडी पगार घेणारी एकुलती एक लाडकी लेक आमची. काहीतरी निमित्त काढून चांगली चांगली स्थळं नाकारली मानसीनं. ठाण्याचा एक मुलगा तर अगदी परफेक्ट मॅच होता मानसीला. पण त्याची- माझी उंची जवळजवळ सारखीच आहे. असलं खुसपट काढून मानसीनं त्यालासुद्धा नाकारलं. यांनी किती समजूत काढली होती तिची. त्यावेळी मानसीची बाजू घेण्याचा मूर्खपणा मी केला नसता तर… .”

उषाच्या मनातली खदखद बाहेर पडत होती.

उषाच्या हातावर हलकेच थोपटल्यासारखं करीत नलू म्हणाली,  “जॉर्जबद्दल तर तुला माहितेय. चंदाच्याच ऑफिसमधला हुशार, सालस मुलगा. केवळ दुसऱ्या धर्माचा म्हणून यांनी टोकाचा विरोध केला. तो लग्न करून अमेरिकेला जाऊन चांगला सेटल झाला आणि ॓आता मला लग्नच करायचं नाही” म्हणून चंदा हट्ट धरून बसलीय.

“आजचा जमाना असता ना तर आधी लग्न करून नंतर त्यांनी तुम्हाला कळवलं असतं.” 

“ते परवडलं असतं. हे गेल्यानंतर कधी नाही इतकं एकटं वाटतं आताशा.” नलू खिन्न होऊन म्हणाली.

“मला तर हल्ली जवळच्या नात्यातसुद्धा कुठल्या कार्याला जावंसं वाटत नाही. तिकडे आडवळणाने गाडी शेवटी मानसीच्या लग्नावर येतेच.

“परवा मुंजीला गेले होते तेव्हा ओळखीच्या एका बाईंनी चंदासाठी घटस्फोटीत स्थळ. धीर करून घरी बोलले मात्र, चंदा एखाद्या वाघिणीसारखी चवताळली. तिनं घेतलेल्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहायला जाते म्हणाली.

“अगं बाई, मग? मग अरुणाने समजूत काढली का तिची” काढणारच. सगळ्याच स्वार्थी आणि मतलबी झाल्येत आज काल. चंदा इथे सढळपणे घरात खर्च करते. मग तिची मर्जी सांभाळत अरुणा सगळं तिच्या हातात आयतं देते. “आत्या आत्या” करत मुलं चंदाकडून हॉटेलिंग, उंची कपडे, गेम्स वसूल करतात. शिवाय चंदा तिच्या भाड्याने दिलेल्या फ्लॅटचे उत्पन्न थोडंच सोडणारेय? कधी लाडीगोडी लावून अरुणा मुलांना चंदाच्या खोलीत झोपायला लावते. राजाराणीचा दार लागलं की मलाच काहीतरी अपराध केल्यासारखं वाटतं. नलूने मनातली खदखद व्यक्त केली.

“वैजूसारखं वागायला जमत नाही ग आपल्याला. ती कशी कोणी चौकस भेटलं की, तिच्या लेकीच्या उत्तम करिअरबद्दल कौतुकाने बोलत सुटते. विचारणाऱ्याची कोरडी काळजी ओठावर यायला संधीच देत नाही.” उषाने त्यांच्या मैत्रिणीचा, वैजूचा दाखला देत म्हटलं.

“हो ना! वैजू म्हणते की लोकांना सतत काहीतरी चघळायला हवं असतं. आपण कशाला त्यांचं च्युइंगगम व्हायचं? आपल्या काळजातलं कुसळ दाखवायचं?

“बरोबरच आहे तिचं. पण… .” 

म्हणत दोघी गप्पच बसल्या… आपापल्या विचारात मग्न झाल्या. आणि मग निमूट घरी निघाल्या.

 ******

लॅच कीने दरवाजा उघडल्याचा आवाज आल्यावर उषाने घाईघाईने पुढ्यातली भाजी आवरायला घेतली.  ॓शी! काय पसारा केलायस आई, माझ्या खोलीत. पर्स ठेवता ठेवता मानसीनं शेरा मारलाच.

“हे मॅच बघताहेत आमच्या रूममध्ये. म्हणून मालिका बघायला मी इथे बसले भाजी निवडत” उषाने खालच्या मानेने म्हटलं.

“आवर ते सगळं लवकर.” मानसीच्या आवाजात बॉसगिरी डोकावलीच. काल मॉलमधून आणलेले ड्रेस घालून बघताना मानसीने खोलीभर टाकलेला पिशव्या, हॅ॑गर्स, पिनांचा पसारा उषाने आज सकाळीच आवरला होता. मुकाट्याने भाजीच्या पसारा आवरताना तिने डोळ्यातलं पाणीसुद्धा आवरलं…

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कलम – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ नास्तिक – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

शुक्रवारची संध्याकाळ. उतरती उन्हे ढगांच्यात लपाछपी खेळत होती. मी ऑफीसमधून बाहेर पडून आकाशवाणी बसटॉपकडे चाललो होतो. बसस्टॉपवर गर्दी जरा जास्तच होती. गर्दीत काही ओळखीचे चेहरे दिसत होते. त्यांच्यात हाय-हॅलो, नमस्कार-चमत्कार होत होते. त्यातच धापा टाकत, विव्हळत बसेस येत होत्या.

आपलं काहीसं ओझं गर्दीत ओतून आणि गर्दीचा एक अंश गिळून त्या पुढे निघून जात होत्या. मी माझ्या घराकडे जाणाऱ्या बसची प्रतीक्षा करत उभा होतो. विचार करत होतो, खूप दिवसात एखादी गोष्ट लिहिली नाही.

एवढ्यात जवळच आरडा-ओरडा ऐकू आला. आकाशातून एक गरुड येऊन रस्त्यात पडला होता. त्याच्या अवती-भवती, एक काळा साप लपेटलेला होता. दोघांच्यात भीषण लढाई चालू होती.

बसस्टॉपवरचे लोक त्या बाजूला पळाले. ट्रॅफिक काही काळ थांबल्यासारखाच झाला. लोक बसमधून, कारमधून माना बाहेर काढून काढून बघत होते. ज्यांना जायची घाई होती, ते वारंवार हॉर्न वाजवत होते. लवकरच ट्रॅफिक गरुड आणि साप यांच्या आजूबाजूने पुढे जाऊ लागला. एकमेकांशी जोरदार लढाई करणाऱ्या गरुड आणि सापाच्या चारी बाजूंनी प्रेक्षक त्यांना घेरून उभे राहिले. मी पण त्यांच्यात सामील झालो.

कधी सापाचं पारडं भारी व्हायचं. कधी गरुडाचं. जीवन-मरणाचा प्रश्न होता. जितकी तोंडं, तितक्या बोली.

‘हा गरुड नाही. ससाणा आहे ससाणा. सापाला मारून टाकेल! ‘

‘अरे नाही, हा गरुड आहे गरुड. पण तोही साधारण साप नाही. काळा नाग आहे. त्याचा फणा पाहिला नाहीत. नागापुढे गरुडाचं काहीच चालणार नाही. ‘

बघता बता गर्दीची सहानुभूती दोन हिश्श्यात वाटली गेली. काही गरुडाच्या पक्षात गेले काहींनी नागाचा पक्ष घेतला.

गर्दीत कांहीं जुगारीही होते.

‘शंभराची पैज लावा. शंभराची. नागच जिंकेल. ’

‘लागली पैज! गरुडच जिंकणार! ’

गर्दीत उभी असलेली एक म्हातारी म्हणाली, ‘कुणी तरी दोघांना वेगळं करा. नाही तर दोघेही मरतील. ‘

कुणी तरी म्हंटलं, ‘आम्ही त्यांना वेगळं करायला गेलो, तर ते आम्हालाच मारून खातील. ‘

एक आवाज आला, ‘तुम्ही भित्र्या भागुबाई आहात. ‘

त्याला उत्तर मिळालं, ‘तुम्ही मोठे तिस्मारखां आहात, असं तुम्हाला वाटतय, तर तुम्हीच त्यांना हात लावा नं! आम्हीदेखील बघू तुमचा पराक्रम! ‘

जेव्हा सापाचं पारडं जड व्हायचं, तेव्हा गर्दीत उभा असलेला एक साधू बाबा जयजयकार करत म्हणायचा, ‘बम-बम भोले! नागदेवता की जय हो! ‘ 

जेव्हा गरुड विजयी होतोय, असं वाटायचं, तेव्हा आवाज यायचा, की हे तर भगवान विष्णूचं वाहन गरुड आहे, तो सापाला सोडणार नाही. ‘

अखेर गरुडाने नागाचा फणा धरून दाबला अणि आपल्या तीक्ष्ण चोचीने आणि टोकदार नखांनी त्याला मारून मारून अर्धमेला केलं. गरुड सापाला घेऊन उडणार, एवढ्यात, साधूबाबाबांनी एक दगड उचलून गरुडावर भिरकावला. गडबडीत गरुड सापाला तिथेच सोडून तसाच उडून गेला.

जुगारी लोक पैसे एकत्र करू लागले. गरुडाच्या पक्षधा-यांवर विजयाचे हसू होते, तर नागपक्षाच्या लोकांचे चेहरे पडले होते.

कुणी खिन्न झालेल्या व्यक्तीने आपली चीड बाहेर काढण्यासाठी एक दगड उचलला. आणि एका बसच्या काचेवर मारला. त्यातून गडबड-गोंधळ, आरडा-ओरडा सुरू झाला. लोक इकडे-तिकडे पळू लागले.

गर्दी आणि आरडा-ओरडा बघून ट्रॅफिक पोलीस तिथे आले. त्यांना पहाताच जुगारी सटकले. गर्दी विखुरली. गर्दीत बसवर दगड कुणी मारला, हे कळले नाही. कुणी तरी त्या क्षत -विक्षत सापाला उचलून बस-स्टॉपच्या कडेला फुटपाथवर टाकून दिले.

माझ्या घराकडे जाणारी बस एवढ्यात आली. मी धक्के खात आत चढलो आणि बस निघाली.

दोन दिवसांनी संध्याकाळी जेव्हा मी घरी जाण्यासाठी आकाशवाणी बस स्टॉपवर गेलो, तेव्हा तिथलं दृश्य पाहून दंग झालो.

शुक्रवारी संध्याकाळी बस स्टॉपच्या शेजारील फूटपाथवर, जिथे क्षत-विक्षत साप टाकलेला होता, तिथे एक छोटंसं पक्कं मंदिर बनलं होतं. त्याच्या भोवतीच्या चारी बाजूंच्या भितींवर पांढरे टाईल्स लागले होते. मंदिरात शिवलिंग स्थापित केलेलं होतं. शेजारीच नागदेवतेचा मोठा फोटो होता. त्याला फुलांचा हार घातलेला होता.

ज्या साधूबाबांनी शुक्रवारी गरुडाला दगड मारला होता, तेच साधूबाबा मंदिरात घंटा वाजवून पूजा-अर्चा करत होते. बाहेर काही महिला शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी हातात दुधाच्या लोट्या घेऊन रांगेत उभ्या होत्या. काही भक्तगणही भगाव्या रंगाची वस्त्रे परिधान करून बाहेर उभे होते. मंदिराच्या शेजारी एक फुलवाल्याचे दुकान होते. तो फुलांचे हार विकत होता. त्याच्या शेजारी एक मिठाईवाला बुंदीचे लाडू विकत होता. मंदिराच्या शेजारी एक नुकताच पेंट केलेला साईन बोर्ड होता. त्यावर लिहिलं होतं, या मंदिराचा शिलान्यास, या विभागाचे नगरसेवक श्री. की ख ग यांच्या करकमळांनी झाला आहे.

मी भगवी वस्त्रे परिधान केलेल्या एकाला विचारलं, ’ हे सगळं काय आहे भाऊ? ’ 

‘आपल्याला माहीत नाही? हे साधूबाबा बनारसचे एक सिद्ध महात्मा आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना रात्री दृष्टांत झाला, इथे एक शिवलिंग गाडलेले आहे. आणि इथे नागदेवतेचा वास आहे. इथे पूजा करून नवस बोलला, तर आपली इच्छा पूर्ण होते. ‘

मला रहावलं नाही. ‘काय बोलताय? शुक्रवारी संध्याकाळी मी इथेच होतो. इथे एका गरुडाने सापाला मारून टाकलं होतं. मग त्या सापाला कुणी तरी फूटपाथच्या कडेला टाकलं. हा साधूबाबाच गरुडाला दगड मारत होता.

मी आणखी काही बोलणार, एवढ्यात त्या भगव्या वस्त्रधारीने माझ्याकडे रागाने पहात थरथर कापत म्हंटलं, ‘नास्तिक’ कुठले! ‘

मला त्या व्यक्तीशी वाद घालावासा वाटला नाही. आपण आंधळ्याला रस्ता दाखवू शकतो. पण डोळे असूनही बघायचंच कुणी नाकारलं, तर आपण तरी काय करणार?

मी बस पकडली आणि घरी आलो. घरी पोचून बघतो, तर काय, बाईसाहेब स्नान वगैरे करून लोट्यात दूध घेऊन उभ्या होत्या.

‘ऐकलंत का, आपली शेजारीण सांगत होती, आकाशवाणीच्या शेजारच्या बस स्टॉपजवळ एक नवं मंदिर झालय. तिथे बनारसचे सिद्धी पावलेले महात्मा आले आहेत. असं म्हणतात, तिथे जो नवस बोलतो, त्याची इच्छा पूर्ण होते. तुम्हाला माहीतच आहे, की आपल्या शेजारचे शर्मा… त्यांचं प्रमोशन किती तरी दिवस रखडलं होतं, आज सकाळीच मिसेस शर्मांनी त्या मंदिरात पूजा केली. नवस बोलला आणि दुपारी शर्माँचं प्रमोशन झालंसुद्धा! आपल्या टुण्णूची उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होतेय. म्हणून मीसुद्धा तिथे जाऊन दर्शन घेऊन येते. तुम्ही येणार का? ‘

‘तू जाऊन ये. मला कथा लिहायचीय. मी आपल्या देवघरातल्या देवापुढे डोकं टेकवीन. ‘ 

मूळ हिन्दी कथा – ‘नास्तिक’

मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय

 मो: 8512070086

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नमन नटवरा… — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ नमन नटवरा…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

(“एका नाटकासाठी इतकी धडपड, मेहनत करायची?

“होय बाबा, ही स्पर्धा हाय, इथं बरीच नाटक होनार, मुंबई पुन्यातून परीक्षक येत्यात, त्याना आवडायला हवं… मग स्पर्धेत पयल दुसरं आलं तर अंतिम स्पर्धेला जायला मिळतं. त्यासाठी ही धडपड’.) 

इथून पुढे – – – 

नाटकासाठी एक स्टेज मिळालं. तेथे दुसऱ्यादिवशी जमायचं ठरल. नरूआणि शिरीष तेथे पोचले तेव्हा जयवंतसरांची पत्नी धावपळ करून स्टेज लाऊन घेत होती. सर कुठे दिसत नव्हते. शिरीषने चौकशी केली तेंव्हा कळले सरांना काल रात्री उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली म्हणून डॉ गुळवणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. सर्वजणं काळजीत होते, नाटक चार दिवसावर आले आणि प्रमुख भूमिका करणारा कलाकार हॉस्पिटलमध्ये. थोडीफार तालीम झाली. मग घरी जाण्याआधी नरू आणि शिरीष हॉस्पिटलमध्ये गेले. सरांना सलाईन लावलेले होते. लांबून त्याना पाहून ते घरी आले.

दुसऱ्या दिवशी शिरीष आणि नरू स्टेजकडे आले, तर जयवंतसर लाईट जोडून पहात होते. नरुने शिरीषच्या हातात हात दिला. काल हॉस्पिटलमध्ये झोपलेला माणूस आज तालीम घयायला हजर होता. मग दोन दिवस रंगीत तालीम झाली. नरुने संपूर्ण नाटक पहिल्यांदा पाहिले. किती अवघड भाषा.. मोठे मोठे संवाद.. अनेक ग्रुप्स.. मुस्लिम कपडे.. लेव्हल्स.. त्यावरील हालचाली.. प्रकाश आणि संगीत सांभाळत कलाकार नाटक पुढे नेत होते. आलेले पाहुणे नाटक पाहून खूष झाले. त्यानी काही सूचना पण केल्या.

इकडे नाट्यस्पर्धा सुरु झाली होती. “तुघलक ‘नाटकाला तिसरा दिवस मिळाला होता.

नाटका दिवशी सर्वांनी स्वतः प्रॉपर्टी, स्पॉट्स उचलून आणले आणि स्टेजवर मांडले. तीन रंगीत तालमी झाल्या होत्या त्यामुळे स्पर्धेतील प्रयोग उत्तम आणि खणखणीत झाला. स्वतः जयवंतने मोहम्मद बिनतुघलक उत्तम साकारला. सर्वच कलाकारांनी चांगले काम केले. तीन परीक्षक होते. त्यातील एक स्त्री परीक्षक होती. परीक्षक आत येऊन सर्वाना विशेष करून जयवंतला भेटून गेले आणि त्यानी पण नाटकाचे कौतुक केले.

नाटकाचा प्रयोग छान झाला असे कौतुक अनेक समीक्षकांनी केले, अनेक प्रेक्षकांनी केला. खुप मेहनत करून नाटक उभे केले होते. या कौतुकाचा स्वीकार जयवंत आणि त्याची पत्नी घेत होती.

दुसऱ्या दिवशी ती दोघ आणि ग्रुपमधील इतर एका स्टॉलवर चहा पित असताना जयवंतचा छोटा मोबाईल वाजला. त्याकाळात त्या शहरात फारच थोडया लोकांकडे मोबाईल होते. नवीन नंबर पाहून जयवंतने “हॅल्लो.. हॅल्लो”केले.

पलीकडून एका बाईचा आवाज आला “नमस्कार, तुमचे नाटक आणि भूमिका उत्तम झाली ‘.

“थँक्स, कोण बोलतंय?

“, मी राधिका, या स्पर्धेची परीक्षक ‘

जयवंतला आश्यर्य वाटते. परीक्षकाचा मला फोन? का केला असेल

“बोला मॅडम.. का फोन केला होता?

 

“स्पर्धेचे सिनिअर परीक्षक आहेत ना सुधीरसर त्याना तुम्हाला भेटायचे आहे. त्यानी तुम्हांला निरोप द्यायला सांगितले.. केंव्हा येऊ शकता? शक्यतो एकटे या किंवा तुमच्या ग्रुपमधील कुणी असलं तरी चालेल ‘.

जयवंतच्या डोक्यात चक्र फिरू लागली, काही तरी गडबड आहे..

सावध राहा.

“उद्या येतो मॅडम सकाळी अकरा वाजता ‘.

“या, आम्ही सारे असू, गेस्टहाऊस मध्ये आहोत आम्ही ‘.

“होय, येतो.. म्हणून जयवंतने मोबाईल ठेवला.

जयवंत एक मिनिट विचार करू लागला -परीक्षकांनी का बोलावले असेल? असे एवढ्या वर्षात कुठल्या परीक्षकांनी रेस्टहाऊस वर बोलावल्याचे ऐकले नव्हते, हे काहीतरी नवीन.

त्त्यांचे फोनवरील बोलणे ऐकत असलेली क्षमा म्हणाली “त्या शेखरचे पहिल्या दिवशी नाटक झाले ना, त्यालाही काल बोलावलेले म्हणे..

“बरे, आपण उद्या जायचे, शिरीष आणि नरू तुम्ही माझ्यसमवेत यायचे आणि.. जयवंतने शिरीषच्या कानात सांगितले.

शिरीषने मान हलवली. उद्या दहा वाजता ते दोघे जयवंतच्या घरी येणार होते.

दुसऱ्या दिवशी नरू आणि शिरीष जयवंतकडे आले. पण जयवंतने एक वस्तू शिरीषकडे दिली, ती त्याने पॅंटीच्या खिशात ठेवली आणि रिक्षा करून तिघे निघाले.

तिघे रेस्टहाऊस मध्ये पोहोचले आणि चौकशी करून राधिका मॅडमच्या सूट मध्ये आले, त्याना पहाताच राधिकामॅडमने बाजूच्या सूटमधील सुधीरसर आणि मोहनसरांना बोलावले. तिघे येऊन खुर्चीत बसले, मग सुधीरसर बोलू लागले

“जयवंत, तुमचे नाटक छानच झाले. पण तशी इतर ग्रुपची पण नाटकें चांगलीच होतात. स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर आला तरच तुम्ही अंतिम स्पर्धेत जाणारं आणि ते आमच्या हातात आहे.

जयवंतने शिरीषकडे पाहिले. शिरीषने हळूच मान हलवली आणि हात खिशात घातला.

“बोलायला हरकत नाही ना, ही तुमचीच माणसे आहेत ना?

जयवंतने मान हलवताच सुधीर बोलायला लागले.

“आम्ही या आधी सुद्धा बऱ्याच ठिकाणी परीक्षक म्हणूंन काम केले आहे, स्पर्धेचा निकाल आमच्या हातात असतो. तुम्हाला जर पहिला नंबर हवा असेल आम्हाला तिघांना प्रत्येकी एक लाख द्यावे लागतील.

“काय? अनपेक्षितपणे जयवन्त चित्तकारला.

“होय, दुसरा हवा असेल तर प्रत्येकी पंचांहत्तर हजार.. राधिका मॅडम मध्येच म्हणाल्या.

“आणि ग्रुप्स पैसे देतांत बरं का, तिसरे परीक्षक म्हणाले.

“काल तो स्वप्नील आला होता, त्याला पण हेच सांगितलं… आणि अंतिम फेरीत नंबर हवा असल्यास त्याची पण व्यवस्था होईल.

“मी एकटा एवढ्या पैशाचा निर्णय घेऊ शकत नाही, ग्रुपला विचारून सांगतो ‘.

“, हो सांगा आणि हे तुमच्या आमच्यात ठेवा बरं का..

“, येतो सर… म्हणून तिघे बाहेर पडले.

बाहेर पडून रस्त्यावर आल्यावर जयवंत शिरीषला म्हणाला “आता बाहेर काढ..

शिरीषने खिशात लपवीलेला पॉकेट रेकॉर्डर बाहेर काढला आणि चालू केला.. त्यात सारे सांभाषण व्यवस्थित रेकॉर्ड झाले होते.

—सायंकाळी सहा वाजता —-

शहरातील बरेच नाट्यकर्मी, प्रतिष्ठित व्यक्ती, प्रोफेसर जमले होते. वर्तमानपत्र वार्ताहर, टीव्हीचॅनेल रिपोर्टर कॅमेरासह हजर होते. चर्चा जोरात सुरु होत्या. आजपर्यत पैशाची मागणी करणारे परीक्षक कोणी पाहिले नव्हते, समाजाची एवढी अधोगतीचा विचार केला नव्हता.

सर्व लोकांसमोर आणि वार्ताहरासमोर जयवंतने परीक्षकासोबतचे रेकॉर्डिंग ऐकवले आणि सर्वाना धक्का बसला. सांस्कृतिक क्षेत्रात एवढे अध. पतन कोणी कल्पिले नव्हते.

दोन मिनिटात बातम्यातून ही बातमी सर्वदूर पसरली.

सर्व ठिकाणहून फोनावर फोन सुरु झाले.

कलेक्टरनी स्पर्धा रद्द केली. परीक्षकांची नाट्यकर्मिनी आणि जनतेने शी थू केले. पोलीस बंदोबस्तत त्याना शहराबाहेर हाकलले. दुसऱ्या दिवशी अनेक वर्तमापत्रात ही ठळक बातमी होती. पुढे कधीही या परीक्षकांना कोणी बोलावले नाही.

जयवंत निराश झाला. आपण आणि आपल्यासारखे अनेक निष्टने नाटक करतो.. रात्रीचा दिवस करून सोबत्याना घेऊन स्पर्धेत उतरतो.. आपली तब्येत, संसार, पैसे याचा विचार न करता दोन दोन महिने जागरणे करून उपयोग काय? असे परीक्षक पैशासाठी हवा तसा निकाल देणार.

जयवंत मग लहान मुलांची नाट्यशिबीरे घेऊ लागला पण स्पर्धेच्या नाटकापासून कायमचा दूर झाला.

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नमन नटवरा… — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ नमन नटवरा…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

 नरु जोरात सायकल चालवत होता, त्याच्या पाठीमागे शिऱ्या बसला होता. शिऱ्या घड्याळ बघत म्हणाला

“साडेसहा वाजले की रे, जोरात घे.

“घेतो रे, पन चढ हाय न्हवं..

“अरे, सात वाजले की सर दरवाजा बंद करत्यात.. जल्दी.

नरुने जोरात सायकल घेतली आणि पावणेसात वाजता सायकल हॉलच्या पायऱ्याला लावली. दोघे घाम पुशीत उभे राहिले. लहानशी वाऱ्याची झुळूक आली, त्याने त्या दोघांना बरे वाटले. मग नरुने हळूच हॉलचा दरवाजा ढकलला. हॉल मध्ये जयवंतसर खुर्चीत बसुन पुस्तक वाचत होते. त्यान्च्यासमोर बाकावर आठ मुलगे आणि चार मुली, दोन वयस्क पुरुष आणि एक वयस्क स्त्री पण बसली होती. नरु आणि शिरीष आत जाऊन एका बाकावर बसले.

सात वाजले तसे जयवंतने हॉल चा दरवाजा आतून बंद केला.

मग तो बोलू लागला “यंदा स्पर्धा पंचवीस नोव्हेंबरपासून सुरु होते आहे, तेंव्हा या वर्षीच्या आपल्या नाटकाची तालीम सुरु करायला हवी. यंदा आपल्या संस्थेने गिरीष कर्नाड यांचे “तुघलक ‘हे नाटक निवडले आहे. तसे हे खर्चिक नाटक आहे कारण या नाटकासाठी ऐतिहासिक ड्रेपरी हवी, लेव्हल्स करायला लागतील, म्युझिकवर खुप मेहनत करायला लागेल. आपल्या संस्थेने मंजूर केलेल्या रकमेत हे नाटक करणे कठीण आहे म्हणून आपल्या सर्वाना अंगमेहनत करून कमीतकमी खर्चात नाटक उभे करायला लागेल.

तुमच्यापैकी सर्वांनाच भूमिका मिळेल असे नाही पण नाटकासाठी इतर कामे जास्त जास्त आव्हानदायक असतांत. बॅकस्टेज अत्यन्त महत्वाचे. कारण आपला हौशी ग्रुप आहे, व्यावसायिक नव्हे. आपल्या सर्वांनाच बॅकस्टेज पण करायला लागेल. या नाटकातील भूमिकेनुसार मी कलावन्त निवडले आहेत, त्याची लिस्ट उद्या मिळेल. प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य कोण करणार हे आपण ठरवू. त्या सर्वांना माझी आणि माझ्या पत्नीची मदत असेल. भूमिका ठरल्यानंतर कलाकारांनी पंधरा दिवसात आपले संवाद पाठ करणे अपेक्षित आहे, मग मोव्हमेंट दिल्या जातील, मग नेपथ्य लावून हालचाली, मग प्रकाश, संगीतसह मोव्हमेन्ट ठरतील. मग जयवंतने नाटकाचे थोडे वाचन केले आणि मंडळी घरी गेली.

नरु आणि शिरीष परत सायकलवरुन घरी निघाले, आता हवेत थंडी होती.

शिरीष या ग्रुपमध्ये दोन वर्षे लहान भूमिका करत होता, नरु त्यांच्याबरोबर यंदा प्रथमच येत होता. नरु बोलू लागला “शिऱ्या, हे जयवंतसर कसे आहेत, म्हणजे बरीच वर्षे नाटक करतात काय?

“होय, वीसवर्षे तरी ते नाटक करतात, सुरवातीला दुसऱ्या ग्रुपमध्ये होते पण तिथं त्यांचं बिनसलं त्यापासून ते आणि त्त्यांची बायको वेगळी झाली आणि त्यांनी हा ग्रुप सुरु केला, दरवर्षी नाटक काढतात पण म्हणावं तस यश अजून मिळालं न्हाई त्यास्नी, पण स्वतःमात्र बेस्ट काम करत्यात, त्त्यांची बायको पण बेस्ट काम करते.

“पन मला देतील काम स्टेजवर?”, बहुतेक न्हाई, या ग्रुपमधील जुनी अनुभवी लोक हायेत, हे नाटक सरांनी काढलंय ते लय अवघड हाय, बोलताना फापलायला व्हणार, इनोदी नाटक असत तर जमतंय कसतरी, पन या नाटकात जुनीच टीम असणान, तुला बॅकस्टेजला घेनार, पन खरं नाटक बॅकस्टेज करता करता समजत.. मी पन दोन वरश बॅकला होतो, बघू यंदा स्टेजवर चान्स देत्यात काय?

दोघ सायकल चालवत घरी गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सात वाजता सर्व जमली, आज अजून बरीच लोक आली होती, वयाने मोठी लोक होती, स्त्रिया होत्या. नरु गप्प बसुन पहात होता.

कलाकारांची निवड झाली, यावेळी शिरीषला शहाबुद्दीनची भूमिका मिळाली. स्वतः जयवंतसर मोहम्मदबिन तुघलक ही कठीण भूमिका करणार होते. वाचने सुरु झाली, हे नाटक चौदाव्या शतकातील आणि इस्लामी वातावरणातील, त्यामुळे बरेच उर्दू शब्द आणि वाक्ये होती. पण जयवंतसरांनी नाटकाचा व्यवस्थित अभ्यास केला होता, त्यामुळे प्रत्येक कलाकाराला ते व्यवस्थित मार्गदर्शन करत होते. हळूहळू कलाकारांच्या तोंडात वाक्ये बसायला लागली.

पण काही कलाकार कधी येत होते कधीं दांडी मारत होते. जयवंतची चिडचिड होतं होती. रोज कुणालाना कुणाला लेक्चर द्यावे लागत होतं. काही दिवसांनी एक स्त्री कलाकार यायची बंद झाली. तिची तात्पुरती तालीम दुसरी कलाकार करू लागली. शेवटी जयवंतसर आणि त्त्यांची पत्नी तिच्याघरी गेली, तेंव्हा तिने “मला लहान भूमिका दिली, म्हणून माझे त्या भूमिकेत मन लागत नाही ‘, असे सांगून काम करण्यास नकार दिला. पुन्हा शोधाशोध करून नवीन स्त्री मिळविली, पुन्हा तिची पहिल्यापासून तालीम सुरु, एका पुरुष कलाकारांची दुसऱ्या शहरात बदली झाली.. म्हणून पुन्हा नवीन माणूस शोधला.

एक दिवस घरी जाताना नरू शिरीषला म्हणाला “मग दरवर्षी असच कोनी ना कोनी नाटक मधीच सोडून जातंय काय?

“होय बाबा, यालाच नाटक म्हणत्यात… पडदा वर जाई पर्यत काय काय होईल सांगता यायचं न्हाई.

“मग जयवंतसरांना लय तरास होतं असेल?

“होय, सर दिवसभर साखरकारखान्यात नोकरीला जात्यात, घरसंसार हायेच आणि रात्रीच नाटक. त्यात रोज असली टेन्शन..

“आनी त्त्यांची घरवाली?

“ती बी नोकरीं करते, यांच्या नाटकात काम करते ‘.

अनेक अडचणी, संकटे दूर करून नाटकाला आकार येत होता, कलाकारांचे पाठांतर बऱ्यापैकी झाले. मग जयवंतसर नेपथ्याच्या मागे लागले. एका सुताराला बोलाऊन लेव्हल्सची मापे दिली, मागे कमान करायला दिली. म्युझिकसाठी एका स्टुडिओत जयवंतसरांनी दोन रात्री जागून कॅसेट तयार केली. यंदा प्रकाशयोजनेकरिता ग्रुपमधील मनिषवर जबाबदारी दिली, अर्थात त्याला मार्गदर्शन जयवंतसरांचेच होते.

जसजशी स्पर्धेची तारीख जवळ येत होती, तसतशी रात्रीची जागरणे वाढत होती, आता रविवारी पूर्ण दिवस आणि बाकी दिवशी रात्री दोनपर्यत तालीम, मग संगीताची तालीम करून जयवंत पहाटे चार वाजता घरी पोचत होता, परत सकाळी डबा घेऊन आठला बाहेर पडत होता.

नाटकाची ड्रेपरी तयार झाली, त्या दिवसापासून कलाकार आपली ड्रेपरी घालून तालीम करू लागले. घरी जाताना नरू शिरीषला म्हणाला

“मग आता नाटक एकदम स्टेजवर बागायचं?”, न्हाई रे बाबा, आता कुठलं तरी स्टेज घेणार भाड्याने तीन रात्रीसाठी आनी तिथं लाईट जोडून नेपथ्य उभ करून नाटकाच्या वेळी करयचा तशी प्रॅक्टिस करायची, त्यावेळी सर त्यान्च्या नाटकातल्या मित्रमंडळींना बोलावत्यात आनी त्यास्नी सूचना करायला सांगत्यात ‘.

“एका नाटकासाठी इतकी धडपड, मेहनत करायची?

“होय बाबा, ही स्पर्धा हाय, इथं बरीच नाटक होनार, मुंबई पुन्यातून परीक्षक येत्यात, त्याना आवडायला हवं… मग स्पर्धेत पयल दुसरं आलं तर अंतिम स्पर्धेला जायला मिळतं. त्यासाठी ही धडपड ‘.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भंगारवाले दादा आणि त्यांचे चुकणारे हिशेब… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ भंगारवाले दादा आणि त्यांचे चुकणारे हिशेब… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

जगभरात करोनाने थैमान घातलं, आणि जाता जाता त्याने आम्हालाही फटका दिला. आमच्या बाबांचा बळी घेतला त्यानं, आईची नोकरी त्यापूर्वीच गेलेली होती. आधीच हातावर पोट असलेले आम्ही अगदीच उघड्यावर पडलो. पैसे संपले, फी भरता आली नाही, माझी आणि माझ्या धाकट्या भावाची शाळा सुटली.

पुस्तकातल्या शिक्षणापेक्षा, जिवंत राहण्यासाठी हातपाय मारण्याचं शिक्षण जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं होतं.

मी आणि माझा भाऊ गल्लोगल्ली फिरून भंगार गोळा करायचो. प्लॅस्टिकच्या बाटल्या – पिशव्या, तुटक्या – फुटक्या, गंजलेल्या मेटलच्या वस्तू – पंखे, बादल्या, छत्र्या – जे मिळेल ते. आणि हे सगळं घेऊन आम्ही तुकारामदादांकडे जायचो – आमच्या एरियातील सगळं भंगार तेच विकत घ्यायचे.

तुकारामदादा – कधीकाळी पांढरा असलेला सदरा, पायघोळ लेंगा, डोक्यावर टोपी, दाढीचे खुरटे खुंट, रूक्ष – उग्र चेहरा. तुम्ही आणलेली रद्दी – भंगार तोलायचे, त्यांच्याकडच्या कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करायचे, आणि हातावर पैसे टेकवायचे.

ना चेहऱ्यावर एखादं स्मितहास्य, ना अघळपघळ गप्पा.

जणू हसण्याचे किंवा बोलण्याचे पैसे पडत असावेत.

मी आणि भाऊ पहिल्यांदा त्यांच्याकडे पुठ्ठे, भंगार घेऊन गेलो तेव्हा फक्त ४८० रुपये टेकवले होते त्यांनी माझ्या हातावर.

तीन चार दिवस सतराशे साठ उकिरडे फुंकून गोळा केलेल्या कचऱ्याचे मोल – धड पाचशे रुपयेसुद्धा नव्हतं झालं.

दर दोन चार दिवसांनी आम्ही तिथं जायचो. दादा वजन करायचे, हिशोब करायचे, पैसे द्यायचे. तेच रूटीन.

पण मग मला एक गोष्ट लक्षात आली. कधीकधी त्यांची गणितं चुकायची, हिशेब बरोबर व्हायचा नाही.

आजचंच बघा ना, आजच्या माझ्या भंगाराचं वजन गेल्या वेळेपेक्षा कमी आहे, पुठ्ठे प्लॅस्टिक जास्त आहेत आणि लोखंड कमी आहे, पण दादांनी मला गेल्या वेळेपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. “भंगाराचे भाव वाढलेत, ” दादा स्वतःशीच बोलल्यासारखे गुरकावले.

पण किंमती वाढलेल्या नसायच्या, ना दादांकडच्या बोर्डावर, ना इकडच्या तिकडच्या भंगारवाल्यांकडे. मी चौकशी केली होती, माहिती काढली होती.

एकदा मला एक चपला ठेवायचा स्टँड मिळाला, बऱ्या अवस्थेत होता. एका बिल्डिंगमधले एकजण घर विकून निघून गेले होते, सोसायटीच्या आवारात स्टँड पडला होता, वॉचमनकाकांनी हाक मारून मला दिला होता तो.

मी स्टँड घेऊन दादांना दिला, “चोरीचा माल मी विकत घेत नाही, ” ते गुरगुरले. मग मी सगळी रामकहाणी सांगितली, “आईशप्पथ, खरं सांगतोय, ” म्हटलं.

दादांनी मला नीट निरखून पाहिलं. त्यांनी काय पाहिलं आणि त्यांना काय समजलं माहित नाही, पण तो स्टँड ते घेऊन गेले. आणि पाचशे रुपयांच्या चार कोऱ्या करकरीत नोटा घेऊन आले.

“दादा, याचे एवढे पैसे नाही होणार, ” मी चाचरत म्हणालो.

“हे तू ठरवणार का मी? माझ्या एका मित्राला अगदी असाच स्टँड हवा होता. ” ते म्हणाले.

ते खोटं सांगत होते. आणि हे आम्हा दोघांनाही माहित होतं.

मग मला जाणवलं की माझ्याप्रमाणेच इतरही काही मुलांच्या बाबतीत दादांची गणितं चुकायची, हिशेब चुकायचे. ती मुलंही माझ्यासारखीच कळकट मळकट, ठिगळं लावलेले कपडे घातलेली, अर्धपोटी असायची, आणि दादा अशा मुलांना पन्नासच्या जागी पाचशे रुपये द्यायचे – त्यांनी आणलेल्या भंगारात तांबं आहे, स्पेशल मशीन आहे, काहीबाही बहाणा सांगायचे.

आम्हाला पैसे हवेच असायचे. ते मुद्दाम जास्ती पैसे देत आहेत हे आम्हाला उमगायचे, पण आम्ही त्याबद्दल कधीच बोललो नाही, आम्हाला कळतंय हे दाखवलं नाही, पण आम्हाला माहित होतं.

आणि एक दिवस आई आजारी पडली. तिला दवाखान्यात भरती करायचं होतं, घरात नेहमीप्रमाणेच पैसे नव्हते. माझ्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जर्मन सिल्वरचा एक पेला घेतला होता, त्यावर झोकदार अक्षरांत माझं नाव कोरलं होतं.

आमच्या उरल्यासुरल्या घरातली ती शेवटची मौल्यवान गोष्ट होती.

काळजावर दगड ठेवून मी तो पेला दादांना दिला. त्यांनी मला परत सांगितलं, “चोरीचा माल मी विकत घेत नाही. “

“अहो, यावर माझंच नाव आहे. आईला दवाखान्यात घेऊन जायचंय, म्हणून विकतोय मी तुम्हाला हे, ” मी पोटतिडकीने सांगितलं.

आईला काय होतंय हे त्यांनी मला नीट विचारून घेतलं. एका कागदावर मला एका हॉस्पिटलचं नाव, पत्ता, एका डॉक्टरांचं नाव फोन नंबर लिहून दिलं, “मी पाठवलंय म्हणून सांग, ” म्हणाले, आणि तब्बल पाच हजार रुपये माझ्या हातावर ठेवले. “चांदीचे भाव आजच वाढले आहेत, ” ते म्हणाले.

पण जर्मन सिल्वर म्हणजे चांदी नसते. एवढं तर मलाही ठाऊक होतं.

चार दिवसांत आईची प्रकृती ठणठणीत झाली, डॉक्टरांनी पैसेदेखील घेतले नाहीत, “ते पैश्यांचं मी आणि दादा बघून घेतो, ” म्हणाले, एवढंच काय, पण आईला तिकडे दवाखान्यात नोकरीदेखील दिली.

मलाही एक पार्ट टाइम नोकरी मिळाली, आता मी आणि भाऊ रात्रशाळेत जाऊ लागलो. आता मला भंगार शोधत भटकावं लागत नव्हतं.

या गोष्टीला आता दोन तीन वर्षं होऊन गेली आहेत. गेल्या महिन्यात माझी नोकरी परमनंट झाली आहे. आज माझा पहिला पगार झालाय, आईसाठी नवी साडी घेतली आहे मी माझ्या पगारातून, धाकट्या भावासाठी शर्ट.

आणि माझ्या खिश्यात एक पाकीट आहे… तुकारामदादांसाठी.

मी त्यांच्या भंगाराच्या दुकानात गेलो. दादा असून तसेच आहेत. आणखी म्हातारे झाले आहेत. हालचाल थोडी मंदावली आहे. त्यांनी मला ओळखलं नाही.

“दादा! मला ओळखलंत? मी भंगार घेऊन यायचो इथं. दोन तीन वर्षांपूर्वी. तुम्ही मला जास्त पैसे द्यायचात. खूप जास्त. माझ्या आईचा हॉस्पिटलचा खर्च तुम्ही केला होतात.”

त्यांनी मान वर केली. त्यांनी मला ओळखलं होतं, पण तसं अजिबात न दर्शवता ते म्हणाले, “जास्तीचे पैसे? कोणी? मी दिले होते? “

“तुम्ही माझ्या कुटुंबाला वाचवलं. “

त्यांनी खांदे उडवले. “वजनकाटा जुना आहे. कधीकधी चुका करतो. आणि माझं वय झालंय, कधी कधी माझ्याकडूनही चुका होतात. “

मी माझ्या खिशातलं पाकीट त्यांना दिलं, १००० रुपये होते त्यात. “दादा, जास्त नाहीयेत, पण माझ्याकडून खारीचा वाटा. तुमच्या काट्याच्या चुकांसाठी. पुढच्या गरजू मुलासाठी. मी शक्यतो दर महिन्याला येत जाईन. “

त्यांनी ते पाकीट उघडलं, एकटक पाहिलं. डोळ्यात तरारलेलं पाणी बोटांनी निकवत त्यांनी मान डोलावली. मी निघालो.

अजूनही दादांचे हिशेब चुकतात, विशेषत: मेहनती, गरजू, गरीब मुलं असली की नक्कीच.

ते कोणाला फुकट काही देत नाहीत, कोणावर मेहरबानी करत नाहीत.

कष्ट करणारं कोणी असलं की मग मात्र त्यांचा हात देता होतो, त्यांचे हिशेब सोयीस्कररीत्या चुकतात आणि तुकारामदादांच्या या चुकणाऱ्या हिशेबांनी आमच्यासारख्या अनेक मुलांच्या आयुष्याची गणितं सुटतात.

(काल्पनिक)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अ _न_ मोल…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “अ _न_ मोल…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

रात्री नऊच्या सुमारास फोन वाजला. पलीकडून आवाज “साहेब, नमस्कार”

“नमस्कार!! कोण? ”

“मी अनमोल, आपला जुना परिचित, स्मरणात आहे का? ”

“आहे तर, वा वा, बऱ्याच दिवसांनी.. ”

“आपली तीव्रतेनं आठवण आली म्हणून फोन केला. रागावू नका. ”

“अजिबात नाही. उलट आठवणीनं फोन केल्याबद्दल छान वाटलं”

“आपलं आरोग्य कसंयं”

“उत्तम, तुझं”

“चांगलयं. नियतीनं संधी दिली तर भेट होईल. धन्यवाद!! शुभ रात्री” एवढं बोलून फोन कट. थोडं विचित्र वाटलं पण अनमोल असाच आहे.

त्याची पहिली भेट आठवली. खूप महिन्यांपूर्वी आमच्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून भरती झाला. गोल चेहरा, बारीक कापलेले केस, शिडशिडीत बांधा, उंचापूरा, लांब नाक, मोठाले डोळे आणि किंचित हसरा चेहरा असलेल्या अनमोलला भेटल्यावर काही विशेष वाटलं नाही पण जेव्हा त्यानं बोलायला सुरवात केली तेव्हा वेगळेपण जाणवलं. तो बोलीभाषेत न बोलता पुस्तकी बोलायचा. काम नीट करण्याविषयी सांगितल्यावर ताबडतोब विनम्रपणे नमस्कार करत तो म्हणाला“आपणास तक्रार करण्याची संधी मिळणार नाही याची पुरेपूर आणि शक्य ती काळजी घेईन. फक्त लोभ असू द्या. यथाशक्ती उत्तम प्रयत्न करीन. ” खरं सांगायचं तर मला त्याचं वागणं आणि बोलणं नाटकी वाटलं.

“गुड, ऑल द बेस्ट” मी शेकहँडसाठी हात पुढे केल्यावर नमस्कार करत म्हणाला “धन्यवाद”.

अनमोलचं व्यक्तिमत्व, वागणं, काम आणि बोलणं यात प्रचंड विरोधाभास होता. केवळ वाचलेले जड जड मराठी शब्द तो बोलताना सर्रास वापरायचा आणि तेच ऐकायला विचित्र वाटत होतं. इंग्रजी शब्द मात्र कटाक्षानं टाळायचा. कुणी ‘गुड मॉर्निंग’ म्हटलं की ‘आपला दिवस सुखकर जावो”असा प्रतिसाद द्यायचा. जरा हटके बोलण्यामुळं साहजिकच कंपनीत अनमोल चर्चेचा आणि चेष्टेचा विषय झाला. अनेकजण मुद्दाम त्याच्याशी बोलून मजा घ्यायचे. हे कळत असूनही अनमोलनं बोलण्याची पद्धत बदलली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अतिसौजन्यानं वागणारा अनमोल कामाच्या बाबतीत एकदम ढिला. कायम मोबाइल नाहीतर वाचत बसलेला. कामाकडे फारसं लक्ष नसल्यानं वारंवार चुका व्हायला लागल्या तेव्हा पुन्हा पुन्हा समज दिली परंतु काही फरक पडला नाही म्हणून सिक्युरिटी मॅनेजरला कळवल्यावर दुसऱ्याच दिवशी अनमोल भेटायला आला. “खूप व्यस्त तर नाही ना. काहीसं बोलायचं होतं”

“आता नको. उद्या बोलू. महत्वाचं काम चालूयं”

“व्यत्यया बद्दल क्षमा असावी. माझ्याकडून कामात कुचराई झाली. अक्षम्य चुका झाल्या म्हणून तुम्ही दबाव टाकलात”

“कसला दबाव? काहीही काय बोलतोयेस. ”

“आमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की तुम्ही नाराज आहात. ”

“तुझ्या कामात सुधारणा हवी एवढंच सांगितलं. दबाव बिबाव काही नाही. बाबा रे, चुकीचे शब्द वापरू नकोस. फार वेगळे अर्थ निघतात. असलं काही बोलण्यापेक्षा कामाकडे लक्ष दे. नाहीतर… ”मी पुढचं मुद्दामच बोललो नाही.

“जसा आपला आदेश, मनपूर्वक आभार आणि धन्यवाद”

“एक मिनिट, फक्त काम नीट कर एवढंच सांगितलंय. आदेश वगैरे काही दिलेला नाही. कळलं”माझा आवाज वाढला तेव्हा अनमोलचा चेहरा पडला. नमस्कार करून निघून गेला. मी कामात हरवलो.

 

संध्याकाळी घरी जाताना कळलं की दुपारीच अनमोल नोकरी सोडून गेला. धक्काच बसला. अनमोल असं काही वागेल असं अजिबात वाटलं नव्हतं. एकदम नोकरी सोडण्याइतकं काहीच घडलं नव्हतं. फोन केला पण त्यानं उचलला नाही. पुन्हा प्रयत्न केला तेव्हा फोन स्वीच ऑफ. त्यानं आपल्यामुळे नोकरी सोडली याचं वाईट वाटलं. भेटून समजावं असं वाटलं पण प्रयत्न करूनही भेट झाली नाही तेव्हा मीदेखील नाद सोडला. दोन महिन्यानंतर एका पुस्तक प्रदर्शनात अचानक अनमोल भेटला.

“अरे, भल्या माणसा, तुला किती फोन केले पण एकदाही उत्तर दिलं नाहीस. इतका रागावलास. ”

“मी व्यर्थ कशाला रागवेल. घरच्यांचा अतीव आग्रह, दबाव आणि चांगला पगार म्हणून ते काम स्वीकारलं. इच्छेविरुद्ध काम म्हणजे मनाला जाच. आता पुस्तकांच्या दुकानात काम करतोय. हे आमचंच प्रदर्शन आहे. इथं पगार कमी असला तरी काम आवडीचं आहे. माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं.”

“तू कामावर परत ये. मॅनेजरशी बोलतो”

“आपण दाखविलेल्या आपुलकीबद्दल धन्यवाद!! मला जीवनाचा मार्ग सापडलायं. ”

“म्हणजे”

“कायम पुस्तकांच्या सानिध्ध्यात रहायचं म्हणून या दुकानात काम करतोय. खजिन्याची चावी हातात आलीय असं समजा. वेगवेगळी पुस्तकं पहायला, हाताळायला, वाचायला मिळतात आणि पगारसुद्धा मिळतो सुख म्हणजे अजून काय असतं. ”

“नाहीतरी तुला वाचनाची आवड आहेच. ”

“आवड नाही वेड म्हणा. ”

“ते कसं”

“वडिलांची कृपा!! मजुरी करणारे वडील चौथीपर्यंत शिकले. इच्छा असूनही पुढं शिकता आलं नाही पण त्यांना वाचायचा नाद. रोज पेपर विकत घेऊन वाचायचे. वडिलांना पाहून मलाही वाचनाचा नाद लागला. माझी आवड समजल्यावर वडील रद्दीतून जुनी पुस्तकं आणून द्यायचे. कोणताही विषय वर्ज्य नव्हता. वाचत गेलो. त्यांच्या अपेक्षा होत्या पण माझं अभ्यासात फार डोकं चाललं नाही. कसाबसा दहावी पास झालो. आमच्याकडं पिढीजात गरीबी, आजूबाजूची परिस्थिती भयावह. भांडणं, मारामाऱ्या, शिव्या हे नित्याचच. परिस्थितीत फार सुधारणा झाली नसली तरी वाचनामुळं माझ्यात लक्षणीय बदल झाला. विचार सुधारले आणि बोलणं तर मी ठरवून बदललं अर्थातच त्यासाठी वाचनाचा खूप फायदा झाला. ”

“अच्छा म्हणजे मुद्दाम तू… ”

“म्हणून तर दखल घेतली जाते. *गर्दीत आपलं अस्तित्व दाखवायचं असेल तर वेगळेपणा पाहिजेच*”

“हुशारेस, फार पुढे जाशील” 

“आपल्यासारख्यांचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर काळजी नाही. पुन्हा नक्की भेटू यात. पुस्तकं जरूर घ्या. तुम्हांला विशेष सवलत द्यायला मालकांना आग्रह करतो. धन्यवाद!! ”अनमोलच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. निरोप घेऊन तो आपल्या कामाला गेला.

“बाबा, इज ही नॉर्मल”माझ्या मुलानं विचारलं.

“हंड्रेड पर्सेंट”

“मग असं का बोलत होते. ”अनमोलविषयी सविस्तर सांगितल्यावर मुलगा म्हणाला. “लकी मॅन”

“ काम तर सगळेच करतात. पैसे, प्रतिष्ठा मिळवतात. आवड मनाच्या खोल कप्प्यात बंद करून भलतंच काम करत राहतात. अनमोलच्या स्टाईल मध्ये बोलायचं तर *आवडीचं कामच उदरनिर्वाहाचं साधन असणं* यासारखे परमसुख नाही. प्रत्येकाच्या नशिबात हे नसतं. त्याबाबतीत हा खरंच सुदैवी. नावाप्रमाणेच *अ न मोल. *

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares