मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-6 ☆ श्री आनंदहरी ☆
श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ विटी-दाडू – भाग-6 ☆ श्री आनंदहरी ☆
'मssम्मी' म्हणून छोट्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला तसे रावसाहेब विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. त्यांचे लक्ष रडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेले.. एक मुलगा चेंडूने खेळता खेळता पडला होता. ते बाकावरून झटकन उठले आणि त्या रडणाऱ्या मुलाकडे गेले. तोवर एक त्या पडलेल्या मुलाच्याच वयाचा एक मुलगा दुसरीकडून धावत आला होता.
“कसा पडलास? बघू कुठं लागलंय?"
त्या मुलाकडे अविश्वासाने, संशयाने पहात त्याने उठण्यासाठी पुढे केलेला हात न घेता पडलेला मुलगा आणखीनच रडू लागला होता. रावसाहेब त्याच्या जवळ गेले. गुडघ्याला थोडेसे खरचटले होते.
“अरे, एवढा मोठा शूरवीर मुलगा तू.. आणि एवढंसं लागलंय आणि रडतोस?”
पडलेला मुलगा त्यांच्याकडेही अविश्वासाने आणि संशयाने पाहू लागला होता.
“तुला सांगतो माझ्या आईला एक जादूचा मंत्र येत होता… "
रावसाहेबांच्या वाक्क्याने ती दोन्ही मुले त्यांच्याकडे आश्चर्याने आणि उत्सुकतेने पाहू लागली तसे ते म्हणाले,
“लहानपणी आम्ही भावंडे खेळताना धडपडलो, पडलो की आम्हीसुद्धा असेच रडत होतो.. मग आई धावत यायची आणि म्हणायची ' खूप दुखतंय ना? थांब हं.. मी जादूने दुखणे गायब करते…'अल्लामत्तीर कोल्लामत्तीर छु ss!' हा जादूचा मंत्र म्हणून लागलेल्या ठिकाणी...