मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप-माणूस… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाप-माणूस… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(त्यांचा तो छोटासा व्हरांडा व्यवस्थित बंद करून घेतलेला होता. तिथे त्यांनी एक सेटी ठेवलेली होती. वडिलांच्या परवानगीने मी रात्री तिथे अभ्यासाला बसू लागलो. माझ्या सावत्र आईला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतंच.) 

इथून पुढे – – 

अभ्यास करता करता मी काही वेळा तिथेच झोपून जायचो. त्यांचा छोटा मुलगा कधी रात्री रडत असला, झोपत नसला तर त्याला खेळवायचो. रोजच्या सहवासाने तोही माझ्याकडे छान राहायचा. त्यामुळे वासंतीला ही जरा मोकळीक मिळायची. दिवसभर ती घरकाम आणि त्या छोट्याला सांभाळताना थकून जायची. विजयची विधवा आई गावाकडे त्याच्या भावासोबत राहायची. क्वचित कधीतरी ४-५ दिवस विजयकडे राहायला यायची. विजय आणि वासंतीला प्रेमविवाह दोन्हीकडच्या घरी मान्य नव्हता. त्यामुळे जवळचे नातेवाईकांचं येणं-जाणं असं नव्हतं च! विजयची पोलीस खात्यात नेमणूक झाली, तेव्हा वासंती सिनियर काॅलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होती. (एफ. वाय. बी. ए.). घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे जमवण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणून मग वासंतीला अठरा वर्षे पूर्ण होताच या दोघांनी गुपचूप रजिस्टर लग्न केलं. एक वर्षानंतर मुलाचा जन्म झाला. त्यामुळे वासंतीचं शिक्षण अर्धवटच राहिलं.

नियमित अभ्यास केल्यामुळे मला बारावीत अठ्ठ्याहत्तर टक्के गुण मिळाले. मी बी. काॅम. बरोबरच ICWA ला पण अ‍ॅडमिशन घेतली. डहाणूतील अरविंद देशपांडे यांच्या सी. ए. फर्ममध्ये मी नोकरी पण मिळवली. ते बाबांच्या परिचयाचे होते, त्यामुळे मला अभ्यास, परिक्षा सांभाळून, आॅफिसचं काम करायला सवलत द्यायचे.

इकडे विजयरावही खूप धडाडीने काम करत होते. आजूबाजूच्या परिसरातील गुंडांना त्यांनी चांगलाच चाप लावला होता. एकदा त्यांच्या बदलीची आॅर्डर आली, तरी लोकांनी ती रद्द करायला लावली. त्याऐवजी मग फक्त त्यांची डहाणू तालुक्यातल्या दुसर्‍या पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. एकंदरीत सगळं सुरळीत चालू होतं.

फेब्रुवारीचा महिना होता. माझी फायनल इयरची परीक्षा जवळ आली होती. त्यामुळे मी पण जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवत होतो. खाण्या-पिण्याची देखील शुद्ध नसायची. वासंती जबरदस्तीने मला कधी चहा-नाश्ता तर कधी जेवण घ्यायला लावायची. माझ्या सावत्र आईला माझं काही सोयर-सुतक नव्हतंच. वडील बाहेर दौऱ्यावर असतील तेव्हा ती आपल्या मैत्रिणींना घरी बोलावून मजा करत असायची नाहीतर त्यांच्यासमवेत बाहेर भटकत असायची.

त्या दिवशी देखील मी रात्री उशिरापर्यंत वाचत बसलो होतो. आणि रात्री एक वाजता अचानक कोणीतरी दार ठोठावलं. मी भांबावून गेलो. तेवढ्यात तोआवाज ऐकून बाजूच्या घरातून माझे वडील बाहेर आले. ते नेमके त्या दिवशी घरी होते. मग मीदेखील दार उघडून बाहेर डोकावलो. एव्हाना वासंती देखील जागी होऊन व्हरांड्यात आली होती.

एक पोलीस वडिलांना हळूहळू काहीतरी सांगत होता. ते दोघेही गंभीरपणे वारंवार विजयच्या घराकडे बघत होते.

मी दार उघडलेलं पाहून वडील आणि तो पोलीस तिकडे आले. वडील मग वासंतीला म्हणाले की, विजयरावांना अपघात झाला आहे आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. तुमच्या घरच्या कोणाचा फोन नंबर असेल तर द्या. हे ऐकून वासंतीला एकदम भोवळच आली. बाळ झोपलेलं होतं. मी पटकन पाणी आणलं आणि वासंतीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. तोवर माझी आईदेखील तिथे येऊन वासंती जवळ बसली. वडिलांनी शेजारच्या वाड्यातल्या कोणाला तरी डाॅक्टरला बोलवायला पाठवले.

मला एकदम आठवलं की विजयरावांची डायरी घरात टेबलच्या ड्राॅवरमध्ये असते. मी डायरी चाळून बघितली, शेवटच्या पानावर त्यांच्या भावाचं नाव आणि एक फोननंबर लिहिलेला होता. तो मी वडिलांना दाखवला.

वडील मग त्या पोलीसासोबत हाॅस्पिटलमध्ये गेले. सारं काही संपलं होतं. विजयरावांचा बाईकला ट्रकची धडक बसल्याने, ते जागेवरच गेले होते. वासंतीला हे कसं सांगायचं हा मोठाच प्रश्न होता.

मी दिलेल्या नंबर वर फोन करून विजयच्या भावाला निरोप दिला गेला. तो फोननंबर गावातल्या – पोलीस स्टेशनचा होता. तेव्हा घरोघरी फोन आलेले नव्हते. मग तिथल्या पोलिसांच्या मदतीने एक जीप मिळवून विजयची आई, भाऊ-भावजय आणि काही गाववाले पहाटे डहाणूला पोचले. वासंतीची आई, भाऊ-वहिनी देखील सकाळी येऊन पोचले.

आल्या आल्या विजयच्या आईने हंबरडा फोडला आणि वासंतीच्या नावाने शिमगा मांडला. हिच्यामुळे माझा मुलगा गेला. तिनंच त्याला माझ्यापासून तोडलं आणि आता कायमचा दूर गेला. त्या तश्या प्रसंगीदेखील या दोन परिवारात तूतू मैमै सुरू होती. या सर्व हल्ल्यामुळे, डाॅक्टरांनी इंजेक्शन दिल्याने जरा शुद्धीवर येत असलेल्या वासंतीची दातखिळीच बसली. डाॅक्टर तिथेच थांबले होते म्हणून बरं! त्यांनी लगेच उपचार केले आणि नंतर मात्र तिला शांत झोपवून ठेवण्यासाठी एक गोळी देऊन गेले.

या प्रसंगाला कसं तोंड द्यावं हे मलाही समजत नव्हतं. विजयच्या घरच्यांनी बाकीचे सगळे सोपस्कार पार पाडले. मी फक्त त्या छोट्याला सांभाळत होतो. कारण माझी सवय असल्याने तो फक्त माझ्याकडेच शांत राहात होता. आपल्या आईला काहीतरी झालंय एवढंच त्या छोट्या जीवाला कळत होतं.

विजयरावांचा अंत्यसंस्कार आटोपल्यावर वासंतीच्या माहेरचे लोक निघून गेले. लोकलाजेस्तव फक्त सासू आणि दीर-जाऊ तेवढी राहिली होती. दिवसकार्य आटोपल्यावर तेही निघून गेले. जाताना दीर अंत्यसंस्कारासाठी आणि दिवसकार्यासाठी खर्च केलेले पैसे मागून घ्यायला विसरला नाही. त्या दहा दिवसांतही सासूच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू होता, वासंतीला शिव्या घालण्यासाठी! आधी प्रेम नव्हतेच, पण आता विजय गेल्यावर त्याच्या बायको-मुलाशी तर त्यांना काहीच संपर्कही ठेवायचा नव्हता, मग जबाबदारी घेण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

एवढ्या भयंकर आघाताने वासंती पार कोलमडून गेली होती. शेजारधर्म म्हणून माझी सावत्र आई मात्र तिला दोन घास जबरदस्तीने खायला घालत होती. वासंतीची अवस्था फारच वाईट झाली होती. आपल्या मुलाला कवटाळून ती वारंवार हंबरडा फोडून रडायची आणि तिची शुद्ध हरपायची. मला अभ्यास सुचणं शक्यच नव्हतं. मी त्या छोट्याला घेऊन आत-बाहेर करत राहायचो आणि त्याला भात-खिचडी असं खाऊ घालायचो.

साधारण महिनाभरानंतर वासंती थोडीशी सावरली. आपल्या मुलाला आपणच जेवू-खाऊ घातलं पाहिजे, याची तिला जाणीव झाली. मग ती काहीतरी अन्न रोज शिजवू लागली. पोलीसस्टेशनमधून एक हवालदार काही कागदपत्रं देऊन गेले होते. नोकरीत कामावर असताना विजयरावांचा मृत्यू झाल्यामुळे नियमानुसार जे काही पैसे त्यांच्या कुटुंबाला मिळायला हवे, त्यासाठीचे अर्ज त्यात होते. शिवाय अनुकंपा तत्त्वावर वासंतीला पोलीस खात्यात नोकरी मिळण्यासाठीचा अर्जही त्यात होता.

मरणारा तर निघून जातो, पण मागे राहिलेल्याला जगण्यासाठी सर्व धडपड करावीच लागते. पैशाचं सोंग तर आणता येत नाहीना! वासंतीकडे तरी कुठून फारसा पैसा असणार? कुटुंबाचा आधार तर बिलकुलच नव्हता. घराचं भाडं, रोजचं दूध, भाजीपाला आणि लहानग्याचं संपूर्ण भविष्यच आ वासून समोर उभं होतं. माझ्या आणि पोलीस स्टेशन मधल्या इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने, तिने ते सर्व सोपस्कार पूर्ण केले. सरकारी कामकाज म्हटलं की त्याची कार्यवाही व्हायला वेळ तर लागणारच. या सगळ्यात तीन महिने असेच निघून गेले.

– क्रमशः भाग दुसरा 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाप-माणूस… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाप-माणूस… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

विराज त्याच्या सर्टिफिकेटसची फाईल घ्यायला घरी आला होता. ती त्याला स्कॅन करून मेलनी

नाशिकच्या ऑफिसला लगेच पाठवायची होती.

आजपर्यंत कधी त्याला स्वतःला फाईल कढून घ्यायला लागली नव्हती. काही हवं असलं तर बाबाच काढून द्यायचे त्यांच्या खणातून.

पण यावेळी बाबा घरी नव्हते, मग काय करणार?

त्याचं असं झालं की विराज यू. पी. एस. सी. ची परीक्षा पास झाला होता. चार दिवसांपूर्वी त्याचा रिझल्ट लागला आणि नेमकी त्याच दिवशी त्याच्या आईची तब्येत बिघडली. तिचं ब्लडप्रेशर एकदम खाली आलं आणि चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. शेजारच्या काकूंनी ऑफिसमध्ये फोन करून बाबांना बोलावून घेतलं. ते तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण त्यांनी आईला इस्पितळात दाखल करून घेतलं. त्यामुळे बाबा

सुट्टी घेऊन तिच्याजवळ थांबत होते. विराजही येऊन -जाऊन चौकशी करत होताच. पण त्याला दोन दिवसांनी नाशिकला इंटरव्ह्यूला जायचं होतं, आय. पी. एस. च्या पोस्टसाठी. त्या तयारीच्या गडबडीत असल्याने त्याला जास्त वेळ आईजवळ थांबता येत नव्हतं आणि बाबांनीही त्याला ती मोकळीक दिली होती.

त्याची धाकटी बहीण वरदा बी. काॅम. च्या शेवटच्या वर्षाला होती. तिची परीक्षा चालू होती. त्यामुळे ती देखील

आईजवळ जास्त वेळ थांबू शकत नव्हती. ती क्लास, अभ्यास आणि परीक्षा यातच गुंतलेली होती.

बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खणात फाईल मिळाली. विराज त्याला पाठवायला लागणारी सगळी सर्टिफिकेट आहेत ना हे तपासून बघत होता. पण त्याला त्याचा शाळा सोडल्याचा दाखला त्यात दिसत नव्हता. मग तो खणात खाली पडलाआहे का म्हणून शोधू लागला. तेव्हा खणात सर्वात खाली एक फाईल दिसली ती पण त्याने उघडली आणि त्यातील कागदपत्रे पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याचं डोकं गरगरायला लागलं. तो डोकं धरून खाली बसला. तेवढ्यात…

तेवढ्यात लॅच उघडल्याचा आवाज आला. त्याचे बाबा

आले होते. विराज, मिळाली ना सगळी कागदपत्रं? असं विचारत ते बेडरूममध्ये आले. विराज चटकन सावरून बसला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही आत्ता कसे काय घरी आलात? ‘अरे, सी विंग मधल्या जोशी काकू आईला भेटायला आल्या होत्या, त्या म्हणाल्या मी संध्याकाळपर्यंत थांबण्याच्या तयारीने आलेय. तुम्हाला हवं तर घरी जाऊन या. म्हणून मी आलो, म्हटलं तुला कागदपत्रं व्यवस्थित लावायला आणि इतरही काही काम असलं तर मदत होईल. मी चहा करणार आहे, तू घेणार आहेस का?

विराजनी त्यांना होकार दिला. एक तर डोकं गरगरत असल्याने ते जागेवर आणायला त्याला चहाची गरज होतीच. शिवाय या विषयावर बाबांशी बोलायला,

शब्दांची जुळवा-जुळव करायला त्याला थोडा वेळ मिळाला असता. असं काय बरं होतं त्या फाईल मध्ये?

बाबांनी चहा केला आणि दोन्ही कप घेऊन ते विराजकडे आले. चहा पिताना विराज विचारमग्न झाला होता. त्याला इंटरव्ह्यूचं टेंशन आलंय असं बाबांना वाटलं. त्यांनी चहा पिऊन कप बाजूला टिपाॅयवर ठेवला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, काय झालं रे बेटा?

विराजच्या डोळे भरून आले, त्याने ती फाईल बाबांकडे देत विचारलं, हे काय आहे बाबा?

त्या फाईलमध्ये एक ॲफिडेविट होतं आणि विराजचा जन्म दाखला. जन्म तारीख आणि आईचं नाव.. वासंती तेही बरोबर होतं. पण वडिलांचं नाव विजय पवार? त्याच्या बाबांचं नाव तर श्रीधर अभ्यंकर होतं. त्या ॲफिडेविटमध्ये श्रीधर अभ्यंकर यांनी विराजला दत्तक घेतल्याचं म्हटलं होतं. आईचे नाव पूर्वाश्रमीच्या वासंती पवार आणि आताची वासंती श्रीधर अभ्यंकर, असा उल्लेख होता. विराजला आजवर यातलं काहीच माहीत नव्हतं.

बाबा जरासे गंभीर झाले. ‘बाळा, तुला हे कधीच कळू नये अशीच तुझ्या आईची आणि माझी इच्छा होती. पण हरकत नाही. आता तू मोठा आहेस, तुला मी सारं काही थोडक्यात सांगतो. जा, आधी तोंड धुवून जरा फ्रेश होऊन ये आणि तुझी फाईल व्यवस्थित ठेव. हे बघ, शाळा सोडल्याचा दाखला पण आहे तुझ्या याच फाईलमध्ये, दहावीच्या मार्कलिस्टच्या खाली!

विराज परत आला आणि बाबा सांगू लागले.

माझा जन्म डहाणूचा. माझे बाबा एका औषध कंपनीत मार्केटिंग ऑफिसर होते. त्यांना कामानिमित्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नेहमी फिरावं लागे. माझी आई गृहिणी होती. मला भावंडं नव्हतं. शाळेत पहिल्या तीनात माझा नंबर असायचा आणि मार्क ऐंशी टक्क्यांहून अधिक. आमचं घर मोठं पाच खोल्यांचं होतं. मला अभ्यासाला स्वतंत्र खोली होती. पण मी सातवीत असताना माझ्या आईला न्यूमोनिया झाला आणि त्यातच ती देवाघरी गेली. मी सैरभैर झालो. माझं अभ्यासात लक्ष लागेना. त्यावर्षी जेमतेम पास झालो. आईचे बाबा संधिवाताने अंथरूणाला खिळलेले, त्यामुळे आजीला त्यांच्यासोबत मनमाडला राहणं आवश्यक होतं. एकुलत्या एक लेकीच्या अकाली मृत्यूने ती दोघं आणखीनच खचली होती. बाबांचे आई-वडील कोकणात एका खेड्यात राहातं होते. तिथली नारळ -सुपारीची बाग आणि घर सोडून, कायमचं डहाणूला येणं त्यांना शक्य नव्हतं. तरीही तीन -चार महिने ते माझ्यासाठी येऊन राहिले.

सहा महिन्यानंतर मात्र त्यांनी बाबांनी दुसरं लग्न करावं, असा धोशा लावला. आईच्या वर्षश्राद्धानंतर बाबांनी दुसरं लग्न केलं आणि माझ्या नशिबी सावत्र आईचा जाच आला. तिला स्वैपाक, घरकाम यात बिलकुल रूची नव्हती. ती स्वतःपुरतं काहीतरी बनवून खायची. बाबा फिरतीवर असायचे आणि अनेकदा मला उपाशीपोटी झोपायला लागायचं. बाबा घरी असले म्हणजे निदान जेवायला मिळायचं. बाबांना सांगायला गेलं तर याचे खूप नखरे आहेत खाण्यापिण्याचे, असा कांगावा करून ती तमाशा करायची. म्हणून मी त्यांना सांगणंच सोडून दिलं. शाळेत अनेकदा मी मित्राच्या डब्यातलं खायचो. घरात असलो तर ती काही ना काही काम करायला लावून मला त्रास देत असे आणि तिचं टीव्ही बघणं, लोळत फिल्मी मासिकं वाचणं चालू असे.

दहावीला मला जेमतेम बासष्ट टक्के मिळाले आणि मी डहाणूच्या काॅमर्स काॅलेजमध्ये ॲडमिशन घेतली. घरातलं वातावरण असं असल्याने मी शक्यतो काॅलेजच्या लायब्ररीतच अभ्यास करत बसायचो किंवा मग मित्रांबरोबर बाहेर वेळ काढायचो आणि संध्याकाळी उशिरा घरी यायचो. याचा परिणाम असा झाला की, माझी खोली आणि तिला जोडून असलेली दुसरी खोली भाड्याने द्यायला तिनं बाबांच्या गळी उतरवलं. म्हणजे माझ्याच काॅलेजच्या खर्चासाठी पैसे मिळतील, असं तिचं म्हणणं.

त्याचवेळी विजय पवार नावाचे सबइन्स्पेक्टर बदलीमुळे डहाणूला आले. त्यांना भाड्याने घर हवं होतं.

मग ते त्यांची बायको वासंती आणि सहा महिन्यांचा छोटा मुलगा असे त्या घरात राहायला आले विजयराव त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे बराच वेळ बाहेरच असायचे. कधी रात्री-बेरात्री उशिरा घरी यायचे.

आता माझी सावत्र आई रात्री उशिरापर्यंत हाॅलमध्ये टी. व्ही. बघत बसलेली असायची आणि बेडरूम तर आई-बाबांची, त्यामुळे मला घरात अभ्यास करायला जागाच राहिली नव्हती. स्वैपाकघर तसं लहान होतं आणि या आईचं कामात धड लक्ष नसल्याने ते फारसं स्वच्छही नसायचं. मग मी बऱ्याचदा मागच्या व्हरांड्यात खुर्ची आणि स्टूल घालून अभ्यास करत बसायचो. विजयरावांनी ते बघितलं होतं आणि माझी कुचंबणाही त्यांच्या लक्षात आली. मग त्यांनी एक दिवस मला विचारलं की ‘ तू रोज रात्री आमच्या बाहेरच्या व्हरांड्यात अभ्यासाला बसशील का? म्हणजे वासंतीला पण सोबत होईल. मला माझ्या ड्यूटीमुळे अनेकदा रात्री घरी यायला मिळत नाही ना! ‘ 

त्यांचा तो छोटासा व्हरांडा व्यवस्थित बंद करून घेतलेला होता. तिथे त्यांनी एक सेटी ठेवलेली होती. वडिलांच्या परवानगीने मी रात्री तिथे अभ्यासाला बसू लागलो. माझ्या सावत्र आईला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतंच.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आधुनिक कर्ण आणि जपलेला आत्मसन्मान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ आधुनिक कर्ण आणि जपलेला आत्मसन्मान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

मी डी मार्टमध्ये नोकरीला आहे, बहुतेक वेळा मी कॅश काऊंटरवर असते. इतर किराणा दुकानांपेक्षा आणि अन्य मॉलपेक्षा आमच्याकडे वस्तूंच्या किंमती खूपच कमी असल्याने आमच्याकडे नेहमीच खूप गर्दी असते.

आज दुपारी चारच्या सुमारासही तशीच परिस्थिती होती. माझ्यासमोर आमच्याच चाळीतील कुसुम तिनं घेतलेलं सामान माझ्या काऊंटरवर ठेवत होती.

कुसुम घरकाम करायची, नवरा दारूडा होता, लिव्हर खराब होऊन मेला गेल्या वर्षी. घरी सासू, एक बालवाडीत जाणारं मूल आणि एक दोन वर्षांचं बाळ – आणि या सगळ्यांचा गाडा एकटी कुसुम ओढत होती.

आजसुद्धा तिच्या खरेदीत निरमा साबण पावडर, आंघोळीचे साबण, तिखट – मीठ, तांदळाच्या कण्या आणि अशाच अगदी आवश्यक वस्तू होत्या, नाही म्हणायला दोन रुपयांचे एक लॉलीपॉप घेतलं होतं तिनं – तिच्या त्या बास्केटमध्ये बिनजरुरी असा एकच काय तो आयटम होता.

मी सराईतपणे पटापट वस्तूंची नोंद केली, अशा वस्तू होत्याच किती म्हणा! आणि बिल झालं ५३९ रुपये.

“अरं माझ्या कर्मा! पाचशेच्या वर बिल झालं! आता काय कमी करू मी?  माज्यापाशीतर पाचशेचीच येक नोट हाय.”

ती मला फारशी ओळखत नसली, तरी मी तिला चांगले ओळखत होती. बहुतेक वेळी बसचे दहा रुपये वाचावेत म्हणून मैलोनमैल पायपीट करत जायची ती, शेअर रिक्षाचासुद्धा कधी तिनं विचार केला नाही.

या जास्तीच्या ३९ रुपयांचं उत्तर तिच्याकडे नसणार, ठाऊक होतं मला. मी केली असती मदत, पण आमचीही महिनाअखेर होती, एकादशीच्या घरी महाशिवरात्र.

मी माझ्या सुपरवायझरकडे शब्द टाकणार, एवढ्यात रांगेत कुसुमच्या मागे उभी असलेली बाई खाली वाकली. कुसुमचं बोलणं रांगेतल्या सगळ्यांनीच ऐकलं होतं, या बाईनं ऐकलं असणारच.

जमिनीवर पडलेली दोनशे रुपयांची एक नोट उचलून कुसुमला देत ती म्हणाली, “ताई, तुम्ही मगाशी तुमची पर्स उघडलीत, तेव्हा तुमच्या पर्समधून ही नोट पडली, घ्या. “

काय चाललं होतं माझ्या लक्षात आलं. त्या बाईला कुसुमला मदत करायची होती, पण तिला ओशाळं वाटू द्यायचं नव्हतं.

“न्हायी वो, माज्यापाशी न्हवती दोनशेची नोट, ” कुसुम प्रामाणिकपणे सांगत होती.

त्या बाईने मदतीच्या अपेक्षेने माझ्याकडे पाहिलं, मी मान डोलावली, कुसुमला म्हटलं, “बाई, तुमच्याच पर्समधून पडली ती दोनशेची नोट. “

गोंधळलेल्या कुसुमने तिची पाचशेची आणि ही दोनशेची अशा दोन नोटा मला दिल्या, मी तिचं सामान आणि उरलेले पैसे तिला परत केले.

तिच्या मागे रांगेत उभ्या असलेल्या त्या बाईला कुसुमला पैसे देऊ करणं शक्य होतं, पण या आधुनिक कर्णानं कुसुमला दानही दिलं, आणि तिच्या आत्मसन्मानाला ठेचही लागू दिली नाही.

देव त्या माऊलीचं भलं करो!

 श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाणवसा… लेखिका : सुश्री नीता र. कुलकर्णी ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

🔆 जीवनरंग 🔆

☆ वाणवसा… लेखिका : सुश्री नीता र. कुलकर्णी ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

वाणवसा…

संक्रांतीच्या सणाची अगदी धामधूम चालली होती. नव्या नव्या भारी साड्या नेसून सगळ्या बायका संक्रान्तिचे खण/सुगडं घेउन इकडे तिकडे जात होत्या. दुकाना-दुकानातून संक्रांतीला लुटण्यासाठी लहान मोठ्या वस्तू घेण्यासाठी अगदी झुंबड उडाली होती.

इकडे साठे वकिलीणबाई आणि घोडके डॉक्टरिणबाईंची चर्चा अगदी मोठ्या रंगात आली होती. चर्चेचा विषय होता संक्रांतीचे हळदीकुंकू. किती बायका बोलवायच्या, काय लुटायचे, पैठणी की शालू नेसायचा वगैरे वगैरे फारच महत्वाच्या विषयावर त्या बोलत होत्या. त्यातच मग गोरे इंजिनिअरिण बाई आणि स्वत:ला साहेबिण बाई म्हणविणाऱ्या ४-५ उच्चभ्ऱू बायका सुध्दा सामिल झाल्या त्यात त्यात सकाळी वाणवसा करायला कोण कोण आले होते याचाही उहापोह झाला. सर्वजणी मी संक्रातिचे सुगडं किती मोठं आणि महागातलं महाग घेतलं हे सांगू लागली. त्यातच त्या कॉलनीत सर्वांच्या कडे मोलकरणीची काम करणारी सीताबाई आज नेमकी सणाच्या दिवशीच आली नाही म्हणून तिच्यावर तोंडसूख घेण्यात आले. ” मेली नवऱ्याच्या आजारपणाचे निमित्त करून हल्ली फारच दांड्या मारते ” असा शेराही मारला गेला. त्यात ओघानेच विषय मालती बाईंचाही निघाला. साठे बाई म्हणाल्या ” स्वत:ला फारच शहाणी समजते ही मालतीबाई. आज वाणवसा करायला का आली नाही म्हणे तर सासूबाईंची तब्येत बरी नाही आणि नवऱ्याला सकाळी लवकर जायचंय म्हणून डबा करायचाय म्हणून येणे जमले नाही ”

मालतीबाई म्हणजे त्या हाय- फाय कॉलनीत चूकून रहायला आलेली मध्यम वर्गीय फॅमिली. मालतीबाईंचा नवरा माधव देशपांडे कचेरीत नूसता क्लार्कच आहे म्हणून तिच्या माघारी सर्वजणी तिला कमी लेखत असत. मालतीबाईच्या सासऱ्याने आपली रिटायरमेंट नंतरची सगळी पूंजी घालून हे मोठ्या नि या पॉश कॉलनीत घर घेतले होते. ही फॅमिली जरी या पॉश कॉलनीत रहायला आली असली तरी बाकीच्या खर्चासाठी ती माणसे आपले अंथरूण पाहून पाय पसरणारी होती. बाकिच्या उच्चभ्ऱू बायकांचे नखरे मालतीला परवडण्यासारखे नव्हते. म्हणून ती त्या बायकात जास्त मिसळत नव्हती. त्यामूळे दूपारच्या वेळी ती लहान मुलांच्या शिकवण्या करुन महिन्याला १-२ हजार रुपये कमावत होती. तेव्हढाच संसाराला हातभार. त्यामूळे मालती बाईला त्या बायकात जाउन चकाट्या पिटायला वेळ नव्हता तसेच ती त्यांच्या महिला मंडळाची मेंबर सुध्दा नव्हती. या सर्व कारणा मूळे बाकिच्या बायका तिला

“शिष्ट मेली” संबोधत होत्या.

या चर्चेत दामलीण बाई तर म्हणाल्या ” मी तर याना स्पष्टच सांगितले की आज मला वाणवसा करायचा करायचाय. सीताबाई सुध्दा आज येणार नाही तर तुम्ही आज बाहेरच जेवा. पोरानाही बजावून ठेवलंय जेवायला आज उशिर होईल. माझा वाणवसा झाल्यावर पोराना ब्रेड नि जाम खायला दिले. आणि ही मालतीबाई वाणवसा न करता स्वयंपाक करत बसली. सांगायचं एक दिवस नवऱ्याला जेवा बाहेर म्हणून. काय त्या म्हाताऱ्या सासूचे एव्हढे कौतूक करत बसते, तिला जेउ काय घालते, तिचे अंथरूण काय घालते, तिला औषधे काय देते!! ” अशी जोरदार चर्चा चालू होती. त्यात दोडके बाईने सागितले की सकाळी सकाळी सीताबाई आली आणि मला ५०० रुपये द्या म्हणू लागली. मी तिला स्पष्टच सांगितले की यानी मला पैसे ठेवलेत पण त्याच्या मला हळदी कुंकवाला लूटायला भारी डिश आणायच्यात म्हणून. इतरही साळकाया म्हाळकायानी सांगितले ” हो गं माझ्याकडेही मागत होती तोंड वेंगाडून सीताबाई पैसे. मी साफ सांगितले नाहीत माझ्याकडे म्हणून. ”

ठरल्या प्रमाणे संध्याकाळी सर्वांकडे हळदी कुंकू पार पडले. अत्तरे, स्प्रे यांची बरसात झाली. भारी भारी वस्तू लूटल्या गेल्या. साड्या, दागिने यांचे रसभरित वर्णन व कौतूक (वास्तविक तोंडावर कौतूक व माघारी नावे ठेवणे) झाले. संध्याकाळी सुध्दा मालती बाई कोणाकडेच हळदीकुंकवाला आली नाही म्हणून नावे ठेवली गेली.

दूसरे दिवशी सीताबाई कामाला आली म्हणून सर्वांचे जीव भांड्यात पडले. सर्वानी तिच्यावर सणादिवशी का दांडी मारलीस म्हणून तोंडसूख घेतले. तिने फक्त नवऱ्याची तब्येत बरी नव्हती एव्हढेच सांगितले. पण घोडके डॉक्टरिण बाईने विचारले सणाच्या दिवशी का दांडी मारलीस तेव्हा सीताबाई ऐवजी घोडके डॉक्टरांनीच उत्तर दिले, ” अगं तूला माहित नाही का, काल तिचा नवरा रामू अगदी मरता मरता वाचला. आपल्या शेजारच्या मालती बाई त्याला आपल्या दवाखान्यात घेउन आल्या होत्या. ” डॉक्टरांचे बोलणे ऐकून सीताबाईंचे डोळे भरून आले. सीताबाई म्हणाली ” खरच डॉक्टर साहेब म्हणतात ते अगदी ख्रं आहे काल माझा नवरा एकदम जास्तीच आजारी झाला. तापानी फणफणत होता. त्याच्या इलाजासाठी मी तुमच्या सगळ्यानकडे पैसे मागत होते. पण तुम्ही कुणीच मला पैसे दीले नाहित. पण आपल्या मालतीबाईनी मला पैसे दिले. नूसतेच पैसे दिले नाहित तर मी फारच घाबरलेली आणि गांगरलेली बघून त्या स्वत:च माझ्याबरोबर दवाखान्यात यायला तयार झाल्या. अगदी रिक्षा आणून दवाखान्यात ॲड्मिट करेपर्यंत त्यानी मदत केली. डॉक्टरसाहेब म्हणाले सुध्दा लवकर आणलेत म्हणून बरे झाले नाहितर आणखी गुंता (कोंप्लिकेशंस) वाढले असते. लवकर उपचार मिळाले म्हणून बरे झाले. मालती बाई सकाळी यायला तयार झाल्यावर मी म्हटलं सुध्दा की तुम्ही कसं काय येणार?  तुमचा अजून वाणवसा व्हायचाय. संध्याकाळी हळदी कुंकवाला बायका पण बोलावल्या असतील ना. तर मला म्हणाल्या, ” अगं वाणवसा म्हणजे आनखीन दूसरे वेगळं असं काय असतं?  एखादं वाण म्हणजेच दान द्यायचं असतं, दान द्यायचा वसा घ्यायचा असतो. म्हणजे दान करायचं असतं. मग जे दान द्यायचं ते सत्पात्री असावं. ज्याला द्यायचंय त्याला त्याची किती गरज आहे हे महत्वाचं आहे. ज्या सवाष्णी ला त्याची खरी गरज आहे तिला ते दान मिळणं गरजेचे आहे. भूकेलेल्याला अन्न देणं जितकं महत्वाचे आहे तितकेच गरजवंताला वेळेत मदत करणे हा फार मोठा वाणवसा आहे. पुर्वी गाडगी मडकी हिच संपत्ती होती त्यात बोरं, उस, हरभरा इत्यादी घालून त्याचं दान केलं जायचं. पण आत्ताच्या काळात गाडगी नि मडक्यांचा तसा काहिच उपयोग नाही. तरी सुध्दा बायका त्याचे स्तोम माजवतात. यात आपल्या संस्कृतिला नावे ठेवण्याचा अजिबात उद्देश नाही. कालमानानुसार त्यात जरूर ते बदल घड्वून आपली संस्कृती नक्कीच जपावी. ” त्यानी त्यांच्या नवऱ्याने दिलेले लूटायच्या वस्तू आणायचे पैसे मला दिले. डॉक्टरसाहेबानी सुध्दा मला खूप मदत केली.

हे ऐकल्यावर डॉक्टर म्हणाले ” खरंच मालती बाईंचे म्हणणे अगदी रास्त आहे. आज तुम्हा सर्वांच्या पेक्षा मालती बाईंचा खरा वाणवसा झाला असे मी म्हणेन. एका सवाष्णीच सौभाग्य वाचवण्यासाठी त्यानी जी मदत केली, जे प्रयत्न केले किंवा जी आर्थिक मदत केली तोच खरा वाणवसा. सीताबाईला मदत म्हणून त्या दिवसभर रामू पाशी थांबल्या, कुठेही हळदी कुंकवाला गेल्या नाहित. त्यांच्या मदतीमुळे रामूचे प्राण वाचलेत. त्या आधी नवऱ्याची बायको म्हणून, सासूची सून म्हणून, मुलांची आई म्हणून जी काय कर्तव्ये आहेत ती आधी पार पाडतात आणि मग देव धर्म, हळदी कुंकू, महिला मंडळ या गोष्टीना महत्व देतात. तुम्हा सर्वानी हल्लीच्या दिवसात त्यांच्यापासून हाच बोध घेतला पाहिजे. ”

एव्हाना महिला मंडळाच्या मिटींग साठी एकेक करून सर्व बायका डॉक्टरिण बाईंच्या घरी जमल्याच होत्यां त्या सर्वानी डॉक्टरांचे बोलणे ऐकले आणि त्याना ते खरोखरच पटले. सर्वानी मालती बाईना बोलावून आणले. त्याना हिणवल्या बद्दल त्यांची माफी मागितली.

सर्व जणीनी पुढच्या वर्षी पासून खऱ्या अर्थाने ” वाणवसा” करण्याचे नक्की केले.

लेखिका : सुश्री नीता र. कुलकर्णी

हैदराबाद.

प्रस्तुती : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खिडकी… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ खिडकी… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

रिक्षावाल्यानं बरोबर स्टेशनच्या दारासमोर रिक्षा उभी केली. त्याला हातात चुरगाळत घेतलेल्या नोटांपैकी एक नोट देत पळतच ती तिकीट खिडकीकडे पळाली. “आता कोणती ट्रेन उभी आहे…?”

तिचा प्रश्न ऐकून आपल्या नाकावरच्या चष्म्यातून बघत तो म्हणाला, “तासाभराच्या प्रवासाची… ह्या पुढचा ट्रेनचा लास्ट स्टॉप आहे. ”

“मला ना प्रवासाला जायचंय… मला द्या ह्याच ट्रेनचं तिकीट. ”

त्यानं हसत पिसीवर टायपिंग केलं… “मॅडम, हीच ट्रेन परतीची आहे तासाभरात. ते पण देऊ का…? ”

त्याच्या ह्या प्रश्नावर ती म्हणाली, “म्हणजे परत येऊच का? तिथून पुढं दूर निघून जाणारी ट्रेन असेल ना…! ”

तो हसला… “किती दूर जाता मॅडम… कुठंही जा, पळसाला पानं तीनच! ”

ती आणखीनच चिडली, “कुठंतरी सापडेल एका पानाचं पळस! ”

तो म्हणाला, “काय कामाचं ते एक पानाचं पळस! एखादा दिवस आवडेल तुम्हाला… परत वाटेल, नकोच… आपलं साधंच बरं नेहमीचं! ”

एवढं बोलत त्यानं तिकीट तिच्या हातात दिलं. म्हणाला, “खास विंडो सीट येता जाता… अशी खिडकी जी बाहेर डोकवता डोकवता आतही डोकवायला लावते… प्रवासातली खिडकी! ”

त्याच्या बोलण्यावर डोळ्याच्या कोपऱ्यातून रागाचा कटाक्ष टाकत ती पळाली. दादरा चढताना ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे बघतच होता. त्यानं बदमाशपणानं अभिमान मधल्या अमिताभसारखं बोट ओठाजवळ नेत तिला डोळ्यानं खुणावलं, तशी ती चिडून हात उगारत पळाली.

हे सगळं बघणारा शेजारचा पाटणकर उठून त्याच्याजवळ आला. त्याच्या खांद्यावर हात थोपटत म्हणाला, “काय हो, ओळखीची आहे का? ”

हसत चष्मा नाकावर सरकवत तो म्हणाला, “शी इज मिसेस माने. ”

पाटणकर आ करून बघत राहिला… “अरे, तेच म्हणतो मी. तू त्यांना नाव न विचारता तिकीट दिलंस, तेव्हाच वाटलं, पण अरे त्या गेल्या कुठं? ”

“खिडकीला भेटायला…” असं माने म्हणताच पाटणकर ओरडला, “what…? काय म्हणालास…? खिडकीला भेटायला? म्हणजे काय?? ”

“चल कॉफी घेऊ आपण… ए जोशी, जरा काऊंटरवर लक्ष दे. आम्ही आलोच. तसंही आता तुम्ही तिघं आहात. ”

माने आणि पाटणकर कॉफी घेण्यासाठी आले. माने म्हणाले, “कसं आहे ना दोस्ता, आपण ह्या आयुष्याच्या प्रवासात पळत असतो. जे वाट्याला आलं, ते आपल्या परीनं रडत-कुढत, स्वीकारत, चिडत आयुष्य जगत असतो. खरंतर प्रत्येकाला गरज असते, रेल्वेची खिडकी पकडून मागं पळणाऱ्या झाडासोबत आपलं आयुष्य मागंही कसं होतं, हे कधीतरी बघण्याची… म्हणजे त्या खिडकीत बसून आपल्या मनाच्या आतल्या खिडकीत डोकावण्याची.

कधीतरी असं वाटलं, की हे असं करायचं… मग ती जरा रिलॅक्स होते. मुळात तिला आयुष्यानं फार त्रास दिलाय. तरीही मनाला सावरत ती आज इथपर्यंत आहे. मला साथ देते, मग मलाही तिला अशा प्रवासाला जाऊ द्यावं वाटतं…

म्हणजे, आम्हीच हा मार्ग शोधलाय आमच्या जगण्यात. कारण दुःखाची तीव्र किनार आहे आयुष्याला… मग त्यासाठी स्वतःला खंबीर करत राहायचं, डोकावायचं शांत होऊन आतल्या आत…” 

हे सगळं बोलताना मानेच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याने ते पुसण्यासाठी चष्मा काढला. रुमालानं डोळे पुसताना तो म्हणाला, “तुला माहितीये ना, हे माझं दुसरं लग्न… पहिल्या बायकोपासून मला मूल झालं पण ते मतिमंद जन्माला आलं आणि तिने चक्क मला घटस्फोट दिला. ‘असलं मूल, असलं आयुष्य मी जगूच शकत नाही’ म्हणत तिनं त्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. शेवटी मी तिला मोकळं केलं… “आता फार मोठा प्रश्न माझ्या म्हाताऱ्या आई-वडिलांचा होता. तो मतिमंद नातू, घटस्फोटित मुलगा, सगळंच त्यांच्या इझी गोईंग आयुष्याच्या विरुद्ध होतं. त्यांना हे सगळं वेगळंच वाटू लागलं. त्यामुळं ताण घेऊन त्यांना आलेले अटॅक… त्यांची उतारवयात वेगळीच परीक्षा!

पहिल्यांदा मला जाणवलं, फक्त पैसा असून उपयोगाचा नाही… खंबीर साथ आवश्यक आहे जगण्यात! लग्नाच्या बाजारात आता माझ्याशी, माझ्या पैश्याशी, नोकरीशी लग्न करायला बरेच जण तयार होते… पण ह्या मतिमंद मुलाच्या बापाशी कोणाला लग्न करायचं नव्हतं. मला आता फक्त मला सुख देणारी बायको नाही, तर माझ्या आई-वडिलांची आणि माझ्या मुलाची आई होईल अशी जोडीदारीण हवी होती…

माझी ही अपेक्षा अवास्तव होती… पण मन कुठंतरी शोधत होतंच; कारण हे सगळं आयुष्य एकट्यानं जगण्याची हिम्मतच नव्हती माझ्यात!

मध्ये असाच माझ्या मावशीकडे कार्यक्रमाला गेलो होतो,.. तिथं ही भेटली. मनाने उगाच कौल दिला… हीच, जिला आपण शोधतोय! मावशीकडे पोळ्या करायला येत होती. सहज चौकशी केली, तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली…

तिच्यावर रेप झाला होता! कॉलेजमधल्याच मुलांचं कृत्य… प्रेम म्हणत फसलेली ती, रेप झाला म्हणताच घरच्यांनी गदारोळ केला… लगेच जख्खड म्हाताऱ्यासोबत लग्न ठरवलं. तो पैसे देणार होता, म्हणून घरच्यांनी तिला विचारलं नाही. तिची आईच तिला म्हणाली, ‘रेप झाल्यावर आता दिवसही राहिलेत… कोण स्वीकारेल तुला? हे लग्न कर म्हणजे तू सुखी आणि आम्ही सुखी! ’

“आपली आईच असं म्हणतेय म्हटल्यावर पाठिंबा आता कुणी देणार नाही. तिनं निर्णय घेतला आणि ती घरातून पळाली. स्टेशन गाठलं… मिळेल त्या रेल्वेनं नव्या शहरात आली. रेल्वेच्या खिडकीत बसून आयुष्याच्या फ्लॅशबॅक परत उजळणी करून घेतला…

तिला आपल्या नात्यातले बरेच जण आठवले, जे लेकरू व्हावं म्हणून नवस, ट्रीटमेंट सगळं करतात… आणि आपल्याला का ही शिक्षा? खिडकीतून उदास होऊन ती सगळं आठवत होती… पण हीच खिडकी तिला नवं आकाश, नवे किनारे दाखवत होती. रेल्वेत आलेले अपंग, आंधळे तिला संघर्ष असून जगण्याची आस बाळगून कसं जगावं हे शिकवत होते…

तिनं ठरवलं, नव्या शहरात मोठ्या घरांसमोर पोळ्याची कामं मागितली. दिवसात वीस-तीस घरं फिरली, तेव्हा कुठं दोन कामं मिळाली… हळूहळू जम बसला. नंतर दहा घरच्या पोळ्या करते. शिवाय शिक्षण पूर्ण केलंय…”

माने पुढं म्हणाले, “मावशीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर मी म्हणालो मावशीला हिम्मत करून, ‘माझ्यासोबत लग्न करशील का विचार तिला…’

माझ्या प्रश्नावर मावशीनं ‘आ’ केला… ‘अरे, जात पात माहीत नाही आणि रेप झालाय तिच्यावर हे ऐकलंयस ना तू,..? ’मी उदास हसत म्हणालो, ‘माझी पहिली बायको जातीतली, रेप न झालेली होती… पण पवित्र बंधातून जन्म दिलेल्या माझ्या मुलाला सांभाळलं नाही. हीनं वाईट कृत्यातून झालेलं मुल आईच्या मायेनं सांभाळलं ना! हिच्या मनाची खिडकी मजबूत आहे. मावशी, तू विचार तिला… मी तिच्या मुलीसह स्वीकारतो तिला…’

“मावशीनं विचारलं. ती भेटायचं म्हणाली. भेटीत एवढंच म्हणाली, ‘मी स्वीकारेन तुमच्या मुलाला… पण हा नवा संघर्ष मला एकटीला पेलवेल असं नाही. तुमची साथ लागेल…’

“मी चटकन म्हणालो, ‘माझी साथ तर असणारच! ’ ती हसून म्हणाली, ‘एक वेगळी साथ… आयुष्याच्या प्रवासात मला रेल्वेच्या खिडकीत बसून मनाच्या आतली खिडकी उघडता आली. आपल्या ह्या संसारात मी कधी उबगले तर मला आवडेल त्या खिडकीत बसून एक असा प्रवास करायला, जो परत मला माझ्यातली ‘मी’ शोधून देईल! ’

“तिच्या वाक्यावर मी म्हटलं, ‘आणि तू हे सगळं सोडून दूर कुठं निघून गेलीस तर…! ’ ती खळखळ हसत म्हणाली, ‘अहो नाही जाणार. मनाची खिडकी एक चौकट बाळगून असते आपल्या भोवती… ती असते जबाबदारीची! त्या जबाबदारीचा कधीतरी शीण आला की अश्या प्रवासाच्या खिडकीतून त्या चौकटीला बघायचं… मग ती आपल्याला तो निसर्ग दाखवते, जो सतत संघर्ष करत जगत असतो. ते अवकाश दाखवते, जे आपल्यावर आशीर्वादाची शिंपण करत असतं, फक्त गरज असते नवं होऊन त्या खिडकीत जाऊन डोकावण्याची. जबाबदाऱ्या टाळायच्या नसतात फक्त त्या स्वीकारायला आपली ताकद अश्या प्रवासानं वाढवायची असते. मला हा प्रवास कुठलंही कारण न विचारता तुम्ही करू देणार आहात का माने…? मग मी तयार आहे, तुमच्या आयुष्याच्या खिडकीत माझ्या लेकीसह येण्यासाठी. ’”

कॉफी संपली होती. मानेची लव्ह स्टोरीही संपली. पाटणकर आश्चर्यानं बघत होता… “असंही जगतात माणसं…? ”

त्याच्या प्रश्नावर हसत माने म्हणाले, “आम्ही तरी जगतोय… आता तूच विचार कर. स्वतःवर झालेला अत्याचार, त्यातून झालेलं लेकरू, त्यात माझं मतिमंद मूल, माझे आई-बाबा… हे सगळं ती आता समर्थपणे पेलते. अशीच कधीतरी चिडते, उबगते आणि मग तास-दोन तास सगळं सोडून निघून जाते आज गेली तशी…”

त्यावर पाटणकर म्हणाला, “मग घरी सगळे विचारात पडत असतील ना? ”

माने म्हणाले, “नाही! तिनं सगळ्यांना अश्या खिडक्या शोधायला शिकवलंय. माझा मुलगा चित्रात अश्या खिडक्या शोधत बसतो, मुलगी गाण्यात शोधते, आई बाबा घराच्याच खिडकीतून त्यांच्या विचारांची खिडकी शोधतात… आणि त्यांना सगळ्यांना हिची खिडकी माहितीये, त्यामुळं तेवढा वेळ सगळे ॲडजस्ट करतात…”

पाटणकर म्हणाला, “आणि माने, तुमची खिडकी…? ”

माने हसत म्हणाले, “अरे ही माझी बायकोच माझी खिडकी आहे! तिनं तिचं माझं नातं इतकं छान जोपासलंय की मला तिच्या डोळ्यात माझी खिडकी सापडते. अरे, तुटून गेलेली स्त्री जर एवढ्या ताकदीनं जगते, तर आपण काय…! ” असं म्हणत माने निघाले.

काही वेळात परतीच्या ट्रेननं मिसेस माने उतरल्या. खरंच दोघांचं बॉंडिंग जबरदस्त होतं. दोघांनी फक्त डोळ्यात बघितलं. त्यांनी हात पुढं केला, तिनं तो पकडला. तिकडे ट्रेन निघाली, इकडे ही जोडी निघाली.

पाटणकर मनोमन म्हणत राहिला, ‘मनाच्या खिडक्या योग्य मिळाल्या, की रेल्वेच्या सुखकर प्रवासासारखा आयुष्याचा प्रवास सुखकर होत असेल!’

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा – मुक्ती / निवास / विवशता – मूळ हिन्दी लेखक : मोहम्मद जिलानी  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा – मुक्ती / निवास / विवशता – मूळ हिन्दी लेखक : मोहम्मद जिलानी  ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

☆☆☆☆

१) मुक्ती –

‘बेटा, रात्र खूप झालीय. एवढ्या रात्री एकटाच कुठे चालला आहेस? ‘ आईच्या या प्रश्नावर सी. आय. डी. इन्स्पेक्टर कमल म्हणाले, ‘आई, कॉल आलाय. कुणी तरी अडचणीत असेल. आम्हा पोलिसांचे कामच आहे, अडचणीत सापडलेल्यांना मदत करायची. तू काळजी करू नकोस. मी लवकरच परत येईन. ‘ असं म्हणून जीपमधून कमल नॅशनल हाय वे कडे जाऊ लागले. सगळीकडे गडद अंधार होता. तासभर तरी ते गाडी चालवत होते. इतक्यात उजवीकडे एक शुभ्र साडीतील मुलगी त्यांना थांबण्याचा इशारा करताना दिसली. कमल काहीसे घाबरले. पण तिकडे दुर्लक्ष करत पुढे निघाले. एवढ्यात त्यांची जीप अचानक थांबली. ब्रेक लावून ते जीपमधून उतरले आणि सगळीकडे पाहू लागले. पण त्यांना काहीच दिसलं नाही. जीपमध्ये बसून ते पुन्हा गाडी चालवू लागले. थोडं दूर गेल्यावर त्यांना जाणवू लागलं की गाडीत कुणी तरी आहे. बॅक व्ह्यू मिरर मधे बघितल्यावर ते गर्भगळीत झाले. त्यांनी एकदम जीप थांबवली आणि घबरत घाबरत विचारलं,

‘कोण आहेस तू? आत कशी आलीस? ’

आत बसलेल्या मुलीने म्हंटले, ‘‘घाबरू नका. फोन मीच केला होता. ’

‘माझ्याकडे काय काम होतं?

‘मला जो माझी मदत करेल, अशा तुमच्यासारख्या कर्तव्यनिष्ठ पोलीस ऑफीसरचीच गरज होती. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर तुम्ही मिळालात. ’

‘तुझं काम तरी काय आहे?

‘इथून डावीकडे एक की. मी. अंतरावर एक तळं आहे. त्याच्याजवळ वडाचा विशाल वृक्ष आहे. ’

‘या बाबत मी काय करू शकतो? ‘

‘तुम्हाला माझ्याबरोबर तिथे यावं लागेल! ’

इच्छा नसतानाही कमल आपला मोठा टॉर्च घेऊन त्या मुलीच्या मागोमाग चालू लागले.

वडाच्या वृक्षाच्या जवळ थांबून तिने आपल्या बोटाचा इशारा ज्या जागी केला, ती जागा पाहून कमलना घामच फुटला. त्यांची बोलतीच बंद झाली.

मुलगी म्हणाली, ‘घाबरू नका. ती माझी समाधी आहे. ‘

‘म्हणजे तू… ? ’

‘. हो. त्या शरिराचा मी आत्मा आहे. माझं नाव माया होतं. माझा प्रियकर चंदरने वर्षापूर्वी मला फसवून इथे आणलं. माझ्यावर आपल्या दोन मित्रांसामवेत बलात्कार केला. मग मला मारून टाकलं आणि या इथे मला पुरलं आणि ते पळून गेले. ’

कमलने सावकाश विचारलं, ‘तुला काय हवय? ’

 ‘मला मुक्ती आणि त्यांना शिक्षा’

 ‘पण याला पुरावा काय? ’

‘ओढाताणीत चंदरचं लॉकेट माझ्या हातात आलं होतं. ते अजूनही माझ्या उजव्या हातात सुरक्षित आहे. ’

सकाळ व्हायला आली होती. इन्स्पेक्टर कमलने पोलिसांच्या मदतीने समाधी उघडली. आपल्या टीमच्या माध्यमातून आणि मायाच्या शवाच्या हातातील लॉकेटच्या पुराव्यावरून चंदर आणि त्याच्या दोघा मित्रांना ताब्यात घेतले. न्यायालयात, अपहरण, बलात्कार आणि खून या आरोपाखाली खटला चालवला गेला. तिघांनाही फाशीची शिक्षा होणार, हे जवळ जवळ निश्चित झालं.

न्यायालयातून बाहेर पडताना कमलला दूर झाडाखाली माया उभी असलेली दिसली. ते तिच्याकडे गेले. ‘मी आपली आभारी आहे. आपण मला मुक्ती दिलीत. ’ ती म्हणाली आणि ती गुप्त झाली.

तिथून निघताना कमलच्या मनात आलं, ‘कायदा काय केवळ जीवित लोकांसाठीच असतो?

मूळ कथा – मुक्ति

मूळ लेखक – महम्मद जिलानी मो. 9850362698

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

☆☆☆☆

२) निवास – – 

‘ए, चल, निघ इथून! कब्रस्तानच्या चौकीदाराने झोपलेल्याल्या भिकाऱ्याला फटकारत म्हंटलं.

भिकारी शमशु उठत म्हणाला, ‘भय्ये, फक्त रात्रभरच झोपतो. कुणाला काय त्रास आहे? ‘

‘अरे बाबा, समजत कसं नाही तुला? हे कबरस्तान आहे. नातेवाईक विरोध करतात. ’

‘यात विरोध करण्यासारखं काय आहे? ‘

‘त्यांनाही मन:शांती, समाधान हवे असते. शिवाय अलीकडे जादूटोणा करणारे मांत्रिक मुडदे उकरून गायब करतात. मी तुला किती वेळा समजावलं. पण तू ऐकतच नाहीस. ‘ असं म्हणत त्याने बरोबर आलेल्या पोलिसांच्या हवाली त्याला केले.

पोलीस ठाण्यावरील इन्स्पेक्टरने कडक स्वरात विचारले, ‘ का रे, मुडदे चोरतोस काय? ”

शमशु घाबरत म्हणाला, ‘हुजूर, तसलं काही करत नाही मी! नाईलाजाने मी फक्त तिथे झोपतो! ‘

‘आता असलं काही चालणार नाही. तू दुसरी जागा शोध. ’

‘हुजूर, कुठे शोधू? मंदिर किंवा मशिदीजवळ झोपलो, तर हाकलून देतात. धार्मिक किंवा सरकारी संस्थानच्या आसपासही फिरकू देत नाहीत. फुटपाथवर झोपलं, तर कोणी पियक्कड गाडीवाला, गाडीने चिरडून टाकेल, याचा नेम नाही. जगलो, वाचलो, तर लंगडा, लुळा बनून आयुष्य काढायला हवं. ’ 

‘यात पोलीस काय करू शकणार? ‘

‘ कमीत कमी आम्हाला कब्रस्तानमध्ये तरी झोपू द्या. तिथे भीतीच्या ऐवजी शांती तरी आहे. ‘

हे ऐकून स्तब्ध झालेला पोलीस अधिकारी गांधीजींच्या फोटोकडे पाहू लागला.

मूळ हिंदी कथा – आशियाना

मूळ कथा – मोहम्मद जिलानी मो. ९८५०३६२६०८

अनुवाद – उज्ज्वला केळकर मो. – 8369252454 

☆☆☆☆

३) विवशता – – 

‘माय लॉर्ड, आपण याच्या भोळ्या, भाबड्या चेहऱ्यावर जाऊ नका. त्याचे पाशवी कृत्य बघा. एका निरागस मुलीची हत्या करताना त्याला ‘रंगे हात ‘ पकडलय. ‘ असं म्हणत सरकारी वकील कुमारसेन यांनी आपला युक्तिवाद मांडला. ही अनोखी केस ऐकण्यासाठी, बघण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खूप गर्दी लोटली होती. पुढील कारवाई करत कुमारसेनने पोलीस पाटील राणे यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावले.

‘आपण काय पाहिलत? ‘

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी गस्तीवर होतो. रात्री जवळजवळ दोन वाजता सुदामा गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या विहिरीजवळ मी याला एका सहा-सात वर्षाच्या मुलीबरोबर पाहिलं.

‘मग काय झालं? ‘ 

‘ जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा लक्षात आलं, की या माणसाने त्या मुलीचे हात-पाय-तोंड बांधून टाकलय. हा काय करणार आहे, याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मी याला व त्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात आलो. मुलीला ताबडतोब इस्पितळात पाठवण्यात आले. हा माणूस मात्र काहीच बोलला नाही. ’ 

‘त्याने काहीचं सांगितलं नाही? ‘ सरकारी वकिलांनी विचारलं.

‘ जी नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याने आपलं तोंड उघडलं नाही. ‘

‘माय लॉर्ड, ही केस अगदी स्वच्छपणे समोर येतेय. त्याचं मौन हाच त्याच्या गुन्ह्याचा पुरावा आहे. अपहरण, बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न याची केस आहे ही! बी. एन. एस. धारा ६३, १०९ व १३७ च्या अंतर्गत याला शिक्षा व्हायला हवी. ‘

तुला आपली सफाई देण्यासाठी काही बोलायचंय? ‘ न्यायाधीश मॅडमने विचारले.

‘होय जज्जसाहेब. मला फाशी द्या. मी अपराधी आहे. माझा गुन्हा हा आहे, की मी गरीब आहे. ‘

‘तुला काय म्हणायचं आहे? ‘ 

‘माझे नाव गिरिधर आहे. शेजारच्या गोगुल गावातला, मी कमी शिकलेला आदिवासी शेतकरी आहे. पत्नीच्या जीवघेण्या आजारात माझी सगळी शिल्लक मिळकत संपून गेली. माझी ५ एकर जमीन सावकाराकडे गहाण ठेवून मी कर्ज घेतले आणि पत्नीवर उपचार करण्यासाठी शहरात आलो. नंतर कळलं, याने कोऱ्या कागदावर माझा अंगठा उठवून घेतलाय. ‘

‘पण यामुळे काही तू केलेला गुन्हा माफ होणार नाही. या मुलीचं अपहरण का केलंस? ‘ सरकारी वकिलाने विचारलं.

‘कोणीही बाप आपल्याच मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या का करेल? ‘

‘मग तू विहिरीजवळ का गेला होतास? ‘

सरकारी इस्पितळात इलाजाच्या दरम्यान माझ्या पत्नीचं निधन झालं. काही दिवस होते तेवढ्या पैशातून गुजराण केली. ’ 

‘या मुलीचं काय करणार होतास? ‘

‘ तहान-भूक सहन करत धर्मशाळेच्या परिसरात किती दिवस राहाणार? मग आत्महत्येचा विचार मनात आला. वाटलं, या क्रूर जनावरांच्या जगात माझ्यानंतर हिला एकटीला जगायला ठेवायला नको. वाटलं, विहिरीत उडी मारून दोघांनीही एकदमच मरून जावं. मुलगी ओरडू नये, पळून जाऊ नये, म्हणून तिचे हात-पाय आणि तोंड बांधून ठेवलं. ‘

हे ऐकून कोर्टात शांतता पसरली. सगळे निकालाची वाट पहात होते. न्यायाधीश आपला निकाल देताना म्हणाले, ‘ अज्ञान, गरिबी, लाचारी, विवशता यामुळे गिरिधरने हा गुन्हा करण्याचा प्रयत्न केला. कायद्याप्रमाणे जी शिक्षा असेल, ती याला होईल. पण कोर्ट सरकारला आदेश देत आहे, की सावकाराकडून गिरिधरची जमीन परत घेऊन त्याला पुन्हा जगण्याची संधी दिली जावी. त्याचे पुनर्वसन केले जावे.

टाळ्यांच्या कडकडाटात कोर्टाची कारवाई संपली…

मूळ कथा – मजबूरी

मूळ लेखक – मोहम्मद जिलानी मो. ९८५०३६२६०८ 

 मो: 8512070086

☆☆☆☆

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चॉकलेटचा बंगला ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  जीवनरंग ?

☆ चॉकलेटचा बंगला ☆ सौ राधिका भांडारकर ☆

ही आहे गणूच्या चॉकलेटच्या बंगल्याची गोष्ट.

एकदा काय झालं! तारीख होती १४नोव्हेंबर. बालदिन. इनरव्हील क्लबच्या काही महिला नटून थटून धारावीच्या झोपडपट्टीत सकाळीच आल्या. मुलांना खाऊ वाटण्यासाठी. “बालदिन म्हणजे काय? तो का आणि कुणाच्या आठवणीसाठी साजरा केला जातो हे मुलांना सांगण्यासाठी, ”

तसे काही ना काही कारणाने कुणी ना कुणी या झोपडपट्टीत येतच असतात. कपडे, खाऊ, पांघरूणं, धान्य वगैरे घेऊन.

त्या बायकांना पाहून दारादारातून सुख्या, मुख्या, रामू, हसन, सलीम आणि लहानगा गणूही धावत बाहेर आले. अगदी उड्या मारत. खाऊ मिळणार होता ना?

गणू लहान असला तरी मनातल्या मनात तो स्वतःशीच बोलायचा. त्या छान छान साड्या नेसलेल्या, रंगीत कपड्यातल्या, चेहऱ्यावर पावडर लावलेल्या, हसऱ्या बायकांना पाहून गणू मनातच म्हणाला, ” माझी माय कधीच का अशी दिसत नाही? ”

सलीमच्या झोपडीसमोर एक पिंपळाचं झाड होतं. तिथल्याच थोड्या मोकळ्या जागेवर त्या सुंदर बायकांनी मुलांना एकत्र यायला सांगितले आणि बॅगेतून आणलेला खूप सारा खाऊ सगळ्या मुलांना वाटला. मुलांनी नेहमीप्रमाणे गलका केलाच. ” मला द्या मला द्या की” मातकट, न धुतलेले हात पुढे करून. नेहमीप्रमाणेच. गणू मात्र दूर उभा राहून ही सारी गंमत पाहतच होता. खाऊ तर त्याला हवाच होता पण त्याने हात मात्र पुढे केला नाही. एक छान ताई मग स्वतःहून त्याच्या जवळ आली आणि मूठभर चॉकलेट्स तिने त्याच्या चिमुकल्या दोन हातात अगदी प्रेमाने ठेवली. गणूला खूपच आनंद झाला. ती ताई म्हणाली, ” खाऊन टाक सारीच्या सारी पण नंतर मात्र दात घासशील ना? ” गणू ने मोठे डोळे करून ताईकडे पाहिलं आणि म्हणाला या चॉकलेटचा मी एक बंगला बांधू का?

गणूने कधीतरी मुख्याच्या रेडिओवर, चॉकलेटच्या बंगल्यावरचं गाणं ऐकलं होतं आणि त्याला ते फार आवडलं होतं.

ताईला खूपच हसू आले. तिने गणूच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाली, बांध की. मी तुला अजून खूप सारी चॉकलेट्स आणून देईन.

त्यानंतर ताईने तिच्या इतर मैत्रिणींना काहीतरी गुपचूप सांगितले आणि ती मुलांना म्हणाली, ” चला रे मुलांनो! हातात हात धरून रिंगण करा बरं! आपण किनई आता एका गाण्यावर नाच करूया. ”

“येरे तू पण ये. नाव नाव काय रे तुझं? ” “गणू. ”

“हे बघ तू रिंगणाच्या मध्यभागी उभा रहा. ही टोपी घाल आणि हे बघ काय आहे. याला मास्क म्हणतात. तोंडावर चढव. ताईने सगळ्यांनाच वेगवेगळे मास्क घालायला दिले. मांजराचे, वाघाचे, कुत्र्याचे, माकडाचे. आणि सगळेजण ताई म्हणत असलेल्या गाण्यावर मस्त नाचू लागले. आता ती धारावीची चिखलातली, उघड्या गटारातली, फाटक्या कपड्यातली झोपडपट्टी नव्हतीच. ती होती एक वेगळीच रंगीबेरंगी नगरी. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला”

गणूला इतका आनंद कधीच वाटला नव्हता. घरात कुणीच नव्हतं. उखडलेल्या फरशीच्या, पत्र्याच्या घरातल्या त्या खडबडीत उंबरठ्यावर तो एकटाच बसला होता. बाकीची मुलं फुटके टायर घेउन गाडा गाडा खेळत होती. काही जवळच साचलेल्या पाण्यात कूदत होती.

माय आणि बापूस दिवसभर घरात नसतात. कधी संध्याकाळी तर कधी रात्रीच घरी येतात. माय त्याच्यासाठी कधी कधी कागदाच्या पुडीत दाणे, भजी, शेव, आणते. बापूसला सारे दारुड्या, बेवडा म्हणतात आणि तो मायला रोज मारतो.

उंबरठ्यावर बसलेल्या गणूला खरंतर हे काहीच आवडत नाही पण आज मात्र तो खूप आनंदात होता. स्वतःशीच हसत होता. “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. ”त्यातच तो पार हरखून गेला. एका वेगळ्याच दुनियेत गेला. तेवढ्यात डोक्यावर मुकुट घातलेली आणि हातात चांदण्या चांदण्या असलेली एक सुंदर काठी घेऊन एक परी गणूजवळ अलगद हवेतूनच उतरली. गणूला वाटले ही ती ताईच. मुकुट घातलेली, परीसारखी दिसणारी. किती सुंदर! परीने हातातली काठी आपटली आणि काय आश्चर्य तिथे आता धारावीची झोपडपट्टी शिल्लक नव्हती तिथे होता एक सुरेख भलामोठा चॉकलेटचा बंगला. त्याला दारं होती, खिडक्या होत्या. बंगल्याच्या भोवती हिरवीगार झाडं होती, निळ्या रंगाचं सभोवताली पाणी होतं, झाडांवर रंगीबेरंगी पक्षी गणूसाठी गाणी गात होती. फुलपाखरे होती. तिथे गटारांची दुर्गंधी नव्हती. चॉकलेटच्या बंगल्यातून पेपरमीटचा सुगंध घेऊन मस्त वारे वाहत होते.

अबब! केवढा मोठा हा सुंदर चॉकलेटचा बंगला! परीताईचा हात धरून तो या खोलीतून त्या खोलीत नुसता उड्या मारत होता. कुठे कुठे नळही होते आणि त्यातून खीर, बासुंदी सारखे गोड गोड पदार्थ वाहत होते. एक नळ उघडला तर त्यातून कितीतरी सोन्याची नाणीज नाणी वाहिली. चॉकलेटचा पलंग आणि चॉकलेटचे पांघरूण. चॉकलेटची तोरणं, चॉकलेटचे खांब. सोनेरी कागद चिकटवलेल्या चमचमणाऱ्या भिंती. परीताई म्हणाली, ” याला पाहिलंस? याला म्हणतात रोबोट. याचं नाव जीनी. तुला हवं ते माग याच्याकडे. तो तुला जे हवं ते देईलच.

गणूला कळेच ना काय मागावे? खरंतर त्याची यादी खूपच मोठी होती आणि त्याला सगळं हवं होतं. शिवाय या चॉकलेटच्या बंगल्यात वेगळीच माणसं होती. ती सारी हसत होती, खेळत होती, गाणी म्हणत होती. छान शब्दात बोलत होती. तिथे मारामाऱ्या नव्हत्या. भांडण नव्हती. ठिकठिकाणी ठेवलेल्या पेट्यांमधून सोन्याचे, चांदीचे दागिने होते. छान स्वच्छ कपडे होते आणि खुळखुळ आवाज करणारे पैसे होते. एका लांबोळक्या खोलीत शाळापण भरली होती. शाळेतल्या मुलांनी एकसारखे स्वच्छ कपडे घातलेले होते. फळा होता आणि मिशीवाले, घारे डोळेवाले गुरुजी मुलांना शिकवत होते. ते मुलांना सांगत होते, ” जो जे वांछील तो ते लाहो!” गणूला काही त्याचा अर्थ कळला नाही पण त्याला ती शाळा मात्र खूपच आवडली. गणूला वाटले जिनीला सांगावे असाच अगदी असाच “चॉकलेटचा बंगला” मला दे. आणि अशीच हसणारी माणसेही दे. ”

समोर एकदम खूप सारा पांढरा धूर झाला. नंतर एवढासा जिनी त्या धुरातून खोलीभर पसरला. त्याचे डोकंही छताला टेकलं आणि तो केवढ्या मोठ्याने हसला. त्याचा हाताचा पंजा म्हणजे जणू काही पृथ्वीचा गोलच होता आणि त्या गोलावर होता गणूला हवा असणारा चॉकलेटचा बंगला. त्यावर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिलं होतं ते काही गणूला वाचता आलं नाही पण त्यावर डोक्यात मोरपीस घातलेल्या, बासरी वाल्या कृष्णाचं चित्र होतं. गणूने नीट निरखून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात आनंदाची लाटच फेसाळली. तो कृष्ण नव्हता काही तो तर कृष्णा सारखा दिसणारा गणूच होता जिनी म्हणाला, ” हा तुझा चॉकलेटचा बंगला. बंगल्याचं नाव *फेरो रोशर* बरं का आणि त्यावर ही डार्क *चॉकलेटची कडेला आयसिंग केलेली वेलबुट्टी असलेली तुझ्या नावाची सुंदर पाटी. वाच बघू. त्यावर लिहिलंय, ” गणूचा बंगला” नंतर गणू, जिनी आणि परीताईबरोबर बरोबर नाच नाच नाचला. आकाशात झुमकन उडाला. केवढ्या तरी मोठ्या बोटीतून आकाशगंगेतही फिरला. फुलांशी, पाखरांशी, चांदण्याशी गप्पा केल्या. नंतर “जिनी” नाहीसा झाला, आंतर्धान पावला. परीताई ही कुठेतरी लुप्त झाली.

एका सुंदर जगात फिरून आलेल्या गणूला जेव्हा जाग आली तेव्हा तो त्याच्या घराच्या ओबडधोबड उंबरठ्यावर होता पण त्याला आतून असं वाटत होतं की तो खूपच आनंदात आहे.

“अरे! ओ गणू इथं काय करतोयस? काय खाल्लास पिल्लास की नाय? भगुण्यात भाकर नि पेज ठेवली हुती म्या. ”

माय कधी आली?

तेवढ्यात बापूसही आला. आज तो दोन पायावर न झुलता उभा होता हे विशेष. मायला म्हणाला, “अगं ओ माय आता ही झोपडपट्टी पाडणार म्हनत्यात. कुणी अमीर लय मोठा माणूस इथं लय भारी माल बांधणार आहे म्हनत्यात. ” “आता ग बया! मग आपन कुटं जानार व्हय. ”

“कळलच ते. आत्तापोतर इतलंच. ”

गणूनं या दोघांचं बोलणं ऐकलं आणि तो लगेच म्हणाला, ” माय काय बी काळजी नगं करूस. ‘जीनीने’ मला लय भारी चॉकलेटचा बंगला दिलाय. त्यात जाऊन आपण राहू की. ”

गणूच्या मायचा आणि बापूसचा ‘अॉ’च झाला आणि दोघेही एकदमच म्हणाले, ”यडं की खुळं गं हे? ” 

पण गणू ने मात्र मनाशी पक्क ठरवलं होतं, ”एक ना एक दिवस जिनीने दिलेल्या चॉकलेटच्या बंगल्यात आपण राहायला जायचंच. ”

गणूचे हे स्वप्न खरंच ठरो!

आधी पहावं मोठं स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर खूप धडपडावं “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ”

न जाणो! एक दिवस गणूच्या मनातला हा “चॉकलेटचा बंगला” प्रत्यक्ष पहायला अनेक प्रवासी नक्की येतील. बेल्जियममधल्या मुतणाऱ्या मुलाला- गणू इतकाच असेल तो नाही का? – जगभरातले प्रवासी बघायला येतात! इथे काहीही अतर्क्य नाही, अशक्य नाही. त्यातलाच हा गणूच्या स्वप्नातला चॉकलेटचा बंगला.

द्या टाळी.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बदल — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ बदल — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(माधवन बिचारा काहीच बोलला नाही.

नयना दोन महिन्यांनी भारतात परत आली. दिलीपला तिने हे सगळं सांगितलं.

“काय करू मी दिलीप? अशीच ही वागणार असली तर माझा तिकडे काहीही उपयोग नाही बघ. मी नाही जात तिकडे. करू दे त्यांनाच बाळंतपण. अरे, मुग्धाचं माझ्यावाचून काहीही अडणार नाहीये. ”हताश होऊन नयना म्हणाली.) — इथून पुढे – – – 

दिलीपने विचार केला. ”हे बघ. आपण फक्त माधवन आणि नवीन बाळासाठी जाऊया. मीही येतो तुझ्याबरोबर. म्हणजे तू एकटी पडणार नाहीस नयना. तीन महिने राहूया आणि परत येऊया.

कसं उलटं आहे बघ. जावई सज्जन लाखात एक तर मुलगीच मूर्ख आणि तऱ्हेवाईक. आपलेच दात आणि आपलेच ओठ. कोणाला सांगणार? पण तू गेली नाहीस तर जन्मभर उगाळत बसेल ती. आपली एकच तर मुलगी आहे ही. बघूया.

तिने बोलावलं तरच जाऊया. ” 

मुग्धाला सातवा महिना लागला. तिने आईवडिलांना विचारलं,

बाबा, यावेळी तुम्ही आणि आई दोघेही या. मी तिकीट पाठवते. मी शेवटपर्यंत जॉब करणार आहे. माझी तब्बेत चांगली आहे. नंतर मला रजा घेता येईल.

तुम्ही दोघेही तीन चार महिने रहा. वाटलं तर व्हिसा वाढवून घेता येईल तुमचा. मग मी बाळाला ठेवीन क्रेश मध्ये. ”

आत्ता तरी हा प्लॅन नयनादिलीपला बरा वाटला. हो म्हणाला दिलीप.

तिकिटे आल्यावर नयना दिलीप अमेरिकेला पोचले. एअरपोर्टवर आलेल्या माधवन आणि मुग्धाला बघून नयनाला गहिवरून आलं.

आपली गर्भभाराने जडावलेली लेक बघून नयनाला अश्रू आवरेनात.

आई म्हणत मुग्धाने आईला मिठी मारली. कारने सगळे घरी आले.

दिलीप ते मोठं घर बॅकयार्ड बघून खूष झाला.

“वावा. आता इथे मस्त बाग करू आपण”. तो हसत म्हणाला.

मागच्या अनुभवावरून नयनाने जरा बिचकत स्वयंपाकघराचा ताबा घेतला. आज काय करू ग स्वयंपाक मुग्धा? ”

आई, तुला हवं ते कर. मी खाईन ते. ” 

नयनाने माधवनकडे बघितलं. तो हसत होता. मग सांगतो अशी खूण केली त्याने.

नयनाने सुंदर शिरा केला. मुग्धाला आवडायची तशी मटकीची उसळ केली. भजी केली.

“आई, कित्ती दिवसांनी मी इतकं सुंदर सुग्रास अन्न खातेय ग. “मुग्धाच्या डोळ्यात पाणी आलं.

चार दिवसांनी माधवन त्या दोघांना घेऊन मॉलमध्ये गेला होता.

नयना म्हणाली “माधवन, ती खरेदी जाऊ दे. आधी मला सांग, हा बदल झाला कसा मुग्धामध्ये? अरे मी तर येणारच नव्हते मागचा अनुभव बघून. अशी ही वागली तर माझीच अवस्था कशी होईल या कल्पनेनेच मला घाम फुटला. हे कसं काय झालं सांग बाबा. ”

माधवन हसत म्हणाला, ”तुमची लेक गुणी आहे हो. फक्त संतापी आणि पुस्तकी आहे फार. म्हणजे बुकिश.

त्या दिवशी काय झालं, माझा मित्र अमोल आहे ना, त्याची बायको रमा पण प्रेग्नन्ट आहे.

तिच्या डोहाळजेवणासाठीआम्हाला बोलावलं होतं. तिथे तिची आई आणि आजी भारतातून आल्या आहेत.

आजींनी मुग्धाला जवळ बसवलं.

तुझी तारीख किती आहे, आईवडील काय करतात अशा चौकश्या केल्या.

 म्हणाल्या “अशी काय अशक्त दिसते आहेस ग तू? नीट खात पीत नाहीस का? तुम्ही मुली म्हणजे कठीण आहात हो. सारखं काय ते गूगल का काय बघून आयुष्य ठरवता?

ते सांगेल तेच खायचं म्हणे. मग डिलिव्हरी पण गुगललाच करू दे की. आचरटपणा सगळा.

चांगलं छान आई आजी देते ते खावं. त्यांना अनुभव असतो पोरी. आमची रमा असलीच पण आता बघ. सगळं खूळ काढूनटाकलं आम्ही तिच्या डोक्यातून. पुस्तकी विद्या नुसती.

व्यवहार नको का जोडीला? फुकट झालोय का आम्ही म्हाताऱ्या? ”

माधवन हसून सांगत होता.

मुग्धाचं वजन अजिबात वाढत नव्हतं आई. तुम्ही गेलात आणि मग समजलं की डॉक्टर म्हणाले वजन कमी आहे बाळाचं.

मुग्धाची डॉक्टर साऊथ इंडियन आहे ती म्हणाली” मुग्धा, आपलं इंडियन फूड सगळ्यात उत्तम असतं. ते खा. हे यू ट्यूब खूळ आधी काढून टाक डोक्यातून.

वजन कमी आहे बाळाचं. मला वाढलेलं दिसलं पाहिजे. मग मात्र मुग्धा घाबरली. मुकाट्याने सगळं खायला लागली. मला उत्तम येतो ना स्वयंपाक. पोळ्या आणतो बाहेरून.

तुम्ही गेल्यावर रडत होती कीआईने केलेलं मी काही खाल्लं नाही आणि तिलाच बोलले मी वाटेल तसं. रोज वाद घातले, तिला वाटेल तसं बोलले मी.

माधवन, येईल ना रे आई पुन्हा?

मला हवी आहे तिची मदत. माझं खूप चुकलं. त्यात रमाच्या आजींनी चांगली कान उघाडणी केली.

आता गाडं ठिकाणावरआलंय. ”

माधवन हसत होता.

“बाबा, मुग्धा हुशार तर आहेच. पण मला माहीत आहे, ती संतापी असली तरी खूप सरळ आणि भाबडी आहे. मला तिची नस बरोबर माहीत आहे. आता हळूहळू तीआणखी समंजस होईल बघा.

मी चार भावंडामध्ये वाढलोय म्हणून मला माणसे समजतात, ऍडजस्ट करता येते. आपलाच हेका दरवेळी चालवता येत नाही हे समजतं मला. पण मुग्धाला ही सवय नाही. एकटीच असल्याने तिला सवय नाही नमते घ्यायची.

पण बदलेल ती हळूहळू. ”

नयनाला माधवनचं फार कौतुक वाटलं. किती समंजस होता हा मुलगा. आपल्या मुलीला अगदी योग्य जोडीदार मिळालाय हे समजलंच त्यांना.

मुग्धातला हा बदल फार सुखावह होता. दोघी मायलेकी मागे बॅकयार्ड मध्ये झोपाळ्यावर बसून तासनतास गप्पा मारत.

मुग्धाला आजीची आठवण येई. तिने सांगितलेल्या गोष्टी तिला आठवत.

“आई मला मुलगीच होऊ दे. मी आमच्याकडे आधीच सांगतात तसे मुलगा का मुलगी आहे हे विचारलं नाहीये. असू दे की सस्पेन्स. ,

पण मला मुलगीच व्हायला हवीय. आणि तीही माझ्यासारखी चिडकी नको. माधवन सारखी शहाणी शांत समजूतदार होऊ दे. ”

नयनाने तिला जवळ घेतलं. “मुग्धा, तू सुद्धा खूप गुणीच आहेस बाळा. खूप बदल झालाय तुझ्यात आणि तो चांगलाच आहे.

असं कमी नको लेखू स्वतःला.

सगळी माणसं कशी सर्वगुण सम्पन्न असणार? किती हुशार इंजिनीअर आहेस तू. किती मोठ्या पोस्टवर समर्थपणे एवढी हाताखालची माणसे संभाळतेस ना?

तूही खूप बदललीस. मला तर माझी नात तुझ्यासारखीच व्हायला हवी. गुणी हुशार. , आणि थोडीशी चिडकी पण. ”

मुग्धाने आईच्या कुशीत तोंड लपवलं. नयनाने तिला थोपटलं.

नऊ महिने भरल्यावर मुग्धा प्रसूत झाली.

“माधवन, आई, काय झालं ग मला?

मुलगीच झाली ना? मला दाखवा ना. “

जवळ उभ्या असलेल्या नयनाला आणि माधवनला मुग्धा म्हणाली.

माधवन म्हणाला, “ हो मुग्धा. तुला हवी होती तशी राणी झालीय तुला. ही बघ. ”

मुग्धाने त्या बाळाला जवळ घेतलं.

दोन दिवसांनी राणीला घेऊन सगळे घरी आले.

आता मुग्धाचं आई शिवाय पान हलेना.

आई, राणीला अंघोळ घालायला शिकव मला. तू करतेस तसं तिला मॉलिश करून बघू दे मला तुझ्या समोर.

तू सांग, आता बाळाला पेज कधी सुरू करायची? ”

नयनाने सांगितलेलं सगळं लक्षात ठेवत मुग्धा राणीची काळजी घेऊ लागली. राणी चांगली गुटगुटीत झाली.

तिकडच्या सारखी सीरिअल्स नकोत म्हणत मुग्धाने नयनाच्या देखरेखीखाली छान मऊ भात घालायला सुरवात केली राणीला. आणि तिलाही तो फार आवडायचा.

चार महिने कसे गेले ते कोणालाच समजलं नाही. जायची तारीख जवळ यायला लागली तशी मुग्धा बेचैन झाली.

“आई, मी खूप त्रास दिला तुला. भारतात पण आणि इथेसुद्धा.

 मला माफ कर. मुलगी झाली की तिच्यासाठी जीव कसा तळमळतो हे आता समजतं मला.

राणी पोट दुखून रडायला लागली की मलाच रडू येतं.

मला लहान वयात आणि मोठेपणी पण कधी तडजोडीची वेळच आली नाही. माझं चुकलं खूप. ”

नयनाने तिला जवळ घेतलं. ”नाही ग मुग्धा. आई होणं सोपंनसतंच. तूही चुकत शिकशीलच. काळजी नको करू. सुदैवाने आम्ही अजून येऊ शकतो तुमच्याकडे. या गोड राणी साठी. तब्बेती चांगल्या आहेत. पैसा भरपूर आहे. आणखी काय हवं?

आणि माफी कसली ग मागतेस?

माझंही चुकत असेलच की थोडसं.

मीही नोकरी करत होते. झालंही असेल थोडं दुर्लक्ष तुझ्याकडे. पण आजी होती ना तुझ्याकडे लक्ष द्यायला.

तर आता डोळे पूस आणि या गोड बाळाला छान मोठी कर. ”

कधीही अडचण आली तर हाक मार. आम्ही नक्की येऊ. ”भरल्या डोळ्यांनी नयना म्हणाली.

सगळी आवरासावर करून ठरलेल्या दिवशी नयना आणि दिलीप भारतात परतले ते निःशंक होऊन आणि मुग्धामधला सुखावह बदल अनुभवूनच..

– समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बदल — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ बदल — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

मुंबई एअरपोर्ट वर विमान पोचले आणि दिलीप आणि नयनाने सुटकेचा निश्वास टाकला. एवढा मोठा कंटाळवाणा प्रवास संपला एकदाचा म्हणून.

रघू ड्रायव्हर कार घेऊन आला होता एअरपोर्टवर. मोठ्या मोठ्या बॅग्ज डिकीत ठेवून त्याने अदबीने विचारलं, “सरळ घरीच जायचं ना सर? का वाटेत जायचं आहे कुठं? ”

“नको नको रे बाबा. फूड मॉलला थांबव आता डायरेक्ट. मस्त कॉफी पिऊया आणि घरची वाट धरू या. ”नयना म्हणाली.

आज जवळजवळ चार पाच महिने अमेरिकेत लेकीकडे राहून आज ते भारतात परत आले.

लाडक्या नातवंडांना सोडून येताना सगळ्या आजीआजोबांच्याडोळ्यात पाणी येतं. नयना दिलीपलाही चिमुकल्या राणीला आणि मुग्धा माधवनला सोडून येताना अश्रू आवरेनात. गोड गुटगुटीत राणी त्यांच्याकडे झेप टाकून येत होती.

इमिग्रेशन मध्ये गेल्यावर राणी आणि मुलगी जावई दृष्टीआड झाले. आणि जड अंत:करणाने दिलीप नयना विमानात चढले.

आत्ता, परतीच्या वाटेवर कारमध्ये बसल्यावर नयनाच्या डोळ्यासमोरून सगळा पट सरकला.

नयना दिलीपच्या बँकेत नोकरीला आली होती. नुकतीच नाशिकहून बदली होऊन नयना रुजू झाली होती. दिलीप तिचा मॅनेजर होता.

सुरवातीला गोंधळलेली नयना आता नवीन बँकेत आणि शहरात चांगलीच रुळली. तिला पुणं फार आवडायला लागलं.

तिला नव्या मैत्रिणी मिळाल्या आणि दर आठवड्याला नाशिकला पळणारी नयना आता महिन्याने सुद्धा नाशिकला जायचे टाळू लागली.

दिलीपने एकदा तिला घरी सहज चहाला बोलावले.

त्याचे आईबाबा, धाकटी बहीण आणि घरातले मोकळे वातावरण तिला फार आवडले.

साधारण चार महिन्यांनी दिलीपने तिला लग्नाबद्दल विचारलं. ,

एका छानशा हॉटेलात तिला कॉफी प्यायला त्याने बोलावले आणि मागणी घातली.

हसून दिलीप म्हणाला”अग, माझ्या हे मनात सुद्धा नव्हतं. पण माझ्या आईला तू फार आवडलीस.

बघ आता.

माझ्या आईने, मला सून फार आवडलीय तर तिला विचार बघू असे सांगितलंय बरं मला. म्हणून मी तुला लग्नाचं विचारतोय. ”हसून दिलीप म्हणाला. म्हणजे माझ्याआधीच तुला सासूने पसंत केलीय. “

नयना हसत म्हणाली” हो का? मग अजूनही तुम्ही मला नाही म्हणू शकता. बळजबरी नाहीये कोणाची.”

दिलीप हसला आणि म्हणाला, “मला तर तू आवडतेसच. पण आईसाहेबांना आवडलीस म्हणजे आता काळजी नाही. होणारच तू लाडकी सून त्यांची. ” असं ते लग्न ठरलं आणि थाटामाटात झालं सुद्धा.

नयनाला माहेरी एकत्र कुटुंबाची सवय होती. , सासरी तिला जड गेलं नाही. उलट तिला सासू आणि नणंद मैत्रिणीसारख्याच झाल्या.

लग्नानंतर जरा उशिराच झाली तिला मुग्धा.

सहा वर्षानी घरात लहान बाळ आलं म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. मुग्धा आजीआजोबा आईबाबांच्या सहवासात मोठी होत होती. आत्या लग्न होऊन आपल्या घरी गेली होती. आपल्या भाचीच्या ओढीने आत्यासुद्धा मुग्धाला भेटायला जवळजवळ रोज येई.

मुग्धा अत्यंत तीव्र बुद्धी घेऊन आली होती. शाळेत सतत पहिली. दिसायला सुंदर. कधीही दुसरा नंबर न बघितलेली मुग्धा हट्टी हेकेखोर व्हायला लागली.

त्यादिवशी शाळेतून आली ती हातपाय आपटतच.

दप्तर फेकून देऊन जोरात भोकाड काढून रडायला लागली.

”काय झालं मुग्धा? “आजीने घाबरून विचारलं. आजी माझा दुसरा नंबर आला. असं कसं झालं? आदित्यचा कसा आला पहिला नंबर? तू शाळेत चल आणि सांग बाईना. ”हुंदके देत देत मुग्धा म्हणत होती.

“मुग्धा, आधी हे खा बघू. मग जाऊ हं उद्या शाळेत. ”आजी म्हणाली.

मग आजी म्हणाली,

हे बघ बाळा कायम तूच कशी नेहमी पहिली येशील? बाकीची मुलं पण छान अभ्यास करतातच. असा त्रागा करायचा नाही. तू काय कमी हुशार आहेस का? ”

आजीने समजूत घातली खरी, पण नयना बँकेतून आल्यावर हा प्रकार त्यांनी तिच्या कानावर घातला.

नयना, मुग्धा हुशार आहे मान्य. पण हा स्वभाव चांगला नाही. मी म्हणेन तेच खरं, मीच हुशार.

त्या विचारात पडल्या. म्हणाल्या, दिलीपची आजी होती अशी हेकट आणि संतापी. अतिशय त्रागा करायच्या त्या, काही मनाविरुद्ध झालं की.

मुग्धा अशीच झालीय. कोण कोणाचे कसे गुण अवगुण घेतं बघा. ”त्या सुस्कारा टाकून तिथून निघून गेल्या.

दिवस भराभर निघून जात होते.

मुग्धा अतिशय हुशार तर होतीच. उत्तम करिअर करत ती इंजिनिअर झाली.

तिच्याच वर्गातल्या माधवनशी तिने लग्न ठरवलं.

माधवन तमिळ ब्राह्मण. अतिशय हुशार आणि आपल्या व्हॅल्यू जपणारा. स्वभावाने मृदू. नम्र आणि कमालीचा शांत. तमिळ असला तरी उत्कृष्ट मराठी समजत होतं त्याला आणि अस्खलित मराठी बोलायचा तो.

दिलीपने त्याला एकदा सांगितलं”माधवन, तुम्ही फार गुणी आहात. नाव ठेवायला जागा नाही तुम्हाला. पण आमचीच मुलगी फार आक्रस्ताळी आहे. ती अतिशय संतापी आहे. तिला संताप आला की भानच रहात नाही. तुम्हाला तिची ही बाजू माहीत हवी म्हणून मी हे सांगतोय”.

माधवन शांतपणे म्हणाला”काळजी करू नका. मी समजून घेईन मुग्धाला. खूप गुणी मुलगी आहे तुमची. ”

आणि ते लग्न झालं. अतिशय हौसेने करून दिलं नयना दिलीपने.

माधवनचे आईवडील लग्नाला आले आणि उपऱ्या सारखे निघून गेले. त्यांना ही मराठी सून अजिबात पसंत नव्हतीच. नशिबाने मुग्धा माधवन त्यांच्याजवळ रहाणार नव्हते.

माधवनला अमेरिकेचा उत्तम जॉब मिळाला.

मुग्धालाही तिकडे चांगला जॉब मिळायची शक्यता होती. मोठ्या आनंदाने दोघेही अमेरिकेला निघून गेले.

नयनाने तिची सगळी हौसेने तयारी करून दिली. भांडी, कुकर रोजची सगळी पोळपाट लाटण्या पासून तयारी दिली करून.

मुग्धा माधवन गेले. आता घरात फक्त दिलीप आणि नयना.

वडीलधारी माणसे एका मागोमाग एक काळाच्या पडद्याआड गेली आणि नयनाला घर खायला उठलं. तरी अजून तिची नोकरी चालू होती म्हणून बरं.

आता मुग्धाला दिवस गेले.

कोडकौतुक करायला, आवडीचे खायला घालायला म्हणून हौसेने रजा घेऊन नयना दोन महिने मुग्धाकडे गेली. मुग्धाने आईचे छान स्वागत केलं. ” आई किती मस्त वाटलं तू आलीस म्हणून ग. ”

नयना उत्तम सुगरण होतीच.

दुसऱ्याच दिवशी तिने हौसेने पौष्टिक धिरडी केली.

मुग्धा म्हणाली, ”हे मी खाणार नाही. यात न्यूट्रिशस काहीच नाहीये.

माधवनने ती अतिशय आनंदाने खाल्ली. आई, काय सुंदर चव झालीय हो. मला आणखी वाढा. ”

मुग्धाने एकाही धिरड्याला हात लावला नाही. ”अग मुग्धा, यात सगळी पिठे आहेत, मेथ्या आहेत, भाज्या घातल्या आहेत. तू खाऊन बघ. ”पण तिने एकही धिरडे खाल्ले नाही.

नयना कानकोंडी झाली. हे असंच चालू राहिलं तर आपण इथे का आलोय असा प्रश्न तिला पडला.

मुग्धा रोज इंटरनेट बघून त्यातले पदार्थ नयनाला करायला सांगे आणि तेच खाई ती. त्याला ना चव ना ढव.

आता हिचं आणि आपलं पुढे बाळंतपणात कसं होणार याचा प्रश्न नयनाला पडला. बरं काहीबोलायला समजवायला जावं तर लगेच,

माझी डॉक्टर आणि डाएटीशियन सांगेल तेच मी करणार हे उत्तर.

अग, त्या गोऱ्या आहेत, आपली संस्कृती खाणे पिणे वेगळे आहे असं सांगूनही त्यातून भांडणेच होऊ लागल्यावर नयना गप्पच बसली.

अक्षरश:ते दोन महिने कसे जातील असं झालं नयनाला. रोज हे असे सहन करून नयना वैतागली. ना कुठे तिला मुग्धाने फिरायला नेलं ना कुठे नीट संवाद साधला. सतत ती एक तर घरून काम करताना घरच्या ऑफिस मध्ये असायची किंवा वर बेडरूम मध्ये.

तिचा नयनाशी संवादच होत नसे. ना कधी मुग्धाने तिला आवडीचे काही खायला करायला सांगितलं, ना कधी तिने केलेलं कौतुकाने खाल्लं. कधी आणलेले सुंदर ड्रेस घालून बघितले नाहीत की साडी नेसून दाखवली नाही नयनाला..

बिचारा माधवन कानकोंडा होऊन जाई. त्यानेच नयनाला मॉल मध्ये नेलं, तिला हवी ती खरेदी करून दिली.

नयना म्हणाली, ” माधवन, मी तर चालले पण तुमचं कठीण आहे हो.

माझीच मुलगी ही पण कशी वागतेय हो. जगात कोणाला दिवस जात नाहीत का? आणि मी आई आहे ना हिची? आता मी हिच्या डिलीव्हरीला येऊन तरी माझा उपयोग होईल असं वाटत नाही. ”

माधवन बिचारा काहीच बोलला नाही.

नयना दोन महिन्यांनी भारतात परत आली. दिलीपला तिने हे सगळं सांगितलं.

“काय करू मी दिलीप? अशीच ही वागणार असली तर माझा तिकडे काहीही उपयोग नाही बघ. मी नाही जात तिकडे. करू दे त्यांनाच बाळंतपण. अरे, मुग्धाचं माझ्यावाचून काहीही अडणार नाहीये. ”हताश होऊन नयना म्हणाली.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तेरी मेरी प्रेमकहानी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तेरी मेरी प्रेमकहानी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

सूर्य मावळतीला गेला आहे. चोहीकडे संधीप्रकाश पसरला आहे. डिसेंबर महिना असल्याने हुडहुडी भरवणार्‍या थंडीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरूवात केली आहे. शहराबाहेर फारशी वर्दळ नसणार्‍या व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यालयात मी माझे बाबा, आई व आमच्या दोन कुटुंब हिंतचिंतकासह बसलेली आहे. दिव्याच्या अगदी मिणमिण प्रकाशात अंधुकसा अंधार जणू अंगावर येत आहे.

गेल्या वर्षभरापासून या केंद्रात पुनर्वसनासाठी भरती असलेल्या माझ्या नवर्‍याला आज डिस्चार्ज मिळणार म्हणून आम्ही सगळे जमलेलो. बाबा कार्यालयीन पूर्ततेत गुंतले होते. पत्नी म्हणून माझ्या नवर्‍याला मी सोडवून नेऊ शकत असल्याने आम्ही हे पाऊल उचललेले.

“मॅडम, या लेटरवर सही करा “

मी सही केली. अक्षय माझ्या नवर्‍यासह पुनर्वसन केंद्राला आम्ही बाय करून निघालो.

सावित्री तू होतीस म्हणूनच मी जगू शकलो. तू नवजीवन दिलं आहेस मला. आता तुला सावित्री याच नावानं मी हाक देत जाईन.

“अक्षय, कितीही अडथळे आले तरी आपलं प्रेम अक्षय आहे, ते कधीच संपणार नाही. “

O my love. म्हणत अक्षयने एक प्रेमळ कटाक्ष माझ्याकडे ठाकला.

आज कशा अवस्थेतून मी त्याला सोडवलं होतं.? कोणत्या अशा शक्ती होत्या कि ज्यांनी व अक्षयमध्ये दुरावा निर्माण केला होता? . कशी सांगणार ही कथा दोन शब्दात. ” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील, दो लब्जों मे ये बया ना हो पाए “

“अक्षयचं स्थळ माझ्यासाठी सांगून आलेलं. घरची गरीब परिस्थिती, पण मुलगा डाॅक्टर असल्याने बाबांनी स्थळाला होकार कळवला.

” बाबा, हा डाॅक्टर आहे. दारू पित असेल तर, ” माझी शंका.

” बाबांनी सरळ मुद्यालाच हात घेतला. अक्षय दारू पित होता, पण पिणार नाही शपथेवर बोलला.

लग्नानंतर सुरूवातीचे दोन /चार वर्ष चांगले गेले. माझ्या घरात प्रथमेश चिमणा ही आला. घर कसं आनंदानं भरलं.

हळूहळू अक्षयने रंग दाखवायला सुरूवात केली. रात्री बेरात्री उशीरा घरी येणंं, पार्ट्यांमधून दारू पिऊन येणं सुरू झालं. मी विरोध करताच, चारचौघात तसं वागावं लागतं. माझ्या व्यवसायाचा तो एक भाग आहे म्हणायचा. ” 

अक्षयचे नातेवाईकही पैशांना लोचणारे होते. याचं लग्न आम्ही करायलाच नको होतं इथपर्यंत यांची मजाल गेलेली. अक्षयला चुकीचे सल्ले देणं, त्याच्यात व माझ्यात दुरावा निर्माण करणं सुरू झालं.

अक्षय तसा imotional fool होता. हलक्या कानाचा होता. त्यांच्या आडसट्यात तो वाहवत गेला. त्यातचं त्याच्याच हाॅस्पिटलमधील विधवा डाॅक्टर त्याच्यावर प्रेमजाळं टाकत होती.

चारी बाजूंनी मला नेस्तनाभूत करण्यात ही मंडळी यशस्वी झाली. अक्षय दुरावला. वहिनीच्या अंकित असलेला अक्षय तिच्या हातचं बाहुलं झाला. अक्षयचं दारूचं व्यसन तिनं नवर्‍याच्या मदतीनं वाढवलं. आणि दारूच्या नशेत अक्षयचं घर, बँक बँलन्स, शेअर्स, विमा, कॅश सगळं सगळं हडप केलं. सगळं लुटून झाल्यावर, ” निघ आमच्या घरातून म्हणत अक्षरशः त्याचं सामान फेकलं. अक्षयने विरोध करताच त्याला जबर मारहाण केली व या व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेऊन, त्यांना खोटंनाटं सांगत त्याची रवानगी इथे केली.

वर्षभर या केंद्रात खितपत पडल्यावर आज मी याची सुटका केलेली.

राम सीतेसारखा चौदा वर्षाचा माझा वनवास आज संपला होता. अक्षरशः मरणाच्या दारातून मी अक्षयला आणलं होतं. माझ्या मंगळसूत्रात व भाळावरच्या कुंकवाच्या शक्तीनेच तो माझ्यापर्यंत पुन्हा पोचला होता. कितीतरी वर्षाने नववर्ष माझ्या जीवनात आनंद घेऊन आलं होतं.

“काय सावित्री काय म्हणतेस ” ” आज आपलं प्रेम जिंकलं अक्षय ” ” होय, तुझ्या प्रेमात ती शक्ती आहेच ” FM Radio वर गाणे सुरू होते.

” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील

दो लब्जों मे ये बया ना हो पाए “

 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares