ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
आंतरराष्ट्रीय महिला दिन
एखादा विशिष्ट दिवस जेव्हा एखाद्या विशिष्ट नावाने ओळखला जातो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी इतिहास घडलेला असतो.आज आठ मार्च रोजी साज-या होणा-या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचेही तसेच आहे.
08/03/1908 या दिवशी अमेरिकेत न्यूयॉर्क येथे पंधरा हजार महिलांनी मोर्चा काढला. त्यांनी कामाचे नियमित तास, चांगला पगार तसेच मतदानाचा हक्क या आपल्या मागण्या मांडल्या व त्या मान्य करून घेण्यासाठी लढा दिला.
रशियामध्ये 1917च्या शेवटच्या फेब्रुवारी महिलांनी असाच लढा दिला. ज्युलियन कॅलेंडर प्रमाणे तो फेब्रुवारीचा शेवट चा रविवार होता. पण ग्रेगेरीयन कॅलेंडरप्रमाणे ती तारीख 08 मार्च होती.
त्यामुळे आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
जगातील अनेक देशांत 1921 पासून हा दिवस साजरा केला जातो. मात्र संयुक्त राष्ट्र संघाने जाहिर केल्यानंतर म्हणजे 1975 पासून भारतात हा दिवस साजरा होतो.
महिलांच्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेणे, महिलांचा सन्मान आणि प्रशंसा करणे, त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक करणे, लिंगभेदाला विरोध करणे आणि महिलांना आर्थिक, राजनैतिक व सामाजिक दृष्ट्या जागृत व स्वयंपूर्ण करणे असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून या दिनाचे आयोजन केले आहे.
महिलांनी महिलांना व पुरूषांनी महिलांना समजून घेऊन सहकार्य केले तरच हे उद्देश सफल होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समस्त महिला वर्गास हार्दिक शुभेच्छा!?
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ७ मार्च -संपादकीय -सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
प्रभाकर ताम्हणे
प्रा. प्रभाकर ताम्हणे हे प्रसिद्ध लेखक होते.’पुनर्मीलन’, ‘रात्र कधी संपू नये’, ‘जीवनचक्र’ आदी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या असल्या, तरी ते गाजले विनोदी कथाकार म्हणून. ‘सुपरस्टार ‘ हे त्यांचे एक पुस्तक.
त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांची कथा, पटकथा, संवाद लिहिले.त्यापैकी काही चित्रपट :
मराठी :आम्ही दोघं राजा -राणी’,’छक्के-पंजे’, ‘दीड शहाणे’,’एक धागा सुखाचा ‘ इत्यादी.
हिंदी : ‘बीवी ओ बीवी’, ‘लव्ह मॅरेज’ इत्यादी.
7 मार्च 2000 रोजी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना नम्र अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी
इंटरनेट: मराठीसृष्टी, सिनेस्तान
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी वाचकांच्या मनावर ज्या साहित्यिकाच्या लेखनाची विलक्षणमोहिनी आहे, ते साहित्यिक म्हणजे रणजीत देसाई. त्यांनी ऐतिहासिक, ग्रामीण, राजे-राजवाडे, सरदार – दारकदार यांच्या वाड्यातून होंणारा नृत्य, सगीत, चित्रकला विलास या पार्श्व्भूमीवरील कादंबर्या-, कथा लिहिल्या. त्यांचं सर्वच लेखन वाचकांनी पसंत केलं, तरीही त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्याव विशेष गाजल्या. त्यातही शिवाजी महाराजांवरची श्रीमान योगी व थोरले माधवरव पेशवे यांच्यावरील ‘स्वामी’ या कादंबर्यांवनी लोकप्रियतेचा इतिहास घडवला. अतिशय रसाळ वाणी, गतिमानता, डोळ्यापुढे हुबेहुब दृश्य साकार करायची किमया अशी त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील.
रणजीत देसाई यांनी वरील कादंबर्याीव्यतिरिक्त, समीधा , लक्षवेध, या ऐतिहासिक कादंबर्याु , शेकरू, बारी, माझा गाव या ग्रामीण कादंबर्याी, राधेय, रूपमहाल, आभोगी, राजा रविवर्मा या आणखी कादंबर्याल लिहिल्या.
संकेत, मेखमोगरी, मोरपंखी सावल्या, मधुमती, बाबूल मोरा, जाण, कणव, गंधाली, कातळ, कामोदींनी इ. त्यांचे काही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
रणजीत देसाई यांची नाटकेही लोकप्रीय आहेत. हे बंध रेशमाचे, हे त्यांचे अतिशय गाजलेले नाटक. याशिवाय, स्वामी, संगीत सम्राट तानसेन, सावली उन्हाची, लोकनायक, रामशास्त्री, पांगुळगाडा, गरुडझेप ही त्यांची अन्य नाटके आहेत.
रणजीत देसाई यांना मिळालेले पुरस्कार
स्वामी कादंबरीला १९६३ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. याच कादंबरेला याच वर्षी हा. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तर या कादंबरीला १९६४साली साहित्य अॅवकॅडमीचा पुरस्कार मिळाला.
१९७३ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाली.
१९९० मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला.
☆ ☆ ☆ ☆ ☆
वसंत नरहर फेणे
वसंत नरहर फेणे – दिवाळी अंकांचे बिनीचे लेखक म्हणून ज्यांच्याविषयी दिवाळी अंकांच्या संपादकांना विश्वास होता, आणि वाचकांना ज्यांच्या कथा आवडत, ते लेखक म्हणजे, वसंत नरहर फेणे –वयाच्या ३५व्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि वयाच्या ९०व्या वर्षापर्यंत ते लिहीत होते. ‘कारवारची माती’ ही कादंबरी त्यांनी ९०व्या वर्षी लिहून पूर्ण केली आणि ग्रंथालीने ती प्रकाशित केली. ३५ ते ९० या कालावधीत त्यांची ३० पुस्तके प्रकाशित झाली.
कादंबरी, कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद असं विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलं. या लेखनात कथा आणि कादंबर्याा त्यांनी प्राधान्याने लिहिल्या. काळ आणि मानवी समाज यांच्या नात्याचे बंध त्यातून उलगडलेले दिसतात. सर्वसामान्य माणसाचं अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने फेणे यांच्या लेखनातून प्रगट होतं. त्यांच्या लेखनात त्यांनी व्यक्तिपेक्षा समाजाला केंद्रस्थानी ठेवलेले दिसते.
वसंत नरहर फेणे- महत्वाची पुस्तके –
सेंट्रल बस स्टेशन, सहस्त्रचंद्र दर्शन, विश्वंभरे बोलविले, या कादंबर्याम, देशांतर कथा, हे झाड जगावेगळे, ध्वज, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृदगंध, निर्वासित नाती, पहिला अध्याय, पाणसावाल्यांची वसाहत, काना आणि मात्रा, काही प्यादी काही फर्जी. पिता-पुत्र, मुळे आणि पाने इ. त्यांचे कथासंग्रह आहेत.
वसंत नरहर फेणे- पुरस्कार
१. काना आणि मात्रा ला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार
२. विश्वंभरे बोलविले’ला ना.सी.फडके पुरस्कार. (२००४)
३. . शब्द – द बुक गॅलरीच्या वतीने देण्यात येणारा भाऊ पाध्ये साहित्य गौरव पुरस्कार
वसंत नरहर फेणे यांचा जन्म २८ एप्रील १९२६ तर स्मृतीदिन ६ मार्च २०१८
☆ ☆ ☆ ☆ ☆
रणजीत देसाई, वसंत नरहर फेणे, या दोघा प्रतिभासंपन्न लेखकांना शतश: प्रणाम.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अर्वाचीन मराठी वाङमयाचे जनक, विशेषत: मराठी कादंबरी आणि लघुकथांचे जनक हरी नारायण आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ मध्ये झाला. पूर्वापार चालत आलेल्या लेखनापेक्षा अगदी वेगळ्या प्रकाराचं लेखन त्यांनी केलं. त्याचा प्रभाव पुढल्या लेखकांवर पडला म्हणून त्यांच्या कालखंडाला हरिभाऊ युग असे म्हणतात आणि हरीभाऊंना युगप्रवर्तक.
हरिभाऊंनी १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक कादंबर्या् लिहिल्या. याशिवाय २ स्वतंत्र नाटके, ३ रूपांतरित नाटके व ३ प्रहसने लिहिली. त्यांच्या सामाजिक कादंबरीत तत्कालीन सामाजिक, राजकीय, संस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडवते. त्यांच्या कादंबर्यां स्त्रीकेन्द्रित आहेत. स्त्रियांच्या दु:खाला वाचा फोडणे, हेच त्यांच्या कादंबरीचे सूत्र आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनुषंगाने निर्माण झालेली पुरुष जातीची व समाजाची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता त्यातून व्यक्त झाली आहे.
ह. ना आपटे ‘ज्ञानप्रकाश’ मासिकाचे काही काल संपादक होते. ‘आनंदाश्रम’ या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकही होते. ‘करमणूक’ या मासिकाचे संस्थापक सदस्य होते. केशवसुतांची कविता व गो.ब.देवल यांचे संगीत शारदा हे नाटक हरिभाऊंनी प्रकाशात आणले. त्यांनी अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना लिहिल्या. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली त्यांनी भास्कराचार्याँची लीलावती , राणी दुर्गावती इ. ची बोधप्रद माहिती प्रकाशित केली.
ह. ना. आपटे यांची काही महत्वाची पुस्तके – सामाजिक – १. पण लक्षात कोण घेतो? २. जग हे असे आहे. ३. चाणाक्षपणाचा कळस, ४. मधली स्थिती ५. मायेचा बाजार, ६. मी, ७. यशवंत खरे
यापैकी ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी कादंबर्यां चा मानदंड मानली जाते. १. ऐतिहासिक पुस्तके – १. उष:काल, २. केवळ स्वराज्यासाठी, ३. गड आला पण सिंह गेला, ४ चंद्रगुप्त व चाणक्य, ५ वज्राघात, ६. सूर्योदय, ७. रूपनगरची राजकन्या याशिवाय स्फुट गोष्टी भाग १ ते ६ हे त्यांचे कथा संग्रह आहेत, तर संत सखू व संत पिंगळा ही नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘हरीभाऊंची पत्रे ‘ म्हणून त्यांच्या पत्रांचेही संकलन, ससंपादन झाले आहे.
अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ह. ना. आपटे यांच्या संबंधीची काही महत्वाची पुस्तके –
१. आलोचना – ह. ना. आपटे विशेषांक (१९६३)
२. ह. ना. आपटे चरित्र – रा.भी. जोशी
३. ह. ना. आपटे चरित्र व वाङ्मय विवेचन – वेणूताई पानसे
४. ह. ना. आपटे संक्षिप्त चरित्र – बापूजी मार्तंड आंबेकर
५. ह. ना. आपटे निवडक वाङ्मय- साहित्य अकादमी – संपादक विद्याधर पुंडलिक
६ हरिभाऊ आपटे – आत्मचरित्रात्मक कादंबरी- मी – डॉ. रेखा वडीरतार्य
☆ ☆ ☆ ☆ ☆
डॉ. नारायण गोविंद कालेलकर
डॉ. नारायण गोविंद कालेलकर हे मराठी भाषिक भाषावैज्ञानिक होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९०९चा. ५०च्या दशकात भाषाविज्ञान या विषयाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या लेखकांनी या विषयावर मराठीतून लिहायला सुरुवात केली. भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास या अर्थी भाषाविज्ञान ही संज्ञा आज वापरण्यात येते, त्या प्रकारच्या अभ्यासाचा प्रारंभ त्या काळात झाला. नव्या अभ्यास शाखेचा परिचय करून देणारे लेखन मराठीत करणार्याा लेखकांपैकी डॉ. कालेलकर हे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
फ्रेंच भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते सायाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती मिळवून पॅरीसला गेले. तिथून परतल्यावर बडोदायेथील महाविद्यालयात तसेच विद्यापीठात फ्रेंच भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्र हे विषय शिकवले.
कल्चरल एक्स्चेंज फेलो म्हणून ते पुन्हा पॅरीसला गेले. तेथील विद्यापीठात त्यांनी ‘ऋद्धिपूर’ वर्णनावरचा ( हा महानुभाव ग्रंथ आहे.) आपला प्रबंध फ्रेंचमधे सादर केला व डी. लिट. मिळवली.
१९५५-५६ ला रॉकफेलर प्रतिष्ठानची ज्येष्ठ अभ्यासवृत्ती मिळवून ते अमेरिकेत गेले. तिथे येल विद्यापीठात भाषाविज्ञान विभागात त्यांनी अध्ययन केले. पुण्याच्या डेक्कन कॉलेज – पदव्युत्तर व संशोधन संस्था इथे इंडो-आर्यन भाषांचे ते प्रपाठक होते. नंतर याच संस्थेत भाषाविज्ञान विभागाचे ते प्रमुख झाले.
लेखन- संपादन
सायाजी साहित्य मालेचे २४६वे पुष्प म्हणून रिचर्ड फिक यांच्या जर्मन ग्रंथाचा डॉ. शिरिष कुमार मैत्र यांनी केलेल्या इंग्रजी अंनुवादावरून ‘बुद्धकालीन भारतीय समाज’ हे पुस्तक लिहिले.
१. ध्वनीलहरी, २. भाषा आणि संस्कृती, ३. भाषा, इतिहास आणि भूगोल ही त्यांची भाषाविज्ञान या ज्ञानशाखेची तोंडओळख करून देणारी पुस्तके. त्यांनी भाषाविषयक पुस्तकांची परीक्षणेही लिहिली. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत त्यांनी लेखन केले.
आधुनिक मराठी वाङ्मयाचे जनक असलेल्या ह. ना. आपटे आणि मराठीतील भाषाशास्त्राचे पंडीत डॉ. नारायण गोविंद कालेलकर यांच्या कार्याला शतश: प्रणाम.?
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ मार्च -संपादकीय -सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
गौरी देशपांडे
गौरी देशपांडे (11.02.1942 – 1.3.2003)
महर्षी कर्वे यांची नात, दिनकर व इरावती कर्वे यांची कन्या व र. धों. कर्वे यांची पुतणी गौरी देशपांडे. त्यामुळे धीटपणा, सुधारकता, वैचारिक स्वातंत्र्य या गोष्टी त्यांच्या रक्तातच होत्या.
त्यांनी इंग्लिशमध्ये एमए व नंतर पीएचडी केलं.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये नंतर पुणे विद्यापीठात त्या इंग्लिशच्या प्रोफेसर होत्या.
कथा, कादंबऱ्या, कविता, ललित व ललितेतर लेखन, भाषांतर(मराठीतून इंग्रजी व इंग्रजीतून मराठी), संशोधन वगैरे बहुतेक सर्वच साहित्यप्रकार त्यांनी सक्षमतेने हाताळले.
त्यांच्या लेखनात मुक्त विचारांचं प्रतिबिंब दिसतं. ते स्त्रीवादापलीकडे जाऊन स्वातंत्र्य वादी, व्यक्तीवादी होतं. वेगवेगळ्या पातळीवरचं प्रेम, त्याच्या मर्यादा, त्यासाठी मोजावी लागणारी किंमत ह्याबद्दलचे विचार त्यांच्या लेखनात दिसतात. लेखणीच्या धीटपणामुळे त्यांच्यावर ‘बंडखोर लेखिका’ हा शिक्का बसला.
पुस्तके :
‘एकेक पान गळावया’, ‘तेरूओ आणि काही दूरपर्यंत’, ‘दुस्तर हा घाट आणि थांग’, ‘उत्खनन’, ‘विंचुर्णीचे धडे’ वगैरे मराठी पुस्तके.
‘बिटवीन बर्थ्स’, ‘लॉस्ट लव्ह’, ‘बियॉंड द स्लॉटरहाऊस’ वगैरे इंग्रजी पुस्तके.
‘अरेबियन नाईट्स’ चे दहा खंड वगैरे पुस्तकांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद.
सुनीता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’चा ‘-अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट ‘, तसेच अविनाश धर्माधिकारींच्या ‘अस्वस्थ दशकाची डायरी’चा ‘डायरी ऑफ अ डिकेड ऑफ ऍगनी’ वगैरे मराठीतून इंग्रजीत अनुवाद.
गौरी देशपांडे यांच्या स्मृतिदिनी त्यांना सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड. शताब्दी दैनंदिनी. इंटरनेट.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज विज्ञान दिन. मानवी जीवन सुखी व्हावे म्हणून विविध सुविधा निर्माण करणारे शास्त्रज्ञ , वैज्ञानिक, संशोधक यांना शतश: प्रणाम.
गजमल माळी
आज गजमल माळी यांचा जन्म दिन. (३१ मार्च १९३४) मराठी भाषेतील लेखक, कवी , नाटककार आणि चिंतांनापर मानवतावाद या विषयावरील महत्वाचे लेखक म्हणजे गजमल माळी ते मराठवाडा साहित्य परिषदेचे त्याचप्रमाकणे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. शिक्षणतज्ज्ञ होते. तसेच मुद्रण व्यवसायातील आघाडीचे प्रणेते होते. सत्यशोधक समाजाचे ते खंदे कार्यकर्ते होते.
गजमल माळी. औरंगाबाद कॉलेजच्या स्थापनेपासून(१९७१) कॉलेजचे प्राचार्य होते. तरुण लेखकांना सतत प्रोत्साहन देणारे आणि लिहिते करणारे प्राध्यापक साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची ३ काव्यसंग्रह, ५ संपादित पुस्तके, लोकसाहित्य शब्दकोशाचे संकलन व सत्यशोधक समाजावरील पुस्तके आहेत. ‘राजकीय सत्तांतर’ या सामाजिक, राजकीय विषयाला वाहिलेल्या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. सत्यशोधक चळवळीतील उपेक्षित व समर्पित कार्यकर्त्यांची त्यांनी आदरपूर्वक दाखल घेतली.
गजमल माळी यांची पुस्तके –
१. कल्पद्रूमाची डहाळी – नाटक – मूळ कथालेखक फ्रांन्सिस दिब्रिटो
२. कामायनी- कादंबरी
३. गांधवेणा – कविता संग्रह
४. ज्ञानोबा कृष्णाजी सासणे – चरित्र ग्रंथ
५. नागफणा आणि सूर्य- खांडकाव्य
संपादित ग्रंथ –
१. तुकारामाचे निवडक १०० अभंग
२. म.फुले व चिपळूणकर ( वैचारिक)
३. म.फुले निवडक विचार ( वैचारिक)
४. राष्ट्रीय कोंग्रेस आणि सत्यशोधक समाज ( वैचारिक)
५. वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा फुले. ( वैचारिक)
गजमल माळी यांना मिळालेले पुरस्कार
१. कल्पद्रूमाची डहाळी या नाटकास उत्कृष्ट नाट्यलेखनाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
२. ज्ञानोबा कृष्णाजी सासणे या ग्रंथाला मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
३. नागफणा आणि सूर्य या पुस्तकाला नागपूऱथील डॉ. दुर्गेश पुरस्कार
४. म.फुले आणि चिपळूणकर या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट समीक्षा लेखनाचा पुरस्कार
५. वैदिक धर्म परंपरा आणि महात्मा फुले या ग्रंथाला मथुराबाई पिंगळे पुरस्कार .
अशा या बहुआयामी लेखकाचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या लेखनकार्यास मानवंदना.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा “मराठी भाषा गौरव दिन”म्हणून घोषित करण्यात आले.
१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून ” १ मे ” दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी. हा छोटासा फरक सर्व मराठी प्रेमींना माहिती असावा म्हणून मुद्दाम स्पष्ट करावेसे वाटले.
आपण सर्व मराठी प्रेमी, मराठी भाषेचा विकास,संवर्धन आणि प्रसार होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहूया.मराठीचा सार्वत्रिक वापर जेव्हा जास्तीत जास्त दिसून येईल तेव्हाच मराठी भाषेचा ख-या गौरव होईल.
आज कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.त्यांचे काव्य,नाटक,लेखन हे लोकप्रिय तर झालेच पण नव साहित्यिकांना स्फुर्तीदायकही ठरले. देशभक्ती,सामाजिक आशय, प्रेम, निसर्ग प्रतिके, किंवा स्फूर्ती देणा-या शब्दांनी फुललेली त्यांची कविता असो किंवा त्याची कथा,कादंबरी,निबंध,ललित लेख ,नाटक यासारखे गद्य लेखन असो,या सर्वातून मानवतावाद आणि सामाजिक बांधिलकीची जाण अगदी सहजपणे दिसून येते.कविवर्य वसंत बापटांनी कवी कुलगुरू या शब्दात त्यांना गौरवले आहे.नटसम्राट सारख्या अजरामर नाट्यकृतीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली.साहित्य चळवळ जीवंत ठेवण्यासाठी त्यानी दिलेले योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.
आज त्यांचा जन्मदिवस.त्या निमित्त त्यांची एक कविता वाचून आपले मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त करूया.कविता अर्थातच कवितेचा उत्सव या सदरात.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच ज्याच्यावर बंदी घालण्यात आली असा ग्रंथ निर्माण करणारा एक लेखक मराठीत होऊन गेला हे आपल्याला माहित आहे का?.विनायक दामोदर सावरकर हे त्या लेखकाचे नाव.सावरकर म्हटल्याबरोबर आपोआप स्वातंत्र्यवीर हा शब्द ओठी येतो हे साहजिकच आहे.पण त्याच वेळेला ते एक विज्ञानवादी समाजसुधारक, इतिहासकार, हिंदू धर्माचे डोळस अभ्यासक, लेखक आणि कवी होते हेही तितकेच महत्त्वाचे !इथे इतिहासकार हा शब्द वापरताना दोन अर्थांनी वापरावा लागतो. एक म्हणजे त्यांनी इतिहासाचे लेखन केले आणि दुसरा अर्थ म्हणजे त्यांनी इतिहास निर्माणही केला.मराठीत असा दुसरा साहित्यिक नसेल असे वाटते.राष्ट्रभक्ती ही त्यांच्या रक्तातच असल्यामुळे राष्ट्राचा इतिहास, भविष्यकाळाविषयी चिंतन,सामाजिक सुधारणांचा आग्रह हे सर्व त्यांच्या लेखनात प्रतित होणे अगदी साहजिक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केलेले हिंदू धर्म चिंतन आणि त्याच वेळेला भावनाशील कवीचे दर्शनही त्यांच्या काव्यातून दिसून येते.या शिवाय ज्या भाषेतून आपण लिहीतो त्या भाषेच्या शुद्धीसाठीही ते प्रयत्नशील होते. मातृभाषेचे संवर्धन करत मातृभाषेतील साहित्यात मोलाची भर घालणारा असा मातृभूमीभक्त साहित्यिक अद्वितीयच म्हणावा लागेल.
सावरकरांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचा जो संशोधनपूर्ण इतिहास लिहिला त्याचा त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने एवढा धसका घेतला होता की या ग्रंथावर प्रकाशनपूर्वच बंदी घालण्यात आली होती. पण तरीही त्याच्या इंग्रजी प्रती प्रकाशित झाल्याच, गनिमी काव्याने!. मराठी आवृत्ती स्वातंत्र्यप्राप्ती नंतर प्रकाशित झाली. सावरकरांची देशभक्तीने ओथंबलेली गीते, शिवरायांची आरती, स्वतंत्रतेचे स्तोत्र,सागराला केलेले आवाहन आणि आव्हानही आपल्याला माहित आहेच. पण अंदमानच्या कोठडीत अकरा वर्षे अनन्वीत छळ सोसत असतानाही त्यांची काव्यप्रतिभा फुलत होती आणि महाकाव्य निर्माण होत होते हे साहित्य जगतातले आश्चर्यच नव्हे काय ?
सावरकरांचे साहित्यिक म्हणून असलेले योगदान एका छोट्या लेखात सांगणे अशक्यच आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर त्यांची ग्रंथनिर्मिती अशी:
10,000 पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत आणि 1500पेक्षा जास्त पाने इंग्रजी भाषेत मौलिक लेखन.
एकंदर 41पुस्तकांची निर्मिती–
1857चे स्वातंत्र्यसमर
अखंड सावधान असावे
अंदमानच्या अंधेरीतून
अंधश्रद्धा भाग 1 व 2
काळे पाणी
माझी जन्मठेप
मोपल्यांचे बंड
संगीत उत्तरक्रिया नाटक
संगीत उःशाप नाटक
महाकाव्य कमला
महाकाव्य गोमांतक
भाषा शुद्धी
नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
जोसेफ मॅझिनी….इ.इ.इ .
सावरकर यांचे जीवनावर आधारित अनेक ग्रंथांची, नाटक, चित्रपट यांची निर्मिती झाली आहे.अनेक ठिकाणी स्मारके उभी आहेत. त्यांच्या नावे अनेक पुरस्कारही दिले जातात.अशा या बहुआयामी साहित्यिकाने 26 फेब्रुवारी 1966 रोजी देहत्याग केला.आज त्यांचा स्मृतीदिन!
त्यांच्या कार्यकर्तृत्वास शतशः प्रणाम !?!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
स्त्रीया जेव्हा लिहू लागल्या, तेव्हा सुरुवातीच्या आघाडीच्या फळीतील लेखिका म्हणजे गिरिजाबाई केळकर. त्या पहिल्या स्त्री नाटककार. त्यांचा जन्म १८८६ चा. त्या पूर्वाश्रमीच्या द्रौपदी श्रीनिवास बर्वे. वडील गुजरातमध्ये स्थायिक असल्याने त्यांचे ५ वी पर्यंतचे शिक्षण गुजराथीत झाले. ६वीत बर्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या शाळेत त्या गेल्या. लहानपणी शेजारच्या आजीबाईंना हरीविजय, रमविजय, पांडव प्रताप, या पोथ्या त्या वाचून दाखवत.
१५ व्या वर्षी लग्न झाल्यावर गिरिजाबाई पुण्यात आल्या. वाचनाच्या आवडीतून त्यांनी उत्तम भाषा अवगत केली. दर शुक्रवारी हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या आसपासच्या स्त्रियांना घरी बोलवत आणि वाचायला शिकवत. मासिके, वर्तमानपत्रे वाचून दाखवत. ‘केसरी’ त्या नियमित वाचत. नंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली. एक लेख ‘ज्ञानप्रकाश’ला पाठवला. तो छापून आल्यावर त्यांनी नियमित लेखन केले. ‘‘ज्ञानप्रकाश’ आणि ‘आनंद’ मध्ये त्यांचे लेख छापून येत. ‘ज्ञानप्रकाश’ मधील लेखांचे ‘गृहिणी भूषण’ नावाचे पुस्तक पुढे प्रकाशित झाले. त्याला वा. गो. आपटे यांची प्रस्तावना आहे.
त्यांनी ‘पुरूषांचे बंड’ नावाचे नाटक लिहिले. खाडीलकरांनी लिहिलेल्या ‘बायकांचे बंड’ या नाटकाला सडेतोड उत्तर म्हणून त्यांनी हे नाटक लिहिले. य. ना. टिपणीस यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले. १९१३ साली हे पुस्तक प्रकाशित झाले.
गिरिजाबाई यांची प्रकाशित पुस्तके – १. मांदोदरी, २.राजकुंवर, ३.हीच मुलीची आई, ४.वरपरीक्षा, ५. सावित्री. ६. आयेषा ही सर्व नाटके आहेत. ‘गृहिणी भूषण’ हा २ भागातला लेखसंग्रह आहे. द्रौपदीची थाळी हे आत्मचरित्र, तर संसारसोपान हे वैचारिक पुस्तक आहे. तसेच स्त्रियांचा वर्ग हे अनुवादीत पुस्तक आहे. स्त्रियानु वर्ग या गुजराती पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
१९२८मधे मुंबईत भरलेल्या २३ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. आज त्यांचा स्मृतिदिन ( २५ फेब्रु. ८० ). त्यांच्या साहित्यिक – नाट्य विषयक कार्याला शतश: प्रणाम ?
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले (24 फेब्रुवारी 1905 – 24 फेब्रुवारी 1986)
त्यांनी तत्त्वज्ञान या विषयात 1924मध्ये बी ए व 1927 मध्ये एम ए केले.
ते नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख होते. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ फिलॉसॉफी, अमळनेर येथे रिसर्च फेलो होते. कर्नाटक महाविद्यालय, धारवाड येथे तत्त्वज्ञान व इंग्लिशचे प्राध्यापक होते.
1954 मध्ये तर्कशास्त्र व सद्वस्तुमीमांसा विभाग, भारतीय तत्त्वज्ञान परिषद, सिलोन येथे ते अध्यक्ष होते. नंतर 1955, 1958, 1959 साली अनुक्रमे ऑक्सफर्ड व लीड्स, व्हेनिस व म्हैसूरला भरलेल्या आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदांमध्ये त्यांनी निबंध सादरीकरण केले.
‘बोधवचने ‘, ‘विचारवडाच्या पारंब्या’, ‘ चिंतन’ व ‘न्यायरत्न महर्षी विनोद यांच्यावर लेख – महर्षी विनोद जीवन दर्शन’ हे त्यांचे मराठी लेखन.
त्यांनी ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ व ‘डॉ. आय. टी. रमसे’ या पुस्तकांच्या इंग्रजी प्रस्तावनाही लिहिल्या.
त्यांच्या निधनानंतर 2 मार्च 1986च्या ‘केसरी’मध्ये त्यांचे सहकारी प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे यांनी लिहिलेला ‘श्रेष्ठ विचारवंत :प्राचार्य प्र. रा. दामले’ हा लेख प्रसिद्ध झाला होता.
24 फेब्रुवारी 1986 ला त्यांचे देहावसान झाले.
☆☆☆☆☆
लक्ष्मीबाई टिळक
लक्ष्मीबाई नारायण टिळक (1 जून 1868 – 24 फेब्रुवारी 1936)
मनकर्णीका गोखले यांचा वयाच्या 11 व्या वर्षी नारायण वामन टिळक या कवीशी विवाह झाला व त्या लक्ष्मीबाई टिळक झाल्या.
तेव्हाच्या प्रथेप्रमाणे लिहितावाचता न येणाऱ्या लक्ष्मीबाईंना त्यांच्या पतीने लिहिणेवाचणे शिकवले. लक्ष्मीबाईंनी लेखिका, कवयित्री, वक्ता बनावे, यासाठी टिळक प्रयत्नशील होते.
लक्ष्मीबाईंनी लिहिलेले ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र अतिशय गाजले.85 वर्षे उलटून गेली, तरी त्याची जादू अजूनही कायम आहे. त्यातील प्रांजलपणा व निर्भयता याची तुलना आचार्य अत्रेंनी म. गांधींच्या ‘सत्याचे प्रयोग’शी केली.बाईंची तल्लख विनोदबुद्धी, आनंदी, खेळकर स्वभाव, अकृत्रिम,खुमासदार शैली, एवढंच नव्हे तर नितळ, साध्या, अभिनिवेशरहित दृष्टीने आयुष्याकडे पाहत केलेले लेखन मनाला भिडते.
टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर साडेचार वर्षांनी बाईंनीही विचारपूर्वक धर्मांतर केले.त्यांनी नेहमीच आधी विचार बदलले, मग आचार.
टिळकांनी ‘ख्रिस्तायन’ हे महाकाव्य लिहायला घेतले. पण जेमतेम 10 अध्याय लिहून झाल्यावर त्यांचे निधन झाले.लक्ष्मीबाईंनी पुढचे 64 अध्याय लिहून ते महाकाव्य पूर्ण केले.
त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत.’भरली घागर ‘हा त्यांचा एक कवितासंग्रह.
24 फेब्रुवारी 1936 रोजी त्यांचा देहांत झाला.
‘स्मृतिचित्रे’सारखे अभिजात अक्षरवाङ्मय लिहून लक्ष्मीबाई टिळक मराठी साहित्यात अमर झाल्या आहेत.
प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले व लक्ष्मीबाई टिळक या दोघांनाही त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर वंदन.