मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक नंबर शिवणार” – भाग – २ – लेखक : श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ “एक नंबर शिवणार” – भाग – २ – लेखक : श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

(एक नंबर शिवणार हे सांगायला, आणि आपला फोन नंबर एका कागदावर लिहून द्यायला तो विसरला नाही. पण दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हटलं, पण तेही राहूनच गेलं.) इथून पुढे – – 

ह्या घटनेनंतर साधारण नऊ दहा वर्षांनी एकदा दुपारी ठाण्याला मी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तिथून जेवून परत घरी येताना, हॉल स्टेशनजवळ होता, म्हणून जेवण जिरवायला चालत स्टेशनकडे निघालो. नेमकं त्याचवेळी माझ्या बुटाच्या सोलने मला दगा दिला. बुटाला सोडून सोल लोंबकळू लागला.

मात्र माझ्या नशिबाने तिथून पन्नास फुटावरच मला एक चांभराचं दुकान दिसलं. कसातरी खुरडत मी त्या दुकानापर्यंत पोचलो. तिथला चांभार खालमानेने काहीतरी शिवत होता. मी त्याच्या पुढ्यात माझा सोल सुटलेला बुट टाकला.

“सोल सुटलाय का, आत्ता शिवतो बघा. ” तो म्हणाला.

“दादा, जरा चांगला शिवा हं. मला लांब जायचंय. ” मी म्हणालो.

“साहेब, अगदी एक नंबर शिवणार बघा. काळजीच नको. ” त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी चमकलो. हा राजाराम तर नव्हे?

“राजाराम? ” मी सरळ हाकच मारली.

हाकेसरशी त्याने वर बघितलं. तो राजारामच होता. माझ्याकडे त्याने दोन मिनिटं बघितलं आणि म्हणाला, “साहेब, तुम्ही ते अंधेरीचे इतिहास संशोधनवाले ना? ” 

मी हो म्हणालो. पठ्ठ्याच्या लक्षात होतं तर. मला बरं वाटलं.

एकमेकांना ओळखल्यावर साहजिकच आम्ही गप्पा मारु लागलो. बोलता बोलता तो म्हणाला, आता मी कामासाठी पूर्वीसारखा फिरत नाही. हे खोपटं भाड्याने घेतलय. रोज इथे मी आणि मुलगा येतो, आणि काम करतो. माझ्या फिरण्यामुळे आणि चोख कामामुळे बरेचजण मला ओळखतात. ते फाटकी पुस्तकं, वह्या वगैरे इथे घेऊन येतात. माझा मुलगा ते शिवतो आणि मी चपला, बुट वगैरे शिवतो.

मुलगा? मी चमकलो. माझ्या आठवणीप्रमाणे राजारामला मूलबाळ नव्हतं, मग हा मुलगा कुठून आला? माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून राजारामच पुढे म्हणाला,

“साहेब, माझा सख्खा मुलगा नाही. त्याचं काय झालं, सात आठ वर्षांपूर्वी एक दिवशी मी ठाण्याला स्टेशनवर उतरलो, तेव्हा पुलाखाली मला एक लहान पांगळा मुलगा दिसला. कुठल्या तरी भिकाऱ्याचा असावा. चेहऱ्यावरून उपाशी दिसत होता. मला त्याची दया आली म्हणून मी एक बिस्कीटचा पुडा घेऊन त्याला द्यायला गेलो, तेव्हा तो गुंगीत आहे असं लक्षात आलं. मी त्याच्या अंगाला हात लावून बघितलं, तर अंग चांगलंच गरम लागलं. सणकून ताप भरला होता. मग मी तसाच त्याला उचलला आणि स्टेशनजवळच्या एका ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून त्याला औषध दिलं. तोपर्यंत हे सगळं ठीक होतं. त्यानंतर आता ह्या मुलाचं काय करायचं हा विचार माझ्या मनात आला. पण मी धाडस करुन आणि काय होईल ते बघू असं ठरवून त्याला थेट माझ्या घरीच घेऊन गेलो. बायकोने आणि आईने त्या मुलाला बघून बरेच प्रश्न विचारले. मी त्यांना काय घडलं ते सविस्तर सांगितलं. आधी त्यांनी दुसऱ्याच्या अनोळखी मुलाला घरात घ्यायला काचकूच केलं. पण नंतर त्याची अवस्था बघून त्या तयार झाल्या. थोड्या दिवसांनी औषधांनी आणि चांगल्या खाण्यापिण्याने तो मुलगा बरा झाला. म्हणून मी त्याला, परत होता तिथे सोडून येतो म्हणालो, पण तोपर्यंत त्या दोघींना त्याचा लळा लागला. त्यांनी नेऊ दिलं नाही. तसंही आम्हाला मूलबाळ नव्हतं आणि इतक्या दिवसात त्याची चौकशी करायला कुणीही आलं नव्हतं. हा अपंग मुलगा कुणाला तरी जड झाला असेल, म्हणून दिला असेल सोडून. दुसरं काय? राहू दे राहील तितके दिवस. माझ्या आईने त्याचं नाव किसन ठेवलं. आधी आम्हाला तो नुसता पांगळाच वाटला, पण नंतर त्याची जीभही जड आहे हे लक्षात आलं. तो तोतरा बोलतो. पण ह्या दोन गोष्टी सोडल्या तर अगदी हुशार आहे. घरी मी पुस्तकं शिवायचं काम करायचो तेव्हा माझ्या बाजूला बसून माझं काम तो लक्षपूर्वक बघायचा. तीन चार वर्षातच त्याने माझं काम आत्मसात केलं. आता तो लिहा वाचायला पण शिकतोय.

साहेब, आमचं हातावर पोट आहे. त्याला घरी ठेवला तर माझ्या बायकोला किंवा आईला त्याच्यासाठी घरी थांबायला लागतं, त्यांचा कामावर खाडा होतो. त्यात त्याच्या तोतरेपणामुळे आजूबाजूची मुलं त्याला चिडवून बेजार करतात, म्हणून मी त्याला पाठूंगळीला मारुन रोज इथे माझ्या मदतीला घेऊन येतो. ” एका दमात राजारामने सगळं कथन केलं.

“अरे पण आहे कुठे तो, मला तर दिसत नाही. ” सगळं ऐकून आणि आश्चर्यचकित होऊन मी म्हणालो.

“या, दाखवतो, ” असं म्हणून राजाराम मला त्याच्या दुकानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला.

तिथे कंपाऊंडची भिंत आणि राजारामचं दुकान याच्या मधल्या, प्लॅस्टिकचं छप्पर असलेल्या छोट्याश्या जागेत एक पांगळा मुलगा अगदी तन्मयतेने एक जुनं पुस्तक शिवत बसला होता. राजारामने उजेडासाठी तिथे एका बल्बची सोय केली होती. त्या मुलाच्या आजबाजूला काही फाटकी आणि काही शिवलेली वह्या, पुस्तकं होती. कामातली त्याची सफाई अगदी राजारामसारखीच वाटत होती. राजारामने त्याची आणि माझी ओळख करुन दिली. माझ्याकडे बघून त्याने हात जोडले व तो छान हसला. मला राजारामचं आणि त्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर मला त्या मुलाची दयाही आली, म्हणून मी राजारामला विचारले,

“राजाराम, तू ह्याला मागे का बसवतोस? पुढे तुझ्या बाजूला बसव. तिथे उजेड चांगला आहे आणि जागाही मोठी आहे. ” 

“साहेब, आधी त्याला मी पुढेच बसवायचो. पण नंतर लक्षात आलं, की लोकं एकाच ठिकाणी चपला आणि पुस्तकं शिवायला द्यायला बिचकतात. त्यातूनही काहींनी काम दिलं तर ते पैसे किसनच्या कामाकडे न बघता त्याच्या पांगळेपणाकडे बघून द्यायचे. ते मला आवडत नव्हतं. म्हणून मग मी त्याला मागे बसवायला लागलो. त्या अरुंद जागेची त्याला आता सवय झालीय. आता तो कुणाला दिसत नाही. त्यामुळे सगळेच प्रश्न सुटले. साहेब, तो त्याच्या पांगळ्या पायांवर कधीच उभा नाही राहिला तरी चालेल. पण आपल्या हिमतीवर उभा राहीला पाहिजे. कुणाच्या दयेवर नको. ” राजारामने स्पष्टीकरण दिलं.

राजारामच्या ह्या विचारांनी मी थक्क झालो. अश्या विचारांची माणसं आजच्या जगात खरंच दुर्मिळ आहेत.

राजारामचं आणि किसनचं पुन्हा एकदा कौतुक करुन, त्यांचा निरोप घेऊन मी निघणार, इतक्यात राजाराम म्हणाला,

“साहेब आणखी एक सांगू? आजवर आम्ही तिघांनी चपला, वह्या, पुस्तकं, गोधड्या, पिशव्या ह्या निर्जीव वस्तू खूप शिवल्या, त्यावर आमचं पोट भरलं. पण आता आम्ही ह्या पांगळ्या मुलाचं फाटलेलं आयुष्य शिवणार. आणि अगदी एक नंबर शिवणार बघा. हे देवाने दिलेलं काम आहे, ते करायलाच पाहिजे. “

राजारामचं ते वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं, आणि माझ्या मनातली त्याची प्रतिमा शतपटीने उंचावली.

समाप्त

लेखक : श्री राजेंद्र परांजपे

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक नंबर शिवणार” – भाग – १ – लेखक : श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ “एक नंबर शिवणार” – भाग – १ – लेखक : श्री राजेंद्र परांजपे ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

रविवारची सकाळ. आम्ही सगळे झोपेत होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. आधी मी दुर्लक्ष केलं. वाटलं भास असेल. पण दोन मिनिटांनी पुन्हा वाजली. तिसऱ्या वेळेस जेव्हा वाजली तेव्हा नाईलाजाने उठावं लागलं. उठून घड्याळात बघितलं तर जेमतेम साडेसात वाजत होते. म्हणजे रविवारच्या मानाने पहाटच म्हणायची.

मी आळस देतदेतच दार उघडलं. दारात साधारण चाळीस एक वर्षांचा एक काळासावळा माणूस उभा होता. अंगात पांढरा लेंगा झब्बा, आणि डोक्यावर मळकी गांधीटोपी. दाढीचे खुंट वाढलेले. त्याच्या हातात एक कापडी पिशवीपण होती. मी त्याला ओळखलं नाही.

माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तोच म्हणाला, “साहेब, नमस्कार. मी राजाराम. ” 

“सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. ” मी म्हणालो.

“अहो कसं ओळखणार? आपण पहिल्यांदाच भेटतो आहोत. मला बाबासाहेब देशमुखांनी तुमचा पत्ता दिला आणि भेटायला सांगितलं. ” त्याने स्पष्टीकरण दिलं.

बाबासाहेब देशमुख म्हणजे प्रसिद्ध इतिहास संशोधक. माझे चांगले आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र. त्यांनी पाठवलंय म्हणजे हा माणूस नक्कीच कामाचा असणार. हे लक्षात आल्यावर, मी राजारामला म्हणालो,

“या ना, आत या. बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. “

“साहेब, तुम्ही मला अहो जाहो नका करु. नुसतं राजाराम म्हणा. मी लहान माणूस आहे. ” राजाराम म्हणाला.

“बरं, बस राजाराम. मी आलोच” असं म्हणून मी आत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, आणि काय काम आहे ते विचारलं.

“साहेब, मी जुनी फाटकी पुस्तकं शिवतो. देशमुखसाहेब म्हणाले की तुम्हीपण त्यांच्यासारखेच इतिहास संशोधक आहात. त्यामुळे तुमच्याकडेपण शिवण्यासारखी अशी दुर्मिळ आणि फाटकी पुस्तकं असतील तर ती द्या. एक नंबर शिवतो बघा मी ती. अगदी नव्यासारखी करुन देतो. ” राजारामने त्याच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं.

त्याचं म्हणणं खरं होतं, मीदेखील गेली तीसेक वर्ष इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे, कुठून कुठून जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं, ग्रंथ, बखरी आणि इतर बरेच ऐतिहासिक दस्तावेज जमा केले होते. त्यातल्या काहींची अवस्था खूप नाजूक होती. ती व्यवस्थित शिवणं गरजेचं होतं. नाहीतर त्यातली पानं सुटून गहाळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे मी अशाच एखाद्या माणसाच्या शोधत होतो. बरं झालं बाबासाहेबांनी त्याला धाडला ते.

“आहेत अशी पुस्तकं वगैरे. अरे पण ती बेडरुममधे कपाटात आहेत. बेडरूम मध्ये माझी बायको आणि मुलगा झोपले आहेत. कपाटातून पुस्तकं बाहेर काढताना कदाचित त्यांची झोपमोड होईल. तू असं कर, तू दुपारनंतर ये. तोपर्यंत मी ती काढून ठेवतो. ” मी म्हणालो.

“दुपारनंतर? ” तो चाचरत पुढे म्हणाला, “साहेब, मी अंबरनाथला राहतो. आता घरी जाऊन परत यायचं म्हणजे खूप उशीर होईल. त्यापेक्षा मी तुमच्या बिल्डिंगच्या खालीच थांबतो, आणि तासाभराने वर येतो. चालेल?

अंबरनाथला राहतो? अरे बापरे! तिथून निघून हा माणूस रविवारी इतक्या लवकर अंधेरीला माझ्या घरी पोहोचला? पहिल्यांदाच आल्यामुळे माझं घर शोधण्यातदेखील त्याचा थोडा वेळ गेला असेलच. कमाल आहे या माणसाची. म्हणजे घरुन निघाला तरी किती वाजता असेल हा? मनातल्या मनात विचार करुन मी त्याला म्हणालो, “बरं, चालेल. मी लवकरात लवकर पुस्तकं बाहेर आणतो. पण तू घरुन काही खाऊन निघालास का? “

“हो साहेब” तो म्हणाला खरा, पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तो खोटं बोलतोय. घरुन निघताना किंवा वाटेत त्याने काहीच खाल्लेलं नसावं. मी खणातून माझं पाकीट काढलं, आणि त्यातली शंभरची नोट काढून त्याच्या पुढ्यात धरुन म्हटलं “हे घे आणि कोपऱ्यावर जाऊन आधी चहा, नाश्ता करुन ये. ” 

राजारामने थोडे आढेवेढे घेतले, पण मी ती नोट त्याच्या खिशातच कोंबल्यावर त्याचा नाईलाज झाला. तो नाश्ता करायला गेला.

तो चहा, नाश्ता करुन येईपर्यंत, मी पुस्तकं काढून ठेवली होती.

ही पुस्तकं शिवायचं काम तो कुठे बसून करणार, असा माझ्या मनात प्रश्न आला. पण जणू काही तो वाचून, राजारामच म्हणाला, “साहेब, तुम्ही तुमची गॅरेजमधली गाडी थोडावेळ बाहेर लावलीत तर मी तिथे बसून काम करतो. चालेल का? “

राजाराम हुशारीने आधीच सगळा विचार करुन आला होता तर. मला त्याचं कौतुक वाटलं.

आणि त्याचा प्रस्तावही चांगला होता. मग आम्ही दोघांनी मिळून पुस्तकं आणि एक मोठी चटई खाली नेली. मी माझी गाडी बाहेर लावली, आणि गॅरेजची जागा त्याला मोकळी करुन दिली. त्याने ताबडतोब चटई अंथरुन त्याच्या जवळच्या पिशवीतून दाभण, दोरा, गोंद, चिकटपट्टी वगैरे सामान काढलं आणि तो कामाला लागला.

“एक नंबर शिवणार बघा साहेब. काही काळजीच नको तुम्हाला आता या पुस्तकांची. या तुम्ही तुमचं आवरुन. ” तो म्हणाला.

वॉचमनला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून मी घरी गेलो आणि आंघोळ, चहा नाश्ता करुन पुन्हा तासा दीडतासाने खाली गेलो. तोपर्यंत त्याने अर्धअधिक काम संपवलं होतं. कामातली त्याची सफाई बघून मी खुश झालो. त्याच्याशी गप्पा मारता मारता मला समजलं की त्याच्या घरी त्याची बायको आणि आई आहे. त्या दोघी लोकांकडे धुणी, भांडी करतात आणि फावल्या वेळेत गोधड्या, पिशव्या वगैरे शिवण्याचंही काम करतात. आणि हा चपलांपासून पुस्तकांपर्यंत सगळं शिवतो. तसे खाऊन पिऊन सुखी होते तिघे, पण त्याच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली तरी अजून पाळणा हलला नव्हता. हा सल त्याच्या मनात होता, तो त्याने दोन तीन वेळा बोलूनही दाखवला. असतं एकेकाचं नशीब.

आणखी तासाभरात त्याचं काम संपलं. आम्ही पुस्तकं घेऊन वर घरी आलो. अगदी मला हवं होतं तसं काम केलं होतं त्याने. त्याला काही खायला देऊन, मी पैसे विचारले. माझ्या अंदाजापेक्षा त्याने कमीच सांगितले. मी ते दिले. त्याबरोबर त्याने त्यातले शंभर रुपये मला परत दिले. “साहेब, हे सकाळी तुम्ही मला नाश्त्यासाठी दिले होते. ” तो म्हणाला.

मी अवाक् झालो. आजच्या लबाडीच्या जगात इतका प्रामाणिकपणा? नाहीतर लोक ठरलेले पैसे दिल्यावरसुद्धा वर लोचटपणे आणखी बक्षिसी मागतात. मी राहू दे म्हटलं. पण त्याने ऐकलं नाही. ती नोट त्याने टेबलावर ठेवली आणि नमस्कार करुन तो निघून गेला. जाण्याआधी, परत काही काम असेल तर सांगा साहेब, एक नंबर शिवणार हे सांगायला, आणि आपला फोन नंबर एका कागदावर लिहून द्यायला तो विसरला नाही. पण दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हंटलं, पण तेही राहूनच गेलं.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री राजेंद्र परांजपे

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाचशे पावलं… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? जीवनरंग ?

☆ पाचशे पावलं… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

अपूर्वा रोजच्याप्रमाणे बागेत गेली. आज बागेत बरीच गर्दी दिसत होती. वाॅकिंग ट्रॅक वरून चालत असताना एका बाजूला सूर्य कलताना दिसत होता. डोक्यावरून एक दोन पक्ष्यांच्या माळा पण उडत गेल्या होत्या. आज घरातले आवरून बाहेर पडेपर्यंत तिला रोजच्यापेक्षा जरा उशीरच झाला होता, अंगवळणी पडलेल्या सवयीनुसार तिचे मन बाहेर फिरण्यास उत्सुक होते. आज रोजच्यापेक्षा कमी फिरावे असा विचार करून तिने हातातल्या घड्याळात बघितले. हातावरचे घड्याळ सात वाजून दहा मिनिटांची वेळ दाखवित होते. घरी परत जाताना तिला थोडी फळ व भाज्या खरेदी करायच्या होत्या. तिने अजून एक फेरी मारु असा विचार केला. बागेतल्या त्या शेडखालच्या बाकांवर अजून पेठे काका, शिरसाट काका, वगळ काका व हल्ली हल्ली त्यांना जाॅइन झालेले कुळकर्णी काका मोठमोठ्याने हसत बोलताना तिने पाहीले, हल्ली शिरसाट काका फार दिवसांनी बागेत आल्याचे तिच्या लक्षात आले. तस पाहता ते बागेच्या गेटच्या बाहेर पडल्यावर समोरच्याच टाँवरमध्ये राहत होते. नवीनच झालेला टाँवर तीस मजली होता. त्यांना भेटून ” कुठे होतात बरेच दिवस आला नाहीत तुम्ही? ” असे विचारावे का हा विचार अपूर्वाच्या मनात आला. अपूर्वा बरेच वर्ष त्या बागेत येत होती. वेळ मिळेल तसा ती कमी जास्त वेळ बागेत चालायला यायची. त्यामुळे तिची या सर्वांशी चांगलीच ओळख होती. बरेच वेळा त्यांच्याशी बोलून ती आणखीन घट्ट झाली होती.

बागेतून बाहेर पडण्याच्या विचाराने गेटजवळ गेलेली अपूर्वा परत मागे फिरली. जाऊ दे. होऊ दे पाच मिनिटे उशिर. पण बोलूया सर्वांशी तिथे जाऊन. असा विचार करून ती सर्व बसले होते त्या बाकांजवळ आली. तेव्हा तिने पाहिले की ते सर्वजण पण उठून एकमेकांचा निरोप घेत होते. वगळ काका शिरसाट काकांना म्हणाले, ” अरे शिर्‍या, येत जा दोस्ता. एवढ्या जवळ तर राहतोस. मित्रांना भेटायला येत जा जरा सवड काढून. ” वगळ काका आणि शिरसाट काका लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांच्या वयात फार अंतर नव्हते. पेठे आणि कुळकर्णी हे मात्र त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते. तेवढ्यात पेठे काका बोलले “अहो शिरसाट येत जा अधूनमधून. तुम्हाला भेटून बर वाटत.” अपूर्वा दुरूनच हे संभाषण ऐकत होती. त्यांच्या त्या मैत्रीच्या चौकोनात शिरसाट काका वयाने इतर तिघांपेक्षा मोठे होते. शांत, गंभीर, मितभाषी होते. तरीपण सगळ्यांशी त्यांचे छान जमत असे. शांत राहून, कमी बोलूनसुदधा ते इतरांशी मिळून मिसळून राहत असत. बाहेर फिरताना त्यांची एक जीवाभावाची मैत्रीण त्यांच्या सोबतीला सतत राहत असे. ती म्हणजे त्यांंना सतत आधार देणारी त्यांची काठी. शांत, विचारी असे व्यक्तिमत्व लाभलेले ते मित्रांच्या चाललेल्या चेष्टा मस्करीत सक्रियपणे भाग घेत नसत. हलकेच हसून, शांत राहून एखाद वाक्य बोलून जात. फिरायला जाण्याच्या उद्देश्याने बाकी तिघांच्या राहणीमानात बदल घडला होता. कोणी टी शर्ट पँट घालत असे, तर कोणी टी शर्ट आणि ट्रॅक पँट घालून येई. तर कधी हाफ पँट व टी शर्टपण घालत असे. पण शिरसाट काका मात्र आपण त्यांना बघतोय तेव्हापासून झब्बा व लेंगा या वेशातच दिसत आले आहेत हे मात्र खरे. अपूर्वाने विचार केला. अपूर्वाला ते त्यांच्यात वेगळे जाणवायचे.

कुळकर्णी बोलल्यावर शिरसाट काका शांतपणे म्हणाले, ” अहो कुळकर्णी यावेसे फार वाटते हो. तुम्हाला तिघांना भेटायची फार इच्छा असते पण हल्ली प्रकृतीच्या कुरबुरी चालू असतात त्याच्यामुळे इच्छा असूनही शरीर साथ देत नाही. मग घरी बसण भाग होत. मग बसतो सोडवित पेपरमधील शब्दकोडी व आवड म्हणून लिहीतो १/२ पानं तेवढाच आपला विरंगुळा. कधी कधी शरीराने हो म्हटले तर बाल्कनीत उभा राहून दुरूनच तुम्हाला पाहतो. तेवढच आपल समाधान. ” आणि ते हसले.

अपूर्वाला दोन तीन वर्षांअगोदरचे ते आठवले काठीविना चालणारे. पण नंतर वयापरत्वे काठी त्यांच्याजवळ येऊन त्यांना साथ देऊ लागली होती. असे जरी असले तरी पूर्वी इतकेच शांत कुठेही त्रागा नाही की लाभलेल्या परिस्थितीसाठी कुरबूर नाही. आलेल्या परिस्थितीशी मिळतेजुळतेपणा अंगिकारुन पुढे जाणारे ते खरच किती वेगळे होते. ऐकू न येणे ह्या त्यांच्या समस्येलापण त्यांनी समस्या न ठेवता एक रोजच्या जीवनातील गोष्ट म्हणून स्विकारली होती. अपूर्वाने विचार केला, ” खरच कशी वेगवेगळ्या स्वभावाची माणस भेटत असतात. “

अपूर्वा पटकन पुढे होऊन शिरसाट काकांना म्हणाली, ” कसे आहात काका? तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. ” त्यावर ते पण बोलले, ” बरा आहे मी. तू कशी आहेस? आता पाय थकले आहेत. पूर्वीसारखे साथ देत नाहीत. म्हणून हल्ली बाहेर पडणे कमी झाले आहे. तू रोज येतेस ना? ” अपूर्वा बोलली. ” हो काका. मी सहसा चुकवत नाही. फिरल्यावर बर वाटत. मनाला आनंद मिळतो. ” अपूर्वाने त्यांना म्हटले, ” काका, तुम्ही मग टेरेसवर तरी जाता का फिरायला मोकळ्या हवेत? ” ” नाही ग. एवढा अट्टाहास करायचे दिवस आता राहीले नाहीत. खर सांगू तुला माझी रोजची गरजेची कामं करण्यापुरत जरी मी चालू शकलो तरी खूप झाले. अजून किती अपेक्षा बाळगायच्या आता पायांकडून? माझ्या त्या नित्याच्या कामांसाठी मला वाटते पाचशे पावले चालता आली तरी त्या परमेश्वराचा मी आभारी राहीन. ” आणि ते काठीच्या आधाराने पुढे चालू लागले. पाचशे पावल खरच किती माफक अपेक्षा आहे नाही ह्यांची? अपूर्वाने विचार केला असच जर का प्रत्येक वृदध व्यक्ती विचार करेल तर जीवनातली वाट्याला येणारी संध्याकाळ किती आनंदी होईल.”

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

मुम्बई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दयाळूपणाचा महिमा – (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

दयाळूपणाचा महिमा – (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

माझे नाव वेरोनिका आहे. मी ८० वर्षांची आहे. मी ब्राइटनमधील एका हार्डवेअर दुकानाच्या वरच्या एका छोट्या अपार्टमेंटमध्ये एकटी राहते. माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, पेन्शन, थोडी बचत यावर माझे घर चालते.. बाल्कनीतील माझ्या बागेत, पुदिना, थायम आणि एक हट्टी टोमॅटोचे रोप आहे.

दर शुक्रवारी, मी नेहमीच्याच सुपरमार्केटमध्ये जाते. त्याच वेळी आणि त्याच गाडीत. मी चहा ची पावडर, ब्रेड, सूप चे कॅन आणि नेहमीच… नेहमीच मोठ्ठ चॉकलेट खरेदी करते. हीच माझ्यासाठी मेजवानी असते.

एका पावसाळी दुपारी, मी एका तरुणीच्या मागे रांगेत होते. तिच्यासोबत दोन लहान मुले होती. एक हळू हळू रडत होतं. दुसऱ्याच्या हातात खेळण्यातला एक कापडी ससा होता ज्याला एक डोळा नव्हता.

तिने दूध, अंडी, तांदूळ, गोठवलेले वाटाणे, डायपर हे सगळं सरकत्या बेल्टवर ठेवले. तिचे हात थरथरत होते. जेव्हा कॅशियर ने ३८. ७६ डाॅलर बिल झाल्याचे सांगितले ते ऐकून ती एकदम स्तब्ध झाली. तीने रोखपाल (कॅशीयर) ला क्रेडिट किर्ड दिले. ते नाकारले गेले. तीने दूसरे कार्ड दिले. ते ही नाकारले गेले.

ती तरुणी रोखपाल (कॅशीयर) जवळ काहीतरी कुजबुजली “मी यातून दूध आणि पाव (ब्रेड) वगळू शकते का?” तीचा आवाज तुटक येत होता.

तेव्हाच मी काहीही विचार न करता माझं कार्ड रोखपाल (कॅशीयर) ला देत त्या तरुणीला त्या सर्व वस्तू माझ्या खात्यातून देण्यास सांगितले. त्या तरुणीने डोळे विस्फारून मागे वळून बघितले व म्हणाली “नाही, मी हे नाही स्विकारू शकत. “

“तू हे घेऊ शकतेस” मी म्हणाले ” कधी ना कधी आपणास सर्वांना मदतीची गरज पडतेच. ” तीने धन्यवाद करण्याआधीच मी स्मितहास्य केले व माझी छोटीशी पिशवी बॅग घेऊन तेथून निघून आले. मी हे काही तीचं धन्यवाद ऐकण्यासाठी केलं नव्हतं.

मला माझं तरुणपण आठवलं. तुटलेली. घाबरलेली. नवरा गेल्यानंतर माझ्या मुलाला मी कसंतरी वाढवत होते. एकदा मी अशीच रांगेत उभी होते… आणि मला कोणीही मदत केली नव्हती. म्हणून मी तीचं बील दिलं आणि घरी निघून गेले.

पण मला पुढचं काही माहीत नव्हतं.

ती तरुणी, तीचे नाव लैला होते, तीने त्या रात्री सार्वजनिक फेसबुक वर या मदतीविषयी लिहिले. “आज एका अनोळखी व्यक्तीने माझ्या किराणा सामानाचे पैसे दिले. पांढरे केस आणि दयाळू नजर असलेली एक वयस्कर महिला. तिने मला व्याख्यान दिले नाही. काहीही मागितले नाही. फक्त पैसे दिले. आणि निघून गेली. मी गाडीत बसून रडले. माझ्या मुलांनी त्या रात्री तिच्यामुळे जेवण केले. जर तुम्ही तिला ओळखत असाल तर तिला सांगा… या कृतीसाठी फक्त धन्यवाद पुरेसे नाही. “

कोणीतरी टिप्पणी केली, “थांबा – तिने पिवळा रेनकोट घातला होता का?” 

आणखी एकाने लिहिले “ती थॉम्पसनच्या हार्डवेअरच्या वर राहते, बरोबर? मी तिला दररोज सकाळी झाडांना पाणी देताना पाहतो. “

तासाभरातच लोकं माझ्या दारासमोर दिसू लागले. ते काही वार्ताहर नव्हते की त्यांचेकडे कॅमेरे ही नव्हते. ते माझे शेजारी होते. ते माझ्यासाठी फुलं, घरी बनवलेल्या जॅम ची बाटली, हाताने विनलेले मफलर वगैरे घेऊन आले होते.

एका किशोरवयीन मुलाने एक चिठ्ठी लिहिली, “तू तिच्यासाठी पैसे दिले. मी ही यापुढे पैसे देत जाईन, मी आता युवा केंद्रात मुलांना मोफत शिकवत आहे. “

मग पत्रे यायला लागली.

एका परिचारिका (नर्स) ने लिहिले “काल रात्री एका रुग्णाला सांत्वन देण्यासाठी मी उशिरापर्यंत दवाखान्यात थांबले, कारण तुम्ही मला दयाळूपणा फार महत्त्वाचा आहे याची आठवण करून दिली.”

व्यसनातून नुकताच सावरणारा एक माणूस लिहितो “मला सापडलेले पाकीट मी मालकाला जसेच्या तसे परत केले. मला तुम्ही केलेल्या उदारतेची आठवण आली होती. “

आणि लैला? ती गेल्या आठवड्यात मला भेटायला आली होती. तिच्या मुलांनाही सोबत घेऊन आली होती. आम्ही माझ्या बाल्कनीत बसलो. चहा घेतला. त्या लहान मुलाने मला त्याचा खेळण्यातला कापडी ससा, ज्याला एक डोळा नव्हता तो दिला. “त्याला तू फार आवडतेस, ” ती म्हणाली.

मी अजूनही दर शुक्रवारी त्या नेहमीच्या सुपरमार्केटमध्ये जाते.

आता, काही वेळा, कुणीतरी मी घेतलेल्या चाॅकलेट बार चे पैसे रोखपाल (कॅशीयर) ला देतो. आणि मी त्यांना ते देऊ देते. कारण दयाळूपणाची भावना संपायला नको. ती भावना फक्त वाट पाहत असते…. कोणीतरी धाडसी व्यक्तीची जो ते सुरू करेल.

आणि जर तुम्ही विचार करत असाल तर, कुणाच्या मनात आशा जागवण्यासाठी तुमच्याकडे पैसेच असले पाहिजेत असं नाही गरज नाही. तुम्ही फक्त एखाद्या गरजू ला जावून भेटण्याची आवश्यकता आहे. त्यांना खरोखर भेटा, आणि शब्दांशिवाय म्हणा, “मी या सर्व परिस्थितीमधून गेलो आहे. आणि आता मी तुमच्यासोबत आहे. “

जग असंच चांगलं होत जाईल, सुधारत जाईल, मोठमोठी भाषणं, आश्वासनं किंवा मथळ्यांमधून (हेडलाईन्स) नाही, तर शांत क्षणांमध्ये, सामान्य लोकांसमवेत. जो एकमेकांची काळजी घेण्याची निवड करतो.

मूळ इंग्रजी कथालेखक – अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

नाशिक, मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक परतीचा प्रवास!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “एक परतीचा प्रवास !” ☆ श्री संभाजी बबन गायके

प्रवास उत्तम सुरू होता. बरेच अंतर कापायचे म्हणून प्रवासातच खूप काही खाद्यपदार्थ आणि सामान-सुमान गच्च भरून घेतलेले होते. हे व्यापारी कुटुंब परिवारासह त्यांच्या कुलदेवीच्या दर्शनार्थ निघालेले होते. कुठलासा नवस फेडायचा होता. कुणाच्या तरी ओळखीतून प्रवासी वाहन ठरवले होते. राकेश नावाचा चालक यायचा होता. पण ऐनवेळी त्याला दुसरी मोठी ट्रिप आली म्हणून त्याचा पार्टनर आला…. मुश्ताक! मुश्ताक शहरापासून पाच सात किलोमीटर्सवर एका वस्तीत राहत होता. त्यांच्या छोट्याशा शहरात अगदी सहाच महिन्यांपूर्वी एक दंगल झाली होती. त्यामुळे एकाच गल्लीत वर्षानुवर्षे सौहार्दपूर्वक राहिलेले लोक एकमेकांपासून फटकून राहत होते. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली. डोक्यातील विचारांपेक्षा पोटातील भूक वरचढ झाली की माणसं ताळ्यावर येतात. जनजीवन पूर्वपदावर आले.

प्रवास सुरू झाला. मुश्ताक हळूहळू या कुटुंबाच्या संभाषणात सहभागी झाला. सुरुवातीला हवापाणी, वाहतूक अशा विषयांपासून बोलणं झालं आणि मग तुम्ही कोण, आम्ही कोण.. कुठले यावर गाडी आली. मुश्ताकचे वडील प्रकाश शेठच्या वडिलांचे ग्राहक निघाले. मग बोलण्यात सहजता आली. मुश्ताकच्या वडिलांनी प्रकाश शेठ यांच्या गावाशेजारच्या एका टोकावर वस्तीत घर घेतले होते.. गावातली जागा अपुरी पडत होती म्हणून. मुश्ताकचे शिक्षण फारसं नव्हतं म्हणून ड्रायवरकी शिकला आणि आता हेच करत होता.

मुश्ताक देवीच्या दर्शनाला अनेकवेळा लोकांना घेऊन गेल्याचे समजले. त्याला वाटेतील सर्वच मंदिरे, त्यांच्या वेळा आणि परंपरा ठाऊक होत्या आणि नाश्ता, जेवणासाठी चांगली हॉटेल्स सुद्धा. भाषेचा काही प्रश्नच नव्हता. प्रकाशशेठच्या घरचे जी भाषा बोलत होते ती त्यालाही चांगली समजत होती. बोलणे धार्मिकतेवर आले की दोन्हीही बाजू काहीशा सावध होत असत. जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक धार्मिकता यावर बोलताना स्थानिक जातीयवादाचा, दंगलीचा विषय आलाच. तेंव्हा मुश्ताक काय म्हणतोय याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. मुश्ताकच्या कुटुंबात सात माणसं होती.. बायको, तीन मुलगे होते. दोन पैकी सर्वांत थोरल्या मुलीचे लग्न होऊन ती सासरी गेली होती. सर्वांत धाकटा मुलगा यंदा दहावीला होता… इंग्लिश मिडियम शाळेत. मुश्ताकने आर्थिक बोजा सहन करून त्याला शिकवायचं ठरवलं होतं. पंधरा वर्षांचा… इम्रान त्याचं नाव. अभ्यासू, हुशार आणि गल्लीतल्या इतर मुलांच्या विपरीत सालस. त्याला लवकरात लवकर मोठं होऊन त्या गल्लीतून त्याच्या कुटुंबाला बाहेर काढायचं होतं.. चांगल्या परिसरात मोठं घर घेईन म्हणायचा नोकरी लागल्यावर. ड्रायव्हिंग शिकून घेऊ का? तुम्हांला मदत होईल असं म्हणायचं. या धंद्यात मुलं नकोत असा मुश्ताकचा ठाम निर्धार होता. त्याच्या बापजाद्यांनी कित्येक शतकांपूर्वी नाईलाजाने तडजोड करून धर्म आणि नांवे बदलून घेतली होती. पण मुश्ताकला त्याची पाळेमुळे ठाऊक होती. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात त्याने समन्वय साधण्याची कला साधून घेतली होती. बायको एकदम शुद्ध शाकाहारी आणि इम्रान आईच्या पावलांवर पाऊल टाकणारा. गल्लीतल्या सर्वांना याचेही नवल वाटायचे. इम्रान परिसरात सर्वांच्या मदतीला धावून जाणारा पोरगा. मुश्ताक इम्रानबद्दल भरभरून बोलत होता त्यादिवशी!

प्रवास सुरू असतानाच मुश्ताकचा मोबाईल बरेचदा वाजला. गाडी चालवत असताना मुश्ताक मोबाईल घेत नव्हता. फक्त कुणाचा फोन वाजतो आहे एवढंच पहायचा. एकाच नंबरवरून तीन कॉल आले म्हणून त्याने गाडी बाजूला घेतली. घाटाच्या रस्त्यावर मोबाईल नीट रेंज मध्ये नव्हता म्हणून संभाषण स्पष्ट झाले नाही. कुणा शेजाऱ्याचा फोन होता बहुतेक.. नंबर सेव्ह नव्हता. भाभी का मेसेज है.. असं काहीतरी म्हणत होता. तिचा फोन खराब झाला होता, त्यामुळे तिने या माणसाला फोन लावायला सांगितला असावा असं मुश्ताक पुटपुटला. मी गाडी चालवतो आहे… बाद में फोन करता हुं म्हणत मुश्ताकने मोबाईल ठेवला. येताना काहीबाही आणा असा निरोप द्यायच्या बहाण्याने त्याची बायको त्याची चौकशी करायला नेहमीच फोन करीत असे, असं दिसलं. गाडी थांबलीच आहे तर फ्रेश व्हावं म्हणून तो गाडीपासून दूर गेला.

गाडीत ठेवलेला मोबाईल पुन्हा वाजू लागला. यावेळी दोन, तीन वेगवेगळ्या नंबरवरून सतत फोन येत होते. शेजारच्या सीटवर बसलेल्या प्रकाश शेठ यांनी मग फोन घेतला… मुश्ताक भाई.. जहाँ भी हो… घर आ जाओ.. पलीकडून सांगितलं गेलं. फोनवर दुसरंच कुणी आहे हे त्या माणसाला समजलं. प्रकाश शेठने त्या माणसाला विचारलं… काय झालंय.. मुश्ताक बाथरूमला गेलेत.. मी निरोप देतो. इथं रेंज जाते येते आहे.

मुश्ताक हात धुवून स्टिअरिंग वर बसला. प्रकाश शेठ म्हणाले… मुश्ताक भाई… कुछ अर्जेंसी आयी है हमारे परिवार में.. हमें ट्रिप कॅन्सल करनी पडेगी!

प्रकाश शेठच्या घरच्यांना तर हे काहीच समजेना. त्यांनी काय झालं असं विचारलं त्यावर त्यांनी घरच्यांना डोळ्यांनीच दटावून शांत बसवलं. मुश्ताक भाई.. पैसे पुरे दूँगा आपके.. चिंता मत करो. बस तुरंत निकालो गाडी वापस.

मुश्ताकने वेगात गाडी दामटली.

दीडशे किलोमीटर्स प्रवास झाला होता तोवर. इथून पुन्हा माघारी जावं लागतंय म्हणून मुश्ताक तसा नाराजच झाला होता. माघारी येताना टोल नाक्यावर गाडी आली आणि मोबाईलला पूर्ण रेंज आली. मुश्ताकने सवयीने व्हॉट्सॲप मेसेज चेक केला. त्याच्या चुलतभावाचा मेसेज होता… इम्रान बहुत बिमार हुवा है.. तुरंत वापस आ जाओ.

सकाळी तर चांगलं होतं पोरगं.. आवरून शाळेत निघालं होतं. काय झालं असं अचानक. आणि मला परत का बोलावलं असेल? मुश्ताकचे डोके गरगरले. त्याने लगेच फोन लावला… सच सच बताओ.. त्याने भावाला काहीसे दरडावूनच म्हटले. त्यावर तो एकच शब्द म्हणाला.. इम्रान… आणि रडू लागला!

मुश्ताकचे पाय लटपटू लागले. त्याने गाडी काढली पुढे… प्रकाश शेठने त्याच्या खांद्यावर हात ठेवला… धीरे चलो.. अब क्या हो गया…. क्या नहीं.. इधर बैठ के तो कुछ समझेगा नहीं! आप धीरे चलो…!

प्रकाश शेठ यांनी आपल्याला मघाशी खोटं सांगितल्याचं त्याच्या लक्षात आलं. आपल्यासाठी शेठने त्यांचा मोठा प्रवास रद्द केल्याचे त्याने जाणले! नक्कीच काहीतरी मोठं झालंय…!

डोळ्यांत आसवं आणि मनात पोराची प्रचंड काळजी घेऊन मुश्ताक थरथरत गाडी चालवत होता… चाळीस किलोमीटर्स अंतर कापायला त्याला दोन तास लागले… वाटेत आडव्या येणारी वाहने त्याचा ताण वाढवत होती.

आपको घर तक छोड के मैं जाऊंगा.. असं मुश्ताक म्हणताच शेठ म्हणाले… नाही.. आम्ही येणार सोबत. प्रत्येक क्षण युगाचा भासत होता मुश्ताकला. त्याची गाडी त्याच्या वस्तीच्या टोकाशी पोहोचली. रुग्णवाहिका आणि पोलिसांची गाडी उभी होती रस्त्यात. गाडी कशीबशी थांबवत मुश्ताक खाली उतरला.. प्रकाश शेठने त्याचा हात सोडला नाही.

इम्रानने घरात फाशी घेऊन त्याचे जीवन संपवले होते. पोरगं शाळेतून आलं.. हातपाय धुतले.. अम्मी… खाना! असं म्हणून तो मागच्या खोलीत गेला. ताट वाढून सात आठ मिनिटे झाली तरी तो जेवायला आला नाही म्हणून त्याच्या आईने त्याच्या बहिणीला त्याला बोलवायला पाठवलं… खोलीचे दार आतून बंद होते…. पुढे लोकांनी दार तोडून उघडले…. खेळ संपला होता!

मुश्ताक कोसळून पडला…. पोराच्या देहाला मिठी मारून हुंदके देत राहिला! प्रकाश शेठ त्याला सावरत होते. तिथे असलेल्या लोकांना हा कोण माणूस आहे ते समजेना. पुढचे सोपस्कार व्हायचे होते. वेळ लागणार होता. त्या गडबडीत प्रकाश शेठ यांनी मुश्ताकच्या खिशात नोटांचे एक पुडके ठेवले.. येतो म्हणाले आणि जड पावलांनी निघाले!

मुश्ताक शुद्धीवर नव्हताच. कब्रस्तानात पोराला मूठमाती दिल्यावर त्याला त्याच्या खिशात काहीतरी जड असल्याचं जाणवलं! मग त्याला उलगडा झाला.

काही दिवसांनी मुश्ताकचा थोरला मुलगा प्रकाश शेठ यांच्या घरी पैसे घेऊन आला. मुश्ताक खूप आजारी आहे म्हणाला. प्रकाश शेठने मुलाला सांगितले… पैसे ठेव तुझ्याकडे… मुश्ताकच्या दवाखान्यासाठी वापर… त्याला सांगू नको.. नाहीतर तो घेणार नाही.. वाटल्यास हे पैसे दान धर्मासाठी वापरून टाक!

तीन महिन्यांनी मुश्ताक, त्याची बायको प्रकाश शेठला भेटायला गेले… मुश्ताक प्रकाश शेठच्या गळ्यात पडून लहान मुलासारखा रडला! प्रकाश शेठच्या घरातल्या भिंतीवर चौदा पंधरा वर्षांच्या एका देखण्या मुलाचा, चंदनाचा हार घातलेला फोटो होता. मुश्ताकने प्रकाशशेठ कडे पाहिले… शेठ म्हणाले… हा आमचा इम्रान!

मुश्ताक केवळ गप्प राहिला… डोळे अजूनही भरून वाहत होतेच… तुम्ही देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर ड्रायवर म्हणून मलाच बोलवा.. असं सांगून गेला. आता या शहरात मुश्ताकला आणि त्या वस्तीत प्रकाश शेठला एक हक्काचं घर आणि माणसं लाभली आहेत!

– – वेदनेची लिपी सारखीच जगभर… वाचायला आली मात्र पाहिजे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कीव… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ कीव… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(मुलीचं लग्न झाल्यानंतर तर ती एकदमच परावलंबी झाली. तिच्या हातच्या भाज्या मला आवडायच्या म्हणून तेवढं सोडून प्रत्येक कामाला तिनं बाई लावून घेतली होती. आणि त्यातली एक जरी बाई कामाला आली नाही तर ती चिडचिड करायची.) – इथून पुढे — – 

रविवारी एका सुपरशाॅपमध्ये खरेदी करुन मी बाहेर आलो तर पुष्पाला दिलेल्या आमच्या सायकलवर एक वयस्कर माणूस बसून मोबाईलवर बोलत होता. सायकलच्या समोरच्या भागावरच्या K. P. या स्टिकरने ती आपलीच सायकल आहे हे मी ओळखलं. त्याचं मोबाईलवरचं बोलणं संपल्यावर मी त्याला विचारलं 

” काहो तुम्ही त्या समता नगर मध्ये रहाणाऱ्या पुष्पाचे नातेवाईक का? ही सायकल आम्हीच तिला दिली होती म्हणून विचारतोय” 

” अच्छा तुमची होती का ही सायकल? छान आहे एकदम. नाही मी पुष्पाबाईचा नातेवाईक नाही. मी तिच्या जवळच रहातो. मी विकत घेतलीये तिच्याकडून ” 

” विकत घेतलीये? कितीला? “

” ती पाच हजार म्हणत होती. मी घासाघीस करुन चार हजारात घेतलीये. तुमच्याकडून साडेचार हजारात घेतली होती म्हणे? “

मला धक्काच बसला. पुष्पाने आम्हांला चांगलंच बनवलं होतं.

” साडेचार हजारात? अहो फुकटात घेऊन गेली होती ती सायकल. पोराला काॅलेजमध्ये पायी जावं लागतं म्हणून ती आमच्या विनवण्या करायची. तिची किंव येऊन आम्ही तिच्याकडून एक रुपयाही न घेता तिला सायकल देऊन टाकली ” 

तो मोठमोठ्याने हसायला लागला

” साहेब पुष्पाबाईने तुम्हांला चांगलंच फसवलेलं दिसतंय. अहो तिच्या पोराकडे दोन वर्षांपासून मोटरसायकल आहे. आणि आजकालचे पोरं सायकल चालवता का? तिनं ही सायकल विकण्यासाठीच आणली होती. तुमच्याकडून आणल्यावर दोन दिवसात तर ही सायकल तिनं मला विकली “

मला आता सुरेखाचा आणि मग माझा स्वतःचाही संताप येऊ लागला. ते ओळखून तो म्हणाला 

” साहेब ती पुष्पा महाबनेल बाई आहे. गोडगोड बोलून, कधी लाचारी दाखवून ती जिथे काम करते तिथून पैसे मागत रहाते आणि नंतर परतच करत नाही. सात आठ महिन्यांपूर्वी तिनं एका बाईकडून दहा हजार घेतले आणि तीन महिन्यांनी त्या बाईचं काम सोडून दिलं. ती बाई तिला शोधतशोधत आमच्या समता नगरात आली तर ह्या पुष्पाने पैशेच घेतल्याचं नाकबूल केलं. लई भानगडी झालत्या. पण बायाबायांचे व्यवहार. तिथं लिखापढी थोडीच असते. गेली बिचारी रिकाम्या हाताने. अशा लयच बायांकडून तिनं पैशे उकळलेत ” 

” पण ती काम चांगलं करते. रेग्युलर येते तिच्याबद्दल विश्वास वाटायला लागतो “

” तेच तर! लई डोकेबाज आहे ती साहेब. काम चांगलं करते, आडवं तिडवं बोलत नाही म्हणून तर बाया तिच्यावर खुश‌ रहाता. ती त्याचाच तर फायदा उचलते. तुमच्या मॅडमकडून तर तिनं पैशे घेतले नाही ना? “

मी एकदम सावध झालो. सुरेखाही तिच्यावर खुश असायचीच. माझ्या अपरोक्ष तिनं दिले असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

” काही सांगता येत नाही बुवा. पण काहो ती सांगायची की तिचा नवरा काही कामधाम करत नाही. दारु पितो. दिवसभर पत्ते खेळत रहातो. तिच्या पैशावरच तिचं घर चालतं. खरं आहे का ते? “

तो परत हसायला लागला.

” एकदम झुठ है साहब. तिचा नवरा शाळेतल्या पोरांची रिक्षातून ने-आण करतो. रात्री स्टेशनवर उभी करतो रिक्षा. चांगली कमाई आहे त्याची. महिन्याला ३५-४० हजार कमवत असेन तो. हां तो गुटखा खातो पण दारु पित नाही. कधीमधी सणासुदीला पत्तेही खेळतो. पण रेग्युलर नाही ” 

माझा चेहरा आता उतरला होता. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा त्यांनीच पाठीत खंजीर खुपसावा अशी परिस्थिती होती. मला आता घरी जाऊन सुरेखाला पुष्पानं तिच्याकडूनही पैसे घेतले होते का हे विचारायची घाई झाली होती. मी निघालो तसा तो म्हणाला 

” साहेब पुन्हा कधी पुष्पा तुमच्याकडे आली तर तिला दारात पण उभी करु नका. केव्हा दगा दिल सांगता येत नाही ” 

” पण ती असं का करते? सगळेच तर तिला सढळ हाताने पैसे देतात “

” लई हावरट आहे साहेब ती. जशी तुमची सायकल आणली ना तशाच बऱ्याच वस्तू ती फुकटात घेऊन येते आणि आमच्या झोपडपट्टीत विकते. तिचं घर तुम्ही पाहिलं नसेल. जे तुमच्याकडे अशीन ते सर्व तिच्याकडे आहे. मोठा टिव्ही, साऊंड सिस्टीम, फ्रिज, ए. सी. , सोफाबिफा. लग्नात तर अशी सजूनधजून जाते जशी मोठ्या खानदानातली आहे “

मी अवाक झालो. ही बातमी मला नवीनच होती. घरकामाला पुष्पा यायची तेव्हा मात्र अगदी साध्या, कधीकधी फाटक्या साड्या नेसून यायची. सुरेखा तिला बऱ्याचदा लग्नात मिळालेल्या कमी दर्जाच्या पण नव्याकोऱ्या साड्या देऊन टाकायची. कदाचित त्या साड्याही ती विकत असेल.

मी घरी आलो तेव्हा सुरेखा टिव्ही वरची सिरियल पहात होती. ह्या सिरियल्सनीही घराघरात समस्या निर्माण केल्या आहेत. जोपर्यंत सिरियल संपत नाही तोपर्यंत बायकांना कुणाशी बोलायलाही आवडत नाही. मी निमुटपणे साडेआठ वाजण्याची वाट बघत बसलो. सिरीयल संपल्यावर तिनं जेवणाची तयारी घेतली. जेवतांना मी तिला म्हणालो 

” तुला माहितेय‌ आपल्याकडून फुकट घेतलेली सायकल पुष्पानं चार हजारात विकून टाकली. विशेष म्हणजे तिच्या मुलाला सायकल नकोच होती. तो अगोदरपासूनच काॅलेजला बाईकने जातो “

मला वाटलं तिला जोरदार धक्का बसेल. पण ती निर्विकारपणे म्हणाली

” कळलं मला. ती आपली नवी कामवाली उषा आहे ना तिनं सांगितलं. तुम्हांला कसं कळलं? “

मग मी तिला सगळा किस्सा सांगितला आणि विचारलं 

” तू तिला काही पैसे तर नव्हते ना दिले? “

” मागितले होते तिनं मला एकदोनदा पाच पाच हजार. एकदा वीस हजारही मागितले होते. पण मला तुम्हांला मागायची हिंमत नाही झाली. तुम्ही नातेवाईकांनाच देत नाही तर तिला कसं देणार? म्हणून मी चुप बसले पण ती माझ्याकडून नेहमी शंभर दोनशे घेऊन जायची ” 

” मग तू तिच्या पगारातून कापून का नाही घ्यायची? ” 

” अहो ती खुप गयावया करायची. कधी नवऱ्याचं कारण कधी आजाराचं, कधी आजारी सासूसासरे तर कधी पाहुण्याचं. मग मला तिची किंव यायची. मला नाही होता येत तुमच्यासारखं कठोर ” 

” असे किती पैसे दिले असतील तू तिला ” 

” मी हिशोब नाही ठेवला पण या सात वर्षात दहाबारा हजार तरी दिले असतील “

मी कपाळाला हात लावला

” पण मग तू तिनं काम सोडलं तेव्हा हे पैसे मागून का नाही घेतले? “

” अहो ती मला न सांगताच सोडून गेली. तिच्याकडे मोबाईलही नसतो. ती मुद्दामच ठेवत नसावी. दोन दिवस आली नाही म्हणून तिच्या नवऱ्याला फोन केल्यावर त्यानं पुष्पानं आपलं काम सोडल्याचं सांगितलं. तिला माझ्याकडे हिशोबासाठी पाठवा असं त्याला सांगूनही ती मला भेटायला आलीच नाही ” 

” बघ तुझ्या या स्वभावामुळेच आपली नवी कोरी सायकल तिला फुकटात द्यावी लागली ” मी चिडून म्हणालो 

” जाऊ द्या असं समजा सायकल चोरीलाच गेली. मागे नाही का मुंबईत तुमचं पाकीट मारल्या गेलं होतं. त्यात तुमचे सात हजार गेले. काय केलं आपण? तसंच हेही समजा ” 

” आता तरी सावध हो. या बायकांवर विश्वास नको ठेवत जाऊ ” 

” नाही बाई! आता तर मी कानाला खडा लावलाय ” 

जेवणं झाली. दहा वाजता मी झोपायला निघालो तशी ती मला म्हणाली 

” तुमच्याकडे पाचशे रुपये आहेत का? “

” आता कशासाठी? “

” काही नाही ती उषा मागत होती. मुलीला दवाखान्यात घेऊन जायचंय म्हणे ” 

मी रागाने तिच्याकडे पहायला लागलो

” आताच तर आपला विषय झाला होता ना? तेव्हा तर तू…. ” 

” जाऊ द्या. खुप गयावया करत होती ती. अशावेळी नाही म्हणवत नाही हो ” 

” ठिक आहे देतो. पण तिच्या पगारातून कापून घे ” 

” हो मग प्रश्नच नाही. तुम्हीही इतके कठोर नका होत जाऊ हो. आपले जुने दिवस आठवा. आपणही गरीबीत दिवस काढलेत. आणि पाचशे रुपयाने काय होतंय. असं समजा आपण दोघं हाॅटेलमध्ये जेवून आलो ” 

आता मात्र मला तिच्या लाॅजिकची आणि भोळेपणाची किव येऊ लागली.

समाप्त

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कीव… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ कीव… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(“साहेब आम्ही गरिब माणसं. कुठून आणणार एवढे पैशे. मावशींना तर माहितेय आमचा घरचा माणूस धड कामधंदा करत नाही. वाटलं तर घेऊन जातो रिक्षा नाहीतर पत्ते खेळत बसतो. नाहितर दारु पिऊन तमाशे करतो. मीच चारपाच घरची धुणीभांडी करुन संसार चालवते” 

तिनं बोलताबोलता पदर डोळ्यांना लावला.) – इथून पुढे — — 

“असंय पुष्पा की ती सायकल नवीनच आहे. तरीसुध्दा तुला आम्ही निम्म्या किमतीत देतोय. तू गरीब आहे म्हणून किराणा दुकानदार तुला फुकटात किराणा देतो का?गॅसवाला फुकटात सिलिंडर देतो का?नाही ना? मग नवी सायकल फुकटात कशी मिळेल?चल ठिक आहे चार हजारात घेऊन जा. एक हजार अजून कमी केले तुझ्यासाठी ” तिची किंव‌ येऊन मी म्हणालो

“नाही ना साहेब. चार हजार सायकलला दिले तर मी महिना कसा काढू?”

“साॅरी चार हजारापेक्षा कमी नाही होणार. फुकटात तर अजिबातच नाही मिळणार सायकल ” मी निक्षून सांगितलं तशी ती न बोलता निघून गेली. मला थोडं वाईट वाटलं. आपण एवढं कठोर‌ व्हायला नको होतं असं वाटून गेलं. पण पै पैचा हिशोब ठेवून कुटुंबाला वर आणणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला फुकट मागू नये आणि फुकट देऊ नये या स्वभावातून बाहेर येणं शक्य नव्हतं.

असाच महिना निघून गेला. त्या दरम्यान सुरेखानं मला सायकलबद्दल काय विचार केला असं दोनदा विचारलं पण मी तिला बाहेरचं कुणी गिऱ्हाईक आलं तर चार हजारात विकून टाकू पण फुकटात सायकल द्यायची नाही असं निक्षून सांगितलं.

त्यानंतर मी माझ्या काही व्हाॅट्सअप ग्रुपवर ” नवीकोरी गियरची सायकल योग्य किंमत आल्यास विकणे आहे. कृपया संपर्क साधावा ” असा मेसेज टाकला. आसपासच्या सायकल रिपेयरच्या दुकानदारांनाही सायकलबद्दल सांगून आलो. कुणीतरी येऊन सायकल घेऊन जाईल असा मला विश्वास वाटत होता. एकदा काॅलनीत काम करणाऱ्या माळ्याला सांगितल्यावर तो सायकल पहायला आला. पण ती आधुनिक सायकल त्याला नको होती. मागे कॅरियर असलेली साधी पण दणकट सायकल त्याला हवी होती. रात्री काॅलनीत गस्य घालणाऱ्या गुरख्यालाही ती दाखवली पण त्यालाही सामान ने-आण करण्यासाठी उपयुक्त असलेली सायकल हवी होती. मग एका रविवारी ही सायकल रिपेअर करणाऱ्या पंक्चरवाल्याकडे गेलो. त्याला गिऱ्हाईकाबद्ल विचारल्यावर तो म्हणाला ” साहेब मी तुम्हांला त्याच दिवशी सांगितलं होतं की आजकाल ज्यांना डाॅक्टरांनी वजन कमी करायला सांगितलंय ते किंवा सायकलिंगचे शौकीन लोकच सायकल विकत घेतात. आणि असे लोक जुन्या सायकली सहसा घेत नाहीत. तुम्ही तुमच्या ओळखीच्या गरीब माणसाला ती ज्या किंमतीला जाईल त्या किमतीला विकून टाका. नाहितर भंगारमध्ये द्या ” 

मी निराश झालो. मग मी कौस्तुभच्या मित्रांना फोन लावले. सायकलिंग असोसिएशनच्या कुणा सदस्याला सायकल हवी आहे का विचारलं. पण सध्यातरी कुणालाच सायकल नको होती. उलट त्यांनी मला ती सायकल लंडनला कौस्तुभकडे पाठवून द्यायचा सल्ला दिला. पण कौस्तुभलाही तिथं सायकल नको होती. भंगारवाल्याला विचारलं तर तो सातशे रुपये देत होता. अर्थातच मी नकार दिला.

एक दिवस संध्याकाळी सुरेखानं मला विचारलं 

“मग मिळतंय का सायकलला कुणी गिऱ्हाईक?”

“अजूनतरी नाही. पण मिळेल कधी ना कधी ” मी आशेने म्हणालो

“तुम्हीही ना काही पण जिद्दीपणा करता. आणि तोही फक्त चार हजारासाठी. चार हजारात कोणती बिल्डिंग बांधणार आहे आपण?तीन महिने झाले तुमच्या या जिद्दीपणामुळे ती सायकलही धुळ खात पडलीये आणि ती पुष्पाही ताटकळत बसलीये. दर आठवड्याला ती मला सायकलबद्दल विचारते. साहेबांना समजावून सांगा म्हणते. तिला काय उत्तर द्यावं तेच मला समजेनासं झालंय ” सुरेखा चिडून म्हणाली 

” तू मला जिद्दी म्हणतेय पण तुझी पुष्पा किती जिद्दीपणा करतेय हे तुला दिसत नाही. खरी गरजू असती तर थोडी घासाघीस करुन अडिच तीन हजारात सायकल घेऊन गेली असती. पण तिला तर फुकटच पाहिजे आहे ” मी रागावून म्हणालो.

” अहो पण मी म्हणते आपल्याला काय कमी आहे? मुलीचं लग्न होऊन गेलंय. मुलगा लंडनला चांगला कमवतोय. पुण्यातल्या दोन फ्लॅटचं चांगलं भाडं येतंय. तुमचा स्वतःचा तीन लाख पगार आहे. दागदागिने, एफ. डी. भरपूर आहेत. तीन प्लाॅट आहेत. रिटायर झाल्यावर तुम्हाला पेंशनही भरपूर मिळेल. अहो जे इन्कम येतंय त्यातला पाव हिस्सा सुध्दा खर्च होत नाहीये. आपल्या दोघांना मेलं लागतं तरी किती! मग त्या चार हजारासाठी तुम्ही एवढा का जीव काढताय? लोक लाखो रुपयांचं दान करतात. आपण एक साधी जुनी सायकल दान करु शकत नाही? बरं ते दानही काही वाया जाणारं नाही. ते सत्कारणीच लागणार आहे. देऊन टाका ना मेली ती सायकल “

तिचं बोलणं ऐकून मी थंडगार झालो. काय चुकीचं बोलत होती ती? मी उगीचच हटवादीपणा करतोय याची जाणीव मला झाली. तरीपण मला शरणागती पत्करावीशी वाटेना. मी शेवटचं अस्त्र वापरलं

” ठिक आहे तिला म्हणा एक टोकन म्हणून एक हजार दे आणि घेऊन जा सायकल ” 

” अरे रामा! अजूनही हजार रुपयात जीव अटकलाच आहे का? अहो पुष्पाच्या जागी दुसरी बाई असती तर मी काहीच बोलले नसते. पण पुष्पा इमानदार आहे. मुख्य म्हणजे ती खाडे करत नाही, उर्मट बोलत नाही, नखरे करत नाही. कामंही किती छान आहे तिचं. नाहीतर इतर बायका किती त्रास देतात ” 

” बरं बरं. सांग तिला उद्या घेऊन जा ” मी शेवटी पराभव पत्करला. तिच्या चेहऱ्यावर विजयी भाव उमटले 

” हे ऐकून बिचारीला खुप आनंद होईल ” ती हसत म्हणाली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ऑफिसातून घरी आलो तेव्हा पोर्चमध्ये सायकल दिसली नाही.

” काय झालं? नेली का सायकल?” मी सुरेखाला विचारलं 

” हो. तिचा मुलगा येऊन घेऊन गेला ” 

” काय म्हंटली पुष्पा? खुश झाली असेल “

” कशाची खुश! खालीपिली साहेबांनी तीन महिने बर्बाद केले म्हणे. अगोदरच दिली असती तर पोराचा पायी जायचा त्रास तरी वाचला असता असं म्हणत होती “

म्हणजे सायकल फुकटात देऊनही मीच अपराधी झालो होतो. बाईने आभार तर मानलेच नव्हते उलट मलाच दोषी ठरवलं होतं.

एक महिन्याने मला दिल्लीला ऑफिस कामानिमित्त एक आठवड्यासाठी जावं लागलं. परत आलो तर सुरेखा सिंकमध्ये भांडी घासत होती.

” काय गं पुष्पा येणार नाहीये का आज?”

” नाही. तिनं आपलं काम सोडलं ” 

” सोडलं? का?”

” का म्हणजे? तिला दुसरीकडे दहा हजार पगाराचं काम मिळालं म्हणून ती तिकडे गेली ” 

” दहा हजार पगार? अशी कोणती नोकरी मिळाली बुवा तिला?” मी आश्चर्याने विचारलं.

” नोकरी नाही. हेच धुणीभांडी, झाडूपोछा आणि दोन्ही वेळेच्या स्वयंपाकाचं काम आहे. मोठा बंगलाआहे म्हणे आणि तीन भावांच्या फॅमिली एकत्र रहातात. कामंही तेवढंच जास्त असणार ” 

मला आठवलं माझा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एम. ई. केलेला भाचा एका कंपनीत नुकताच लागला होता. त्याला दहा हजारच पगार होता. म्हणजे तिसरी शिकलेली पुष्पा आणि लाखो रुपये खर्च करुन एम. ई. केलेला भाचा समान पातळीत आले होते. मला आजकालच्या शिक्षणातील झालेल्या घसरणीची आणि माझ्या भाचाची चांगलीच किंव आली.

” मग काय तूच धुणीभांडी करणार आहेस का?”

” तुम्हांला तर काय आनंदच होईल मी केलं तर. पैसे वाचतात ना तुमचे! मी लावून घेतलीये दुसरी बाई. उद्यापासून येणार आहे ” 

मला आठवलं आमच्या लग्नाच्या वेळी मी साधा क्लार्क होतो. पगारही कमीच होता. तेव्हा माझी आई आणि सुरेखा दोघी मिळून धुणीभांडी, घराची साफसफाई, स्वयंपाक करायच्या. एवढंच नाही तर पापड, वेफर्स, कुरडया, लोणची, दिवाळीचा फराळ सगळं घरीच व्हायचं. आई गेली तरी अगदी मुलं काॅलेजला जाईपर्यंत हे सुरु होतं. सुरेखा तोपर्यंत अगदी चवळीची शेंग होती. पण घरकामाला आणि अगदी पोळ्या करायलाही बाई यायला लागली तेव्हापासून सुरेखाला चांगलाच आराम मिळू लागला. सोबत तिचं वजनही वाढू लागलं. मग हळूहळू डायबेटिस, बी. पी. , गुडघेदुखी, कंबरदुखी हे आजार तिच्या मागे लागले. मुलीचं लग्न झाल्यानंतर तर ती एकदमच परावलंबी झाली. तिच्या हातच्या भाज्या मला आवडायच्या म्हणून तेवढं सोडून प्रत्येक कामाला तिनं बाई लावून घेतली होती. आणि त्यातली एक जरी बाई कामाला आली नाही तर ती चिडचिड करायची.

— क्रमशः भाग दुसरा 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ कीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

एका रविवारी मी निवांतपणे पेपर वाचत असतांना सुरेखा बाहेर येऊन मला म्हणाली 

” अहो ती आपली कौस्तुभची सायकल ठेवायची आहे की विकून टाकायची? “

” का? अचानक असं का विचारतेय? ” 

” अहो काही नाही पुष्पा विचारतेय की तुम्ही वापरत नसाल तर मला देता का म्हणून? “

मी विचारात पडलो. कौस्तुभ नोकरीसाठी लंडनला गेल्यापासून ती सायकल खरंतर धुळ खातच पडली होती. पण तिला घेऊन अजून एक वर्षही झालं नव्हतं. कौस्तुभ इथं असतांना त्यानं फार तर तीन महिने ती वापरली असेल. अर्थातच अजून ती नवीकोरीच वाटत होती. त्यामुळे मला ती विकाविशी वाटेना.

” राहू दे अजून. मी वापरेन तिला ” 

” तुम्ही? घरात दोन बाईक आणि एक कार असतांना तुम्ही सायकल वापरणार? ” 

” अगं नेहमीकरिता नाही. अधूनमधून जेव्हा वाटेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वापरत जाईन. असंही डाॅक्टरने मला सायकल वापरायला सांगितलंय ” 

” मग तिला काय नाही सांगू? “

” सध्या तरी नाही सांग. कधी वाटलंच विकाविशी तर तसं सांगू तिला ” 

” बरं. सांगते ” 

ही पुष्पा आमच्याकडे सात वर्षांपासून धुण्याभांड्यांचं काम करत होती. सांगितल्याशिवाय ती कधी खाडे करायची नाही. त्यातून कधी जास्तीचे पाहूणे आले तरी जास्त काम पुरतं म्हणून कटकटही करायची नाही त्यामुळे सुरेखा तिच्यावर खुश होती. दिवाळी आली की बोनस म्हणून एक महिन्याचा पगार, साडी, फराळाचे पदार्थ वरुन चहा अशी तिची सरबराई केली जायची. केवळ दिवाळीच नाही तर इतरही वेळेस सुरेखा तिला प्रेमाने जेवू घालायची. मैत्रिणी किंवा शेजारच्या बायका जमल्या की हमखास घरात काम करणाऱ्या बाईचा विषय निघायचा. अशावेळी सुरेखा तोंड भरभरून पुष्पाची स्तुती करायची.

काही कामानिमित्त मी घराबाहेर पडलो तेव्हा पोर्चमध्ये भिंतीला टेकून उभी असलेली सायकल मला दिसली. नऊ हजाराची ती गिअरची सायकल चांगली देखणी होती. कौस्तुभला फिटनेसची आवड असल्यामुळे तो कायम सायकल चालवायचा. जुनी सायकल त्रास देऊ लागली तशी त्यानं जुनी सायकल भंगारमध्ये विकून ही घेतली होती. कौस्तुभसोबत त्याच्या दोन मित्रांनीही अगदी अशीच ह्याच रंगाची सायकल घेतल्यामुळे तिघांनीही आपली सायकल ओळखू यावी यासाठी त्यावर स्वतःच्या नावाचे स्टिकर लावले होते. कौस्तुभनंही K. P. अर्थात कौस्तुभ पालवे असं स्टिकर सायकलच्या मागेपुढे लावलं होतं. या के. पी. वरुन त्याचे मित्र त्याला गमतीनं खुद पसंद म्हणायचे. मात्र कौस्तुभ एकदम मनमिळावू स्वभावाचा सदैव हसतमुख रहाणारा मुलगा होता. ही सायकल पाहिली की मला कौस्तुभची तिव्रतेने आठवण यायची. त्यानं लंडन सोडून ताबडतोब इथं निघून यावं असं वाटू लागायचं. अर्थात तो जेव्हा लंडनला जायला निघाला तेव्हा मलाच आनंदासोबत त्याचा खुप अभिमान वाटला होता.

१५-२० दिवस उलटल्यानंतर परत एकदा सुरेखानं सायकलचा विषय काढला. या दिवसात मी एकदाही सायकल वापरली नव्हती. खरंतर सकाळी ऑफिसला जातांना घाई असायची म्हणून आणि परतल्यावर थकून गेल्यामुळे माझी सायकल वापरायची इच्छाच व्हायची नाही. अशीही गेल्या २०-२५वर्षांपासून मी सायकलच चालवली नव्हती. अर्थातच सायकल चालवण्याचा मुहूर्त काही निघत नव्हता. सुरेखानं विचारल्यावर मी अजून एखादा महिना गेल्यावर सायकलचा विचार करु असं तिला सांगितलं. सकाळचा माॅर्निंग वाॅक सोडून सायकल चालवावी या विचाराने एक दिवस मी निघालो. सायकल छानपैकी पुसून घेतली. पण खाली पाहतो तर सायकलचं पुढचं चाक बसलेलं. त्यातली हवा कमी झाली की ते पंक्चर झालंय हे कळायला मार्ग नव्हता. एवढ्या सकाळी पंक्चरची दुकानं उघडत नसल्याने मी सायकल पोर्चमध्येच ठेवून वाॅकला गेलो. त्या रविवारी बाहेरगावी जावं लागल्याने सायकल रिपेअर होऊ शकली नाही. एके दिवशी संध्याकाळी जेवायला बसलो असतांना सुरेखानं परत विषय काढला.

” का हो दिड महिना उलटून गेला तुम्ही सायकलला हात लावलेला नाही. मला नाही वाटत तुम्ही कधी सायकल चालवाल. मग उगीच कशाला त्या बिचाऱ्या पुष्पाला ताटकळत ठेवताय. देऊन टाका ना तिला. तिच्या मुलाला काॅलेजला जायला हवीये. बिचाऱ्याला इतक्या दूर पायी जावं लागतंय असं सांगत होती ” 

मी विचारात पडलो. सुरेखाचं म्हणणं योग्यच होतं. एकतर गेल्या अनेक वर्षांपासून मी सायकल चालवलेली नव्हती. दुसरं ती चालवण्यात मला इंटरेस्टच नव्हता. पडूनपडून खराब होण्यापेक्षा ती विकून टाकलेली बरी असा मी निर्णय घेतला.

” ठिक आहे. सांगून दे तिला सात हजार देऊन घेऊन जा म्हणून “

” सात हजार? ती गरीब बाई काय देईल सात हजार “

” अगं सायकल एकदम नवीन आहे. कौस्तुभनं ती जास्तीत जास्त तीन महिने वापरली असेल. आताशी ८-९ महिने झालेत तिला घेऊन. नऊ हजाराची घेतली होती आपण. सात हजार तर मिळायलाच पाहिजे तिचे. तू तिला सांगून तर बघ. नाही म्हंटली तर सहा हजारात देऊन टाकू “

” बरं सांगून पहाते “

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर मी तिला पुष्पा काय म्हणाली ते विचारलं

” ती नाही म्हणतेय “

” मग किती देणार म्हणतेय ती? “

” ती म्हणते अशीच पैसे न घेता देऊन टाका. गरीबाला दान केलं तर काय बिघडतं? असंही म्हणे तुम्हांला काय कमी आहे? बंगला आहे, दोन फटफट्या आहे, एक चारचाकी आहे. साहेबांना दोन लाख रुपये पगार आहे. सहासात हजारांनी तुम्हांला काय फरक पडणार आहे? असं म्हणत होती “

” वा गं! भलतीच शहाणी दिसतेय तुझी पुष्पा. आणि मला दोन लाख रुपये पगार आहे असं तिला कुणी सांगितलं? “

” मी एकदा तिला म्हणाले होते. तरी तिला कमीच सांगितला. तीन लाख नाही सांगितला “

” तरीच ती इतकी वटवट करतेय. अजिबात फुकट नाही द्यायची सायकल. आपली काय दोन नंबरची कमाई आहे? आम्हीही खुप गरीबी पाहिलीये. उपाशी

पोटी दिवस काढलेत. दहा वर्षाचा होतो तेव्हापासून कष्टाची कामं करतोय. पण कधी कुणाकडे हात पसरले नाहीत की कुणाला असं तिच्यासारखं काही फुकट मागितलं नाही. स्वाभिमानाने जगलो आणि कष्ट करुन इतक्या वर पोहचलोय. पैशांची किंमत आहे म्हंटलं अजून आम्हांला. आपण विकत घ्यायचं आणि ह्यांना फुकट द्यायचं ही कोणती पद्धत? ” 

मी चिडून म्हणालो तशी सुरेखा वरमली. मुकाट्यानं आपली काम करत राहिली. मीच शांत होऊन म्हणालो.

” तिला म्हणा. तुझ्यासाठी दोन हजार अजून कमी करतो. पाच हजारात घेऊन जा सायकल ” 

सुरेखा काहीच बोलली नाही. माझा निर्णय तिला आवडलेला दिसला नाही पण मी त्यावर ठाम होतो.

त्या रविवारी मी पंक्चरच्या दुकानात जाऊन सायकलमध्ये हवा भरली. तिला ऑईलिंग, ग्रिसिंग करुन चकाचक केली. थोडी चालवूनही पाहिली. मस्त चालत होती. पण तेवढ्या चालवण्यानेही माझा श्वास चांगलाच फुलला. पोटऱ्यात पेटके आले. आपल्याकडून आता सायकल चालवणं होणार नाही या निष्कर्षाप्रत मी आलो. पंक्चरवाल्याला सायकल विक्रीबद्दल विचारलं तर तो म्हणाला 

” साहेब सध्या फक्त ज्यांना ढेऱ्या कमी करायच्या असतात ते किंवा जे शौकीन आहे तेच सायकल विकत घेतात. तरी पण मी विचारुन बघतो. कितीपर्यंत द्याल? “

” नऊ हजाराची सायकल आहे. पाच हजारात देऊन टाकू “

तो हसला

” पाच हजारात कुणी घेणार नाही साहेब. दोन हजारांपर्यंत जाईल “

” अरे फक्त आठनऊ महिने झालेत घेऊन. कमीत कमी चार हजार तरी आले पाहिजे ना. तू तर बघतोच आहेस की सायकल अगदी नवीन आहे ” 

” बरं बघतो ” म्हणून तो बाईकचं पंक्चर जोडू लागला.

मी घरी आलो तर सुरेखा म्हणाली

” ती पुष्पा तुमच्याशी बोलायचं म्हणतेय ” 

” बरं पाठव “

” पण तिच्याशी चिडून बोलू नका. नाहितर काम सोडून जायची ती. तुम्हांला काय माहित नवीन बाई मिळवायला आम्हांला किती त्रास होतो ते ” 

आजकाल या बायकांनी या कामवाल्यांना फारच शेफारुन ठेवलंय. कामवाली काम सोडून जाईल या भितीने त्या सदोदित त्यांची वरवर करत असतात.

” ठिक आहे. पाठव तर खरं तिला ” 

पुष्पा समोरच्या दारातून आली

” नमस्कार साहेब. साहेब ती सायकल देऊन टाका ना. पोराले कालीजात जायला लई तरास होतोय बगा ” 

” मी कुठे नाही म्हणतोय. पाच हजार दे आणि घेऊन जा सायकल ” 

ती ओशाळवाणं हसून म्हणाली 

” साहेब आम्ही गरिब माणसं. कुठून आणणार एवढे पैशे. मावशींना तर माहितेय आमचा घरचा माणूस धड कामधंदा करत नाही. वाटलं तर घेऊन जातो रिक्षा नाहीतर पत्ते खेळत बसतो. नाहितर दारु पिऊन तमाशे करतो. मीच चारपाच घरची धुणीभांडी करुन संसार चालवते ” 

तिनं बोलताबोलता पदर डोळ्यांना लावला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिंदगी जीने के लिए… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ जिंदगी जीने के लिए… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“आयुष्यात दोन शक्ती महत्त्वाच्या •••• एक सहन शक्ती व दुसरी समज शक्ती ” •••

 काल बऱ्याच दिवसांनी अनघा घरी म्हणजे माहेरी आली. लग्न झाल्यावर पहिले वर्ष सणवार म्हणून तिचे येणे होत असे. पण आता घरी सासू सासरे, एक छोटं बाळ, म्हणजे घरात तीन लहान मुले. यांना सांभाळण्यात तिचा वेळ कसा जातो?? ते तिलाही कळत नाही. त्यातच आता सासरे आजारी आहेत, म्हंटल तर अजून काम वाढलेले आहे. अजय तिला खूप मदत करतो. आई बाबांची जबाबदारी जणू त्यानेच घेतली आहे. त्यांचे औषधपाणी बघणे, डॉक्टर ची visit त्यानंतर ब्लड टेस्ट, इतर टेस्टसाठी त्यांना नेणे -आणणे. तो खूप शांतपणे करत असतो. अनघाही त्याला साथ देते. •••

येवढ्यातच बाबा आजारी पडल्यापासून, तो आई बाबांना आपल्या घरी रहायला घेऊन आला. आतापर्यंत आई बाबा स्वतंत्रपणे अगदी आरामात रहात असत. बाबा सर्व काम स्वतः करत असत. कोणावर अवलंबून नव्हते. पण आता आजारपणामुळे नाईलाजाने त्यांना येथे येणे भाग पडले. मनातून त्यांना हे आवडत नव्हतेच. पण काय करणार?? म्हातारपण म्हणजे अनेक न आवडणाऱ्या गोष्टी करायला भाग पाडणारा आयुष्याचा काळ. •••• 

येथे आल्यावर सर्व व्यवस्थित सुरू झालं. पण बाबा सारखी चिडचिड करत असत. अनघाला कळतच नव्हत की आम्ही कुठे कमी पडतोय? कधी कधी अजयचे पण बाबांबरोबर खटके उडू लागले. आई शांत असायच्या. पण बाबा मात्र लहान सहान गोष्टींवरून चिडत असतं. ••••

एकदा त्यांचे औषध दोन तीन दुकानात शोधून ही मिळाले नाही. अजयच्या मिटिंगची वेळ झाल्यामुळे, संध्याकाळी जाऊन पुन्हा बघतो, असा विचार करून अजय औषध न घेता घरी परत आला. ••••

” माझं औषध मुद्दामच आणल नाही. असं कसं औषधं मिळालं नाही?? सर्व औषध मिळतात फक्त हेच मिळाल नाही. ” असं म्हणून बाबा खूप रागावले व जेवले नाही. तसेच झोपले. त्यांच्या अशा वागण्याने घरातील वातावरण खराब झाले. ••••

दुपारी चहा घेताना आई अनघाला म्हणाल्या, ••• “अगं! ! आजाराने ते त्रस्त झाले आहेत. त्यांना परावलंबन आवडत नाही. म्हणून असे वागतायेत. तुम्ही दोघे खरंच खूप लक्ष देत आहात. अनघा तू समजून घे बाबांना. “•••••

थोड्या वेळाने अनघाच्या कानावर सहजच आई बाबांचे बोलणे पडले. बाबा आईंना म्हणत होते, ••• “ही मुलं आपल्याकडे लक्ष देत नाही. आपण त्यांना जड झालो आहोत. बघ आज औषध आणल नाही. तेंव्हा आपण आपल्या घरी जाऊ. ” आईंनी त्यांच्या म्हणण्याला ••• ” हो का?? तुम्हाला असं वाटतं का?? बरं, आपण जाऊया घरी म्हणून दुजोरा दिला. “••••

अनघाला वाईट वाटले आत्ता तर आई काही वेगळंच बोलत होत्या आणि आत्ता काही वेगळंच. •••••

आज अनघाने आपल्या आई बाबांना बोलताना हे सर्व सांगितले. व रडू लागली. अजून काय करावं?? अशी अपेक्षा आहे त्यांची?? मला कळतच नाही. ••••

अनघाची आई म्हणाली, •••

अग! ! तुझा थोडा गैरसमज झालाय.

थोडा विचार कर. पूर्ण आयुष्य स्वतंत्र पणे जगणाऱ्या माणसाला या परावलंबी परिस्थिती शी जुळवून घेता येत नाहीये. त्यात म्हातारपण, आजारपणामुळे त्यांच्या मनात असंख्य विचार येत असावेत. नेहमी एक्टीव्ह राहणाऱ्या माणसाला पलंगावर पडून राहणे जड जातंय. आपल्यामुळे इतरांना होणारा त्रास त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटत नाही. त्यातच मुलांच्या होणारा खर्चाची काळजीही वाटत असावी. आणि आजींचे म्हणशील तर त्यांचेही वय झालंय. व या उतार ‌वयात बाबांना सांभाळण्याचे काम करायचे आहे. त्यांची होणारी सतत चिडचिड आईंनाच झेलायची आहे. उगीच वाद नको म्हणून परिस्थितीला सांभाळायला त्या तसं म्हणतात. तू समजते तसा अर्थ नाही. म्हणजे तू त्याचा तसा अर्थ काढू नको. अग! म्हातारपण म्हणजे बालपणच लहान मुलांसारख. कधी कधी त्यांच्या हो मधे हो मिसळावे लागते. थोड्यावेळाने ते ती गोष्ट विसरून जातात. तसंच काहीसं आहे हे. •••••

आयुष्यभर समजदारीने वागणारा माणूसही म्हातारपणी कसा वागेल??? सांगता येत नाही. तुला आठवतंय ना आपले आजोबा कसे करायचे?? आयुष्यभर प्रत्येक पाहुण्याची सरबराई करणारे, भरपूर खाऊपिऊ घालणारे आजोबा, शेवटी फार विचित्र वागत होते. जेवताना त्यांच्या जवळ कोणी गेले की माझे जेवण हा घेईल या भीतीने ते रागवत असत. ••••

अनघा हे सर्व विचार मनातून काढून टाक. तू आणि अजय छान काम करत आहात. जास्त काम पडतंय तुला हे मान्य आहे. पण आपल्या माणसांची काळजी घेणे हे आपलेच काम असते ना. सध्या दुसरी इतर कामे करू नको. स्वतः कडेही लक्ष दे. गरज असल्यास स्वयंपाक करायला एखाद्या मावशी मिळतात का बघ. वेळ पडली तर एजेंन्सी मधून बाबांसाठी एखादा सहायक मदतीला ठेव. •••

आईच्या बोलण्याने अनघाच्या मनातले अनावश्यक, तिला मानसिक त्रास देणारे विचारांची दिशा बदलली. तिला आई चे म्हणणे पटले. ••••

बाबा शांतपणे ऐकत होते. म्हणाले, •••• अगं! ! आई बरोबर सांगतेय. हे बघ हे सर्व आम्ही दूर बसून तुला सांगतोय. पण त्या situation मधे जो असतो, तेंव्हा तुमची मानसिक परिस्थिती वेगळी असते. पण शांत रहायचे. हे लक्षात ठेव. ••••

विचारांची दिशा बदलली, व अनघा शांत झाली. तुम्ही संभ्रमात असताना योग्य मार्गदर्शन मिळाले की प्रश्न सूटतात. •••

अनघाच्या आई बाबांनी आपली जबाबदारी छान पार पाडली. मुलांचे केवळ कौतुक न करता, चूका सुद्धा लक्षात आणून देणे, त्यांचे कर्तव्य व जबाबदारी त्यांना समजावून सांगणे, योग्य मार्गदर्शन करणे, ही जबाबदारी आई वडिलांचीच असते. •••

म्हणताना ना, ••••

” रिश्तों की कद्र करनी हो, तो 

वक्त रहते कर लिजिए जनाब 

बाद में सूखे पेड़ों को पानी देकर

हरियाली की उम्मीद करना बेकार हैं।”•••

म्हणतात ना, •••

“जिंदगी जीने के लिए दो शक्तियों की जरूरत होती है एक सहन शक्ती और दूसरी समझ शक्ती”।••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “भागीआजी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “भागीआजी…” ☆ श्री मंगेश मधुकर

फॅमिली ग्रुपवर रात्री साडे-अकराला चंदूचा मेसेज “भागीआजी सीरियस, हॉस्पिटलमध्ये एडमिट केलंय”लगेच ग्रुपवर विचारपूस सुरू झाली.

भागीरथी उर्फ भागीआजी, वयाची सत्तरी पार केलेली, काही वर्षांपूर्वी नवरा गेला. मूलबाळ नाही. सगळी मावस-चुलत भाचे मंडळी हाच भागीआजीचा गोतावळा. गावाकडे भल्या मोठ्या घरात लाडक्या मोत्यासोबत एकटी रहायची. चंदू सोडला तर दिवसेंदिवस कोणी भेटीला यायचं नाही. भाचे, इतर नातेवाईक लग्न कार्यात भेटायचे. कधीतरी फक्त फोनवर बोलणं व्हायचं. वयामुळं आजीला त्रास सुरू झालेले. एकदोनदा हॉस्पिटलवारी झाली तेव्हा भाचे-पुतणे आवर्जून भेटून गेले. तेव्हापासून फोनवर विचारपूस वाढली. भागीआजीला खूप आनंद झाला पण मनात शंकेची पाल चुकचुकली. ही काळजी आपली की इस्टेटीची असा विचार मनात आला. आतापर्यंत दुर्लक्ष केलं आणि आता अचानक इतकी काळजी? आपण लाडके कसे झालो याचचं आजीला आश्चर्य वाटत होतं. वास्तविक भागीआजीचा एकमेव आधार म्हणजे चंदू. जो दररोज फोन करायचा आणि जमेल तसं तर भेटायला यायचा. चंदू ना नात्याच्या ना गोत्याचा. त्याच्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागणार होतं तेव्हा भागीआजीनं मदत केली. शिक्षण पूर्ण करून चंदूनं तालुक्याच्या बॅंकेत नोकरी मिळवली. तिथंच सेटल झाला पण भागीआजीला विसरला नाही.

दुसऱ्या दिवशी भागीआजीला भेटायला सगळा गोतावळा आला.

“नक्की काय झालयं. ”

“तब्येत फार खराब झालीयं”

“वय झालयं. आता असे प्रॉब्लेम्स येणारच. ”

“सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत मग नक्की प्रॉब्लेम काय?? ”

“डॉक्टर काय म्हणाले. ”

“आजीची शुद्ध का हरपलीय. काहीच बोलत का नाही”

…   अशी पाठोपाठच्या प्रश्नांना चंदू उत्तरं देत होता. भेटीची औपचारिकता पार पाडून प्रत्येकानं काढता पाय घेतला.

“काळजी करू नकोस. म्हातारपण आहे थोडा वेळ लागेल पण आजी ठणठणीत होईल. नक्कीच बरी होईल. चल येतो. शुद्धीवर आल्यावर आजीला मी भेटायला आलो होतो हे तिला नक्की सांग आणि काही लागलं तर बिनधास्त फोन कर. पैसे आहेत ना. ” 

…. हेच चंदूला प्रत्येकानं सांगितलं. रूममधून बाहेर आल्यावर सर्वांचं बोलणं एकदम बदललं…..  

“यावेळेस कन्फर्म दिसतंय”

“फार फार तर अजून दोन तीन दिवस काढेल. ”

“म्हणजे परत सुट्टी काढून यायला लागेल”

“आयला, वैतागच आहे”

“काही सांगता येत नाही. ”

“हो ना. म्हातारी फार काटक ये. ”

“हा ते पण खरंय. इतकी वर्षे एकटी राहतिये. डेरिंग लागतं ”

“तिच्यानंतर गावांकडचं घर आणि दोन एकर जमीन कोणाच्या नशिबी???? ”

“म्हातारीची इच्छा”

“कोणाला म्हणून काय विचारता. त्या चंद्यालाच मिळेल”

“मग आपण काय xx मारायला आलोय का”

“बरे गप्प बसू. लांबचे असलो तरी रक्ताचे नातलग आहोत. तो चंद्याच परका आहे. गरज पडली तर कोर्टात जाऊ. ”

“या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. आधी आजीच्या मनात काय आहे ते कळू द्या”

“पण एक गोष्ट मान्य करा. चंदूनं आजीची खूप काळजी घेतली आणि अजूनही घेतोय. ”

“बरंच आहे की. आपल्या डोक्याला ताप नाही. ”

“आणि तसंही फार कळवळा आला असेल तर तूही चंदूला जॉइन कर. ”

“नको. जे चाललयं ते ठीकयं”

पुरुषांची चर्चा सुरू असताना महिलामंडळी आजीला भेटायला गेल्यावर चंदू बाहेर आला… 

“ए बघ गं. आहेत की..  ” एकजण म्हणाली तेव्हा खी खी करत सगळ्या हसल्या.

“हळू हळू. कुणी ऐकलं तर वाट लागेल. ”

“आजीची परिस्थिती पाहून जे वाटलं ते तर बोलले. ”

“हो गं. काहीच हालचाल नाही..  ही म्हणते तसंच वाटतं”

पुन्हा एकदा खी खी झालं…

“दोन दिवस झाले हीच कंडिशन आहे. ”

“म्हातारीच्या मागे इस्टेट कोणाला?? ”

“मृत्यूपत्र केलं असेल ना”

“असल्या गोष्टींविषयी तिला काय माहीत असणार”

“एक सांगते. म्हातारीच्या नावावर जे काही आहे ते विकून समान वाटणी करायची”

“मान्य. सगळं आपल्यालाच मिळणारयं. उगीच त्यावरून भाडंणं नकोत. थोडे दिवस थांबा. ”

… तितक्यात चंदू आल्यानं लगेच सगळ्यांनी टोन बदलला. काहीजणींचे डोळे भरले तर दोघी रडायलाच लागल्या.

“काही लागलं तर हक्कानं सांग. फोन कर. ”

…. तोंडदेखलं बोलून सगळ्या रूमबाहेर आल्यावर चटकन नॉर्मल मोडवर आल्या. भागीआजीला भेटायला आलेल्यांनी कोरडी सहानुभूती दाखवण्यापलीकडं काहीही केलं नाही. फक्त चंदू आणि त्याची बायको दोघांनी हॉस्पिटल सोडलेलं नव्हतं.

— 

रात्री चंदूचा पुन्हा मेसेज “भागीआजी…….   ”

“कधी, किती वाजता, आता पुढचं कसं करायचं, इथंच की गावाकडे”

…. लगेचच ग्रुपवर विचारणा सुरू झाली. पाचेक मिनिटांनी ग्रुपवर चंदूनं व्हिडिओ पोस्ट केला. त्यात हॉस्पिटलच्या बेडवर मांडी घालून बसलेल्या भागीआजीला पाहून सर्वांना धक्का बसला. कोपरापासून हात जोडत आजीनं बोलायला सुरवात केली….

“ए सरडयांनो, मी चांगली धडधाकट आहे. इतक्या लवकर जात नाही. तुमची नाटकी काळजी दिसली. बोललेलं समद ऐकलं, वा रे वा काय एकेकाची भाषा. इस्टेटी साठी खोटं वागता. समदे लबाड लांडगे. मागं आजारी पडले. एकदम तुमी लोक भेटायला आला. तवाच डाउट आला. म्हणून तुमचे खरे रंग बगण्यासाठीच हे नाटक केलं. यात बिचाऱ्या चंद्याचे हाल झाले..  पण तुमचं पुतनामावशीसारखं प्रेम, नकली काळजी समजली. साळत गेली नाई पण दुनियेनं लई शिकवलं. आता समदं इसरा. दान करीन पण तुमाला देणार नाही..  बजावून ठेवते. आणि आता परत तोंडं दाखवू नगा. नाहीतर….   ” 

…. हातातल्या चाकूने भागीआजीनं सफरचंदाचा तुकडा मोडला आणि व्हिडीओ बंद झाला.

काही वेळातच चंदू फॅमिली ग्रुपमधून बाहेर पडला…

…. त्यानंतर ग्रुपवर फक्त एकच विषय होता – – ‘ भागीआजी ‘.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares