मराठी साहित्य – विविधा ☆ अनेकरंगी शब्द-बहारदार ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆  अनेकरंगी शब्द-बहारदार ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘बहारदार’ हा एरवी मी अनेकदा ऐकलेला, वाचलेला आणि स्वत: ही बर्याचदा वापरलेला शब्द..! पण आज लेखनाचा विषय म्हणून याचा विचार सुरु झाला,तेव्हा या शब्दाने शब्द आणि भाषा यांच्यातल्या नात्यांचे बहारदार रंग अधिकच रंगतदार होत असल्याची समृध्द करणारी जाणिव मन प्रसन्न करुन गेली.

‘बहर’ म्हंटलं कि निसर्ग आठवतो आणि बहार हा शब्द अनेक जुन्या हिंदी सिनेमांच्या सुखद बहारदार आठवणी ताज्या करतो.बहर या शब्दात सुगी,सराई,मोसम,अशा अनेक सुखद विविधरंगी निसर्गावस्था जशा लपलेल्या लपलेल्या आहेत तसेच बहर हाच शब्द नव्हाळी, टवटवी, ताजगी, जोम अशा विविध अर्थरंगातली नवतारुण्याची चाहूलही सूचित करतो.

‘बहार’ या शब्दाने जागवलेल्या अनेक जुन्या हिंदी चित्रपटांच्या आठवणी बहार या शब्दाचे विविध रंग अधोरेखित करणार्याच आहेत. ‘बहार’, ‘बहारोंके सपने’,’बहारे फिर भी आयेंगी’ही अशा काही चित्रपटांची प्रातिनिधिक उदाहरणे. ‘बहार’ हे चित्रपटाचे नाव. त्या नावात समृध्दी, भरभराट, संपन्नता यातल्या समाधान, संतुष्टता यांचे सूचन आहे. ‘बहारों के सपने’ विपन्नावस्थेतील गरीबांनी पाहिलेली समृध्दीची स्वप्ने रंगवणारा वाटतो, तर ‘बहारे फिर भी आयेगी’ निराश मनोवस्थेला दिलासा देणारा हेही दिवस जातील अशा आशावादाचा परिसस्पर्श करुन सावरु पहाणारा असल्याचे लक्षात येते.

बहर, बहार या शब्दांनी अशा अनेक उमलत्या आनंद सौख्य, समृध्दीच्या अर्थरंगानी आपल्या मनात सुखद असोशी निर्माण केलेली असते.पण या सुखद वास्तवाचा मोसम कायम टिकणारा नसतो हे आपण गृहीत धरलेले नसेल तर बहरानंतर येणारा शिशीर आपल्याला अधिकच चटके देणारा वाटण्याची मात्र शक्यता असते.तसे होऊ नये म्हणूध बहर असो वा शिशिर दोन्हीही क्षणभंगूर आहे हे लक्षात घेऊन सुखात तरंगत न रहाता,आणि दु:खाने खचून न जाता या दोन्ही अवस्थेत मनाला सावरणारे ओठावरले गाणे आपण अलगद जपायला हवे.

बहारदार या शब्दनिर्मितीतील वैशिष्ठेही लक्ष वेधून घेणारी आहेत. बहार आणि दार या दोन शब्दांनी बनलेला हा संयुक्त शब्द..! एक नाम आणि दुसरा विशेषण. नामाचं वर्णन करण्यासाठी एरवी विशेषण वापरले जाते आणि ते नामाच्या आधी येते आणि आपलं वेगळं अस्तित्व जपतही असते. उदाहरणार्थ -सुखद धक्का, दुष्ट माणूस, लाल गुलाब इत्यादी. ‘बहारदार’ मधे मात्र ‘बहार’ या नामाच्या नंतर ‘दार हे विशेषण येते. गंमत म्हणजे हे विशेषण स्वत:चे वेगळे अस्तित्व न जपता त्या नामाशी संलग्न होते. पण हे होत असताना स्वत:चं वैशिष्ठ हरवत नाही.तर प्रत्यय बनून त्या नामालाच स्वत:त सामावून घेऊन स्वत:चा रंग त्याला देते. म्हणजे इथे ‘ दार ‘ या विशेषणाच्या स्पर्शाने ‘बहार’ या नामाचे बहारदार या वेगळ्या विशेषणात रुपांतर होते. दार हा शब्द श्रीमंत या अर्थाचा.बहार म्हणजे सौंदर्याची, रंगरसांची, अभिवृध्दीची श्रीमंती..! बहारदार सादरीकरण, बहारदार रंगत, बहारदार अभिनय,  याप्रमाणे हे विशेषण वापरले जाते. दार या विशेषणाच्या प्रत्यय रुपातल्या नामसंलग्नतेतून तयार झालेली चवदार, रंगतदार, मजेदार अशी इतरही उदाहरणे आहेत.

‘बहारदार’ या शब्दाच्या स्पर्शाने माझ्या मनात उमटलेले हे विचारतरंग भाषासमृध्दीसाठी निदान माझ्यापुरतेतरी शब्दांशी खेळायला प्रवृत्त करणारे ठरलेयत हे मात्र खरे..!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळ आला होता पण ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ काळ आला होता पण ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

रोजच्यासारखीच मी बँकेत जायला निघाले होते. आदल्या दिवशी पित्ताचा प्रचंड त्रास झाल्याने खूप अशक्तपणा

जाणवत होता. पण किल्ल्यांची जबाबदारी असल्याने जाणे भागच होते. म्हणून टूव्हीलर ऐवजी रिक्षाने निघाले होते. एक दीड कि. मि. गेले असेन, आणि अचानक मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. छाती जड झाली. कुणीतरी बरगड्यांची घट्ट मोळी बांधत आहे असं वाटायला लागलं. जीवाची घालमेल व्हायला लागली.

नकळत मी रिक्षाच्या सीटवरच आडवी झाले… परत उठत होते ..झोपत होते. माशासारखी तडफड व्हायला लागली. रिक्षा वाला पार घाबरून गेला. “परत” घरी सोडतो म्हणाला. पण परत जाईपर्यंत मी मरेन असं मला आतून तीव्रपणे जाणवत होतं. पुढे वाटेत एक नामांकित हॉस्पिटल असल्याचं आठवलं.

‘तिथे घेऊन चला’ म्हटल्यावर ‘रस्ता माहिती नाही’ म्हणत तोच रडवेला झाला. मग मीच कसातरी रस्ता दाखवला.

तिथे पोहोचताच तिथल्या मोठ्या लॉबीतून कशीबशी चालत मी रिसेप्शनपाशी गेले. तिथली मुलगी फोनवर बोलण्यात इतकी गुंग होती की तिने माझ्याकडे बघितलेही नाही. आता आधार घेत उभे राहणेही अशक्य होत होतं.

समोर एक स्ट्रेचर ट्रॉली दिसताच मी कशीतरी जाऊन त्यावर झोपले. काही मिनिटे मी तिथेच तडफडत पडले होते. तिथून चाललेल्या वयस्करशा दोन ‘ मावशींनी’ मला पाहिलं आणि पटकन ती ट्रॉली ढकलत मला आत कुठेतरी नेऊन ठेवलं.

शिकाऊ दिसणारे दोन तीन डॉक्टर्स तिथे बसलेले होते. वॉर्डबॉयने मला तिथल्या टेबलवर झोपवलं. माझी तळमळ जास्त वाढली होती. मग एक एक करत तिथला प्रत्येक जण घरचा, बँकेचा फोन नंबर विचारायला लागला.

‘आधी काहीतरी इलाज करा‘

असं शेवटी मी ओरडले, तेव्हा ऑक्सिजन मास्क लावला गेला यात किती वेळ गेला कोण जाणे. मग आमचे मॅनेजर सर्वात आधी तिथे पोहोचले.

कुठल्याशा फॉर्मवर त्यांनी सही केली, आणि ” काळजी करू नका” एवढेच बोलून, किल्ल्या घेऊन ते निघूनही गेले. पुन्हा मी सोडून सगळे शांत … एव्हाना माझा घसा आवळल्यासारखा व्हायला लागला होता. छाती-पाठ- मान गळच प्रचंड दुखत होतं. शुद्ध हरपेल असं वाटत होतं. मग त्यांनी मला एक इंजेक्षन दिलं, आणि स्ट्रेचर-ट्रॉलीवर झोपवून लिफ्टमध्ये नेले. लिफ्टमध्ये मला माझी बहीण दिसली आणि माझी शुद्ध पूर्ण हरपली.

संध्याकाळी कधीतरी मी शुद्धीवर आले….आणि सकाळपासून घडलेला एक एक प्रसंग मला आठवायला लागला. प्रत्येक प्रसंगात, माझं आयुष्य संपवायला आलेला काळ जाणवायला लागला.

पण तरी अजून मी जिवंत कशी काय होते?….. मग हळूहळू लक्षात यायला लागलं की…… काळ आला होता हे तर १००% सत्य होतं, कारण त्या अवस्थेत ते मला क्षणाक्षणाला जाणवत होतं. पण वेळ? ती नक्कीच आली नसावी. कारण ती आली असती ,तर त्याही अवस्थेत हॉस्पिटलमध्ये जाण्याची अंतः प्रेरणा श्री स्वामींनी मला दिलीच नसती. रिक्षावाला मला वाटेतच उतरवू शकला असता.

त्या दोन मावश्यांना माझ्याकडे लक्ष द्यावं असं वाटलं नसतं. जे एक अत्यावश्यक इंजेक्शन तेव्हा मला दिलं लं, ते केमिस्टकडून आणायला माझ्याबरोबर कुणीच नव्हतं हे लक्षात येताच तिथला वॉर्ड – बॉयरुपी देवमाणूस ट्कन जाऊन, त्या इंजेक्शनचे ४००० रू स्वतःच्या नावावर लिहायला सांगून, ते घेऊन आला नसता. अर्थात हे मला नंतर कळलं होतं……. आणि या सगळ्यांनी मिळून, काळ बरोबरच घेऊन आलेल्या त्या वेळेला भक्कमपणे अडवून गदी वेळीच परतून लावलं होतं, म्हणून मी जिवंत राहिले होते…..त्या सर्वांची मी आजन्म ऋणी आहे.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर तपासायला आले तेव्हा अगदी गंभीरपणे म्हणाले की” अजून अर्धा तास उशीर झाला असता तर यांचं काही खरं नव्हतं”……. आणि त्यांच्या त्या बोलण्याने मला मात्र तेव्हा नकळतच हसू आलं होतं.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे  ४११०३७.

मोबाईल: ९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिकमास ☆ श्रीमती अनुराधा फाटक 

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ अधिकमास ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

दरवर्षीच्या बारा चांद्र मासापेक्षा अधिक असणारा असा अधिक मास १८ सप्टेंबरला सुरु होत असून १६ आक्टोबरला संपत आहे.साधारणपणे दोन वर्षे आठ महिन्यानी असा चांद्रमास येतो.

पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तसा पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो.चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे २९.७५ दिवस लागतात. आपण ३०दिवसांचा (तिथींचा) एक चांद्रमास मानतो. चंद्राच्या उगवण्या-मावळण्याच्या वेळेप्रमाणे तिथीत वृध्दी किंवा क्षय होत असतो .त्यामुळे साधारणपणे आपले चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे व सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते या दोन प्रकारच्या वर्षात ११ दिवसांचा फरक पडतो अशी तीन वर्षे झाली एक महिना अधिक म्हणून ओळखला जातो. म्हणून दर दोन वर्षे आठ महिन्यानी अधिक महिना येतो.

चांद्रमासाच्या बारा महिन्यात आपल्या सणसमारंभाची जशी योजना असते तशी अधिक महिन्यात नसलयानेच कदाचित या महिन्याला मलमास म्हणत असावेत.

‘आपल्या कालावधीत इतर मासाप्रमाणे काहीच नसते’ याची खंत वाटून हा मलमास श्रीविष्णूकडे गेला. त्याने आपली दुर्लक्षितता भगवान विष्णूला सांगताच भगवान विष्णूने त्याला आपले ‘पुरुषोत्तम ‘ हे नाव दिले तेव्हापासून तो पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जाऊ लागला अशी एक आख्यायिका सांगितली जाते. या मासात ‘भागवत’ सप्ताह करण्याची प्रथा असून ‘माझ्या परिवाराचे आयुष्य अछिद्र व्हावे ‘ अशी प्रार्थना भगवान विष्णूला करून त्याच्या स्मरणार्थ अपूप( अनारसा) वाण देतात.

हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंहावतार झाला तो अधिक मासातच!

असे हे अधिक मासाचे महत्व !

आपल्या मनोकामनांचे पूर्तत्व करणारे !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणगोत ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

B.Sc Microbiology, P.G.Diploma in Hospital Management

 ☆ विविधा ☆ गणगोत ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

माझी परसबाग हे माझ्यासाठी माझं नंदनवन! ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हे संतांचे वचन तंतोतंत पटावं अशी ही विसाव्याची जागा! मनमोकळं व्हायच ठिकाण जणू! मौनातून बरच काही सांगून जाणार विश्वच ते! सजीव सचेतन असं जिवाभावाचं कुटुंब….

परस दारावर जाईचा नाजूक वेल पसरलाय. उंबर्‍यावर पाय पडताच तिचा सुवास श्वासात भरून जातो. शुभ्र पांढऱ्या फुलांचे सात्विक तेज मन उजळून टाकतो.

परसाच्या मध्य भागी आपल्या सावळ्या मंजिऱ्या लेऊन नटलेली कृष्ण तुळस मन प्रसन्न करते. तिचे भक्ती रूप दर्शन नतमस्तक व्हायला लावते.

तिच्याच बाजूला जास्वंद नम्रतेने वाकून तिला लाल फुलं अर्पण करतोय असं काहीसं दृश्य दिसतं.

अबोली नावाप्रमाणेच अबोल आणि शांत..,,

परस दाराच्या मागच्या दारापाशी वेगवेगळ्या रंगात गुलाब हसतात. काटेरी भाले अंगावर घेऊन जणू आतील सर्व गणगोतांचे चे ते संरक्षण करतात.

गुलाब भालदार तर बकुळ चोपदार सावळीशी अशी ही नाजूक पण दाराशी खडा पहारा ठेवते तिच्या सुगंधाने आकर्षित होऊन निमिष भर थांबून घराकडे एक दृष्टीक्षेप टाकून पुढे जाणाऱ्या प्रत्येका पासून बागेला दृष्ट लागू नये म्हणून ही सावळी सर्वांना काळं तीट लावते जणू!

आंबा गर्द सावली ढाळतो ते केवळ माझ्या मनी साठीच, असे मला वाटते कारण मनी दिवसभर त्याच्या सावलीत पहुडलेली असते.

वृद्ध पारिजात अंगणाची शोभा वाढवतो पारिजातकाची नाजूक फुलं रोज तुळशीवर बरसतात आणि तिची यथासांग पूजा होते.

चाफा निमुटपणे पान पिसाऱ्यातून दर्शन घडवतो तो अगदी माझ्या झोपायच्या खोलीपर्यंत पसरला त्यामुळे मलाही जणू त्याचाच सुगंध.

अशीही माझी परसाबाग माझ्या जिव्हाळ्याची…..

त्या दिवशी मी खूप उदास होते. आईचं वर्षश्राद्ध नुकतच झालं आणि बाबांचं एक दोन महिन्यावर येऊन ठेपलं होतं.आईला सोडून बाबांना जणूं एकट राहणं जमलच नाही गेले पाठोपाठ तिला भेटायला. आम्हाला इथे एकटं सोडून…

दोघांच्या आठवणीने डोळे पाणावले. नकळत हळूहळू टीपं ढाळू लागले. अंगणातील मंडळींच्या नजरेतून हे सुटले नाही आणि मग प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.

“ताई काय झालं? का रडतेस? आमचं काही चुकलं का? काही तरी बोल बाई!” सर्वांनी एकदम गलका केला.

गुलाबाने री ओढली “ताई तू काळजी करू नकोस. तुझं सगळं दुःख मी पचवतो. सगळे काटे मी माझ्या अंगावर घेतो”

जास्वंद म्हणाले, “आता जाते कशी बाप्पाकडे आणि तुझी आणि त्यांची भेटच घडवते. मग हवं ते मग त्याच्याकडे”

चाफा म्हणाला, “रडू नको ताई. बोलून सगळे निपटूया. तू अगोदर तुझ्या मनात जे दाटलय ते मोकळं कर”

अबोली म्हणाली, “मी नावाचीच अबोली ग तुझी माझी बट्टी! सांग मला तुझ्या मनातलं आणि मोकळी हो.

बकुळ म्हणाली,“ दृष्ट लागली माझ्या ताईला, दृष्ट काढून टाकते आता ताबडतोब!”

आंबा म्हणाला,“अशी संतापू नकोस ताई शांत हो जराशी. ये पाहू माझ्या सावलीत आणि सांग मनातलं….”

मनी माझ्या दोन पायात घुटमळला लागली तिच्या झुबकेदार शेपटीने मला गोंजारायला लागली. मूकपणे मला बोलतं करायचा तिचा प्रयत्न होता.

तुळशी ने मौन सोडले. तिने माझ्या मनातलं जाणलं. “अगं ताई आई-बाबांच्या जाण्याने तू इतकी दुःखी झाली आहेस ते मला ठाऊक आहे तुझे अश्रूच ते सांगतात पण ‘उपजे ते नाशे’ या न्यायाप्रमाणे अशा घटना घडणारच.हे जीवन चक्र आहे. आपण वास्तव स्वीकारले पाहिजे. नाही का?

इतका वेळ शांत असलेला वृद्ध पारिजात बोलू लागला, “अगं बाळा मीच तुझा तात!

दारावरची जाई म्हणाली अगं राणी मीच तुझी आई!”

आई-बाबांना भेटल्याचा कोण आनंद झाला म्हणून सांगू?….. माझा मन मोर नाचू लागला.

इतक्यात वार्‍याची एक मंद झुळूक आली आणि गुलाब अबोली चाफा बकुळ जास्वंद सर्वांना घेऊन फेर धरून नाचू लागली. संपूर्ण आस मंतात एक मंद सुगंध दरवळू लागला. एक असा अप्रतिम गंध जशीअत्तराची कुपी सांडली जणू………

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एम्. विश्वेश्वरय्या ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

 ☆ इंद्रधनुष्य ☆ एम्. विश्वेश्वरय्या ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती, त्या वेळची गोष्ट आहे. खचाखच भरलेली एक रेल्वेगाडी चालली होती. इंग्रज प्रवाशांची संख्या जास्त होती. एका डब्यात एक प्रवासी गंभीर चेहरा करून बसला होता. रंगाने सावळा, देहयष्टीने साधारण, पोशाखही सामान्यच! त्यामुळे डब्यातील इतर इंग्रज प्रवासी त्याची कुचेष्टा करत होते; पण कोणाच्याही चेष्टेकडे त्याचे लक्ष नव्हते. अचानक त्याने उठून रेल्वेची साखळी खेचली. वेगात जाणारी रेल्वे तात्काळ काही अंतरावर थांबली. सर्व प्रवासी त्याला ओरडू लागले. थोड्या वेळाने रेल्वेचे सुरक्षा रक्षक तेथे आले व त्यांनी विचारले, ‘साखळी कोणी व का खेचली?’ त्या व्यक्तीने उत्तर दिले, ‘मी खेचली साखळी. माझा अंदाज आहे, साधारण एक फर्लांग अंतरावर रेल्वेचे रुळ उखडले आहेत.’

सुरक्षारक्षकाने आश्चर्याने विचारले, ‘तुम्हाला कसे काय कळले?’ तो म्हणाला, ‘महोदय, मी शांत बसून अंदाज घेत होतो. गाडीच्या गतीमध्ये मला फरक जाणवला. रेल्वे रुळाच्या आवाजातील फरकही मला पुढील धोक्याची सूचना करत होता.’

सुरक्षारक्षकांनी त्याला घेऊन रेल्वे रुळांची पाहणी केली, तर खरोखरच काही अंतरावर रुळांचे नटबोल्ट उखडले होते. इतर प्रवासी आता मात्र या व्यक्तीने एवढ्या मोठ्या अपघातातून सर्व लोकांचे प्राण वाचवले म्हणून त्याचे कौतुक करू लागले.

कोण बरे होते ते? ते होते एक इंजिनीअर. त्यांचे नाव होते ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.’

वैज्ञानिकांच्या पंक्तीत इंजिनीअर (अभियंते) कसे काय बसू शकतात, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. खरे म्हणजे स्थापत्य क्षेत्रातही अनेक नवनवीन शोध लागत असतात. त्यामध्ये प्रतिभावान अशा अभियंत्यांचे बौद्धिक योगदान महत्त्वपूर्ण असते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत निर्माण आणि विकास यामध्ये इंजिनीअर तंत्रज्ञांची कुशलता महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रेणादायी वाटचालीचा.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजेच एमव्ही… अभियांत्रिकी, पाणी व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, औद्योगिकीकरण व शिक्षण व्यवस्थापनातील एक अलौकिक असे व्यक्तिमत्त्व! त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूर प्रांतातील मुदेनाहल्ली या गावात झाला. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री वेदविद्येचे प्रकांड पंडित व आयुर्वेदतज्ज्ञ होते.

असेच एकदा शास्त्रीजी गंगावतरणाची गोष्ट सांगत होते. सात-आठ वर्षांच्या विश्वेश्वरैय्याच्या मनात या गोष्टीने घर केले. भगीरथाच्या प्रयत्नाने गंगा पृथ्वीवर आली, ही गोष्ट त्याने आपल्यासाठी आदर्श मानली. ज्ञान, आत्मविश्वास आणि साधनेच्या बळावर माणूस एखाद्या नदीची दिशा बदलू शकतो, गंगेला भागीरथी बनवू शकतो, हे त्यांना कळले. त्यांनी मन लावून अभ्यास केला. माध्यमिक शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्यातील दडलेल्या भगीरथामुळे त्यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८८३मध्ये इंजिनीअर होऊन सहायक अभियंता या पदावरून त्यांनी श्रीगणेशा केला. पुढे एकेक यशोशिखर पादाक्रांत करत गेले. नदीचा प्रवाह जसा पुढे पुढे जातो, तसे विश्वेश्वरय्या यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. सिंधू नदीवर धरण बांधले. या धरणामुळे दक्षिणेतील पठारी भागात सिंचनाची सोय तर झालीच, शिवाय सक्कर शहराला पाणीपुरवठाही होऊ लागला.

ते पुण्याच्या खडकवासला धरणाचे अभियंता असतानाची एक गोष्ट आहे. त्या काळी पुण्यामध्ये पाण्याची फार टंचाई होती. धरणासाठी ऑटोमॅटिक गेट सिस्टीम म्हणजे ‘स्वयंचलित दरवाजे’ हा एकमेव पर्याय होता; पण ग्रामीण भागात विजेशिवाय स्वयंचलित दरवाजे ही कल्पना म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती; मात्र ‘सर एमव्हीं’नी विज्ञानाच्या नियमांचा केवळ अभ्यासच केला नव्हता, तर ते नियम आपल्या रोजच्या जीवनात उतरवले होते. ‘पाण्यात बुडल्यानंतर कोणत्याही पदार्थाचे द्रव्यमान कमी होते,’ या विज्ञानाच्या साध्या नियमाचा त्यांनी खडकवासला धरणाचे दरवाजे बांधताना उपयोग करून घेतला. त्यासाठी त्यांनी दोर, गेट, डक्ट आणि प्रतिवजनाचा आधार घेतला. पाण्याचा दाब वाढला की पाणी डक्टमध्ये येते आणि प्रतिवजन कमी झाल्याने दरवाजे आपोआपच उघडतात. पाणी ओसरले, की प्रतिवजन पूर्वपदावर येते आणि दरवाजे आपोआप बंद होतात. विजेशिवाय चालणारे हे स्वयंचलित दरवाजे म्हणजे धरणक्षेत्रात नवीन क्रांतीच होती. या तंत्राचे पेटंट त्यांच्या नावे झाले; पण देशप्रेम व जनसेवा या गुणांमुळे या पेटंटचे पैसे घेण्यास त्यांनी नकार दिला.

सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था त्या काळी नसल्याने ते सांडपाणी नदीच्या पाण्यात जाऊन पाणी दूषित होते, ही मोठी समस्या होती. अशा दूषित पाण्यामुळे प्लेग, नारू, अतिसार असे साथीचे रोग फैलावण्याचा सतत धोका असे. यावर उपाय म्हणून ‘सर एमव्हीं’नी बंद पाइपमधून शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना तयार केली. भारतातील २१ शहरांसाठी पाणीपुरवठ्याच्या योजना त्यांनी आखल्या आणि प्रत्यक्षातही उतरविल्या. सॅनिटरिंग इंजिनीअरिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना ‘सर एमव्हीं’ नी हैदराबाद, कराची आणि दक्षिण आफ्रिकेत एडन शहरासाठी मलनि:सारणाची भूमिगत योजना आखून दिली.

त्या काळी शेतीची सारी मदार पावसावर असे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि जलविद्युत निर्मिती ही काळाची गरज होती. ही गरज ओळखून त्यांनी निरा नदीच्या किनारी सिंचनासाठी ब्लॉक व्यवस्थेची सुरुवात केली. या व्यवस्थेमध्ये पाण्याचे वितरण शास्त्रीय पद्धतीने केले गेले. त्यामुळे प्रभागाच्या एक तृतीयांश क्षेत्रात उसाचे व दोन तृतीयांश क्षेत्रात रब्बी आणि खरीपाची पीके घेता येऊ लागली. ही योजना तात्कालिक नव्हे, तर सार्वकालिक ठरली.

सर विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंताच नव्हते, तर ते एक पर्यावरणतज्ज्ञ आणि हळव्या मनाचे छायावादी कवीही होते. त्याच भावनेतून त्यांनी प्रत्येक धरण आणि जलाशयाच्या आसपास उद्याने व वॉक वे तयार केले. प्रचंड मोठा पाणीसाठा आणि दूरवर पसरलेली हिरवाई! ‘स्वच्छ शहर, हरित शहर’ ही घोषणा बहुधा यातूनच आली असावी. कृष्णराजसागर धरण आणि वृंदावन गार्डन यांमुळेच ‘सर एमव्हीं’ना ‘आधुनिक म्हैसूरचे जनक’ असे म्हटले जाते. विश्वासार्हता, व्यवस्थापन कौशल्य, समर्पण वृत्ती आणि प्रामाणिकपणा या अद्वितीय गुणांमुळे म्हैसूरच्या महाराजांनी १९१२मध्ये त्यांची राज्याच्या दिवाणपदी नियुक्ती केली. दिवाण म्हणून काम करताना त्यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली.

विकासासाठी, दळणवळणासाठी उत्तम व्यवस्था अपरिहार्य आहे, या विचाराने त्यांनी राज्यात रेल्वे सुविधेचे नवे जाळे विणले. तिरुमाला ते तिरुपती हा रस्तेमार्गही त्यांचीच देणगी. ‘सर एमव्हीं’चे जीवन म्हणजे जणू वाहता प्रवाहच! कुठेही ओंजळीतून पाणी घ्या, ते निर्मळ अमृतासारखेच असणार. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. सातहून अधिक संस्थांची मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली. सुमारे दोन डझन संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. ब्रिटिश सरकारचा सीआयई हा बहुमान त्यांना मिळाला. १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

आपल्या देशाच्या विकासालाच त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. भारतीय संस्कृती सहकार्य आणि कार्यकौशल्याचे जणू प्रतीक म्हणजे सर एमव्ही. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्यासारख्या इंजिनीअर्सच्या योगदानाचा गौरव म्हणून १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. सहायक अभियंता ते भारतरत्न हा सर विश्वेश्वरय्या यांचा अद्भुत प्रवास साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्त्व अधोरेखित करतो.

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर.

प्राथमिक शिक्षक, जि. प. केंद्र शाळा मसुरे नं. १ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)

मोबाइल : ९४२०७ ३८३७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जन्म – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : जन्म – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मी जन्म १- कविता लिहिली, त्या गोष्टीला दहा वर्षं होऊन गेली.  सालातील शेवटच्या आकड्यांची उलटापालट झाली. १९७६ साल. या वर्षी खरोखरच गुलबकावलीचं फूल माझ्या उदरात वाढत होतं. प्रेशस बेबी म्हणून जसं खूप कौतुक होतं, तसंच देखभाल, काळजीही खूप होती. डॉ. श्रीदेवी पाटील या त्या काळातल्या निष्णात आणि लौकिकसंपन्न डॉक्टर होत्या. त्यांच्या दवाखान्यात महिना-दीड महिना बेड रेस्टसाठी रहावं लागलं होतं. मला तसं काहीच होत नव्हतं, पण तसं डॉक्टरांना म्हंटलं की त्या म्हणायच्या, `तुला काही होतय म्हणून नव्हे, काही होऊ नये म्हणून दवाखान्यात ठेवलय.’ या काळात मला कथांचे अनेक विषय मिळाले आणि त्यानंतर काही काळाने मी कथालेखन सुरू केलं.

अखेर प्रसूतीचा काळ जवळ आला. मी दिवसभर कळा देत होते. पण फारशी काही प्रगती नव्हती. संध्याकाळची पाच- साडे पाचची वेळ असेल. मला कळा येण्याचं इंजक्शन दिलं आणि लेबर टेबलवर घेतलं. दोन कळातलं अंतर कमी होत होतं, पण म्हणावी तशी प्रगती नव्हती.

एवढ्यात हॉस्पिटलच्या दारात एक रिक्षा उभी राहिली. त्यातून दोन महिला उतरल्या. एकीचा चेहरा वेदनेने पिळवटलेला. दुसरी तिला धरून आता आणत होती. ती बहुधा तिची आई असावी.

तिला पाहिल्याबरोबर नर्सनी मला लेबर टेबलवरून खाली उतरवलं आणि तिला टेबलवर घेतलं. आकांती वेदनेनं ती किंचाळली. एकदा… दोनदा… आणि नर्सच्या हातात तिचं बाळ होतं. मी विस्मित होऊन तिच्याकडे पाहत राहिले. कळा द्यायचीच विसरून गेले. नंतर तिला रूममध्ये हलवलं आणि मला टेबलवर घेतलं. मी कळा देत होते पण डोळ्यापुढे मात्र तिची प्रसूती होती. मनात शब्द उतरत होते-

 

पापणीवर उतरणारा गडद अंधार

प्रकाशाची भिरभिरणारी वलयं

त्यात विरघळून गेलेली.

झुलत्या पुलावरची अरुंद निसरडी वाट

अजूनही सरत नाही.

दोन्ही बाजूच्या खोल डोहात पसरलीय

गूढ, भयाण आकारहीन सावली.

पायातलं सारं बळ ओसरलय..

प्राण कासावीस झालेत, श्वास कोंडलेत.

दूरच्या सुरक्षित निवांत किनार्‍यावरून वळलेल्या नजरा कुजबुजताहेत,

इतकं का अवघड आहे सारं?

थोडं सोसायला हवं…सोसायलाच हवं.

एवढा बाऊ कशासाठी?

काहीच कळत नाही… उमजत नाही. अपराध्यासारखं वाटतय.

पण अंगातलं सारं त्राण सरलय.

आणि इतक्यात…

मायेने ओलावलेला गहिरा स्वर

अंगभर थरथरत जातो संजीवनी होऊन.

सारी वाटचाल सरलीय… आता फक्त वितीचं अंतर

एवढी एकच कळ… एवढंच… थोडा धीर धर…

मरगळलेल्या प्राणात पेटतात पुन्हा चैतन्याचे पलिते

जीवाच्या कराराने घेतली जाते एक साक्षात्कारी झेप

आणि त्याच सुरक्षित किनार्‍यावर टेकतात पाय

छातीशी बिलगलेल्या नन्ह्या फरिश्त्याचं वरदान घेऊन.

तिने बाळाला जन्म दिला होता. मी कवितेला. असा त्यावेळी माझ्या बाळाच्या जन्माआधी माझ्या `जन्म’ कवितेचा जन्म झाला होता.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सागरतीरी ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

☆ विविधा :  सागरतीरी – श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण 

“सागरकिनारी”

मी परवा  असाच एकटा समुद्राकाठी बसलो होतो. आजूबाजूला बरेचजणं होते,कोणी खेळत होते, हातात हात घेऊन एकमेकांच्या प्रेमात गुंतून गेले होते, कोणी भेळ खात होते वगैरे वगैरे !!!

जवळच एक जोडपं बसलं होतं,एकमेकांपासून बर्या पैकी अंतरावर…..बहूधा नवविवाहित आणि तेही arranged marriage वालं असावं. तो बोलत असताना तिची मान खाली आणि ती बोलत असताना  त्याचे डोळे तिच्या चेहर्यावर थबकलेले.

थोड्या वेळाने दोघांनी एकमेकांकडे पहात पहात वाळूवर एकमेकांची नावे कोरली आणि पहात राहीले…. तो तिच्या नावाकडे आणि ती त्याच्या…..दोघेही भावी आयुष्यातील स्वप्नात जणू बुडून गेले होते. आजूबाजूला काय घडतंय याची त्यांना जाणीवही नव्हती….. असाच बराच वेळ झाला….आणि दोघेही अचानक भानावर आले………भरतीच्या लाटेनं कधी गाठलं ते कळलंच नाही. त्याच लाटेनं त्या जोडप्यानं कोरलेली नांवेही पुसून टाकली. दोघेही सावकाश उठले. हातात हात गुंफले… ती त्याच्या दंडावर डोकं टेकवून  बिलगली आणि दोघंही चालू लागले.

मी मात्र सुन्न झालो होतो नि संतापलो समुद्राच्या या कृतघ्नपणाला…..खरंतर ते दोघेही माझे कोणीही नव्हते….तरीही मला वाटलं..त्या दोघांच्या नाजूक भावनांशी खेळायचा समुद्राला काय अधिकार???? आणि थेट समुद्रालाच तो सवाल ठोकला……

समुद्राला खळाळून हासू फुटलं….. आणि मला उत्तरला……अरे वेड्या, हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तुला काय वाटलं त्यांनी कोरलेली नावं माझ्या लाटेनं पुसून टाकली?? अरे, ते दोघे इथून जाताना पाहीलं नाहीस????

त्याने तीचा हात हाती घेतला….प्रेमानं आणि तीही त्याच्या दंडावर विसावली….विश्वासानं. यालाच संसार म्हणतात,हेच खरं प्रेम असतं,यातंच सार्या आयुष्याचं सुख दडलेलं असतं. तुला वाटत असेल माझी लाट भुसभूशीत वाळूवर रेखाटलेली नावं पुसून टाकते. अरे हट… इथून जाणारं प्रत्येक जोडपं घेऊन जातं असं प्रेम कि जे माझ्यासारखं  अथांग आहे, तितकंच गहीरं आहे……ऊथळ नाही. काही कालानंतर हेच जोडपं पुन्हा इथं येईल, ते आपल्या चिमुकल्याला घेवून. त्यावेळी ते बांधतील वाळूत एक चिमुकलं घर….पुन्हा माझी लाट ते घर माझ्यात सामावून घेईल….पण ते आईबाबा नाराज नाही होणार कारण त्यांनी केलेलं घर विश्वास आणि प्रेमाच्या धाग्यांत घट्ट आहे. कोणतीही लाट ते उध्वस्त नाही करू शकणार……

पायावर आलेल्या लाटेच्या स्पर्शाने मी भानावर आलो…..खूप खूप सुखावलो…..आणि  लक्षात आलं……समुद्र कधीच काहीच उध्वस्त करत नाही……उध्वस्त करतात ती माणसांना न कळलेली एकमेकांची मनं!!!!! आणि इतके दिवस जे मला वाटतं होतं कि  कांहीतरी चुकतंय माझ …..आज अचानक मला जाणवलं….कांही  नावं पुसून टाकण्यांन सुखाच्या लाटा आयुष्यात येत असतात.

हे सागरा…..शतशः धन्यवाद!!!

 

© राजीव पुरुषोत्तम दिवाण

बदलापूर(ठाणे)

फोन:९६१९४२५१५१

वॉट्स ऍप :८२०८५६७०४०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जन्म-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : जन्म – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

या गोष्टीला खूप म्हणजे खूपच वर्षं झाली. पण काही वेळा स्मृतीच्या तळातून ती अचानक वर उसळून येते. १९६७ सालची गोष्ट. त्या वर्षी मी बी.एड. करत होते.फेबु्रवारी महिना. आमचा फायनल लेसन प्लॅन लागला होता. परीक्षेच्या वेळी पहिल्या दिवशी पहिलाच माझा मराठीचा लेसन होता. युनीट कोणत घ्यावं, कसा लेसन घ्यावा इ. विचार स्वाभाविकपणेच मनात घोळत होते. लेसनसाठी पाठ्य पुस्तकातील कविता निवडावी, की बाहेरची? असं सगळं विचार मंथन चालू होतं. त्यातच माझी मासिक पाळी सुरू झाली. यावेळी चार-पाच दिवस उशीर झाला होता. तरी पाठपरीक्षेपूर्वी ३-४ दिवस सहज सगळं निपटलं असतं. पण यावेळी नेहमीप्रमाणे चार-पाच दिवसानंतरही ब्लिडींग थांबेना. मग मात्र धाब दणाणलं. पाठ परीक्षा हातची गेलीच बहुतेक, असं म्हणत डॉक्टरांकडे गेले.

डॉ. श्रीनिवास वाटवे हे त्या वेळचे नावाजलेले गायनॅकॉलॉजीस्ट. त्यांना दाखवले. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी `क्युरेटिन’चा सल्ला दिला. संध्याकाळी अ‍ॅडमिट झाले. रात्री सात-साडे सातला क्युरेटीन होणार होते. त्याप्रमाणे मला प्रिपेअर करून टेबलवर घेतले. तिथे भिंतीला लागून असलेल्या शो-केसमध्ये सर्जरीची साधने होती. वेगवेगळ्या आकाराच्या सुर्‍या, कात्र्या, चाकू , सुया, पकडी आणखी किती तरी. लखलखित. चकचकित.

अ‍ॅनॅस्थेशिया देणारे डाक्टर अद्याप यायचे होते. त्यामुळे डॉक्टर, सहाय्यक, नर्सेस सगळी मंडळी डॉक्टरांची वाट बाहेर उभे होते. रूममध्ये टेबलावर फक्त मी आणि भोवतीनं शो-केसमधली लखलखित साधने. हत्यारे.

मी मनाशी पाठाबद्दलचा विचार करायचे ठरवत होते. कशी सुरुवात करायची्… कोणते प्रश्न विचारायचे? वगैरे… वगैरे… पण त्यातलं काही डोक्यात येतच नव्हतं. भरकटलेल्या विचारांना शब्द मिळत गेले-

 

घटका भरत आलेली

जीवघेणी कळ

मस्तक भेदून गेलेली

ललाटीची रेषा,

वाट हरवून बसलेली

घड्याळाची टिक टिक

जिण्याचा तोल साधत

सांडत असलेली

 

इतक्यात डॉक्टर आले. मला भूल दिली गेली. डॉक्टरांनी आपलं काम पूर्ण केलं.

काही वेळाने माझी भूल उतरली. भूल उतरता उतरताही मगाच्याच ओळी मनावर उमटत राहिल्या. त्या पुसून मी पुन्हा पाठाचा विचार करू लागले. पण तो विचार मनातून हद्दपारच झाला. त्याच्याच पुढच्या ओळी प्रगटत राहिल्या.

 

इथरची बाधा

नसानसातून शरीरभर भिनलेली…

लाल… हिरवी… पिवळी… निळी वर्तुळं

काळवंडत गेलेली…

पांढर्‍या शुभ्र ठिपक्यांच्या

लयबद्ध हालचाली.

पाजळत्या रक्तपिपासू हत्यारांची

लांबच लांब पसरलेली

अशुभ सावली.

संज्ञा बधीर होताना

सारं सारं दूर सरतय.

रक्तात उमलणार्‍या

गुलबकावलीचं हसू,

लाटालाटांनी मनभर उसळतय.

अणूरेणू व्यापून उरतय.

 

इथे माझ्या नेणिवेने क्युरेटिनचं `सिझेरियन केलं होतं आणि कल्पनेनं गुलबकावलीचं फूल माझ्या ओंजळीत ठेवलं होतं. माझ्या `जन्म’ या कवितेचा जन्म अशा रीतीने तिथे ऑपरेशन टेबलवर झाला.

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर ☆ 

मनुष्याला ‛मी’ पण मिळवून देणारा सार्थ शब्द म्हणजे ‛अहंकार’! मनुष्य हा बुद्धिवादी प्राणी आहे. म्हणूनच इतर पशु- पक्ष्यांपेक्षा तो वेगळा गणला जातो. आपल्या भावना तो आपल्या संवादातून , कृतीतून व्यक्त करु शकतो. म्हणूनच  जिथे सुख आहे तिथे दुःख, जिथे प्रेम आहे तिथे द्वेष आणि जिथे राग आहे तिथे लोभ हे हातात हात घालून असतात. त्यामुळेच जिथे स्वत्व आहे तिथे ‛अहम्’ असलाच पाहिजे असा अलिखित नियम आहे.

हा अहम् माणसाला कोणत्या स्तरापर्यंत पोहोचवू शकतो याची शेकडो उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात. या ‛अहम्’ नेच हिटलरचा बळी घेतला. जग जिंकणारा सिकंदर या ‛अहम्’ पुढेच नमला. आपल्या मुझद्दीपणाने अनेक लोकांचा बळी घेणारा औरंगजेबाचा  अहम् चा तोरा  संभाजीराजांसारख्या राष्ट्रनिष्ठ व्यक्तीच्या देशभक्तीपुढे फिका पडला. मात्र अहम् ला जिंकणारे या जगात अजरामर झाले.स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा…… किती नावे घ्यावीत तेवढी थोडीच आहेत.

खरं तर मनुष्य जन्माला येताच त्याचा ‛को$हम्’ (मी कोण?) चा प्रवास सुरु होतो. परंतु ‛अहम् ब्रह्मा$स्मि’ (मी ब्रह्म आहे) पर्यंत सर्वांचा प्रवास होतोच असे नाही. त्यामुळे हा अहम् च आपण कुरवाळू लागतो.

लहान असताना आपण पंचतंत्रात एक गोष्ट वाचली होती . त्यामध्ये बेडकीची पिल्ले गाय बघून येतात आणि आईकडे तिचे वर्णन करतात. ती केवढी मोठी होती हे समजण्यासाठी ती स्वतःचे शरीर फुगवून “ एवढी मोठ्ठी का?”असे विचारते. तेव्हा मुले म्हणतात,“नाही, त्यापेक्षा मोठ्ठी!” मग बेडकी आणखी अंग फुगवते. पुन्हा विचारते, मुले पुन्हा नकार देतात, पुन्हा ती फुगते व फुगत फुगत शेवटी मरुन जाते. त्याचप्रमाणे आपण या अहम् चा  फुगा फुगवू लागतो. आपल्याच कौतुकात आपण मग्न होऊन जातो. त्यामध्ये आपण इतरांचा बळी घेतो आहोत हे लक्षातच येत नाही.मात्र कधीतरी या भ्रमाचा भोपळा फुटतो व आपण जमिनीवर येतो. पण त्यावेळी हातात  बाकी शून्य राहिलेली असते.

पण अहंकार सोडणे म्हणजे स्वाभिमान सोडणे नव्हे. जिथे गर्वाची भावना येते तिथे अहम् वाढतो.मात्र आत्मसन्मान स्वाभिमान वाढवतो. आमचा ‛आयुर्वेद’ म्हणता म्हणता अमेरिकेसारखा देश आमच्या देशातील हळदीसारख्या औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवते. जगात क्रिकेटमध्ये  अव्वल नंबरवर असणारे आम्ही वर्ल्ड कप क्रिकेटमधून बाहेर पडतो किंवा एक अहवाल ओबामाना सांगतो की त्यांच्या देशातील बरीच ‛ टॅलेंट’ ही भारतीय आहे ज्याचा उपयोग ते त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी करुन घेतात. किंवा आमच्या सहिष्णुतेला दुर्बलता समजून पाकिस्तान किंवा चीनसारखे देश आम्हालाच आव्हान देत घुसखोरी करतात.  या सर्व घटना खरोखरच आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या आहेत. म्हणूनच आता केवळ अहम् कुरवाळण्यापेक्षा स्वाभिमानाची कास धरण्याची गरज आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आई नावाचं विद्यापीठ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ आई नावाचं विद्यापीठ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

नऊ दहा वर्षाची सुमन आज आजीबरोबर कामाला आली होती.

” कशी आहेस सुमन? शाळा चांगली चाललीय ना? आज कशी काय आलीस तू?”

“अहो वहिनी,आत्ता शाळेला आठवडाभर सुट्टी आहे.म्हणून आता सुट्टीत आजीच्या मदतीला येणार आहे मी.”

तिच्या बोलण्यात प्रौढत्वाची झलक डोकावत होती. मी बघत होते.कधी सुमन भांडी घासत होती तर कधी विसळत होती. आजी तिला भांडे कसे आणि कुठे जोर देऊन घासायचे,तर कसे चोळून विसळायचे हे काम करता करताच दाखवून देत होती. धुणे कसे धुवायचे, कसे पिळायचे, कसे झटकून वाळत घालायचे हे समजावून देत होती. आजीच्या हाताखाली हळूहळू तयार होणाऱ्या सुमनमधे मला उद्याची हुशार, चुणचुणीत, कामसू गृहिणी दिसत होती.

आमच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरील वॉचमनबाईची सकाळी कामाची नुसती धांदल सुरू असायची. आज तिच्या मुलींचा दंगा ऐकू येत होता. म्हणून खिडकीतून डोकावले तर  वाॅचमनबाई धुणे धूत होती.होती जवळच तिची चार पाच वर्षांची मुलगी सावकाशपणे पुढ्यातली भांडी यथाशक्ति घासत, विसळत होती. तिला मधून मधून आईच्या सूचना सुरू होत्या. तर छोटी दीड दोन वर्षाची मुलगी पाण्यात खेळत होतीऋ अचानक तिने ओरडून रडून आईकडून हट्टाने अंगातला फ्रॉक काढून घेतला आणि तो ती पाण्यात बुडवून धूवू लागली. मधूनच ती तो फ्राॅक चोळत होती ,तर मधूनच उठून  आपटत होती. त्या नादात तिचा तोल जात होता. मला तिचे खूप कौतुक वाटले. आईचे अचूक निरीक्षण करून तिची प्रत्येक कृती सुरू होती.

मनात विचार आला आई एक’ चालतं बोलतं ‘विद्यापीठ असते.जगण्याचे शास्त्र आणि प्रात्यक्षिक यांचा असा एकत्र सुंदर मिलाफ कोणत्याच शाळेत नसतो आणि असा अंत:करणापासून शिकवणारा दुसरा प्रेमळ गुरूही  अन्य कोणीच नसतो.  आईची ही शाळा आयुष्यभर अशीच सुरु असते. फक्त अभ्यासाचे विषय बदलत असतात आणि आपल्या मुलांना उत्तम माणूस म्हणून घडवण्यासाठी आई आयुष्यभर धडपडत असते.

अशा विचारात मी आत वळले तर माझी दोन्ही छोटी मुले खोलीच्या सफाईला लागली होती.

“अग रेवा, तुम्ही हे काय करताय ?”

“आई, काल शाळेत बाईंनी  आम्हाला ‘शामची आई’ धडा शिकवला. मला शामची गोष्ट खूप आवडली. छोटा शाम आईला किती मदत करायचा ना !आता सुट्टीत मी पण तुला मदत करणार आहे.

” मी पण”,  छोट्याने ताईची री ओढली. मला मुलांचे खूप कौतुक वाटले.

आज मुली उच्च शिक्षण घेऊन घराबाहेर पडत सर्वच क्षेत्रात उत्तम करिअर करीत आहेत. सर्वोत्तम स्थान मिळवत आहेत. त्याचवेळी त्या घरातली जबाबदारीही नीटनेटकी पार पाडतात.ही दुहेरी कसरत त्यांना जमते.मग मुलांना का नाही जमणार?शिक्षणासाठी,  नोकरीसाठी परदेशी किंवा घरापासून लांब राहताना मुलांनाही घरातली सर्व कामे व्यवस्थितपणे करता आली तरच निभाव लागतोय. नाहीतर खूप हाल होतात.मुलांची कामे आणि मुलींची कामे अशी विभागणी आजकाल राहिलेली नाही.

म्हणूनच आज काळाची गरज झाली आहे की फक्त मुलींकडूनच नव्हे तर मुलांकडून सुद्धा घरातल्या सर्व कामांचा गृहपाठ गिरवून घेतला पाहिजे.उद्याची कुशल ‘आदर्श गृहिणी’ कशी बनेल या संस्कारातच मुलगी लहानाची मोठी होत असते.मुलांवर सुद्धा बालपणापासूनच हे कामाचे संस्कार होणे आवश्यक आहे. उद्याचा समंजस जोडीदार बनण्यासाठी आणि घराच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा.

“अग रेवा, या इकडे. मी दाखवते तुम्हाला दोघांना सफाई कशी करायची ते.”  असे म्हणत मी हातात झाडू घेतला.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares