मराठी साहित्य – विविधा ☆ तिळगुळ घ्या, गोड बोला ☆ श्रीमती सुधा भोगले
☆ मनमंजुषेतून ☆ तिळगुळ घ्या, गोड बोला ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
तिळगुळ घ्या, गोड बोला, संक्रांतीच्या सणाला तिळगुळ एकमेकांना देताना म्हणायचे गोड गोड शब्द! वर्षभरातील कटू आठवणींना विसरून जाऊन एकमेकात गोडी निर्माण करणारा सण! नवीन लग्न झालेल्या लेकीचा संक्रांतसण करण्यास मातेची केवढी धावपळ. जामातांना सणाला बोलवून त्यांना संक्रांतीचे दान करणे यात परंपरेचा भाग आलाच. बालगोपाळांचा बोरनहाण हा केलेला संस्कार, परंपरेचा व हौसेने करायचा सोहळा! उत्सवप्रियतेमुळे चारजणांनी एकत्र जमावे हेच खरे त्यामागील उद्दिष्ट.
असे आपले अनेक सण. त्यामागील संस्कार, काहीवेळा पौराणिक कथा आणि बहुतांशी आपल्या थोर भारतीय संकृतीतील विचार, आचार आणि परंपरा यांचा सुरेख संगम म्हणजे संक्रांतीसारखे सण होय. सणांनी आपले जीवन इतके व्यापून टाकलयं की त्यांची आपण आतुरतेने वाट पहात असतो. सणामुळे आपल्या जीवनात उत्साह, आनंद आणि क्रियाशीलता येते.
प्रत्येक सणामागे आणि धार्मिक कृत्यात दानाची अजोड अशी कल्पना असते. आपली संस्कृती त्यावरच आधारित असल्याने आपल्याजवळचे जे चांगले आहे, उत्तम आहे ते योग्य ठिकाणी देणे, यातून दात्यास सात्विक समाधान लाभते.
मकर संक्रणापासून देवांची रात्र संपून दिवस सुरु होतो. दिवस म्हणजे प्रकाश. इतके दिवस असलेली रात्र...