श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ४८ आणि ४९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.
भक्तीसूत्र ४८…
यः कर्मफलं त्यजति, कर्माणि संन्यस्यति, ततो निर्द्ंवद्वो भवति ॥४८॥
अर्थ : जो कर्मफलाचा त्याग करतो, सर्व कर्मांचाही त्याग करतो, त्यामुळे तो द्वंद्वरहित होतो, अर्थात मायेच्या पलिकडे जातो.
विवेचन : मागील सूत्रात जो योगक्षेमाचाही त्याग करतो, जो निर्मम होतो, संगांचा त्याग करतो तो मायेतून तरून जातो असे सांगितले, या सूत्रात आणखी तीन साधने सांगतात. प्रथम कर्मफलत्याग सांगितला आहे. या साधनाचा मागील साधनाशी संबंध आहे. मानवप्राणी हा या जगात येतो तो कर्ता म्हणून येतो. कर्तृत्वाबरोबर येणारा दुसरा धर्म म्हणजे कर्मफलाचे भोक्तृत्व हा आहे. कोणीही जे कर्म करत असतो ते निष्फळ जावे म्हणून करीत नाही तर त्याचे फळ भोगावयास मिळावे याच हेतूने करीत असतो. यासच फलासक्ती म्हणतात. अशा आसक्तीने मानव कर्मे करतो. जर फल न मिळेल अथवा त्या फलाची आसक्ती नसेल तर कर्मे करण्याकडे प्रवृत्ती होणे कठीण आहे, हे जरी खरे आहे तरी जीव जो कर्मात अडकतो तो या फलासक्तीमुळेच. मी कर्ता हा अभिमान म्हणून मीच या कर्माचे फळ भोगावे ही आसक्ती, यासच कर्माचा बंध म्हणतात, असे श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात.
“तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥”
(ज्ञान. १८. २०५)
या फलासक्तीतूनच पुढे रागद्वेषादी विकार, अनुकूल-प्रतिकूल भावना, इत्यादी निर्माण होतात. त्यातल्या त्यात संसारी माणसाची सकाम कर्माकडे विशेष प्रवृत्ती होते ती आणखीही बंधनाला कारण होते. मनुष्याला जन्ममरण प्रवाहात वाहत जावे लागते त्याचे कारणही हे कर्मफळच आहे. याचा परिणाम असा होतो की मनुष्य असो वा साधक जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. आणि मिळणाऱ्या प्रत्येक नव्या जन्मात पुढील जन्माची बेगमी करतो.
माउली म्हणतात,
वृत्ती{ऐ}सें मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥
(ज्ञान. १७. ५८)
ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्याला फलासक्ती ठेवता येणार नाही. कारण तोही एक मायापरिणामच आहे. म्हणून विवेकी साधक हळूहळू मायेच्या जाळ्यातून सुटण्याकरिता एक एक बंध तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच ‘कर्मफलंत्यजति’ याचा अंतर्भाव होतो.
कर्माचे चार प्रकार आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य व प्रायश्चित्त. त्यांत साधकाने काम्य कर्मे करू नये असे सांगितले जाते. ज्ञात-अज्ञात पातकक्षालनाकरिता प्रायश्चित्त कर्मे करावीत व नित्यनैमित्तिक कर्मे न केली तर प्रत्यवाय आहे, म्हणून ती टाकू नयेत. अशा प्रकारे जर कर्मे करील तर तो कर्मत्यागीच मानला जाईल. मात्र ती कर्मे निरहंकार वृत्तीने कर्तृत्वमद व फलाशा टाकून करावीत. प्रारब्धाने आलेली किंवा आपली विहित कर्मे अवश्य करावीत. त्यांचा त्याग करणे उचित नाही असे माउली म्हणतात.
“जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥ तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे ।वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥”
(ज्ञा. ३. ६४/६५)
तीन प्रकारचा कर्मत्याग गीतेमध्ये सांगितला आहे.
१. वेद, ईश्वर, परलोक यावर विश्वास न ठेवणारा तमोगुणी पुरुष अविवेकाने जो विहित कर्माचा त्याग करतो तो तमोगुणी त्याग होतो.
२. शरीराला फार कष्ट होतात, दुःख होते या भीतीने जो कर्मत्याग केला जातो त्यास राजस त्याग म्हणतात
३. जो मनुष्य/साधक आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म कर्तृत्वमद व फलास्वादाची अभिलाषा टाकून करतो त्यास सात्त्विक त्याग म्हणतात.
कर्मत्यागाचे एक सोपे सूत्र सांगता येईल. एखाद्या कंपनीत मनुष्य नोकरी करत असतो. तेथील अधिकारी जे काम त्याला सांगतो, त्यानुसार तो मनुष्य ते काम करीत असतो. त्या कामातून होणाऱ्या लाभहानीकडे त्याचे फार लक्ष नसते. सांगितलेल्या कामात आपल्याकडून छोटीशीही चूक होऊ नये याची दक्षता तो मनुष्य घेत असतो. ते काम त्याने चोख केले की मालक/अधिकारी त्याला मासिक पगार देतो. आणि त्या व्यवसायात त्या मालकाला नफा झाला तर तो दिवाळीला भेटवस्तू (बोनस) पण देत असतो. इथे आपण भगवंताला आपले मालक करावे, त्याच्याकडे नोकरी करावी असे करता आले तर आपले काम अधिक सोपे होईल असे वाटते. संसारातील लाभ हानी स्वाभाविकपणे भगवंताची होईल. आपण त्यातून अलिप्त होऊ शकू. थोडक्यात मनुष्याने भगवंताच्या हातचे उपकरण बनून जावे. त्याला म्हणावं तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन. एकदा कर्तेपण भगवंताकडे दिले (अगदी मनापासून) की लाभहानी हा विषयच रहात नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच दाई सारखा करावा आणि परमार्थ आई सारखा करावा.
मायेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणिक एक त्याग करावा लागतो, त्याचा विचार पुढील सूत्रात पाहू.
जय जय रघुवीर समर्थ
– –
भक्तिसूत्र ४९
वेदानपि संन्यसति, केवलमविच्छिन्नानुरागं लभते ॥ ४९ ॥
अर्थ : जो वेदांनी सांगितलेल्या विधिनिषेधात्मक कर्मसमूहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या उत्तरोत्तर वाढ शुद्ध, अखंड, एकरस प्रेमाचा लाभ होतो. अर्थात, तो मायेपासून मुक्त होतो.
विवेचन: मागील सूत्रात कर्मफले व ती प्राप्त होण्याकरिता केली जाणारी विहित कर्मे यांचाही तो भक्त त्याग करतो असे सांगितले आहे.
वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांचे प्रामुख्याने चार अंगे आहेत. पहिले अंग आहे संहिता. दुसरे अंग आहे ब्राह्मण ग्रंथ आणि तिसरे आहे आरण्यके. चौथे आहे वेदांत.
संहितेमध्ये वेदकालीन देवतांचे मंत्र आले आहेत. ब्राह्मण ग्रंथात विविध यज्ञाबद्दल माहिती आलेली आहे तर तिसऱ्या भागात अर्थात आरण्यकात भगवंतासंबंधी चिंतन करून जे अनुभव घेतले, त्याचा उहापोह इथे आढळतो. चौथे आहे वेदांत, यात उपनिषदे येतात. या चारी अंगाचा अभ्यास अनेकांनी केला, पण वेदांचा अभ्यास केला, सर्व वेद तोंडपाठ केले म्हणून त्यांंना भगवंताची प्राप्ती झाली असे होत नाही. तर त्यातील मर्म लक्षात घेतले पाहिजे. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज सांगतात की साधकांमध्ये एक दुर्गुण अवश्य येतो. त्याला परमार्थ छान बडबडता येतो. एक उदा. पाहू. चार धाम यात्रेला जाण्यासाठी एक जण रेल्वेचे तिकीट काढायला गेला. त्याने तिकीट काढले. त्या तिकीट देणाऱ्या माणसाने त्या मनुष्याला चार धाम यात्रेचे संपूर्ण वर्णन करून सांगितले. तसेच कुठे काय करावे? कुठे खरेदी करावी? कोणते हॉटेल स्वस्त आहे? धर्मशाळा कुठे आहेत? ते सर्व सांगितले. या मनुष्याने त्या तिकीट देणाऱ्या मनुष्याला सहज प्रश्न केला की तुम्ही बरेच वेळा यात्रा केलेली दिसते. तर तो तिकीट विकणारा म्हणाला मी एकदाही यात्रा केली नाही. लोकांनी सांगितलेल्या माहितीवरून मी हे सर्व तुम्हाला सांगू शकलो. नुसती माहिती झाली म्हणून उपयोग होत नाही.
वेदांचा, अभ्यास करून मनुष्य नुसती पोपटपंची करणार असेल, तर त्याचा काय उपयोग? त्यात अनुभूती असणे अत्यंत महत्वाचे. इथे तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो.
“वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।”
संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे.
“वेद अनंत अनंत बोलिला । अर्थ इतुकाचि साधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावें ॥२॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुकाचि निर्धार ॥३॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हाचि होत ॥४॥”
कोणतेही तत्व नुसते पाठ करणे अपेक्षित नाही. तर त्याची अनुभूती घेतलेली असावी. तरच ते आपल्याला कळले असे होते. बाळ नीट चालायला शिकेपर्यंत पांगुळगाडा वापरतो. याच नियमाप्रमाणे ज्ञान प्राप्त करेपर्यंत ‘पांगुळगाडा’ वापरणे अपेक्षित आहे. आणि थोडे अधिक मोठे झाल्यावर त्या ‘पांगुळगाड्या’चा अभिमान न धरता त्याचा त्याग करणे अधिक उचित आहे.
राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे रंग. अनु म्हणजे मागे जाणे, अथवा… ला शोभणे. भक्ताचे भगवंतावरील प्रेम वाढत जाते, तेव्हा त्याला प्रेमाचा रंग लागला असे म्हटले जाते. भक्त मिरेला कृष्ण भक्तीचा रंग लागला होता, असे म्हटले जाते. साधकाचे असेच व्हावे. *या प्रेमाला अनुराग असे म्हणतात. भिंतीला रंग लागला की आधीचे रंग संपूर्णपणे नष्ट होत असतात. अर्थात त्या साधकाच्या वासना निर्बीज होत असतात.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
“प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥ मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरीभक्ती । जाले वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥२॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरीचे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥३॥ हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरीजना ॥४॥”
(अभंग क्रमांक ११५६, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
असे प्रेम प्रत्येकाला लाभावे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना.
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






