श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “‘वाघनख’ – – NOM DE GUERRE!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
कर्नल विश्वासराव शिंदे
दैत्य हिरण्यकश्यपला मारायला नृसिंह अवतारात देवाला हातांच्या बोटांच्या नखांचा वापर करावा लागला… असाच एक राक्षस कलियुगात जन्माला आला होता… यावेळी त्याने ‘अफझल’ म्हणजे ‘श्रेष्ठ(? )’ असं नाव धारण केलं होतं! कलियुगातल्या नृसिंहानेही अर्थात स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांनीही नखांनीच अफझलची आतडी बाहेर काढून त्याला यमसदनी धाडले! फक्त ही नखं महाराजांच्या हातांच्या बोटांची नव्हती… बोटांमध्ये अंगठीसारखी घातलेली… धातूची होती! माजलेल्या अफजलचं पोट फाडायला मानवी नखं पुरेशी ठरली नसती… म्हणूनच धातूच्या वाघनखांची योजना महाराजांनी केली होती! हे छोटंसं शस्त्र डोंगराएवढा शत्रू मातीत घालायला पुरेसे ठरले होते!
वर्ष १९८५. भारतीय सैन्यात मराठा लाईट इन्फंट्रीची २१वी बटालियन उभारण्यात आली… भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्सचा विचार करता ही बटालियन तशी ‘तरुण’ किंवा नवी कोरी म्हणावी अशी होती. सीमापारचे शत्रू तर आहेतच, परंतू देशांतर्गत शत्रू सुद्धा काही कमी नाहीत. उत्तर-पूर्वेकडे देशाला विशिष्ट असा शेजार लाभलेला आहे. विघटनवादी शक्ती या देशांच्या सीमावर्ती भागांत तसेच त्यांच्या सीमांत लपून भारताविरोधात सशस्त्र कारवाया करीत असतात.
घनदाट जंगले, हिंस्र श्वापदे, विषारी कीटक, सततचा पाऊस यांची पर्वा न करता या भागांत आपल्या सैनिकांना काम करावे लागते. इथं समोरासमोरची लढाई लढली जाऊच शकत नाही. इथं आवश्यकता आहे गनिमी काव्याची… गुरील्ला पद्धत! गनिम-ई-कावा म्हणजे शत्रूचे हुलकावणी देणारे युद्ध आणि गुर म्हणजे युद्ध आणि ईला म्हणजे छोटे… छोटे युद्ध! यामागे कमी संख्येत, अचानकपणे प्रकट होत मोठ्या सैन्यावर वायुवेगाने हल्ला करून निघून जाणे, अशी पद्धत असते. आणि हीच पद्धत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा प्रमुख भाग होती, असं दिसून येतं.
१९९०. उत्तर भारतात वाढता विघटनवाद लक्षात घेऊन खास उत्तर-पूर्वी राज्यांसाठी असं स्वतंत्र दल उभारण्याची गरज भासली. त्यावेळी लेफ्टनंट जनरल विजय ओबेराय (सेवानिवृत्त) त्यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल होते आणि त्यांच्याकडे एक बटालियन स्पेशल फोर्स म्हणून प्रशिक्षित करण्याचे दायित्व दिले गेले… त्यांनी २१वी बटालियन निवडली!
गुरील्ला पद्धतीच्या युद्धासाठी सैनिकांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देणे अनिवार्य असते. म्हणून प्रशिक्षणाचा स्तर अत्युच्च ठेवावा लागतो. या दलाचे नावच स्पेशल फोर्सेस अर्थात विशेष सामर्थ्य असणारी दले असे आहे. भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती होणे हीच मोठी कठीण बाब असते. स्पेशल फोर्सेस मध्ये या भरती झालेल्या, प्रशिक्षित सैनिकांनाच सहभागी करून घेतले जाते. विविध रेजिमेंटस, बटालियन्स मधील सैनिक आणि अधिकारी या दलांत प्रवेश करण्यासाठी स्वयंप्रेरणेने येतात… कारण यांत निवड म्हणजे एक मोठा बहुमान समजला जातो!
प्रशिक्षण कालावधी तीन ते पाच महिन्यांचा असू शकतो. यात पहिले पस्तीस दिवस सततचे शारीरिक प्रशिक्षण, डोळ्यांवर पट्टी बांधून एकत्रित येऊन कवायती करणे इ. चा समावेश तर असतोच. त्याचबरोबर स्वयंपाक करणे, संदेशवहन प्रशिक्षण, इमारती उध्वस्त करणे, तातडीचे वैद्यकीय सहाय्य देणे, अंधारातून, पाण्यातून, जंगलातून रस्ते शोधणे, आणीबाणीच्या स्थितीत अन्न, पाणी शोधणे, विषारी प्राणी हाताळणे आणि शस्त्रे चालवणे. चार चार दिवस पिण्याच्या पाण्याशिवाय राहणे, एक लिटर पाण्यावर तीन दिवस काढणे, सात सात दिवस न झोपता काम करीत राहणे! पाठीवर किमान दहा किलो वजन बाळगणे तर नेहमीचे. चालणे तर असतेच परंतू संपूर्ण युद्धसामग्री घेऊन दहा ते चाळीस किलोमीटर्स चालणेसुद्धा नेहमीचे. विविध भाषा गरजेनुसार शिकवल्या जातात. सैन्यात भरती होताना आणि पुढे प्रत्यक्ष सेवेत खडतर आयुष्य जगत असलेले सैनिकही या प्रशिक्षण सोडून जाण्याचे प्रमाण मोठे असते. प्रशिक्षणाच्या या टप्प्यावर प्रशिक्षण सोडून जाण्याचे प्रमाण सुमारे वीस टक्के असते.
पंचेचाळीसाव्या दिवसापासून आणखी कठीण टप्पा येतो. छत्तीस तास सतत व्यायाम, कसरत करणे, शत्रूच्या प्रदेशात घुसणे तिथून बाहेर पडणे याचा सराव, तीस किलोचे युद्धसाहित्य, चाळीस किलोचे इतर साहित्य घेऊन चालणे दहा किलोमीटर्स वेगाने चालणे, चाळीस ते पंच्याऐंशी किलो वजनाच्या जड वस्तू हलवणे, इकडून तिकडे घेऊन जाणे, पाण्यात बुडी मारून राहणे शिकवताना हात पाय बांधले जातात, पाण्यासंबंधी प्रशिक्षणात पहिल्या सोळा तासांत पिण्यासाठी पाण्याचा एक थेंब किंवा अन्नाचा एक कण दिला जात नाही. आणि या अवस्थेत स्मरण शक्ती, निरीक्षण शक्तीची परीक्षा घेतली जाते. हे झाल्यावर पुन्हा दहा किलोमीटर्स चालणे, सहा तास व्यायाम करणे, शत्रूवर छापा घालणे, जंगलात वास्तव्याची तयारी करणे, जखमी सैनिकांना संकटातून घेऊन येणे इत्यादी इत्यादी गोष्टी सर्वसाधारणपणे शिकवल्या जातात.
५६व्या दिवशी, सतरा किलो वजन घेऊन १०० किलोमीटर्स अंतर चालणे… यासाठी तेरा ते पंधरा तासांचा वेळ लागू शकतो… शिवाय इतर आणखीही प्रशिक्षणे असतात… प्रत्येक मिनिट आणि मिनिट शिकत राहावे लागते… आणि शेवटी अतिरेकी विरोधी कारवाईचे आव्हानात्मक प्रशिक्षण दिले जाते. वाळवंट, बर्फाळ प्रदेश, जंगली प्रदेश, पर्वतीय प्रदेश यांमधील कारवायांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम असतातच. शिवाय विमानातून उडी घेत शत्रू प्रदेशात शस्त्रे घेऊन उतरणे हा भागही असतोच…
एवढे सर्व केल्यावरच Maroon Berete प्राप्त होते… काचेच्या पेल्यातील पेय पिऊन झाल्यावर त्या प्याल्याचा तुकडा चाऊन खाल्ला की प्रशिक्षण पूर्ण केले असे समजले जाते. आणि मगच स्पेशल फोर्सेसचा लढवय्या तयार होतो! परंतू सर्वांत महत्वाची बाब म्हणजे स्वत:ची ओळख लपवून म्हणजे जवळजवळ अदृश्य राहूनच या योद्ध्यांना कामगिरी करावी लागते… They don’t exist so that we can! अर्थात इतरांसाठी ते अस्तित्वात नसतातच. पण त्यांचे हे अस्तित्वात नसणे हे देशातील नागरीकांच्या अस्तित्वात राहण्यासाठी असते!
२१ मराठा चे रुपांतर स्पेशल फोर्समध्ये करण्याचे ठरल्यावर निवड चाचणी झाली. सुमारे दोनशे सैनिक आणि काही अधिकारी स्वयंस्फूर्तीने पुढे आले. यांपैकी केवळ १७ टक्के लोकच प्रशिक्षणात टिकले! विशेष बाब म्हणून इतरांना दुसरी संधी देण्यात आली… तरीही हे प्रमाण पंचवीस टक्क्यांच्या वर जाऊ शकले नाही… इतके प्रशिक्षण जबर होते!
२१ मराठा मध्ये त्यावेळी लेफ्ट. कर्नल राजीव परमार नावाचे अनुभवी उप-प्रमुख अधिकारी कार्यरत होते. चाळीस वर्षे वय असलेले परमार साहेब पदोन्नती घेऊन इतर बटालियन, रेजिमेंटमध्ये जाऊ शकले असते… पण जिथे माझे सैनिक तिथेच मी असेन या दृढ संकल्पामुळे परमार साहेबांनी स्पेशल फोर्समध्ये स्वयंप्रेरणेने नाव नोंदवले… प्रशिक्षणात पद आणि अनुभव याचा विचार न करता सर्वांना समान प्रशिक्षण घ्यावे लागते… या कठीण प्रशिक्षणादरम्यान परमार साहेबांना मृत्यूने गाठले!
२१ मराठाचे स्पेशल फोर्सेस दलात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी रत्नागिरीतल्या मोरावणे गावात जन्मलेल्या कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांच्या समर्थ खांद्यांवर देण्यात आली. कर्नल शिंदे यांच्या रूपाने त्यांच्या घरातील ही पाचवी पिढी सैन्यात कार्यरत होती. त्यांचे वडील श्री. भास्करराव शिंदे Bombay Sappers मध्ये होते किंबहुना त्यांनीच Bombay Sappersची ४११, Para Field Company उभारली होती!
कर्नल विश्वासराव शिंदे साहेबांनी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून पदवी घेऊन पुढे Indian Military Academy, देहरादून येथे सैन्याधिकारी प्रशिक्षणास प्रवेश मिळवला व त्यातून ते १९७२ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या १४व्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. सध्या सेवानिवृत्त असलेल्या शिंदे साहेबांनी वयाच्या ६८व्या वर्षी विमानातून १५०० फुटावरून parachute jump करून दाखवली होती. अशा अनेक कामगिरी त्यांच्या नावावर आहेत. विविध पदांवर सेवा बजावलेल्या कर्नल शिंदे साहेबांनी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष दलास प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अत्यंत प्रभावीरीत्या पार पाडलेली आहे!
२१ मराठा बटालियन स्पेशल फोर्स मध्ये रुपांतरीत करण्यासाठी शिंदे साहेबांनी पूर्ण ताकदीनिशी काम केले… आणि सामान्य जवानांतून विशेष योद्धे निर्माण केले.. आणि या शेकडो जवानांनी, अधिका-यांनी मणिपूर, म्यानमार सीमा इत्यादी ठिकाणी अनेक बलिदाने देत जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करून म्यानमारमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांचा शोध घेऊन म्यानमार मध्ये घुसून त्यांना संपवण्याची कामगिरी या फोर्सने २०१५ मध्ये केली होती… Surgical Strike नावाने ही मोहीम प्रसिद्ध आहे. एखादा टोकदार भाला जसा अजिबात आवाज न करता थेट, अचूकपणे लक्ष्य भेदतो… यात चूक करण्याची सुतराम संधी नसते… त्याला Silent Spear म्हणतात… म्हणूनच या २१ स्पेशल फोर्सळा Silent Spear असंही म्हणतात. २०२३ पर्यंत सुमारे ३३ जवान, अधिकारी यांनी या प्रदेशात बलिदान दिले असून तीन कीर्ती चक्रे, १७ शौर्य चक्रे, ५४ सेना मेडल्स, १९५ उत्कृष्ट कामगिरी प्रशस्तीपत्रके अशी कमाई केलेली आहे. होय, शौर्यासाठी मिळवलेली पदके, पारितोषिके मोठ्या अभिमानाने सांगितली जातात… पण यासाठी प्राणांचे बलिदानही द्यावे लागते!
देशासाठी बलिदान देणारे हुतात्मा कर्नल संतोष महाडिक हे याच दलाचे अधिकारी होते. प्रसिद्ध सैन्याधिकारी ब्रिगेडीअर सौरभ सिंग शेखावत (निवृत्त) यांनी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात मोठी कामगिरी करून दाखवल्याचे सर्वश्रुत आहेच!
भारतीय सैन्यातील या स्पेशल फोर्सेस वेगवेगळ्या टोपणनावांनी (moniker) ओळखल्या जातात, त्यांची स्वत:ची परिचय-चिन्हे आहेत. Red Devils, Predators, Russel’s Vipers, Mighty Daggers, Pirates, Mountain Rats, Desert Scorpions, Vipers, Dirty Dozens अशी ही विविध नावे आहेत… याला Nom De Guerre असं संबोधन आहे. म्हणजे युद्धातलं नाव. २१ मराठा बटालियनच्या स्पेशल फोर्सचं असं नाव देण्याची वेळ आली तेंव्हा कर्नल विश्वासराव शिंदे साहेबांनी एक मराठी, आगळंवेगळं आणि अत्यंत अभिमानास्पद नाव सुचवलं… वाघनख!
जय हिंद! जय हिंद की सेना!
माहिती संकलक व लेखक : संभाजी बबन गायके.
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




