सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

💐 अ भि नं द न 💐

ललित कला फाऊंडेशन ठाणे. आयोजित साहित्य पुरस्कार सोहळा दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी के. आ. बांठीया विद्यालय सिडको सेक्टर १८ नवीन पनवेल येथे संपन्न झाला. रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी, ज्येष्ठ साहित्यिक माननीय अशोक श्रीपाद भांबुरे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक सेवेच्या सन्मानार्थ, ललित कला साहित्य पुष्प पुरस्कार,  मा. ए. के. शेख व मा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री अशोक श्रीपाद भांबुरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.! .💐

आज त्यांची कविता “फसली आशा” प्रकाशित करीत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 283 ?

☆ फसली आशा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

आज जीवनी उरली नाही कसली आशा

वाट पाहुनी किती उशीरा निजली आशा

*

तिला वाटले उद्या सुखाचा दिसेल तारा

दिव्यत्वाचे स्वप्न पाहुनी चुकली आशा

*

बरेच काही बोलायाचे होते बाकी

कुठे बोलली मुकाट होती बसली आशा

*

बोली होती तिची लागली या बाजारी

अर्ध्या किमती मधेच गेली विकली आशा

*

हिरवी झाली कधीच नाही शेतीवाडी

सुकून गेले स्वप्न बावरे सुकली आशा

*

मृगजळ दिसले धावत गेली त्याच्या मागे

आभासाच्या जलाशयाला फसली आशा

*

तारुण्याचा बहर तसा तर शिल्लक होता

तारुण्यातच अशी कशी ही खचली आशा

☆

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted