कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # ३०६ – विजय साहित्य
☆ मृत्यू नंतर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अक्षर छंद – १७ अक्षरी द्विपदी. वीस ओळी.)
☆
मृत्यूनंतर, यमलोकाचा,
प्रवास होतो, सुरू
आठवणींना, काळीज वेडे,
पहा लागते, स्मरू.
*
यमदूताच्या, सवे निघाली,
आत्म ज्योतीची, यात्रा
तिथे न चाले, कलेवरी त्या,
इहलोकीची, मात्रा.
*
मृत्यू नंतर, हिशेब होतो,
पदा पदांचा, जेव्हा
गंगा यमुना, गालावरती,
खळाळ धावे, तेव्हा…!
*
नश्वर देहा, सोडून जाते,
व्यक्ती लाडकी, जेव्हा
प्रवास चालू, परलोकीचा,
आज्ञातातील, तेव्हा.
*
मृत्यू नंतर, सरते सारे,
उरे न काही, मागे
आप्त मंडळी, करती चर्चा,
आठवणींना, जागे
*
मृत्यू नंतर, फिरतो आत्मा,
मागे उरते, माया
दहा दिसांनी, पिंडदान ते,
श्रृती स्मृतींची, छाया.
*
आला एकटा, जाई एकटा,
कैक जोडली, नाती
काळ घेऊनी, पहा धावतो
कुणा न लागे, हाती.
*
मृत्यू नंतर, कुणी पाहिला,
प्रवास ज्याचा, त्याचा
ज्ञात क्षणांनी, कर्म फलाचा
संचीत केला, साचा.
*
असा प्रवासी, सखा सोबती,
दूर देशी त्या, राही
हळव्या नेत्री, दुनिया त्याची,
कशी वागते, पाही.
*
अंतरातले, आभास त्याचे,
पहा सांगती, काही
संपून गेला, प्रवास आता,
मागे फिरणे नाही.
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




