कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # ३०७ – विजय साहित्य
☆ मित्र…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(सोळाक्षरी द्विपदी…)
☆
दुःख जाणूनीया माझे,भाव मनीचे वाचतो,
ओठांवरी हास्य सदा, मन माझे सावरतो…!
*
शब्द तुझे आश्वासक,वादळात देतो साथ
जेव्हा उरतो एकटा, तुझ्या आठवांची बात…!
*
तेज किरणांचे होतो, हरवून जातो जेव्हा
“आहे मीच तुझ्या सवे!” बोल ऐकवीतो तेव्हा…!
*
शिकवतो जगायला, देतो आधाराचा हात
दुःख येता माझ्या दारी, होतो मदतीचा हात…!
*
मित्रा तुझे रूप असे, नाही शब्दातीत खेळ
सुख दुःख भावनांचा, आहे भावस्पर्शी मेळ…!
*
वेदनांचे दोन थेंब,जेव्हा दिसती डोळ्यात
डोळे पुसण्याला येतो, शब्द धावत ओठांत..!
*
कधी चुका माझ्या झाल्या कधी वाटाच चुकल्या
रागावल्या दुरावल्या, नाही मैत्रीस मुकल्या…!
*
काळ जरी हा सरला,गेलो मित्रा दूर जरी ,
आपुलकी विश्वासाची बरसेल वर्षा उरी…!
*
जीवनाच्या सायंकाळी, नाही कुणावर रोष
अनुभवे आकळला, सारा स्वभावाच्या दोष…!
*
मैत्र आणि मैत्रीतला, तूच अनवट सेतू
शब्दाविना जाणतोस अंतरीचे सारे हेतू…!
*
धागा कधी न तुटतो, असा जरतारी शेला
सांभाळतो श्रृती स्मृती अनुराग, अलबेला…!
*
देवाकडे मागतो मी,”हात” तुझा हाती हवा
जन्मोजन्मी तूच मित्रा, दिठी मिठीत दिसावा…!
*
निरोपाचा नाही शब्द, माझ्या हृदय कोषात
तुझे संजीवन मित्रा, आठवांच्या आरशात…!
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





