श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – भवसिंधूचे हेचि तारू… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
कोणाच्या आधारें करूं मी विचार/
कोण देईल धीर माझ्या जीवा//१//
*
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक /
यातिशुद्ध एक ठाव नाहीं//२//
*
कलियुगीं बहु कुशळ हे जन /
छळितील गुण तुझे गातां //३//
*
मज हा संदेह झाला दोन्हीं सवा /
भजन करूंं देवा किंवा नको //४//
*
तुका म्हणे आतां दुराविता जन /
किंवा हे मरण भले दोन्ही//५//
☆
– संत तुकाराम.
तुका म्हणे
आपल्या सभोवताली निर्माण झालेले सामाजिक वातावरण पाहून त्याच्या वर वैतागलेले तुकाराम महाराज देवालाच म्हणतात. अशा या जाचातून जाणा-या कठीण काळात कोणाच्या आधारावर कोणता विचार करू? या नाजूक वेळी मला कोण आधार देईल. मी कोणी फार मोठा शास्त्रज्ञ पंडित किंवा वाचकही नाही. तसेच मी उच्च कुळात जन्मलो की नाही नाही हेही मला निपटणे ठाऊक नाही.
या कलियुगात लोक फारच कुशल, हुशार आणि चाणाक्ष झाले आहेत. मी तुझे गुणगान करतो. तुझी मनोभावे पूजा करतो. केवळ तुझेच नामस्मरण करतो. म्हणून त्यांनी माझा छळवाद मांडला आहे. म्हणूनच माझ्या मनात त्यांच्या विषयीचा संदेह आणि संशय आता बळावत चालला आहे. तेव्हा मी तुझे भजन पूजन आणि नामस्मरण करावे की नको हे आता तूच मला सांग. माझ्या मनाला आता कठीण पेच पडला आहे. मी हे माझे कार्य बंद केले तर जन लोकांसोबत जोडलेला माझा संपर्क हरवून बसेन. लोक माझ्यापासून दूर जातील ते मला नको आहे. तुझे नामस्मरण बंद करणे आणि जनलोकांपासून दूर जाणे या दोन्ही गोष्टी मला मरणा सारख्याच वाटतात. आता या पेचातून तुझ्या वाचून माझी सुटका कोणीही करू शकत नाही. तुकाराम महाराजाना छळणा-या लोकांच्या होणा-या त्रासामुळे ते किती हैराण झाले होते हे यावरून कळते. म्हणूनच त्यांनी आपली व्यथा इतरांना न सांगता ती प्रत्यक्षात देवापुढेच मांडली आहे.
– संत तुकाराम.
*
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






