श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन” – लेखिका : श्री रमेश पतंगे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन
लेखक: रमेश पतंगे
पृष्ठ: १३६
मूल्य: २५०₹
प्रस्तावना : मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ विचारवंत, पद्मश्री रमेश पतंगे हे सिद्धहस्त लेखक आहेत. सामाजिक समरसता चळवळ आणि राष्ट्रीय विचारांची पत्रकारिता यासाठी रमेशजींनी दीर्घकाळ काम केले. ‘साप्ताहिक विवेक’चे साक्षेपी संपादक म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्राचा सामाजिक-राजकीय कृती आराखडा तयार करण्यासाठी विपुल लेखन केले आहे. मागील दहा वर्षांपासून रमेशजी पतंगे ‘भारतीय संविधान’ या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन करीत असून आतापर्यंत त्यांची संविधान विषयातील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याच लेखनमालिकेत नव्या पुस्तकाची भर पडली असून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे पुस्तक आता उपलब्ध झाले आहे.
संविधान म्हटले की, कायद्याचे पुस्तक, सर्वसामान्य नागरिकांचा संविधान विषयाशी फार संबंध येत नाही; पण रमेशजींचे वैशिष्ट्य असे की, याआधीच्या पुस्तकाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन या पुस्तकातून कायद्यांच्या संकल्पना सोप्या भाषेत उलगडून सांगितल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून आणि सामाजिक न्यायाच्या परिवर्तनशील विचारांतून आकाराला आलेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे भक्कम अधिष्ठान आहे. भारतीय संविधानाने कोणती क्रांती केली? या प्रश्नाचे उत्तर रमेशजींनी या पुस्तकात सोप्या पद्धतीने दिले असून ‘समान मत-समान पत’ (प्रत्येक मताचे समान मूल्य) ही संकल्पना उदयास येण्यासाठी संविधान सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. रमेशजींनी आपल्या पुस्तकात यावर सविस्तर चर्चा केली आहे. आपण जेव्हा भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा इतिहास अभ्यास करतो तेव्हा, असे लक्षात येते की, देशाला स्वातंत्रच मिळणार हे स्पष्ट दिसत असताना १९४६ मध्ये भारताच्या संविधान निर्मितीसाठी समिती गठीत करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून या समितीमध्ये निवडले गेले. देशाची फाळणी झाल्यानंतर मुंबई प्रांतातून त्यांना निवडून आणण्यासाठी डॉ. राजेंद्रप्रसाद व मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी प्रयत्न केले. असे असले तरी आपला भारत एकात्म आणि समतायुक्त असायला हवा, याबाबतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतन १९१९ पासून सुरू झाले होते. ब्रिटिश सरकारने पाठवलेल्या विविध कमिशनसमोर डॉ. बाबासाहेच आंबेडकरांनी ज्या साक्ष दिल्या आहेत, त्यांचा आढावा घेऊन या पुस्तकात रमेशजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अलौकिक बुद्धिमत्ता आणि समाजचिंतन अधोरेखित केले आहे.
नव्याने स्वतंत्र्य होणाऱ्या भारत देशाच्या नागरिकांना नवीन ओळख देणारे संविधान साकार करताना आपली सामाजिक, धार्मिक परिस्थिती काय आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीच विसरले नाहीत. शतकानुशतके अन्याय आणि विषमतेच्या जोखडाखाली दबलेल्या समाजाला मुक्तीची दिशा देताना आणि नव्या राष्ट्राची पायाभरणी करताना जे मूल्याधिष्ठित मार्गदर्शन आवश्यक होते, ते आपल्या संविधानाने दिले. ही मूल्याधिष्ठित व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून निर्माण करताना आपल्या देशातील समाज जीवन आणि इतिहास यांचा सुक्ष्म अभ्यास असणाऱ्या एकात्मिक समाज्याची आवश्यकता कायद्याच्या चौकटीत पूर्ण केली. संबिधान सभेतील शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, ‘आपण अनेक वेळा पारतंत्र्यात गेलो कारण आपण संघटित नव्हतो. ‘ संघाटित समाज हा स्वतंत्र देशाचा आधार असणार आहे. हे भविष्यवेधी चिंतन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आहे. आज भारत एक स्थिर, सक्षम आणि प्रगतिशील राष्ट्र म्हणून जगात उभा आहे, त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक चिंतनाची ठाम पायाभरणी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते. अनेक देशांच्या संविधानाचा त्यांचा अभ्यास होता. एखादा कायदा करताना त्यासंदर्भात अन्य देशात काय विचार केला होता. येथे आपण काय विचार केला पाहिजे. यासंबंधी त्यांनी दीर्घ चर्चा केली आहे भारतीय समाजरचना, परंपरा आणि विविधतेचा सखोल अभ्यास असणाऱ्या मूल्यांचा समन्वय साधण्याची अद्वितीय क्षमता प्रदान करणारे संविधान निर्माण करताना आपली विद्वत्ता पणाला लावली होती. दीर्घ चिंतन, व्यापक अभ्यास आणि अनुभवाच्या आधारे तयार झालेल्या या संविधानाने सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेची मूल्यव्यवस्था इतक्या प्रभावीपणे मांडली गेली की, वंचित, शोषित आणि दलित घटकांना नवसंजीवनी मिळाली आणि भारतीय लोकशाही अधिक बळकट झाली. याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे.
आपले संविधान हा केवळ एक स्थिर दस्तऐवज नाही; तर तो काळानुसार विकसित होणारा, बदलत्या परिस्थितींना सामोरे जाणारा आणि समाजाच्या गरजांनुसार स्वतःला परिष्कृत करणारा जिवंत दस्तऐवज आहे. शासनव्यवस्थेला दिशा देणारे आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणारे हे एक प्रभावी साधन आहे. सामाजिक न्याय, समान संधी, उत्तरदायी प्रशासन आणि लोकशाहीतील सक्रिय सहभाग या मूल्यांचे संरक्षण करण्यामध्ये संविधानाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी स्पष्ट करून आपले संविधान हे मानवकेंद्री आहे हे आग्रहाने सांगितले आहे.
आज भारत विकासाच्या विविध क्षेत्रांत प्रगती करत असला, तरी त्या प्रत्येक पावलामागे संविधानिक चौकटीचे भक्कम अधिष्ठान आहे, ही जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आपल्या संवैधानिक जाणिवा अधिक प्रबळ करण्याची ही वेळ असून सर्वसामान्य नागरिकांसोबत राजकीय क्षेत्रात, प्रशासन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींनी संविधानाचा गाभा समजून घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रमेश पतंगे यांच्या या पुस्तकातून संविधानाकडे पाहण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सखोल आणि चिंतनशील दृष्टिकोन आपल्यासमोर मांडला जातो. या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा सर्वांना उपयोग होईल, असा विश्वास वाटतो.
संविधानाविषयी व्यापक जनजागृती होणे हीच सशक्त लोकशाहीची खरी गरज आहे. ही जनजागृती करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या दीर्घ चिंतन व परिश्रमांना आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे. हे पुस्तक त्यादृष्टीने खूप महत्त्वाचे असून ते प्रत्येक नागरिकासाठी, कार्यकर्त्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास वाटतो.
1949 साली संमत झालेल्या संविधानाच्या अनेक कलमांविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१९ पासून केलेले मूलगामी चिंतन…
* दुभंगलेल्या समाजाला एकजिन्सी करण्यासाठी संवैधानिक कायद्याचा मार्ग कसा आखून दिला.
* संवैधानिक मूल्यांना संविधानाच्या भाषेत कशी दिलेली उत्तरे…
* विविधतेने नटलेल्या देशाला बांधून ठेवण्याचे महाकठीण काम संविधानाच्या माध्यमातून कसे केले…
* भारतीय संविधान हे जीवंत दस्तऐवज आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे मांडले…
– – या सर्वाची सहज सोप्या भाषेत या पुस्तकातून मांडणी करण्यात आली आहे.
– – कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी आणि प्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे पुस्तक
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







