श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “हलक्या डोक्याचे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
प्रसंग एक :
सकाळची वेळ, किचनमध्ये स्वयंपाकाची गडबड. आईनं पोहे प्लेटमध्ये ठेवून दहा मिनिटं झाली. तीन-चार वेळा हाका मारल्या पण अंकितानं एकदाही उत्तर दिल नाही. तेव्हा संतापलेल्या आईनं हातातला मोबाइल हिसकला. अंकिताला भयंकर राग आला. आईवर मोठ्या आवाजात खेकासली “काय कटकट ये. फोन दे”
“देणार नाही. उठून तास झाला. फोनमध्येच तोंड घालून बसलीयेस. बाकी काही काम नाही. खाऊन घे. ”
“मला भूक नाही. फोन दे महत्वाचं काम आहे. ”
“रील्स पाहून पोट भरणार नाही. तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. ”
“माझं मी बघेन. उगीच डोकं फिरवू नकोस. फोन दे नाहीतर.. ”
“काय करशील”आईनं म्हटल्यावर राग अनावर झालेल्या अंकिता जोरात किंचाळत हाताला येईल त्या वस्तू फेकल्या. वाट्टेल ते बडबडत थेट आईच्या अंगावर धावून गेली. लेकीचं अनपेक्षित वागणं पाहून प्रचंड धक्का बसलेल्या आईनं फोन पुढे केला. अंकितानं झडप घालून फोन घेतला “परत माझ्या फोनला हात लावलास ना तर बघ. ”आईच्या डोळ्यात पाणी आलं त्याचवेळी अंकिता रील्स पाहत हसत होती.
प्रसंग दोन :
दुपारची वेळ असल्यानं गाड्यांची वर्दळ कमी होती. उड्डाणपूलावरून स्कूटरस्वार हेल्मेटधारी सुधीर चाललेला. अचानक विरुद्ध दिशेनं तूफान वेगानं येणाऱ्या बाईकला पाहून सुधीर गडबडला. कशीबशी टक्कर टाळली पण दोघंही तोल जाऊन पडले.
“का फुकट मरतोस. जरा नीट चालव की, ”चिडलेला सुधीर ओरडला. बाइकवाला भडकला.
“ए, xxxxx काय बोल्ला”
“तुला मरायचं तर एकटा मर. दुसऱ्याला का घेऊन जातोय. गाडी अशी चालवतात का? ”
“गाडी कशी चालवायची हे सांगणारा तू कोण?? माजं मी बगेन. रस्ता काय तुझ्या बापाचाय का? ”
“मग तुझ्या बापाचा आहे का? . एकतर रॉन्ग साइडनं आलास. वर माज दाखवतो”सुधीरच्या बोलण्यानं भडकलेला बाईकवाला अंगावर धावून आला. तेव्हा इतर गाडीवाल्यांनी मध्ये पडत दोघांना शांत केलं.
“गप जा. डोकं फिरवू नकोस. ”संतापानं फणफणणारा बाईकवाला म्हणाला. त्याचा एकूणच अवतार आणि आविर्भाव बघून नादी लागण्यात अर्थ नाही हे लक्षात आल्यानं सुधीर तिथून निघाला. तेव्हा बाइकवाल्याची हातवारे करत बडबड सुरू होती.
प्रसंग तीन :
फोनची वाजणारी रिंग किचनमध्ये कामात असलेल्या सुमाला ऐकू आली नाही. तीन-चार वेळा फोन करूनसुद्धा फोन घेतला नाही म्हणून दीपक जाम वैतागला. घरात पाऊल ठेवल्याबरोबर त्यानं आरडाओरड सुरू केली. “हजारवेळा सांगितलं की फोन घेत जा. ”
“फोन वाजेलला लक्षातच आलं नाही”
“अंताक्षरी खेळण्यासाठी फोन केला नव्हता”
“मी सुद्धा मुद्दाम केलं नाही. कामात होते. ”
“लक्ष कुठं असतं. कसल्या तंद्रीत असतेस”
“गाढ झोपले होते म्हणून मुद्दाम फोन घेतला नाही. आता बोला. इतकं काय अति महत्वाचं काम होतं. ” सुमाच्या तिरकस बोलण्यानं म्हणाली तेव्हा दिपकचा पारा अजून चढला. तोंडाला येईल ते बोलायला लागला. शब्दाला शब्द लागून दोघांत कडाक्याचं भांडण झालं.
—-
– – वरील घटना काल्पनिक असल्या तरी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आहेत. कोणाही सोबत असं होऊ शकतं. तीनही प्रसंगात कोण बरोबर कोण चूक याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे “राग” आणि वागण्यातली आक्रमकता हाच खरा चिंतेचा विषय आहे.
रागावर कंट्रोल नाही हाच अनेकांचा मोठ्ठा प्रॉब्लेम झालाय.
‘राग येणं’ हे जरी नैसर्गिक असलं तरीही आजकाल आपण लगेच चिडतो, संतापतो.
आणि त्यासाठी कोणतंही निमित्त पुरतं. फार लवकर रिअॅक्ट होतो.
अनेकदा डोकं तापलं की संयम सुटतो. तारतम्य राहत नाही. शांतपणे विचार करण्याची इच्छाशक्ती आणि कुवत जवळपास संपलीये.
क्षुल्लक गोष्टींसाठी टोकाची भूमिका घेऊन परिणामांचा विचार न करता भावनेच्या भरात कृती केली जाते.
—
पूर्वी सुद्धा लोक चिडायचे, रागवायचे पण प्रतिक्रिया आजच्या इतक्या तीव्र नव्हत्या.
शिवीगाळ, धमकी, अंगावर धावून जाणं, मारहाण, अगदी जीव घेणं. असे प्रकार घर, ऑफिस, सार्वजनिक ठिकाणी सर्रास होतायेत.
पेपरमध्ये त्याविषयीच बातम्या आणि सोशल मिडियावर सुद्धा तेच.
आदर, संयम, समजूतदारपणा आता सुविचारापुरते मर्यादित झालेत. याचा वास्तवात फारसा कोणी वापर करत नाही.
धावपळ, तणाव, एकटेपणा आणि आभासी जगाचा कैफ यात गुरफटलेलं आयुष्य जगताना सतत अस्थिर असलेलं मन.
माणसा – माणसातील प्रत्यक्ष संवाद आणि त्यातली सहजता संपलीयं.
जिथं तिथं फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करण्याच्या नादात सगळंच बिघडलंय.
अनाकलनीय होतं चाललयं.
—
एकुणात सारांश असा की आपण खूप “चिडके” झालोय.
ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारे जसे हलक्या कानाचे तसेच कशावरूनही चिडणारे *“हलक्या डोक्याचे”* – – आजच्याच भाषेत बोलायचं तर ‘अँग्री बर्डस’
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




