श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “अंकल…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
“तुजसे नाराज नही जिंदगी,हैरान हू मै,परेशान हू मै….”गेले काही दिवस अशी अवस्था झालेली.मन थाऱ्यावर नव्हतं.सगळं व्यवस्थित चाललेलं.फार काही टेंशन नव्हतं तरीसुद्धा खूप उदास वाटत होतं.निराशा दाटलेली. मनापासून आनंद घेता येत नव्हता.यांत्रिकपणे रोजची कामं चाललेली.डॉक्टर मित्राच्या सल्ल्यानुसार तपासण्या केल्या पण रिपोर्ट नॉर्मल आले.विचार करून डोकं फुटायची वेळ आली. म्हणून अंकलना भेटायला गेलो.
“अरे वा,वा,चौथा खांब या”अंकलनी नेहमीसारखं हटके स्वागत केलं.
“आता हे काय नवीन?”
“अरे तू मीडियावाला ना.लोकशाहीचा चौथा खांब….”
“प्रत्येकवेळी नवनवीन नावं द्यायला कसं सुचतं”
“आई शप्पथ!!मलाही माहीत नाही पण सुचतं आपोआप” डोळे मिचकावत अंकल म्हणाले.
“तुमच्याकडे आलं की छान वाटतं.एकदम मस्त फिलिंग”
“म्हणूनच बऱ्याच दिवसांनी नव्हे महिन्यांनी भेटतोयेस.”
“इच्छा होती पण कामाच्या गडबडीत जमलं नाही”
“कसा आहेस”अंकलनी विचारल्यावर ओशाळल्यासारखं झालं वास्तविक मी विचारपूस करायला पाहिजे होती पण लक्षातच आलं नाही.आताशा आपण साधेसुधे मॅनर्स देखील विसरत चाललो आहोत.
“मी ठीकयं.तुम्ही कसे आहात.”
“मस्त,मजेत नेहमीसारखा”
“फार पेशंट दिसत नाहीत.”
“आता गर्दी स्पेशालिस्टकडे.आमच्यासारखे जुने डॉक्टर आता आऊटडेटेड.”
“एक विचारू..पर्सनल आहे”
“बिनधास्त”
“तुम्हांला कधीच हताश,कंटाळलेलं पाहिलं नाही.इतकी एनर्जी कुठून आणता.कायम फ्रेश असता. याचं सिक्रेट मलाही सांगा.”
“आयुष्य सोपं केलंय.”
“म्हणजे”
“मला आनंदी रहायला आवडतं म्हणून तसं राहण्याचा प्रयत्न करतो.”
“पण तरीही,त्रास असणारच ना.ते कोणाला चुकलेत”
“त्यालाच तर आयुष्य म्हणतात.समोर येईल ते स्वीकारायचं म्हणजे त्रासाची तीव्रता कमी होते.त्यासाठीच काही सवयी मुद्दाम लावून घेतल्यात आणि काही बदलल्या.”
“उदारणार्थ..”
“आपली कुवत,मर्यादा ओळखून वागतो आणि स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला शिकलोय.शक्य तेवढंच काम करतो.महत्वाचं म्हणजे कमी अपेक्षा ठेवतो त्यामुळे फार प्रॉब्लेम निर्माण होत नाही.”
“ऐकायला चांगलं वाटलं तरी प्रत्यक्षात असं वागणं फार अवघडयं.”
“हो पण अशक्य नाही.”
“आजकाल पैसा आहे पण मन शांत नाही असं का?.
“दिखाऊपणाच्या नादात आपणच आयुष्य अवघड करतो.अनेक त्रास स्वतःहून ओढावलेले असतात.मोठ्ठ कर्ज काढून खरेदी करायची आणि ईएमआयची वाळवी मेंदूला लावून घ्यायची.त्याचा तब्येतीवर परिणाम होतो.भरिस भर ताण आणि मोबाईल कायम सोबतीला असल्यानं सतत अस्वस्थ.”क्षणभर अंकल माझ्याविषयीच बोलत आहेत असं वाटलं.
“पण तुम्हांलाही त्रास झाला असेलच ना.”
“खूप त्रास झाला.धाडस नाही.
अल्पसंतुष्ट,कचखाऊ,पळपुटा,डेरिंग नाही वगैरे वगैरे अशी भरपूर नावं मिळाली.“कुछ तो लोग कहेंगे” म्हणत सोडून दिलं.माझा निर्णय बदलला नाही अर्थात बायकोच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं. आता आम्ही आनंदी आहोत. गरजेपुरता पैसा गाठीशी आहे.मुलाच्या संसारात डोकावायला नको म्हणून मुद्दाम वेगळं राहतो.एक रुपयाचं सुद्धा कर्ज नाहीये.रोजचा व्यायाम आणि जिभेवरचा ताबा यामुळं तब्येत उत्तम,जमेल तसं सहलीला जातो.एकूणच मस्त आयुष्य चाललंय.”अंकलचं ऐकून मला त्यांचा खूप हेवा वाटला.
“अजून एक महत्वाचं सांगतो.”
“काय ते..”
“आपले प्रॉब्लेम्स स्वतःलाच सोडवावे लागतात.प्रेमपत्र कितीह सुंदर लिहिलेलं असलं तरी जाहिरारित्या वाचायचं नसतं. तसंच आपले प्रॉब्लेम कितीही मोठे आणि महत्वाचे असले तरी इतर त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही.त्यात आजकाल तर मदत करण्याऐवजी सल्लाच दिला जातो.”
“थोडक्यात काय तर दाढदुखीचा ठणका ज्याचा त्यालाच सहन करावा लागतो.”
“करेक्ट.नेमकं बोललासं.उदाहरण आवडलं”
“तुमच्याकडूनच शिकलोय.हसू नका पण मी सुद्धा मदत मागायलाच आलोय.”
“ते लक्षात आलं.तू मागतोय म्हणून सल्ला देईन पण मान्य करायचा की नाही याचा निर्णय तुलाच घ्यायचाय.माझा आग्रह नाही.” अंकलशी बराच वेळ गप्पा मारल्या.मनातली खदखद मोकळी केल्यावर शांत वाटलं.अंकल काहीच बोलले नाहीत.
“काही सीरियस”भीती भीत विचारलं.
“काहीही झालं नाहीये.हे मानसिक दुखणं आहे.टेंशन घेऊ नकोस.”
“विनाकारण उदास,निराश का वाटतं.”
“होतं असं.सर्व काही ठीक असलं तरी अनामिक काळजी वाटतेच.खूप विचार करतोस का?”
“हो.”
“विचारांची धुनी कायम पेटलेली.अनावश्यक, संदर्भहीन विचार येतात. स्वतःचाच राग येतो.घुसमट वाढते.शांत झोप नाही.मेंदू कायम सावध.करेक्ट!!”
“असंच होतयं.परफेक्ट निदान केलंत.पक्के मनकवडे आहात.हे कशामुळं?.”
“एकसूरी आयुष्य!!आजच्या भाषेत बोलायचं तर मोनोटोनस लाईफ!!सगळंच वरवरचं,तकलादू,तेच ते अन तेच ते आयुष्य.त्यातही आनंद घेण्यापेक्षा दाखवला जातो.त्यामुळे मन अस्थिर. एकाग्रता फार काळ टिकत नाही.भान हरपून जावं असं घडत नाही.स्वतःची नेमकी आवड,छंद कोणते?हेच समजत नाही.मेंढरांसारखे एकमेकांच्या पाठीमागे फरफटत जाऊन नकली आनंदी घेत राहतो.”
“अगदी खरंय,मी पण तेच करतोय.आवड साफ विरसलोय .”
“आधी त्याचा शोध घे.जे केल्यानं छान वाटतं,मूड चांगला होतो,आनंद मिळतो ते ते सर्व कर.आतापर्यंत घर,संसार,मुलं यांच्यासाठी केलसं.थोडं स्वतःसाठी जग…..आणि आता आज एवढा डोस बास!!बाकी तू हुशार आहेस.चला”
“मी घरी सोडतो.”
“नको.माझी मर्सिडिज आहे ना” सायकलकडे बोट दाखवत अंकल हसले.मी वाकून नमस्कार केल्यावर “कल्याणमस्तु!!” असा आशीर्वाद देऊन सायकलवर टांग मारून निघून गेले.पाठमोऱ्या अंकलकडे पाहताना अचानक डोक्यात ट्यूब पेटली लहाणपणी मला सायकल खूप आवडायची. भरपूर चालवली आणि नंतर सायकल सुटली ती कायमचीच.गेल्या कित्येक वर्षात सायकलला हातच लावला नव्हता.ठरलं तर मग…… नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले “ थॅंक्यू अंकल.”
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





