त्रिशला शहा
☆ निरोप… ☆ त्रिशला शहा ☆
☆
“निरोप कसला माझा घेता
जेथे राघव तेथे सीता”
… गीतरामायणातील अतिशय ह्रद्य असे, श्रीराम वनवासात जाताना आपल्या प्रियेचा निरोप घ्यायला सीतेच्या कक्षात येतात तेव्हा सीतेच्या तोंडी असलेले हे गाणे.
निरोप, एक साधा तीन अक्षरी शब्द, पण या एकाच शब्दामध्ये अनेक भावभावनांचा कल्लोळ दाटलेला असतो. एक प्रकारची हुरहुर, करुणा, वैषम्य, स्नेह, आनंद मनात साकारत असते. निरोप देणे म्हणजे नव्याचे स्वागत करणेही असते म्हणूनच काही वेळा निरोप देणे म्हणजे आनंद साजरा करणे असते.
आत्ताच पहा नं, आपण सरत्या वर्षाला निरोप देतोय आणि नविन वर्षाचे स्वागत करतोय. हा अतिशय आनंदाचा क्षण कारण फाल्गुन अमावस्येचा अंधार संपून चैत्राची नवी पहाट येते तेव्हा गुढ्या तोरणे उभ्या करुन आनंदोत्सव साजरा करतो.
तीस-पस्तीस वर्षे नोकरी करुन योग्य वयात सेवानिवृत्ती घेताना निरोप समारंभ होतो, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतः साठी जगण्याची ही एक संधीच असते. घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना परत या असा आग्रहही असतो. एकाद्या सुंदरशा समारंभाचा शेवट आभार मानून करताना त्या समारंभाच्या यजमानांचा निरोप घेऊन आपण घरी परततो. लग्नात मुलीला सासरी पाठवताना तिला निरोप देताना घरच्या सगळ्यांना च भावना आवरता येत नाहीत. मुलीचे मनही कातर होतेच, हे जरी आनंदाश्रू असले तरी त्यातील निरोपाची भावना मनाला हुरहुर वाटणारीचं असते.
सहलीला जाताना मन अगदी आनंदाने भरून येते पण परतीचा प्रवास कधीतरी सुरु करावाच लागतो मग त्या उधाणलेल्या लाटा असोत, दरीडोंगर असोत किंवा एखादी मस्त बाग असो, निसर्गाच्या अद्भूत नजाऱ्याचा देखावा असो या साऱ्याला टाटा बायबाय करून आपल्या कर्तव्याच्या जगात परत यावचं लागते. एखाद्या सुंदरशा मैफिलीची सांगता करावीच लागते.
निरोप घेण्याचा आणि देण्याचा अतिशय ह्रद्य प्रसंग म्हणजे देशावरच्या सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या जवानाला निरोप देण्याचा. आपल्या कुटुंबाला सोडून जाताना त्या जवानाचे मन कातर होतेच पण भारतमातेच्या रक्षणासाठी मन सीमेवर धावही घेते. घरच्यांची पण अवस्था यापेक्षा वेगळी नसते.
दहावीच्या निरोप समारंभात लहानपणापासून शिक्षण घेत आलेल्या शाळेचा निरोप घेताना त्या विद्यार्थ्यांना भावना अनावर होतातच पण पुढील शिक्षणासाठीची भरारी घेताना मन आतुरलेले असते.
म्हणूनच निरोप देणे म्हणजे नविनच्या स्वागतासाठी सज्ज होणे. इथे कुठेही भावनेला महत्व उरत नाही हेचं खरे.
© त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




