श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “ती दोघं… ” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
एकमेकांच्या अगदी विरुद्ध.
एक पूर्व तर दुसरी पश्चिम
कधीच एकत्रपणे भेटत नाहीत.
जणू काही दोन डोळे शेजारी
भेट नाही जन्मभरी.
—
‘तो’
अवतीभवती सर्वत्र आहे
सगळं त्यानचं व्यापलंय.
कुठंही जा.इच्छा असो वा नसो ‘‘तो’ आहेच.
वेगवेगळ्या रूपात भेटतो.
कधी कधी चांगला वाटतो तर बऱ्याचवेळा पार हैराण करतो
पण त्याला टाळता येतच नाही.
अन त्याची इतकी सवय झालीये की,
नसला की अस्वस्थ वाटते.मन बेचैन होतं.
टेंशन, स्ट्रेस यांच्याइतकाच आयुष्यात ‘तो’ मिसळलाय.
आणि
ती…
आता दुर्मिळ झालीयं.
पूर्वीइतकी सहज भेटत नाही.
शोधावं लागतं.
प्रयत्न करावे लागतात.
तरीही मिळेल याची खात्री नाही
‘ती’ हरवलीये.
हळूहळू अस्तित्वहीन होतेय.
हेच काळजी करण्यासारखं आहे.
‘ती’च्या नसण्यानं फरक पडत नाही
कारण, गरज कमी झालीये.
परंतु, तरीही ‘ती’ पाहिजे.
तिच्या शिवाय जगणं सैरभैर होईल.
श्वासाइतकीच ‘ती’ महत्वाची.
जेव्हा जेव्हा ‘तो’ असह्य होतो, वैताग आणतो.टाळता येणं शक्य होत नाही.
तेव्हा आधार फक्त ‘ती’च देते.
असा तो म्हणजे “आवाज”
ती म्हणजे “शांतता”
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




