डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ केली प्रीत जतन… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆

विस्मृतीत जरी सारे जीवन प्रेम तुझे हृदयाशी जपुन

विद्ध जाहले घावांनी  मन अंतरी केली प्रीत  जतन ॥ध्रु॥

* 

आयुष्याच्या मार्गावरती सुखदुःखांची कितीक नाती

मोरपिसांचा स्पर्श मुलायम  कधी क्षते घायाळ करती

जीवघेण्या जखमा सोसुन  भले नि वाइट गेलो विसरुन

विस्मृतीत जरी सारे जीवन प्रेम तुझे हृदयाशी जपुन  ॥१॥

 *

रातराणी दरवळता धुंद  आयुष्याचे विणले बंध

रोमारोमात भिनला कुंद आसमंताचा सुगंध मंद

तुझ्याविना नच काही जाण अस्तित्वा गेलो विसरुन

विस्मृतीत जरी सारे जीवन प्रेम तुझे हृदयाशी जपुन  ॥२॥

 *

अंतरी जे दाटूनी आले  अपुलेच तया जाणून भोगले

धुंदी अथवा क्लेशही आले दोघानी त्यात एक मानिले

एकमेकावीण जगणे भिन्न जीवन झाले सारे सुन्न

विस्मृतीत जरी सारे जीवन प्रेम तुझे हृदयाशी जपुन  ॥३॥

 *

 साथ निभावली अद्वैताची जिवा-शिवाच्या एकत्वाची

विलग कधीही ना होण्याची विधीसाक्ष त्या सप्तपदीची

हात सुटले नशीब निर्घृण जगणे उरले हे एकलपण

विस्मृतीत जरी सारे जीवन प्रेम तुझे हृदयाशी जपुन  ॥४॥

*

जगलो आपण चकोर होऊनी  प्रेमातुनी  आकंठ बुडूनी

अवनीवरती स्वर्ग उभारुनी साऱ्या जगता गेलो विसरुनी

शाश्वत काही नसते जाणुन होते कधी का दुःख भलावण

विस्मृतीत जरी सारे जीवन प्रेम तुझे हृदयाशी जपुन  ॥५॥

 (निशिगंध)

☆

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted