सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

☆ आमची थोडी धार्मिक, आध्यात्मिक आणि निसर्ग सहल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

“केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र, ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार! “

फार पूर्वीपासून आपण हा श्लोक ऐकत आलो आहोत. पूर्वीच्या काळी प्रवास, सभा, दूर वर जाऊन शास्त्रांचा अभ्यास या गोष्टी थोड्या अवघड होत्या… त्यामुळे हे ज्याच्या हातून घडत असेल तो हुशार, चतुर आणि पंडित समजला जाई, पण काळ इतका झपाट्याने बदलला आहे की, आता फोन, मोबाईल, गुगल यामुळे जग क्षणात जवळ येत आहे. सुदैवाने आम्ही या बदलत्या काळात राहिलो आहोत. त्यामुळे आम्ही चौघी जावांनी ज्येष्ठ नागरिक असूनही स्वतःच्या जीवावर प्रथमच अशी लांबची ट्रिप आयोजित केली होती..

मुख्य म्हणजे साठे टूर्सचे मालक आमच्या नात्यातीलच असल्याने त्यांच्याकडून आम्हाला ट्रिप संबंधी सर्व मार्गदर्शन मिळाले. ट्रीपचा प्रत्येक दिवस एक एक स्थळ तसेच तेथील मुक्कामही त्यांनी आम्हाला बुक करून दिला होता. ट्रेनची तिकिटे, हॉटेल बुकिंग या दोन महत्त्वाच्या गोष्टी कळल्यावर आता ट्रिप ची तयारी करायला हरकत नाही असे वाटले. चौघींच्याही मुलांनी आम्हाला घराबाहेर पडायला प्रोत्साहन दिले हे विशेषच! अशा तऱ्हेने सर्व प्रकारची तयारी करून एक महिन्यापूर्वी आम्ही या ट्रिपसाठी पैसे भरले आणि आता शरीराने आणि मनाने ट्रिप साठी तयार झालो होतो. आत्ता पर्यंत नवऱ्याबरोबर फिरायची सवय, त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याकडे सोपवल्या की, आम्ही फक्त कपड्यांच्या बॅगा भरणार! पण यावेळी सर्वच तयारी आपली आपण!

त्यातून कारवार, कर्नाटकात जायचं म्हणजे भाषेचा प्रश्न! पण आमच्या मोठ्या जाऊबाई कानडीच्या बऱ्यापैकी जाणकार असल्यामुळे त्यांनी ती बाजू सांभाळली. नंबर दोनच्या जाऊ बाई ही मार्गदर्शनाला तत्पर! मी आणि धाकटी जाऊ दोघींनी फायनान्स विभाग सांभाळला. ठराविक पैसे गोळा करून झालेला खर्च लिहिणे आणि पैसे सांभाळणे! असो, ही झाली ट्रीपची सुरुवात! नमनाला घडाभर तेल! प्रत्यक्षात ट्रिपचं वर्णन येणार आहेच!

आमचा उतू चाललेला उत्साह घेऊन 10- 1 -2026 रोजी रात्री पुणे रेल्वे स्टेशनवर जमलो, तेव्हा आम्ही पाल्य आणि आमची मुले पालक असल्याने नीट जा, काळजी घ्या, तब्येती सांभाळा, उगीच पळापळी करू नका वगैरे वगैरे सल्ले ते आम्हाला देत होते. आम्ही लहानपणी त्यांच्या मागे पळलो, आता ते आमच्या मागे! रिझर्वेशन मध्ये जागांची थोडी उलटापालट झाली होती. सर्वांची रिझर्वेशन तिकिटे वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये होती. , पण रात्रीचे अकरा वाजता ट्रेन सुटल्याने उद्या सकाळी बघू काही ॲडजस्टमेंट होते का? अशा विचाराने आम्ही आपापल्या 

बेडवर झोपलो. रात्री वेगवेगळी गावे, शहरे रेल्वे बरोबर मागे पडत होती. सकाळी सकाळी मिरज आले, पुढे रेल्वे कर्नाटकात शिरली आणि वातावरण बदलत गेले.

प्रत्येकीने ठरवल्याप्रमाणे लाडू, चिवडा, मेथी पराठे, गुळपोळ्या याशिवाय काही चटक-मटक पदार्थ घेतले होतेच, तरीही सकाळी इडली वडा हा गरम गरम नाश्ता आम्ही घेतला. गाडी जसजशी कर्नाटकात जात होती तशीच थंडी कमी जाणवू लागली पण बाहेरची हिरवी झाडी मनाला आनंद देऊ लागली!

 चौघी जावांच्या गप्पा तर अखंड चालू होत्या. बेळगाव नंतर लोंढ्याला ट्रेन ने ट्रॅक बदलला आणि वेग पकडला. संध्याकाळी पाचच्या दरम्यान उडपी स्टेशन आले.. आता बघायचे होते की, आपल्याला कोणती गाडी आणि ड्रायव्हर मिळणार आहे याची!

 आम्हाला गाडीचा नंबर आणि ड्रायव्हर कोण असेल ते कळवलेले होते, त्याप्रमाणे ‘जॉय’ या ड्रायव्हरची भेट झाली. “जॉय” खरोखरच जाॅयफुल, एनर्जेटिक माणूस होता! वयाने जेमतेम पंचविशीचा असेल पण त्याच्या कामात हुशार होता. त्याच्या कानडीला आमच्या मोठ्या वहिनी बरोबर समजून घेत होत्या. आम्ही आपले थोडा इंग्रजी, मराठीचा सहारा घेत संवाद करत होतो. सामान डिकीत टाकून आमची गाडी आमच्या पहिल्या हॉटेल मुक्कामावर गेली. हॉटेलचं नाव होतं ” *हॉटेल पर्ल”*

हॉटेल खरोखरच छान होतं! तिथे दोन खोल्यांचे बुकिंग होते. एका खोलीत नंबर १/२ आणि दुसऱ्या खोलीत नंबर ३/४ असा जावांचा क्रम होता. खोलीची पाहणी केली आणि प्रथम रूमवर चहा मागवला, फ्रेश झालो, तयार झालो, उडुपी ची फेरी मारायला बाहेर पडलो.

एका सरळ रस्त्याने जाऊन त्याच पावली परत येताना आईस्क्रीम आणि थोडी पोट पूजा केली आणि रूमवर परत आलो. कालची रात्र प्रवासात गेली होती, त्यामुळे आज रूमवर छान झोप लागली!

सकाळी ठरल्याप्रमाणे पहिली आवराआवरी करून उडपीच्या कृष्ण मंदिरात आलो. तिथे माझ्या तिन्ही जावांनी लिहिलेल्या भगवद्गीतेच्याप्रती दिल्या, प्रमाणपत्र घेतले. मी यात नसल्याने हॉलमध्ये बसले होते. तिथे लहान मुलांचा एक ग्रुप भगवद्गीता म्हणत होता. त्यांच्या मॅडमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 2, 12 आणि 15 असे अध्याय म्हटले.. मला श्रवण भक्ती करता आली!

(आता गीता लिहिण्यासाठी मी आणली आहे, बघूया कधी संकल्प सुरू होईल आणि पूर्ण करेन)

त्यानंतर आम्ही प्रसादाच्या रांगेत उभे राहिलो तो अनुभव मात्र जरा जास्त त्रासदायक होता. गर्दी खूप होती, पण इतके कृष्णभक्त आहेत हे पाहून बरे वाटले. जवळपास दीड तास उभे राहिल्यावर दर्शन प्रसाद मिळाला. त्या दिवशी दुपारीच आम्ही मुरडेश्वर ला जायला निघालो. मुर्डेश्वर चे *आर एन एस गेस्ट* *हाऊस* वर आमचा दुसरा मुक्काम होता..

मुर्डेश्वर ला मसाल्याच्या पदार्थांची बरीच दुकाने होती. तिथे खरेदी करण्याचा मोह काही आवरला नाही! थोडे काजू घेतले. किरकोळ खरेदी म्हणत म्हणत बॅगा भरल्या जात होत्या!

हॉटेल समुद्राजवळच असल्याने मनसोक्त सागर दर्शन होत होते! शंकराचे मंदिर छानच! परिसर निसर्गरम्य असल्यामुळे खूपच छान वाटत होते. तिथे प्रसाद घेऊन दुपारी आम्ही गोकर्ण महाबळेश्वरला जाण्यास निघणार होतो.

आमचा ड्रायव्हर खूप उत्साही असल्यामुळे त्यांनी आम्हाला काही ठिकाणी स्वतः हून दाखवली. वाटेत एक मारुतीचे मंदिर बघायला मिळाले. सभोवतालचा निसर्ग बघत बघत आम्ही गोकर्ण महाबळेश्वरला निघालो होतो.. त्या छोट्याश्या प्रवासात आम्ही धारेश्वर आणि गुणवंतेश्वर ही दोन ठिकाणे पाहिली. त्या दिवशी मंगळवार असल्याने गणपती दर्शन मिळाले याचा आनंद वाटला!

13तारखेला सकाळी गोकर्ण महाबळेश्वर दर्शन खूप छान झाले. तरीही योगायोगाने काही अभिषेक वगैरे करायचा असल्यामुळे आम्हाला दुपारी पण देवळात जाऊन दर्शन घेता आले.

आम्हाला 14 तारखेला दुपारपर्यंत मडगाव येथे पोहोचायचे होते. मडगावहून निजामुद्दीन रेल्वे पकडायची होती.

14 तारखेच्या सकाळी हॉटेल वर भरगच्च नाश्ता करून सामानासह आम्ही बाहेर पडलो. ओम बीचवर गेलो, तेव्हा समुद्र पाहून मन प्रसन्न झाले. समुद्रात घुसलेल्या खडकांच्या एका रांगेने ओम चा आकार धारण केलेला आम्हाला दाखवला, संपूर्ण प्रवास समुद्राबरोबरच चालू होता, त्यामुळे मला तरी खूप छान वाटत होते! त्या बीच चे नाव ‘ *कुडले बीच’* असे होते. तिथे किनाऱ्यावर अनेक स्टॉल्स होते. ते पाहता पाहता किरकोळ खरेदी ही झालीच! वाटेत महाबलम् गुंफा पाहिली. शंकराचे वास्तव्य गुहेत पाहताना मन नेहमीच गंभीर होते!

ओम बीचवर फिरवून आमच्या सारथ्याने आम्हाला स्टेशनवर नेण्यासाठी गाडी काढली.. आमची ट्रेन 3-45वाजता होती. पण आम्ही सव्वा दोन वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचलो.

आता घराची ओढ लागली होती. खूप थकलो होतो… पाय भरभर उचलत नव्हते.. नाही- नाही म्हणत सामानाची एखादी पिशवी वाढली होतीच, त्यामुळे सामानासाठी कुली ठरवला आणि अर्थात ते बरेच झाले. कारण गाडी एक नंबर प्लॅटफॉर्मवर न लागता तीन किंवा चार नंबर वर येणार आहे.. अशी अनाउन्समेंट झाली. आम्ही चौघी सावकाशीने दादर चढून प्लॅटफॉर्म गाठला. कुली चांगला मिळाला. त्याने सामान चढवून दिले. इतरही लोकांनी आम्हाला मदत केली.

आता मात्र आम्हाला भूकही लागली होती.. सकाळच्या नाश्त्यानंतर खायला वेळच मिळाला नव्हता. संध्याकाळी दिप्ती ने आणलेल्या गुळपोळ्या आणि इतर किरकोळ खाऊ खाऊन आम्ही पुन्हा पसरलो.. परतीचा प्रवास झोपेतच झाला. पहाटे चार वाजता पुणे स्टेशनवर उतरलो. मस्त चहा प्यायलो. इतक्यात अद्वैतची गाडी आली आणि आम्हा सर्वांना सुखरूप घरी पोहोचता आले.. आत्तापर्यंत केलेले प्रवास हे थोडे कमी वयात आणि नवऱ्यांच्या जीवावर केलेले होते, पण स्वतंत्रपणे ठरवून चौघी जावांनी ही मोठी ट्रीप ठरवली आणि पार पाडली याचा निश्चितच आनंद झाला. पुन्हा नवीन ऊर्जा घेऊन आलो! वयानुसार सर्वांनाच आल्यावर दोन दिवस झोपावे लागले पण मिळालेला आनंद हा नक्कीच खूप होता! लगेच एकमेकींना फोन करून पुढची ट्रिप कधी करू या अशी विचारणाही आम्ही केली!

एकमेकीं बरोबर ट्रीप चे फोटो शेअर केले आणि पुनः प्रत्ययाचा आनंद घेतला!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments