सुश्री सुनीला वैशंपायन
वाचतांना वेचलेले
☆ “Less luggage, more comfort…” – लेखक : श्री सचिन मधुकर परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆
☆
“Less luggage, more comfort…”
वयाच्या ८९ व्या वर्षी ती शेवटच्या ग्लानीत होती. काही शेवटचे क्षणच उरले असावेत बहुधा. तिने किंचित डोळे उघडले.
तो जवळच होता. नुकताच आला असावा कदाचित.“चला, निघूया का आपण? मलाही उशीर होतोय. काही उरलंसुरलं असेल तर….” तो किंचित हसला. तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, “तसं फार काही नाही पण मी काहींना माफ करणार नाही मरेपर्यंत…ती वाशीची कुमुद, माई सावंत, दिगंबर मुसळे आणि विद्याताई….”
“का बुवा?” मरणासन्न अवस्थेतही तिचा तो निर्धार बघून त्याला हसू आवरेना..
“का म्हणजे काय? या सगळ्यांनी आयुष्यभर छळलंय मला. अपमान, पदोपदी अपमान केलेत. तोंडाला येईल ते बोललेत. माझ्या माहेरचे उध्दार केलेत. प्रॉपर्टीवरुन वीस पंचवीस वर्षे कोर्टकज्जे चालवलेत हरामखोरांनी. त्या विद्याने तर माझा नवरा…. कधीच माफ करणार नाही”
तो उठला होता तो क्षणभर बसला. त्याने तिचा हात नीट धरला, “बरं…पण आता तुझ्या माफ न करण्यानं काय होईल? त्यावेळी तु प्रतिकार करु शकली नाहीस. नंतर कधी केला नाही. आणि आता माफ न करण्याचं ओझं शिरावर कोण घेऊन बसलंय? कुमुद याक्षणी वृध्दाश्रमात खितपत आहे. विद्याताई लंडनला मुलीकडे आहे मजेत असं तुला वाटतंय पण तिथे ती हक्काची मोलकरीण झालीये, वैतागलीये पण बोलणार कुणाला? दिगंबर मुसळे निजधामाला जाऊन दहा वर्षे झाली. माई सावंत अशाच कुठल्यातरी अज्ञातवासात…. नियती बघते काय ते? आणि तु तरी कुठे गं धुतल्या तांदळासारखी आहेस? तुझ्या हातूनही असंख्य चुका, अपमान झालेच आहेत की…. तु त्यांना माफ न करुन आता काहीच फरक पडत नाही. पण तुझ्या माथ्यावर ओझं मात्र झालंय खूप… ऐक एक, ते ओझं इथेच टाक, माफ कर आणि चल माझ्यासोबत”
“तुला काय जातंय बोलायला? मी सोसलंय”
“हो मान्य आहे. पण आता काय? एका ठराविक क्षणी याला काहीच अर्थ उरत नसतो. तु माफ न करुन आता काय होणार आहे नेमकं? तुला तर साधं बोटंही हलवता येत नाही. इथून जाताना ही विषारी आणि विखारी ओझी का नेतेयस? त्यावर पुढे खूप व्याज वाढतं. शिक्षा देणारी ती नियती आहे. तू नव्हेस…. तुला एक सांगू? प्रवासात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. Less luggage, more comfort…”
ती अस्फुट हसली…. “करते रे बाबा माफ सगळ्यांना… ओझी कधीतरी उतरवायला हवीतच. हो ना?”
“परफेक्ट…” तो म्हणाला… आणि अर्धवट ग्लानीतला तिचा देह आता चिरनिद्रेत जाऊ लागला… तो एव्हाना तिला घेऊन खोलीबाहेर पडला.. आता ओझं हलके झाले होते…
☆
लेखक: श्री सचिन मधुकर परांजपे
(पालघर)
प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





वाचताना वेचलेलं फारच सुंदर! जीवनोपयोगी!