? वाचताना वेचलेले ?

☆ ‘वय हे मनाला असतं…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

वय हे मनाला असतं. शरीराला वय असतं, असं मला वाटत नाही.

मी आपल्याला एक उदाहरण सांगतो.

पंडित सातवळेकर होते – ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं.

त्यांना जेव्हा शंभरावं वर्ष लागलं तेव्हा मला असंच मनात आल की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे, तर आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करुन यावं. म्हणून मी पारडीला गेलो.

शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. आजारी असतील, आपण दोन मिनिटांत नमस्कार करावा, ‘बरं वाटतंय ना, काळजी घ्या’ वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला गेलो त्या वेळेला बघतो, तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं तपासत बसले होते.

तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते.

मी नमस्कार वगैरे केला. मला म्हणाले, “मी वाचलं आहे तुमचं साहित्य”.

मी घाबरलोच एकदम. “असलं काही लिहिण्यापेक्षा बरं लिहा” असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पं. सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील, असं मला कधीही वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे – म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं.

ते म्हणाले “आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या तरुण पोरांना माहीत नाहीत, ते मी निवडून काढणार आहे आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात पुढली आठ-दहा वर्ष जातील”.

शंभराव्या वर्षी पुढल्या आठ-दहा वर्षांचा कार्यक्रम त्यांच्या हातात होता. पुष्कळ वेळेला आपण म्हातारे अशासाठी होतो, की तुम्ही जगताय कशासाठी या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. फक्त आर्थिक उत्पादनासाठी, महिना पगारासाठी हे उत्तर काही आपलं आपल्यालाच समाधान देत नाही. कशासाठी जगतो त्याला एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन जीवनाला लागतं…

(पं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीसमारंभात पुलंनी केलेल्या भाषणातून)

दादा धर्माधिकारी म्हणतात, तारुण्याचे तीन ‘त’ कार आहेत. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. जर या तीन गोष्टी आपल्यात असतील तर वय ही फक्त एक संख्या उरते. पं. सातवळेकरांच्या बाबतीत हेच असावं. म्हणून १०० व्या वर्षी पुढील आठ वर्षांचे नियोजन त्यांच्याकडे होते.

अशा या अलौकिक व्यक्तिमत्त्वांसाठी सहस्र नमन.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments