श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “जिवंत आईचे श्राद्ध…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द!!
मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला. मला म्हणाला आज आईच श्राध्द आहे, आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो.
मला आश्चर्याचा धक्काच बसला, पाच मिनिटा पुर्वीच मी त्याच्या आईला मार्केटमध्ये भेटलो होतो. मी काही बोलणार तेवढ्यात, मित्राची आई हातात पिशवी घेवून इथे स्वत: येवून पोहचली.
मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारलं, “भल्या माणसा, ही कसली चेष्टा करतोयस वेड्या, आई तर आहे तुझ्या बाजूला..”
मित्र आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत जोर जोरात हसत म्हटला, अरे भाऊ,.आईच्या मरणानंतर गायी वासरे नी कावळ्यांना लाडू खाऊ घालण्याऐवजी मी आईला जिवंतपणीच तृप्त करू इच्छितो. त्याचे असे मत होते कि, “जिवंतपणीच आई- वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द”.
तो पुढे म्हणाला, “आईला मधुमेह आहे, पण गोड खायला आवडते. म्हणून मी नेहमी फ्रीज मध्ये काही न काही ठेवून जातो, जे जे तिला आवडतं, ते ते सर्व आणून ठेवतो, श्रद्धेनी लोक मंदिरात जातात, अगरबत्ती लावतात. मी पण लावतो ‘कासव छाप’, आई झोपायला जायच्या आधी, मच्छर हाकलायला.
सकाळी आई “दासबोध” वाचायला बसते नियमित, मी तिचा चष्मा साफ करून देतो, माझा असा समज आहे की, देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा, आईचा चष्मा साफ करण्याने अधिकच पुण्य मिळेल” आणि मित्र त्याच्या आईसोबत निघून गेला.
मी घरी येउन सुन्न मनाने पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसलो. मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच तथ्य वाटलं. रिती रिवाज म्हणून आपण श्राध्द करतो, पूर्वजांच्या नावानी पोटभर गोड धोड खातो, पण खरच ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, एवढे निश्चित.
अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशात पण अशी टिफिन सेवा अजून तरी सुरु झालेली नाही. त्यांच्या जिवंतपणी, त्यांच्यावर दुर्लक्ष करणे, म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते. खरे तर त्यांच्या उतार वयात आई वडिल, पैश्यापेक्षा प्रेम, आणि एक सच्चा आधार फक्त तुमच्यामध्ये शोधतात.
आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबादारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात, याची त्यांनाही पुरेपूर जाणीव असते. पण तरीही जी मुले आई वडिलांची काळजी घेवू शकत नाहीत, त्यांना देवही माफ करणार नाही. आज कितीतरी वृद्ध माता पिता, कुटुंबियांकडून अवहेलना झेलतांना आपण पाहत असतो यावर कवी धर्मेश ची ओळ आहे…
”आधी माता मग पिता.. मग घेईन प्रभू नाम… मला नकोय दुसरे तीर्थधाम”!!
संत कबीर असे म्हणतात,
जीते बाप को रोटी नां दे
मरे बाद क्यो पछतांये ॥
मुठभर चावल धाबेपर झोककर
कव्वे को बाप बनाये॥
संत तुकोबाराय असे म्हणतात…
भुके नाही अन्न ।
मेल्यावरी पिंडदान ॥
हे तो चाळवा चाळवि ।
केले आपणची ठेवी ॥
प्रिय मित्र-मैत्रिणीनो, मेल्यानंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणी काहीच कमी पडू देऊ नका… जिवंतपणी आपण आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास आणि मेल्यानंतर अनेक पूजा- अर्चा आणि पिंडदान केल्यास काय उपयोग त्याचा?
* * * *
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





उत्कृष्ट रचना, काश ! इसे लोग समझ सके