☆ ‘आईसारखं…‘ — लेखिका : सुश्री उर्मिला देवेन ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆
“आई, मी ऑफिसला जाते आहे… तुमचं औषध वेळेवर घ्या हं. मोबाईल सोबत ठेवा. “
नम्रता दररोज सकाळी हेच वाक्य पाठ केल्यासारखं बोलायची. आवाज गोड, चेहऱ्यावरचं हास्य हलक्याशा थकव्याने झाकलेलं असायचं. बोलण्यात आदर असायचा पण आपुलकी हरवलेली…
कमला काकू, म्हणजे तिची सासू, खिडकीतून तिला पाहायच्या. ती मागे परतूनही बघत नसायची. कमला काकू सत्तर वर्षांची. पूर्वी शिक्षिका. बोलकी, थोडी रुक्ष, आणि थोडीशी “मी म्हणते तेच खरं” अशा स्वभावाची.
ती नेहमी म्हणायची, “मी सुनेला मुलीसारखं वागवलं! “
आणि नम्रता म्हणायची, “हो, पण कधी आईसारखं काही केलं नाही. “
दोघींच्या मध्ये फारसं काही घडलं नव्हतं. ना मोठं भांडण, ना काही गोडही, पण घरात एक जडसर शांतता कायम असायची. जी बोलण्यातून नाही, तर न बोलण्यातून पाझरत होती. कमला काकुला जणू साऱ्यांची सवय झाली होती. नम्रताही तिचं रोजचं जगणं, फोनवर मिटिंग्स, वेळेवर डबे, ऑफिस
सगळं तिचं व्यवस्थित होतं. तिच्यासाठी “आई म्हणजे आपुलकी, पण सासू म्हणजे शिस्त. ” एवढचं समीकरण तिने मांडलं होतं. त्याला कमला काकूने मोडलेही नव्हते. सुनेने घरची काम करावी आणि सासूने ती बघावी असे कितीतरी वर्षापासून सुरु होते. नम्रता तिच्या राज्यात आनंदी होती, पण कमला काकूचा जीव ह्या शांत नात्यात गुदमरत होता. नम्रतासाठी सासू जसं म्हणेल तसंच ती करायची, मग आपुलकी आणि प्रेम कुठे असणार होतं. कमला काकू जे शोधत होत्या ते त्यांना असं मिळणं शक्य नव्हतं.
एक दिवस त्या घरी एकट्याच होत्या. त्यांच्या खोलीत जुना पसारा काढून बसल्या होत्या. त्यात काही जुने नवऱ्यासोबतचे फोटो, काही तिच्या सासूसोबतचे फोटो, बऱ्याच आठवणी आठवत राहिली… त्या आठवणीत ती सून झाली आणि अलगद आठवण झाली… शब्द बाहेर आले, “मी सासू कशी झाले, मी तर आई आहे… निदान नम्रताच्या नवऱ्याची… त्या नात्याने मी तिच्या आईसारखी होऊ शकते, सासू कशी झाले… ”
त्या दिवशी नम्रता जरा उशिरा घरी आली, नेहमीच्या सवयी प्रमाणे तिने रोजचे प्रश्न केले, “आई औषधी घेतल्या होत्या ना वेळेवर. फिरायला गेल्या होत्या, मला वेळ झाला आज, तुमचा संध्याकाळाचा चहा लगेच आणते. ” तो ‘आई’ हा शब्द कमला काकूला बोचला होता.
नम्रता आधी नियमाप्रमाणे हातपाय धुवायला आणि आवरायला तिच्या खोलीत गेली. आणि कमला काकुने तिच्यासाठी चहा तिच्या खोलीत आणला. तिचा कप तिला देत म्हणाल्या, “आज तुझ्यासाठी केला गं. तू करतेस दररोज माझ्यासाठी. कदाचित माझ्या हातचा चहा तुला आवडणार नाही, पण… आज मी ‘आईसारखं’ काहीतरी करावं वाटलं. “
नम्रता क्षणभर स्तब्ध झाली. ती कपाकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं, जणू आतमध्ये साठवलेली थोडीशी दाट धुके विरून गेली. काकुच्या त्या थकलेल्या चेहऱ्यावर तिला अनेक जाणीवा दिसल्या. हातात असलेला गरम, धुरकट चहाने तिला शांत केले…
“आई… हा चहा फार दिवसांनी प्यायले. माझ्या लहानपणी… आई पण असाच करत असायची. हल्ली असा चहा मिळणे दुर्मिळ… “
त्या दिवशी दोघींच्यामध्ये काहीतरी उमजलं. ते शांत होतं पण एका नवीन नात्यासारखं होतं… नम्रता दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघाली होती, पण त्या दिवशी जाताना ती मागे वळून म्हणाली,
“आई, संध्याकाळी आपण एकत्र बसून चहा पिऊया. “
कमला काकू हसल्या. खरं हसल्या. कदाचित पहिल्यांदाच…
☆
लेखिका : सुश्री उर्मिला देवेन
प्रस्तुती : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





