श्री मंगेश जांबोटकर
वाचताना वेचलेले
☆ नियंत्रण सोडा… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆
एका संध्याकाळी, नवरा दरवाजातूनच सहज म्हणाला, “ऐक ना, मी थोडा वेळ मित्रांसोबत बाहेर जातोय. ”
कपडे घड्या घालत बसलेली त्याची पत्नी फक्त वर पाहत म्हणाली, “ठीक आहे. मजा करा. ”
तो थोडा चकित झाला. नेहमी ती त्याला “लवकर परत ये, सावधपणे गाडी चालव, उशीर करू नको”—असे काहीतरी सांगायची. पण त्या दिवशी काहीच नाही — ना सुस्कारा, ना प्रश्न, फक्त शांत “ठीक आहे. ”
काही तासांनी त्यांचा किशोरवयीन मुलगा किचनमध्ये आला. हातात एक कागद आणि चेहरा फिक्का.
आई, ” तो हळू आवाजात म्हणाला, “माझे मॉक परीक्षेचे निकाल आले… आणि ते खूप वाईट आहेत. ”
तो थिजून उभा राहिला, कारण त्याला नेहमीप्रमाणे ओरडा होईल, अशी खात्री होती. आईला त्याच्या अभ्यासाची खूप काळजी, म्हणून आज पुन्हा ‘वेळ वाया घालवला’, ‘क्षमता वाया घालवत आहेस’ अशी भाषणे ऐकायला मिळतील — अशी त्याची तयारी होती.
पण त्याऐवजी ती शांतपणे म्हणाली, “ठीक आहे. ”
तो विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाला, “फक्त… ठीक आहे? ”
“हो, ” ती प्रेमाने म्हणाली. “जास्त अभ्यास केलास, तर पुढच्या वेळी चांगले होईल. नाही केला तर सेमिस्टर रिपीट करावा लागेल. तुझा निर्णय. मी दोन्ही परिस्थितीत तुझ्या पाठीशी आहे.”
तो हैराण झाला. आई एवढी शांत कधी झाली?
दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची मुलगी घाबरतच घरात आली. हॉलमध्ये थोडं थबकून ती म्हणाली, “आई… मी… मी कारला धडक दिली. फार मोठं नाही, पण डेंट पडलाय.”
आई ना ओरडली, ना रागावली, काहीच नाही. ती फक्त म्हणाली, “ठीक आहे. उद्या गाडी वर्कशॉपमध्ये देऊन टाक. ”
मुलगी थिजलीच. “तुला… राग नाही? ”
आईने मंद स्मित केले. “नाही. रागावल्यानं कार परत नीट होणार नाही. पुढच्या वेळी जपून चालव. ”
आता घरातील सगळेच चिंतित झाले. ही स्त्री — त्यांची पत्नी, त्यांची आई — पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती कधी तापट, पटकन तणावात येणारी, पटकन बोलून जाणारी होती. आता मात्र शांत, स्थिर, अगदी प्रसन्न दिसत होती.
ते एकमेकांत कुजबुजायला लागले — काही बिनसले आहे का? तब्येत बरी नाही का? काही घडले आहे का?
शेवटी त्या संध्याकाळी, सगळ्यांनी तिला किचनच्या टेबलाजवळ बसवले.
“ऐक, ” नवरा म्हणाला, “तू अलीकडे खूप बदलली आहेस. काहीही होतंय, तरी तुझा राग येत नाही, तू प्रतिक्रिया देत नाहीस. सगळं ठीक आहे ना? ”
ती त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहत हसली.
“काहीच बिनसलं नाही, ” ती म्हणाली, “सगळं अगदी योग्य चाललंय. मला फक्त एक गोष्ट समजली आहे. ”
ते सगळे शांत झाले.
“खूप वर्षांनी लक्षात आलं, ” ती म्हणाली, “की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यासाठी स्वतःच जबाबदार असतो.
नवऱ्याने भुवया उंचावल्या. “काय म्हणायचंय तुला? ”
ती हात जोडून म्हणाली, “मी आधी प्रत्येक गोष्टीची चिंता करायची. तू उशीर केलास तर काळजी, मुलांचे मार्क कमी आले तर अपराधीपणा, काही तुटलं तर राग, कुणी नाराज झालं तर ते ठीक करण्याची धडपड. मी सगळ्यांच्या समस्या माझ्या मानायचे. पण एक दिवस लक्षात आलं — माझ्या काळजीने त्यांची समस्या सुटत नाहीत. फक्त माझी शांतता नष्ट होते. ”
मुलगी शांतपणे ऐकत होती.
ती पुढे म्हणाली, “माझ्या तणावाने तुम्हाला काही फायदा होत नाही. माझी धडपड तुमचं आयुष्य सोपं करत नाही — फक्त माझं कठीण करते. मी तुम्हाला सल्ला देऊ शकते, प्रेम देऊ शकते, साथ देऊ शकते. पण तुमचं आयुष्य मी तुमच्यासाठी जगू शकत नाही. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात — चांगले असोत वा वाईट. ”
ती क्षणभर थांबली आणि पुन्हा हसली. “म्हणून मी ठरवलं — जे माझ्या नियंत्रणात नाही ते नियंत्रित करण्याचा प्रयत्नच मी करणार नाही. ”
मुलगा पुढे झुकत विचारला, “म्हणजे… तुला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही? ”
ती डोके हलवत म्हणाली, “अगदी वाटतं. पण चिंता करणे आणि नियंत्रण ठेवणे यात फरक असतो. मी तुमच्यावर माया करू शकते, पण त्यासाठी माझी शांतता हरवू नये.”
घरात शांतता पसरली.
ती तिघांकडे प्रेमाने पाहत म्हणाली, “माझं काम — तुम्हांला प्रेम देणं, मार्गदर्शन करणं, आणि गरज पडली की तुमच्या पाठीशी उभं राहणं. पण तुमचं काम — स्वतःचं आयुष्य स्वतः हाताळणं. निर्णय घेणं. त्यांचे परिणाम भोगणं. तसंच, प्रत्येकजण मोठा होतो. ”
ती शांतपणे मागे रेलून म्हणाली, “म्हणून आता काही चुकीचं झालं, तरी मी स्वतःला आठवण देते — हे मी दुरुस्त करण्यासारखं नाही. मी शांत राहीन. तुम्ही यातून शिकाल यावर विश्वास ठेवेन. कारण जीवन असंच असतं — धडे शिकवतं. ”
थोडा वेळ घरात संपूर्ण शांतता होती. वातावरण मात्र बदललं होतं.
नवऱ्याने तिचा हात हातात घेत म्हटलं, “तू आज आम्हा सगळ्यांना काहीतरी शिकवलंस. ”
ती हसली. “आसेल कदाचित. पण हे मला स्वतःलाच आधी शिकावं लागलं. ”
त्या रात्री सगळ्यांनी तिच्या शब्दांवर विचार केला.
मुलगा पुन्हा अभ्यासाला बसला — आई ओरडली म्हणून नाही, पण जबाबदारी त्याची आहे, हे त्याला जाणवलं म्हणून. मुलीने स्वतःच कारची दुरुस्ती ठरवली आणि इन्शुरन्सची प्रक्रिया समजून घेतली. नवरा पुढच्या वेळी बाहेर जाताना स्वतःहून फोन करून सांगू लागला — कारण ती सक्ती करत होती म्हणून नाही, तर त्याला तसं करावंसं वाटलं म्हणून.
आणि हळूहळू घर हलकं वाटू लागलं.
कोणीही भीतीने नाही तर समजुतीने वागू लागले. कोणीही कशावर ओरडा होईल, या कल्पनेने दडपून राहत नव्हते.
कारण घरातला एका जरी माणसाने शांतता स्वीकारतो, तरी ती शांतता सगळ्यांत पसरत जाते.
एक जण नियंत्रण सोडतो, आणि बाकी लोक स्वतःला नियंत्रित करायला शिकतात.
आणि अशा प्रकारे — शांतता संसर्गासारखी पसरते.
☆ ☆ ☆ ☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






