श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ चुलीभोवती साकारलेले भाषिक ‘ऐश्वर्य’… – लेखक: डॉ. केशव स. देशमुख ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
बोली काय अथवा भाषा काय, ती एकठायी अशी नसते. तिच्या उगमाचं अचूक स्थान सांगता येत नाही. तथापि, अनुमानानं भाषेचा शोध नोंदवता येतो. तशा नोंदी अनेक चिंतकांनी मांडून भाषेच्या वाटा दाखवलेल्या आहेत. पण हे अंतिम सत्य नव्हे. हा सत्याच्या दिशांचा शोध होय, असे खात्रीने सांगता येते.
चूल आणि भाषा यातील भाषिक नजाकत किंवा बोलीची आशयघनता असलेले शब्दधन मराठीच्या शब्दसंस्कृतीला मिळालेले वरदानच! खेडी आज पुष्कळशी बदललेली असली तरी *अन्न हे पूर्णब्रह्म* हे वचन अंगीकारत उदरभरणाचे खेड्याचे प्रधानस्थळ *चूल* तर आजही आहेच. हा चुलीचा परिसर भाषिक ऐश्वर्याचा एक असाधारण दाखलाच. चूल म्हटले की, महिला, श्रम, सैपाक, साधने, नावे आणि भाषा असा एक एकोपा कालानुकाल असलेला.
आज यात परिवर्तन जाणवत असले तरीही *घरोघरी मातीच्या चुली* आणि या अशा चुलीभोवती असलेले भाषिक ऐश्वर्य आमच्या मराठीची अभिजात शानच अधोरेखित करणारे आहे.
या गावसंस्कृतीचे उदरभरण करणा-या या चुलीभोवती मराठी बोलीतील शब्दधन काठोकाठ भरलेले आढळून येते. ही मराठी भाषिक वैभवाची समृद्ध अशी बाब म्हणायला हवी. खेड्यातील चुलीचा हा अवाढव्य आणि महत्त्वाचा परिसर चुलीशी जूडून असलेले भाषिक वैभवच दाखविणारा आहे. ग्राम, प्रदेश, संस्कृती, बोली, शब्द-धन, श्रम आणि महिला यांच्या एकसामायिक संघटनामधून आलेले हे भाषिक वैभव फारच मोलाचे आणि भाषिक उपकृततेच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.
चूल परिसरातील बोलीभाषेचे वैभव सोदाहरण पाहूया. कंसात त्या त्या शब्दांचा साररूप अर्थ दिला आहे. जसे की, *सनकाडी* (चूल पेटविण्यास लागणारी शीघ्र ज्वलनशील अशी वाळलेली अंबाडीची काडी), *हुडवा* (शेणाच्या वाळलेल्या गोव-या सांभाळून ठेवण्यासाठी हवाबंद केलेला ढीग, साठवण), *ढेपसा* (विझून शांत झालेली गोवरीची राख, जी खेड्यात आजही अनेकदा दात निर्मळ करावयास दंतमंजनासारखी वापरली जाते), *वतोल* (अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी न्हाणीघरात असलेला भलामोठा चुल्हा, जणू चुलीचा थोरला भाऊच), *आहार* (चुलीतला धगधगता लालबुंद निखारा), *इसान* (खूप गरम पाण्यात थंड पाणी मिसळून अंघोळीस अनुरूप करावयाची पाण्याची स्थिती), *जळतन* (वाळलेला लाकूडफाटा, केरकचरा जो चूल पेटविण्यास हवा असतो तो) चूल प्रज्वलीत करण्यासाठी ही सगळी साधनसामुग्री आणि त्याभोवती असलेले हे असे मोलाचे भाषिक-धन मराठीत सलग एकाठायी आलेले आढळत नाही.
गाव-चुलीवर केवळ सैपाक होत नाही, तर तिथे साधनभाषा आणि अनोखी शब्दसंपदाही नांदत असते. आता हे पहा, *काठोट* (भाकरीचे पीठ मळण्यासाठी दोन कान असलेली लाकडाची मोठी परात किंवा पराता), *बेलने* (गव्हाची पोळी लाटण्यासाठी दोन हातांनी पोळी करावयाचा रूळ), *बुडगे* (पितळी लहान पेला), *येळनी* (खापराची मोठी वाटी किंवा वाटा), ही गावचुलीची भाषा. तव्यावरची भाकरी परतवण्यासाठी ही भाषा उलथण्याला *सराटा* म्हणते. पाणी ठेवण्याच्या खापरी भांड्यांना ही गाव-माणसं *माथन, केळी, बिनगी* अशा अनेक नावांनी या भांड्यांची ओळख करून देतात.
गावी किंवा वावरात जाताना भाकर-चटणी ठेवायला येथे टिफीन नसतो. तिथे असतो *पालव* (कापडाचा जुना तुकडा) बाजारात जाताना सॅक, पिशवी कुठली? इथे तो असतो *झो-या* किंवा *खलत्या. * गावी, गरीबाघरी संसारात धातूची भांडी ती कुठली! मातीचा, खापराचा, गरीबीची संसार हीदेखील गावाची भाषिक, सामाजिक अभिजात अशीच ओळख पूर्वापारची. इथला सगळा संसार गाडगी-मडकी यांचाच. जिन्नस ठेवायला इथे असते *उतरंड. * म्हणजे खापरी भांड्यांच्या आतल्या घरातल्या रांगा किंवा चळती. या मडक्यांनाही येथील भाषेत अनेक नवी नावे असतात. *गाडगं, मडकं, खापरी, सुगडे, डेरा* इत्यादी. सारांश काय तर स्थळ, घटना, प्रसंग बदलला की, या खापराच्या वस्तू नवा शब्दांचा पेहराव करून वावरतात हे खास वैशिष्ट्य! चुलीचाच हा भवताल, भाषेचा नवा आयाम दाखविणारा!
शिवाय, चुली म्हटले की, जिभेच्या चवीचा चवदार तृप्तीचाही नजराणाच. या चुलीवर रटरटणाऱ्या किती तरी पदार्थांना एक हटके चव आहे आणि भाषेचीही त्यांना अवीट गोडी आहे. उदा. पुरणाची पोळी बुडवून खाण्यासाठी एक पातळ गोडसर पदार्थ बनवतात ते असते *आळण. * सगळी धान्य एकत्रित करून अशा पिठांच्या बनवलेल्या पौष्टिक भाकरीला म्हणायचे *बेलडीची भाकर. * हीच भाकर खान्देशात *कयन्याची भाकर* असते. हिरव्या हरभऱ्याची कोवळी पाने कुटून त्यात चटणीमीठ घालून जो तयार होतो तो असतो *घोळाणा. * जगातल्या कुठल्याही सॅलडला पराभूत करेल एवढा अस्सल हा पदार्थ. घोळाणाचे भाषांतरही अशक्य असा चवदार हा पदार्थ. नाव, भाषा, शब्दही लज्जतदार!
गावभाषेतील चूलपरंपरेत वसून असलेल्या शब्दांना त्यांचा स्वतःचा नाद आहे आणि भाषा म्हणूनही खास अशी खुमारीही आहे. *वळवट, सरगुंडे, बोटवे* हे येथील महिलांनी अपार कष्ट करून बनवलेले भातांचे प्रकार आहेत. नूडल्सची ही आदिम रूपे आहेत. पण नूडल्सला मागे टाकणारी. गव्हाचा मूळ स्रोत वापरून *वळवट, बोटवे* केले जातात. साखर, दूध, तूप घालून खाल्ला जाणारे हे मुलायम स्निग्ध पदार्थ मूलतः सणासुदीला खाण्यात येतात. अळूची पाने इथे *चमकुरा* होऊन आलेली असतात. फळभाज्या उन्हात वाळवून ठेवतात. त्यांना *उस-या* म्हटले जाते. तसेच गूळ आणि पीठ घालून जेवणात गोड बनवलेला पातळसा पदार्थ खेडूतांच्या ताटात येतो तो *लाभडे* होऊन. हे धन जतन करायला हवे.
चूल ही आहार आणि आरोग्याचीही अन्नपूर्णाच. गावाची भाषा चुलीने अधिक रसदार आणि लयदार ठेवली यात काहीच शंका नाही. अशा एकेका स्थळाचा भाषिक महिमा सांगणारे अन्नपूर्णेचे नवे कोश सचित्र, साधार सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. हे तगडे परंतु सर्वेक्षणाचे, कष्टाचे काम आहे. हे घडले नाही तर एक मोठा ग्रामस्तरीय शब्दऐवज आपण गमावून बसू. मग आपल्याहाती उरेल ती फक्त रूखरूख! या अशा संपन्न गावरहाटीत रोज ताटात येणाऱ्या भाज्यांची नाम-भाषाही नूतन, वेगळी, रसरशीतच आहे! जसे की, कोथिंबीरऐवजी संबार, बटाटेऐवजी आल्लू, ढेमशाऐवजी दिलपसंद, छोट्या काकड्याऐवजी शैलन्या किंवा शेन्ना, भली मोठी काकडी याऐवजी वाळकं, भेंडी असं म्हणण्याऐवजी बोंडं किंवा भेंडरं म्हणणं. वांग्यांची गावाकडे बैंगनं झालेली असतात.
ज्या त्या फळ आणि भाज्यांना मातीतल्या सुवासाला धरून नावे देण्याची गावभाषेची ही रीत मराठी बोलीभाषेची चव आणि या बोलीची खचितच श्रीमंती वाढविणारी आहे. मुख्यत्वे ही सारीच्या सारी बोलीप्रवण शब्दसंपदा मातीचा आणि येथील समग्र समाजजीवनाचा भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, कालिक आणि महिलांच्या श्रमनिष्ठेचा अमोल ठेवाच! कुठलीची भाषा एकल नसते. एकट्याची नसते. भाषेचे पाझर दूर आणि खोलवर वाहाते राहिलेले असतात आणि ते समाजाच्या चलनवलनातून अखंडित राहिलेले असतात. समाज आटला की भाषा आटते. हे एवढे भाषिक मौलिकत्व जतन करण्याची जबाबदारी गावमाणसांसह जशी गावाची आहे तशी ती आपल्यातल्या प्रत्येकाचीही आहेच!
☆
लेखक : डॉ. केशव स. देशमुख
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





