श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माझी भाषा… माझा समज…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

नुकत्याच झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने बरेच काही चांगले, विनोदी वाचायला मिळाले. आणि मराठी भाषेवरच्या प्रेमाच्या लाटेने थोडी उसळी घेतली… 

आणि बोलतांना मराठीत असलेले, लपलेले, लपवलेले, आणि गैरसमज करून घेतलेले अर्थ व त्यामुळे होणारी गंमत लक्षात आली.

घरात बोलत असतानांच साध वाक्य, तुम्ही चहा आधी घेणार, कि भांडी घासून झाल्यावर. आता सांगा यात चहा घेणार… म्हणजे मिळणार का आपल्या हाताने घेणार… आदर आणि स्वावलंबन दोन्ही अर्थ यात काठोकाठ भरलेले आहेत. कदाचित हे अर्थ जितके काठोकाठ भरलेेेले आहेत तेवढा चहा पण कपात भरलेला नसतो. त्यातही आपण थोडी कपात करतो. या बरोबरच भांडी कोण घासणार… याचा उल्लेख नसला तरी बरोबर समजत. पण वाक्यात गंमत आहे.

असंच दुसरं वाक्य. काही कळलं का. आता यात विचारणा, प्रश्न, आणि असलेल्या बुध्दी बद्दल शंका… सगळ्या भावना यात आहेत. मग ते वाक्य आपल्यासाठी असेल, किंवा आपण म्हंटल असेल. पण प्रसंग, परिस्थिती, शब्दावर दिलेला जोर, आणि अर्थातच चेहर्‍यावर असणारा भाव यामुळे काय म्हणायचं ते लक्षात येतच. याच धर्तीवर असणारं आणखीन एक वाक्य, काही गरज नाही. यात राग आणि सौजन्य दोन्ही आहे. पण हे वाक्य सौं. च असेल, तर सौजन्य असेलच असही नाही. परिस्थितीनुसार याचा अर्थ आपण आपला लावायचा असतो. जमेल का हे पण याच अर्थाने ऐकायला येणारं वाक्य. यात क्षमतेवर विश्वास जाणवतच नाही. काहीवेळा काळजी, तर काहिवेळा उपरोध जाणवतो.

लक्ष कुठे आहे तुमचं हे तर लक्ष्यवेधी वाक्य आहे. यात आपण काय सांगतो या कडे लक्ष नाही. किंंवा ज्याची गरज आहे ते सोडून नेमकं कशाच निरीक्षण चाललं आहे हे लक्षात आणून दिल जातं. यावेळी लक्ष आणि लक्ष्य दोन्ही विचलित झालेलं लक्षात येत.

तुम्ही काय देणार यात अपेक्षा, कौतुक, आनंद, आश्चर्य याच बरोबर अपेक्षित असलेल काहि मिळणार नाही याची जवळपास खात्रीच असते. फक्त वेेळ, व शब्दांच्या सुरावरुन यात काय आहे ते समजून घ्याव लागतं.

एखादं काम पूर्ण केल्यावर आपण सहज म्हणतो, झालं. यात काम पूर्ण केल्याचा आनंद किंवा समाधान असतं. पण हे काम मी करु का… अशी विचारणा आपणहून केली, आणि त्यावर झालं… अस उत्तर आल, तर मात्र त्या झालं याचा अर्थ आपल्याला वेगळा सांगावा लागतच नाही. यात आनंद किंवा समाधान सापडणारच नाही. जाणवेल ती फक्त निराशा… 

आपण मराठीत बोलत असलो तरी काही इंग्रजी शब्द आपण आपलेच म्हणून सर्रास वापरतो. कदाचित एकदा आपलं म्हंटल की दूर लोटायच नाही हा मराठी बाणा यात असेल. किस हा शब्द मराठीत आणि इंग्रजीत लिहितांना वेगळा आणि अर्थही वेगळा असला तरी, व आपण बोलतांना किस याचा मराठी अर्थच घेतला तरी वाक्य कस ऐकतो त्यावरून ऐकतांना गंमत वाटते.

आज दोन्ही वेळेस ऊपवास आहे. मग… किस सकाळी करु कि रात्री चालेल… अस विचारल तर… गंमत वाटणारच. आणि समजा ऊत्तर दिल… सकाळीच कर. रात्रीच रात्री बघू… तर… किंवा एखाद्या गोष्टीबद्दल नको तितकी चर्चा सुरु असेल तरी म्हणतो, बास आता… किती किस पाडायचा… 

बोलीभाषा मराठीच असली तरी पुणं, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, मराठवाडा, नाशिक, खान्देश इथली वेगळी आहे. आमच्याकडे काहि लोकांना ळ चा उच्चार ड असा करायची सवय आहे. लिहीतांना ळ लिहीला तरी उच्चार ड असा करतात. यात काही चूक आहे अस वाटत नाही. आमच्या वर्गात नेमाडे, भोळे, काळे अशी आडनांव असणारे होते. या सगळ्यांनाच एक जण बोलवत होता. पण तो म्हणाला नेमाडे, भोडे, काडे. सगडेच्या सगडे संध्याकाडी या. समजल तरी ऐकतांना गंमत वाटायची. एक म्हण आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. आता हिच म्हण याने म्हंटली तर ती उथड पाण्याला खडखडाट फार अस म्हणेल. खळखळाट आणि खडखडाट किती विरुद्ध अर्थ आहे. पण हिच गंमत आहे.

अशा खूप गोष्टी असतील. पण भाषेत प्रेम, ओलावा, गंमत आहे कारण ती माझी आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments