श्री जगदीश काबरे
☆ “संवादाचा अभाव” ☆ श्री जगदीश काबरे ☆
भारतीय समाजात आजही अनेक कुटुंबांमध्ये विवाहाचा अंतिम निर्णय पालकच घेतात. मुलगा किंवा मुलगी यांची संमती विचारली जाते; पण अनेकदा ती केवळ औपचारिकता ठरते. स्पष्ट नकार देण्याचे स्वातंत्र्य अनेक तरुण-तरुणींना प्रत्यक्षात मिळत नाही. आई-वडिलांचा शब्द अंतिम, घराण्याची प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल? किंवा इतके चांगले स्थळ शोधून आणले आहे, अशा दबावांमुळे अनेक तरुण-तरुणी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय स्वीकारतात. अशा वातावरणात मुक्त संवादाची जागा भीती, मौन आणि कधीकधी तर क्रूर कृत्य करण्यास भाग पाडतात. परिणाम सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरीशी संगनमत करून थंड डोक्याने केतन अगरवालचा लोहगडच्या दरीत ढकलून केलेला खून.
मुलांना स्वतःच्या भावना, मत किंवा नकार मोकळेपणाने व्यक्त करता येत नसतील, तर समस्या अधिक गुंतागुंतीची बनते. दडपलेला विरोध, मानसिक ताण, असहाय्यता किंवा संताप कधी कधी चुकीच्या आणि विनाशकारी मार्गाने बाहेर पडू शकतो. अर्थात, कोणत्याही गुन्ह्याचे समर्थन यामुळे होत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या कृतीसाठी कायदेशीरदृष्ट्या जबाबदार असते. परंतु समाजशास्त्राचा उद्देश केवळ दोषी शोधणे नसून अशा घटना घडण्यामागील सामाजिक परिस्थिती समजून घेणे हा असतो.
पालकांनी मुलांच्या आयुष्याबाबत निर्णय घेताना त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. विवाह हा दोन कुटुंबांचा नव्हे, तर दोन व्यक्तींचा दीर्घकालीन सहजीवनाचा निर्णय असतो. त्यामुळे त्यामध्ये स्पष्ट, निर्भय आणि प्रामाणिक संवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. मुलाने किंवा मुलीने नाही म्हटले, तर त्या नकाराचा आदर करण्याची मानसिक तयारी पालकांमध्ये असली पाहिजे. नकार म्हणजे अवज्ञा नव्हे; तो व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे अशा घटना समाजासाठी इशारा असतात. त्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की, विवाहसंस्थेत संवादाला किती महत्त्व दिले जाते, मुलांच्या इच्छेला किती स्थान दिले जाते आणि कुटुंबातील निर्णयप्रक्रिया किती लोकशाहीवादी आहे. संवाद, परस्पर सन्मान आणि स्वायत्तता यांचा अभाव असेल, तर त्याची किंमत कधी कधी संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागू शकते.
घटना घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच संवादाने प्रश्न सोडवला तर नंतर डोक्याला हात लावून बसायची पाळी येणार नाही, हे आपली कुटुंबव्यवस्था केव्हा समजून घेईल?
© श्री जगदीश काबरे
(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





